Wednesday, November 09,2005
Maharashtra Times
'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या आठवणींत बुजुर्ग रमले होते आणि त्या ऐकताना श्ाोते हेलावून जात होते. पुलंचा परिसस्पर्श लाभलेल्या अनेकांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले होते. पु. ल. देशपांडे कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने अकादमीच्या रवींद नाट्य मंदिरात 'आठवणी पुलंच्या' हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
अभिनेत्री आशालता म्हणाल्या, 'पुलंनी अनेकदा माझ्या हातचं जेवण खाल्लंय. ते म्हणायचे, तुझ्या हातचं कारलं खातानाही कुर्ल्या खाल्ल्यासारखं वाटतं!' पुलं 'मत्स्यगंधा'च्या प्रयोगाला आले असता त्यांना जाणवलं की, रामदास कामतांबरोबरच्या प्रसंगात आशालता यांच्या डोळ्यांत पाणी येतंय. मध्यंतरात ग्रीनरूममध्ये आल्यावर त्यांनी विचारलं तेव्हा आशालता यांनी सांगितले की, आज सकाळीच रामदास कामत यांची आई वारली आणि तरीही ते प्रयोगाला आले! तेव्हा पुलं म्हणाले, कामतांचं बरोबर आहे. कलावंताला नातं नसतं. ही आठवण सांगत आशालता म्हणाल्या, 'पुढे जेव्हा माझ्या आयुष्यात दु:खाचे प्रसंग आले, तेव्हा भाईंचं हे वाक्य आठवायचं आणि मी कामाला लागायचे!'
पुण्यात पालिकेने बालगंधर्व रंगमंदीर बांधायला घेतलं, तेव्हा त्यावर टीका करणारे आपणही होतो आणि 'साधना'तून पुलंवर टीका करणारे लेखही लिहिले होते. त्याने 'साधना'चे संपादक वसंत बापट अस्वस्थ झाले. पण पुलं मात्र त्याचा कडवटपणा न ठेवता आपल्याशी वागले आणि विरोधभक्तीतून निर्माण झालेलं हे नातं पुढे फुलतच गेलं, असं प्रसिद्ध लेखक अनिल अवचट यांनी सांगितलं.
प्रफुल्ला डहाणूकर, श्ाुती सडोलीकर आणि विजय तारी यांनीही पुलंच्या हृद्य आठवणी सांगितल्या.
Friday, July 6, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment