Thursday, May 4, 2017

संभा नाभाजी कोतमिरे यांची पत्रे -- उरलंसुरलं

खास 'पु.ल.प्रेम' साठी माझी एक जूनी पोस्ट शेअर करतोय —

रोज एक . . .
१. आपल्या लोकांना ब-याच गोष्टींचे शिक्षण द्यावयास हवे

मेहेरबाण संपादक ' अणिल ' यास
संभा नाभाजी कोतमिरे याचे
प्रेमप्रूर्वक दंडवत ...
अनंतचतूर्दशीला श्री. गनरायाचे वीसर्जण केले आनी तुम्हास हे पत्र लीहावयास बसलो आहे.

खरोखर त्या दाहा दीवसांत शेकेट्री म्हनून माला जे अणुभव आले ते तुम्हांला दाहा पुस्तके वाचूण सूधा येनार नाहीत.

आपल्या देशात जे जे काही चालत आहे — ज्या ज्या भयंकर गोस्टी घडत आहेत त्या सर्वांचे काय कारन असावे याचा अणुभव मला त्या दाहा दीवसांत आला. फक्त कुठल्याही बाबतीत शीस्त नाही हेच खरे.
सादी गोश्ट. मंडपामधे बायकांणी कूठे बसावे व पुरसाणी कुठे बसावे ह्याचे केवढे मोठे बोरड लावून ठेवले होते. पन एकजन शीस्तीणे बसले तर शपथ. तरी बरे, मी स्वैंयसेवकाची टोळी शिकवून तालिममास्तराच्या हाताखाली तयार ठेवली होती. पन काही उपयोग नाही. सर्व गोंधळ. नऊचा कार्यक्रम अासला तर दाहापासून येक वाजेपर्यंत केव्हाही यावे, केव्हाही जावे.
भासन असो वा चांगले गाने असो यांच्या आपल्या गफ्फा चाललेल्या. मग त्या गानाराबोलना-याला आपन कीती गोंधळात टाकीत आहो याचा वीचारच नाही. बरे मधूनच एकदम उठून जाने—जाताना नीमूटपणे जावे तेही नाही. आपल्या कुठेकुठे बसलेल्या पोराबाळांना मोठमोठ्याणे हाका मारीत सर्व मंडळींचा चालू कार्यक्रमातील लक्ष्य काढूण आपल्याकडे ओढने असला आचरटपणा करन्यात आपले लोकांणा काडीचीही लाज वाटत नाही हे पाहून मी मणातल्या मणात भडकून जात असे. प्रंतु मी जबाबदारीच्या जागेवरआसलेणे आपले डोक्यावर बर्फाचा खडा आहे आशा समजुतीणेच वागन्याचे ठरिवले होते. त्यामुळे शक्य तीतके भांडनतंट्याचे प्रसंग टाळले.
प्रंतु दूर्दैवाणे एक प्रसंग मला टाळता आला नाही. स्त्रियांचा कार्यक्रम चालू असताणा काही हलकट लोक आचरटपना करन्याच्या ऊदेशाणे तेथे आलेले दीसले. त्यांच्यापैकी एक नीसटला पन् चौगेजन मात्र खात्रीणें हळदमीटाचे पलिस्तर बांदून बसले आसतील. भलता चावटपना माला खपत नाही आनी तसा दीसला तर मी तोंडाचा ऊपयोग न करता हाताचाच करतो.

आपले लोकांणा बरेच गोशटीचे शीक्षण द्यावयास पाहिजे हे मात्र खरे. ऊदाहरनार्थ रस्त्यात पाण खाऊन थूकने. परवा अामच्या मंडपात एकजन पीचकारी मारत आसताना आमच्या मेव्हन्याने त्याचे तोंड भाहेरुणही रंगिवले. माला वाटते बरेच वेळा पायातल्या वहानेला हाताशी धरल्याशिवाय सुदारना होत नाही. हा आपला माजा रांगडा न्याय आहे. पन जगात दुबळेपना सारका श्राप नाही. नम्रपना असावा पन लाचारी नसावी. आता मी यवढ्या मोठमोठ्या बंगलेवाल्यांकडे चीकी विकतो पन कदी कोनाची लाळ घोटत नाही. ऊगाच ' साहेब ' 'हुजूर ' कशाला ? माला येक गोश्ट कळते. चीकी अशी हवी की जी पाहून तोंडाला पानीच सुटले पायजे. मग ते तोंड कुनाचे आहे हा सवाल नाही. एकदा त्या वस्तूवर मण गेले की मानूस ते घेनारच. फक्त लोकांची मणे ओढन्यासाठी तुम्ही मासीकवाल्याप्रमाने बायाबापड्यांची रंगीबेरंगी अब्रू चवाठ्यावर मांडली नाही. म्हनजे झाले ! चिकीच्या वरच्या कागदावर बाईचा मुखवटा चिटकावून चीकी खपवन्याची पाळी जर मजवर आली तर खुशाल हमालाचा धंदा करीन.

माज्या म्हनन्याचे तात्पर्य हेच. धंदा असो, लीहीने छापने असो, आथवा चारचौघांत वागने असो आपल्या लोकांला जंवर शीस्तीची आवड नाही तंवर आपल्या देशाचे पाऊल कधीच फुडे पडनार न्हाई. स्वताच्या जबाबदारीची जानीवच आपनाला नाही. परवाच येका शाळेच्या दारात मी चीकी वीकत उभा होतो. पाच मास्तरांपैकी चार मास्तरांची धोत्रे कळकट दाड्या वाडलेल्या आनी चेह-यावर मुडद्याची कळा ! धोत्रे फाटकी अासती तर गरीबुमुळे आहेत म्हटले आसते पन कळकटपनाचे गरीबीशी काय नाते ? बरे साहापैशाच्या पात्यात दाहा दाढ्या होतात. आता संपादक माहाराज , तुम्हीच सांगा पोरांना वळन लावना-या मास्तरांना स्वताची शीस्त सांभाळायला नको का ?
परवाच्या ऊच्छवात असेच. दोनतीन भाषने ठेवली होती. पन भाव न देनारा एक जन वेळेवर आला अासेल तर शपत. कोन तास भर ऊशीरा तर कोनाचा येतच नाही म्हनून निरोप ! आनी हिते आपला शेकेट्री बसला आहे ताम्हनात देव बुडवून ! आनी लोक जांभया किंवा शिव्या देताहेत. आपल्याला आपल्या कामाचे, वेळेचे, जबाबदारीचे, कसलेच महत्त्व नाहि त्यामूळे आसे होते. पन ह्या सर्वांचे मूळ ती 'शीस्त' तीचा दुष्काळ ! मग सुदारना कसली नी काय कसले ?
तुमचा क्रुपाबिलाशी,
संभा नाभाजी कोतमिरे
( चीकीचे व्यापारी )
अनिल साप्ताहिक, १८/०९/१९४७

— पुलं
संग्रह - उरलंसुरलं
ता.क. — पंतप्रधानांनी केलेले सार्वजनिक स्वच्छतेचे आवाहन अन् 'आप'च्या झाडूने राजधानीत केलेली ' राजकिय साफसफाई ' या पार्श्वभूमीवर पुलंचा १९४७ मधे लिहिलेला सार्वजनिक शिस्तीवरचा हा लेख खरोखरचं अप्रतिम !!!

संजय आढाव (११/०२/२०१५)

0 प्रतिक्रिया: