Wednesday, August 7, 2019

समृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा - देवेंद्र जाधव

पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला लाभलेलं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होय. त्यांचं लिखाण आणि त्यांनी उभी केलेली व्यक्तिचित्रं आजही वाचकांच्या मनावर गारुड करून आहेत. हसता हसता वाचकांना अंतर्मुख करण्याची किमया पु.लं.नी त्यांच्या लिखाणातून साधली. 2018 हे पु.लं.चं जन्मशताब्दी वर्ष आहे. याचंच औचित्य साधून अप्पा परचुरे यांच्या संकल्पनेतून ‘परचुरे’ प्रकाशनाने ‘कसा मी असा मी’ हे पुस्तक वाचकांसमोर आणले आहे. पु.लं.नी लिखाणासोबत विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. मग ते संगीत असो वा अभिवाचन. त्यामुळेच संपादकांनी पु.लं.चे विविध विषयांवरचे काहीसे दुर्मिळ लेख, त्यांनी केलेली भाषणं तसेच मुलाखती आदी गोष्टी या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.

पु.लं.च्या वाचनप्रेमापासून पुस्तकाची सुरुवात होते. ग्रंथालय आणि पुस्तकांशी जडलेलं अनोखं नातं पु.लं.नी ‘ग्रंथालय ः एक आनंद निधान’ या लेखातून सांगितलं आहे. गाण्यातील ‘गर्दी’ आणि ‘दर्दी’ यातील फरक ‘संगीत’ या लेखात पु.लं.नी समजावून सांगितला आहे. ‘भाषांतरे आणि रूपांतरे’ या लेखात पु.लं.नी एक प्रकारे स्वतः केलेल्या कामाची चिकित्सा केली आहे. पाश्चात्त्य नाटकांच्या संहितेचं मराठी रंगभूमीवर रूपांतर करताना त्यात कोणते बदल करावे लागले याचा एक प्रकारे शोध पु.लं.नी घेतला आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या शिवाजी महाराजांवरील मूळ बंगाली कवितेचा पु.लं.नी केलेला अनुवाद हा एक वस्तूपाठच म्हणावा लागेल. त्यांनी अनुवाद करताना वापरलेले अस्खलित मराठी शब्द आपल्याला काहीसे नवीन असले तरीही त्यातून आपल्या शब्दसंपदेमध्ये भर पडते हे निश्चित.

पु.लं.चा संगीतविषयक असलेला अभ्यास या पुस्तकातील बहुतेक लेखांमधून दिसून येतो. स्वर आणि आलाप यांविषयी तसेच पाश्चात्त्य संगीताविषयी त्यांना असलेली जाण प्रत्ययास येते. पु.लं.चं बंगाली भाषेवर आणि संगीतावर विशेष प्रेम होतं. तसेच दूरदर्शनच्या प्रारंभीच्या काळात पु.ल. सक्रिय होते. त्या वेळेस कार्यक्रमाचे नियोजन करताना पु.लं.च्या ठायी असलेला हजरजबाबीपणा तसेच मुलाखत रंगतदार होण्यासाठी त्यांनी वापरलेली हुशारी आदी गुणांचं दर्शनसुद्धा आपल्याला होतं.

या पुस्तकातील एक महत्त्वाचा लेख म्हणजे ‘भगवान श्री सखाराम बाईंडर’. विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाईंडर’ या नाटकाचं पु.लं.नी केलेलं विडंबन सुसंस्कृत आणि सभ्यपणाचा बुरखा घालून वावरणाऱया समाजाला चिमटे काढतं. सखाराम बाईंडर नाटकावरून मोठा गदारोळ माजलेला, परंतु प्रेक्षकांनी हे नाटक उचलून धरलं. पु.लं.नीसुद्धा हाच मुद्दा पकडून हा विडंबनपर लेख लिहिला आहे. ‘आचार्य अत्रे’ आणि ‘बालगंधर्व’ या दोन महान व्यक्तींचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कार्याचा गौरव पु.लं.नी लालित्यपूर्ण शैलीत केला आहे.

या पुस्तकात पु.लं.चे असे अनेक लेख वाचायला मिळतात. यातील प्रत्येक लेखातून पु.ल. देशपांडे हा ‘अवलिया’ आपल्याला भेटत राहतो. पुस्तकाच्या अखेरीस पु.ल. गेल्यानंतर सुनीताबाईंनी पु.लं.ना लिहिलेलं पत्र वाचता येतं. पु.ल आणि सुनीताबाई यांच्या सहजीवनाचं आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं हे पत्र आहे. नवरा-बायकोचं मैत्रीचं आणि खेळीमेळीचं नातं या पत्रातून पाहायला मिळतं.

प्रत्येक लेखाच्या शेवटी पु.लं.नी केलेली मिश्किल विधाने चौकटीत दिली आहेत. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेलं पु.लं.चं व्यंगचित्र मुखपृष्ठाच्या स्वरूपात वापरण्यात आलं आहे. पु.लं.च्या साहित्याचं सखोल चिंतन करणारी डॉ. अरुणा ढेरे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे. डॉ. नागेश कांबळे यांनी या लेखांचं संकलन केलं आहे. पु.ल. त्यांचं आयुष्य अखेरपर्यंत मनमुराद जगले. यातील प्रत्येक लेखातून पु.लं.चं जीवनातील प्रत्येक घटकाबद्दल असलेला आशावाद प्रकट होतो. पु.लं.वर प्रेम करणाऱया प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक आवर्जून संग्रही ठेवावं, असंच आहे.

कसा मी असा मी
मूळ लेख पु. ल. देशपांडे
संकल्पना आणि मांडणी अप्पा परचुरे
संकलक डॉ. नागेश कांबळे
पृष्ठs १८४, मूल्य २०० रुपये

--देवेंद्र जाधव
सामना
२१ ओक्टोबर २०१८

0 प्रतिक्रिया: