Tuesday, June 27, 2017

प्रिय भाई

१७ वर्ष झाली, भाई, तुम्हाला जाऊन.... तरी अजून रोज भेटता.... कधी वर्तमानपत्रातून, कधी पुस्तकातून, कधी ऑडिओ कॅसेट्च्या रूपात, कधी गाण्यात, कधी हार्मोनियमच्या स्वरात, कधी जाहिरातीतल्या कोट्यांमधून....

अजूनही कधी एसटीच्या प्रवासात म्हैस आडवी जाते, तेव्हा तुम्ही भेटता.

डिजिटायझेशनच्या ह्या बदलत्या काळात रस्त्यानी एखादं साईन-बोर्ड पेंटिंगचं दुकान दिसलं की, तुमची आठवण येते.

पोस्ट खाती आता फक्त नावालाच उरली आहेत. पण, तुम्ही कथांमध्ये रंगवलेली पोस्ट ऑफिसं अजूनही जिवंत आहेत.

गल्लोगल्ली अध्यात्माची दुकानं लागलेली पाहून आजही तुमचं, 'असा मी, असा मी' आठवतं आणि हसू येतं.

"मला सगळ्याच राजकारण्यांचं म्हणणं पटतं" हे अजूनही कित्येकांच्या बाबतीत घडताना दिसतं... अगदी माझ्याही.

आजूबाजूला पसरत चाललेली अराजकता आणि अस्वच्छता पाहून "इंग्रज गेला तो कंटाळून... शिल्लकच काय होतं, इथं लुटण्यासारखं ?" हे नेहमी आठवतं.

एखाद्या टपरीवर चहा घेत असताना नकळत आधी चहाचा रंग पाहिला जातो आणि 'अंतू बर्वा'चा चहाच्या रंगावर मारलेला शेरा आठवतो.

भारत सरकार कडून मिळणारा द्रोणाचार्य पुरस्कार 'चितळे मास्तरां'ना मिळायला हवा, अशी एक भाबडी आशा मनात घर करून आहे.

नवीन घर बांधणारे लोक आजही हातात विटा घेऊन समोर उभे राहताहेत.

एखादी मुलगी कुत्र्याशी लडिवाळपणे बोलत उभी असेल तर 'पाळीव प्राण्यां'चा संपूर्ण अल्बम डोळ्यापुढून झर्रकन निघून जातो.

लग्नाच्या पद्धती बदलल्या, सर्व सोयी उपलब्ध झाल्या, मोबाईलच्या एका क्लीक वर सुपारी पासून भटजींपर्यंत सर्व गोष्टी मिळत असल्या, तरी प्रत्येक मांडवात नारायणाची उपस्थिती असतेच ! त्याला अजून रिप्लेसमेंट मिळालेली नाही.

चाळी जाऊन सोसायट्या आल्या पण गच्चीचा प्रश्न अजूनही तसाच आहे.

जुन्या आणि मोजक्याच शिल्लक असलेल्या काही इराणी हॉटेलांमधून आजही असंख्य 'नाथा' कामात एकटेच झुरत आहेत आणि त्यांच्या वाक्याची सुरवात अजूनही "बाबा, रे" नेच होत आहे.

आजच्या ह्या कॉम्पिटिशन च्या जमान्यात काही 'रावसाहेब'ही आहेत. टिकून नाही, असं नाही... पण, तुमच्यासारखे कलावंत त्यांच्या वाट्याला येत नाहीत. हे जग चालवण्यासाठी अजूनही कोणाला काही करावं लागत नाही.

तुम्ही अनुभव दिलेल्या प्रत्येक गोष्टी आज अस्तित्वात आहेत. पण, तुम्ही नाहीत.

तुमच्या आठवणी, तुमचे किस्से, तुमच्या कथा, तुमची नाटकं, तुमची गाणी, तुमचं संगीत आजही अजरामर आहे... तुकारामाच्या गाथेसारखं...

भाई, तुमच्याशी इमोशनल अटॅचमेंट असणारी बहुधा आमची ही शेवटची पिढी...!

मागे एकदा एका मित्राकडे गेलो असताना त्याने त्याच्या पुस्तकांचं कपाट माझ्यापुढे उघडलं. कपाट कसलं, खजिनाच तो. विविध विषयांची, विविध लेखकांची असंख्य पुस्तकं त्यात आपलं अस्तित्व पणाला लावून उभी होती. पण, त्यातही तुमची पुस्तकं मला चट्कन ओळखता आली... कारण, तुमच्याच भाषेत सांगायचं तर "कोणत्याच पुस्तकाची पानं एवढी चुरगाळलेली नव्हती !"

लेखक : ओंकार जोशी

Wednesday, June 21, 2017

प्रिय पु.ल.

कागदावर तारीख लिहून मी कितीतरी वेळ त्या कोर्‍या कागदाकडे पहात होतो.....निश:ब्द. काहीतरी हरवलं होतं. जाणवतं होतं , ऐकूही येत होतं , फक्त दिसत नव्हतं. आठवणींचा पूर , विचारांचं उठलेलं काहूर , झालेला एक एक संस्कार , संवाद साधत होता. पण सारं काही मुकं होतं. त्या अभिव्यक्तीने जशा डोळ्यांच्या कडा ओल्या होत होत्या तश्या आजही होऊ लागल्या होत्या. पटकन पाणी गालावर ओघळेल असंही वाटत होतं जे पूर्वी कधीही होत नव्हतं. अशा अनेक मर्यादा त्या अभिव्यक्तीनेच घालून दिल्या होत्या.

विचारांना आणि संवादांना गती आली. ३०-३५ वर्षांचा फेरफटका झाला. खूप ठिकाणी गेलो. अगदी परदेशात सुध्दा जाऊन आलो. खूप जण भेटले. काही शब्द भेटले , काही सूर एैकू आले. सारं काही माणुसकीने ओतप्रोत भरलेलं , देखणं आणि सुसंस्कृत. टाळ मृदुंगाच्या गजरात इंद्रायणीचा काठ कुंभारासकट दर्शन देऊन गेला. विशाल सागर , तिथल्या नारळी पोफळीच्या बागा आणि डिटम्याच्या दिव्याच्या उजेडातील खपाटीला गेलेली पोटं आतमधे काहीतरी कालवून गेली.

परदेशातील घर हरवलेली माणसं भेटली. लग्न कार्यातील निमंत्रण पत्रिका आठवली. मोतीचूराचा लाडू आठवला. टाचा झिजलेल्या चपला आठवल्या. रेल्वेच्या बोगीतील १००% तुकाराम आठवला आणि अचानक उदबत्तीचा वास आला. नव्या कोर्या छत्रीवर पडलेलं पावसाचं पाणी आणि छत्री वर करून केलेल्या छत्रपतींचा जयघोष आठवला. पटकन मुठी आवळल्या. दचकलो , ओळीत चुकून नववा शब्द आला होता , खोडला आणि नविन ओळ सुरू केली. क्षणात कागदावरती लांब केसांचा शेपटा पडला , वाटलं पुढचा पेपर भरूच नये. पण तेवढ्यात कल्हईवाल्या पेंडश्यांच्या बोळातील निळे डोळे मला शांत करून गेले.

जीवन कळलेली माणसं भेटली. सवाई , कुमार इतकंच काय हवाई गंधर्वही भेटले. त्यांच्या सारख्यांच्या गुणांचं आवडीने केलेले गायन एैकू आलं. शांतीनिकेतनातील पारावर बसलेला शांत वृध्द तपस्वी आठवला. बघता बघता चाळीचा जिना चढून गच्चीवर आलो. पाहिलं तर तिथे मोठ्ठे कुलूप म्हणून जिने उतरून खाली येऊ लागलो तर वृध्द चाळीचं मनोगत एैकू येऊ लागलं.

वरातीच्या निमित्ताने गावातील लोकल नाट्य पाहिलं. दिल देके देखोचा रिदम एैकला. दमयंतीमालेचं हंबरणं एैकू आलं. कोर्टाची साक्ष झाली. हशा आणि टाळ्यांचा गजर एैकू आला. बघता बघता गोष्टी इतिहास जमा झाल्या.

या सगळ्या गोष्टी तशा आपल्या आसपास असणार्या , दिसणार्या पण तरीही लक्षात न आलेल्या. माणसं , वस्तु ,वेगवेगळी ठिकाणं , सूर , शब्द आज सगळे अचानक एकदम जाणवायला लागले , दिसायला लागले. शब्दावाचूनचे सूर एैकता एैकता शब्दच सगळं सांगू लागले. आणि एकदा काय झालं ! अहो परवाचीच गोष्ट आहे असं म्हणत म्हणत गोष्टी गोष्ट सांगू लागल्या काय हरवलं आहे त्याची.

विनम्र अभिवादन.

अतुल कुलकर्णी
नारायणगाव
दि १२-०६-२०१७