गांधीजींनी एके ठिकाणी म्हटले आहे की, “ गांधीवाद नावाची कोणत्याही प्रकारची वस्तू नाही. आणि माझ्यामागे कोणताही असा पंथ चालू व्हावा अशी माझी इच्छा नाही. मी एखादे नवे तत्त्व किवा एखादा नवा सिद्धान्त शोधून काढला, असा दावाही मला करावयाचा नाही.'' गांधीजींच्या या उद्गारावरून मला तुकोबांच्या अभंगातील ओळ आठवली:-
“आम्ही वैकुंठवासी। आलो याचि कारणासी ।
बोलिले जे ऋषि । साच भावे वर्ताया ॥”
ऋषींनी शोधलेली आणि माणसामाणसाला निरामय, सुंदर जीवनाचा आनंद देणारी सनातन तत्त्वे संतांनी आचरून दाखविली. ज्ञानेश्वरांनी ह्या अशा शुद्ध, निर्भय आचरणालाच उद्देशून म्हटले आहे, “जयांच्या लीळांमाजी नीति जियाली दिसे.'' त्यांचे आचरण पाहणे म्हणजेच नीतितत्त्वांचा विकास पाहणे आहे. गांधीजींचा शोध हा त्यांच्या लेखनातून किवा वक्तृत्वातून घेण्यापेक्षा आचरणातून घ्यायला हवा. वक्तृत्वापेक्षा कर्तृत्वातून त्यांना शोधायला हवे. त्यांच्या शब्दापेक्षा त्यांचं मौन अधिक बोलके असे आणि उपदेशापेक्षा उपोषणातून अधिक सामर्थ्य प्रकट होई. म्हणूनच गांधीवाद गांधींना मंजूर नव्हता.वादात प्रतिपक्षावर मात करण्याचा अभिनिवेश असतो. तिथे बहुधा जो तो बुद्धीच सांगतो आणि उरते ते करंटेपण. वाचाळतेला क्रियेचा आधार नसला तर 'शब्द बापुडे केवळ वारा' होऊन जातात. गांधींचे तत्त्वज्ञान त्याच्या प्रत्येक क्रियेतून दर्शन देत गेले. ईश्वर आणि प्रार्थना ह्यांवर नितान्त श्रद्धा असणारे गांधीजी त्या ईश्वराचे दर्शन भारतातल्या बहुसंख्यांना भाकरीतूनच घडवावे लागेल हे ओळखून होते. त्यांना भरल्या पोटातला वेदान्त नको होता आणि उपाशी पोटोबांना विठोबाची भक्ती सांगायची नव्हती. म्हणूनच त्यांच्या अध्यात्माचा टाळकुटेपणा झाला नाही. भगवन्ताचे अधिष्ठान आणि चळवळीचे सामर्थ्य ह्यांचा संगम झाला पाहिजे. नुसत्या भगवन्ताच्या अधिष्ठानाच्या जयजयकारातून आळसाला आणि भोंदूपणाला उत्तेजन मिळते. आणि सात्त्विक अधिष्ठानाशिवाय होणाऱ्या सामाजिक वा राजकीय चळवळीतून द्वेषाचे विषारी वातावरण तयार होते, तत्त्वच्युती होते, अविश्वास निर्माण होतात. अविश्वासातून भय आणि भयातून हिंसा जन्माला येते. दुर्बलांचे दुर्बलत्व वाढते आणि सबलांचे दानवीकरण होते.
गांधीजींनी सत्य, अहिंसा यांसारख्या सनातन मूल्यांचे स्वरूप कृतीतून प्रकट करण्यात आयुष्याचा प्रत्येक क्षण वेचला. सामान्य माणसाला हवा असतो तो त्याच्या डोळ्यांना दिसणारा आचरणाचा धर्म. आणि हा धर्म सांगणारा माणूस आपल्यांतच आहे, आपल्या वेदना जाणणारा आहे, त्या वेदना भोगलेला आहे, हा विश्वास ऐकणाराच्यात निर्माण व्हावा लागतो. गांधीजींचे हे लौकिकत्व अत्यंत अलौकिक होते. म्हणूनच त्यांचे अनुयायीत्यांच्यासमवेत पुढारी आणि अनुयायी ह्या नात्याने न चालता त्यांचे कुटुंबीय म्हणून चालले. ते महात्माजी होते, पण त्याहूनही अधिक ते ‘बापू’ होते. सरदार वल्लभभाई म्हणजे नखशिखान्त विलायती बालिष्टर. पण बापूंच्या सहवासांत आले आणि हा पोलादी पुरूष बापूंची दात घासण्याची लिंबाची काडी तयार करणे, फळे कापणे, मधपाण्याचे मिश्रण करणे ही कामे मागून घेऊन करू लागला. असामान्य बुद्धिमत्ता आणि प्रखर पांडित्य असलेले विनोबा आश्रमात गांधीजींच्या जोडीला बसून धान्य निवडीत, दळण दळीत. जनाबाई दळिता कांडिता विठ्ठलाचे गीत गात होती, कबीर शेले विणताना माणसांच्या वेदना पाहून रडत होता, चोखामेळा रस्ता झाडत देवाचे नाव घेत होता, सावता माळी मळ्यातल्या कांद्यामुळ्यांच्या लागवडीत विठ्ठलाचे रूप पाहत होता. महात्माजींच्या आश्रमांत ही सारे कामे देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन चालली होती. व्यासपीठावरून भाषणे करणारे, सरकारशी शाब्दिक किंवा शस्त्र धारण करून चकमकी करणारे पुढारी जनतेला ठाऊक होते. ते वंद्यही होते. ते तुरूंगवासही सहन करीत. त्यांच्या शौर्याविषयी लोकांना आदरही होता. परंतु पुढ्यात चरखा घेऊन सूत काढणारा आणि आपल्यासारखेच दळणटिपण करणाराआणि आपल्यासारखेच गरीबीचे जिणे जगणारा, तसाच अर्धनग्न असणारा हा माणूस आपल्या दु:खाशी सर्वस्वी परिचित असणारा आपला तारक आहे ही जाणीव गांधींना विलक्षण जवळीक देऊन गेली. गांधींच्या काळात भारत हा एक विशाल कुटुंब बनला तो गांधींच्या ह्या लोकविलक्षण लौकिकत्वामुळे. भारतातल्याच नव्हे, तर जगातल्या कुठल्याही माणसाला सवंसंगपरित्यागी माणसाकडे सदैव जिव्हाळा आणि आदर अशा संमिश्र भावनेनेच पहायला आवडते. भारतात तर त्याचे विशेषच कौतुक. म्हणूनच गांधीजींच्या सार्वजनिक जीवनातल्या उदयाबरोबर गांधीवादाचा जन्म न होता गांधीयुगाचा जन्म झाला. वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवनांत मानवी समाजाच्या धारणेला अत्यावश्यक असणाऱ्या सनातन मूल्यांचा आधार असलेले नवे विचार गांधींनी दिले. गांधींनी नवा धर्म दिला. नाही, नवी व्रते गांधींच्या आचाराधिष्ठित विचारांना गांधीवाद न म्हणता गांधीयोगच म्हणायला हवे. योगात जोडण्याची कल्पना येते, आणि जोडायला दुवा लागतो. भारतातला 'दारिद्र्य' हा दुवा गांधींनी सर्वांत महत्त्वाचा मानला. सार्या व्यथांचे मूळ दारिद्रयात आहे, हे सनातन सत्य आहे.
ह्या देशात गांधीजींच्या काळात आणि आजच्याही काळात जास्तीत जास्त लोकांची समान व्यथा म्हणजे दारिद्र्य. विवेकानंदांनीही लक्ष्मीनारायणापेक्षा दरिद्री- नारायणाच्या उपासनेलाच महत्त्व अधिक दिले. भारतात आर्थिक दारिद्र्याइतकेच भयानक आध्यात्मिक दारिद्र्य आहे. ईशावास्याची घोषणा ज्या देशात झाली त्या ह्या देशाइतका अध्यात्मदृष्ट्या दरिद्री देश भौतिकवादी म्हटल्या गेलेल्या यरोपखंडातही नसेल. सर्वाभूती एकच ईश्वर असल्याचा आपण गजरच अधिक करतो. साक्षात् त्या देवाच्या दारातच आम्ही स्पृश्याला घडविणारा ईश्वर आणि अस्पृश्याला घडवणारा ईश्वर असे त्या ईश्वराचेच दोन तुकडे केले. आम्हाला दारिद्रयामुळे माणुसकी परवडत नाही की माणुसकी नाही म्हणून आम्ही दरिद्री, कोण जाणे. दारिद्र्याच्या खातेऱ्यात लोळणार्या माणसांकडे आपण चांगल्या कोरड्या डोळयांनी आणि त्याहून कोरड्या मनाने पाहू शकतो. रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी यांसारख्या अमानुष आचरणपद्धतीत भारताला अग्रमान मिळावा, असला हा देश राजकीयच काय पण धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक किवा वैचारिक पारतंत्र्यात न पडता तरच आश्चर्य. गांधीजींनी पहिले बोट ठेवले ते ह्या आध्यात्मिक आणि आर्थिक दारिद्रयावर. ह्या आध्यात्मिक दारिद्रयाविरुद्ध आणि त्यातूनच निर्माण होणार्या सहानुभूतिशून्य जगण्यावर अत्यंत तीव्रतेने आघात करणारा गांधींच्याही आधीचा महात्मा ज्योतिबा फुले. उपास, दैन्य, उपेक्षा ह्यांच्या संगतीत नांदणारा आणि भिक्षुकशाहीने निर्माण केलेल्या भगवंताच्या भुताला देव मानणारा शेतकरी आणि त्याच भिक्षुकशाहीला बळी दिलेल्या विधवा आणि अस्पृश्य, ह्यांच्याविषयीच्या कळवळ्याने, अत्यंत तीव्रतेने जीवनातील सत्याचा शोध घ्यायला निघालेले ज्योतिबा फुले मला इतर कुठल्याही पुढाऱ्यापेक्षा गांधीजींचे खरे पूर्वसूरी वाटतात. फुल्यांची वाणी कठोर हाती, पण अंतःकरण माणुसकीने ओथंबलेले होते. गांधींचे अंत:करण आणि वाणी दोन्हीही मृदु असली तरी निर्धार वज्राला भेदणाराच होता. महात्मा फुल्यांच्या कार्याची मर्यादा महाराष्ट्रापुरतीच राहिल्यामुळे भारतीय पातळीवर त्यांच्या कार्याचे कौतुक झाले नाही. पण त्यांनी जी चळवळ सुरू केली ती सत्यशोधनाचीच होती. गांधींनीही प्रथम प्रयत्न सुरु केले ते सत्याचेच प्रयोग. प्राचीन भारतीय ऋषी हे प्रयोग करणारे वैज्ञानिक होते. गांधींच्यात सामान्य आणि असामान्य दोघांनाही प्रयोग करणारा ऋषी आढळला. फरक इतकाच की, हा ऋषी सामान्यांच्यात वावरणारा सन्त होता. हिमालयांत जाऊन बसणारा योगीराज नव्हता.हा आपल्यात राहणारा, आपल्यासारखाच, आपल्याला समजणारी भाषा बोलणारा आणि आपल्या दुःखांना वाचा फोडणारा, ती दुःखे हलकी करण्याच्या कृती शोधून काढणारा आहे, ह्याची जाणीव, जिथे प्रकाशाचा कसलाही किरण पोहोचू शकत नव्हता, असल्या खेड्यांतल्या सामान्यांतल्या सामान्य माणसाला झाली.
स्मृतिकारांनी 'ज्ञानी' माणसाच्या वागण्याचे मोठे मार्मिक वर्णन केले आहे.:-
यं न सन्तं न चासन्तं
नाश्रुतं न बहुश्रुतं ।
न सुवृत्तं न दुर्वृत्तं
वेद कश्चित्स ब्राह्मण: ॥
जो संतांसारखा असामान्य नाही किवा जो संतपणाला पारखाही नाही, जो अविद्वान नाही आणि विद्याभ्यासजडही नाही, जो सदाचाराचा बडेजाव करणारा नाही किवा दुराचारीही नाही, असा लौकिकांत लौकिक आणि अलौकिकांत अलौकिक असणारा माणूस पोथीनिष्ठांना बुचकळ्यात पाडीत असला तरी सामान्यांना आपल्याहून थोर असल्याची जाणीव असूनही आपला वाटतो. म्हणूनच राजकारणातील पंडितांना गांधीजींची जी 'फॅड्स्' आहेत असे वाटत होते, ती सामान्य जनांना अहिंसामय प्रतिकाराची समर्थ आयुधे वाटली. गांधी पंचा नेसून उघडे राहिले. वस्त्राधिष्ठित संस्कारांना सुधारणा समजणाऱ्या लोकांना त्यांत ढोंग दिसले, परंतु कोट्यवधी अर्धनग्न भारतीयांना त्यात हा माणूस आपल्यासारखा वाटला. गांधींच्या आधी हा वेडेपणा (?) फक्त ज्योतिबांनी इंग्रजांच्या मुंबईत भरलेल्या दरबारी जातांना केला होता. गांधीजींच्या उदयापूर्वी 'स्वराज्य' हा भारतीय बुद्धिमंतांचा आणि शस्त्रवंतांचा इंग्रज बुद्धिमंतांशी आणि शस्त्रवंतांशी चाललेला झगडा होता. गांधीजींनी तो न्यायाचा अन्यायाविरुद्ध चाललेला, माणुसकीचा अमानुषत्वाशी चाललेला झगडा केला.हा झगडा केवळ राष्ट्रीय नव्हता. जगातल्या दलितांचा त्यांना दलितावस्थेत ठेवणारांशी चाललेला हा झगडा होता. गांधींनी राजकारणाचे अध्यात्मीकरण केले ते सायंप्रार्थनेने नव्हे, तर जात, धर्म, राष्ट्र, वेश ह्या कृत्रिम तटबंदीविरुद्ध पुकारलेल्या पवित्र शंखनादाने. डॉ. मार्टिन ल्यूथर किंगच्या बलिदानामुळे गांधींच्या आंतरराष्ट्रीय प्रभावाची जाणीव जगाला अधिक झाली, तरी एकोणीसशे एकोणतीस साली म्हणजे डॉ. किंग ज्या साली जन्माला आले आणि वयाने अवघे सात महिन्यांचे होते, त्या वर्षी गांधींनी निग्रोंच्या दास्यमुक्तीच्या चळवळीला त्यांच्या 'क्रायसिस' नावाच्या मासिकासाठी संदेश पाठविता होता. त्यात त्यांनी म्हटले होते- “गुलाम असणे यात कोणताच कलंक नव्हता. गुलामांचे मालक असणे यात खरा कलंक होता. परंतु ते जाऊ द्या. गतकाळाचा हा संदर्भ उकरून काढणे आता बरोबर होणार नाही. भविष्यकाळाकडे आपण नजर ठेवू. जे लोक सत्य, पावित्र्य व प्रेम यांचा आग्रह धरतील तेच आगामी काळाची घडण करू शकतील.” इतकेच नव्हे तर त्यानंतर सहाच वर्षांनी म्हणजे १९३५ साली गांधींच्या भेटीला निग्रो कार्यकर्त्यांचे एक पथक भारतात आले होते. त्या पथकाला गांधींनी सांगितले, “अखेरीस अहिंसेचा पवित्र संदेश जगाला पोहोचविण्याचे ऐतिहासिक कार्य निग्रोंच्याच द्वारा होणार आहे.” गांधीजींना अभिप्रेत होते ते सार्या मानवी समाजाचे स्वातंत्र्य. लिकनने म्हटले आहे, “मी कुणाचा जसा गुलाम होणार नाही, तसाच कुणाचा मालकही होणार नाही.''
स्वातंत्र्य ह्याचा अर्थच मुळी भयशून्य होणे हा आहे. भारतीय तत्त्वज्ञानात चित्त भयशून्य करणे हा गीताप्रणीत अंतिम आदर्श आहे. लोकमान्य आणि गांधी ह्यांची गीतेवरची अपार निष्ठा ह्या भयशून्य होण्याच्या साधनेतूनच आली. “आनंदं ब्रह्मणो विद्वान् न विभेति कदाचन।” भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात बहुतेक साऱ्या क्रांतिकारकांना गीतेचे आकर्षण भयशून्य होण्याच्या तत्त्वज्ञानाचा मार्गदर्शक ग्रंथ म्हणूनच होते. भयशून्यता ही स्वातंत्र्याचीच नव्हे, तर जीवनातल्या सार्या थोर कर्तृत्वाला आवश्यक असणारी अटच आहे. याच संपूर्ण मुक्तीच्या कल्पनेमुळे गांधींना इंग्रज मालक जाऊन देशी मालक यावा, हे अभिप्रेतच नव्हते. म्हणूनच त्यांनी सारी शक्ती माणसामाणसांतल्या उच्नचनीचतेच्या कल्पना नष्ट करण्याकडे लावली. मानवी इतिहासातला हा काही पहिलाच प्रयत्न नव्हे. परंतु विसाव्या शतकात इतक्या निकराचा प्रयत्न गांधीजींनीच केला. गांधीजींच्या लेखी एखादा वैज्ञानिक आणि केवळ अंगमेहनत करणारा भंगी ही दोन टोके नव्हती. समाजपुरुषाच्या शरीरातील समान महत्त्वाची घटके होती. शौचकूप गलिच्छ झाल्यावर मायक्रोस्कोपऐवजी झाडू हवा आणि मलरोग तपासायला मायक्रोस्कोप वापरता यायला हवा. त्या त्या वेळी ती कामे समान महत्त्वाची. म्हणूनच गांधीनी लेखणी, टकळी आणि झाडू एकाच तोलाने वापरली. गांधीजी खरे कर्मयोगी होते. कारण हाती असलेल्या प्रत्येक कर्मातल्या “ कौशल्याला” ते अतिशय महत्त्व देत. प्रार्थनेची जागा आणि शौचाचा संडास ह्या दोन्ही स्थानांविषयी त्यांनी तितक्याच उत्कटतेने विचार केला. गांधीजींच्या निकट सहवासाचे भाग्य लाभलेले एक गृहस्थ मला सांगत होते की, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत गांधीजी जे जे काही करीत असत ते पाहणाऱ्याला असे वाटे की, गांधीजींना तेवढेच काम आहे.नुसते स्नान करीत असले तरी एखाद्याला वाटावे की, ह्यांना स्नानाचाच शौक आहे. आणि मैला साफ करीत असताना वाटावे की, गांधीजींना मैला साफ करणे एवढेच सर्वात महत्त्वाचे वाटते. हिशेबाबद्दलची दक्षता पाहून त्यांना कोणी पक्का बनिया समजावे, तर मुलांशी खेळतांना पाहून असला रिकामा आजोबा आपल्याही घरात असावा असे वाटावे. नुसते झोपले तरी इतके गाढ झोपायचे की, ही झोप चांगली पाचसहा तास चालणार असा अंदाज करावा, तर विसाव्या मिनिटाला त्या गाढ निद्रेतून त्यांना जाग येत असे. गांधीजी पंचाच नेसत. पण त्या पंचाची काळजी एखाद्या रेशमी वस्त्रासारखी घेत. सूत काढताना बोटभर सूत फुकट जाऊ देत नसत. उघडे असत, पण अजागळासारखे उघडे नसत.त्यांनी शरीराचे चोचले पुरविले नाहीत, पण एखाद्या तलवार बहाद्दराने आपली तलवार लखलखीत आणि धारदार ठेवावी तसे आपले शरीरही लखलखीत ठेवले. शरीर हे जीवित-कार्यातल्या साधनासारखे वापरले. ते गंजू दिले नाही. साधे पत्र लिहिताना कागदाचा एक कपटा वाया घालवू दिला नाही. शब्दांचा वापरदेखील असाच काटेकोरपणाने केला. गांधीजींची शब्दयोजना हा तर साहित्यिकांनाही हेवा वाटावा असा विषय आहे. ते मितभाषी नव्हते की अमितभाषी नव्हते. यथार्थभाषी होते, गंभीरातला गंभीर प्रसंग देखील एखाद्या प्रासंगिक विनोदी उद्गाराने ते सुसह्य करून टाकीत. विनोद हा तर गांधीजींच्या अहिंसक भात्यातला रामबाण होता. अश्रू आणि हास्य हे माणसाला जोडणारे केवढे बळकट दुवे आहेत! भयग्रस्त माणूस हसू शकत नाही आणि अमानुषाच्या डोळ्यात सहानुभूतीचे अश्रू उभे राहात नाहीत. असला हा लौकिकातला लौकिक आणि अलोकिकातला अलौकिक माणूस आपल्या देशात ज्या काळी आपल्या आचरणाने नवे चैतन्य निर्माण करीत होता तो काळ म्हणजे गांधीयुग. युगाचा हिशोब तारीखवार करता येत नाही. परंतु एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांनी असहकारितेचे पर्व सुरू केल्यापासून ते भारत दुभंगला जाऊन पाकिस्तान आणि भारत अशी दोन शकले होऊन मिळालेल्या स्वातंत्र्यापर्यंतचा काळ हे गांधीयुग, असे मला वाटते.
ह्या युगात देशातल्या लहानापासून थोरांपर्यंत सर्वांना कुठल्याही विषयावर महात्मा गांधी काय म्हणतात ते जाणून घेण्याची ओढहोती. आमची दुःखे समजणारा हा नेता आहे, असा विश्वास अनुयायांना वाटल्याखेरीज त्या नेतृत्वाला काहीच अर्थ नसतो. मग ते दुःख वैयक्तिक असो वा सामाजिक. माझ्या मुलांच्या शिक्षणापासून ते माझ्या आरोग्यापर्यन्त गांधी माझी चिन्ता करताहेत असे वाटे. समाजातल्या प्रत्येक माणसासाठी गांधीजींनी कार्यक्षेत्र निर्माण केले होते. देशभक्ती व्यासपीठावरून उठून थेट स्वयंपाकघरापर्यंत जाऊन पोहोचली. शांतिमय लढाईची दैनंदिन तालीम केल्याशिवाय ह्या लढ्यांतला सैनिक होता येत नाही, हे लोकांना उमजले.त्यासाठी गांधींनी लोकांना कितीतरी प्रकारची व्रते दिली. व्रताशिवाय शिस्त येत नसते. शिस्त ह्याचा अर्थ मनाला तालात पावले टाकायला शिकवणे. मिलिटिरी किंवा एन. सी. सी. तली शिस्त ही प्रासंगिक असते. परेड ग्राउंडवरून निघालेली एन्. सी. सी. तील मुले किवा सुट्ट्यांच्या दिवशी हिंडणारे लष्करी जवान सार्वजनिक जीवनातली शिस्त पाळतातच असे नाही. त्यांची शिस्त वरिष्ठांच्या हुकुमातून पाळली जाते. स्वत:च्या मनाला हुकूम दयायची त्यांना सवय नसते. सत्याग्रही सैनिकाचा अधिकारीही तोच आणि साधा सैनिकही तोच. व्रताला हृदयपरिवर्तन व्हावे लागते. वेषपरिवर्तन नव्हे. हृदयपरिवर्तनापेक्षाही बुद्धीने घासून घेऊन स्वीकारलेले व्रत अधिक कसोशीने पाळले जाते. गांधीजींनी हृदयपरिवर्तन म्हटले, तरी केले ते विचारपरिवर्तन. ते झाल्यावर परदेशी कापड अंगाला लावणार नाही म्हणणाऱ्या सामान्यातल्या सामान्य माणसाला निर्भयतेचा दिव्य स्पर्श होऊन गेलेला असे. “गांधीजी तुरुंगात आहेत ना? मग आपण दिवाळीचे फक्त स्नान करायचे, फराळ करायचा नाही, अंगाला उटणी लावायची नाहीत, विलायती साबण लावायचा नाही.” एवढे साधे व्रत करणार्या कुटुंबालाही केवढा धन्यतेचा साक्षात्कार होत असे. हे सारे निर्णय सचिवालयातून आलेले नसत की भडक प्रचाराचीही साधने वापरली जात नसत. ज्या ब्राह्मण कुटुंबात-शिवाशिवीचा सैतान धुमाकूळ घालायचा, त्या कुटुंबातल्या वयोवृद्ध कर्मठ बायका देखील सत्याग्रही म्हणून तुरुंगात गेल्या आणि तुरुंगातील विटाळ कालवलेली (?) भाकरी खाऊन धर्माच्या खऱ्या साक्षात्काराचे नवे पुण्य संपादून परतल्या. ज्या गुजरातेत पुरुषांपुढे येताना बायकांना तोंडासमोर हातभर लांब घुंगट घेऊन यावे लागे, त्या गुजराती स्त्रिया हजारोंच्या संख्येने सत्याग्रहात दाखल झाल्या. पदराखालच्या पित्या पोराला म्हातार्या सासूच्या हवाली करून निःशस्त्र प्रतिकाराला निघालेल्या भारतीय बायका, दारूबाजांचे अश्लील बरळणे आणि पोलिसांच्या लाठ्या ह्यांना न जुमानता दारूच्या अड्ड्यावर पिकेटिंगला उभ्या राहिलेल्या सत्याग्रही स्त्रिया, ज्यांच्या सुकुमार तळव्यांना दिवाणखान्यांतला गालिचा देखील टोचावा असल्या तरुणींनी भर उन्हात मिठाच्या सत्याग्रहासाठी केलेली पायपीट आणि पोलिसाहाती खाल्लेला मार ह्यांच्या स्मरणाने देखील आजच्या सर्वस्वी विपरीत परिस्थितीत, माझ्या बालपणी मी पाहिली होती. ती स्वप्ने होती की सत्य होते असा संदेह निर्माण होतो. मुंबईच्या लॅमिंग्टन रोड पोलिस स्टेशनपुढे सत्याग्रह्यांवर लाठीहल्ला चालू होता. बघ्यांचीही गर्दी होती. त्यातच एक स्त्री होती. अंगावर दागिने होते. तिने ते दृश्य पाहिले. अंगावरचे दागिने उतरवले. शेजारी एक अनोळखी माणूस उभा होता, त्याच्या हाती ते दागिने दिले, त्याला आपल्या घरचा पत्ता दिला आणि सांगितले, “हे दागिने माझ्या घरी पोहोचव आणि घरच्या माणसांना सांग की, मी सत्याग्रहांत दाखल झाले.'' तो माणूस म्हणाला, “पण बाई, मी अनोळखी माणूस. कुठल्या विश्वासाने हे दागिने तुम्ही माझ्या हाती देता? '' बाई म्हणाली, ” तुमच्या अंगावर खादी आहे ना? तेवढा विश्वास मला पुष्कळ आहे.''
आज त्याच खादीच्या संदर्भात ही कथा “अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी” सारखी वाटेल. कृष्ण गेल्यावर युद्धविजेत्या अर्जुनाला चोरांनी बदडावे आणि गांधी गेल्यावर पांढर्या खादीला स्वार्थाने बरबटलेल्या अभद्र वस्त्राचे, कोड फुटल्यासारखे पांढरेपण लाभावे हा काय भयानक दुर्विलास आहे! गांधीयुग एखाद्या स्वप्नासारखे संपले आणि वास्तवांत गांधीयुगान्त सुरू झाला. यंदा साजरा होत असलेला गांधीजन्मशताब्दीचा उत्सव मला तरी सुतकातल्या सणासारखा वाटतो आहे. गांधींचे आम्ही काय ठेवले आहे म्हणून आम्ही त्यांच्या जन्मशताब्दीच्या उत्सवाचा अधिकार सांगावा? सद्गुणी बापाच्या दुर्गुणी पोराने कुठल्या आधारावर पितृश्राद्ध करावे? केवळ रूढी म्हणून! नाही केले तर लोक नावे ठेवतील म्हणून! सत्ताधीशांनी तर खादी पांघरून आपले लांडगेपण दडवलेच, परंतु गांधीयोगाचा गांधीवाद करणारांनी आणि असल्या सत्ताधीशांचा सदैव आधार घेऊन जगणारांनी तर खादीचे धर्मांधांसारखे सोवळे केले. सोवळ्यातला अहंकारी ब्राह्मण आणि खादीचा पंचा नेसून स्वतःला चारचौघांपेक्षा श्रेष्ठ मानणारा गांधीवादी ह्यांत मला तरी फरक वाटत नाही. एकाने खादीचे कवच केले, दुसऱ्याने सामान्यांना दूर लोटणारे सोवळे केले.
आता तर काय? सारी सृष्टीच बदलली. पिकेटिंग करणाऱ्या बायकांनी पोलिसांच्या लाठ्यांतून फुटलेल्या रक्ताला कुंकू मानून दारूबाजांना परावृत्त केले होते. व्यसनमुक्ती लाभली नाही तरी आपण पोराबाळांना उपाशी टाकून ताडीचे मडके पोटांत रिचवतो, ह्याची लाज निर्माण होत होती. नुकतीच मी मुंबईत दादरच्या भरवस्तीत पाटी वाचली. ‘सरकारमान्य ताडी-माडी विक्री केंद्र.' आत डोकावलो असतो, तर तिथे सुताचा हार घातलेला राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटोही आढळला असता. एका बाजूला गांधीजींच्या जन्मशताब्दीचा सोहोळा, तर दुसरीकडे ताडीमाडी-विक्री केंद्राची उद्घाटने. आपल्या सार्वजनिक जीवनाची भयंकर परवड आहे ही! आपल्या देशाने दारूबंदी हे एक व्रत म्हणून स्वीकारले होते. व्रताच्या पालनासाठी प्राण पणाला लावावे लागतात. जीवनातली प्रत्येक गोष्ट तर्कावर घासता येत नाही. राष्ट्रीय निशाण हेही एक फडकेच असते. पण त्याच्या इज्जतीसाठी माणसे प्राण देतात. जुन्या राष्ट्रीय निशाणाचा, बूट पुसायचे फडके म्हणून, आपण वापर करीत नाही. निरनिराळया भावनेमुळे हिदू गोमांस खात नाही आणि मुसलमान सूकर भक्षण करीत नाही. प्रत्येक धर्माने टिकावासाठी अशी व्रते दिली आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात गांधीजींनीही अशी व्रते दिली होती. राष्ट्रभाषा शिकण्यापासून ते रस्ते झाडण्यापर्यंत अनेक व्रते होती. आणि सर्वदेवनमस्कार केशवाप्रत जातात, तशी ही सर्व व्रते अखेर स्वराज्याप्रत जाताहेत, अशी गांधीयुगांत लोकांची श्रद्धाही होती. फार मोठ्या प्रमाणावर आपल्या देशांत ह्या व्रतांचे पालन होत होते. मात्र जसजसे स्वराज्य दृष्टिपथात येऊ लागले आणि सत्तेच्या सिहासनांच्या अंधुक आकृत्या दिसू लागल्या, तसतसा एक एक चिरा ढासळू लागला. आपण केलेल्या त्यागाचे आता आपल्याला सामुदायिक नव्हे तर व्यक्तिगत मोल मिळायला हवे, अशी वासना होऊ लागली. चातुर्मास संपत यावा आणि अभक्ष्य भक्षणाची खायखाय सुटावी तसे झाले.
असल्या सत्तेच्या सिंहासनाची स्वप्ने पडत नव्हती फक्त गांधीजींना. त्यांना स्वतंत्र भारतात राज्यकर्ते नको होते. त्यांना हवे होते राज्यकारभार करणारे जनतेचे विश्वस्त. मत्ताधीशांना विश्वस्त म्हणणारे गांधी सत्ताधीशांकडूनही तीच अपेक्षा करीत होते. त्यांचे सत्याचे प्रयोग संपले नव्हते. पण आता सत्तेचे प्रयोग सुरू होतील, ह्याची चिन्हे त्यांना दिसू लागली होती. आणि म्हणूनच त्यांनी काँग्रेसच्या विसर्जनाची सूचना केली होती. हंगामी मंत्रिमंडळाच्या काळांत काँग्रेसमधल्या पुढाऱ्यांना सत्तेच्या रक्ताचे काही थेंब चाटायला मिळाले होते. सत्तेच्या तुकड्यांसाठी चाललेले ते जिभल्या चाटणे गांधींनी पाहिले होते. सत्ता आली की ती गाजवण्याचा मोह आलाच. म्हणूनच गांधीजी म्हणाले होते की, ज्याला म्हणून चांगले राहायचे आहे आणि कुठल्याही परिस्थितीत चांगले असेल तेच करायचे आहे, त्याने सत्ताधीश होता कामा नये. डॉ. झाकीरहुसेन यांना लिहिलेल्या उत्तरात गांधीजींनी स्पष्ट म्हटले आहे- “राजकीय सत्तेची प्राप्ती झाल्यावर आपल्या कामाचे बक्षिस म्हणून जर आपण सत्ता धरून बसू लागलो तर त्यात आपला अध:पात होईल.”
व्हिन्सेंट शीन ह्या त्यांच्या चित्रकाराने त्यांना स्पष्ट विचारले होते, “आपलं काय मत की, सत्ता नेहमीच अधःपाताला कारणीभूत असते?” गांधींनी एका शब्दांत तितक्याच स्पष्टपणे सांगितले, “होय!”
आणि सत्तेचा मोह काँग्रेसच्या पुढार्यांना सुटला नाही. भयानक रक्तपाताने झिजलेल्या दिल्लीमध्ये दुभंगलेल्या भारताचा स्वातंत्र्योत्सव साजरा होत होता आणि मुस्लीम लीगच्या रक्तपिपासू लांडगेतोडीने छिन्नविछिन्न झालेल्या, पाशवी अत्याचारांनी धाय मोकलणाऱ्या मायमाऊल्यांच्या वेदनांनी व्याकुळलेली गांधीजींची वृद्ध पावले तिथे “एकला चालो रे” करीत निघाली होती. गांधीयुगान्ताचे भेसूर शिंग स्वातंत्र्यदिनीच फुंकले गेले. ज्या मुसलमानांच्या प्रेमाने गांधींनी हिदूंचे शाप सारखे झेलले त्या मुसलमानांनी त्यांचे मानले नाही आणि भरतखंडाची शकले झाल्यामुळे हिदूंचा संताप अनावार झाला. ज्यांना गांधींनी आपले अनुयायी मानले होते, कालपर्यंत जे त्यांचे वाक्य वेदवाक्याइतके पवित्र मानीत असल्याचे दाखवीत होते, त्यांनीही आपला मार्ग बदलला. ते नव्या राजप्रसादांच्या दिशेला गेले आणि गांधीजींचा वनवास चालूच राहिला. गांधींना हवा होता तो भारतीय आदर्शातला ‘जगाचा उपभोगशून्य स्वामी असणारा राजा’. प्रत्यक्षात गोरे राज्यकते गेले आणि काळे राज्यकर्ते आले. गोऱ्यांच्या राजवटीत कागदी घोडे नाचवणार्या नोकरशाहीने तिकडले मुजरे इकडे केले. मुजोरी न सोडता! पुन्हा एकदा राजा आणि गुलाम हे नाते सुरू झाले. काल लोकांच्या जोडीने अनवाणी चालणारे नेते सत्तेवर येताच अलीशान बंगल्यांत राहू लागले. दारावरचा उर्मट दारवान हलला नाही. गरिबांचे राज्य आल्याची दवंडी झाली. राज्यावर बसलेला गरीब मात्र दिसेना. लोकशाहीत लोक होते तिथेच राहिले. तसेच आशाळभूत. तसेच भयग्रस्त. तसेच अडाणी तेच उपाशी. साहेबांच्या राज्यांत अगम्य इंग्रजीत कारभार चाले. स्वराज्याचा कारभारही त्याच भाषेत आणि त्याच लालफितांच्या दिरंगाईचा गुण घेऊन चालला. ब्रिटिश नोकरशाहीची लोखंडी चौकट अभंग राहिली. गांधीजींची जीवनस्पर्शी व्रते आता केवळ प्रतीकात्मक राहिली, सणासुदीला सूतकताई होऊ लागली. रस्त्यांची नावे बदलली. कडेच्या फूटपाथनिवासीयांचे निवासस्थान बदलले नाही. साहेबांचे घुतळे गेले पण नव्या पुतळ्यांच्या पायऱ्यांवर तेच दळिद्र रात्रीच्या विसाव्याला पडत होते. निधर्मी राज्याची घोषणा झाली. परंतु निवडणुकीचे उमेदवार निवडताना कग्रेसने देखील सत्पक्षाचे यश न मानता आपल्या पक्षाच्या यशावर डोळा ठेवून जात हाच विचार महत्त्वाचा मानला. संस्थाने खालसा झाली, पण करोडो खाजगी मालमत्ता असणाऱ्या संस्थानिकांना आम्हीं गलेलट्ठ तनखे दिले. कसायांना गाईनी सुरे मोडल्याची नुकसानभरपाई दिली. काही संस्थानिकांनी तर अंगावर खादीही पांघरून नव्या अधिकाराच्या जागा मिळवल्या. गांधींनी विधायक कार्य करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या सार्या संस्थांची संस्थाने झाली आणि प्रत्येक ठिकाणी, बाबा आमट्यांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे फक्त 'मतपेटीशी प्रणयाराधन सुरू झाले. प्रणयात आणि समरात सारेच साजून दिसते. तेव्हा तत्त्वाशी तडजोडी आल्याच! समाजोपयोगी कार्याला महत्व न राहता राज्यकर्त्यांचे प्रत्येक पाऊल निवडणुकांचे कौल आपल्या बाजूने कसे पडतील ह्याचाच फक्त विचार करून टाकण्यात येऊ लागले. कार्यसिद्धीपेक्षा कार्यप्रसिद्धीला महत्त्व आले. गांधी सामाजिक जीवनात नीती हा निरपवाद नियम म्हणून मानीत होते. आता नीती हा एक अपवाद ठरला आहे. राजसत्तेला ठाऊक असलेली नीती एकच! वारांगनेची! गांधीयुगामध्ये खरोखरीच त्यागाला मागेपुढे न पाहणाऱ्या नेत्यांनी सत्तेवर येताच तो त्याग जणू काय भावी भोगाच्या आशेने चढवलेला मुखवटा होता की काय अशी शंका येण्यासारखे अभद्र व्यवहार सुरू केले. लोकराज्यातही लोक आणि राज्यकर्ते असे तट पडले. आणि दिल्ली ही लोकधानी न होता राजधानीच झाली. निष्ठावन्त विधायक कार्यकर्त्यांनाही आश्रितांचे जिणे जगावे लागले. माधुकऱ्याच्या चौपदरीत सणासुदीला एखादी जिलेबी टाकावी तसली अनुदाने त्यांना मिळू लागली. त्यांतल्या धूर्तांनी निरनिराळया अखिल भारतीय बोर्डात आपली वर्णी लावली आणि दरिद्रीनारायणाच्या सेवेला भल्याभक्कम लांबलचक अमेरिकन् मोटारीत बसून हे महन्त हिंडू लागले. सत्याचा आणि सेवेचा धर्म खरोखरीच मानणारा एखादा गांधीयोगी कुठे तरी संडास साफ करीत, नाहीतर खादीच्या चिंध्या फाडीत वसला. एखाद्या म्हाताऱ्या बेकार नटाने उगीचच आपल्या तरुणपणीच्या भूमिकांतली भाषणे आपल्या चाळीतल्या एका खोलीच्या बिऱ्हाडी पाव्हण्यांना म्हणून दाखवावीत, तशी ह्या जुन्या निष्ठावान विधायक कार्यकर्त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या प्रवचनांची स्थिती आहे. फक्त केविलवाणी!
(अपूर्ण..)
पु. ल. देशपांडे
(गांधी जन्मशताब्दीनिमित्त 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी', पुणे, यांनी प्रसिद्ध केलेल्या 'महात्मा गांधी गौरव ग्रंथा'तून)
(गांधी जन्मशताब्दीनिमित्त 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी', पुणे, यांनी प्रसिद्ध केलेल्या 'महात्मा गांधी गौरव ग्रंथा'तून)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment