Tuesday, April 29, 2014

खरंच.. शिवी कधी देऊ नये? - डॉ. तारा भवाळकर

खूप आदर्श म्हणून नावाजलेल्या एका ग्रामीण भागातील शाळेच्या भेटीतील प्रसंग! सुप्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे शाळेत आले होते. व्हरांड्यात एक-दोन बेसीन्स होती. साबण, हात पुसण्यासाठी छोटे टॉवेल्स.. अशी छान सोय होती. बहुधा मधल्या सुट्टीत डबे खाण्याआधी व नंतर हात धुण्यासाठी ही सोय असावी, असे पु. लं.ना वाटले. मुख्याध्यापकांचा हा साक्षेपीपणा पाहून पु. ल. खूश झाले आणि त्यांनी तसे मुख्याध्यापकांना बोलून दाखविले. त्यावर तत्परतेने मुख्याध्यापकांनी खुलासा केला- ''नाही. तसंच केवळ नाही. म्हणजे ते आहेच, पण माझा मुख्य हेतू वेगळा आहे.'' ''कोणता?'' -''काय आहे.. ही सगळी बहुतेक ग्रामीण भागातील त्यातही कामगारांची मुले-मुली आहेत. मधल्या सुट्टीत मैदानावर खेळताना खूप धुडगूस घालतात -भांडतात.. तेही स्वाभाविकच आहे म्हणा.. पण पुष्कळदा फार वाईट वाईट अपशब्द ('शिव्या' उच्चारणे मुख्याध्यापकांना अवघड वाटले असावे) उच्चारतात. मुलांना नीट वळण लावण्यासाठी ही सोय आहे''.

''पण ही बेसीन, साबण आणि अपशब्द यांचा काय संबंध?'' पु.लं.नी आपली शंका बोलून दाखवली.
''माझं मुलांकडे मधल्या सुट्टीतही बारीक लक्ष असतं. कोणी अपशब्द उच्चारला की, मी त्या मुलाला जवळ बोलावतो, शांतपणे विचारतो, ''तू आता काय म्हणालास?'' तो मुलगा ओशाळतो.. ''नाही सर, तुमच्यासमोर कसं म्हणू ते..?'' ''का?''- ''वाईट आहे तो शब्द''- ''मग तुझ्या इतक्या छान तोंडातून वाईट शब्द उच्चारलास, आता तोंडही वाईट झाले ना!'' ''हो सर!''- मुलगा कबूल करतो. 
मग मी त्याला सांगतो.
''तर मग त्या बेसीनवर जा. साबणाने नीट तोंड धू. चूळ भर आणि स्वच्छ हो.''

मुलगा मुकाट्याने सरांची आज्ञा पाळतो. पु.लं.नी हे सगळे शांतपणाने ऐकून घेतले. पण बहुधा त्यांच्या प्रवृत्तीनुसार ते मनातल्या मनात मिस्कीलपणे हसत असावेत. (हा माझा अंदाज). पण प्रकटमध्ये ते घाईगर्दीने म्हणाले,
''अहो नको सर. असे त्यांचे तोंड बंद करू नका. तुम्ही त्यांची तोंडे बंद केलीत, तर ती मुले हातात धोंडे घेतील''- सरांचा चेहरा प्रश्नार्थक! पुढे खुलासा- ''काय आहे सर, मनातल्या असंतोषाला वाट करून देणे, ही माणसाची गरज आहे आणि त्यासाठी शब्द हा त्यातल्या त्यात निरुपद्रवी पर्याय आहे. बोलले की मन मोकळे होते. मनात असंतोषाची खदखद राहत नाही आणि सगळीच माणसे एकमेकांशी अशीच काहीशी वागतात, बोलतात, मोकळी होतात आणि पुन्हा एकमेकांशी सामान्य व्यवहार करतात. शिव्या या मानसिक स्वास्थ्यासाठी एक प्रकारचे 'सेफ्टी व्हॉल्व' असतात. ही मुलेसुद्धा थोडा वेळ भांडतात, शिव्या देतात आणि थोड्या वेळाने सगळे एकत्र येऊन डबे खातात. शाळा सुटली की पुन्हा गळ्यात गळे घालून घराकडे जातात.''

पु.लं.चे नाव आणि त्यांचा दबदबा, शिवाय सरांची अभिजात नम्रता असल्याने त्यांनी फार प्रतिवाद केला नाही. तरी म्हणाले, ''पण मग मुलांना वळण कसे लावायचे?''- ''काय आहे सर, मुलांची भांडणे खेळाबरोबरच संपून कशी जातील, ती पुढे हिंसक वळण घेणार नाहीत, एवढे आपण पाहावे, असे मला वाटते.'' 
वारणेच्या साखर कारखान्याच्या परिसरातील या शाळेला मी भेट दिली, त्या वेळी शाळा फिरून दाखविताना मुख्याध्यापकांनी ही पु.लं.च्या भेटीची हकीकत सांगितली होती.

वारणा परिसर-उद्योगाचे संस्थापक तात्यासाहेब कोरे मोठे कल्पक आणि गुणग्राहक होते. कारखान्याबरोबरच परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांनी विविध उपक्रम सुरू केले आणि त्यासाठी शोधून शोधून गुणी माणसे आणून एकेक उपसंस्था त्यांच्यावर सोपवली होती. प्रस्तुत मुख्याध्यापकांना एका नामवंत शाळेतली त्यांची कीर्ती पाहून येथे आणले होते. व्हिक्टोरियन शिस्तीतले हे मुख्याध्यापक श्री. महाबळेश्‍वरवाला (बहुधा पारशी असावेत). मी गेले तेव्हा तात्यासाहेबच प्रथम भेटले होते. तेव्हाचा हा प्रसंग.

माणसाने शब्द जपून वापरावेत. कोणी दुखावले जाऊ नये, अशी सभ्यतेची र्मयादा सर्वसाधारणपणे असते. म्हणून मागच्या टिपणात 'शब्द वापरा जपून..' कशासाठी? ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रत्यक्ष जीवन पूर्ण आदर्श नसते. मग त्या जीवनातून उमटणारी भाषा तरी पूर्ण गोड-गोजिरी कशी असेल आणि सतत कोणत्याही गोडाचा कंटाळा येतोच. म्हणून मधूनच झणझणीत चटणीसारखी एखादी शिवीही आपोआप येत असावी तोंडात! फक्त तिची र्मयादा वेळेवर ओळखणे महत्त्वाचे! 'शिवी' हे 'शिव'चे स्त्रीलिंगी रूप! शुद्ध करते मनाला ते! असे गमतीने म्हटले जाते. पु.लं.ना तेच अभिप्रेत असावे.

डॉ. तारा भवाळकर
लोकमत
६/२/२०१४

5 प्रतिक्रिया:

Avi Vidhate said...

छान लेख आहेत

Mr.Kuntewad Datta Uttamrao said...

शिव्या या मानसिक स्वास्थ्यासाठी सेफ्टी व्हॉल्व असतात.
खुप छान.

Laxmipriya said...

Khup chan 👌😊

आठवणीतील जग said...

खूप छान, काहीतरी शिकवून जाते

Anonymous said...

छान लेख आहे