Leave a message
Showing posts with label संजय मोने. Show all posts
Showing posts with label संजय मोने. Show all posts

Wednesday, July 31, 2019

पु. ल. : एक माणूस! - संजय मोने

सातवी किंवा आठवीत होतो मी तेव्हा. शाळेतून वक्तृत्व स्पर्धेसाठी आमची पाचजणांची निवड झाली होती. हल्ली या वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जात नाहीत. कारण अशाच एका स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर बक्षीस समारंभात भाषण करताना प्रमुख पाहुणे (जे त्या काळातले एक अत्यंत प्रभावी खासदार होते. शिक्षणातली कसर त्यांनी बाहुबलाने आणि आसपास कायम वावरणाऱ्या बाहुबलींच्या अस्तित्वाने भरून काढली होती!) स्पर्धकांना शाबासकीवजा, मार्गदर्शनवजा संदेश देताना ‘वक्तृत्व’ हा शब्द उच्चारायचा आटोकाट प्रयत्न करू लागले. एका मर्यादेनंतर त्यांची आणि त्यांच्या जिभेची मजल ‘वकृत्व’पर्यंत पोचली. त्यांनी त्यावर समाधान न मानता पुन्हा एकदा त्या शब्दाचा लक्ष्यवेध करायचा विडा उचलला आणि अचानक माईकवरून आम्हाला एक किंकाळी ऐकू आली आणि पाठोपाठ खासदारांच्या ओठाच्या कडेने एक बारीक रक्ताची धार नजरेस पडली. त्या बालवयात आम्हाला त्या घटनेची फारशी माहिती त्या क्षणी मिळाली नाही, नंतर आमच्या शिक्षकांच्या बोलण्यावरून असं लक्षात आलं की भाषणात ‘वक्तृत्व’ हा शब्द त्यांच्या एरवी घणाघाती बरसणाऱ्या जिभेच्या तुकडय़ाचा बळी घेऊन गेला. त्यानंतर ‘र’ हा शब्द पुढील आयुष्यभर त्यांना वर्जति राहिला. (असंही ऐकलं, की पुढे ते ‘उर्वशी’ आणि ‘पुरुरवा’ हे शब्द ते ‘उव्वशी’ आणि ‘पुउअवा’ असे उच्चारत असत.) आणि त्यामुळे वक्तृत्व स्पर्धा बंद पडून त्याची जागा सोप्या मराठीतल्या ‘डिबेट’ या शब्दाने घेतली. असो. मुद्दा तो नव्हता.

त्या स्पर्धेत आमच्या शाळेला काही पारितोषिकं मिळाली. मलाही मिळालं. त्या काळात दहा-बारा वर्षांच्या मुलांना गीताई किंवा उपनिषदं द्यायची एक अनिष्ट प्रथा होती. पुस्तकं देणं उत्तमच. पण कुणाला काय द्यायचं?

या स्पर्धेच्या आयोजकांनी मात्र छान विनोदी पुस्तकं दिली होती. घरी गेल्याबरोबर मी त्यातलं एक पुस्तक वाचायला घेतलं. थोडं वाचलं. मला काही ते आवडलं नाही. दादरच्या आयडियल बुक डेपोत जाऊन मी तिथल्या गृहस्थांना ती पुस्तकं बदलून द्यायची विनंती केली. मी जे पुस्तक बदलून मागत होतो त्या लेखकाचे पुस्तक मला आवडलं नाही, हे ऐकून त्या गृहस्थांना थोडं आश्चर्यच वाटलं. त्यांनी माझी पुस्तकं बदलून द्यायची विनंती मात्र मान्य केली. आणि ‘त्याऐवजी कुठलं हवंय?’ तेही विचारलं.

‘‘ते नाडकर्णी, रेगे, त्रिलोकेकर वगरे आहेत, ते पुस्तक द्या.’’

‘‘‘बटाटय़ाची चाळ’?’’

‘‘हो.’’

‘‘नावही माहीत नव्हतं तुला.. तरी ते पुस्तक हवं आहे?’’

‘‘हो.’’

त्याआधी काही काळ मला माझे आई-वडील एका नाटकाला घेऊन गेले होते. म्हणजे ‘बटाटय़ाची चाळ’ बघायला आम्ही गेलो होतो. तो एकपात्री प्रयोग होता, हे नंतर नाटय़- व्यवसायात आल्यावर मला कळलं. तेव्हा पडदा उघडला की सुरू होतं ते नाटक; इतकीच माहिती मला रंगभूमीबद्दल होती. तुडुंब भरलेलं नाटय़गृह आणि हसून मुरकुंडय़ा वळलेले प्रेक्षक ही त्या नाटकाची आठवण होती. अचानक शेवटची पंधरा मिनिटं लोक शांत झाले. गंभीर झाले. काही जण तर डोळ्यांवर रुमाल चढवत होते, हेही पाहिलं. फार काही कळत नव्हतं, पण त्या पंधरा मिनिटांत मलाही जरा अस्वस्थ व्हायला झालं. ते का? आणि आधी लोक हसत होते तेही का? हे जाणून घ्यायचं म्हणून मी आयडियलमधून ‘बटाटय़ाची चाळ’ हे पुस्तक घेऊन आलो. वाचायला बसलो. काही भाग कळला नाही. काही काही विनोद समजले. पण पुस्तक शेवटपर्यंत खाली ठेवलं नाही. तसं माझं मूळ घर आणि माझा जन्म गिरगावचा असल्यामुळे काही भाग नावं वगळता अत्यंत ओळखीचा वाटला. साधारण थोडय़ाफार फरकानं तशीच माणसं आमच्या गिरगावच्या चाळीत आहेत याचा साक्षात्कार झाला.

ती माझी आणि पु. ल. देशपांडे यांची पहिली एकतर्फी ओळख. पुढे मग मी ‘वटवट वटवट’ पाहिलं. दूरदर्शनवर ‘रविवारची सकाळ’ पाहिलं. आणि हळूहळू त्यांच्या प्रेमात पडलो. एकेक करून त्यांची सगळी पुस्तकं वाचून काढली. फक्त एकदाच नाही, तर अनेकदा.

माझं नाव ‘संजय’ हेसुद्धा त्यांच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या कवी संजय या पात्रावरून ठेवलं आहे. त्याचं असं झालं की- माझा जन्म झाला तेव्हा माझे वडील त्या नाटकात संजयची भूमिका करत असत. ते नागपूरच्या दौऱ्यावर होते. जन्मपत्रिकेनुसार झ, थ आणि छ या छापाची नावं असावीत, असं कोणीतरी सांगितलं. आज या नावाची माणसं बघितली की माझंही नाव तसंच असतं- या कल्पनेनं अंगावर काटा येतो. परंतु तसं काही झालं नाही. माझ्या वडिलांबरोबर तेव्हा शांताबाई जोग नाटकात काम करायच्या. त्यांनी माझ्या वडिलांना सुचवलं की, मुलाचं नाव ‘संजय’ ठेव. त्यानंतर शांताबाईंच्या मुलाला- अभिनेते अनंत जोग याला मी एक-दोनदा बोलून दाखवलं, की त्याच्या आईचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.

आजही कधी कुठे बाहेर जायचं झालं पाच-सहा दिवस- की माझ्या बॅगेत जी तीन-चार पुस्तकं चढवली जातात त्यात पु. ल. देशपांडे यांचं पुस्तक असतंच. हल्लीच्या जगात, विशेषत: आमच्या व्यवसायात सामाजिक आणि जातीपातीच्या समस्येनं होरपळून निघालेल्या कुणा लेखकाचं पुस्तक जर सोबत नसेल तर तुमच्याकडे तुच्छतेने बघतात. पण मला कुणाची पर्वा नाही. कारण मी माझ्या परीने त्यांची होरपळ फक्त न वाचता ती दूर करण्याचा प्रयत्न करतो.

त्यानंतर मी पु. ल. देशपांडे यांची दोन नाटकं केली. ‘ती फुलराणी’ आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’! त्यामुळे माझी-त्यांची ओळख झाली. त्यांच्या घरी जाण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा (गप्पा नाही म्हणणार. कारण गप्पा समकक्ष लोकांच्यात घडतात.) मोकाही मिळाला. खरं तर ते बोलत होते आणि मी ऐकत होतो. ते ऐकताना एक गोष्ट लक्षात आली, की हा माणूस अतिशय हुशार आहे. (पुन्हा ‘बुद्धिमान’ म्हणणार नाही, कारण बुद्धिमत्तेची जोख ही त्या क्षेत्रात तितकाच अधिकार असणाऱ्या माणसाकडून व्हावी लागते.) तर माणूस अत्यंत हुशार आहे आणि तितकाच सजगही. मराठी भाषेवर कमालीची हुकमत आहे त्यांची. त्याचबरोबर इतर भाषाही त्यांना वज्र्य नाहीत. स्वभाव म्हणाल तर त्या सगळ्याच्या तळाला एक मिश्कीलपणा आहे. मुळात त्यांच्या स्वभावात एक कणव आहे. कुठल्याही प्रकारचा तोरा किंवा ऐट नाही. आपल्यासारखीच ‘व्यायामबियाम’ या शब्दाची आणि क्रियेची त्यांना फारशी आवड नाही. उत्तम आणि चविष्ट खाण्याची त्यांना आवड आहे. सगळे महत्त्वाचे आणि मानाचे पुरस्कार मिळाल्यावरही ते वाचकांसाठी कायम त्यांच्यातलेच राहिले, हे फार महत्त्वाचं. लेखक म्हणून त्यांनी अमाप पसे मिळवले. परंतु या पैशांचा वैयक्तिक उपभोग न घेता त्यांचा अखंड लिहिता हात समाजाला देण्यासाठी कायम मोकळा राहिला. मनात येतं तर ते एखादा बंगलाबिंगला बांधून, दारात गाडी आणि उग्र श्वान झुलता ठेवून, तितकाच उग्र चेहरा ठेवून जगू शकले असते.

लवकरच त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकावर आधारित ‘नमुने’ मालिका सादर होणार आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती हदी भाषेत होत आहे. त्याच्या चित्रीकरणाच्या वेळी मला जाणवलं की, त्यांच्या लेखनात भाषा हा अडसर अजिबात नाहीये. कारण त्यांचं लेखन हे समस्त माणसांच्या विचारांच्या आधारावर रचलेलं आहे. माणूस कुठल्याही प्रांतात राहणारा असो; त्याची म्हणून एक विचारमालिका असते. ती कायम असते. पुलंच्या लेखनाचं हे एक मला जाणवलेलं वैशिष्टय़.आणि हाही विचार मनात आला, की हे खरं तर आधीच व्हायला हवं होतं. हे वर्ष पुलंचं जन्मशताब्दी वर्ष आहे. याची अजून एक खासियत म्हणजे आपल्याकडे कुणाची जन्मशताब्दी साजरी करायची असली की त्या व्यक्तीच्या कार्याचा शोध घ्यावा लागतो. त्या व्यक्तीचं बरंचसं कार्य बहुतेक लोक विसरून गेलेले असतात. मग खूप धावाधाव होते. सरकारी पातळीवर तर सगळा सावळा गोंधळच असतो. शेवटी कशीबशी ती घटना उरकली जाते. अशा वेळी त्या माणसाचा आत्मा नक्कीच आपण का जन्माला आलो म्हणून तडफडत असणार. यावेळी मात्र तसं होणार नाही. कारण पु. ल. देशपांडे अजूनही सगळ्यांच्या मनात ताजेतवाने आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे दात घशात घालायला त्यांचा तमाम वाचकवर्ग अजूनही जिवंत आहे.

एका नाटकासाठी आम्ही नागपूरला गेलो होतो. जाताना बाबा आमटे यांच्या आनंदवनात थांबलो. तेव्हा बाबा खूप आजारी होते. अंथरुणाला खिळलेले होते जवळजवळ. मेंदू मात्र पूर्णत: शाबूत होता. आम्ही जाऊन त्यांना भेटलो. माझ्याबरोबर विनय येडेकर होता. बाहेर पडल्यावर आम्ही सगळे शांत होतो. अचानक तो मला म्हणाला, ‘‘संजय! आज मला काय वाटलं माहीत आहे? मला देवाला भेटल्यासारखं वाटलं.’’

तसंच मी जेव्हा पहिल्यांदा पु. ल. देशपांडे यांना पाहिलं तेव्हा मला ‘माणूस’ बघितला असं वाटलं.

इथेच थांबतो.

sanjaydmone21@gmail.com

संजय मोने
लोकसत्ता
२२ जुलै २०१८
a