Tuesday, January 31, 2023

ती फुलराणी (प्रथम प्रयोग २९ जानेवारी १९७५) - प्रसाद जोग

अजरामर मराठी नाटक..
ती फुलराणी
प्रथम प्रयोग :
२९ जानेवारी १९७५

इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती "फुलराणी" या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

जॉर्ज बर्नार्ड शॉचे ‘पिग्मॅलिअन’ वाचत असताना त्यातल्या पात्रांच्या संवादाची मराठी रूपे पुलंना दिसायला लागली आणि हे नाटक मराठीत आणावे असे त्यांना वाटत होते. पुलंनी स्वतः जरी ‘ती फुलराणी’ला ‘पिग्मॅलिअन’चे रूपांतर म्हंटले असले तरी ते अस्सल देशी वाटत.

सतीश दुभाषी पु.लं. कडे नवीन नाटकाची मागणी करायला गेले असता , त्यांच्या मनात हा पिग्मॅलियन पुन्हा जागा झाला. सतीशसारखा गुणी नट त्यांना प्रो. हिगिन्सच्या भूमिकेत दिसायला लागला आणि मग त्यांनी ‘ती फुलराणी’ हे नाटक लिहून काढले ते मुख्यत: सतीशसाठी. मंजुळेच्या भूमिकेसाठी भक्ती बर्वे यांना आणि विसूभाऊसाठी अरविंद देशपांडेंना घेण्याचा आग्रह धरला तो पु.लं च्या पत्नी सुनीताबाईंनी. इंडियन नॅशनल थिएटरने हे नाटक रंगमंचावर आणले. सतीश दुभाषी, भक्ती बर्वे, अरविंद देशपांडे, राजा नाईक, मंगला पर्वते ह्या गुणी कलावंतांना बरोबर घेऊन ह्या नाटकाचे दिग्दर्शन करणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव पु.लं.ना मिळाला . ह्या नाटकाच्या स्वभावाला धरून त्यातल्या शब्दाशब्दात,वाक्यावाक्यात प्रयोगातल्या कलावंतांनी नाटकात रंग भरला.

पु.लं. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’ नाटकाने भक्ती बर्वे यांना ओळख प्राप्त झाली. या नाटकातील ‘मंजुळा’ हे पात्र रंगभूमीवरील अजरामर भूमिकांपैकी एक. या नाटकाच्या तालमींच्या आठवणीही तितक्याच खास आहेत.’ती फुलराणी’ मधील स्वगत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ पुलंनी स्वत: भक्ती यांच्याकडून बसवून घेतले होते. या स्वगताला वन्स मोअर येणार हे भाकीत पुलंनी तालमीतच केले. गाण्याला वा वादनाला वन्स मोअर येण स्वाभाविक होत पण स्वगताला वन्स मोअर म्हणजे भक्ती यांच्यासाठी ती कल्पनाच अविश्वसनीय होती. ती फुलराणी च्या पहिल्या प्रयोगात भक्ती‌ यांनी हे स्वगत सादर केलं आणि प्रेक्षकातून एकदा नाही अनेकदा वन्स मोअर आला…पुलंचं भाकीत खरच ठरल.


मंजुळा : ………” असं काय मास्तरसाहेब ? गधडी काय? नालायक, हरामजादी ? थांब…..

थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा
मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर
तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वांडात घालीन शान
तुजा क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा
तुला शिकवीन चांगलाच धडा

तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज
माजी चाटत येशील बुटां, मी म्हनन, काय आज इकडं कुठ ?
हात पसरून मागशील भीक, मी म्हनन, जरा शुद्ध बोलायला शीक
मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चाल भाईर मुकाट
उगं वळवळ करतोय किडा ! तुला शिकवीन चांगलाच धडा !

तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा,
ओ हो हो, आहाहा, ओ हो हो, आहाहा, हाऊ स्वीट, हाऊ स्वीट
लव्हली, चार्मिंग, ब्युटी, हाय, समदे धरतील मंजूचे पाय
कुत्र्यावानी घोळवीत गोंडा, तरन्या पोरांचा दारात लोंढा
हाय मंजू, हाय दिलीप….हाय मंजू, हाय फिलीप
मंजू बेन केम छो, हाऊ डु यू डु,
कम, कम, गो हेन्गिंग गार्डन, आय बेग युवर पारडन ?
कुनी आनतील सिलीकची साडी, कुनी देतील मोत्यांची कुडी
कुनी घालतील फुलांचा सडा ! तुला शिकवीन चांगलाच धडा !

मग? कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होउन स्वार
नदरेला जेव्हा नदर भिडल, झटक्यात माझ्या पायाचं पडल
म्हनल,रानी तुज्यावर झालो फिदा, क्या खुबसुरती, कैसी अदा
माग, माग, काय हवं ते माग, प्यारी माज्यावर धरू नकोस राग
मी मातर गावठीच बोलीन, मनाची गाठ हळूच खोलीन
गालावर चढल लाजेची लाली, नदर जाईल अलगद खाली
म्हनेन त्याला, ह्ये काय असं ? लोकांत उगंच होईल हसं
कुंपणापातर सरड्याची धाव, टिटवीन धरावी का दर्याची हाव
हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा? गटारीच्या पान्याला सोन्याचा घडा ?
मग राजाच येईल रथात बसून, म्हनंल, कसं बी कर, पन हो माझी सून
दरबारी धरतील मुठीत नाक, म्हनत्याल राजाचा मान तरी राख
तोरणं बांधा नि रांगोळ्या काढा, त्या अशोक्याला शिकवीन चांगला धडा !

मंग मंजू म्हनल, महाराज ऐका, त्या अशोक मास्तराला बेड्याच ठोका
शिशाचा रस त्याच्या कानांत वता, आन लखलख सुरीन गर्दन छाटा
मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा, आन पालटून काढून चाबकानं फोडा
महाराज म्हनत्याल, भले हुशार, धाडून द्या रं घोडस्वार
हां हां हां हां
जवा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हनशील मंजे सोडीव मला
धरशील पाय आन लोळशील कसा, रडत ऱ्हाशील ढसाढसा
तुझा ए, तुझा ओ, तुझा न, तुझा ण, तुज्या श्या, तुजं वसकन आंगाव येणं
भोग आता गप तुज्या कर्माची फळं, तुज्या चुरूचुरू जिभेला कायमचं टाळं
महाराज म्हनत्याल, ह्याची गर्दन तोडा, मी म्हनन, जाऊ द्या, गरिबाला सोडा
तू म्हनशील, मंजुदेवी आलो तुला शरन
मी म्हनन, शरन आल्यावं देऊ नये मरन. “

पुलंनी हे इतकं अफलातून लिहिलंय ना, की अगदी मंजुळेसारखं ते त्याच ठसक्यात बोलावसं वाटतं. पूर्ण फुलराणीचं नाटक तर अनेक महाविद्यालयांमध्ये अजूनही बसवलं जातंच पण फक्त या स्वागताचे कितीतरी प्रयोग शाळा, महाविद्यालयांमध्ये झाले असतील.

प्रसाद जोग
सांगली
९४२२०४११५०

'ती फुलराणी' पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


0 प्रतिक्रिया: