Tuesday, November 7, 2017

बरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात


पु.ल. तुम्ही तुमच्या साहित्यात देवांपासुन संतांपर्यंत..नेत्यांपासुन शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांवर #कोपरखळ्या,निखळ विनोद केलेत.

पण तुम्ही आज असे काही विनोद केले असते तर आम्ही ते सहन केले नसते!कारण आता आमच्या चित्तवृत्ती इतक्या अस्थिर,उतावीळ झाल्या आहेत..आम्ही आमच्या आर्दशांबद्दल,जातींबद्दल इतके पजेसिव्ह झालो आहोत की आम्ही तुमच्या नर्म विनोदाला न समजता आमच्या धार्मीक.. जातीय भावना दुखावल्यामुळे आम्ही तुमचे पुतळे जाळले असते.

सोशियल साइट्सवर ''पु.ल.देशपांडे हेटर्स'' पेजेस तयार केले असते. बरं झालं तुम्ही आधीच गेलात..

तुम्हाला आज संगीत नाटकांवर प्रेम करणारे रावसाहेब भेटले नसते की इतिहास जगणारे हरीतात्या, चप्पल झिजेस्तोवर शिक्षण सेवा देणारे चितळे मास्तर भेटले नसतेच.
कारण ती जमात आता कालबाह्य; नव्हे नामशेष झाली आहेत.

आणि समजा आजच्या काळातल्या नारायणावर वा अंतु बर्व्यावर तुम्ही लिहीलं असतं तर तो म्हणला असता ''अरे आमच्यावर विनोद काय करतोस!!पहिले आमची रॉयल्टी दे''!!

त्यामुळे बरंच झालं तुम्ही फार आधीच जन्मलात!आणि मुख्य म्हणजे आज तुमचे विनोद..शब्दातील मर्म..जागा..ग्राफ्स समजणारी पिढी तयार होतेच कुठेय!

आम्हाला काॅमेडी कम चित्रपट प्रमोशन कार्यक्रमांची..लाउड विनोदांची आणि दर तीस सेकंदांनी कानठळ्या बसवणाऱ्या प्री रेकाॅर्डेड लाफ्टर आणि ताळ्या ऐकायचीच इतकी सवय झालीए की तुमच्या वाक्यांतील शब्दांचे अस्तर..खोली..आमच्यापर्यंत पोहचलीच नसती.त्यामुळे हसता हसता डोळ्यांच्या कडा ओलावणारे तुमचे शब्द..वाक्यातील अर्थ..विनोद आम्हाला आज कळणार नव्हताच.

आज तुम्ही असते तर कुठल्या टिव्ही चॅनलवर तुम्हाला; कृत्रीम हिडीस हसणाऱ्या एखाद्या बाईसोबत किंवा खोटं हसणाऱ्या, खुर्चीवरील बुजगावण्या सोबत तुम्हालाही जज बनवुन बसवलं असतं.तेव्हा उथळ कर्कश विनोद पाहुन ऐकुन घुसमट तुम्ही सहन करू शकला नसता..आणि आम्हिही तुम्हाला तसं पाहु शकलो नसतो.म्हणुन बरच झालं तुम्ही गेलात!


आज तुमच्या कथाकथनाला आम्ही आलो असतो तर आम्ही पहिले सोशियल साइट्सवर ''लिसनिंग टू पु.ल.देशपांडे;लाइव्ह.'' अपडेट्स टाकुन;
तुम्ही हरी तात्या,पेस्टन काका सांगत असताना आम्ही सर्व आमच्या माना खाली घालुन दर दोन मिनीटांनी वा आमचे मेसेजेस..पोस्ट्स..चेक राहीलो असतो...
आणि तुमच्यासोबत #सेल्फीज घेऊन सोशिअल मीडियावर टाकून उथळ प्रेम दाखवत राहिलो असतो.

मोबाइल चं कर्णपिशाच्च आमच्या मानगुटीवर बसण्यापुर्वीच..आणि त्या कर्णपिशाच्चाची फेसबुक,वाॅट्स अप आणि इतर पिलावळी जन्मण्यापुर्वीच तुम्ही गेलात तेच बरं झालं.

पण शेवटी एकच म्हणतो देवाने आमचे जीवन समृद्ध करण्याकरिता तुम्ही व तुमचं साहित्य;दिलेल्या या मोलाच्या देणग्या!न मागता त्याने दिल्या पण तो त्या कधीही परत मात्र घेउ शकणार नाही.

- अभिजीत पानसे

2 प्रतिक्रिया:

Unknown said...

सर, तुमचे मत मला तंतोतंत पटते, आजकाल सामाजिक जीवनाबद्दल फक्त दोनच प्रकारच्या लोकांना समजते, पहिले राजकारणी आणि दुसरे त्यांचे समर्थक, जर पुलं असते (त्यांच्या दुर्दैवाने) आणि त्यांनी जर कोणतेही सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले असते तर त्यांच्याही नावाने शिव्यांची लाखोली वाहिली असती, आणि ते संवेदनशील पुलंप्रेमींना सहन करावे लागले असते (कारण आपल्याला तशी भाषा जमणार नाही हे नक्की).

अमोल केळकर said...

एकदम मार्मिक