Tuesday, June 24, 2014

विनोदाने पुलकित करणारे पु.ल. देशपांडे - आरती नाफडे

पु. ल. देशपांडे २००० सालात १२ जून रोजी आपण सर्वांचा निरोप घेऊन गेले. पण तमाम महाराष्ट्रातील जनता ‘निरोप आमचा कसला घेता’ जेथे विनोद तेथे पु. ल. असे म्हणत पु. ल. ची स्मृती कायम जागृत ठेवली.

पु. ल. म्हणजे विविध गुणांची खाणच. त्या खाणीतून आपण विनोदाचं गाठोड बाहेर काढलं व उघडलं तर त्यांच्या विनोदातील वैशिष्ट्ये त्यांच्या विनोदात विपुलतेने आढळतात. पु. ल. सबकुछ असं आपण नेहमी म्हणतो व वाचतो, तर हे सबकुछ कसं अवगत होत गेलं याचा मागोवा घेताना पु. ल. सांगतात, चार्ली चॅप्लीन आणि वॉल्ट डिस्ने यांना शांततेसाठी असणारं नोबेलचं पारितोषिक द्यायला पाहिजे होतं. त्यांनी जगाला जो आनंद दिला तितका आनंद दुसरं कोणीही देऊ शकलं नाही. पु. ल. च्या मनात दडलेला महापुरुष चार्ली चॅप्लीन.

आजूबाजूची माणसं, परिस्थिती माणसावर एक संस्कार करून त्याला घडवत असतात, असं सांगताना पु. ल. म्हणतात, पार्ल्याला घराच्या ओसरीवर गाण्याचा अड्डा नेहमीच जमत असे. गाण्याचे कार्यक्रम नेहमी होत असत. पण परीक्षा आली की त्यावर बंधनपण येत असे. परंतु परीक्षा दरवर्षी येते म्हणून काय गाणं चुकवायचं का म्हणणारे वडील पु. ल. ना मिळाले आणि म्हणून गाण्याचा कार्यक्रम असला की गाण्याला ‘जातो’ अनाऊंस करायचं.
पु. ल. नी एकदा नाटक बघायला गेले असताना सिगरेट ओढली. वडील पण त्याच नाटकाला आले होते. घरी आल्यावर वडिलांना विचारलं नाटक कसं झालं? वडील म्हणाले, ‘चांगलंच झालं शिवाय तुला सिगारेटचा ठसका नाही लागला.’ अशा मोकळ्या वातावरणात विनोद फुलत गेला. पु. ल. नी लेखक व्हावं असं आजोबांना वाटे. आजोबा साहित्यप्रेमी, तर वडील गाण्याचे शौकीन. पु. ल. चे मामा स्टोरी टेलर. ते गोष्टी रंगवून सांगत असत. गाण्याची, नाटकाची व साहित्याची आवड असणारे सगे सोयरे, साध्या वातावरणातील मध्यमवर्गीय कौटुंबिक परिसर ही पु. ल. च्या जीवनातील मोठीच देणगी होय. पु. ल. म्हणतात, विनोदाचं जीवनात नेमकं स्थान कोणतं? 

विनोदाने काय दिले- या प्रश्‍नाचं उत्तर देताना त्यांच्या शब्दात, ‘विनोदानं प्रमाणाची जाणीव दिली, आयुष्यात पहिलं काय आणि दुसरं काय हे शिकवलं.

विनोद हा परमेश्‍वराची देणगी असते. तो कळण्याकरिता विशिष्ट मानसिकता लागते. पु.ल. च्या जवळ सहज विनोद आहे. तसेच उत्स्फूर्त विनोद हा पु. ल. च्या व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वाचा विशेष होता. हजरजबाबीपणा व विनोदाची अशी खास शैली पु. ल. जवळ होती व म्हणूनच खाजगी गप्पांची महफील गाजविताना त्यांच्या कोट्या, विनोद भान विसरून श्रोते मंडळींना त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटत असे. फटाफट हशा हा मैफिलीची रंगत वाढविण्यात नेहमी अग्रेसर राहत असे. कारण पु. ल. चे विनोद वा कोट्या गुदगुदल्या करून निर्मळ आनंद देणार्‍या असत. घरातील चार पिढ्या एकत्र बसून विनोदाचा आनंद लुटू शकतात.
त्यांच्या जबरदस्त निरीक्षणशक्तीमुळे पु. ल. सहज विनोदाचे माध्यमातून लोकांमध्ये सुसाट वार्‍यासारखे पसरत. स्वत:वर कोटी व विनोद पु. ल. करीत. स्वत:चा व सुनीताबाईंचाही अपवाद करीत नसत. सुनीताबाई पु. ल. ना सारखा औषधाचा व खाण्यापिण्याचा सल्ला देत तेव्हा पु. ल. त्यांना जाहीरपणे ‘उपदेश पांडे’ म्हणायचे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एकदा पु. ल. ना म्हणतात, तुमच्या घरी काय तुम्ही अन् सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार. पु. ल. नी गंभीर चेहरा करीत म्हटले, बायको तुमच्यावर तलवारीचे सारखे वार करते व तुम्ही ढाल धरून ते चुकवीत आहात असे चित्र असते. पु. ल. म्हणतात, आमच्या घरी नुसता हास्यकल्लोळ नसतो तर सर्व कल्लोळ असतात. अगदी संशयकल्लोळ सुद्धा.
विनोद हा पु. ल. च्या लेखनाचा स्थायीभाव. निखळ विनोद निर्मिती करून पु. ल. नी प्रेक्षकांचे मनात अढळ व मराठी भाषेत सम्राटपद मिळवलं आहे. 
पु. ल. च्या विनोदी साहित्य क्षेत्रातील त्यांचे स्थान म्हणजे देदीप्यमान चमकणारा तारा आहे. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, गणगोत, व्यक्ती आणि वल्ली अशी कितीतरी पुस्तकं विनोदाबरोबरच माणसं समजून घेण्याची मालिकाच आहे. जीवनाचा आनंद भरभरून लुटायचा असेल तर पु. ल. म्हणतात, एक बाजाची पेटी आणि ओंजळभर फुलं कायम घ्यावीत म्हणजे सूर आणि सुगंध यांनी जीवन सुंदर होते. अशा सुंदर जीवनात आयुष्यभर सर्वांना आनंद देत हसवीत हसवीत ते निघून गेले. पण असं तरी का म्हणायचे. कारण त्यांच्या विनोदी साहित्य रूपाने ते आपल्यात आहेतच. कवी कुसुमाग्रज म्हणत, पु. लं. चे साहित्य म्हणजे एक ‘पुलबाग’ आहे. कवी मंगेश पाडगावकरांनी पु. लं. च्या अमृत महोत्सव प्रसंगी लिहिले ते असे.

‘पु. ल. स्पर्श होताच दु:खे पळाली
नवा दूर, आनंदयात्रा मिळाली
निराशेतूनी माणसे मुक्त झाली
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली’

पु. ल. स्वत:बद्दल म्हणत की, ब्रह्मदेवानं त्यांना ‘हसवण्याचा गुण’ एवढेच भांडवल देऊन इहलोकी पाठवलं, जीवनातले चांगले पाहून ते आनंदले, तो आनंद त्यांनी भरभरून वाटला.
त्यांच्या साहित्यरूपी आनंदयात्रेत सामील होणं, त्यांच्या साहित्याचा आस्वाद घेऊन आनंद लुटणं हे त्यांच्या स्मृतिदिनाचे दिवशी खरे स्मरण होय.

आरती नाफडे 
तरुण भारत
१३ जून २०१४

Thursday, June 12, 2014

अजि म्या पु.ल. पाहिले

महाविद्यालयात असताना डोक्यात अनेक खुळं घुसतात, ठाण मांडून बसतात आणि मग जे काही ठरवलं असेल ते तडीस नेल्याखेरीज मन स्वस्थ बसू देत नाही. ते वयच तसं असतं, मग मी तरी त्याला अपवाद कसा असणार? त्यातलंच एक वेड म्हणजे माझे आवडते लेखक आणि अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना भेटायचं. पण माझ्यासमोर मूलभूत का काय म्हणतात तसा प्रश्न उभा होता की "कसं?"
वार्षिक परिक्षा संपल्यावर एकदा 'गणगोत' हे पुस्तक वाचत बसलो असता अचानक मनात विचार आला.....महाविद्यालयालयीन किंवा ग्राम्य भाषेत सांगायचं तर 'डोक्यात किडा वळवळला'...की आपण यांना भेटायला हवं, नव्हे भेटायचंच.
पुस्तक वाचून संपवलं आणि मेजावर ठेवणार तोच माझ्या हातातून सटकलं. खाली पडू नये म्हणुन पटकन दोन बोटात धरलं तेव्हा उचलताना पुस्तकाच्या सुरुवातीला पुस्तकाचे हक्क वगैरे लिहीलेल्या पानावर पु.लं.चा पुण्यातला पत्ता दिसला आणि माझी ट्युब पेटली. सुट्टीत पुण्याला मामाकडे जाणार होतोच. म्हटलं तेव्हा सरळ त्यांच्या घरी जावं. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात त्यांची घरं असल्याने ते नक्की कुठे असतील हे कसं समजणार ही सुद्धा समस्या होतीच. शिवाय फोन करून भेट ठरवायला मी काही पत्रकार नव्हतो किंवा कुठला कार्यक्रम ठरवायला जाणार नव्हतो. पण माझ्या नशीबात त्यांचं दर्शन घडणं लिहिलं होतं बहुतेक. कारण दुसर्‍याच दिवशी एका वर्तमानपत्रात ते कुठल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात असल्याचं वाचनात आलं आणि ठरवलं की ह्या पुण्याला मामाकडे जाईन तेव्हा आगाऊपणा करून सरळ त्यांच्या घरीच जायचं.
मग ४ जून १९९६ च्या गुरुवारी दुपारी साधारण चार-साडेचारच्या सुमारास मी आणि माझा मामेभाऊ सुजय असे पु.ल. रहात असलेल्या रूपाली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या सदनिकेसमोर उभे राहिलो. आम्ही भलतं धाडस केलं होतं खरं, पण पु.लं.ना आमच्यासारख्या आगाऊमहर्षींकडून त्रास होऊ नये म्हणून सदैव सजग असणार्‍या सुनीताबाई आम्हाला आत तरी घेतील की नाही अशी भीती होती. "शेवटी आलोच आहोत तर बेल तर वाजवूया, फार फार तर काय होईल, आत घेणार नाहीत, भेटणार नाहीत, एवढंच ना" अशी स्वत:चीच समजूत काढून आम्ही धीर केला आणि बेल वाजवली". दार उघडलं गेलं आणि........
..........."अजि म्या ब्रह्म पाहिले " अशी अवस्था झाली. समोर साक्षात पु.ल.! स्मित
मी भीत भीत म्हणालो, "आम्ही मुंबईहून तुम्हाला भेटायला, तुमची स्वाक्षरी घेण्यासाठी आलो आहोत, आम्ही येऊ का?". मी मनात हुश्श केलं.
"आत या," पु.ल. म्हणाले. आम्हाला हायसं वाटलं. आम्ही दोघांनी त्यांचा प्रत्येक शब्द मनात साठवून ठेवायचा असं ठरवलं होतं. खरं सांगतो, त्यांनी त्याक्षणी "चालते व्हा" असं म्हणाले असते तरी आम्हाला तेवढाच आनंद झाला असता.
थोडं विषयांतर होतंय, पण एक उदाहरण देऊन कारण सांगतो. इथे मला लौकीकदृष्ट्या नुकसान झालं तरी त्याचा फायदा कसा करून घ्यावा ह्याच्याशी संबंधीत एक किस्सा आठवला.
गॅरी सोबर्स यांनी इंग्लंड मधल्या एका काऊंटी सामन्यात माल्कम नॅश नामक गोलंदाजाला एका षटकात, म्हणजेच सहा चेंडूंवर, सहा षटकार मारले. पु.लं.नीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 'मुंबईत क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे' तसा तो राणीच्या देशातही असावा, कारण नॅशने आपली गोलंदाजी धुतली गेली म्हणून रडत न बसता त्याला ते सहा षटकार कसे मारले गेले ह्याचं रसभरीत वर्णन करणारे कार्यक्रम (टॉक शो) सादर करून त्याच्या आख्ख्या क्रिकेट कारकिर्दीत कमावले नसतील इतके पैसे कमावले.
तद्वत "आम्हाला हाकलले, पण कुणी? प्रत्यक्ष पु.लं.नी" असा मित्रमंडळींमध्ये, खाजगी का होईना, कार्यक्रम त्यांना 'वीट' येईल इतक्या वेळा सादर केला असता फिदीफिदी
आम्हाला आत यायला सांगून पु.ल. सोफ्यावर बसले. त्यांच घर अगदी त्यांच्यासारखंच साधं आणि नीटनेटकं. समोर भिंतीवर चार्ली चॅपलीनचं एक पोस्टर. आम्ही आपापल्या कागदावर त्यांची स्वाक्षरी घेतली. मी माझ्या हातातल्या कॅमेर्‍याकडे बोट दाखवून त्यांना "आमच्याबरोबर तुमचा एक फोटो काढू का?" अशी विनंती केली. पण त्यांनी "नका रे, आजारी माणसाचा कसला फोटो काढायचा" असं म्हणून नकार दिला. मी थोडा खजील झालो, कारण त्यांचे गुढगे दुखत होते हे त्यांच्या चालण्यातून दिसत होतं. त्यांनी असं म्हणताच सुजयच्या चेहर्‍यावर एक नाराजीची सुक्ष्म लकेर उमटलेली मला दिसली. "ठीक आहे, माफ करा. स्वाक्षरी बद्दल धन्यवाद" असं कॄतज्ञतेने म्हणून आम्ही त्यांच्या पाया पडलो. सुनीताबाईंकडे पाणी मागितलं व पिऊन लगेच निघालो.
माझ्यासाठी "आता मी मरायला मोकळा" असं वाटण्याचा तो क्षण होता.
"काय हे, फोटो का नाही काढून दिला, पु.ल. आहेत ना ते", आम्ही इमारती बाहेर आल्यावर सुजयची चिडचिड बाहेर पडली. लहान मूल रुसल्यावर कसं दिसेल तसे हुबेहुब भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते. "अरे सुजय", मी म्हणालो, "तू एक लक्षात घे, ते पु.ल. असले तरी भारतीय रेल्वे किंवा एस.टी. सारखी 'जनतेची संपत्ती' नाहीत. त्यांची प्रायव्हसी महत्त्वाची नाही का? आपण आगाऊपणा करून भर दुपारी गेलो खरं, नशीब सेलस्मन लोकांना हाकलतात तसं आपल्याला हाकलून नाही दिलं. उगीच कुणालाही फोटो कोण काढू देईल?" आता सुजयची नाराजी थोडी कमी झालेली दिसली.
"आणि असं बघ, काही देवळात फोटो काढायला बंदी असते की नाही, तसंच हे ही समज. ह्या साहित्यातल्या आपल्या दैवताचा फोटो आपल्याला काढता आला नाही असं समज. आणि त्यांनी आपल्याला प्रसाद दिलाय की!"
"प्रसाद?" सुजय बुचकळ्यात पडला. "अरे आपल्याकडे ह्या साहित्यातल्या देवाचा स्वाक्षरीच्या रूपाने प्रसाद आहेच की". असं म्हणताच सुजयची खळी खुलली.
मी पु.लं.ना प्रत्यक्ष भेटलो हे ऐकल्यावर द्राक्ष आंबट लागलेली एक कोल्हीण...आपलं...माझी एक मैत्रीण म्हणाली, "हँ, त्यात काय पु.ल. आपल्या पुस्तकातून सगळ्यांनाच भेटत असतात". खरय की - लेखक आणि कवी त्यांच्या पुस्तकातून, खेळाडू मैदानात किंवा टी.व्ही. वरील थेट प्रक्षेपणातून आणि कलाकार त्यांच्या कलेतून सगळ्यांनाच भेटत असतात. पण यांपैकी आपली आवडती व्यक्ती प्रत्यक्ष समोरासमोर भेटावी, त्या व्यक्तीशी थोडंसं का होईना बोलायला मिळावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. पण ते भाग्य फार थोड्यांच्या नशीबी येतं आणि अशा नशीबवान लोकांपैकी मी एक आहे ही एक खास गोष्ट खचितच आहे.
pula04061996_01.JPG
मुंबईला परतताच वर्तमानपत्रातला पु.लं.चा एक फोटो त्या कागदावर चिकटवून तो स्वाक्षरीचा कागद फ्रेम करून घेतला. वरच्या चित्रात दिसणारी ती फ्रेम पुण्यातील माझ्या घरात त्या जादूई क्षणांची आजही आठवण करून देते आहे.
मी ज्या दिवशी पु.लं.ना भेटलो तो दिवस ४ जून आणि त्यांची पुण्यतिथी १२ जून हे दोन्ही दिवस जवळ आले आहेत असं लक्षात आलं आणि ह्या आठवणी सहज शब्दबद्ध झाल्या. तुम्हाला कुणाला पु.ल. भेटले असल्यास तुम्हीही तुमच्या आठवणी सांगा.
मंदार जोशी
मुळ स्त्रोत -- > http://www.maayboli.com/node/16070