Monday, December 12, 2011

पु.ल. संचिताची बखर - प्रशांत असलेकर

पु. ल. देशपांडे यांचे पुतणे जयंत देशपांडे यांना त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच पुलंची व्याख्याने, गप्पांचे फड, आप्तमित्रांच्या मैफली यांचे ध्वनिमुद्रण करण्याचा छंद जडला. त्यातून त्यांच्या हाती लागला एक अनमोल खजिना. या अलिबाबाच्या गुहेबद्दल..

जेहत्ते काळाचे ठायी महाराष्ट्र नामक भूप्रदेशी काका-पुतणे यांचे नाते बहुत बदनाम असे. प्रंतु याच महाराष्ट्र देशी दुसऱ्या एका पुतणियाने मात्र आपुले थोर काकांचे सांस्कृतिक संचित जतन करण्याचा मोठा शर्थीचा यत्न चालविला असे. ते श्रीमान म्हंजे दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे पुतणे रा. रा. जयंतराव देशपांडे! पुलंचे कनिष्ठ भ्राता उमाकांत यांचे चिरंजीव!

स्वर्गीय पु. ल. देशपांडे यांणि कोठेही गुळाचा गणपती न बनता साहित्याचे प्रांती खाशी मुशाफिरी केली. टवाळांसी रोचणारा विनोद नामक पदार्थ निर्विखार करून तो मवाळांचे गळी उतरविला. विनोदास हीन लेखणारी, भाषांतरास निकृष्ट समजणारी समीक्षकशाही, आढय़ताखोरी, राजकीय हुकूमशाही आदी पातशाह्य़ा दबवून आनंदाचे राज्य स्थापित केले. बेकेट, बर्नाडची लूट करून मराठी दौलत वाढविली. पराक्रमाचे विविध दुर्ग सर केले. मराठीयांची हृदये काबीज केली. अनंत गडकोट-लष्कर उभारिले. समानधर्मीयांची मांदियाळी मेळविली. तमाम महाराष्ट्राची अभिरुची एका उच्च पातळीस नेवोन भिडविली.

ऐशा पराक्रमी काकांचे माघारी त्यांचे जे जे म्हणोन संचित दृक्श्राव्य माध्यमात उरले असे, ते पुढील पिढीसाठी जतन करण्याची मोठी मोहीम जयंतराव देशपांडे यांणि हाती घेतली असे. जयंतराव म्हणितात, ‘पुलं ही चीजच अशी होती, की त्यामागे सदासर्वकाळ ध्वनिरेखाटन यंत्रणा घेवोनच धावावे. त्यांचे बोलणे, भाष्य करणे, गप्पा मारणे- सारेच अमृतासमान.’ जयंतरावांसी विद्यार्थीदशेतच याची जाणीव झाली. पुढती त्याणि असा मनसुबा केला की, पुलंचे मुखातून जी अमृतवाणी स्रवते ती शक्य तितुकी ध्वनिमुद्रांकित करावी.

ध्वनिमुद्रांकनाचे तंत्र त्याकाळी बहुत खर्चिक तथा जडबंबाळ होते. कॅसेट नामक सुबक ध्वनिफिती अवतीर्ण जाहल्या नव्हत्या. ध्वनिरेखाटन स्पूल नामक अवाढव्य रिळांवरी करावे लागे. जयंतराव मुंबईतील मौजे पारलई येथे राहतात. त्याकाळी पारलईत नंदू कुलकर्णी नामक गृहस्थांची ध्वनिक्षेपण यंत्रणेची मक्तेदारी होती. जयंतराव याणि नंदू कुलकर्णी यांच्याशी मसलत करोन भाईंचे पाल्यात जे जे कार्यक्रम घडो येतील त्यांची ध्वनिमुद्रिका रेखांकित करण्याचा परवाना हासिल केला. जयंतराव त्याकाळी विद्यार्थीदशेत होते. ध्वनिमुद्रांकनासाठी लागणारे स्पूल खरेदी करण्यासाठी त्यांसि बहुत यातायात करावी लागे.

त्याणि ध्वनिमुद्रित केलेले पुलं यांचे प्रथम भाषण म्हणिजे जनता पार्टीचे उमेदवार एच. आर. गोखले यांचे प्रचार सभेतील पुलंचे भाषण. मोहतरमा इंद्रा गांधी याणि त्यावेळी त्यांचे वीस कलमी कार्यक्रमास भगवद्गीतेची उपमा दिली होती. त्यावरी भाष्य करताना पुलं म्हणाले, ‘इंद्राजींची २० कलमे धुंडाळण्यास आम्ही गीता उघडली. प्रंतु पहिलेच वाक्य ‘संजय उवाच’ ऐसे आढळून आल्यावर घाबरून मिटोन टाकली.’

या प्रसंगाचे ध्वनिमुद्रण जयंतराव यांणि स्पूल नामक स्थूल ध्वनिफितीवरी केले. त्यानंतरही काही काळ हा सिलसिला चालू होता. काही काळ त्यांणि त्यांचे आत्याचे यजमान तेलंग- जे गुप्त पोलीस वार्ता विभागात होते- यांच्याकडून पोलिसांचे ब्रीफकेससदृश ध्वनिरेखाटन यंत्र उसने आणून पुलंच्या बऱ्याच भाषणांचे, संगीत मैफिलींचे तथा दोस्तांबरोबर रंगलेल्या गप्पाष्टकांचेही ध्वनिमुद्रण केले.

काळाचे ओघात ध्वनिमुद्रण पद्धतीत पुढे बहुत फर्क पडला. स्पूल ते कॅसेट ते सीडी ऐशी स्थित्यंतरे होत सांप्रतकाळी ती डीव्हीडी नामक स्वरूपात करिना कपूरप्रमाणे ‘झीरो फिगर’ची होवोन अवतीर्ण झाली असे. जयंतराव यांणि या सर्व आधुनिक तंत्रांचा अवलंब करून पु. ल. देशपांडे यांचे मुखातून बाहेर पडलेला शक्य तितुका शब्द तथा सूर जतन करोन ठेविला असे. जयंतरावांचा पुलंविषयीचा ध्वनिमुद्रिकासंग्रह म्हणजे एक अलिबाबाची गुहा असे. ज्यांची आपण कल्पनाही करो शकत नाही, अशी काही अतिदुर्मीळ ध्वनिमुद्रिते त्यांचे संग्रही आहेति.

साहित्यिक व. कृ. जोशी यांचे शुभमंगलप्रसंगी लग्नमंडपातच वसंतराव देशपांडे यांचे गायन व संवादिनीवर पुलं ऐसी मैफील रंगली होती. त्याची ध्वनिफीत या खजिन्यात असे. पुलं यांणि संगीत दिलेली (सहाय्यक संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे) मंगेश पाडगांवकरलिखित आकाशवाणीवरील ‘भिल्लन’ या संगीतिकेची ध्वनिफीत, गोविंदराव पटवर्धनांचे षष्ठय़ब्दीपूर्तीप्रसंगी पुलंनी केलेले भाषण तथा त्यानंतर गोविंदरावांबरोबर त्यांची रंगलेली जुगलबंदी, ‘वस्त्रहरण’ नाटकाचे १७५ व्या प्रयोगानिमित्त पुलं यांणि दिलेले आशीर्वचन, जागतिक मराठी परिषदेतील भाषण, ग्वाल्हेर गायकीवरील पुलंचे विवेचन, बालगंधर्व जन्मशताब्दी सोहळ्याचे प्रसंगी पुलंनी केलेले गुणगान, तसेच पुण्यभूषण पुरस्कार, गदिमा सन्मान, पुणे कानडी समाजातर्फे झालेल्या गौरवप्रसंगी पुलंनी केलेल्या भाषणांच्या ध्वनिफिती या संग्रहात आहेति.

ध्वनिमुद्रितांचे जोडीने पुढे दृक्श्राव्य मुद्रिताचीही (व्हिडीओ रेकॉर्डिग) सोय उपलब्ध झाली. जयंतराव देशपांडे यांचे संग्रही अशा अनेक दृक्श्राव्य चित्रफितीही उपलब्ध आहेति. पंडित सी. आर. व्यास यांचे षष्ठय़ब्दीपूर्तीप्रसंगी पुलंनी केलेले सांगीतिक भाषण, जनाबेअली मल्लिकार्जून मन्सूर यांचे पंच्याहत्तरीप्रसंगीचे पुलंचे भाषण आणि तदोपरांत मलिक्कार्जून मन्सुरांबरोबर झडलेली आणि उत्तरोत्तर चरमसीमेला पोहोचलेली जुगलबंदी, भार्गवराम आचरेकरांचा सन्मान व त्याप्रसंगीची जुगलबंदी, देवधर म्युझिक स्कूलच्या अमृतमहोत्सव प्रसंगीचे पुलंचे हृद्गत, पुण्यभूषण पुरस्कार प्रसंगीची ध्वनिचित्रफीत, ‘गुळाचा गणपती’ चित्रपटाचे पुन:प्रक्षेपणाचे वेळी भाईंनी केलेले भाषण अशा असंख्य ध्वनिचित्रफितीही या खजिन्यात समाविष्ट आहेति.

संगीत हा पु. ल. देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता. तसाच तो समस्त देशपांडे कुटुंबीयांचाच मूल जीवनाधार जाणावा. स्वभावत: जयंतराव देशपांडे यांच्या संग्रहात पुलंनी रंगविलेल्या असंख्य संगीत मैफिलींच्या ध्वनिफिती आहेत. त्यांची केवळ जंत्री देणेही अशक्य! १९७० साली घडलेल्या ‘मर्मबंधातली ठेव ही’ या कार्यक्रमाची ध्वनिफीत तर केवळ लाजवाब! जणू या संग्रहातील कोहिनूर हिराच! या कार्यक्रमात वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, माणिकताई वर्मा व भार्गवराम आचरेकर यांणि सहभाग घेतला होता. या नावांवरूनच ती मैफल किती रंगली असेल याचा अंदाज करावा. याशिवाय जयंतरावांचे संग्रही माणिकताई वर्मा व शोभा गुर्टू यांची पुलंनी घेतलेली मुलाखत व मैफल, गंगुबाई हनगल- फिरोज दस्तूर- भीमसेन जोशी यांच्यासमवेत रंगलेली मैफील यांच्याही ध्वनिचित्रफिती आहेति. तसेच न्यू जर्सी येथे महाराष्ट्र मंडळाच्या सभेत पुलंनी केलेले भाषण, डॉ. सुनील दुभाषी (अमेरिका) यांचे निवासस्थानी रंगलेला पुलंच्या गप्पांचा फड, त्यास संगीताची फोडणी, चतुरंग पुरस्कार प्रदानसमयी वसंत सबनीस आदींनी पुलंची घेतलेली प्रकट मुलाखत, त्याचप्रमाणे दस्तुरखुद्द पुलं यांणि घेतलेली बाकीबाब बोरकरांची तरल काव्य-मुलाखत, पुलं व सुनीताकाकू यांचे वेळोवेळीचे काव्यवाचन यांच्या ध्वनिचित्रफितीही जयंतरावांचे दफ्तरी जतन केलेल्या आहेति. पुलं यांचे प्रत्येक शब्दावरी अवघा महाराष्ट्र लट्टू होता आणि त्यांच्या तोंडून बाहेर पडलेला होता होईतो प्रत्येक शब्द जतन करण्याचा जयंतराव यांणि प्रामाणिक यत्न केला असे.

जयंतराव देशपांडे महोदयांचा हा खजिना केवळ पु. ल. देशपांडे या व्यक्तिसापेक्ष नसून संगीतविश्वातील जे जे अव्वल आहे, ते ते त्यांच्याकडे उपलब्ध असे. पुलंच्या निमित्ताने त्यांचा साहित्य-संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी स्नेह जुळला. तो स्नेह पुलंच्या माघारी आजही वर्धिष्णू असे. विविध गायकांच्या ध्वनिमुद्रिकांचा त्यात समावेश असे.
ध्वनिमुद्रिकांव्यतिरिक्त पुलंसंबंधित अनेक दृश्याचित्रांचाही त्यांच्यापाशी ठेवा असे. पुलं यांचे मौजीबंधन नरसोबाची वाडी येथे झाले. त्यासमयीचे कटीवस्त्र नेसलेले, हाती रुईचा दंड धरलेले बटू पुलं एथपासोन ते स्वयं जयंतरावांचे मौजीबंधनप्रसंगी धार्मिक विधीप्रसंगी बसलेले यजमान पुलं (वामांगी सुनीताबाईंची करडी नजर), दूरदर्शनच्या उद्घाटनप्रसंगी जवाहरलाल नेहरूंसमवेतचे पुलं अशा अनेक दुर्मीळ, ऐतिहासिक, माहितीपर छायाचित्रांचाही संग्रह जयंतरावांनी जतन करोन ठेविला असे.

ध्वनिचित्रफिती, छायाचित्रे याखेरीज जयंतराव यांचेकडोन पुलं यांच्याविषयी काही मनोरंजक, अप्रसिद्ध माहितीही कळते. देशपांडे कुटुंबीयांचे मूळ आडनाव गडकरी असे होते. कोल्हापूर जिल्ह्य़ातील चंदगड तालुक्यातील गंधर्वगड व कलानिधीगड या कलाक्षेत्राशी संबंधित नावांच्या गडांचे पुलं यांचे पूर्वज किल्लेदार होते. सारावसुलीच्या कामानिमित्ते त्याणि पुढती देशपांडे हे पदनाम आडनाव म्हणून धारण केले. पुलंना वडिलांचा सहवास अत्यल्प लाभला. त्यांच्यातील सारा कलावारसा हा त्यांच्या मातोश्री व मातुलवेशीयांकडून लाभला होता. पुलंमधील सर्व गुण अल्प प्रमाणात त्यांचे एक मामा महारुद्रमामा यांचे अंगीही होते. हे महारुद्रमामा मिश्कील बोलणे, हकिगत रंगवून सांगणे, नाटय़पदांचे कोकणीतून विनोदी विडंबन करणे यांत माहीर होते. हे सर्व गुण पुलंनी उचलिले व त्यांचा स्वतंत्र विकास केला. पुलं हे वास्तविक या महारुद्रमामांचीच विकसित आवृत्ती होती. त्यांचे अजून एक मामा मंगेशमामा हे मूक, बहिरे, पण अत्युत्कृष्ट चित्रकार होते. सतीश दुभाषींचे वडील नारायणमामा हेही गायनकलेत निपुण होते. पुलंना पेटीवादनाची गोडी लावण्यात महारुद्रमामा व नारायणमामांचा मोठा वाटा होता. पुलंना लहानपणी आजोळी ‘बाबुल’ म्हणायचे.

जयंतराव देशपांडे यांणि पुलंसंबंधित सारे संचित आधुनिकतेची कास धरोन मऱ्हाटीत ज्यास ‘सॉफ्ट कॉपी’ अथवा वलंदेजांचे भाषेत ज्यास ‘संगणकीय प्रत’ म्हणितात, त्या स्वरूपात रूपांतरित केलेली असे. याकामी त्यांस त्यांची धर्मपत्नी दिपाकाकू तथा ताम्रमुखी टोपीकरांचे प्रदेशी स्थायिक त्यांचे सुपुत्र निखिल, स्नुषा गौरी, तसेच कन्या नेहा कामत यांचीही साथ असे.
जयंतराव देशपांडे यांच्यापाशीचा हा संग्रह खासगी असला तरी पुलंप्रेमी व जिज्ञासू यांचेसाठी व्यापारी उपयोग न करण्याचे अटीवर तो खुला आहे. प्रस्तुत संग्रह जरी पु. ल. देशपांडे यांच्यासंबंधी असला तरी वस्तुत: ते साऱ्या महाराष्ट्राचे गेल्या अर्धशतकाचे सांस्कृतिक संचित असे. त्याची निगराणी राखून जयंतराव देशपांडे एक प्रकारे तमाम महाराष्ट्राचेच सांस्कृतिक धन जपण्याचा प्रयत्न करीत आहेति. इति लेखनसीमा.

प्रशांत असलेकर
रविवार ६ नोव्हेंबर २०११
लोकसत्ता

Wednesday, November 16, 2011

चष्मेवाला - विजय तेंडुलकर

भाईंचे अष्टपैलुत्व उलगडून दाखविणारे लिहिलेले लेख पुलंच्या जन्मदिनी परचुरे प्रकाशन मंदिरतर्फे ‘तुझिया जातीचा। मिळो आम्हां कोणी।।’ या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. या पुस्तकाचे प्रकाशन ८ नोव्हेंबर रोजी कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात विजय तेंडुलकर यांनी उभे केलेले पुलंचे अनवट व्यक्तिमत्त्व..

बिर्ला मातुश्री सभागार. ओकीबोकी, रीत्या खुच्र्याच्या हारींनी रेखलेली, धूसर काळोखानं भरलेली, भयाण स्तब्धतेनं व्यापलेली केवढी तरी पोकळी. केवढी तरी लांब, केवढी तरी रुंद. जणू राक्षसाच्या घरचा पेटारा आणि स्वप्नातल्या सात दालनांपलीकडे शिळा होऊन बसलेल्या राजकन्येसारखी ती अगदी टोकाला प्रकाशाच्या एकाच झोतानं उजळलेली पांढरीफेक साध्वी बिर्ला मातुश्री- पुतळ्याच्या निश्चलपणे चष्म्यातून दिवस-रात्र टवकारून पाहणारी. रीत्या रंगमंचावरून एकटेपणी सहज पाहावी, तो उरात कसनुशी धडकी भरविणारी. पोटात खड्डा पाडणारी. काळजाचा एखादा ठोका चुकविणारी.
- आणि मंद उकाडा.. एखाद्या उन्हात वाळवलेल्या आणि मग निववलेल्या पांघरुणात लपेटून बसावं, तसा आतून चुटपुटता बेचैन करणारा, पाठीच्या पन्हळीत घामाची ओली लव मधूनच उठवणारा. पंखे बंद. एअरकण्डिशनला सुट्टी. हे आड दिवसाचं, आड वेळेचं थिएटर. लग्नाविना मांडव किंवा रंग धुऊन बसलेली वारांगना. तितकंच ओकंबोकं, भयाण, असह्य़, निस्त्राण. सारं अस्तित्व धुपून गेल्यासारखं. थकलेलं, मरगळलेलं, जडशीळ होऊन ओठंगलेलं, जीवन्मृत. उजेडाच्या आणि काळोखाच्या सीमा पार हरवून बसलेलं.

रंगमंचावर त्यामानानं बरी परिस्थिती दिसते आहे. पडदा दुभंगलेला आहे. दोन-चार प्रकाशझोत वेगवेगळ्या बाजूंनी येऊन लोळले आहेत. मागल्या बाजूला एका नृत्यनाटिकेचा ‘डेकोरेटिव्ह’ पडदा. रंगमंचावर एक ठसठशीत बाई दुसऱ्या एका फिक्या माणसाला काहीतरी समजावून सांगत आहे. त्या माणसाची दाढीच तेवढी लक्षात राहते. पलीकडे काही खुच्र्या, एक टेबल. आणि एक हाडकुळा स्काऊटमास्तर शिट्टी बोटांभोवती घुमवीत रेंगाळतो आहे. तीन बाया- यातली एक उंच- हातात कार्डबोर्डच्या ढाली घेऊन फिरताहेत, येताहेत आणि पुन्हा जाताहेत. डोक्याला पावसाळी थाबडी टोपी ‘फिट्ट’ केलेला, उंच, काटकिळा एकजण येतो आणि विचारतो, ‘‘भाई, हे ठीक आहे ना?’’

भाई नावाचा तो कुणीतरी- जाडा चष्मेवाला- ‘फर्स्ट क्लास’ म्हणतो आणि हा रंगमंच, हे थिएटर हे सर्व काही आपल्यासाठीच घडवलं असल्यासारखा इतस्तत: फिरत राहतो- आत्मविश्वासानं. सुखानं. अगदी रुची घेत घेत. कधी त्या ठसठशीत बाईच्या वाटाघाटीत भाग घेतो, तर कधी स्काऊटमास्तरशी कुजबुजतो आणि केव्हा नुसताच गुणगुणतो; स्वत:शीच, स्वत:साठीच. तेवढी क्षणमात्र-सारी नि:स्तब्धता त्या सुरावटीच्या फुलपाखरांनी अंतर्बाह्य़ मोहरून जाते. मुक्त, उत्स्फूर्त, बांधेसूद, प्रसन्न अशी सुरावट. कुणीतरी कुणाला तरी हाक मारतं. कुणीतरी प्रेक्षागृहातून कोल्हापुरी वहाणा वाजवीत जातं. कुठंतरी ठोक् ठोक् सुरू होते, आणि त्यातच कुणालातरी ढोलकीवर हलकी सम घेण्याची लहर येते..
तो जाडा चष्मेवाला आत्मविश्वास आता, एकीकडे त्या समेवर मान मुरडून नुकत्याच येऊन उभ्या राहिलेल्या कुणालातरी सांगतो, ‘‘शहाण्या माणसानं नाटक करू नये, चर्चा करावी.’’

तो उभा राहिलेला हसतो. वाटाघाटी करणारी ठसठशीत बाई उभी राहून समोरच्या ‘दाढी’ला रंगमंचावर कसल्यातरी जागा दाखवू लागते. दोन गडी रंगवलेली एक खोटी भिंत घेऊन रंगमंच ओलांडून जातात. एक चष्मेवाली कोपऱ्यातल्या बाकावर बसून काहीतरी आठवू लागते आणि पगडी घातलेला एक जाडा आपल्याच पगडीच्या शानीत येतो आणि इकडेतिकडे घुटमळत राहतो. रंगमंचावरून प्रेक्षागृहात आता एक झारदार मर्दानी लकेर सफाईनं उतरते आणि डाव्या अंगानं मागे निघून जाते. ‘‘हा लाला देसाई..’’- जाडा चष्मेवाला आत्मविश्वास.. नवख्या माणसाला सांगतो, ‘‘काय गळा आहे!’’

प्रकाशझोत विझतात. बदलतात. वाढतात. कमी होतात. चर्चा होते- ठसठशीत बाई आणि चष्मेवाला आत्मविश्वास. एक-दोघे सल्ला देतात; एक-दोघे नुसतेच पाहतात, ऐकतात. बाकडय़ावरची विसरभोळी बाई आठवून आठवून कसल्यातरी नोंदी करते आणि उंच बाई पुन्हा एकदा निमित्त सापडल्यासारखी तरातरा येऊन जाते. एक टक्कलवाला गोरा गृहस्थ टपोऱ्या शुभ्र फुलांचा मोठा बांधीव गुच्छ आतून बाहेर आणि बाहेरून पलीकडे आत नेतो. मागे एक खुर्ची खाड्दिशी आपटते. त्यानिमित्तानं लक्ष पुन्हा मागे जातं आणि भास होतो, की हे सारं- रंगमंचावर आणि खालचं मिळून- एक स्वप्ननाटक आहे किंवा भासचित्र किंवा तसलं काहीही! पण हे खरं नव्हे.

पण मग तो चष्मेवाला आत्मविश्वास एकदम पृच्छा करतो- ‘‘रेडी एव्हरीबडी? सुनीता, वुई स्टार्ट नाव् अं!’’
क्षणभर जड शांतता. मग ‘‘ओ येस्..’’ ठसठशीत बाई ऊर्फ सुनीता.
‘‘कर्टन!’’ तो ओरडतो.

पडदा दोन्ही बाजूंनी येऊन एकसंध होतो. स्वप्ननाटक तात्पुरतं भंगतं. रंगमंच झाकला जातो. अंतरंग झाकलं जातं. आणि जणू एक लांब-रुंद दगडी चेहरा समोर उरतो. काहीही न सांगणारा. त्यासाठीच तो असतो- दर्शनी पडदा. काहीही न सांगण्याकरता. अपेक्षा निर्माण करण्याकरता. उत्सुकता ताणण्याकरता.

हजारो भुंग्यांनी गजबजल्यासारखं थिएटर. माणसांनी फुललेलं, रंगांनी खुललेलं. वेगवेगळ्या सुगंधांनी दरवळलेलं. धूसर प्रकाशाची धुंदी चढलेलं. पडद्यामागच्या वाद्यमेळानं भारलेलं. आणि प्रकाश आणखी धूसर होतो. अखेर नाममात्रच त्याचे कवडसे दूरदूरवर राहतात आणि दर्शनी पडद्यामागून शब्दांच्या गोंडस लकेरी बाहेर ओसंडू लागतात..
‘‘या या या या, मंडळी, या.. या, मंडळी, या.. या, या..’’

भाऊसाहेब, काकासाहेब, दादासाहेब, अण्णासाहेब, अक्कासाहेब, बाईसाहेब.. साऱ्यांचं भरभरून स्वागत. छोटय़ा बाळूचाही विसर नाही. पुरुषी आवाजाच्या जोडीला स्त्रीचा घरगुती, रेखीव शब्द.
- आणि निघतात सनईचे सूर.. ‘वराती’चा ‘मूड’ निर्माण करणारे.

पडदा दुभंगतो. आता प्रकाशाच्या नेमक्या फेकीनं उजळून निघालेली रंगमंचाची झगमगती चौकट समोर आकारते. मागे साधा निळा ‘कव्हर’चा पडदा.

‘वाऱ्यावरची वरात’चं पालुपद आळवणारा संच आपलं काम करून विंगेत जातो आणि दुडक्या चालीनं एक स्थूल देह लोटल्यासारखा रंगमंचाच्या मध्यभागी येऊन कसाबसा थांबतो. तोच तो- चष्मेवाला आत्मविश्वास. ‘‘सुनीता, वुई स्टार्ट नाव् अं!’’ म्हणणारा. ‘कर्टन’ची सूचना देणारा. मनानं रंगमंचाची रुची घेत, सुरांच्या चोरटय़ा लकेरी उडवीत त्या दिवशी इतस्तत: वावरणारा. ‘शहाण्या माणसानं चर्चा करावी, नाटकं करू नयेत..’ त्याचे शब्द.. नाटकंच करावीत, ज्यांच्यापाशी तेवढी धमक असते ते नाटकंच करतात, चर्चा करीत नाहीत, असं बजावणारे..
त्याच्या पहिल्याच पावलाला प्रेक्षागृहात हास्य खळबळू लागतं आणि पहिल्या वाक्याला त्याचा मोठा स्फोट होतो- ‘‘आता इथून गेलं ना, ते घोडं आमचंच!’’
बराच वेळ साथ जमवून आणि नोमतोम करून गवयानं अखेर पहिल्या समेवर आदळावं, तसा सारा कार्यक्रम इथं गच्चदिशी समेवर आदळतो आणि हुशारला प्रेक्षक सावरून बसतो. रंगमंचावरून चष्म्याच्या भिंगांवाटे भुवया किंचित आक्रसून पाहणाऱ्या शोधक नजरेला हवं ते सापडतं आणि दुणावल्या आत्मविश्वासानं, घरगुती सहजतेनं आणि अंगच्या जिद्दीनं पुढली वाक्यांची फेक चालू होते. हशांच्या पावत्या घेऊ लागते. आपण निर्माण केलेल्या वल्लींना सामोरी होऊन आपल्यावरचे आपलेच विनोद रंगमंचावरची ही चतुर आणि कसबी वल्ली अंगावर घेऊ लागते. उठणाऱ्या हशांनी प्रफुल्लित होऊ लागते. मनाजोगत्या न उठणाऱ्या हशांची कारणं तिरकस नजरेनं प्रेक्षकांत शोधू लागते. वाद्य मनाजोगतं बोलावं म्हणून बजवय्याचा अट्टहास, तसा समोरच्या प्रेक्षकांबद्दल जणू या चष्मेवाल्याचा अट्टहास. समोरचा प्रेक्षक मनाजोगता ‘बोलू’ लागेपर्यंत आपल्या विनोदाच्या तारा पिळण्याची त्याची खटपट. परंतु ती करताना मुद्रेवर तोच आरंभीचा लटका बावळटपणा, शब्दांच्या फेकीत तीच मुलायम सहजता. आवाजात मार्दव, जिवणीवर चोरटं स्मित आणि चष्म्याआडच्या डोळ्यांत मात्र शोधक अस्वस्थता.

होता होता तपकिरीचा किंचित साहित्यिक एजंट अंतर्धान पावतो. एका व्याख्यान समारंभाची आठवण जागी केली जाते आणि पाठोपाठ त्या व्याख्यानाशीच आपण पोहोचतो. ‘कव्हर’चा निळा पडदा बाजूला झाला आहे. एखाद्या आडगावच्या व्याख्यान समारंभाचा मालमसाला समोर मांडला आहे. पाच-सात बाप्ये, तीन-चार बाया, मागे एका काल्पनिक संस्थेचा ‘बॅनर’ आणि टेबलामागच्या ‘महत्त्वा’च्या खुर्चीत स्वत: सर्वाचा लाडका चष्मेवाला. आता कार्यक्रम चांगलाच ‘तापला’ आहे. रंगमंचावरच्या त्या दृश्यावर- त्यातही त्या टेबलामागच्या खुर्चीवर शेकडो नजरा खिळल्या आहेत; दुसरं-तिसरं काही नाही, मुबलक हसू मागणाऱ्या. जिवण्या विलगल्या आहेत, माना उंचावल्या आहेत, हात घट्ट जुळले आहेत, श्वास जडावले आहेत. पोटात कुठंतरी हसण्याची निकड दुखते आहे आणि स्वागतपर पद्यवाल्या बावळट बायांच्या हातांतल्या कार्डबोर्डच्या ढालींवरची ‘सुस्वागतम्’ या अक्षरांची बायांप्रमाणे उलटापालट होऊन प्रत्यक्षात ‘सासुगंमत’ किंवा या प्रकारचं काही समोर दिसू लागताच प्रेक्षकांची पोटं पुन्हा फसफसू लागतात आणि हास्याचे टोलेजंग मजले उठू लागतात. चष्मेवाला मागे खुर्चीत बसून ही आपली ‘कर्तृक’ संतुष्ट नजरेनं पाहत असतो. आता प्रेक्षक त्याच्या मनासारखे ‘बोलू’ लागलेले असतात. वाक्या-वाक्याला हशा उसळत असतो. एका हशातून दुसरा हशा निघतो. हास्याचे नुसते कल्लोळ प्रेक्षागारात उठत-फुटत असतात. आणि मधून मधून यात वाक्य लोपून केवळ त्यावरचा हशाच- खरं म्हणजे स्फुंदून स्फुंदून उठत राहतो.

हा ‘व्याख्यान समारंभ’ जरा लांबतोच; परंतु प्रेक्षकाला त्याची दखल नसते, भान नसतं. दखल असते- घडय़ाळांना आणि चष्मेवाल्याला. त्याच्या मनात काटछाटीचे विचार सुरूदेखील झालेले असतात. आक्रसल्या भुवयांखालची नजर पुढय़ातल्या पाठमोऱ्या ‘समारंभा’वर यादृष्टीने फिरूदेखील लागलेली असते. त्यातल्या ‘जागा’ हेरू लागलेली असते. पुढल्या अभंग, पोवाडा आणि लावणी गायनात तो साथीदारांसह घुसतो, तो बहुधा हाच विचार मनात घोळवीत. तो गातो, लचकतो, मुरडतो आणि मग शेवटी चक्क वारकरी बनतो. मागे-पुढे उडू, नाचू लागतो. वारकऱ्यासारखा रंगतो, रंगवतो. ‘ब्रह्मानंदी’ पोहोचलेला वाटतो. ‘वरातीमागलं घोडं’ शोधीत लोटत, लडबडत रंगमंचावर आलेली त्याची ती पावलं इथे हलकीफुल होऊन ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात नुसती नृत्य करू लागलेली दिसतात. स्थूल काया पिसासारखी हलकी झालेली असते. रोमरोमांत लय भरलेली असते आणि प्रेक्षागारातदेखील ती फिरू लागलेली असते.. साक्षात् इंद्रायणीचा काठ थिएटरात क्षणभर अवतरतो.. विठूचा गजरदेखील कानी येत राहतो.. मघाचचा चटोर चष्मेवाला तो हाच की काय, असा साक्षात् प्रश्न कुणाला पडावा.. परंतु हा तोच!.. हा ‘बटाटय़ाच्या चाळी’तलाच; पण ‘चिंतन’शील चष्मेवाला, ‘तुका म्हणे’, ‘भाग्यवान’, ‘तुझे आहे तुजपाशी’मधला भावुक, अंतर्मुख चष्मेवाला.. ‘जोहार मायबाप’ चित्रपटात चोखामेळा बनून अक्षरश: भक्ती जागलेला चष्मेवाला.. हा ‘कृष्णाकाठचे कुंडल’मधला परंपरेचं ऋण साक्षात रक्तात वागवणारा चष्मेवाला.. सुरांत रंगणारा, लयीत विरघळणारा कलावंत.. आणि तरीही मघाचाच, किंचित्काल- आधीचाच चटोर, चावट, मिश्किल, वर वर बावळट, पण अगदी हिशेबी चष्मेवाला.. दोन्ही एकच.. हीच तर किमया.. यासाठीच तर विठूचा गजर!..
संपलं. गजर ‘विंगे’त निघून जातो आणि रंगमंचावर पाहता पाहता वारकऱ्याचा विनोदी लेखक होतो- चष्मा सावरत खेडवळ जीवनाच्या या रम्य काल्पनिक चित्राच्या पाश्र्वभूमीवर आजच्या खेडय़ाचं विदारक चित्र रंगमंचावर बोलावतो आणि त्यात स्वत:ची कुचंबणा आणि किंचित विटंबनाही हौसेनं करून घेतो. विदारकता हास्याच्या कल्लोळात बुडाल्यासारखी वाटते, बोध बालिश मनोरंजनात हरवतो की काय, असं होतं; पण तेच अभिप्रेत असतं. पदवीनं प्रोफेसर असला आणि व्यवसायानंही काही काळ प्रोफेसर म्हणून जगला असला तरी हा चष्मेवाला रंगमंचाचं ‘व्यासपीठ’ करू इच्छित नाही. किंबहुना व्यासपीठाचा रंगमंच करणं त्याला अधिक पसंत. सूर, लय, नाटय़, हास्य हेच त्याचं क्षेत्र. विशेषत: हास्य. ‘विठू’च्या गजराच्या लयीनं क्षणमात्र भरलेलं, भारलेलं थिएटर पाहता पाहता हास्याच्या उकळ्यांनी उतू जाऊ लागतं आणि हा अमृताहून गोड भासणारा नाद श्रुतींत भरभरून घेत चष्मेवाला पुढल्या इरसाल ‘साक्षी’च्या ‘वन मॅन शो’ची मानसिक तयारी करू लागतो. त्यासाठी ‘फुरफुरू’ लागतो. सारं काही हिशेबाबरहुकूम चाललेलं असतं; थोडं जास्तच.. अपेक्षेपेक्षा अधिक.. क्वचित अनपेक्षित जागांवर हास्याचे भुसनळे फुटतात.. अपेक्षित जागा येण्याआतच प्रेक्षागृह हास्यानं तुडुंब भरून जातं.. आणि अपेक्षित जागा मूळ अपेक्षा तोटकी ठरवतात.. उठलेला हास्यकल्लोळ एकेकदा थांबत नाही, थांबतच नाही. थांबणारदेखील नाही- कधीच थांबणार नाही- असं क्षणभर वाटतं.. थिएटर कोसळणार असं वाटतं.. वाद्यातून बोल काढणाऱ्या वादकाला वाद्य आपसूक बोलू लागलेलं दिसावं, म्हणजे त्याच्या काळजात क्षणमात्र जे लकलकेल, मनात क्षणभर जे सरकून जाईल, ते अशावेळी कदाचित या चष्मेवाल्याच्या संवेदनक्षम, कुशाग्र मनात क्षणभरच, पण- दाटत असेल का? सूत्रधाराचा, कर्त्यांचा आत्मविश्वास आणि हिशेब अशा क्षणी पुरता लोपत असेल आणि कर्तुमकर्तुम् आदिशक्तीपुढं युगानुयुगे लीन होत आलेला नगण्य, क्षुद्र, असहाय, मूढ मानव- तेवढाच कदाचित एक क्षणभर उरत असेल..

पण नस्त्या कल्पना नकोत! तो पाहा, चष्मेवाला एखादं नर्मविनोदी वाक्य टाकून हास्याची पावती वसूल करण्याकरता चष्म्याच्या भिंगांतून किलकिल्या डोळ्यांनी पाहत अडून राहतो आणि ती मिळाल्यावरच पुढं जातो आहे.. हास्याची लाट ओसरत असल्याचं जाणवताच केवळ एखाद्या हालचालीनं किंवा आविर्भावानंदेखील मुक्त, खळाळतं हास्य निर्माण करतो आहे.. प्रेक्षक ‘बोलणं’ ही त्याची या क्षणी एकमेव आवड आहे. त्याच्या मनमोकळ्या, अगदी पाशवी हास्याचा नाद ऐकणं ही त्याच्या कानांची भूक आहे. त्या हास्याच्या वादळी समुद्रात मजेनं पाय चुळबुळवीत किनाऱ्यावर बसून तृप्त होणं हा त्याचा आनंद आहे.. ही जिद्द आहे.. धुंदी आहे.. आणि हे सारं त्याला साध्य आहे.. अगदी हात जोडून सेवेला उभं आहे.. हुकमेहुकूम.. क्षणमात्र होईल ही लाट त्याच्यावर स्वार.. किंवा तसा भास होईल.. पण एरवी तोच लाटेचा स्वामी आहे. तोच याक्षणी त्या रंगमंचाचा आणि शेकडो धडाडती काळिजं सामावणाऱ्या या प्रेक्षागृहाचा स्वामी आहे.. तोच त्या प्रकाशाचा आणि अंधाराचा स्वामी आहे..

मध्यांतर. विद्युद्दीप उजळतात आणि ‘बाहेर सगळी व्यवस्था आहे.. जे लागेल ते- तितकं विकत घेऊन खा, अनमान करू नका,’ म्हणून सांगणारा तो आर्जवी, गोंडस आवाज त्याच्या धन्यामागोमाग अंतर्धान पावतो. समोर पुन्हा तो एकसंध दर्शनी पडदा.. नव्यानं अपेक्षा चाळवणारा, उत्कंठा ताणणारा.. मख्ख! कुणीतरी कुणालातरी म्हणतं, ‘‘करमणूक म्हणून ठीक आहे..’’

- आणि कुणी आणखी कुणाला बजावतं- ‘‘ग्रेट!’’
चष्मेवाला. घर- बिछायतीवर लोळलेला. चिंतनमग्न. जवळ सवयीनं पेन, कागद. टीपॉयवर सकाळची वर्तमानपत्रं. यांतल्या एक-दोनांत तरी ‘वराती’ची समीक्षणं. एखादी सनसनाटी बातमी छापावी, तशी गरमागरम. फोन सारखा वाजतो आहे. लोक तिकिटं किंवा कंत्राटं मागतात किंवा अभिनंदन करतात. हे सारंच कंत्राट सुनीता नामे ठसठशीत बाईकडे सुपूर्द. अगदी तहहयात.
पोस्टमन पत्रं आणून टाकतात. सगळी अभिनंदनाची, स्तुतीची, कौतुकाची. व्याख्यानांची निमंत्रणं, प्रस्तावनेची गळ, लेखासाठी विनंत्या, कथाकथनासाठी विचारणा, ग्रंथप्रकाशनाची मागणी, इत्यादी लफडी त्यांत बहुधा असतातच. परंतु-
‘‘आमच्या आयुष्यात तुम्ही खरेच आनंदाची हिरवळ निर्माण केलीत..’’
‘‘तुमच्या वरातीनंतर आता दोन महिने सगळे करमणुकीचे कार्यक्रम रद्द..’’
‘‘तुमचा कालचा कार्यक्रम भलताच हास्यास्पद वाटला.. इतका मी कधीच हसलो नव्हतो..’’
‘‘ही वाईची दुर्गी कोण?..’’
हे नमुने तूर्त फार..

भेटायला मित्रमंडळी येतात आणि कालच्या कार्यक्रमाच्या घोळघोळून आठवणी काढतात.. आठवणीनंही गुदगुल्या झाल्यागत हसत राहतात.. त्याआधीच्या कार्यक्रमाशी तुलना करतात..

फोटोग्राफर अल्बम घेऊन येतो. कार्यक्रमाचे फोटो. गदगदून हसणारे यशवंतराव, टाळी देणारे बाबूराव, अक्षरश: घोडय़ासारखा खिदळणारा कोणीतरी आणखी ‘राव’, डोळ्यांत पाणी जमेस्तोवर हसून दमलेल्या आयाबाया, जागच्या जागी उशा घेणारी पोरंटोरं, न हसवल्यानं डोळे मिटून हसत बसलेला संपादक, एरवी भारदस्त, गंभीर, विचारमग्न, चिंताग्रस्त, लांब दिसतील असे कित्येक हसरे, खुलले चेहरे, या साऱ्या गदारोळात न हसण्याचा तोंड दाबून प्रयत्न करणारा कोठल्यातरी बँकेचा काळा चष्मेवाला मॅनेजिंग डायरेक्टर.. आणि उरलेला सगळा आपला चष्मेवाला.. रंगमंचावर, रंगमंचामागे, कोणातरी बरोबर, एकटा, डोक्यावर फडकं गुंडाळलेला, पोटाला अ‍ॅप्रेन बांधलेला. पेटी वाजवताना, गरबा खेळताना, उडय़ा मारताना, थुंकताना, मेंदीनं हात माखलेल्या सौ.च्या तोंडाशी फोनचा घसरता रिसीव्हर धरताना, रामागडय़ाशी चार सुख-दु:खाच्या गोष्टी करताना, लावणी म्हणताना, अभंग नाचताना..

बिछायतीवरचा चष्मेवाला हे सारे फोटो किलकिल्या डोळ्यांनी आणि आक्रसल्या भुवयांनी न्याहाळतो. पाय जरा जास्त ताणतो. ‘डब्बल’ जिवणी थोडी हलवतो. मग खूश होऊन बोटांनी पोटावर ठेका धरीत एक सुरावट सिगारेटच्या धुरासारखी सोडून देतो आणि हाकारतो, ‘‘सुनीताबाई, आणखी दोन कप चहा टाका.’’
कुशीदेखील वळण्याची तसदी तो घेत नाही. तूर्त वळण्याची आवश्यकता नसते.

(पूर्वप्रसिद्धी : पु. ल. ७५)
(या ग्रंथाचे मूल्य ३०० रु. असून वाचकांना तो २५० रु. या सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात येणार आहे. पहिल्या आवृत्तीच्या प्रत्येक प्रतीमागे २५ रु. भाईंच्या स्मरणार्थ बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’ संस्थेला देण्यात येणार आहेत.


विजय तेंडुलकर
लोकसत्ता
६-नोव्हेंबर-२०११

Friday, November 11, 2011

एक आणि एकमेव - शांता शेळके

८ नोव्हेंबरला पुलंच्या जन्मदिनाचं औचित्य साधून 'परचुरे प्रकाशन' तर्फे 'तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात विविध मान्यवरांचे पुलंविषयीचे लेख संकलित करण्यात आलेत. त्यापैकीच पुलंच्या साहित्यिक-सांस्कृतिक व्यक्तिमत्वाचे लोभस पैलू व्यक्त करणारे हे काही लेख...
- शांता ज. शेळके

पु.ल. देशपांडे यांच्या लेखनातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचे आणि त्यांतून प्रकट होणा-या त्यांच्या साहित्यगुणांचे वर्णन अनेकांनी अनेक प्रकारे केले आहे. त्या वर्णनांनाही पुरुन उरेल इतकी चतुरसता, समृद्धता त्यांच्या विविध आणि विपुल वाङ्मयीन आविष्कारांत आहे. तथापि, हे सारे गुणविशेष ध्यानात घेऊनही पु.लं.चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य मला जाणवते, ते म्हणजे त्यांच्या लेखनातून सतत व्यक्त होणारी मध्यमवर्गीय संस्कृती. गेल्या अनेक पिढ्या मराठी माणसाने आपली म्हणून जी संस्कृती, जीवनसरणी अनुभवली आहे, जपली आणि जोपासली आहे; तिचा इतका सर्वांगीण, संपूर्ण आणि खोलवर वेध घेणारा पुलंसारखा अन्य कोणताही लेखक गेल्या अर्धशतकात मराठी साहित्यामध्ये होऊन गेलेला दाखवता येणार नाही. एक लेखक आणि एक माणूस या नात्याने पुलंनी जी अपरंपार लोकप्रियता संपादन केली, त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या साहित्यातून सतत प्रकट होत राहिलेली ही मराठी मध्यमवगीर्य संस्कृती. बहुसंख्य मराठी माणूस ही या संस्कृतीचीच निमिर्ती आहे. म्हणून तिचा सातत्याने आविष्कार करणारे पु.ल. मराठी वाचकांना इतके भावले, आवडले. नुसते आवडले इतकेच नव्हे; हा लेखक त्यांना अगदी आपला, आपल्या घरातला, आपल्याच रक्तामासाचा असा वाटला. पुलंशी त्यांचे अभिन्न, उत्कट असे नाते जडले. ही आपुलकी, ही जवळीक गेल्या अर्धशतकात अन्य कोणत्याही लेखकाच्या वाट्याला आलेली नाही.

पुलंच्या साहित्यात वारंवार येणा-या या मध्यमवर्गीय संस्कृतीमुळे ते वाचकांच्या सर्व थरांत जाऊन पोहोचले, त्यांना अतिशय लोकप्रियता लाभली ही गोष्ट खरीच आहे; पण त्यामुळेच त्यांच्या साहित्यावर वेळोवेळी काही आक्षेपही घेतले गेले. एका मुलाखतीत पुलंनी या आक्षेपाला आपल्या परीने उत्तर दिले आहे. ते म्हणतात, 'मी मध्यमवगीर्यांवरच सगळं साहित्य लिहिलं, असा आक्षेप मध्ये कुणीतरी माझ्यावर घेतला. पण मी मध्यमवर्गीयांवर लिहिलं याचं कारण मीच मुळात मध्यमवर्गीय आहे, हे आहे. उद्या कुणी म्हणालं, तुम्ही सगळं मराठीतच लिहिलं आहे. तर त्याला काय उत्तर देणार? मला मराठीत लिहिता येतं म्हणून मी मराठीत लिहिलंय एवढंच!' पुलंनी आपल्या आक्षेपकांना दिलेले हे उत्तर अर्थपूर्ण आहे. पुलंच्या लेखनावर घेतला जाणारा आणखी एक आक्षेप म्हणजे, ते भूतकाळात अधिक रमतात. इंग्रजीत ज्याला nostalgia म्हणतात ती स्मरणरंजनाची वृत्ती हा त्यांच्या वाङ्मयीन आणि व्यक्तिगत स्वभावाचा एक ठळक विशेष आहे. या दोन्ही आक्षेपांचा थोड्या बारकाईने विचार केला पाहिजे; आणि त्यासाठी पु.लं.चे बालपण ज्या काळात गेले तो काळ, ती परिस्थिती प्रथम ध्यानात घेतली पाहिजे.

त्या स्वातंत्र्यपूर्व काळात कुटुंब हा मराठी समाजाचा केंदबिंदू होता. बहुतेक मराठी माणसे कुटुंबाच्या आश्रयाने राहत. एकूण जीवनालाच कुटुंबसंस्थेची भरभक्कम बैठक होती. पु.लं.चे संस्कारक्षम वय, त्यांचे बालपण या काळात गेले. कुटुंबजीवनाचे, त्याप्रमाणेच मध्यमवर्गीय संस्कृतीचे खोल ठसे त्यांच्या मनावर उमटले. त्यांनी सिद्ध केलेली नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यपरंपरा ही पु.लं.ची आधारभूत प्रेरणा होती. ती त्यांच्या साहित्यातच नव्हे, तर व्यक्तिगत जीवनातही वारंवार प्रकट होत राहिली. त्या काळातील वाङ्मयीन दैवते, तेव्हाचे राजकीय पुढारी, स्वातंत्र्याकांक्षेने भारलेले तेव्हाचे वातावरण; कोणत्याही संवेदनाक्षम उमलत्या मनाला आतून हेलावून टाकील, उत्तेजित आणि प्रस्फुरित करील असे ते सारे होते. पु.ल. जेव्हा मागच्या या काळाकडे वळून बघत, तेव्हा ते भारावून जात. हे मंत्रभारलेपण त्यांना कधी सोडून गेले नाही. त्यांच्या साहित्यावर वारंवार आढळून येणारी स्मरणरंजनाची वृत्ती ही पु.लं.ना त्या काळाने दिलेली देणगी आहे.

हे सारे खरे असले, तरी पु.ल. भूतकाळाचे केवळ भाबडे, भाविक भक्त नव्हेत. मध्यमवर्गीय संस्कृतीचा गुणगौरव करणा-या पु.लं.ना तिच्यातले दोषही दिसत होते. खुपत होते. मध्यमवगीर्यांची संकुचित मनोवृत्ती, जातीय अभिमानामुळे त्यांच्या ठायी निर्माण होणारे क्षुद अहंकार, आर्थिक कनिष्ठ जीवन वाट्याला आल्यामुळे श्रीमंतांविषयीचा खोलवर रुजलेला असूयायुक्त हेवा, पूर्वजांची थोरवी सांगून आपले दैन्य झाकण्याची धडपड या दोषांची पु.लं.ना चांगली जाण होती. तिने त्यांच्या विनोदी लेखनाला विषयांचा भरपूर पुरवठा केला. मध्यमवर्गीयांचे गुणदोषमुक्त प्रत्ययवादी चित्रण प्रथम चिं. वि. जोशी यांच्या चिमणरावाने केले. तेच चित्रण पुढे पु.लं.च्या विविध प्रकारच्या लेखांनी, व्यक्तिचित्रांनी अधिक मामिर्कपणे, अधिक जाणकारीने केलेले आढळेल. बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीने या मध्यमवर्गाच्या स्थैर्याला गदगदा हलवले, त्याची स्थिती अनुकंपनीय करून सोडली. या सर्व बदलांबरोबर मिळतेजुळते घेणे त्याला फार अवघड गेले. या वावटळीत सापडलेल्या आणि त्यामुळे हतबल झालेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे जे चित्र पु.लं.नी 'असा मी असामी' या पुस्तकात रंगवले आहे, त्याला तोड नाही. ते चित्रण विनोदी आहे तसेच कारुण्यपूर्णही आहे. विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळात सर्वसामान्यांच्या वाट्याला जी ससेहोलपट आली, तिचे अतिशयोक्तीपूर्ण तरीही वास्तव वर्णन वाचताना जुना काळ अनुभवलेल्या कोणत्याही वाचकाला त्यात अंतरीची खूण पटल्याशिवाय राहणार नाही. हसता-हसता त्याचे मन गलबलून आल्याविना राहाणार नाही.

नंतर देश स्वतंत्र झाला, पण त्याबरोबर सामान्य माणसासमोर काही वेगळ्या समस्या उभ्या राहिल्या. पूर्वीच्या अनेक सुंदर मूल्यांची पडझड होताना त्याने पाहिली. पैसा या गोष्टीला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आणि त्यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रांना बाजारूपणाची कळा आली. कला, साहित्य, राजकारण सारे पैशाच्या संदर्भात मोजले आणि विकले जाऊ लागले. सिद्धीपेक्षा प्रसिद्धीला अधिक मोल आले.

साहित्य, संगीत, नाट्य या पु.लं.च्या आवडत्या कलाक्षेत्रांतही अनेक प्रकारच्या भंपकपणाचा सुळसुळाट झाला होता. नवकाव्य, नवकथा, नवसंगीत, नवनाट्य यांच्या नावावर अनेकदा खोटे, कृत्रिम, तकलुपी असे बरेच काही निर्माण होत होते आणि भाबडे रसिक त्यावर लुब्ध झाले होते. या बदलांत जे अस्सल, कसदार, समर्थ होते, ते त्या-त्या कलाक्षेत्राला वेगळे, सुंदर परिमाण देऊन गेले. पु.लं.मधल्या मर्मज्ञ रसिकाला त्याची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. पण नवतेचा केवळ आव आणणा-या अनेक ढोंगासोंगांचा फुगा फोडण्याचे कार्यही त्यांच्या भेदक विडंबनांनी तितक्याच उत्कटतेने केले. 'सहानुभाव संप्रदाय', 'शांभवी : एक घेणे', 'आठवणी, साहित्यिक आणि प्रामाणिक', 'एक सौंदर्यवाचक विधान', 'प्रा. अश्व. विश्व. शब्दे' यांसारखे पु.लं.चे अनेक लेख वाचकांना या संदर्भात आठवल्याखेरीज राहणार नाहीत. साहित्याच्या क्षेत्रात माजलेल्या प्रयोगशीलतेच्या नावावर भलभलत्या गोष्टी रूढ करू पाहणा-या कृतक साहित्यसेवकांचा सारा पोकळपणा अशा प्रकारच्या लेखांमधून पु.लं.नी उघडकीला आणला. 'सुरंगा सासवडकर'सारख्या लेखातून त्यांनी सांगीतिक नवसमीक्षेची बेहद्द थट्टा केली आहे, तर 'असा मी असामी'तला नानू सरंजामे किंवा 'बटाट्याच्या चाळी'तला नवलेखक यांच्याद्वारा नवसाहित्यातील कृत्रिम प्रवृत्तींचे अतिशयोक्तीपूर्ण पण प्रभावी चित्र त्यांनी रंगवले आहे.

पु.लं.च्या या प्रकारच्या लेखनामुळे ते केवळ जुन्याचे अभिमानी, भूतकालीन स्मरणरंजनात रमणारे आहेत; असा ग्रह होतो; पण ते काही विशिष्ट अर्थानेच खरे आहे. गेल्या पन्नास वर्षांत साहित्यात, नाट्यात, संगीतादी कलांत जे नवीन सत्य, चैतन्य आणि सार्मथ्य निर्माण झाले, त्यांचे कौतुक पु.लं.नी अत्यंत स्वागतशील वृत्तीने केले आहे. नाट्यक्षेत्रातले नवे प्रयोग त्यांनी कुतूहलाने न्याहाळले. दलित आणि ग्रामीण यांसारख्या वाङ्मयातील नवप्रवाहांची ताकद त्यांनी ओळखली. मर्ढेकर, विंदा करंदीकर, आरती प्रभू, नारायण सुर्वे यांच्या कवितांनी मराठी काव्याचे साचलेपण कसे मुक्त केले आहे, त्यात नवे खळाळ कसे आणले आहेत हे पु.लं.च्या रसिकतेला नेमके उमगले. रंगभूमीवरील प्रयोगशील नाटककाराच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवूनच ते थांबले नाहीत, तर स्वत:ही 'राजा इडिपस', 'माय फेअर लेडी' किंवा 'थ्री पेनी ऑपेरा' अशा समर्थ नाट्यकृतींना त्यांनी मराठी रंगभूमीवर मराठी भाषा-पेहरावासह आवर्जून आणले!

पु.लं.चे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आवर्जून सांगायला हवे. आज साठी-सत्तरीच्या घरात असलेल्या आणि साहित्यक्षेत्रात प्रस्थापित झालेल्या अनेक थोर कलावंतांनी जुन्याकडे निक्षून पाठ फिरवली आहे की काय, अशी शंका येते. आजचे साहित्य कालच्या साहित्यातूनच विकास पावले आहे या गोष्टींचा त्यांना सोईस्करपणे विसर पडलेला दिसतो. काही साहित्यिक तर आधुनिकतेच्या हव्यासाने इतके पछाडलेले आहेत की; जुन्या कलावंतांचे, जुन्या कलाकृतींचे उल्लेखही ते कटाक्षाने टाळतात. असे केले नाही, तर आपण पारंपरिक ठरू अशी भीती त्यांना वाटत असावी असे दिसते. पु.लं.ना हे असे काही करण्याची कधीही आवश्यकता भासलेली नाही. कृतज्ञता हा पु.लं.च्या स्वभावाचा एक अत्यंत सुंदर असा विशेष आहे. नव्याचा पुरस्कार व स्वीकार करताना जुन्याचा नामनिदेर्शही करू नये इतका सावध धूर्तपणा त्यांनी कधी बाळगलेला नाही. यामुळेच मराठी साहित्यातील जुन्या आणि नव्या अशा सा-याच सुंदर आविष्कारांचे एक सलग व संपूर्ण चित्र त्यांचे लेखन वाचताना आपल्या प्रत्ययास येते.

श्री. ना. पेंडसे यांच्या नव्या कादंबरीची थोरवी जाणून घेताना हरिभाऊंचे अस्तित्व नाकारण्याची गरज त्यांना वाटत नाही. मर्ढेकरांच्या आणि आरती प्रभूंच्या कवितेतील निरूपम नावीन्य सहजपणे ओळखणारे पु.ल. रविकिरण मंडळातील यशवंत, गिरीश किंवा माधव ज्यूलियन यांच्या स्मरणात राहिलेल्या कवितापंक्ती तितक्याच प्रेमादराने दाखवतात.
पु. ल. देशपांडे हे असे अनेक वाचनांतून, स्मरणांतून, दर्शनांतून, इतकेच नव्हे; तर अगदी साध्या-साध्या लहानशा गोष्टींमधूनही मराठी मनाला सतत भावत राहिले, प्रिय होऊन बसले. अभिनय, विनोद, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, संगीत, नाट्य, वक्तृत्व अशा अनेक पैलूंमधून त्यांनी मराठी माणसाशी संवाद साधला. त्याबरोबर आपल्या असाधारण दातृत्वाने अनेकांच्या जीवनात त्यांनी सुख, सौंदर्य, प्रकाश आणला. मी जेव्हा पु.लं.चा विचार करते, तेव्हा एक फार जुनी आठवण मनात जागी होते. अनेक वर्षांपूर्वी एक इंग्रजी कादंबरी मी वाचली होती. तिचे नाव मला आठवत नाही. त्या कादंबरीत एका छोट्या मुलीचे चित्र रंगवलेले आहे. ही छोटी सकाळी अंथरुणात उठून बसते. खिडकीतून बाहेर दिसणारा सूर्यप्रकाश, उन्हात हसणारी बाग बघते. तिचे हृदय एकदम आनंदाने भरून येते आणि आपले दोन्ही हात पसरून ती आपल्या बाळबोलीतून एकदम आवेगाने उद्गारते, I love all the world!

पु.ल. हा मला त्या छोट्या मुलीचाच एक प्रौढ पण हृदयात सतत लोभस बालभाव बाळगणारा सुंदर आविष्कार वाटतो.

६ नोव्हेंबर २०११
महाराष्ट्र टाईम्स

Wednesday, November 9, 2011

‘पुलं’च्या प्रस्तावना - विवेक आचार्य

पुलंचे साहित्य म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण. त्यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे विविध प्रकार हाताळले. त्यात त्यांच्या प्रस्तावना म्हणजे एक आगळेवेगळे साहित्य दालनच. त्यावर एक झोत.

सुदैवाने मराठी साहित्यामध्ये प्रस्तावनेला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. अनेक मान्यवरांनी विविध विषयांवरील पुस्तकांना प्रस्तावना लिहून साहित्याचे हे वैशिष्ट्यपूर्ण दालन समृद्ध केले आहे. आचार्य अत्रे व पु. ल. देशपांडे ही दोन अष्टपैलू व्यक्तिमत्त्वे महाराष्ट्रात झाली. दोघांनी आपली स्वत:ची साहित्यनिर्मिती केलीच. शिवाय अत्यंत रसिकपणे दुसर्‍या लेखकांच्या वाङ्मयीन कलाकृतींचे कौतुक केले. मराठी भाषेतील अनेक पुस्तकांना या दोघा रसिकराजांच्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत. मराठी भाषेच्या अभ्यासकाला या प्रस्तावनांचे परिशीलन केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही.

पु. ल. स्वत: रसिक वाचक होते, मराठी भाषेतील अनेक साहित्यकृती पुलंच्या रसाळ प्रस्तावनेने सजलेल्या आहेत. पुल विनोदाने म्हणत की, पुढेमागे माझी ओळख लेखक म्हणून करून न देता सुप्रसिद्ध प्रस्तावना लेखक म्हणून केली जाईल इतक्या प्रस्तावना मी लिहिल्या आहेत.कुठल्याही साहित्यकृतीमध्ये प्रस्तावनाकाराचे नेमके कार्य काय हे समजावण्यासाठी पुल मोठे चपखल उदाहरण देतात. ते म्हणतात, लग्नमंडपातील मुलीचा मामा ज्याप्रमाणे मुलीला बोहल्यावर नेतो व नंतर तो दुरूनच तिचा संसार बघतो त्याचप्रमाणे प्रस्तावना लिहून झाल्यानंतर प्रस्तावना लेखक अलिप्तपणे पुस्तकाचे यशापयश अनुभवतो.

पुलंनी स्वत:च्या अपूर्वाई, गणगोत इ. पुस्तकांना छोटेखानी प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. अपूर्वाईला पुलंनी मोठी खुमासदार प्रस्तावना जोडलेली आहे. मुकुंदराव किर्लोस्करांच्या पत्राला मान देऊन त्यांनी किर्लोस्करमध्ये आपल्या युरोपवारीचे वर्णन केले व अपूर्वाई जन्मली. पुलंनी त्यांच्या त्या ‘अनामिक’ मित्राचे ऐकून प्रवासवर्णन लिहिले नसते तर प्रवासवर्णनाच्या एका नवीन बाजापासून मराठी साहित्य वंचित झाले असते. स्वत: पुलंनीही प्रवासवर्णन व आत्मचरित्र न लिहिण्याचा संकल्प केला होता. अपूर्वाईच्या निमित्ताने त्यांनी एक संकल्प मोडला; परंतु आत्मचरित्र न लिहिण्याचा संकल्प भाई मोडू शकले नाहीत. मराठी सारस्वत एका रसिकराजाच्या आत्मवृत्ताला मुकले हेच खरे.

‘गणगोत’ या गाजलेल्या पुस्तकात आपल्या सुहृदांची अत्यंत भावपूर्ण ललित चित्रे पुलंनी रेखाटली आहेत. ही चित्रे साकारताना आपली मन:स्थिती कशी होती, आपली भूमिका काय होती याचे मार्मिक विश्‍लेषण त्यांनी प्रस्तावनेत केले आहे. ‘‘या पुस्तकातून दिसणारी माणसे खरोखरीच तशी आहेत की नाहीत हे मला ठाऊक नाही. आपुलकीच्या डोळ्यांनी पाहताना त्यांचे जे दर्शन मला घडले त्याची ही चित्रे आहेत. न जाणो त्यांचा आणि माझा जो सहवास घडला त्या सहवासाचीच ही चित्रे असतील एखादवेळी.’’ पुस्तकातील व्यक्तिरेखांप्रमाणे पुलंचे हे प्रास्ताविकही हृदयंगम आहे.

शेक्सपिअरच्या साहित्याबद्दल ‘रंगविश्‍वातील रसयात्रा’ या प्रा. के. रं. शिरवाडकरांच्या पुस्तकाला पुलंची रसिली प्रस्तावना लाभलेली आहे. हिंदुस्थानवरील ब्रिटिश राजवटीमुळे झालेल्या फायद्यातोट्यांविषयी नेहमीच उलटसुलट चर्चा होत असते. पुल म्हणतात, ‘‘इंग्रजांना शंभर खून माफ करावेत अशी एकच गोष्ट त्यांनी आणली ती म्हणजे शेक्सपिअरची नाटके. इंग्रजी साम्राज्यावर न मावळणारा सूर्य शेवटी मावळलाच; परंतु शेक्सपिअरचे साहित्यसाम्राज्य अबाधित आहे. लेखक शेक्सपिअर, कलाकार शेक्सपिअरचे वर्णन करताना पुलंची लेखणी बहरली आहे.’’

‘विश्रब्ध शारदा’ हा मराठी पुस्तक प्रकाशनातला एक अभिनव प्रयोग होता. प्रसिद्ध व्यक्तींच्या अप्रकाशित पत्रांचा हा त्रिखंडात्मक संग्रह. शारदाच्या दुसर्‍या खंडात नाट्य आणि संगीत कलांशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी लिहिलेल्या पत्रांचा संग्रह आहे. अर्थातच या संग्रहाला पुलंची रसिली प्रस्तावना आहे. रंगभूमी आणि संगीत कलेच्या क्षेत्रातील चढउतार टिपत असतानाच पुलंनी या क्षेत्रांच्या आर्थिक स्थितीचाही मार्मिक ऊहापोह केलेला आहे.

पुलंनी असंख्य प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तावनांचा विचार आपण केला (अधिक प्रस्तावनांसाठी जिज्ञासूंनी ‘दाद’ हे पुस्तक वाचावे). पु. ल. देशपांडेंच्या या प्रस्तावनांतून त्यांचे कलासक्त मन सतत प्रतीत होत राहाते. ओघवती, प्रवाही भाषा, एखाद्या हृदयस्पर्शी वाक्यावर सम गाठण्याचे त्यांचे हुकमी कसब, नर्म विनोदाचा शिडकावा करत असतानाच एखादा मौलिक विचार सांगण्याची लकब, मानवी स्वभावाचे सूक्ष्म अवलोकन, त्यांची बहुश्रुतता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसर्‍या लेखकांचे, कलावंतांचे मनमोकळेपणाने कौतुक करणारी त्यांची सहृदयता या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या प्रस्तावनांत पडले आहे. पुलंच्या प्रस्तावना वैचारिक धनाने समृद्ध आहेत. पुलंच्या प्रस्तावना हे मराठी सारस्वताचे एक कोरीव लेणेच आहे!

विवेक आचार्य
सामना
१२ जून २०११

Monday, November 7, 2011

भाई....महाराष्ट्राचे!

१२ जून २०००....लंडनवरून पप्पांचा फोन होता.

"लाल्या, पुलं गेले?"

"हो", मी म्हणालो.

"अरेरे... अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही", पप्पा जड आवाजात म्हणाले.

"हो", मी.

"एक काम कर. आजचे सगळे मराठी पेपर घेऊन ठेव...मला भारतात आल्यावर सगळेच्या सगळे पाहिजेत."

पप्पांच्या सांगण्यानुसार मी बायकोला तिच्या ऑफिसात फोन केला. तिला येताना रेल्वे स्टेशनच्या स्टॉलवरुन सगळे मराठी पेपर विकत घ्यायला सांगीतले. मुळची गुजराती असणार्‍या माझ्या बायकोला पुलं जास्त ठाऊक नसल्यामुळे ती जास्त काही बोलली नाही. संध्याकाळी अंधेरी स्टेशनला ती बुकस्टॉलला गेली.

"सगळे मराठी पेपर द्या", तिने तिथल्या माणसाला सांगितले.

डोळ्यांत पाणी आणून तो म्हणाला, "ताई, आपले पुलं गेले हो!"

हा वरचा प्रसंग माझी कल्पनाशक्ती नसून अगदी जे घडलं तेच आहे. माझ्या बायकोने कधीच कुणा पेपर विक्रेत्याला अश्या प्रकारे एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या निधनावर व्यथीत झालेले बघीतले नव्हते. घरी आल्यावर तिने मला झाला प्रकार सांगितला. तिला प्रश्न पडला होता कि एखादी व्यक्ती रस्त्यावरच्या सामान्य माणसाला इतकं प्रभावीत कशी करु शकेल? अंधेरी स्टेशनच्या पेपरबॉय पासून ते थेट लंडन मधल्या तीच्या सासर्‍यांना त्याच भावनेत गुंतवणार्‍या या माणसाबद्दल - पु.ल.देशपांडेंबद्दल तिला उत्सुकता लागली होती. त्या रात्री मी तीला पुलंची ओळख करून दिली....त्यांच्या पुस्तकातून!

त्या रात्री पुलं आम्हाला पुन्हा भेटले... नाथा कामत बनून, नंदा प्रधान बनून, नारायण बनून, सखाराम गटणे बनून, चितळे मास्तर बनून...आणि विशेष म्हणजे, त्यांच्या निधनाने डोळे ओले होते, तरीही त्यांचे शब्द ओठांवर हसू आणत होते....

कधी कधी वाटतं, महाराष्ट्राला पु.लं यांनी बहाल केलेली सर्वात मोठी देणगी कोणती? साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट...सगळं काही त्यांना सिद्ध झालं होतं! पण खरं सांगू? पुलंनी आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे संस्कार! पुलंनी महाराष्ट्राला संस्कार दिले! एक प्रगल्भ विचारधारा दिली. शास्त्रीय संगीतात त्यांचा एवढा हातखंडा असून देखील, त्यांनी सामान्य माणसाला अवलोकन होईल अश्या प्रकारे संगीतावर प्रेम करायला शिकवलं.

"रविवारची सकाळ" बघताना, कामत मामा, कडवेकर आणि देसाई मास्तरांच्या मजेशीर शैलीत संगीताची एक अविस्मरणीय अशी मैफल दिली. अगदी सहजपणे! साठीच्या चाळीत श्रमजीवी मध्यमवर्गीय लोकांच्या गप्पा ऐकवत "उगीच का कांता"च्या एक-एक सुंदर जागा दाखवल्या! हसता हसता अचानक एखादी हरकत काळीज छेडून जाते....एखाद्या तानेवर "वा वा" म्हणता म्हणताच पोटात गुदगुल्या करत एखादा संवाद हास्य घेउन येतो!

"असा मी..." मधल्या जोश्यांच्या बेंबट्या बनून चाळीतून "ब्लॉक" मध्ये येणार्‍या सामान्य माणसाची कसरत बघून खरंच कुठेतरी आमच्या पिढीला आपलेच वडिल आठवतात हे खरं! मुंबईसारख्या शहरात १९६० च्या दशकात चाळीत राहणार्‍या प्रत्येक सामान्य मराठी माणसाची ती कथा होती. आजकालच्या मॉल संस्कृतीत वाढणार्‍या पिढीला बहुदा ही भावना कळणार नाही....पण तरीही पुलंचं साहित्य हे ह्याही पिढीला हसणं शिकवेल यात कसलीही शंका नाही.
पुलं आयुष्य भरभरून जगले...आणि त्यांनी सर्वांना भरभरून दिले...आपल्या संगीतातून, लिखाणातून, नाट्यातून.... अख्ख्या जगण्यातूनच! १२ जून २००० साली त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली...पण त्यांचं "जगणं" अजून चालूच आहे....पु.लं एक चैतन्य होते....आहेत!

मी आधी म्हणालो तसं....पु.लं नावाचं हे चैतन्य, हा जगण्याचा झरा.... हा अव्याहत चालूच राहणार... नाथा कामत मधून, नंदा प्रधान मधून, चितळे मास्तरांमधून, सखाराम गटणे मधून, नारायण मधून, नामू परीट मधून, पानवाल्यामधून....ही एक कधीही न संपणारी अशी वरात आहे....जमीनीवरची...महाराष्ट्राच्या!

पु.लं....आपले भाई... हे नेहमी आपल्यामध्येच राहणार....संस्कार बनून!

- माधव आजगांवकर
facebook.com/madhav.ajgaonkar

Tuesday, September 20, 2011

पुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे

पुलंच्या एका सत्कार समारंभानंतर अत्र्यांनी त्यांच्या ‘मराठा’ दैनीकात पु.लंवर हा लेख लिहिला होता

मराठीतील ख्यातनाम विनोदी लेखक, महान संगीतकार, उत्तम दिग्दर्शक, कुशल नट आणि आमचे परममित्र श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची ४७ व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी निवड झाली, म्हणून परवा विलेपार्ले येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मुंबईतील अनेक सत्कारसमारंभ आम्ही पाहिले आहेत आणि स्वत: आम्हालाही अनेक वेळा या सत्कारांना ’तोंड’ द्यावे लागले आहे, परंतु काल ’पु.ल.’ यांचा आम्ही जो सत्कार पाहिला तो अक्षरश: अविस्मरणीय होता. त्याची भव्यता, त्याची गोडी दीर्घकाळ मनात रेंगाळत राहणारी! जनतेचे पु.ल. यांच्यावर किती अमाप प्रेम आहे. नि मराठी माणसाला राजकारणाप्रमाणेच नाट्याविषयीही किती ’रस’ आहे त्याची ’पोचपावती’ काल पु.ल. यांच्या सत्काराला दहा हजारांच्यावर प्रचंड संख्येने गर्दी करुन जनतेने दिली आहे. हा सत्कार जर ’शिवतीर्था’वर झाला असता तर सारे ’शिवतीर्थ’ वाहून गेले असते! आम्ही स्वत: पु.ल. यांच्या विनोदावर, पु.लं.च्या नाट्यकृतीवर नि विशेषत: संगीतावर बेहद्द खूष आहोत! महाराष्ट्रात एवढा बहुगुणी आणि निर्मळ वृत्तीचा माणूस आज तरी आम्हाला दिसत नही! परवा हा जो पु.ल. यांचा भव्य सत्कार झाला त्या सोहळ्याला अध्यक्षस्थानी आम्ही स्वत: होतो. आम्ही अध्यक्ष होतो म्हणून पां. वा. गाडगिळांनी पाठविलेल्या संदेशात मोठ्या आपुललीने पु.ल. यांच्याबरोबर आमचाही गौरव केला. परंतु पु.ल. यांच्या सत्काराला आम्ही अध्यक्ष होतो ह्याचा पु.ल. पेक्षा आम्हालाच खरोखरी आनंद वाटला.
महाराष्ट्रात मराठी भाषेची, मराठी कलेची, मराठी नाट्याची ज्यांनी ज्यांनी मान उंचावली त्या प्रत्येकाचा मुक्तकंठाने गोरव करण्यात आम्ही धन्यता मानली आहे आणि पु,ल. चा आणि आमचा संबंध तर कितीतरी वर्षापूर्वीचा आहे. आमच्या एका किर्तनाला पु.लं. नी मागे टाळांची साथ देऊन तुकोबांचा एक अभंग रसाळपणे म्हटल्याचे आम्हांला आठवते. तेथपासून आम्ही पु.लं.च्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करीत आलो आहोत. ही व्यक्ती एवढी बहुरंगी आहे की, त्यांना काय येत नाही हाच मोठा प्रश्न आहे. त्यांच्या विनोदाचा वारसा त्यांना आजीकडून मिळाला असल्याचे ते सांगतात. ती गोष्टही मोठी गंमतशीर आहे. त्यांच्या आजीकडे त्यांचे मामा काही मंडळी घेऊन येत. ती बहुधा पेहेलवान असत. एकदा त्यांचे मामा आजीला म्हणाले की, ’आजी ही माणसे पेहेलवान आहेत बरं का.’ तेव्हा आजी म्हणाली, "असं का, बरं झालं, मघापासून कोळशाचं पोतं घरात आणायला मी माणूस पाहातच होते!" पु.ल.. यांचा आजचा विनोद , आजची व्याख्याने आणि सर्व लेखन वरवर पाहिले . तरीही त्यांच्या आजीच्या या धर्तीच्या उपजत विनोदावरच ते सारे पोसले आहे हे अगदी खरे आहे. ’तुझे आहे तुझपाशी’ हे नाटक तसेच खोगीरभरती. नस्ती उठाठेच, गोळाबेरीज हे कथासंग्रह. अपूर्वाई, पूर्वरंग ही प्रवासवर्णने आणि ’पुढारी पाहिजे’ या लोकनाट्यातील उपहासगर्भ विनोद यामागेही हीच वृत्ती आहे.

पु.ल. यांचा विनोद अत्यंत निर्मळ आहे. आयुष्यात त्यांनी वावगे काही लिहिले नाही. विनोदी लेखकांविषयी समाजात पुष्कळ गैरसमज असतात. विनोद ही अत्यंत अवघड गोष्ट आहे हे आम्ही अनुभवावरुन सांगतो. विनोद करणारा माणूस समाजातील ज्या व्यंगावर विनोद करतो त्याचा त्याने सूक्ष्मपणे अभ्यास केलेला असावा लागतो. जीवनातील विसंगती हुडकताना त्याला सुसंगतीचा साक्षात्कार झालेला असतो. सर्कशीतील विदूषक वरुन जरी बावळट दिसला , तरी सर्व ’क्रिडापटूंची’ कला त्याला अवगत अस्ते, ह्याची कितीकांना कल्पना असते? विनोदकरांचे असेच आहे. पु.लं.चा विनोद हा विनोदाचा एक स्वतंत्र प्रकार आहे आणि नाट्यातील त्यांचा विनोद तर खरोखरीच अतिशय आल्हादकारक आहे. ’तुझे आहे तुजपाशी’ मधे ’सुत’ कातणार्‍या श्यामला काकाजी म्हणतो, ’ज्या वयात सुत जमवायचे त्या वयात सुत काय काततोस?’ हा विबोद किती श्रेष्ठ दर्जाचा आहे! या विनोदात केवळ शाब्दिक कोटी नाही. जीवनातले एक तत्वज्ञान त्यात सामवलेले आहे. नाट्य आणि राजकारण ह्यांचे बाळकडू मराठी माणसाला मिळाले आहे. म्हणून मराठी माणसाच्या जीवनात संघर्ष व नाट्य आहे. हे नाट्य आणि जीवनातील संघर्ष पु.लं.नी बरोबर ओळखला आहे. म्हणूनच पु.ल. यशस्वी नाटककार झाले आहेत.

एक गोष्ट सांगतो, पु.लं.च्या नाटकातील तंत्राविषयी आनचा थोडा मतभेद आहे. पु.लं.च्या नाटकात काही वेळा हास्य व अश्रू यांची गल्लत होण्याचा संभव वाटतो. पु.ल. यांचा प्रयत्न नि:संशय मोठा आहे. एकाच वेळी हसू ओठावरून रुंदावत असताना क्षणात डोळ्यांतुन पाणी काढणे हे असामान्य सामर्थ्य आहे नी:संशय. पु.ल. तसाच प्रयत्न करीत आहेत. अर्थात अवघड प्रयत्न आहे हा. आणखी एक गोष्ट सांगतो. पु.लं.च्या विनोदामध्ये पुषकळ वेळा ते पटकन आत्मलक्षी बनतात. ह्याचे कारण त्यांची मूळची वृत्ती भावुक असेल हे खरे, परंतु यामुळे विषयाचा रसभंग होण्याची शक्यता असते. पण हे आमचे किरकोळ मतभेद आहेत. पु.ल. यांच्या गौरवाला, श्रेष्ठपणाला आणि समर्थ लेखणीला त्यामुळे जराही उणेपणा येत नाही. कारण पु.ल. चे लेखन मग ते नाट्य असो, कथा असो की प्रवासवर्णने असोत-- इतकं सिद्धहस्त आहे की, एक दोन मतभेदांतून त्याला कधीही कमीपणा येणार नाही.

पु.ल. यांच्या नाट्याचे आणि साहित्याचे समीक्षण करण्याची ही जागा नाही नि वेळही नाही. पु.लं.चे फक्त कौतुक करायची वेळ आहे. ते सिद्धहस्त आहेत. नाट्य-कलेबाबत बोलावयाचं तर फक्त आम्ही एवढंच म्हणू की, ’तुझे आहे तुजपाशी’ हे एकच नाटक पु.लं.नी जरी लिहिले असते तरी आम्ही त्यांना ’नाटककार’ गौरवैले असते. ह्या एकाच नाटकाने ते अमर झाले आहेत. आमच्या परवांच्या भाषणात पु.लं.च्या गौरवासंबंधी बोलताना आम्ही एक मुद्दा मांडला. आजपर्यंत अनेक वेळा आम्ही तो मुद्दा आहे. स्वत: आम्ही, पु.ल., विजय तेंडुलकर, बाल कोल्हटकर, वसंत कानेटकर इत्यादी नाटककार मराठी रंगभूमीवर तेजस्वी कामगिरी बजावत असताना नटश्रेष्ठ केशवराव दारे ’मराठी रंगभुमी १९३० नंतर संपली’ असे म्हणतात. याचे आम्हाला परमदु:ख होते. केशवरांनी या नाटकरांना, नविन नटांना आणि नटींना उत्तेजन द्यावयास हवे, आशीर्वाद द्यावयास हवा! आजची प्रगतीशील मराठी रंगभूमी नटवर्य दाते यांजकडून आशीर्वादाची अपेक्षा करीत आहे. प्रोत्साहनाच्या दोन शब्दांची अपेक्षा करीत आहे! आणि एवढेही सांगून केशवरांवाना मराठी रंगभूमीचे आजचे तेजस्वी रुप दिसले नाही तरी तिच्या यशाची पावती लक्षावधी जनतेकडून आज मिळत आहे. हे अमाप यश रंगभूमी मेल्याचे लक्षण आहे काय? परवा भाषणात पु.ल. देशपांडे म्हणाले की. नाट्याच्या प्रेमाने प्रेरीत होऊन मुंबईहुन ऑफीस सुटताच डेक्कन क्विनने पुण्याला जाऊन तीन वाजेपर्यंत तालमी उरकुन नि पहाटेच्या पॅसेंजरने परत मुंबईत कामावर येऊन मी हजर होतो. रंगभुमीचे उज्वल दिवस टिकवण्यासाठी धडपडणारी नवी नवी मंडळी काय ’मराठी रंगभूमी संपली’ म्हणून ही आटापिट करताहेत? पु.ल. यांच्या सत्काराच्या निमित्ताने आज पुन्हा ओघाने हे लिहिले .

मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ पु.ल. यांच्या गळ्यात आज पडली आहे, ते काही फारसे गौरवाचे नाही. यापूर्वीच त्यांना तो मान मिळण्यास हवा होता. आणखी एकदोन वर्षात ते साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होतील आणि मराठी भाषेतील हा विद्वान पंडीत मराठीचा झेंडा आपल्या असामान्य , कोटीबाज विनोदाने नि खुसखुशीत शैलीने फडकत ठेवील यात काय शंका? आम्ही स्वत: गडकरी, कोल्हटकर, ठोमरे यांच्या पिढीत वाढलो आहोत आणि परवा आम्ही म्हटल्याप्रमाणे त्या प्रतिभासंपन्न आणि थोर लोकांच्या परंपरेतील एक प्रतिनीधी म्हणून आम्ही पु.ल. यांच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवीत आहोत! यापेक्षा आज ह्या क्षणी आम्ही अधिक लिहू शकत नाही. पु.लं.च्या असामान्य कर्तुत्वाने भारवलेल्या अवस्थेतच आम्ही पु.लं.च्या नव्या निवडीबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करुन सांगतो. पुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो!

आचार्य अत्रे
मराठा
११-१-१९६५

मुळ स्त्रोत -- http://anandghare.wordpress.com

Wednesday, July 20, 2011

‘कैवल्या’चा आनंद घेणारा!

श्री राम पुजारी यांच्या सत्तरीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ‘पुलं’नी आपल्या या स्नेह्य़ाचं रसिलं व्यक्तिमत्त्व शब्दांमधून उभं केलं होतं.‘पुलं’चं ते भाषण.
मित्रहो,
रामनं आपलं अंत:करण मोकळं करून भाषण केल्यानंतर, मी बोलणं मला चुकीचं वाटायला लागलेलं आहे. एखाद्या चांगल्या गाण्याचा परिणाम आपल्या मनावर व्हावा, तसा त्याच्या भाषणाचा परिणाम झालाय, गाणं संपल्यावर बोलणारे लोक किती कद्रू असतात ते माहीत असल्यामुळे, तो अपराध आपण करू नये असं मला वाटतं. पण आजचा प्रसंगच असा आहे की दोन शब्द आपल्या वतीनं मी बोललो नाही तर मलाच रुखरुख वाटत राहील. मी बोलू नये, अशी निसर्गानं व्यवस्था केलेली आहे पण दरवेळी निसर्गाचं मानलंच पाहिजे असं नाही.

रामचा उल्लेख करताना पुष्कळ लोक म्हणाले की, हा सगळ्यांना अरे-तुरे करतो. रामच्या डोळ्यांनी जो मनुष्य पाहू शकतो त्यालाच तो अरे-तुरेचा अधिकार असतो. आपण ‘विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो’ असं म्हणतो, ‘विठ्ठलरावांना भेटून आलो’ असं नाही म्हणत. विठ्ठल, राम, कृष्ण यांच्याबद्दल आपण एकेरीच बोलतो मग त्यांच्यापेक्षा आम्हीच असे काय मोठे लागून गेलो की आमच्याबद्दल अहो-जाहो करून बोलावं- आपलेपणा आणि परकेपणा साध्या शब्दात व्यक्त होतो. बघा- आईला आपण ‘अगं’ म्हणतो, बापाला ‘अहो’ म्हणतो, कारण दूर असतो तो आईपेक्षा. तर अहो-जाहो हे दूरचं लक्षण आहे. शिष्टाचार वगैरे दूरच्या ठिकाणी. आता रामनं बोलताना सांगितलं की, त्याच्या घरी मी गेलो की गप्पा मारताना मी ऐसपैस पाय पसरून आरामात बसतो. आता ही आपुलकी मुद्दाम ठरवून दाखवण्यासाठी केली जात नाही. ती निर्माण झालीय याची जाणीव व्हावी लागते. आयुष्यात ही जाणीव व्हायची स्थळं कमी असतात, ही त्यातली दु:खद गोष्ट आहे.

रामनं गाणं खूप ऐकलं. कसं ऐकलं? तर ते सुरांचं प्रेम घेऊन ऐकलं. गाण्याला तो मोजपट्टी घेऊन गेला नाही. तो गाण्याचा सुपरवायझर झाला नाही. ऐकणारा झाला. ‘ऑडिट’ हा शब्द, ऐकणं आणि हिशेब तपासणं, या दोन्ही अर्थानी वापरला जातो. इथं हा दुसरा ऑडिटर झाला नाही तर ऐकणारा ऑडिटर झाला. त्यानं गाण्यावर प्रेम केलं, तितकंच त्या गाण्यामुळेच गवयावर प्रेम केलं आणि ‘हे प्रेम मी करतोय’ असा भावही कधी खाल्ला नाही, त्याची त्याला आवश्यकता वाटली नाही, कारण त्याच्या हिशेबी क्रिकेटियर आहेत, चित्रकार आहेत, कवी आहेत, गायक आहेत, इतर कलावंत आहेत, नट आहेत. हे सगळे आहेत ते त्याला आपले वाटतात - ते त्याला आपले वाटतात हे त्यांना प्रत्येकाला माहीत असल्यामुळे त्यांना तो आपला वाटतो. उद्या जर राम मला म्हणाला, ‘आपण आलात, बरं वाटलं.’ त्यावर मी त्याला विचारेन, ‘ मी असा काय गुन्हा केला म्हणून तू असं बोलतोहेस?’ एक तर मराठीची सवयच प्रेमातून अरे-तुरेवर येणारी आहे. आपल्या भाषेला तसा फारसा शिष्टाचार मान्य नाही. फार शांतपणे कोणी मराठी बोलायला लागलं की तो ढोंगी आहे असं वाटायला लागतं. ही मंत्री मंडळी बोलतात बघा, ‘आपण आलात, बरं वाटलं. सहज आला होता काय?’ वगैरे.

राम मैफिलीत असताना गायक जितक्या तन्मयतेनं, आनंदानं गातो तितक्या तन्मयतेनं आणि आनंदानं दुसऱ्या कोणाही पुढे - समीक्षकांची क्षमा मागून सांगतो - ते असूनही गायक रंगतोच असं नाही, कारण तिथं हिशेब तपासनीस बसलेले असतात. माझे एक गवई मित्र होते. म्हणजे ते गात होते म्हणून त्यांना गवई म्हणायचं. ते बैठकीत काय करावं याच्या नोटस् काढून देत असत. ‘तान नंबर एक’, ‘तान नंबर दोन’ एवढंच नव्हे तर ‘या तानेस वाहवा मिळाल्यास ती पुन्हा घ्यावी’- हे मी कपोलकल्पित सांगत नाही - विनोदी लेखकालाही जिरवणारे पुष्कळ असतात, त्यापैकी हे! तर असं काही न करता, आपण गेल्यानंतर आनंद देणारा हा खरा आनंदयात्रीच आहे. त्याला तो आनंद ठिकठिकाणी मिळालेला आहे. तो आनंद मिळत असताना त्याच्या मनात एक विचार सतत आहे की, कोणाच्या तरी कृपेनं हा आनंद आपल्याला मिळालेला आहे. ‘कृपेनं मिळालेलं आहे’ ही भावना आहे ना तिचं विच्छेदन करता येत नाही. शवच्छेदन करता येत नाही. ती एक असते. जसं आता कोणीतरी सांगितलं, फार योग्य सांगितलं. मला वाटतं रेग्यांनी सांगितलं. रेग्यांनी गंभीरपणानं सांगितलं. रेग्यांचा गंभीरपणा सगळ्यात मिश्कील असतो - त्यांनी सांगितलं, ‘संगीतामुळे त्याच्या वागण्याला परतत्त्वस्पर्श झाला. फार सुंदर उल्लेख केला. संगीताचा परतत्त्वस्पर्श ज्यांना झाला तो या साध्यासुध्या गोष्टींच्या बाहेर जातो. तुम्हाला सांगतो, भारतीय संगीत ही अशी गोष्ट आहे की जिथे ‘कैवल्य’ म्हणजे काय याचा साक्षात्कार होत असतो. त्याला रूप नाही, रंग नाही. निराकार, निर्गुण हे जसं देवाचं वर्णन. तसं भारतीय संगीताचं वर्णन करता येईल. पुढे शब्द आले की घोटाळे सुरू होतात, ते निराळे. पण ज्यावेळी आलापी चालू असते. स्वरांचं आळवणं चालू असतं. त्यावेळी तो ‘कैवल्य’ स्वरूपाचाच आनंद असतो. तसला आनंद रामला साहित्यानं दिला, खेळानं दिला.

अरुण टिकेकरांसारख्याला त्यानं क्रिकेटियर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याची महत्त्वाकांक्षा केवढी असेल बघा! मी शाळेत क्रिकेट खेळायला गेलो. पहिल्याच दिवशी मला क्रिकेटच्या शिक्षकांनी सांगितलं, ‘तू फुटबॉल खेळ’- म्हणजे ‘क्रिकेट खेळू नकोस’ हे त्यांनी निराळ्या रीतीनं सांगितलं, कारण आमच्या शाळेत फुटबॉल नव्हता. माझ्याकडे कोण होतकरू कवी येतात, त्यांच्या कविता वाचल्यावर अंगावर काटा येतो. मी त्यांना सांगतो, ‘तुम्ही नाटक ट्राय करा’, म्हणजे एक वर्ष तरी त्याचं त्यामध्ये जातं. कुणीतरी भाषणात आत्ता म्हटलं की, ‘मी सुदाम्याच्या पोहय़ांची पुरचुंडी घेऊन आलोय्’ माझ्याकडे होतकरू कवी वहय़ांची पुरचुंडी घेऊन आलेले असतात. तर अशा ठिकाणी रामसारखा एखादा मित्र असावा. रामची बैठक याचा अर्थ साहित्य, संगीत, कला यांची बैठक. याच्याशिवाय आम्ही कधी काही बोललोच नाही. याचं एक कारण आहे. असं मला वाटतं. माझ्या आणि त्याच्या स्वभावात एक साम्य आहे - आम्ही कधी शर्यतीत नव्हतो. आयुष्यभर कधी पहिलं यावं म्हणून धावलोच नाही- पहिला आलो नाही ही गोष्ट निराळी.

मला बालकवींची कविता आठवते. ‘स्वार्थाच्या बाजारात, कितीक पामरे रडतात। त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो।’ मला हे मिळायला पाहिजे म्हणून त्याच्या मागे लागलो तर ते कधी मिळतच नाही. आमचे खाँसाहेब लोक फार चांगलं बोलायचे. आपण त्यांना जर सांगितलं ‘खाँसाहेब कालचा बागेश्री काय छान झाला’ की ते म्हणायचे, ‘हो गया’. मी केलं नाही, ते झालं. ही भूमिका केवळ गाण्याबद्दल नव्हे तर आयुष्याबद्दल यावी. ही भूमिका कशी येते ती आत्ता राम बोलला त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल. ‘मला माहीत नव्हतं. - मी झालो. असं असं माझ्या जीवनात आलं.’ त्याचं पृथक्करण करण्याचा त्यानं प्रयत्न केला. जे काही आहे ते त्याच्या मनामध्ये आहे, ते सांगण्याचा रामने प्रयत्न केला आणि त्यामध्ये आपल्याकडे कर्तृत्व एका कणाचंही घेतलं नाही. एवढंसंसुद्धा कर्तृत्व न घेता, हे मला मिळालं या आनंदात तो बोलला. असा आनंद त्यानं स्वत: घेतला. तुमच्याकडून घेतला, तुम्हाला परत देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तो आनंदानं स्वीकारला, याचं लक्षण - ही सभा. ही सभा जी इथं भरलेली आहे, त्यावरून दिसून येतं. सर्व थरांतले, सर्व पक्षांचे लोक इथं आहेत. सध्या माणसांबद्दल बोलताना पक्षाचा आणि पक्षाबाहेरचा असं दोन्ही बोलावं लागतं. म्हणजे एके ठिकाणी माणूस दिसतो. दुसऱ्या ठिकाणी तो दिसत नाही - कुठला हे मी सांगत नाही - तर अशी सर्व थरांतली माणसं आली आहेत. त्याच्या बरोबरीचे शाळकरी मित्र जे आलेले आहेत, ते आपापल्या क्षेत्रात कितीतरी उच्च स्थानावर गेले आहेत. ते उच्च स्थान विसरून शाळेमध्ये त्या वयाचे असताना जसे बागडले तसेच ते आत्ता आलेले आहेत. मला खात्री आहे की ते शाळेतला आपला ताजेपणा घेऊन आपल्या गावी परत जातील.

असा ताजेपणा त्याच्या भेटीत ज्यानं आयुष्यभर मला दिला असा हा राम आहे. मी इथं आलो म्हणजे रामवर मोठे उपकार केले आहेत असं नाही. मला भीती वाटत होती की, कुठं गेल्यावरती आजारी पडू नये. पण आता तीही भीती मला वाटत नाही, कारण याच्यामागे जी रामची पुण्याई ती आमच्याही कामी येते. कधी कधी असं मला वाटायला लागलंय, साहित्य, संगीत, चित्र, नृत्य, गायन याच्यावर निस्सीम प्रेम करणारा मनुष्य असतो ना त्याच्या वाटेला जायला देवालासुद्धा जरा भीती वाटत असली पाहिजे. यांची मैत्री चालू दे, असं त्यालाही वाटत असेल. अशी याची मैत्री चालू दे, असं वर्षांनुर्वष देवाला वाटत राहो आणि ती आम्हाला पाहायला मिळो, अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपण आता रामला ‘हॅपी बर्थ डे टू यू’ म्हणू या!

रविवार, १७ जुलै २०११
लोकसत्ता

Tuesday, July 5, 2011

मम सुखाची ठेव! - सुरेश ठाकूर

महाराष्ट्राचे हे लाडके व्यक्तिमत्त्व ३५ वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आचरे गावात आपल्या ‘मैत्र जिवाचे’ अशा ७० कलावंतांना घेऊन माहेरपणाला गेले होते. त्यात होते- दस्तुरखुद्द पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कुमार गंधर्व, वसुंधरा कोमकली, मालिनी राजूरकर, गोविंदराव पटवर्धन, नारायण पंडित, अशोक रानडे, एम. आर. आचरेकर, चिंचाळकर गुरुजी आदी मंडळी. पुलंचे ते माहेरपण म्हणजे आगळेवेगळे गंधर्व संमेलनच होते.
त्याची ही आठवण!

त्या १९७६ सालच्या आचरे गावच्या रामनवमीच्या दिवसाचे सारे वातावरणच ‘पुलमय’ होऊन गेले होते. पुलं आणि त्यांच्या परिवाराचा आचरे येथील सुखद सहवास आम्हा आचरेवासीयांच्या दृष्टीने ‘मर्मबंधातील ठेव’ ठरली होती, की जी आम्ही अजूनपर्यंत जपून ठेवली आहे. आज ३५ वर्षे झाली तरी त्या आठवणी मोगऱ्याच्या कळ्यांप्रमाणे टवटवीत आहेत.
त्याचे असे झाले, एके दिवशी आचरे गावचे सुपुत्र, पु.ल. देशपांडे यांचे स्नेही आणि सुप्रसिद्ध तबलापटू वसंतराव आचरेकर यांचे रामेश्वर देवस्थानचे तत्कालीन ट्रस्टी बाळासाहेब गुरव यांना एक पत्र आले. ‘या वर्षी रामेश्वर मंदिराचा त्रिशतसांवत्सारिक महोत्सव येत आहे. त्यानिमित्त पु.ल. देशपांडे, सुनीता वहिनी, कुमार गंधर्व आणि त्यांचा ७० जणांचा गोतावळा आचरे येथे मागारपणाला येत आहे. आपण रामनवमी उत्सवात गायन, वादनकला, साहित्य यांचे छोटेखानी संमेलनच भरवू.’

त्या पत्रातील प्रत्येक अक्षराने बाळासाहेब गुरवांसोबत अख्खे आचरे गाव आनंदून गेले. माझ्या वडीलबंधूंनी- दादा ठाकूर यांनी- ही बातमी घरी सांगितल्यावर आम्हीही मंतरून गेलो. चिपळूणहून निघणारे एक ‘सागर’ नियतकालिक सोडले तर अन्य गावागावांत पोहोचणारे त्या वेळी स्थानिक वृत्तपत्र नव्हते, पण पु.ल. देशपांडे आचरे गावी येणार आणि चक्क आठ दिवस मुक्कामाला राहणार, ही सुवार्ता ‘रानारानात गेली बाई शीळ’ करीत गावागावांत, घराघरांत पोहोचली. पुलं सुनीताबाईंसोबत धामापूर मुक्कामी येऊन जायचेच, पण आचरे गावी आठ दिवस पुलं परिवाराचा मुक्काम हा सर्वासाठीच ‘महाप्रसाद’ होता.

आणि.. ज्या सोनियाच्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो, तो दिवस उजाडला. रामनवमी उत्सव चालू असतानाच कोल्हापूरमार्गे व्हाया कणकवली, रामगड, श्रावण करीत धुळीचे रस्ते अक्षरश: तुडवत तुडवत तीनचार जीपगाडय़ा, दोन मॅटेडोर आदी वाहनांनी पु.ल. देशपांडे आणि त्यांचा गोतावळा आचरे येथे डेरेदाखल झाला. एक एक नक्षत्र पायउतार होत होते. आपल्या गावी त्या काळी नसलेल्या कोणत्याही भौतिक सुविधांनी ओशाळून न जाता स्वत: वसंतराव आचरेकर खांद्यावरील हातरुमाल सावरत सर्वाना उतरून घेत होते- ‘‘येवा, आचरा आपला आसा.’’
त्यात होते पु.ल. देशपांडे, सुनीता देशपांडे, कुमार गंधर्व, वसुंधरा कोमकली, मालिनी राजूरकर, गोविंदराव पटवर्धन, नारायण पंडित, अतुल व्यास, रत्नाकर व्यास, मुंबई विद्यापीठाचे त्या वेळचे संगीत विभागाचे प्रमुख अशोक रानडे, थोर साहित्यिक अरविंद मंगळूकर, शरच्चंद्र चिरमुले, बंडुभैय्या चौगुले, राम पुजारी, इंदूरचे नटवर्य बाबा डिके, इंदोरचे पत्रकार राहुल देव, बारपुते, थोर चित्रकार एम.आर. आचरेकर, चिंचाळकर गुरुजी, भार्गवराम पांगे आदी ६०-७० मंडळी आचरे गावी अवतीर्ण होत होती आणि आचरे गावचे नभांगण ताऱ्यांनी भरभरून जात होते.

पाडव्यापासून सुरू होणारे रामनवमी उत्सवाचे दिवस.. दुपारची वेळ.. रामेश्वर सभामंडपात महिरपी कनातीही गाऊ लागल्या होत्या. वाळ्याचे पडदे वातावरण सुगंधित करीत होते. सभामंडपातील हंडी झुंबरात दुपारचे सूर्यकिरण लोलकासारखे भासत होते. दरबारात रामेश्वर संस्थानचे त्या वेळचे वयोवृद्ध ख्याल गायक साळुंकेबुवांचा ‘पुरिया धनश्री’ ऐन बहरात आला होता. त्याच धूपदीप वातावरणात ‘पुरिया धनश्री’च्या पाश्र्वसंगीतावर आचरे गावचे ज्येष्ठ नागरिक अण्णा फोंडकेकाका, पु.ल. देशपांडेंच्या हाती मानाचा नारळ देऊन त्यांचे हात आपल्या हाती घेऊन पुलंना रामेश्वराच्या सभामंडपात आणत होते. पुलंच्या मागून महाराष्ट्राचा साहित्य, संगीत, चित्र-शिल्पकलेचा अक्षरश: ‘शाही सरंजाम’ पायी चालत येत होता. त्या माजघरातील शाही स्वागताने ‘भाईंचे’ डोळे पाणावून गेल्याचे आम्ही अगदी जवळून पाहिले.
त्या वेळी रामेश्वर मंदिराच्या परिसरात कोणत्याही अत्याधुनिक सोडाच, पण अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध नव्हत्या. ‘पु.ल. देशपांडे आपल्या घरी राहतील का?’ ‘सुनीताबाई अ‍ॅडजेस्ट करून घेतील का?’ या विचारांनी देवस्थानचे विश्वस्थ बाळासाहेब तथा अण्णा गुरव थोडे धास्तावलेच होते. त्या मंडळींसाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणजे त्यांचा शेजारचा अक्षरश: मांगर. तो त्यांनी माडाच्या झापांनी शाकारून सजवला होता. जमीन शेणाने सारवून रांगोळ्या काढल्या होत्या. गाद्या, उशा, खुच्र्या वसंतराव आचरेकरांनी कोल्हापूरहून आणल्या होत्या. आठ दिवसांसाठी सर्व तऱ्हेच्या भाज्या आणि सोबत यल्लप्पा आचारीदेखील कोल्हापूरहून आणला होता. पुलंच्या मागारपणाची जशी जमेल तशी तयारी केली होती.
वास्तूला शोभा त्याच्या स्थापत्यरचनेपेक्षा त्यात कोणाचे वास्तव्य, यावरच खरी अवलंबून! पुलं, सुनीताबाई, कुमार गंधर्व, एम.आर. आचरेकर आदी रत्नजडित ६०-७० जवाहीर त्या मांगरवजा कुटीत राहायला आले आणि त्या पर्णकुटीचा क्षणार्धात कसा ‘राजमहाल’ झाला, तो आम्ही याची डोळा पाहिला. अख्खे गुरव कुटुंबच त्यांच्या तैनातीला होते. सुनीताबाई, वसुंधरा कोमकली गुरवाच्या घरच्या सुनाच झाल्या होत्या. पुलंची दंगामस्ती बघायला आम्ही आमचाही तळ आमच्या घराकडून गुरवांच्या घरी हलवला होता. एकदा काही पत्रकारांनी सुनीताबाईंना गुरवांच्या घरी तांदूळ निवडताना पाहून प्रश्न केला, ‘‘तुम्ही तांदूळ निवडता?’’ त्या वेळी सुनीताबाई म्हणाल्या, ‘‘हो आम्ही जेवतोसुद्धा!’’ आणि कुमारांपासून गोविंदराव पटवर्धनांपर्यंत सर्व हास्यकल्लोळात बुडाले!

त्या पर्णकुटीत पुलं आपल्या विविध प्रवासवर्णनातील किस्से सांगत. तो तर वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. अगदी लहान मूल आजोळी जसे दंगामस्ती करते तसे पुलं आपले वय विसरून वागायचे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘‘अरे वसंता, काल मी पु.ल. देशपांडे होतो रे! आज मी पुलं आचरेकर झालो.’’ दुपारी, संध्याकाळी रामेश्वर मंडपात कुमारांच्या मैफिली रंगायच्या! प्रारंभी मालिनी राजूरकर, वसुंधरा कोमकली, नारायण पंडित यांचे गायन व्हायचे. नंतर सतारवादन, संतूरवादन, त्यानंतर कुमारजी अवतीर्ण व्हायचे!

भार्गवराम तथा दादा पांगे ध्वनी संयोजनाची जबाबदारी घ्यायचे. तबल्यावर वसंतराव आचरेकर, हार्मोनिअमवर गोविंदराव पटवर्धन, तानपुऱ्यावर वसुंधरा कोमकली आणि निवेदनाची जबाबदारी स्वत: पुलं देशपांडे यांनी घेतलेली आणि रंगत म्हणजे त्या कार्यक्रमाची जिवंत चित्रे पांढऱ्या शुभ्र ड्रॉईंग पेपरवर स्वत: एम.आर. आचरेकर चितारीत असत. कुमारांची ‘तान’ ते लीलया पेन्सिलने त्या ड्राईंग पेपरवर सहज उतरवत. सुरुवातीला त्या रेषा अगदी शेवयासारख्या वाटत, पण क्षणार्धात ‘गायनाच्या बैठकीचा आकार’ घेत. ही जादू एम.आर. आचरेकर या प्रचंड व्यक्तिमत्त्वाच्या महान कलाकाराच्या अगदी जवळ बसून बघण्याचे भाग्य आम्हाला लाभले.

कुमारांच्या ख्याल गायनानंतर पुलंचे निवेदन होई. त्यानंतर कुमारजींची निर्गुण भजने सुरू व्हायची. इंदूर, देवासच्या कलाकारांसोबत आचरेवासीय कलावंतांनाही ती भजने डोलवत ठेवायची! एके दिवशी तर बहारच आली. दुपारी मालिनी राजूरकरांपासून कुमार गंधर्वापर्यंत सर्वानी वसंत, भीमपलासी, तोडी, गुजुरीतोडी, मुलतानीतोडी आदी रागदारी गायकीने चैत्रातील त्या दुपारला मोगऱ्याचा गंध दिला. खऱ्या अर्थाने वसंतोत्सव रंगला!
..आणि त्याच सायंकाळी पुलंचा एक आगळा पैलू आम्ही पाहिला! हार्मोनिअमची स्वर्गीय जुगलबंदी! अगदी आमच्या माजघरात बसून ऐकतो आहे, अशी! स्वर्गीय जुगलबंदीसाठी पुलंसोबत तेवढय़ाच तोलामोलाचे संवादिनीचे बादशहा होते गोविंदराव पटवर्धन! तबल्यावर वसंतराव आचरेकर आणि जुगलबंदीसाठी उभयतांनी नाटय़संगीत निवडले होत- ‘सकुल तारक सुता’. जुगलबंदी जवळजवळ पाऊण तास चालली होती. उभयतांची बोटे सुरांवरून लीलया फिरत होती आणि स्वरांचे ‘महाल’ सभामंडपात आकारात होते. त्याकाळी आम्हा कोणाजवळच ‘टेपरेकॉर्डर’सारखे साधे उपकरणही उपलब्ध नव्हते. तो स्वर्गीय ठेवा अजूनपर्यंत फक्त आम्ही कानात आणि मनात जपून ठेवला आहे.. अगदी अत्तराच्या फायासारखा! चिरंतन! आणि चिरंजीव!

आचरे गावचे सुपुत्र गंगाधर आचरेकर यांच्या ‘भारतीय संगीत’ या संगीतावर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, त्यावेळी अध्यक्षपदावरून झालेले पुलंचे अभ्यासपूर्ण भाषण, आचरी यल्लप्पाचा झालेला सत्कार! यल्लप्पाचा गौरव करताना गहिवरून आलेला पुलंचा कंठ आणि भरून आलेले यल्लप्पाचे डोळे आमच्या नजरेसमोर अजूनही आहेत. त्या कार्यक्रमाची गंमत काही औरच होती. चर्चा, परिसंवाद, मैफल, पुस्तक प्रकाशन सोहळा, ग्रंथपाल काका दळवी यांचा पुलं देशपांडे यांनी केलेला गौरव, गुरवांच्या मांगरात चालणारी पुलं व परिवाराची दंगा-मस्ती हे सारे आम्हाला अगदी जवळून पाहता आले. पुलंचे ते मागारपण म्हणजे आमच्या दृष्टीने आगळेवेगळे गंधर्व संमेलनच होते.

असा हा आगळावेगळा, आमच्या गावात येऊन आचरेकर झालेला ‘गंधर्व’ १२ जून २००० रोजी सर्वाना सोडून गेला. त्यानंतर या अशा वलयांकित व्यक्तींना अगदी जवळून पाहिल्याचे, अनुभवल्याचे आम्ही सर्वाना सांगत राहिलो. त्या प्रसंगाची दुर्मीळ छायाचित्रे दाखवून आमची ही श्रीमंती इतरांना वाटत राहिलो. त्या पुलकित दिवसांच्या आणि त्यांच्या गोतावळ्याच्या आगळ्या मागारपणाच्या आठवणीचा स्वर्गीय ठेवा आम्ही गावक ऱ्यांनी जपून ठेवला आहे, ‘मम सुखाची ठेव’ म्हणून!

सुरेश शामराव ठाकूर
लोकसत्ता,
रविवार १२ जून २०११

Tuesday, June 21, 2011

पाठीवरचा तो हात!

"आले, आले बरं का!" गर्दीत कोणीतरी म्हणाले.
"कुठे आहेत, कुठे आहेत?" बरेच आवाज.
"ते काय, अँबेसिडर मधून उतरताहेत."
गुरुशर्टावर बिल्ले लावलेली काही स्वयंसेवक मंडळी पुढे सरसावत, "तुम्ही जरा बाजूला सरका हो, त्यांना यायला सुध्दा रस्ता नाहीये! नाहीतर असं करा ना, तुम्ही सगळे आत का नाही जाऊन बसत? ते तिथंच येणार आहेत."
कोणीही फारसं मनावर घेतलं नाही. ते स्वाभाविकच होतं.
सगळ्या गर्दीच्या टाचा उंच झाल्या! मिळेल तिथून पुढे घुसून, मान ताणून लोकांची त्यांना बघण्याची धडपड सुरु होती.
मलाही उत्सुकता होतीच पण हे सगळे लोक इतके पराकोटीचे उत्सुक होते की मी जरा भांबावलोच.
मी "बाबा, मलाही थोडं उंच करा ना!"
बाबांनी मला दोन्ही हातांना धरुन थोडं उचललं आणि ते मला दिसले! मंडळी, ते माझं पुलंचं साक्षात पहिलं दर्शन!!
१९८० चा सुमार असेल, मी आठवीत असावा. अहमदनगरच्या 'महावीर कलादालना'च्या उद् घाटन सोहळ्यासाठी पुलं आलेले होते.
नुकतीच त्यांची साठी झाली होती. 'पुलं एक साठवण' हे प्रकाशनपूर्व नोंदणी वगैरे करुन घरपोच आलेलं मला आठवत होतं.
(पोस्टातून घरपोच आलेल्या पार्सलातून कोरे पुस्तक बाहेर काढून, त्याच्या पानांचा छान वास घेत घेत आपण आधी न वाचताच ते घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून प्रथम आजोबांना द्यावे लागले होते हे ही लक्षात होते:)
तशी 'व्यक्ती आणि वल्ली', 'पूर्वरंग', 'अपूर्वाई' ह्या पुस्तकांची मोहिनी मनावर आरुढ होतच होती पण हे विख्यात साहित्यिक आहेत वगैरे कल्पनांना डोक्यात अजून स्थान नव्हते.

असो. तर उभ्या महाराष्ट्राच्या मनावर गारुड करणार्‍या ह्या वल्लीचं पहिलं दर्शन कसं होतं?
अहो, ते पांढरेशुभ्र केस, जणू त्यांच्या कर्तृत्वाची हिमालयाच्या उंचीची साक्ष देणारे (असं अर्थात मला नंतर वाटू लागलं, पण ते केस त्यावेळीही मला भावले होते) हे पांढरे केस फार थोड्या लोकांना खर्‍या अर्थाने शोभून दिसतात बरं का, त्यातले एक भाईकाका होते; अंगात साधा खादीचा झब्बा, फार इस्त्री बिस्त्री असली भानगड नव्हती, त्यावर फिकट हिरवं-पिवळसर जाकीट तेही खादीचंच आणि पांढरा पायजमा असा वेष; चेहर्‍यावर आताच फर्मास कोटी करुन आल्यासारखे मिश्किल भाव, त्यांचा तो खास भाईकाका ष्टाईल चष्मा आणि त्यामागचे ते, लहान मुलाची अपार उत्सुकता आणि जिज्ञासा यांनी भरलेले, डोळे! ते अजूनही माझ्या मनात घर करून आहेत. तुम्हाला सांगतो ह्या मोठ्या माणसांच्या डोळ्यात अशी काही एक वेगळीच चमक असते की बस! ते डोळे तुम्हाला पहात नसून तुमच्या आत कुठेतरी बघताहेत असे तुम्हाला जाणवते! मी अनिमिष नेत्रांनी त्यांना बघत होतो. ते चालत आत सभागृहात गेले आणि सगळी गर्दी हिप्नॉटाईज झाल्यासारखी मागोमाग गेली!

आत छोट्या स्टेजवर सगळी मंडळी स्थानापन्न झाली. हारतुरे प्रास्ताविक झालं. बोलणार्‍या मंडळींपेक्षा माझं (आणि बहुदा सर्वांचंच;) सारं लक्ष पुलं कडेच होतं! ते मधूनच असे काही मिश्किल भाव चेहर्‍यावर दाखवायचे की मला मोठी गंमत वाटत होती (त्यावेळी कदाचित ते वक्त्याच्या बोलण्यातल्या अशा काही जागा हेरुन ठेवत असावेत की त्याचा वापर ते त्यांच्या भाषणात करुन लोकांना हसवतील असे आपले मला वाटले.) झालं पुलं बोलायला उभे राहिले. तोपर्यंत कानोकानी खबर पसरुन गर्दी इतकी वाढली की लोकांना जागा पुरेना, सभागृहाचे दरवाजे बंद करु का म्हणून विचारणा झाली. आणि इथे भाईकाका खरंच का मोठे ते मला समजलं! अहो माणूसवेडाच आसामी तो, ते संयोजकांना म्हणाले "अहो असं करुयात का, आपणच सगळे बाहेर हिरवळीवर जाऊयात का? लोकांना हिरवळीवर बसायला चालत असेल तर मी तिथे व्हरांड्यात उभा राहून बोलेन. माझी काहीच हरकत नाही!" क्या बात है!! (अहो हिरवळीवरच काय काट्याकुट्यात बसून ऐका म्हणले असते तरी सर्व लोक बसले असते!Smile लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात हिरवळीवर धाव घेतली! मिळेल तिथे जागा पकडून लोक बसले. आतली टेबलं खुर्च्या व्हरांड्यात आल्या. पुलं बोलायला लागले.

त्यावेळी ते काय बोलले ते मला फारसं आठवत नाहीये कारण माझ्या मनात त्या वेळी वेगळ्याच विचारांनी थैमान घातलं होतं. मला पुलंचं रेखाचित्र काढायचं होतं त्यामुळे मी सोयिस्कर जागा शोधत होतो की जिथून मला ते नीट दिसू शकतील! शेवटी महत्प्रयासाने व्हरांड्याशेजारच्या जिन्यात जागा मिळाली. हातातल्या कागदावर माझं चितारणं सुरु होतं. पुलं बोलत असल्यामुळे सहाजिकच हालत होते त्यामुळे त्यांचे विशिष्ठ कोनातले भाव चित्रात पकडताना माझी तारांबळ होत होती. शेवटी एकदाचं ते पूर्ण झालं! पुलंचं भाषण संपताच त्याच्या भोवती स्वाक्षर्‍यांसाठी गराडा पडला. एकेकाला ते हसून स्वाक्षरी देत होते. मी भीत भीतच सामोरा गेलो. मला जवळ बोलावून, पाठीवरुन हात फिरवून, डोळे मोठे करुन माझ्या हातातल्या चित्राकडे बघून म्हणाले "वा, छान काढलं आहेस रे! मला ठाऊक नव्हतं मी एवढा चांगला दिसत असेन!:)". आणि त्यांनी चित्रावर स्वाक्षरी केली!
महाराजा, त्यावेळी काय वर्णावी माझ्या मनाची अवस्था! 'अवघेचि झाले देह ब्रम्ह' म्हणजे काय असते त्याचा प्रत्यय आला! मी तरंगतच घरी आलो. एरवी ज्या गोष्टी करायला मी साफ नकार देत असे त्या सहजा सहजी ऐकताना पाहून माझे आई-बाबा गोंधळून गेले! ही काय जादू झाली?
आल्या गेलेल्याला पुलंची ती स्वाक्षरी पुढचे कितीतरी दिवस मी दाखवीत असे. तो माझा आनंदाचा ठेवा मी नीट जपून ठेवलाय!
अशीच अनेक वर्षे गेली. पुलं नंतर भेटतच गेले, पुस्तकातून , कथाकथनातून, संवादिनीतून, चित्रपटातून, नाटकातून, लेखांमधून आयुष्य समृध्द करत गेले. नंतरही पुण्यात वसंतव्याख्यान मालेच्या निमित्ताने म्हणा कुठल्याशा भाषणाच्या निमित्तने म्हणा बर्‍याचदा त्यांना प्रत्यक्ष पहाण्याचा योग आला. पण पहिली भेट ती पहिली भेट त्याचा ठसा अमिट असतो हेच खरे!

असाच काही कामाने हैद्राबादला गेलो होतो. पुलं पुण्यात 'प्रयाग' मधे अतिदक्षता विभागात आहेत हे माहीत होतेच. हैद्राबादला जाताना मनात शंकेची पाल चुकचुकली होती.
१२ जून २०००. माझं काम संपवून मी हॉटेलवर आलो. दूरदर्शवर संध्याकाळच्या बातम्या लावल्या पुलं गेले एवढंच कळलं. पुढच्या बातम्या ऐकू आल्या नाहीत. कितीतरी वेळ सुन्न बसून होतो.
छातीत खूप खूप जड वाटत होतं. दु:खावेग अति झाल्यावर डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरु झाल्या. मनाच्या आत खोल कुठेतरी काहीतरी ओरबाडल्यासारखी घायाळ अवस्था झाली होती.
माझ्या पाठीवरुन प्रेमाने फिरलेला तो हात परमेश्वराने त्याच्या हातात धरला होता आणि मी पोरका झालो होतो!

लेखक - चतुरंग
मूळ स्त्रोत - www.misalpav.com/node/1268
(लेखकाच्या पुर्वपरवानगीने हा लेख इथे टाकण्यात आला आहे)

Monday, June 6, 2011

व्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे

मी पु.लं.चा फॅन, चाहता. मला पु.लं.चं व्यक्ती आणि वल्ली पुस्तक पूर्ण पाठ. मी माझ्या वेगवेगळ्या नाटकात मग्न होतो. त्या काळात व्यक्ती आणि वल्ली रंगमंचावर आणण्याची चर्चा चालू होती. मला वाटलं त्यातल्या पु.लं.च्या भूमिकेसाठी विक्रम गोखले किंवा दिलीप प्रभावळकर यांच्यापैकी कोणाला तरी हा रोल मिळणार. मला या नाटकात रोल मिळेल असा मी विचारही केला नव्हता. आणि मला निर्मात्याचा फोन आला तू व्यक्ती आणि वल्लीमधील पु.लं.चा रोल करशील का? माझी पर्सनॅलिटी किंवा माझं बाह्य व्यक्तिमत्व तरुणपणच्या पु.लं. सारखं काहीसं तेव्हा होतं. मला विचारण्यापूर्वीच निर्मात्याने पु.लं. नाच विचारलं होतं की अतूल परचुऱ्यांना ही भूमिका द्यायची का? पु.ल. लगेच ’हो’ म्हणाले. त्यामुळे मी ही भूमिका करायला नकार देणं शक्यच नव्हतं. माझी पु.लं.शी ओळख नव्हती. आणि त्या काळात त्यांच्या आजारपणाला सुरुवात झाली होती. पण त्यांच्या विनोदबुद्धी तशीच तीव्र होती.

एकदा साहित्यसंघात ’तुझं आहे तुजपाशी’ या नाटकाचा प्रयोग होता आणि पु.ल. नाटक बघायला आले होते. मी त्यात शामची भूमिका करत होतो. माझं काम त्यांना अतिशय आवडलं, ते म्हणाले ’तुझं काम पाहताना सतीशची आठवण होते.’ या त्यांच्या कॉमेंटमुळे खूप आनंद झाला. सतीश दुभाषी आणि पु.ल. यांच्या चेहऱ्यात साम्य होतं याची मला पुन्हा जाणीव झाली. तेवढ्यात ते खुर्चीवरुन उठताना मी त्यांना हात द्यायला गेलो, त्यांचा विनोद इतका उत्स्फूर्त, ते म्हणाले ’नाही रे हल्ली थोडा वेळ लागतो. कारण स्टार्ट घ्यावा लागतो.’ नाटक संपल्यावर त्यांनी पेटीवर ’कृष्ण मुरारी’ गाणं वाजवून दाखवलं. त्यांनी माझं नाटक पाहणं, पेटीवर गाणं वाजवून दाखवणं हा मी माझा गौरव समजतो. सुपारेल कॉलेजच्या प्रांगणात चतुरंग संम्मेलनात पु.ल.ना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार होता. तीथे व्यक्ती वल्लीचा प्रयोग व्हायचा होता. चार हजार प्रेक्षक समोर बसले होते. सुरुवातीला बिरजू महाराज आणि झाकीर हुसेन यांचा कार्यक्रम होता. तो संपल्यावर रात्री अडीच वाजता नाटकाला सुरुवात झाली आणि नाटक पावणे सहाला संपले.

नंतरचा प्रयोग बालगंधर्वला होता. पु.ल. नाटकाला आले होते. पण पु.लं.ची लोकप्रियता एवढी की नाटक संपल्यावर पु.ल. मागच्या दारानं बाहेर पडणार होते तर त्यांना दर्शन घेण्यासाठी गेला. व्यक्ती आणि वल्ली या नाटकाचे दोनशे पन्नास प्रयोग झाले. खरं तर व्यक्ती आणि वल्ली हे नाटक तर एक ललितगद्य आहे. त्यात पु.लं.नी एकुण अठरा व्यक्तींवर लिहिलं. त्यातल्या काहीच व्यक्ती आणि वल्ली आम्ही नाटकाचं रुपांतर देऊन सादर केल्या. आपल्याला दहा पंधरा माणसाचे प्रकार शोधून सापडत नाही पण पु.लं.नी व्यक्तीमधल्या निवडलेल्या वल्ली, किती ग्रेट! शब्दकळा! अजूनही व्यक्ती आणि वल्ली वाचलं किंवा ऎकलं तर फ्रेश वाटतं हीच त्याची गंमत आहे.
दुर्दवाने पु.लं.चं मराठी समजणारा प्रेक्षक आज नाही. पु.लं.ची भाषा अलंकारिक नाही. पण त्यांचा विनोद कळायला मराठी भाषेची बलस्थान ठाऊक असायला हवीत. मला प्रामाणिकपणे वाटतं इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं, जर आपण त्यांना थिएटरपर्यंत आणू शकलो तर त्यांनाही पु.लं.ची नाटकं आवडतील. पण त्यांनी व्यक्ती आणि वल्ली वाचलं असेल तर त्यांचा आनंद द्विगुणीत होईल हे नक्की.

पु.लं.नी माझं नातीगोती हे नाटक पाहिलं होतं. मला ते ओळखत होते. व्यक्ती आणि वल्लीच्या निमित्ताने त्यांच्या माझ्या भेटी झाल्या. पण हक्काने गप्पा मारायला जाऊन त्यांना त्रास द्यावा हे मला योग्य वाटलं नाही. तेव्हा आजारपणाचा त्रास चालू झाला होता.

’तुझं आहे तुजपाशी’ नाटकाचा पु.लं.च्या पंच्याहत्तरीनिमित्त पुण्यात प्रयोग होता. मी शामचं काम करत होतो आणि माझी पत्नी सोनिया गीताचं काम करत होती. पु.ल. नाटकाला आले आणि म्हणाले ’मुद्दाम आलो. त्या त्या वयातील माणसं ते ते रोल करत आहेत’ या वाक्याला अर्थ होता. कारण शामचं काम ५०-५५ वयाचा कलावंत करायचा. नाटकातल्या शामचं वय २०-२५ वर्षं होतं मी त्यावेळी २५ वर्षाचा होतो म्हणून मला ही कॉमेंट फार आवडली. व्यक्ती आणि वल्ली आम्ही झी टीव्हीसाठी मालिकेच्या स्वरुपात केलं तेथे आम्हाला नंदा प्रधान, भैय्या नागपूरकर इत्यादी व्यक्ती आणि वल्ली घेता आल्या. नंदा प्रधानची भूमिका सचिन खेडेकरने केली होती. व्यक्ती आणि वल्लीच्या (मालिकेचा आणि नाटकाचा) दिग्दर्शक होता चंद्रकांत कुलकर्णी. त्याला नाटकांची उत्तम जाण आहे. व्यक्ति आणि वल्ली हे नाटक रेव्हू फॉर्म मधे आहे. तेव्हा त्याला निवेदनाची जोड द्यायला हवी हे त्यानं जाणलं. चंद्रकांत कुलकर्णी मला म्हणाला, ’तुझ्या खांद्यावर कॅमेरा आहे. तू शूट करुन दाखवायचं.’ म्हणजेच मला दोन पातळ्यांवर काम करावं लागलं एक म्हणजे त्यातून बाजूला होऊन नाटकातलं लेखकाचं पात्र होऊन वावरणं हा एक वेगळाच आनदं होता. लोक मला विचारत पाठांतराचा त्रास होत नाही का? कसा होणार? मुळात मला व्यक्ती आणि वल्ली पाठ होतच आणि पु.लं.नी मला काम करायला सांगितलं होतं हा सगळा अत्यंत भाग्याचा आनंदाचा सुवर्णयोग होता.

ज्याला हायलाईट म्हणता येईल अशी माझ्या आयुष्यातील न पुसली जाणारी आठवण म्हणजे माझं लग्न ठरलं होतं, पहिली पत्रिका गणपतीला ठेवली. दुसरी पु.लं.ना द्यायला पुण्याला गेलो. त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना लग्नाला येणं शक्य होणार नाही माहीतही होतं त्यांना पत्रिका दिली त्यांनी मला ’युवराज’ अशी हाक मारली आणि म्हणाले, ‘प्रकृती बरी असली तर मी लग्नाला नक्की येईन.’ आणि आश्चर्य म्हणजे लग्नाच्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांचा फोन आला म्हणाले.’ मी येऊ शकणार नाही पण इथूनच म्हणतो ’नांदा सौख्यभरे’.

त्यांचं ’असा मी असामी’ हे फॅन्टास्टिक पुस्तक आहे त्यात नाटकीय प्रसंग जास्त आहेत आणि त्यातली कॅरक्टर्स गडद आहेत. त्यातलं धोंडोपंत हे पात्र पु.लं.च्या जवळ जाणारं आहे. पण ’असा मी असामी’ मला करता आलं नाही याची मला खंत आहे. पु.लं.च्या स्मृतीला प्रणाम!

अतुल परचुरे
(जीवनज्योत दिवाळी अंक २००९)

Thursday, May 19, 2011

देवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.

देवगडकरांकडुन पाठवलेला हापूस आंबा खाल्यानंतर पुलंनी त्यांचे आभार एका पत्रातून व्यक्त केले होते हेच ते पत्र .

मुळ स्त्रोत - http://devgadmango.com/blog/?p=122

Friday, May 6, 2011

'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...

मराठी रंगभूमीला पडलेले भरजरी स्वप्न म्हणजे ' बालगंधर्व ', मराठी नाट्यसंस्कृतीचा सुरेल इतिहास म्हणजे ' बालगंधर्व ' ... याच गंधर्वयुगाच्या स्मृती जागवत ' बालगंधर्व ' हा जरतारी सिनेमा आज प्रदर्शित होतोय. त्यानिमित्ताने १९८६ मध्ये बालगंधर्वांच्या जन्मशताब्दीनिमित्त पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या गंधर्वगौरवाचा हा पुनर्प्रत्यय...

ह्या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्याच्या लेखी काहीही असले तरी मराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्य हिशेबी हे बालगंधर्वनाम संवत्सरच आहे. बालगंधर्व नावाचा ह्या महाराष्ट्राच्या नाट्य कला क्षेत्रात जो एक चमत्कार घडला त्या विस्मयकारक नटवराच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे.


रहस्य कायमच

जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात उत्तम दर्जाचे कार्य करणा-यांना श्रेष्ठत्व मिळते, लोकप्रियता मिळते, पण विभूतिमत्व लाभतच असे नाही. ही कुणी कुणाला उचलून द्यायची पदवी नाही. विभूतिमत्त्वाच्या देवाणघेवाणीची तिथे सांगता नसते. बालगंधर्वांना असे विभूतिमत्व लाभले आणि ते देखिल ज्या काळात ते वावरत असलेल्या नाट्यक्षेत्राकडे अवहेलनेने पाहिले जायचे, अशा काळात असंख्य रसिकांच्या मनात त्यांनी घर केले. ह्यामागील रहस्य शोधून काढायचा अनेक कलावंतांनी आणि कलासमीक्षकांनी प्रयत्न केला त्यांच्या अभिनयगुणांचं, गायनातल्या वैशिष्ट्यांचं, त्यांच्यातल्या उणिवांचे विश्लेषण करणारे लेख लिहिले. भाषणं केली. आपली चिकित्सक बुद्धी पणाला लावली. एवढे करूनह या कलावंताला लाभलेल्या विभूतिमत्त्वाचे रहस्य हाती पूर्ण लागल्याचे समाधान कुणाला मिळाले असेल असे वाटत नाही. वास्तविक बालगंधर्वाहून अधिक सुंदर दिसणारे आणि अधिक प्रभावी रितीने गाणारे कलावंत त्यावेळी होते आणि आजही आहेत. अण्णा किर्लोस्करांच्या शाकुंतल, सौभद्रपासून आजतागायत चालत आलेल्या मराठी नाटकांविषयीच्या मराठी रसिकांच्या मनातल्या जिव्हाळ्याची ज्यांना कल्पना नाही अशी माणसं तर म्हणतील की स्त्रीवेश घेऊन नाटकात नाचणा-या एका नटाचं ही मंडळी हे काय एवढे स्तोम माजवताहेत. त्यांना बालगंधर्वांना लाभलेल्या रसिकांच्या प्रेमाची प्रतच कळणं अवघड आहे. म्हणूनच कविवर्य माडगुळकर जेव्हा ' असा बालगंधर्व आता न होणे ' अशी ओळ लिहून गेले तेव्हा हजारो मराठी रसिकांना कवी आपल्या मनातले बोलला असे वाटले.

सूर बरसणारा वरूण

अत्यंत अवघड गोष्टी अगदी सोप्या आहेत असे करून दाखवणे ही असमान्य प्रतिभावंतांनाच साधणारी किमया आहे. गहन तत्त्वज्ञान देखिल ग्यानबा-तुकाराम सोपं करून सांगतात आणि वरपांगी सोपी वाटणारी ओवी किंवा अभंगातील ओळ अनुभवायचा प्रयत्न करायला लागलो की ती ओळ किती खोल पाण्यातून आली आहे याची जाणीव होते. इथे आपले हात जोडले जातात तेही असली अद्भूत किमया घडवणा-या प्रतिभा नावाच्या शक्तिपुढे. कुणी मग त्याला देवाचे देणे म्हणतात, कुणी पूर्वजन्माची पुण्याई म्हणतात, त्या तर्कापलिकडल्या अनुभवाला काहीतरी म्हटल्याशिवाय आपल्याला राहवत नाही आणि मग आपण काहीतरी म्हणत असतो. पण असले आनंददायक अनुभवच आयुष्यभर आपले खरे सांगाती असतात. आयुष्यातील सारी कृतकृत्यता असल्या अनुभवांच्या क्षणांची एखाद्यापाशी किती साठवण आहे यावर जोखायची असते. ज्यांना श्रेष्ठ प्रतिभावंत म्हणावे असे कलावंत वरूणसारखी असल्या आनंदांच्या सरींची बरसात करून असंख्य मनांचे मळे फुलवित असतात. बालगंधर्व हा असाच एक वरूण, सूर बरसत राहणारा. नुसत्या गाण्यातूनच नव्हे तर गद्यातूनसुद्धा. त्यांच्या नुसत्या स्मरणाने भीमपलास, बागेश्री, यमन, बिहाग, खमाज या रागांची एकदम कारंजी मनात उडायला लागतात. तसेच तुषार स्वयंवरातील ' दादा ते आले ना ' किंवा ' खडा मारायाचा झाला तर ' किंवा एकच प्यालातील ' हे चरण जिथं असतील तोच माझा स्वर्ग ' किंवा दौपदीतल्या ' जा ! दुःशासनाला म्हणावं दौपदी स्वतंत्र आहे. दौपदी कुणाची दासी नाही बरं. दासी नाही ' यासारख्या गद्य वाक्यांच्या स्मरणानेही उसळतात. त्यांची ' अन्नदाते मायबापहो ' ही आर्जवी हाक आठवली की त्या स्मरणाने अंगावर काटा उभा राहतो. मन भरून येते. आयुष्यातल्या एका पुष्पपरागसुगंधित स्मृतिपथावरून आपण सहलीला निघाल्यासारखे वाटतं. हा स्मृतिपथ किती दूरवर घेऊन जाईल ते सांगता येत नाही.


नाटक नव्हे, शुभकार्य

गंधर्वांचे नाटक पाहणे हे नुसते तिकीट काढणे आणि थेटरात जाऊन नाटक पाहाणे एवढंच नसे. कुटुंबात एखाद शुभकार्य निघावं तसं गंधर्वाचं नाटक पाहायला जाण्याचं कार्य निघायचं. थेटरात तास तास आधी जाऊन पोहोचायचं. मग गणपतराव बोडस, मास्तर कृष्णराव, रानडे ही मंडळी रंगपटाकडे जाताना बघायला मिळत. विठोबाच्या देवळाच्या प्रांगणात निवृत्ती, ज्ञानदेव ही संत मंडळी साक्षात दिसावी तसं वाटे. आमची तिकिटे पिटातली किंवा त्यांच्या आसपासची माडीवरची असायची. मग माडीवरून खाली पुढल्या कोचाकडे येणारी धनिक मंडळी दुरून पाहायची. एकदा ह्याच ऑपेरा हाऊसमध्ये अल्लादिया खाँसाहेब आले होते. वडलांनी मला त्याला वाकून नमस्कार करायला लावला होता. वडलांचे बालपण कोल्हापूरात गेल्यामुळे अल्लादिया, बुर्जीखाँ, मंजीखाँ ही नावे माझ्या कानावरून फार लहानपणीच गेली होती. त्या एकच प्यालानंतर पुढे बालगंधर्वांची पुढे कितीतरी नाटके पाहिली. रिपन थेटरात पाहिलेल्य त्यांच्या कान्होपात्रेत शेवटी विठ्ठलचरणी विलीन होऊन काष्टवत झालेली कान्होपत्रा पाहताना अभिनयातला तो मला एक चमत्कार वाटला होता. त्या नाटकाच्या प्रयोगाची एक मजेदार आठवण आहे. एरवी स्टेजसमोर गादीवर बसून आपल्या तबल्याने लोकांना जागच्याजागी नाचायला लावणारे थिरकवा खाँसाहेब गंमत म्हणून नाटकातल्या भजनात वारकरी वेश चढवून पखवाजी पांडोबा बोंद्र्यांच्या शेजारी टाळ वाजवित नाचत होते.

माझ्या आयुष्यात एकाचढ एक गायक वादक ऐकायचा योग मला लाभला. त्या गायकांची तुल्यबळ म्हणावे असे आजही तरुण गायक-गायिकांचे गाणे, वाजवणे ऐकायला मिळते. पण बालगंधर्वांच्या स्वराची किमया काय आहे ते मात्र कळत नाही. तासतास तयारीने पिसलेल्या भीमपलासापुढे बालगंधर्वांनी त्याच भीमपलासात ' देवा धरले चरण ' एवढी नुसती तीन शब्दांची ओळ भिजवून काढली की सगळा भीमपलास एका क्षणात आपल्या शरिराबाहेर रंध्रारंध्रातून आत झिरपत गेल्याचा अनुभव यायचा. बरं हा काही केवळ रम्य ते बालपण छाप अभिप्राय आहे असे नाही. मध्ये एक काळ असा आला होता की चित्रपटसंगीताच्या लाटेत बालगंधर्वांची स्वरांकित द्वारका बुडून जाणार की काय अशी भिती वाटत होती. पण कुठे काय जादू झाली ते कळत नाही. मराठी संगीतसृष्टीत ही सारी गायकी पुनर्जन्म घेतल्यासारखी प्रकटली. बालगंधर्वांना ज्यांनी कधी प्रत्यक्ष पाहिले नाही, की प्रत्यक्ष ऐकलेही नाही अशी गुणी मुलं त्यांच्या ध्वनीमुद्रिका ऐकून त्या गायकीतली गहिराई ओळखून ती गाणी आत्मसात करण्यात आनंद मानताना दिसायला लागली. मला कधीकधी इतकी मजा वाटते की एरवी सगळे मॉड संस्कार असेलेली तरुण मुलंमुली जर चांगल्या संगतीची नजर लाभलेली असेल तर बालगंधर्वांच्या गाण्यातल्या ज्या विशेष सौंदर्यस्थळांना साठ-सत्तर वर्षांपूर्वी दाद मिळायची त्याच जागांना तितक्याच आनंदाने दाद देताना दिसतात. कलेच्या सौंदर्यात ही अशी एक कालनिरपेक्ष आनंद देणारी शक्ती असते. कलावंत जाणून घेणं म्हणजे त्या शक्तीची लीला जाणून घेणं असतं. असा स्थल काल निरपेक्ष आनंद देण्याचं सामर्थ्य एक तर निगर्सप्राप्त असतं किंवा निसर्गासारख्याच निरपेक्ष सहजतेने फुललेल्या कलेच्या दर्शनात असतं. त्यातली निरपेक्षता आणि सहजता ह्या दोन्ही गोष्टी अमोल असतात. खळखळत वाहणे हा निसर्गाचा सहजधर्म. तसाच सहजधर्म म्हणून गळ्यातून सूर वाहतो असा साक्षात्कार घडवणारा गतिमानी गायक कलावंत म्हणजे निसर्गाने निरपेक्ष भावनेने आपल्याला दिलेल्या पौर्णिमेच्या चांदण्याच्या, सूर्योदयाच्या फुलांच्या ताटव्यांच्या, खळाळणा-या निर्झराच्या देण्यासारखे एक देणे असते. ते कोण आणि कुठे आणि कसे घडवितो हे कोडे सुटले असते तर बालगंधर्वाच्या गाण्यातल्या आनंदकोशाचे रहस्य उमगले असते.

स्वरदानाचे वरदान

शंभर वर्षांपूर्वी सूर लयीचा स्वयंम् अवतार असल्यासारखा साक्षात्कार घडवणारे हे देणे महाराष्ट्रात जन्माला आले. सूर आणि लय यांचे पार्वती परमेश्वरासारखे संपृक्त स्वरूपातले दर्शन त्याने घडवले आणि ते ही कुठून ? तर स्वतःला शिष्ट समजणा-या समाजातल्या लोकांनी अपवित्र, ओंगळ मानून बहिष्कृत केलेल्या नाटकाच्या मंचावरून, आंगणातल्या मातीत रांगणा-या बालकृष्णाने आपल्या चिमण्या मुखाचा ‘ आ ’ करून यशोदेला विश्वरूपदर्शन घडवले... तसे ह्या बालगंधर्वानेही नाटकातल्या गाण्यासाठी लावलेल्या ‘ आ ’ कारामागचे भारतीय अभिजात संगीतातले विश्व जाणकारांच्या अनुभवाला आणून दिले. विचारहीन अरसिकांनी हीनत्वाचा डाग देऊन चोरटा संबंध ठेवायच्या लायकीची कला ठरवलेल्या संगीत कलेला जणू शापमुक्ती लाभली. घराघरात नव्हे, तर मराठी माजघरा-माजघरात गंधर्वाचं गाणं गेलं. त्याचा आदर झाला. लाड झाले. स्त्री-पुरूषांनी मोकळ्या गळ्याने त्या गाण्यांची सलगी जोडली. महाराष्ट्राला वरदानासारखं लाभलेलं हे स्वरदान. मनाच्या झोळीत ते कृतज्ञतेने स्वीकारावं आणि स्वतःला धन्य मानावं.

म्हणून म्हणतो की, ह्या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्याच्या लेखी काहीही असलं तरी मराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्या हिशेबी हे ‘ गंधर्वनाम संवत्सर ’ च आहे.

( ‘ कालनिर्णय ’ च्या सहकार्याने)

महाराष्ट्र टाईम्स
६/५/२०११
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8171275.cms

(पु.ल. प्रेमी श्री चंद्रशेखर मोघे यांनी हा लेख विरोपाद्वारे दिल्याबद्दल त्यांचे अनेक धन्यवाद)

Saturday, April 30, 2011

गांधी टोपी - खिल्ली

राष्ट्रीय चळवळीत भाग घेतलेल्या एका वृद्ध स्नेह्यांना मी विचारले, “ गेल्या पंचवीस वर्षांत सर्वांत मोठे परिवर्तन कशात झाले असे आपल्याला वाटते ?"

"गांधी टोपीत !" ते म्हणाले.

"ते कसे काय ?"

"पूर्वी गांधी टोपी घालायला इंग्रज सरकारची भीती वाटत होती. हल्ली आपल्याच जनतेची वाटते."

"असं का म्हणता ?"

तूच पाहा गांधी टोपी, पायघोळ धोतर, खादीचा झब्बा आणि जाकीट घालून हातात एक कातडी अटॅची घेतलेल्या माणसाविषयी तुझे प्रथम दर्शनी मत काय होते ?" मी बोललो नाही. मला जुनी हकीगत आठवली.

मिठाच्या सत्याग्रहाचे दिवस होते. लॅमिंग्टन रोडवर पोलिस स्टेशनपाशी सत्याग्रहींचा जथा आला होता. लोक निर्भयपणे पोलिसांच्या गाडीतून घुसून स्वतःला अटक करून घेत होते. त्या गर्दीत एक तरुण स्त्री होती. तिने आपल्या अंगावरचे दागिने उतरवले. शेजारच्या एका माणसाच्या हाती दिले. त्याला आपले नाव सांगितले, पत्ता सांगितला आणि म्हणाली,

"माझ्या घरी हे दागिने नेऊन द्या आणि सांगा ‘म्हणावे, मी सत्याग्रहात गेले."

तो गृहस्थ म्हणाला,"बाई, तुमची माझी ओळखदेख नाही. तुमचे हे दागिने मी तुमच्या घरी पोहोचवीन असा तुम्हाला विश्वास का वाटतो ?” तुमच्या अंगावर खादी आहे. आणि डोक्यावर गांधी टोपी आहे म्हणून."

इतक्या आपुलकीने आणि विश्वासाने भारतीय माणसांना जोडणाऱ्या गांधी टोपीची आज जी स्थिती झाली आहे ती आमच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या स्वातंत्र्यातल्या वाटचालीची कमाई समजावी का ! आता त्या गांधी टोपीवर पांढऱ्याला अधिक चकचकित पांढरे करणारे टिनोपाल बिनोपालसारखे द्रवण आले आहे. त्या चकचकाटाला आणि कडक इस्त्रीलाच प्रगती मानून आत्म- संतोषात राह्यचे असेल तर ती गोष्ट निराळी ! माझ्या स्वराज्याच्या कल्पनेत होता तो गांधी टोपीचा प्रवास या दिशेने होणारा नव्हता.

- पु.ल. देशपांडे 
एका गांधी टोपीचा प्रवास
खिल्ली

Friday, March 25, 2011

उत्स्फ़ूर्तता पुलंची - सुधीर गाडगीळ

नमस्कार,

’बोलणं’ नेमकं, नेटकं, समोरच्याला सहजतेनं समजेल असं असणं ही सध्याच्या मार्केटिंगच्या जगात अत्यावश्यक बाब ठरू पाहतीय. शब्द निवडीतली स्वाभाविकता, शब्द मांडणीतील अनौपचारिकता, विचारांची स्पष्टता आणि क्वचित प्रसंगी उत्स्फ़ूर्तता हे सूत्र सांभाळलं, तर कुठल्याही वयोगटातल्या, कुठल्याही स्वभवधर्माच्या माणसांशी तुमचे संवादाचे सूर सहज जमतात. ’पुलं’नाही अनौपचारिक बोलीत बोलण्याची भट्टी झक्क जमली होती.

"तुम्हाला सांगतो..."म्हणत ते क्षणात समोरच्यांच्या हृदयात शिरत. अंगभूत उत्स्फ़ूर्तता, बारीक निरिक्षणशक्ती आणि मूळात माणसांची आवड आणि त्यांच्या आनंदात आनंद मानण्याची उपजत वृत्ती यामुळे शब्दांच्या खेळाचे ते अनभिषिक्त सम्राट राह्यले. आपण मंडळी अनेकदा त्यांच्य उत्स्फ़ूर्त उद्गारांनी खदखदलेले आहात. मला ’पुलं’ समवेत प्रावास करण्याचाही योग आला आणि साध्या साध्या गोष्टीतही त्यांनी केलेल्या शेरबाजीमध्ये डोकावणा-या ’खट्याळ-मिष्किल’ पुलंचे दर्शन घडले.


मॊरिशसहून परतत होतो. एअरपोर्टच्या ड्यूटी-फ़्री शॉपमध्ये पुल-सुनीताबाईंसमवेत मीही रेंगाळलो होतो. समोरच्या शो-केसमध्ये एक पैशांचं सुंदर लेदर पाकीट लटकवलेलं होतं. पुलंना ते पाकीट फ़ार आवडलं. त्यानी सेल्समनला विचारलं, "केवढ्याला?"
सेल्समननं जी किंमत सांगितली, ती ऎकताक्षणी पुलं क्षणात उद्गारले,
"अरे, मग पाकीटात काय ठेवू?"

-सुधीर गाडगीळ
मुळ स्त्रोत --> http://sudhirgadgil.blogspot.com/2010/11/blog-post_25.html

Wednesday, March 16, 2011

पु.ल. एक आठवण - धनंजय इंगळे

फावल्या वेळात पुलं वाचत बसणं, हा माझा आवडता छंद आहे. मनाच्या आनंदी अवस्थेत पुलं वाचले तर आनंद शतगुणित होतो व दु:खी अवस्थेत वाचले, तर दु:खाची तीव्रता खूप कमी होते, असा माझा कित्येक वर्षांचा अनुभव आहे.
सतत गाण्याच्या मैफिलींचा आनंद घेणारा श्रोता कधी स्वत: गाऊन बघण्याचं धाडस करतो, तेव्हा आपण गवय्ये आहोत अशी फुशारकी त्याला अजिबात मारायची नसते. पण तरीही, एखाद्या वेळी त्याला राहावत नाही. आज पुलंबद्दल लिहिताना माझं असंच काहीसं झालंय..

पुलंच्या बाबतीत लिहिताना प्रश्न असा पडतो की, त्यांच्यावर लिहायचं ते कोणत्या बाबतीत?
सामाजिक बांधीलकीची जाण ठेवून लिहिणारा लेखक, स्वत:चं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर लक्षावधी रुपयांचं दान निरनिराळ्या संस्थांना देणारा दाता, उत्तम नाटककार, संगीतकार, शास्त्रीय संगीताचा उत्तम जाणकार आणि गायकसुद्धा, अप्रतिम हार्मोनियम वादक, की सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक..

कठीण आहे! एवढासा माणसाचा मेंदू. त्यात इतक्या सर्व गोष्टी ठासून भरलेल्या बघितल्या, की आश्चर्य वाटतं. जाऊ दे म्हणा.. आपण आपला त्यांच्या कलाकृतींचा आनंद घेत राहायचा. बाकीच्याशी आपल्याला काय देणं-घेणं?
पुलंची मला सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती. आपल्या दैनंदिन व्यवहारात आढळून येणार्‍या विसंगती अचूक टिपण्याची व ती कोणाला न दुखवता नेमकेपणाने लोकांसमोर मांडण्याची त्यांची ताकद, ही एक फार मोठी दैवी देणगी आहे. आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, ही या दैवदत्त शक्तीची काही उदाहरणं. वरील सर्व लेखक श्रेष्ठ खरेच, पण या सर्वाहूनही पुलंचा विनोद काही वेगळाच आहे. त्यांचं लिखाण वाचताना नेहमी ‘अरेच्या, हे तर अगदी आपल्या मनातलंच लिहिलंय..’ असंच वाटत राहातं, यातच त्यांचं यश दडलं आहे.
काहींच्या विनोदाने लोक कधीतरी दुखावले गेलेही असतील कदाचित. पण पुलंचा विनोद निर्मळ असतो. तो गुदगुल्या केल्यासारखा खळखळून हसवतो, त्याचबरोबर अंतर्मुखही करतो. म्हणजे एखाद्याची दाढी करताना, गुळगुळीत तर झाली पाहिजे, पण जखमही व्हायला नको.. असं!
त्यांचं कुठलंही पुस्तक हातात घ्या, निखळ आनंदाचा ठेवा असतो. याचं एक कारण असंही देता येईल, की त्यांनी जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं. कुठल्याही गोष्टीची चांगलीच बाजू वाचकांसमोर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.‘‘आयुष्यात वेळोवेळी इतके दु:खाचे, अपमानाचे प्रसंग सर्वावर येत असताना, माझ्या लिखाणातून आणखी दु:ख वाचकांसमोर ठेवण्यापेक्षा त्यांना दोन घटका आनंद देता आल्यास ते मला अधिक आवडेल..’’ असं ते म्हणत. किंबहुना माझा स्वत:चा दृष्टिकोनसुध्दा असाच असल्यामुळे असेल कदाचित, मला त्यांचं लिखाण प्रचंड आवडतं.

सिद्धहस्त लेखक म्हटलं, की प्रथम आठवतात, ते पुलंच! त्यांची प्रवासवर्णनं (जावे त्यांच्या देशा, अपूर्वाई, पूर्वरंग) वाचताना याचा पदोपदी प्रत्यय येतो. प्रवासवर्णनच कशाला, त्यांचं ललित लेखन, व्यक्तिचित्रण, काहीही घ्या, फॅण्टास्टिक.!! स्वत: रंगभूमीचे कलावंत आणि नाटकाचे दर्दी असल्याकारणाने, त्यांना परदेशात गेले तरीसुद्धा नाटकांचे थिएटर प्रथम दिसे. त्यांचा एक मित्र खवचटपणे त्यांना म्हणालादेखील, ‘‘कुत्रा कुठेही गेला, तरी त्याला जसा ‘खांब’ दिसतो, तसं तुला थिएटर दिसतं..’’ सांगायचं तात्पर्य, त्यांना नाटक रंगभूमी यांची प्रचंड आवड होती. त्यांच्या प्रवासवर्णनातसुद्धा याचंच वर्णन भरपूर असतं.

कुठलाही लेख, कथा इ. लिहिताना त्याची सुरुवात व विशेषत: शेवट, हे आकर्षक असणं जरुरी असतं. तरच ते मनाची पकड घेऊ शकतात. याबाबतीत पुलंना पैकीच्या पैकी गुण द्यायला हवेत. त्यांचं कुठलंही लिखाण बघा, माझं म्हणणं तुम्हाला पटेल. उदा. व्यक्ती आणि वल्लीमधील ‘चितळे मास्तर’, ‘बापू काणे’ इत्यादी. विशेषत: ‘चितळे मास्तर’चा शेवट तर नकळत डोळ्यांच्या कडा भिजवून जातो. अल्टिमेट!

मानवी स्वभावाचं अत्यंत बारकाईचं व प्रत्ययकारी चित्रण करावं, तर ते पुलंनीच! ‘दाद’, ‘गणगोत’, ‘गुण गाईन आवडी’, ‘मैत्र’ इत्यादी. त्यांच्या पुस्तकातून त्यांच्या सुहृदांच्या व्यक्तिरेखा त्यांनी रंगवल्यात. त्या वाचताना तासन्तास कसे निघून जातात कळतही नाही. पुलंच्या व्यक्तिरेखांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्या कधीही आततायी, हिंसक होत नाहीत. म्हणून वाचकांच्या डोक्याचं टेन्शन वाढत नाही. म्हणून त्या जास्त इंटरेस्ट घेऊन वाचल्या जातात. निखळ आनंद देणारं हे लिखाण, कितीही वेळा वाचलं तरी कधीही कंटाळा येत नाही. मला स्वत:ला तर ते इतकं आवडतं, की फावल्या वेळात पुलं वाचत बसणं, हा माझा आवडता छंद आहे. मनाच्या आनंदी अवस्थेत पुल वाचले तर आनंद शतगुणित होता, व दु:खी अवस्थेत वाचले, तर दु:खाची तीव्रता खूप कमी होते, असा माझा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. आणि जी कला तुमचं दु:ख, टेन्शन हलकं करते, तीच सर्वश्रेष्ठ असते.. नाही का?

पुलं नुसते साहित्यिकच नव्हते, तर इतरही अनेक कला त्यांच्या अंगी होत्या. ते एक उत्तम वक्ते होते, हार्मोनियम वादक, संगीत दिग्दर्शक होते. नाटकांच्या तर सर्व अंगांत ते पारंगत होते. पटकथा, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य अशी सर्व अंगे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. चित्रपट व्यवसायातदेखील त्यांनी भरपूर नाव कमावलं. ‘गुळाचा गणपती’ हा चित्रपट म्हणजे तर सबकुछ पुलं! ‘अंमलदार’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’ इ. त्यांची नाटकं झकास चालली. ‘बटाटय़ाची चाळ’ ह्या एकपात्री प्रयोगाने पुलंचं नाव सर्वतोमुखी झालं. नंतर आलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’ने तर कहरच केला. त्याचा नुसता प्रयोग जाहीर झाला की एक तासाच्या आत प्लॅनवर बसलेला माणूस गल्ला पेटीत टाकून खिडकी बंद करायचा.
एखादी गोष्ट आवडली, पटली तर स्वत: वाटेल तो त्याग करून ती गोष्ट तनमनधनाने स्वीकारायची, हा पुलंचा खाक्या. त्यापायी (सपत्नीक) प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईकांच्या कॉलेजच्या स्वप्नापायी पुण्याची नोकरी सोडून मालेगावच्या उजाड रानात राहायला गेले. तशीच बेळगावच्या कॉलेजात प्रोफेसरकी केली. इंदौरी, लखनवी, ग्वाल्हेरी वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी रामूभैया दातेंसोबत उत्तरेची सफर करून आले. भूदानाचं कार्य जाणून घेण्यासाठी विनोबांच्या सहवासात कित्येक दिवस पायी फिरले. आनंदवनात तर किती वेळा येऊन गेले असतील, देव जाणे. असंख्य नोकऱ्या केल्या, सोडल्या.. दत्ताने केलेले गुरू आणि पुलंच्या नोकऱ्या, यात फारसा फरक नसावा.

मित्र जमवणं आणि मनमुराद गप्पा मारणं, स्वत: हसणं आणि इतरांनाही खळखळून हसवणं, हा पुलंचा आवडता षौक. उत्स्फूर्त शाब्दिक कोटया कराव्यात तर त्या पुलंनीच. त्यांच्या एकसष्टीनिमित्त त्यांचा सत्कार झाला. त्यासाठी जे हार आणले होते, ते खूप जाड व वजनी होते. ते हार बघून पुलं चटकन उद्गारले, ‘‘बापरे, एवढे मोठे हार घालून घ्यायचे, तर मला उभ्याच्या ऐवजी आडवंच व्हायला हवं..’’ कविवर्य बा. सी. मर्ढेकर हे पुलंचं श्रद्धास्थान! एका गावात मर्ढेकरांच्या कविता वाचनासाठी पुलंना बोलावलं होतं. ते संध्याकाळचे त्या गावात पोहोचले. रात्रीच्या जेवणासाठी कुणा परिचितांच्या घरून जो टिफिन आला, तो आठ ते दहा खणांचा होता. टिफिन बघताक्षणी, आणणाऱ्या माणसाला पुलं म्हणाले, ‘‘अहो, उद्या आपल्याला लोकांना मर्ढेकर ऐकवायचे आहेत, ढेकर नव्हे.. सचिनची बॅटिंग बघताना किंवा पुलंचं लिखाण वाचताना आपल्याला (किमान मला तरी) असं वाटायचं, की हे सारं किती सोप्पं आहे.. आपण हे अगदी सहज करू शकू. पण प्रत्यक्षात बॅट घेऊन मैदानात उतरलं किंवा आता पुलंवर लिहायला बसलो, तेव्हा अर्जुनासारखं ‘सीदन्ती मम गात्राणी..’ झालं. शब्द आठवेचनात! तेव्हा कळतं, की सचिन किंवा पुलंसारखे पैदा होत नसतात. हजारो वर्षांंतनं एखादेच पुलं जन्मतात..

थोर गायक कै. डॉ. वसंतराव देशपांडे आणि पुलं हे अतिशय अंतरंग मित्र. ४०-४५ वर्षांची मैत्री, १९८३ साली वसंतरावांच्या अकाली निधनामुळे तुटली, तेव्हापासून ते थोडे खचल्यासारखे झाले. ‘‘वसंता नसलेल्या जगातही आपल्याला कधीकाळी रहावं लागेल, अशी कल्पनाच कधी मनाला शिवली नाही..’ असं ते म्हणत. म्हणूनच महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्वीकारताना त्यांनी, ‘‘विझवून दीप सारे, मी चाललो निजाया..’’ असं म्हटलं, तेव्हा विलक्षण वाईट वाटलं. एक ना एक दिवस सर्वानाच जायचं असतं. पण पुलंनी आपणांस आयुष्यभर जो आनंद भरभरून दिला, त्याबदल्यात त्यांचंचं जाणं फार खटकतं. अनेकांचे गुणविशेष त्यांनी टिपले व सर्वांपर्यंत पोहोचविले. स्वत: घेतलेला आनंद शतपटीने वाढवून पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचविला.
पुलंची वारंवार आठवण येताना वाटतं, की ते स्वत:सुद्धा ईश्वराची एक कलाकृतीच होते. आम्हा सामान्यांच्या आयुष्यात अर्थ व रंग भरण्यासाठी देवानेच त्यांना या पृथ्वीवर पाठवलं होतं. तो पाठवणाराही असा लहरी आहे, की देताना ‘देऊ का?’ असं विचारत नाही आणि परत नेतानाही ‘नेऊ का?’ असं विचारत नाही. देतो आणि नेतो. आपण बघण्याव्यतिरिक्त काय करू शकणार? त्यांची लीला अतक्र्य आहे. त्यांच्या लीलेला आणि त्याहीपेक्षा त्याच्या कलाकृतीस सलाम करणं, एवढंच आपल्या हातात उरतं. नाही का?

धनंजय इंगळे
लोकसत्ता
२८/५/२०१०

मुळ स्त्रोत - http://www.loksatta.com/lokprabha/20100528/pulkit.htm