Saturday, October 4, 2008

परफॉर्मर ’पुलं’ - सुधीर गाडगीळ

पु.ल. देशपांडे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त खास लेख शब्दांच्या निवडीतलं नेमकेपण, सोप्पेपण, शब्द मांडणीतली अनौपचारिकता, भरजरी अलंकारिक शब्दांना दिलेला फाटा आणि 'नादा' मधला जिव्हाळा, या गोष्टी 'पुलं'ना ऐकताना आवर्जून जाणवत असत. भरड्या खादिच्या नेहरु शर्टाची बाही सरसावत 'तुम्हाला सांगतो' म्हण त्यांनी केलेलं भाषण असो, पॅंट-बुशकोटातल्या 'पुलं'चं, सिगारेटचा झुरका घेत कोचावर शेजारी बसलेल्याशी चाललेल्या गप्पा असोत किंवा 'एनसीपीए'त भावसंगीताचा प्रवास ते मांडत असताना, त्यांचं चाललेलं निवेदन असो, माझं लक्ष त्यांच्या शब्दमांडणीकडेच सतत असे. भाषण असो वा मुलाखत, त्यांच बोलणं गप्पा मारल्यासारखं असायचं, घरात बोलताना पुढचं वाक्य सहज सुचत जावं तसं. त्यातलं साधेपण मनाला भिडायचं.

'पु.ल.'च्या आवाजात , त्या नादात, तुमच्या -आमच्या विषयीचं प्रेम जाणवायचं, एखाद्याचं उत्स्फूर्त वाक्यानं स्टेजवर चैतन्य निर्माण करण्याची क्षमता त्यांच्या बोलण्यात होती. अहमदनगरला 'आर्ट गॅलरी'चं उद्घाटन होतं. बासुदा आणि पुलं समारंभाचे पाहुणे होते. संयोजक-संचालक काही कारण नसताना 'पुलं'च्या वाटेला गेले. म्हणाले, 'आज या गॅलरीत चित्र प्रदर्शन आहे. पण बोलवलेल्या पाहुण्यांपैकी एकजण नाटकातला....'पुलं' आणि दुसरे सिनेमातले... बासुदा. दोघांनी हातात 'प्रश्न' कधी धरलेला नसेल. 'त्या संयोजकाचं हे आगाऊ वाक्य संपताक्षणी, पुलंनी फक्त प्रेक्षकांकडे बघत दाढी करत असल्याचा अभिनय करत भाबड्या स्वरात म्हटलं 'रोज हातात ब्रश धरतो की हो !' 

गंमत साधताना कधी अकारण कुणाचा अवमान नाही. उगाच आक्रस्ताळी विधानं नाहीत. चारजण भोवती असावेत. गप्पामारा, सगळ्यांचा वेळ आनंदात जावा, ही भवना सतत. वेळ कसा गेला हे कळलंच नाही, असं साऱ्यांना वाटावं, ही अतंरीची इच्छा, अर्थात खूप 'अतंरी' शिरण्याइअतपत माझ 'वय' नव्हते. सुरुवातीला दुरुन ऎकत गेलो. माध्यमात काम करायला लागल्यानंतर मात्र बऱ्याच वेळा 'गप्पा' मारण्याचा योग आला. दोन-चार वेळा 'प्रवास' ही घडला. या सर्वच संवादात किंवा त्यांची पुस्तक वाचताना किंवा त्यांना चाळ, वरात, वटवट, सादर करताना पाहताना, मला पुन: पुन्हा त्यांचा 'शब्द खेळ' मोहित करायचा. थोडं त्यांच्या सान्निध्यात गेल्यावर जाणवलं की, उत्स्फूर्त शब्दफेकीमागेही शिस्तबद्ध आखणी आहे. 'तुम्हाला सांगतो' म्हणत, पाण्याचं भांडं तोंडाला लावतानाच, पाणी प्यायलानंतरचं वाक्य, हुकमी, हंशा-टाळीचं आहे, याची खात्री जशी पुलंना असे तसं आता दाद द्यायला सज्ज व्हावं, हे श्रोत्यांना समजुन येऊन, वाक्य येण्यापूर्वीच हास्याची लकेर श्रोतृवृदाच्या चेहऱ्यावर उमटे. डोळ्यावर चष्मा असुनही ,असूनही ते कधी साहित्य परिषदेतल्या अहवाल वाचनासारखं बोलले नाहीत. उलट त्या चष्म्याआडून रोखलेल्या खट्य़ाळ डोळ्यातून, आमच्याच अवतीभवती बघत, आमच्याच मनातल्यासारख्या इतरांच्या खोड्या शब्दातून काढत असत. 

एकदा वाटवे, ज्योत्स्नाताई, मालती पांडे, नावडीकर अशा साऱ्या गायकांचा आणि त्यांच्या भावगितांचा विषय निघाला, म्हणाले, "ती सगळीच गाणी विलक्षण होती. वाटव्यांच्या गणपतीतल्या मैफलीत, समोर सतरंजीवर बसलले श्रोते, वाटव्यांच्याबरोबर गाणी म्हणत. इतकी पाठ होती. मलाही आवडत. ते नावडिकरांच कुठलं...'रानात सांग कानात...' मस्त चाल. आवडायचं. एक शंका यायची मनात." 'काय? काय हो?' आमच्या उत्सुक नजरा आणि अधिरलेले कान. "मला वाटायचं, गाणं छान. पण एवढ्या मोठ्या रानात अगदी कानात कशाला सांगायला पाहिजे?" 'हे सुचण्यासाठी अंगभूत खट्याळपणाच हवा,' असं तेच एकदा सांगत होते. म्हणाले, मी, वसंता, (वसंतराव देशपांडे) शरद (तळवरकर) आम्ही एकत्र जमलो की वात्रपटपणाला उत असे. कदाचित या मुळातल्या वृत्तीमुळेच, भोवतीच्या विसंगतीवर बोट ठेवत, भंपकपणावर टिप्पणी करत, 'पुलं' आमच्या मनातलं बोलून जात. त्यांच्या निरीक्षण शक्तीला तर दादच द्यायला हवी. आपण पाह्यलेल्या, अनुभवलेल्या गोष्टीच ते भाषणात मांडत. पण ऐकताना आपल्या सगळ्यांनाच वाटे की, 'अरे हे आपल्या कसं लक्षात आलं नाही?" आणि म्हणूनच आपण सारे टाळ्यांच्या गजर करत असू. 

एक उदाहरण देतो. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराचा परिसर. पूर्वीच्या ओंकारेश्वर स्मशानभूमीपासून, जंगली महाराज रस्त्यावरच्या झाशीच्या राणीपर्यंत पसरलेला. याच आपल्याला माहीत असलेल्या परिसराबद्दल. गंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात 'पुलं' कसे बोलतात पाहा..."एखादी वास्तू कुठे उभी राहते याला फार महत्व आहे. गंमत बघा. इथं बाहेरच्या बाजूला पुरूषाच्या वेषातील स्त्री आहे. झाशीची राणी आतल्या बाजूला स्त्रीच्या वेषातला पुरूष आहे. बालगंधर्व. अर्धनारीनटेश्वराची दोन रुपं जिथं आहेत नटेश्वराचं मंदिर उभारलं जातय, ही आनंदाची बाब आहे. अलिकडे नटेश्वर आहे. पलीकडे ओंकारेश्वर आहे. मधून जीवनाची सरीता वाहतीय. तिच्यावर पूल आहे. माझी विनंती एवढीच आहे की पूल एकतर्फी असू द्या. ओंकारेश्वराकडून नटेश्वराकडे येणारा असू द्या." आता अशा शब्दामांडणीला आपण भरभरून दाद दिल्याशिवाय राहू का. उत्स्फूर्त शब्दांचे फुटाणे ते क्षणोक्षणी फोडत. 

एकदा नगरच्या दौऱ्यात काळे आर्किटेक्टकडे आम्ही जेवायला बसलो होतो. जेवणात मासे पाहिल्यावर पु.ल. खूष झाले. पण माशाचा आग्रह होऊ लागताक्षणी म्हणाले की, रात्री 'मर्ढेकर' प्रोग्रम आहे. ढेकर' नाही. मॉरिशसच्या एअरपोर्टवरून आम्ही सारे भारतात परतीला निघालो होतो. एअरपोर्टवर कस्टम ड्यूटी फ्री शॉपमध्ये एक पैशाचं सुंदर पाकीट त्यांना दिसलं. किंमत ऎकल्यावर म्हणाले, 'पाकिटाला एवढे पैसे दिल्यावर पाकिटात काय ठेवू?" याच मॉरीशसच्या परिषदेत मी माणिक वर्मांना जेव्हा विचारलं की, माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना, तुम्हाला तुमचं कुठलं भावगीत उपयोगी पडलं? तशी शेजारीच उभे असलेले 'पुलं' पटकन म्हणाले, 'अरे तिच्या वर्मावर का घाला घालतोस'? 

लिहीतानाही बोलण्याप्रमाणेच ते सहज असत. अकारण श्ब्दांची आतषबाजी नाही. लिहितानाही वृत्तीतला - मनातला 'परफॉर्मर' सतत जागा असे. नुसता त्यांचा 'आवाज -आवाज' लेख वाचला तरी वाचणाऱ्याला 'ऎकत' असल्याचा अनुभव यावा, अशी शब्दांची रचना. बर्वेला 'अंतू बर्वा' उच्चारून ते वाचकाला क्षणात कोकणात घेऊन जात. नारायणाच्या धावपळीतून अवघ मंगलकार्यच डोळ्यासमोर उभं करता करता, खरकट्या हातानं अर्धवट लाडू खाउन एकटाच पेंगुळलेला नारायण दाखवून पोटात खड्डा आणत हसवता हसवताही कारुण्याची झालर लिहीण्या-बोलण्यात सतत डोकावे त्यामुळे पुलं आणखीनच आपले वाटत. संभावीत प्रतीष्ठितांच्या भंपकपणाला आमच्याच शब्दातून टप्पू देत ते आमच्याच मनातला उद्वेग व्यक्त करत. उदा. 'मासा पाण्यात श्चास कसा घेतो हे जसं सांगता येत नाही, तसं सरकारी अधिकारी नेमका कुठे, कसा पैसा खातो ते सांगता येत नाही.' 

त्यांना रंगमचंचावर किंवा पडद्यावर पाहताना जाणवलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या पोशाखही तुमच्या आमच्यासारखा साधा असे. ढगाळ नेहरु शर्ट किंवा चौकडीचा बुशकोट. वरातीत पेटी वाजवायला बसले की रुमाल डोक्यावर बांधलेला. वाद्य अस्त्याव्यस्त पसरलेली, पेटीच्या सूरातून मात्र क्षणात गंधर्व काळात घेऊन जात. सामान्यांसारखा पोशाख, एखाद्या घटनेच्या अनुषंगानं सामान्यांच्या मनात उमटतील अशा उमटलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया, भंपक राजकरण्याच्या बाबतीत केलेली टोलेबाजी आणि हे सारं करताना मिष्किलपणा किंचितही न सोडलेला. त्यामुळे 'पुलं' मला तरी आर. के. लक्ष्मणानी चितारलेले लव्हेबल कॉमनमॅन्च वाटतात. हा कॉमनमॅन स्वत:च्या लेखणी-वाणीतून जमा केलेले कोटभर रुपये सामाजिक संस्थांना वाटून टाकतो. तेव्हा तर या मिष्किल परफॉर्मर बद्दलचा आदर अधिकच वाढतो. तमाशातला सोंगाड्या, खेडातलं भजनी मंडळ, रघुतमा रामा म्हणणारे किर्तनकार, ही सामान्यांशी संवाद साधणारी मंडळी पुलंच्या विशेष आवडीची होती. हे गप्पात कळल्यावर तर अधिकच बरं वाटतं. चाळीतले कुशाभाऊ सोकाजी नाना, एच. मंगेशराव काय, म्हैस' मधला सुबक ठेंगणीकडे बघणारा किंवा पंचनाम्याचा पोलीस काय, असंख्य नमुन्याची माणसं, 'पुलं' मधला परफॉर्मर जेव्हा नादातल्या वैविध्यासह, बसण्या-उठण्याच्या विशिष्ट पोश्वरसह सादर करतो, तेव्हा तेव्हा त्यांच्या लिखाणातल्या सूक्ष्म निरीक्षणाला दाद द्यावी की आवाजाचे बहुविध पोत दाखविणाऱ्या बहुरुप्याला दाद द्यावी की रंगमंचावरच्या त्यांच्या लवचिकपणाला द्यावी हे समजेनासं होतं आणि मग त्या साऱ्या अनौपचारिकतेला नमस्कार करण्यापलीकडे काय उरतं?

साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट अशा ललिर कलांच्या सर्व क्षेत्रात मुक्त संचार केलेल्या आणि या प्रत्येक प्रांतात आपली नाममुद्रा उमटवलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाशी एक-दोन वेळा प्रवासात प्रदिर्घ गप्पा मारण्याचा योग आला. जुन्या डायऱ्यात त्या नोंदी सापडल्या. त्या इथे नोंदवतो. ७ डिसेंबर १९९२ डेक्कनक्वीनचा प्रथम श्रेणीचा दबा. दंगलीचं रोद्र रुप सुरु होण्याची कल्पना गाडीत बसताना आम्हा कुणालाच नव्हती. मी नेहमीच्या सवयीनं गाडीत चक्कर टाकायला निघालो तर पुढच्याच बोगीत पुलं. स्वेटर घालून बसलेले. त्या संध्याकाळच्या प्रवासात ते शहरांवर बोलले, बडोद्याच्या टांगेवाल्याची एक गंमत त्यांनी सांगितली... "अरे मी शहरांवर लिहिणार होतो. 'बारागावचं पाणी' असं नाव पण डोक्यात होतं. पण ते नाव आमच्या वसंत बापटानं घेतलं आणि माझं लिहीणं राहून गेलं, कलकता मला नेहमी खुणावतं. आकृष्ट करतं 'बस्ती' हा शब्द झोपडपट्टीला तिकडनंच आला. बेळगाव आवडतं. बडोद्याला टांगे छान असत. सजवलेल्या गाद्या असायच्या . मी आणि भीमसेन पूर्वी बरोबर फार भटकायचो. ते गाणार. मी अध्यक्ष. इतकं की लोकांना वाटायचं की मी त्यांच्या गाण्याच्या मानधनातून काही घेतो की काय? तर बडोद्याला टांग्यातून जाताना आम्ही परस्पर ताना घेत होतो. तुला सांगू? गतीबरोबर गायकाला गाणं सुचतंच. मध्येच वळणावर ताना थांबल्या. तशी टांगेवला म्हणाला की, 'साब पुरीया धनाश्री पुरा करो. अच्छा चल रहा था, क्य़ूं ठहरे?' आम्हा दचकलोच. संगीतज्ञानाही चटकन ओळखू न येणारा 'राग' त्या टांगेवाल्यानं ओळखला होता. कोण कशात हुशार असेल सांगता येत नाही. सुराला जात धर्म, पंथ, पत, धंदा याचं मोजमापच नाही. आम्ही त्या टांगेवाल्याला विचारलं, "तुला कसं माहीत?" तो उत्तरला, "आपने फ़ैय्यज खॉं साबकी मेहफील सुनी होगी, मैने तो रियाझ सुना है...." 

कौतुक, आदर, प्रेम या भावना पुलंविषयी व्यक्त करण्यासाठी मराठीतली स्रव विशेषणं आजवर उपलब्ध आहेत ती यापूर्वी अनेकांनी व्यक्त केलीयेत. पुलंच्या पहिल्या पुण्यतीथीच्या वेळी(१२ जून २००१) दिलीप माजगावकरांनी मला शेक्सपियरचं एक वाक्य, त्यानं ते वेगळ्या संदर्भात वापरलेलं त्याची ओळ निवेदनासाठी दिली... ऍंड द एलिमेंटस सो मिक्सड एन हीम. दॅट नेचर माईट स्टॅंड अप ऍंड से टू द वर्ल्ड, दॅट धिज अ मॅन. 'पु.लं'बाबत असंच म्हणता येईल की.. संस्कृतीच्या सर्व घटकांच मिश्रण, ज्यांच्यात एकवटलेलं आहे, असे हे पुरुषोत्तम! या परफॉर्मर पुरुषोत्तमास एका छोट्या परफॉर्मरचा प्रणाम. 

सुधीर गाडगीळ 
(लोकसत्ता)

1 प्रतिक्रिया:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

सर्व पु. ल. प्रेमी त्यांचा ’पु. लं.’ असा उल्लेख करणे कधी थांबवणार? त्यांचे नाव ’पुरुषोत्त्म लंबोदर देशपांडे’ होते कीं काय असे मला वाटू लागले आहे! पुलंबद्दल, पुलंचे असे एका शब्दात लिहिताना उचित असलेला आदरार्थी अनुस्वार ’पु. लं.’ असे अवतरणात लिहिताना अनुचित आहे. पुलंनी स्वत: त्यावर अगणित विनोद केले असते!