Wednesday, November 11, 2020

पुलंवर आपलं इतकं प्रेम का?

पु.लंची आठवण काढायला काही खास दिवस यायची गरज नसते. ती रोज कुठल्यातरी प्रसंगात येतच राहाते. पण आज ८ नोव्हेंबर, पुलंची १०१ वी जयंती. त्या निमित्ताने त्यांच्याबद्दल लिहिण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही.

“महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व” ही ओळ जर माझ्या लेखात आली नाही तर कदाचित तुम्हाला पटणारच नाही की हा लेख पु.लंवर आहे. हे वाक्य फक्त पु.लं साठी राखीव आहे. त्यांच्यानंतर महाराष्ट्रात एकही इतकं लाडकं व्यक्तिमत्व झालेलं नाही आणि होणारही नाही.
पु.लंची ओळख झाली ती शाळेत असताना, ती सुद्धा कॅसेटच्या स्वरूपात “आसा मी असामी” ऐकताना. ८ वी -९ वीत असताना शाळेतल्या काही मैत्रिणींबरोबर क्राफ्टचा एक प्रोजेक्ट करताना ही कॅसेट पहिल्यांदा ऐकली. आता लगेच पु.लंची ओळख ८ वी-९ वीत झाली?? असा प्रश्न विचारु नका. मी इंग्लिश मिडियममध्ये एज्युकेशन टेक केलं आहे. त्यामुळे आमची अवस्था साधारण गुप्तेकाकांच्या निमासारखी!! त्यामुळे ‘डॅडी जर्मनीला फ्लाय करून गेले, दोन किंवा तीन मंथ्सनी येणार आहेत’ ही वाक्य आम्हाला नवीन नव्हती. ‘असा मी आसामी’ पुस्तकाच्या रूपात हातात यायला डिग्री उजाडावी लागली. त्यानंतर आजपर्यंत त्याची इतकी पारायणं झाली आहेत की त्याच्या ऐवजी दासबोध किंवा विष्णुसहसत्रनाम वाचलं असतं तर समर्थ किंवा विष्णू प्रसन्न झाले असते. ते प्रसन्न होवो किंवा न होवो आम्ही मात्र प्रसन्न झालो ते पु.लं मुळे.

कुठे कुठे पु.ल आठवतात म्हणून सांगू..

मुलं निरागसपणे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्या निरागसतेचं कौतुक करायचं नंतर सुचतं, आधी ‘शंकर आपल्या निरागसता का काय म्हणतात त्याने काळजाला कधी हात घालेल सांगता येत नाही’ हे तरी आठवतं किंवा ‘हल्लीची पिढी बरीच चौकस आहे बरं का गणपुले!!’ म्हणणारे आणि महाराष्ट्रात बावीस वडगावं आहेत ही माहिती असणारे पार्ल्याचे आजोबा आठवतात. व्होटिंगच्या काळात ऑफिसमध्ये शिरताना आमचा ऑफिसबॉय विचारायचा ‘मॅडम मत दिलं का? किंवा ‘मॅडम तुमच्याकडे कोण येणार’, ‘नमो”च येणार’. त्याला उत्तर द्यायच्या आधी ‘अणुयुद्ध टाळण्याचा एकमेव मार्ग ठाऊक असलेला बेनसन जानसनमधला दत्तोबा कदम आठवतो. फॅमिली डॉक्टर म्हंटलं की कुशाभाऊंचे ‘फॅमिली ऑफ माय डॉक्टर’ दिसतात. ऑफिसमध्ये ऑफिसच्या प्रिंटरवर जेव्हा लोक आपल्या प्रवासाच्या तिकीटांची किंवा वैयक्तिक प्रिंटआऊट काढताना दिसायचे तेव्हा माझा धोंडो भिकाजी व्हायचा; कारकुनी इमान जळायला लागायचं. भाजी आणायला गेल्यावर चवळीची जुडी आणि सुरणाची टोपली दिसली की अप्पा भिंगार्डे आणि गुरुदेवांच्या दर्शनाला आलेल्या पारशिणीची आठवण येते. कोणी लंडनला निघालं की आपोआप ‘तेवढा कोहिनूर हिरा बघून या हो’ म्हणणारे अंतु बर्वा आठवतात. कॉलेजच्या रस्त्यावरून जाताना ‘शिजन’ कसा आहे हे बघायला आलेला एखादा नाथा कामत शोधावासा वाटतो.

पु.लंची व्यक्तिचित्र अंगात किती भिनलेली आहेत ह्याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा आला. मी सकाळी नवऱ्याशी पेस्ट कंट्रोल करायला हवा, फ्रीजचं सर्विसिंग करून घ्यायला हवं अश्या काही प्रापंचिक विवंचनांवर चर्चा करत होते. तितक्यात धाकटे चिरंजीव, वय वर्ष १०, झोपेतून उठून आले. माझ्या बाजूला बसून त्याने चिंताग्रस्त चेहरा केला आणि म्हणाला ‘आई, आज एक मोठ्ठा प्रॉब्लेम होऊ शकतो’ मला वाटलं बहुतेक काही तरी सबमीट किंवा कंप्लीट करायचं राहिलं शाळेचं. मी विचारलं ‘काय?’ तो म्हणाला ‘आज रात्री जर RCBहरली तर Mumbai Indians पॉईंट्स टेबलमध्ये वर जाईल’ मी दोन मिनिटं त्याच्याकडे पाहिलं आणि मग मला हसूच फुटलं. मी हळूच त्याच्या केसांतून हात फिरवला आणि म्हंटलं ‘बाबा रे, तुझं जग निराळं आणि माझं जग निराळं!!’

एकदा गणपतीच्या कार्यक्रमानिमित्त आमच्या सोसायटीने एका स्पर्धेत भाग घेतला होता. दोन नृत्यांच्यामधे सूत्रसंचालन करणारी मुलगी प्रेक्षकांना काही प्रश्न विचारत होती. त्यात तिने एक प्रश्न विचारला ‘जशी हिंदूंची “गीता”, मुसलमान बांधवांचं “कुराण” तसं पारसी बांधवांचं काय?’ पूर्ण ऑडिटोरियम शांत झालं आणि मी जोरात ओरडले “झेंद अवेस्था”. माझ्या मागच्या पुढच्या रांगेतले सगळे माझ्याकडे कौतुकाने बघत होते. साधारणपणे यूपीएससी किंवा एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांनाच ह्या प्रश्नाचं उतर माहित असू शकतं. मला ते उत्तर माहीत होतं ह्यामागे माझा अभ्यास किंवा सामान्य ज्ञान वगैरे काहीही नव्हतं. ती केवळ आणि केवळ “थ्रीटी नारीएलवाला”ची कृपा होती दुसरं काही ही नाही.

बटाट्याच्या चाळीत आणि आमच्या बिल्डिंगमध्ये नाही म्हणायला एक साम्य आहे; आमच्याही बिल्डिंगच्या गच्चीला कुलूप असतं!! आचार्यांना ‘तू काय धंदा करतो रे बोर्वे?’ विचारणारा बटाट्याच्या चाळीतला फर्टाडो हा खरंतर एक आदर्श माणूस आहे असं मला नेहमी वाटतं. ‘वर्क इज वर्शिप’ हा त्याचा जगण्याचा कानमंत्र आहे. तो संडेला चर्चला जाऊन टाईम वेस्ट करत नाही. त्या वेळेचा उपयोग तो गळे आणि खिसे कापण्यासाठी करतो. वादावादी करायला ही त्याला फुरसत नसते ‘मी टेरेस वगैरे काय वरी करत नाय, उगीच झगडी कशाला करता रे? तू तुझा धंदा कर मी माझा धंदा करतो’ असं म्हणत तो आपलं काम इमानदारीत करा हे सांगून जातो.

महाराष्ट्रात अनेक मोठे लेखक लेखिका होऊन गेल्या, मग पुलंवर आपलं इतकं प्रेम का? ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पुलंनी मध्यमवर्गीयांना, सामान्य माणसांना त्यांच्या सामान्य असण्यात एक असमान्य धाडस आहे हे जाणवून दिलं. त्यांनी बदलावं असा नियमही घातला नाही आणि बदलावं लागलंच तर त्यात काही चूक आहे असा निष्कर्षही काढला नाही. शाळेत प्रत्येक स्पर्धेत आपण भाग घेत नव्हतो. काही स्पर्धांमध्ये घेतला तर काहींमध्ये फक्त प्रेक्षक होऊन त्यांचा आस्वाद घेतला किंवा मागे बसून टवाळक्या आणि भाग घेणाऱ्यांवर टीका केल्या. त्यात ही वेगळाच आनंद होता हे त्या वयातही कळलं होतं पण पुढे जाऊन त्याचा विसर पडला आणि प्रत्येकच स्पर्धेत धावत राहिलो. आजच्या स्पर्धात्मक युगात आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन जाणवतं की प्रत्येक स्पर्धेत आपण भाग घेतलाच पाहिजे असं नाही किंवा भाग घेतलाच तर त्यात पहिल्या काही क्रमांकांमद्धे आपला नंबर यायलाच पाहिजे असं ही नाही कारण धोंडो भिकाजी जोशी सांगून गेले आहेत...
‘कुणीही मान मोडून काम न करता आमची बेनसन जानसन कंपनी कशी टिकली हे एक कोडं आहे. म्हणूनच हे जग टिकायला कुणीही खास काही करण्याची आवश्यकता आहे असा मला वाटत नाही. ह्या जगात येताना जसा गुपचुप आलो तसा जातानादेखील आपल्या हातून त्या जगाला फारसा धक्का न लावता निघून जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक आसामी आहे’

©गौरी नवरे
८ नोव्हेंबर २०२०

Tuesday, November 10, 2020

पुलंचा विनोद : आता होणे नाही?

पु. ल. देशपांडे उर्फ पुलं : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असं कुठल्याही मराठी माणसानं अभिमानानं सांगावं असा लेखक व गुणग्राही कलावंत!   भाईंना जाऊन आतापावेतो दोन दशके झाली असली तरी त्यांच्या लिखाणातून ते घराघरात सामावलेले आहेत. गतवर्षी  त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली.  त्यांच्या नाटकांचे, व्यक्ती-वल्लींचे आणि इतर लिखाणाचे अनेक कार्यक्रम जगभर झाले.  खऱ्या अर्थाने 'झाले बहु होतील बहु पर या सम हा' असं हे बहुविध आणि बहुपेडी व्यक्तिमत्व होतं.  पुलंसारखं असं नानाविध क्षेत्रात लीलया वावरणारं आणि आनंदाची लयलूट करणारं व्यक्तिमत्व परत होणं अशक्य आहे. पण त्यांच्या विनोदाचं काय? त्यांच्या पूर्वीही अनेक विनोदी लेखक होऊन गेले आणि पुलंच्या पश्चातही अनेकजण चांगलं विनोदी लिखाण करत आहेत.  पण मला वाटत पुलंच्या विनोदाची सर कुठल्याच लेखनाला आलेली नाही, किंबहुना ती येणं शक्य नाही.  म्हणूनच पुलंसारखाच  त्यांचा विनोदही एकमेकाद्वितीय आहे.


इतकी वर्ष झाली तरी पुलंचा विनोद आपल्याला अजूनही हसवतो, रिझवतो, हसता हसता डोळ्यात पाणी आणतो!  त्यांनी लिहिलेली पात्र खरीखुरी, जिवंत वाटतात.  पुराव्याने शाबित करिन म्हणणाऱ्या हरितात्यांचा भास कुणाच्यात होतो, कुणाच्या तरी छापील वागण्यातून / बोलण्यातून एखादा सखाराम गटणे डोकावतो.  “समस्त रत्नाग्रीच्या गाई तूर्तास गाभण का रे झम्प्या?” असं म्हणत टोमणे मारणारा पण फणसासारखा आतून गोड असणारा कोकणातला अंतु बरवा सारखा कोणी भेटतो आणि पुलंनी वापरलेली प्रतीकं, उपमा किती चपखल आहेत हे पदोपदी जाणवत राहत.  त्यांच्या प्रत्येक विनोदाला एक करूण, हळवी किनार आहे.  ती डोळ्याचे काठ नक्की ओले करते,  ह्रदयात एक प्रकारची "फील गुड" भावना निर्माण करते.  कदाचित यामुळंच पुलंचा विनोद अजूनही हवाहवासा वाटतो. 


त्यांच्या विनोदाची शैली मिश्किल आहे, कुणालाही न दुखावणारी आहे. तो विनोद खऱ्या अर्थाने निर्मळ आहे. पुलंनी कधीच कुणाला दुखावणारा किंवा कमरेखालचा विनोद केला नाही - त्याची त्यांना गरजच पडली नाही. सहकुटुंब सहपरिवार दिलखुलास हसता येईल आणि हसता हसता अंतर्मुख करून जाईल असा विनोद हे त्यांचं वैशिष्ट्य. अर्थात त्यांच्या विषयाला काही मर्यादा आल्या हे निश्चित.  काही झालं तरी तो मध्यमवर्गीय, पांढरपेशा समाजाशी निगडीत राहिला. त्यांनी पाहिलेलं, जगलेलं चाळीतले आयुष्य, आणि काळाच्या ओघात झालेले बदल न रुचल्यानं एक प्रकारचं स्मरणरंजन करणारा झाला. त्यामुळं पुलंच्या विनोदावर/लिखाणावर तो स्मरणरंजनात रमणारा विनोद आहे असा एक आरोप होतो.  काही प्रमाणात तो खरा असेलही.  पण मला वाटतं तो फक्त तेवढ्यापुरता सीमित राहिलेला नाही. त्यांच्या विनोदाची वीण ही पक्की आहे. कधीकधी विनोद सांगताना त्यातून अचानक एखाद वैश्विक सत्य अलगदपणे सामोरं येतं.  उदा. शेवटी काय घड्याळाचे पट्टे नी तबकड्या बदलतात.. सुखाने टळलेली दुपार पहायला तबकडी आणि पट्ट्या कुठल्या का असेना” किंवा “शेवटी तुम्ही आम्ही काय, पत्रातल्या पत्त्याचे धनी.. मजकूराचा मालक मात्र निराळाच असतो!!”


तो विनोद पूर्णपणे कालसापेक्ष नाही, स्थळसापेक्ष नाही हे खरंय.  आता चाळी नामशेष झाल्या, ओनरशिपचे ब्लॉक्स आले, माणसामाणसातला आपुलकीचा ओलावा काही प्रमाणात कमी झाला, जीवन अधिक वेगवान झाले.  त्यामुळे असो किंवा विनोदाचे काही संदर्भ जुने झाल्यानं (उदा. लुगडी नेसून शाळेत जाणारी गोदाक्का आता नाही!) असो, पुलंचे काही विनोद आता फारसे समजत वा रुचत नाहीत. असं जरी असलं तरी त्या विनोदाचा दर्जा मात्र नक्कीच उच्च प्रतीचा आहे आणि तो मात्र अजिबात बदललेला नाही.  या उलट आजकाल करमणुकीच्या क्षेत्रात पाहिलं तर विनोदाचा दर्जा फारच ढासळलेला दिसतो. अनेकदा ज्याला 'स्लॅपस्टिक कॉमेडी' म्हणतात तिकडेच तो झुकताना आढळतो. त्या पार्श्वभूमीवर पुल लिखित 'ती फुलराणी', 'असा मी असामी' ह्यातील विनोद अजूनही ताजातवाना वाटतो.  "तुम्हाला पुणेकर, मुंबईकर का नागपूरकर व्हायचंय?" हा लेख असो किंवा पुलंचं 'माझा शत्रुपक्ष' असो हे विनोद कधीच जुना झालाय असं वाटत नाही. त्यांनी सूक्ष्म निरीक्षणशक्तीतून निवडलेली माणसांची वैशिष्ट्य अजूनही काही बाबतीत तंतोतंत खरी असल्याचं जाणवतं! त्यांचं पौष्टिक खाद्यजीवन वाचताना अजूनही जिभेला पाणी सुटत नाही असा रसिक न सापडणं विरळच !  एवढंच कशाला, आता परदेश प्रवासाची नवलाई कमी झाली असली तरीही त्यांची अपूर्वाई/पूर्वरंग वाचताना विनोदाची झालर लोभस आणि सुखदायी वाटते.


शाब्दिक कोट्यात तर पुलंचा हात धरणारा कोणी नाही! त्यांच्या अनेक कोट्या अजूनही वापरल्या जातात!  अगदी पुलंची सुनीताबाईंना उद्देशून केलेली "मी देशपांडे व ही उपदेशपांडे" ही कोटी असो वा उपहासाने म्हणलेले "आपल्या मदरटँग मध्ये आपले थॉट्स जेवढे क्लिअरली एक्सप्रेस करता येतात ना तेवढे दुसऱ्या भाषेत येत नाहीत" वाक्य असो, आपल्याला हमखास हसवतेच!  उगाच नाही  त्यांना कोट्याधीश पुलं म्हणत ! 


त्यांच्या पूर्वीच्या लेखकांच्या  लेखनात ज्यांच्यावर विनोद व्हायचा/केला जायचा त्यांना कुठंतरी शालजोडीतले मारता मारता त्यांची कुठंतरी खलनायक/खलनायिका अशी प्रतिमा तयार होत असे, पण पुलंच्या विनोदाचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे त्या विनोदात खलनायकच नाही. त्यामुळे त्यांचा विनोद अजिबात बुळबुळीत होत नाही.  उलट तो कितीही टोकदार झाला तरीही तो दुखावत नाही. साध्या शब्दातून हसवत, कोटी करत, उणिवांकडे बोट दाखवत आपल्याही नकळत, हळूच डोळ्यातून पाणी काढण्याचं कसब फक्त पुलंच्याच विनोदात आहे.


दुःखी असताना पु.ल. वाचले तर त्या दुःखाची तीव्रता कमी होते आणि आनंदात वाचले तर तो आनंद दुप्पट होतो असा माझाच अनुभव आहे. आणखी किती लेखकांच्या लेखनाबद्दल असं खात्रीनं म्हणता येईल?  पुलंची भाषा अलंकारिक नाही पण त्यांचा विनोद कळायला, त्याचा आस्वाद घ्यायला मराठी भाषेची बलस्थान माहिती हवीत हे मात्र नक्की. पुलांसारखा विनोद परत होणार नाही असं जेंव्हा मी म्हणतो त्यामागे हे पण एक कारण आहे. मराठी भाषा झपाट्याने बदलत चालली आहे. भाषेविषयी आपुलकी, आत्मीयता हळूहळू कमी होते आहे. साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यापेक्षा चित्रपटातील झगमगीकडे समाजाचे, विशेषतः युवापिढीचे लक्ष आहे. त्या आकर्षणापोटी चांगल्या, दर्जेदार विनोदी साहित्याच्या निर्मितीची गती कमी झाली आहे. या पूर्वी म्हटल्याप्रमाणे ते वेगळे दृश्य माध्यम असल्याने तेथील विनोदही शारीरिक व प्रासंगिकतेकडे झुकणारे आहेत. असले विनोद काही वेळा क्षणभर हसवतातही,  पण पुलंच्या कुठल्याच विनोदासारखे लक्षात राहात नाहीत असा माझा अनुभव आहे. म्हणूनच तसा विनोद परत होणार नाही असं मला वाटतं.  


मंगेश पाडगांवकरांनी पुलंबद्दल लिहिलंय ते परत एकदा उद्धृत करावंसं वाटतं : 


पुलस्पर्श होताच दुःखे पळाली,

नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,

निराशेतून माणसे मुक्त झाली,

जगू लागली, हास्यगंगेत न्हाली


अशी आनंदयात्रा, हास्यगंगा तयार करणारा, निराशेतून बाहेर काढणारा  विनोद परत होणार नाही असं म्हणणं खरं तर एका अर्थानं त्यांच्या लिखाणाचं, विनोदाचं कौतुक करणारं, अभिमानास्पद  आहे आणि त्याच वेळी असे दर्जेदार विनोदी लिखाण करणारे आणखी मराठी लेखक अजून मिळाले हे शल्य असणारही आहे. पण ज्यांच्या नावातच दुसऱ्याला "पुलकित" करण्याचं सामर्थ्य आहे असे लेखक नेहमी जन्माला येतात थोडेच?


~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

लेखक:    सागर साबडे
“मला काय वाटतं....” लेखन स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त लेख.

पुलकित आठवणींचे आजोळ

महाराष्ट्राचे लाडके दैवत, पु. ल. देशपांडे.. उत्तम, दर्जेदार विनोदाचे संस्कार ज्यांनी उभ्या महाराष्ट्रावर केले, उत्कृष्ठ वक्ते, ललितलेखन, प्रवास वर्णन ह्या द्वारे मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे, जाणकार संगीतकार, नाटककार, चित्रपट क्षेत्रात ही ज्यांनी आपला ठसा उमटवला असे हरहुन्नरी कलाकार, असे अनेक पैलू असलेले बहुरंगी बहुढंगी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या प्रतिभेचे वर्णन करण्याइतकी प्रतिभा आणि शब्द ह्या दोहोंची माझ्याकडे कमतरता आहे... पुल असे अवलिया आहेत की त्यांच्या हयातीत माणसं त्यांच्याकडे आपोआप आकर्षित व्ह्यायचीच आणि त्यांच्या सहवासाने प्रसन्न चित्त. तसचं आता ही त्यांच्या साहित्य रुपी ठेव्याने ते अजरामर आहेत... त्यांच्या साहित्यातील काहीही वाचायला घ्या... तुमचं मन आनंदी, प्रसन्न झालच पाहिजे...
(पुलंच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे , मी रेखाटलेले हे रेखाचित्र)

पुलं ना मी प्रत्यक्ष पाहिले नव्हते.. पण माझे आजोबा,आजी,आई, मावश्या ह्यांनी पाहिलं होते... पार्ल्यातील , अजमल रोड वरील पुलंचे त्र्यंबक सदन हे घर आणि माझे आजोळ जवळ जवळ. पुलंचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ आणि माझ्या आजोबांचा श्री. पु. करकरे ह्यांचा जन्म २० मे १९२०... पुलंची आई आणि माझ्या आजोबांची आई म्हणजे माझी पणजी (इंदिरा करकरे) ह्या छान मैत्रिणी... दोन्ही कुटुंबात जिव्हाळ्याचे संबंध, त्यामुळे माझ्या आजोबांच्या तसचं माझ्या आईच्या तोंडून ही पुलंच्या अनेक आठवणी मी ऐकल्या आहेत... पुलं पार्ल्यात कायम वास्तव्याला नसले तरीही ते , सुनीता बाई अधून मधून पार्ल्यात यायचे.. माझी आई, मावश्या लहान असताना त्यांच्या घरी कधीतरी जात...आई सांगते, तिच्या लहानपणी टेप रेकॉर्डर नवीन होता, पुलंच्या घरी तो होता, मग पुलं, सुनीता बाई, कधीतरी, तिला, माझ्या मावश्या, तसचं इतर आजूबाजूच्या लहान मुलांना त्यांच्या घरी बोलावून त्यांच्या आवाजात गाणी, गोष्टी रेकॉर्ड करून घेत, आपलाच आवाज टेप रेकॉर्डर वर ऐकताना ह्या सर्व लहान मुलांना भारी मौज वाटे...१९६१/६२, साली जेव्हा, पुलं, गदिमा, वसंत कानिटकर, वसंत सबनीस यां सारखी दिग्गज मंडळी सैनिकांचे मनोरंजन करणाऱ्या कार्यक्रमासाठी लडाख ला निघाली तेव्हा त्यांना विमानतळावर निरोप द्यायला पुलंच्या घरच्या मंडळींबरोबर माझी आई, मावश्या हि गेल्या होत्या.

ह्या आणि अशा अनेक छोट्या मोठ्या आठवणीत माझ्या आजोबांनी आम्हाला सांगितलेली एक पुलंची हृद्य आठवण माझ्या मनाला भावते.

१९६० साली माझी पणजी, आजारी होती, तिचे हे शेवटचे दिवस हे तिने जाणले होते, तेव्हा पुलं आले की त्यांना मला भेटायचंय अशी इच्छा तिने पुलंच्या आईपाशी व्यक्त केली होती, पुलं त्या दरम्यान जेव्हा पार्ल्याला आले तेव्हा आवर्जून माझ्या आजोबांच्या घरी पणजी ला भेटायला आले... पणजी ला त्यांना बघून खूप बरं वाटलं आणि तिने त्यांना छोटीशी भेट म्हणून रुमाल दिले.. पुढे काही दिवसांनी माझ्या पणजीचे निधन झाले... ही बातमी जेव्हा पुलं ना समजली तेव्हा पुलंनी माझ्या आजोबांना एक सांत्वन पर पत्र लिहिलं, त्यात पुलं म्हणतात,"मावशींच्या निधनाची बातमी ऐकून फार वाईट वाटलं , तुझी आई अन् माझी आई अतिशय चांगल्या मैत्रिणी, त्यांनी जणू स्वतःचे मरण आधीच जाणले होते... मी त्यांना भेटायला आलो होतो तेव्हा त्यांनी मला रुमाल भेट दिले, जणू भविष्यात घडणाऱ्या ह्या दुःखद प्रसंगाने डोळ्यात येणारे अश्रू पुसायलाच म्हणून हे रुमाल दिले.." पुलंचे हे भावपूर्ण पत्र माझ्या आजोबांनी जपून ठेवलं होतं.. मी ही माझ्या लहानपणी ते पाहिलं होतं.

पुलंना प्रत्यक्ष पहायचं भाग्य मला लाभलं नसलं तरी पुलं चे ,गोल जिना असलेले जुने घर, मला आठवतंय. उंच, शिडशिडीत बांध्याच्या पुलंच्या आई,(ज्यांना मीराच्या आई असं संबोधलं जायचं) पुलंसारखे दिसणारे त्यांचे भाऊ उमाकांत आणि धाकटे बंधू अन् अभिनेते रमाकांत देशपांडे ह्यांना मी पाहिले आहे. आता माझं आजोळ तिथे नाही तसचं पुलंचे ते जुनं घर ही नाही (त्र्यंबक सदन आहे पण नव्या इमारती स्वरूपात), पण त्या भागात गेले की अजूनही नॉस्टॅल्जिक वाटतं... पुलंच्या ह्या प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष आठवणीने मन पुलकित होते आणि पुलं आणखी जवळचे वाटतात.


डॉ स्वाती भाटवडेकर
८/११/२०२०