Tuesday, May 11, 2021

एक जिप्सी - (मानसी पटवर्धन)

८ नोव्हेंबर १९१९...गावदेवी पुलाखालील "कृपाळ हेमराज" चाळीत दुपारी २.४० मिनिटांनी एक बालक "गुपचुप "जन्मले..वार होता न कर्त्याचा वार "शनिवार" आणि महिना होता "कार्तिक"..अगदी भर दुपारी,उकाड्यात, सूर्यदेव मध्यान्ही तळपत असता या बालकाचा जन्म झाला..पण जन्मानंतर तो लडिवाळ "ट्येsssहेsss "ऐकू आलाच नाही.सगळी मंडळी चिंतेत बुडाली.शेवटी सुईणीने सुई तापवून बाळाच्या हातावर व कपाळावर टेकविली... आणि ते नवजात बालक रडू लागले,त्याचा तो पहिला "ट्ये sssहेsss"ऐकून माता गहिवरली, हसू लागली , सारे घरदार,नव्हे "हेमराज चाळ" हसू लागली...जन्मत:च जणू "हास्याचे भांडवल" घेऊन या बालकाची रवानगी ब्रह्मदेवाने इहलोकी केली असावी..भर दुपारी जन्मल्याने ते आपल्या अंगच्या तेजाने तळपणार होते आणि साऱ्या जगाला त्या अद्भुत तेजाच्या वलयाने दिपवून टाकणार होते...हे बालक म्हणजेच आपले सगळ्यांचे लाडके "पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे".. ..साहित्यिकांचे लाडके "पी एल" आपले "भाई"...!!!

वसंत सबनीसांनी पु लं ना विचारले,"भाई ,पी देशपांडे किंवा डी पुरुषोत्तम असं एखादं नाव का नाही घेतलंत?..."अरे "पी देशपांडे" हे एखाद्या "टेलर" सारखे वाटते तर "डी पुरुषोत्तम "गुंटकल स्टेशनात काम केल्यासारखे "..म्हणून "पुरुषोत्तम" हे वाढत्या अंगाला फिट्ट बसणारे नाव मला देण्यात आले.

जणू लोकांच्या जीवनात भरभरून आनंद निर्माण करण्यासाठीच त्यांचे पृथ्वीतलावर आगमन झाले असावे...पु ल म्हणतात ,"मी लोकांना काय दिले याचा मी हिशोब कधीच ठेवला नाही,पण त्यांनी मात्र त्यांची एक बहुमोल गोष्ट मला दिली...."हास्य "..."!!लहानपणापासूनच माझ्या मनी मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील "एक जिप्सी" दडून बसला होता."एक विदूषक","एक गायक" ,"एक लेखक" माझ्या मनी नित्य वस्तीला असत.."तू माझा सांगाती" या न्यायाने कोणी जन्माची साथ दिली असेल तर ती "रवींद्रनाथ टागोर" आणि "चार्ली चॅपलीन" यांनी...!!!तेच माझे "प्रेरणास्थान" बनले आणि हजारो व्यक्तिरेखा जन्मल्या...!!!"गुळाचा गणपती" या "सब कुछ पु ल" असलेल्या चित्रपटातील "नाऱ्याच्या" भूमिकेतून पदोपदी "चॅपलीन" डोकावतो..!!"पुढचं पाऊल" मधील ढोलकी वादक "कृष्णा महार"त्यांनी हुबेहूब साकारलाय .."जोहार मायबाप जोहार" मधील त्यांनी साकारलेली "चोखामेळ्याची" भूमिका हृदयस्पर्शी अशीच होती. "अमृतसिद्धी गौरव ग्रंथात" म्हटले आहे की त्यांचे "जावे त्यांच्या देशा" वाचून "कवी बोरकर" हेलावले...त्यातील "निळाईची गुहा" हा लेख तर त्यांना एखाद्या महाकाव्याचा "कळसाध्याय" वाटला .त्यांचा "बालगंधर्व" विशेषांकातील "जोहार मायबाप जोहार" हा व्यक्तिचित्राचा वस्तुपाठ होय..याचा "मलाव्य" म्हणून उल्लेख करता येईल.."मलाव्य"(महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व) या शब्दात व्यक्त होणारा अर्थ पुढीलप्रमाणे...

श्रवणं कीर्तनम् च विष्णो:स्मरणं पादसेवनं
अर्चनं, वंदनं, दास्यम् सख्यम् आत्मनिवेदनं

१९४४ मध्ये "भट्या नागपूरकर" हे पहिले व्यक्तिचित्र "अभिरुची" या मासिकासाठी पु लं नी लिहिले...साहित्यिकाच्या यशाचे मर्म त्याच्या सूक्ष्म अवलोकनात ,निरीक्षण शक्तीत आहे... पाच ज्ञानेंद्रिय जणू नित्य टिपकागदाचे कार्य करत असतात...सहवासात येणारी माणसे ,ठिकाणे यांचे सूक्ष्म अवलोकन करता करता त्यांचा मनावर उमटलेला ठसा शब्दरूप धारण करतो आणि जन्म होतो हरितात्यांचा,पेस्तनजींचा,नारायणाचा,अंतू बरव्याचा..पु लं ना भेटलेले "आबा चांदोरकर" इतिहासप्रेमी होते त्यांच्यात त्यांना "हरितात्या" भेटले..कोकणात गेले असता तिथल्या लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण हेल काढत केलेले संभाषण,कोकणी संस्कृती त्यांनी टिपली आणि "अंतू बरव्याचा" जन्म झाला..पु लं ना विचारणा होई की आपल्या साहित्यात कथांचे प्रमाण कमी का?..."अहो व्यक्तिचित्रण म्हणजे कथाच नाही का त्या व्यक्तिमत्वाची?"...पु लं चे उत्तर असे...त्यांना भेटलेल्या अनेक व्यक्ती ,ज्याचा ठसा त्यांच्या मनी उमटला त्या व्यक्तिरेखा अमर झाल्या...त्यांचे शब्दप्रभुत्व इतके चपखल असे की ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर त्या चित्रदर्शी वर्णनातून उभी राही,नव्हे आपल्याला त्यांची ओढ लागत असे...त्यांच्या प्रभावी शब्दकळेने "पेस्तनजी","हरितात्या","नारायण","चितळे मास्तर"आपल्याला आपले "सुहृद" वाटू लागले...!

केसरबाई, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, यासारख्या गायिका, म. वि. राजाध्यक्ष, कर्णिक, गोखले, इत्यादि साहित्यिक मित्र,ऋग्वेदी, अप्पा, यासारख्या आप्तस्वकीयांबरोबरच गजा खोत, नामू परीट यासारख्या व्यक्तींचेही व्यक्तिचित्रण त्यांनी रेखाटले. अर्थातच या व्यक्तीचित्रणातील व्यक्ती त्यांना कोठे ना कोठे तरी भेटलेल्या आहेत. त्या व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात प्रेम, आदर, आपुलकी आहे.मुख्य म्हणजे त्या व्यक्तीच्या असामान्य कर्तृत्वाचा ठसा त्यांच्या मनी उमटला आहे."भास्करबुवा बखले","राम गणेश गडकरी" यासारख्या व्यक्ती त्यांच्या कलेतून,देखण्या पैलूंतून ,असामान्य गुणांमुळे त्यांच्यासाठी जिवंत आहेत.त्यांच्यामुळे मिळालेला आनंद त्यांनी शब्दरूप देऊन गौरविला आहे."बाबा आमटे -एक विज्ञानयोगी","एक गाण्यात राहणारा माणूस"(मल्लिकार्जुन मन्सूर),"आनंदयात्री बाकीबाब"(ब.भ.बोरकर),"मुली ,औक्षवंत हो"(लता मंगेशकर),"पंडित वसंतखा देशपांडे","मंगल दिन आज"(पंडित कुमार गंधर्व)हे त्यांचे "गुण गायन आवडी" मधील लेख म्हणजे "कृतार्थ भावनेने गुणवंतांचे केलेले स्मरण "होय.

पारल्याच्या टिळक मंदिरात अनेक नामवंत वक्त्यांची भाषणे होत असत.काही कार्यक्रम असला की तिथली घंटा त्याची पूर्वसूचना देई.इथेच पुलंनी सरोजिनी नायडू,विनायक दामोदर सावरकर,सुभाषचंद्र बोस ,आचार्य अत्रे यांनी भाषणे ऐकली.अत्र्यांच्या भाषणाचा त्यांच्या मनी खोलवर परिणाम झाला.भाषण करत असता प्रत्येक श्रोत्याला वक्ता आपल्याशी संवाद साधत आहे असे वाटले पाहिजे हे अत्र्यांच्या भाषणातून त्यांच्या मनी रुजले .

लेखन,साहित्य,संगीत,एकांकिका,नाटक,चित्रपट,
गीतलेखन,गायन,हार्मोनियमवादन,संगीत,पटकथालेखन,काव्यगायन अशा अनेक प्रांतात यशस्वीपणे मुशाफिरी केलेले पु. ल. लेखनात अधिक रमले.लेखनातील विविध प्रकार त्यांनी हाताळले."तुझे आहे तुजपाशी","सुंदर मी होणार" ,"भाग्यवान",'तीन पैशाचा तमाशा","ती फुलराणी" यासारखी नाटकं, "आम्ही लटीके न बोलू","विठ्ठल तो आला आला" सारखे एकांकिका संग्रह,"पुढारी पाहिजे" सारखे लोकनाट्य,"खोगिरभरती", "नसती उठाठेव","गोळाबेरीज","हसवणूक","असा मी असा मी","खिल्ली" यासारखी विनोदी पुस्तके,"अपूर्वाई","पूर्वरंग","जावे त्यांच्या देशा",'वंगचित्रे" यासारखी प्रवासवर्णने,"गणगोत","गुण गाईन आवडी" यासारखी व्यक्तिचित्रे ,याखेरीज बालनाट्य,भाषणे यांचाही समावेश त्यांच्या साहित्यात होतो.

पुलंचा विनोद "दर्जेदार" असे.कोणाच्या व्यंगावर बोट ठेऊन त्यांनी विनोद साधला नाही.त्यांच्या विनोदाने कधी घुसमट होत नसे,उलटपक्षी कोंदट वातावरणाला प्रसन्न करण्याचे त्यात सामर्थ्य होते...त्यांचा विनोद कधी "कच्च्या कैरीची" लज्जत देई तर कधी "कोकिळेच्या कूजनाची"..तो पक्षाच्या केविलवाण्या फडफडीगत कधीच भासला नाही.साध्या साध्या गोष्टीत ते सहज विनोद करत..पहा ना...कापड दुकानात काम करणारे त्यांना एखाद्या "योग्याप्रमाणे" भासत,कारण "बनारसी शालू आणि राजपुरी पंचा" ते एकाच निर्विकार मनाने दाखवत...शेकडो लुगड्यांच्या घड्या मोडल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरची घडी बदलत नसे.पुलंचा विनोद असा आरशासारखा स्वच्छ असे...भाजीत झुरळ सापडल्याच्या तक्रारीवर ते म्हणत,"मंथली ट्वेन्टी टु रुपीज मध्ये एलिफंट का यायचा भाजीत?हे जगप्रसिद्ध उत्तर देणारा खानावळ वाला पुलंच्या विनोदाचे दर्शन घडवितो.

पुलंचा "हजरजबाबी विनोद" हा विलक्षण होता..कविवर्य बा.भ.बोरकर हे त्यांचे श्रद्धास्थान...ते आजारी होते ,तेव्हा पुल त्यांना भेटायला गेले ,त्यांच्या प्रकृतीविषयी लिहिताना त्यांना राजाध्यक्षांना लिहिले,"डॉक्टरांनी बोरकरांना पेयांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली आहे."

"इन्स्टंट विनोद करून हसविणे" हा तर त्यांचा हातखंडाच होता.नागपूरला कडाक्याच्या थंडीत रांगणेकरांच्या नाटक कंपनीबरोबर गेले असता प्रत्येकजण "काय ही थंडी" असे म्हणू लागला.तबलजी मामा म्हणाले ,"रात्री इतकी थंडी पडली होती की दातावर दात आपटत होते.त्यावर पुल म्हणाले ,"मामा तुम्ही रात्री वाटीत काढलेल्या दातांच्या कवळ्यासुद्धा एकमेकांवर इतक्या आपटत होत्या ,की त्या आवाजानेच मी जागा झालो.पुलंना हा विनोदाचा वारसा त्यांच्या "बाय"(आईची आई)आजीकडून मिळाला असावा.ती सतत मजेशीर बोले."मोरी" माशाला "मोरोपंत" तर "कुरल्याना" "घाटकोपर" आणले असे म्हणे..!!

देशपांड्यांचं घराणं बेळगाव जवळच्या "जंगमहट्टीचं"...कोल्हापूरजवळ "कलानिधीगड" आणि "गंधर्व गड" असे दोन समोरासमोर किल्ले होते.कलानिधीगडाची वतनदारी पुलंच्या पूर्वजांकडे होती.१९४७ पर्यंत त्यांना वार्षिक २० रुपये वतन मिळे.पुढे कोणा पूर्वजाने हातातील तलवार टाकून हाती लेखणी धरली आणि ते गडकर्यांचे देशपांडे झालो..पुलंचे वडील "जे बी अडवानी" या कागद कंपनीत सेल्समन होते.त्यांना कुठे कल्पना होती की मोठेपणी आपले चिरंजीव याच कागदाची रिम च्या रिम साहित्य निर्मितीच्या नावाखाली वाया घालविणार आहेत?पुलंचे आजोबा "ऋग्वेदी" या नावाने ग्रंथ लिहीत.ते कीर्तनही करत.कीर्तनातील पदे सरधोपट पणे म्हणून संपविण्याकडे त्यांचा कल असे.पण मागे साथ करणारे पुल मात्र तीच पदे आळवून आळवून म्हणत..ज्या काळात मुलांचे खिरापतीकडे लक्ष असे ,तेव्हा पुलंचे लक्ष मात्र कीर्तनातील अभंग,ओव्या श्लोक यांकडे असे.आजोबांनी रवींद्रनाथांच्या गीतांजलीचे "अभंग गीतांजली" असे भाषांतर केले होते.आई चा स्वर निर्मळ होता ,ती अंगाई म्हणून निजवत असे.मामा नाट्यपदे म्हणत असे.त्यामुळे कलेचा वारसा घरातच होता,आणि त्यासाठी प्रोत्साहनही मिळत असे.

आजोबा संस्कृत भाषणे लिहून देत.

मनोहरा मधुरा च संस्कृत भाषा
एषा एव अस्माकं पूर्वजाणाम् आर्याणाम् सुलभा शोभना च भाषा...

पुलंच्या जाहीर भाषणाचा पहिला प्रयोग "जोगेश्वरीच्या सरस्वतीबागेत" वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षी झाला.भाषण अभिमन्यूवर होते.भाषण करता करता पुल पदरची दोन वाक्ये बोलून गेले आणि पुढले भाषण विसरले.पण प्रसंगावधान राखून "माझी दूध पिण्याची वेळ झाली" असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.

हेमराज चाळीत त्यांचे जेमतेम १८ ते २० महिन्याचे वास्तव्य होते.त्यानंतर जोगेश्वरीतील "सरस्वतीबाग" नंतर "५ अजमल रोड,पार्ले "येथे त्यांचे वास्तव्य होते.पारल्याला आल्यावर "श्री दत्तोपंत राजोपाध्ये" यांच्या क्लासमध्ये ते हार्मोनियम शिकू लागले.लहानपणी जेवणं झाली की त्यांचा हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम ठरलेला,धाकटा भाऊ रमाकांत तबल्यावर...आणि घरची मंडळी हक्काचे प्रेक्षक...!!राजोपाध्ये यांच्या क्लासमधील एक कार्यक्रमात दस्तुरखुद्द "बालगंधर्व" अध्यक्ष म्हणून आले होते.ते अगदी पुलंच्या समोर येऊन बसले.पुल वाजवीत होते त्यांचीच पदे..."सत्य वदे वचनाला नाथा".. विजेसारखी चपळता असलेल्या त्यांच्या बोटांतून बालगंधर्वांच्या गळ्यातील पाणीदार मोत्यासारखी तेजस्वी असलेली एकेक पल्लेदार तान निघत होती...बालगंधर्व खुश झाले त्यांनी पुलं ना शाब्बासकी दिली,त्यांचे खूप कौतुक केले...प्रत्यक्ष बालगंधर्व समोर बसले असता "सत्य वदे वचनाला" वाजविणे हे एक धाडस होते,नव्हे शिवाजीराजांसमोर भवानी चालविण्यासारखे होते..हा चमत्कार घडला होता...तेव्हा "बालगंधर्व" हे "सुरांच्या दुनियेतील प्रत्येकाचे आराध्य दैवत" होते.त्यांचं गाणं हा शब्दातीत अनुभव असे.पुलंच्या बालमनावर पहिला संस्कार बालगंधर्वांच्या सुरांचा झाला. पुलंच्या जीवनी सगळ्यात जास्त कोणी रंग भरले असतील तर ते संगीताने...सुरांनी...!!!त्यांनी सुमारे ११ चित्रपटात आपला ठसा उमटवला. काहींना त्यांनी संगीत दिले होते...काहींमध्ये अभिनय केला.

बालपणी अभ्यासापेक्षा त्यांचा संगीताकडे अधिक ओढा होता.संगीतकार होण्याआधी ते भावगायक झाले.. जी. एन. जोशी, गजानन वाटवे अशा दिग्गज मंडळींच्या जमान्यात तबल्यावर वसंतराव देशपांडे, सारंगीला मधुकर गोळवलकर व स्वत: पेटी वाजवत पुलंनी भावगीत गायनाचे अनेक कार्यक्रम करून श्रोत्यांची दाद मिळवली."वहिनी" नाटकातील "पाखरा जा त्यजुनिया" हे पद श्रीधर पार्सेकरांच्या संगीतात त्यांनी गायले होते.पुढे "केशवराव भोळे "यांची भेट झाली आणि त्यांच्या संगीताची छाप पुलंवर बसली,पुल त्यांना गुरुस्थानी मानत.रांगणेकरांच्या "कुबेर" या चित्रपटातून पुलंचा चित्रसृष्टीत प्रवेश झाला.१९४९च्या "मोठी माणसं" पासून ते संगीतकार बनले."देव पावला"या चित्रपटाची गाणीही खूप गाजली.

"देव पावला" चित्रपटातील "माणिक वर्मा" यांचे "कबिराचे विणतो शेले" हे गीत अजरामर आहे आणि आजही त्याची लोकप्रियता अभंग आहे."घरधनी' मधील गीतही त्यांनीच लिहिली होती.त्यातील वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील "बशी कपाचे लगीन झाले ,बशी बायको नवरा कप"या गाण्याने मजा आणली होती.. १९५३ मध्ये पुलंनी ‘अंमलदार’, ‘माईसाहेब’, ‘विठ्ठलपायी’, देवबाप्पा’ आणि ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटांना संगीत दिलं. यातील ‘देवबाप्पा’ आणि ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटांची गाणी प्रचंड गाजली.देवबाप्पा मधील "नाच ग घुमा" च्या वजनावर लिहिलेले "नाच रे मोरा आंब्याच्या वनात" हे गीत "सदाबहार" आहे.कोणतेही स्नेहसंमेलन याशिवाय पूर्ण होत नाही."गुळाचा गणपती" मधील सगळीच गाणी गाजली..."इंद्रायणी काठी" तून भक्ती रस ओथंबून वाहतो ,भीमसेन जोशी यांनी त्या गीताचे सोने केले आहे."इथेच टाका तंबू" हे "अरेबिक स्टाईल" वर आधारलेले आणि "ही कुणी छेडिली तार" हे बहरलेला प्राजक्त पाहून "केदार" रागावर गदिमांनी लिहिलेले गीत ...खड्या सुरात गाऊन तानांची आतषबाजी करणाऱ्या वसंतरावांना "ही कुणी छेडिली तार" सारखे मृदू गीत पुलंनी गायला लावले आहे.

१९५५-मध्ये आकाशवाणीवर नोकरी करत असताना त्यांनी "अमृतवृक्ष" आणि "जनाबाई" अशा दोन संगीतिका सादर केल्या. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या ‘बिल्हण’ या संगीतिकेचं संगीतदिग्दर्शन व निर्मिती पुलंचीच. या संगीतिकेतील ‘माझे जीवनगाणे’ व ‘शब्दावाचुनी कळले सारे’ या गीतांच्या पुढे ध्वनिमुद्रिका निघाल्या व गाजल्या. याशिवाय पुलंच्या संगीतातील ‘माझिया माहेरा जा’, ‘बाई या पावसानं’, ‘हसले मनी चांदणे’, ‘तुझ्या मनात कुणीतरी तुझ्या मनात कुणीतरी लपलं गं’ या खाजगी ध्वनिमुद्रिकाही गाजल्या.

एखादी कविता,कथा,कादंबरी नव्या सृष्टीची कवाडे उघडून देते.लहानपणी संत पंत कविता ऐकलेल्या पुलंनी बोरकरांच्या कवितेचा उत्सव पहिला ,तेव्हा त्या शब्दांनी त्यांच्या मनावर गारुड केले."क्षणभर त्या शब्दांनी आपल्या पंखांवरून मला दूरच्या जगाची सफर घडविली" असे पुल म्हणतात."केशवसुत" त्यांचे नित्याचे साथी होते.बालकवींच्या "फुलराणीचे" त्यांना वेड होते,तशी नारायण सुर्व्यांची "मनी ऑर्डर" त्यांच्या मनी कोण्या एक स्त्रीच्या वेदनांचे काटे रूतवून जात असे.गालिब ,तुकोबा,शेक्सपिअर,कालिदास,रवींद्रनाथ ,गोर्की, मर्ढेकर,सुर्वे,खानोलकर,खलील जिब्रान,हेमिंग्वे सारे त्यांच्या मनी गुण्यागोविंदाने नांदत...त्यासाठी त्यांना पासपोर्ट लागत नसे. सुनीताबाईंबरोबर काव्यगायनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी गाजविले आहेत.

वयाची पन्नाशी उलटल्यावर पुल १९७०मध्ये "बंगाली" भाषा शिकण्यासाठी शांतिनिकेतनात गेले.बंगाली भाषा आणि रवींद्रनाथांचे काव्य यांच्या ओढीचा वारसा देणारे होते त्यांचे आजोळ चे आजोबा,गीतांजलीचे भाषांतरकार "वामन मंगेश दुभाषी" उर्फ़ "ऋग्वेदी"...!! भाषा जिथे जिवंत पिंडातून उमटत असेल तिथेच जाऊन,तिची नाना स्वरूप अनुभवून व भोगून शिकायची असते अशी त्यांची धारणा होती.शांतिनिकेतनात गेले तेव्हा "जिबोने आज कि प्रथम एलो बशंतो" ?(जीवनात आज प्रथमच वसंत आला का?)असा प्रश्न पडला होता.पुढे रविंद्रानी सगळ्या ऋतूतील सौंदर्य पाहण्याची दृष्टी दिली.ग्रीष्मालाही ते "अग्नी स्नाने शुचि होक धरा"(अग्नी स्नानाने पृथ्वी शुचिर्भूत होवो)असे म्हणत असत.वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर बंगाली शिकण्याची जिद्द बाळगणारे पुल खरच धन्य होत.

पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे.१९५८ मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर "मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन" या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील "पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते "झाले. दिल्ली दूरदर्शनवर वरील पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी "पंडित नेहरूंची" दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुल हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.

जीवनाचा आनंद लुटण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.हे जीवन सुंदर आहे,पण शारीरिक दौर्बल्यामुळे समाजातील काही जण तो घेऊ शकत नाहीत .अशा वेळी त्यांच्या मदतीसाठी "पु ल देशपांडे फाउंडेशन" ही संस्था जाते."हसविण्याचा माझा धंदा" या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग करून पुलंनी रक्तदान शिबिरासाठी ४०,०००रुपये दिले.समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्यरत असणाऱयांबाबत त्यांना नितांत आदरभाव होता.त्यांनी कुष्ठरोग्यांच्या लग्नात उभे राहून मंगलाष्टके म्हटली. कुष्ठरोग्यांविषयीची समाजाची मानसिकता बदलण्यात पुलंनी सिंहाचा वाटा उचलला.
पुलंच्या देणगीतूनच ‘मुक्तांगण’सारखी सेवाभावी संस्था २९ऑगस्ट १९८६ रोजी उभी राहिली. पुण्यात "बालगंधर्व नाट्यगृह "उभे राहिले पाहिजे असा आग्रह धरणाऱ्यात पुल अग्रस्थानी होते.देशात आणीबाणी आली तेव्हा जयप्रकाशजींच्या प्रिझन डायरीचे त्यांनी "स्वगत" या नावाने मराठीत भाषांतर केले.

जीवनातील असंख्य प्रकारचे अनुभव शोषून,त्यांना विविध आकार देऊन ,त्यातील आशयघनता शब्दात मांडून सामान्य माणसाच्या जीवनात आनंद फुलविणारा हा आनंद यात्री...द्वेष,मत्सर हे शब्द त्यांच्या कोशातच नव्हते...सुरांच्या पंखांवर बसून नादब्रह्मात रमणारा ,कैवल्याच्या चांदण्याचा आस्वाद घेणारा हा अवलिया...रंगभूमीवर सादरीकरण करताना "शब्दात" प्राण ओतणारा हा हाडाचा कलावंत...बालगंधर्व,केशवराव दाते,भास्करबुवा बखले,बाबा आमटे,बा भ बोरकर,कुमार गंधर्व,वसंतराव देशपांडे ,ग दि माडगूळकर यांची साथ त्यांना लाभली आणि त्यांच्या जीवनाचे आनंदवनभुवन झाले आणि इतरांच्याही जीवनी ही आनंदाची फुलबाग फुलविण्यासाठी ते आयुष्यभर झटले.."पद्मश्री","पद्मविभूषण" या उपाधी मिळाल्या,सरकार दरबारी मन मरातब मिळाला...साहित्याच्या विश्वात आत्मतेजाने चमकणारा हा दिव्य रवी होता.."पुरुषोत्तम" हे नाव त्यांनी सार्थ केले.आपल्या संपन्न अनुभूतीतून त्यांनी अखिल विश्व श्रीमंत केले.त्यांची साहित्याची भूक "चतकोराने' भागणारी नव्हती...आजन्म शब्दावर प्रेम करणारा हा सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला तिचा सच्चा उपासक होता.

त्यांच्या दिवाळी अंकात आलेल्या "माझे खाद्यजीवन" या लेखाचे पारायण केल्याने "सतीश मनोहर सोहोनी" (चिनी आक्रमणाच्या वेळी संरक्षक खात्यातील वायरलेस ऑपरेटर)यांची कडाक्याच्या थंडीतही जिवेषणा बळावली.१४०००फुटांवरील बर्फाळ पहाडी प्रदेशात त्यांना पुलंच्या साहित्याने साथ दिली.तसेच एक २०वर्षांचा तरुण "उदय फाटक" कुलू मनाली येथे ट्रेकिंग ला गेला असता त्याला "व्हायरल इन्फेक्शस पोलिन्यूरोसिस" झाला,मज्जा यंत्रणा कोलमडली.कोणत्याच वैद्यकीय उपायांना तो प्रतिसाद देईना. मात्र "असा मी असामी","अंतू बरवा","नारायण","म्हैस" या पुलंच्या व्यक्तिरेखांनी त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची पहाट झाली.क्रमाक्रमाने सर्व ताणातून तो मुक्त झाला आणि पूर्ववत जीवन जगू लागला. याचे श्रेय त्याची आई "सुनीती फाटक" पुलंच्या साहित्याला देते. नामवंत बुद्धिबळपटू खाडिलकर भगिनी आपला ताण सुसह्य करण्यासाठी पुलंचे साहित्य नेतात...(अमृतसिद्धी गौरव ग्रंथातून याचा संदर्भ घेतला आहे..)

पुलंचे साहित्य म्हणजे "विविधरंगी फुलांनी नटलेली फुलबाग"...त्यांचे जीवनाचे तत्वज्ञान निर्भय,नितळ आहे.त्यांचे माणसावरील प्रेम अफाट आहे."एका ठिकाणी थांबणे" हे त्यांच्या रक्तातच नाही.त्यांचे उज्ज्वल भविष्य वडिलांनी ओळखले होते आणि "तू याचे मोठमोठे मान सन्मान बघशील" असे आईला सांगितले होते.वडिलांचे आशीर्वाद फळाला आले...उत्तम कलाकृतीने पुल जसे भारून जात ,तसेच आज आपण त्यांच्या दर्जेदार साहित्याने भारावून जातो..."शब्दांची पालखी करावी आणि त्यात मानाने त्यांना बसवून आपण पालखीचे भोई व्हावे" ...याने सुद्धा त्यांचे ऋण फिटणे नाही...!!!"दिव्यत्वाची जेष्ठ प्रचिती तेथे कर माझे जुळती..."!!!

मंगेश पाडगावकर म्हणतात...

पुलस्पर्श होताच दु:खे पळाली
नवा सूर आनंदयात्रा मिळाली
निराशेतुनी माणसे मुक्त झाली
जगू लागली हास्य गंगेत न्हाली...
हेच खरे...!!


मानसी पटवर्धन.
(स्वर प्रतिभा दिवाळी अंक २०१८च्या सौजन्याने )

0 प्रतिक्रिया: