Tuesday, April 21, 2020

सुनिताबाई एक साठवण - आरती

बरेच दिवसांपुर्वी वर्तमानपत्रात सुनिताबाईंचा काव्यवाचनाचा मुंबईत एक कार्यक्रम झाल्याचे वाचले होते. त्यादिवशी पेपरची घडी घालता घालता 'किती चांगले कार्यक्रम निसटुन जातात' असा विचार मनात आल्यशिवाय राहिला नाही. आणि आश्चर्य म्हणजे आज परत तसेच घडत होते. त्याच कार्यक्रमाचे रेकॉर्डींग पु.ल. देशपांडेंच्या पुण्यतिथी निमीत्ताने यशवंतराव चव्हाण सभाग्रुहात दाखवण्यात येणार होते. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळची होती, तिकीटे उपलब्ध होती, कार्यक्रम पुण्यात होता आणि मी पण पुण्यातच होते. पण तरीही एक मोठ्ठेच प्रश्नचिन्ह होते, जावे की नाही ? कारण असे की सोमवारी माझी परिक्षा होती, फक्त दोनच दिवस माझ्या हातात होते. वर्षभर पुस्तके जणू सोवळ्यात आहेत अशी परिस्थिती होती. हे सगळे एका बाजुला आणि दुसरीकडे कार्यक्रमाचा मोह, तो काही सुटत नव्हता. या संभ्रमातच ऑफीसचा रस्ता संपला आणि जागेवर पोहोचल्या क्षणी मैत्रिणीला फोन करुन 'कार्यक्रमाला जात आहोत' असे सांगितले. कसा ते समजले नाही पण निर्णय झाला हे मात्र खरे.
साधारणपणे तीन तासांचा कार्यक्रम. अगदी सुरवातीपासून ते थेट शेवटापर्यंत क्षण अन क्षण डोळ्यात, कानात, मनात कुठे कूठे म्हणून साठवू असे काहीसे होवून गेले होते. उत्कृष्ठ काव्यवाचन आणि तितकीच सुरेख संवाद साधण्याची पद्धत. काही जुन्या आठवणी, अनुषंगाने आलेले एक दोन विनोदी किस्से, प्रत्येक कविचे एखादे खस असे वैशिष्ट्य. असे कार्यक्रमाचे स्वरुप, अगदी परिपूर्ण.

राम गणेश गडकरींपासून सुनिताबाईंनी कार्यक्रमाला सुरुवात केली, ज्येष्ठ साहित्यिक म्हणुन गडकरींचा मान पहिला आहेच परंतु पु.ल. आणि सुनिताबाईंनी त्यांची काव्यवाचनाच्या कार्यक्रमांची सुरुवातही गडकरींच्या कवितांपासून केली होती. गडकरींच्या नाटकं व इतर गद्य लिखाणाचा वाचक वर्ग मोठा होता. परंतु त्यांच्या कविता तितक्याश्या लोकांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या. त्यांच्या या तिसर्‍या रुपाचे दर्शन रसिकांना घडावे या हेतुने पु.ल. व सुनिताबाईंनी त्यांच्या कवितावाचनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली.
'गडकरींच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी माझा जन्म झाला, चार चौघात जरी भाई हे गमतीने म्हणत असे तरी आत कुठेतरी त्याला या गोष्टीचा अभिमान होता' अशी गमतिशीर आठवण सांगून सुनिताबाईंनी गडकरींची 'मंगल देशा, पवित्र देशा' ही कविता सादर केली. .... मनात विचार आला खरच गडकरींचेच हे चौथे रुप नसेल कशावरुन ? पु.लं. चे लेखन क्षेत्र गडकरींपेक्षा संपूर्णपणे भिन्न होते. त्यांनी न हाताळलेला लेखन प्रकार पु.लं च्या रुपात पुर्ण झाला. म्हणुनच वाटते गडाकरी पु.लं.च्या रुपात आपल्यात नक्कीच आले असतील. एव्हढा मोठा आनंदाचा ठेवा घेउन, एक असामान्य कर्तुत्व, निर्लेप दातॄत्व घेउन. असेच पु.ल ही नक्कीच परत आले असतील. कारण ज्यांना माणसांची ओढ असते ते माणसांमधेच तर परत येणार. आपण फक्त 'पु.लं. च्या मृत्युनंतर नऊ महिन्यांनी माझा जन्म झाला' असे अभिमानाने सांगणार्‍याची वाट बघायची.

गडकरींनंतर आले मर्ढेकर. 'मर्ढेकर हा एकमेव सुटाबुटातला कवी' अशी सुनिताबईंनी मर्ढेकरांची ओळख करुन दिली. साधारणपणे साहित्यिक म्हंटले की अतिशय साधी रहाणी असे चित्र पूर्वी लोकांच्या डोळ्यासमोर होते. अभियांत्रीकी पार्श्वभूमी असलेल्या मर्ढेकरांनी नोकरीत मोठ मोठी पदे भुषविली होती. कविता त्यांची आवड होती, चरितार्थ नव्हता. कदाचित म्हणुनही हा फरक असेल. कुठल्याश्या कार्यक्रमाचे मर्ढेकर अध्यक्ष असताना, पु. ल. व सुनिताबाई त्यांना भेटण्यासठी म्हणुन व्यासपीठावर गेले होते. 'ही माझी बायको', अशी पु.लं नी सुनिताबाईंची ओळख करुन दिली, आणि सुनिताबाईंनी त्यांच्या स्वभावगुणाला अनुसरुन मर्ढेकरांना घरी जेवायला येण्याचे आमंत्रण दिले. मर्ढेकरांनी पण लगेच येण्याचे कबुल केले, पण एका अटीवर, अट कोणती ? तर बेत पिठल भाकरीचा असावा आणि खाली पाटावर जेवायला वाढावे. प्रतिभावंतांमधे अभावानेच आढळणारा साधेपणाचा एक अनोखा रंग. सुनिताबाईंनी निवडलेल्या मर्ढेकरांच्या कविताही अशाच विवीध रंगी. 'या दु:खाच्या कढईचीगा, अशीच देवा घडण असु दे', या कवितेतून जितका मनाचा कणखरपणा प्रतीत होतो, तितकाच नाजुकपणा निथळतो 'दवात आलीस भल्या पहाटे, शुक्राच्या तोर्‍यात एकदा', या ओळींमधून. 'पोरसवदा होतीस काल परवा पावेतो' मधील अवखळपणा, 'असे काहीतरी व्हावे अशी होती दाट इच्छा, असे काहीतरी झाले पुरविते तेच पिच्छा' मधील अगतिकता, सुनिताबाईपण तेव्हढयाच सामर्थ्याने व्यक्त करतात. 'फलाटदादा, फलाटदादा' या कवितेतील 'बोल ना फलाटदादा' म्हणत सुनिताबाईंनी केलेले आर्जव ऐकुन खरंच आता फलाटदादा तरी बोलेल नाहीतर सुनिताबाईंच्या डोळ्यांमधुन अश्रुधारा वाहतील असेच वाटुन गेले. पण शेवटची ओळ संपताच त्या अगदी पूर्ववत होऊन जात. त्यांच असं प्रत्येक कवितेत आत-बाहेर येण-जाण ही तर फक्त अनुभवण्याचीच गोष्ट आहे, लिहिण्या वाचण्याची नाहीच.

सगळ्यात जास्त रंगला तो खानोलकरांचा किस्सा. कवि चिं.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभु मूळ कोकणातले. त्यांच्य वडिलांची कोकणात खानावळ होती. वडिलांना मदत म्हणून खानोलकर गल्ल्यावर बसत असत. तिथे बसल्या बसल्या रिकाम्या वेळात कविता लिहीणे हा त्यांचा छंद होता. खानावळीत नियमीत येणार्‍यांपैकी दोघांची नजर गल्ल्यावर बसलेल्या ह्या तरुणावर असे. हा कागद पेन घेउन इतके पानेच्या पाने रोजच काय लिहीतो असा मोठाच प्रश्न त्या दोघांना पडला होता. मुलगा तरुण आहे आणि अगदी हरवून जाऊन लिहितो आहे म्हणजे नक्कीच प्रेमपत्र असणार, असा निष्कर्ष तर त्यांनी काढलाच पण खात्री करुन घेण्यासाठी त्यांनी एके दिवशी त्यातले काही कागद पळवून आपल्या खोलीवर नेले. 'ऊभी लिहितात ती कविता आणि आडवे ते गद्य' एवढीच मराठी साहित्याची ओळख असलेल्या त्या दोघांना आपण पळवून आणल्या त्या, त्या मुलाने लिहिलेली प्रेमपत्रे नसून कविता आहेत असा अर्थबोध झाला. पुढे त्यातल्याच काही कविता त्यांनी मुंबईस मौज प्रकाशनात छापण्यासाठी पाठवल्या. अगदी खानोलकरांच्या नाव-पत्त्यासहित. परंतु तिन-चार महिने वाट पाहुनही जेंव्हा त्या छापून आल्या नाहीत तेंव्हा कविचे चिं.त्र्यं.खानोलकर हे विचित्र नावच त्याला कारणीभूत असावे असे समजून या महाशयांनी मग कविचे नाव बदलून पुन्हा नव्याने कविता छापण्यासाठी पाठवून दिल्या. आणि यावेळेस पत्ता जरी तोच होता तरी नाव होते 'आरती प्रभू'. आश्चर्य म्हणजे यावेळेस कविता छापुनही आल्या आणि स्वतःच्याच प्रतिभेपासून अनभिज्ञ असलेला एक थोर कवि महाराष्ट्राला मिळाला. अचानक मिळालेल्या या अफाट प्रसिद्धीमुळे खानोलकर थोडे विचीत्र मनस्थितीत सापडले. 'आपण कोणीतरी अद्वितीय आहोत' असा अहंकार आपल्यात निर्माण तर होणार नाही ना अशी भिती त्यांना वाटू लागली. आणि कविता जन्मली, 'येरे घना येरे घना, न्हाउ घाल माझ्या मना'. 'एका रिमझिम गावी, भासत आहे हृद्यस्थ तान, पण ...' , 'गेले द्यायचे ते राहून, तुझे नक्षंत्रांचे देणे ...' या सगळ्याच कवितांमधला नेमका भाव सुनिताबाई प्रेक्षकांपर्यंत अगदी थेट पोहोचवतात.

बा.भ.बोरकर, पु.ल व सुनिताबाईंवर त्यांचा विशेष लोभ होता. त्यामुळे बोरकरांच्या कविता त्यांनी अधिकच समरसुन वाचल्या. त्यांच्या आपल्यावर असलेल्या 'विशेष' प्रेमाची जाणीव कशी झाली याची आठवण सांगताना सुनिताबाईंनी सांगितलेला प्रसंग अगदी मन हेलावून टाकतो. बोरकर अगदी अंथरुणाला खिळून होते. या आजारातून आता ते उठत नाहीत, हे सगळे समजून चुकले होते. सुनिताबाई त्यांना भेटण्यासाठी म्हणून गेल्या होत्या. बोरकरांना तर उठून बसणे पण शक्य नव्हते. वाचन तर लांबची गोष्ट. म्हणुन त्यांनी सुनिताबाईंना आपली 'समुद्राची' कविता म्हणुन दाखवण्याची विनंती केली. ती बोरकरांची अगदी सुरुवातीच्या काळातली कविता असल्यामुळे सुनिताबाईंना पाठ नव्हती. शेवटी बोरकरांच्या मुलीच्या मदतीने घरातच शोधाशोध करुन, पुस्तक मिळवून सुनिताबाईंनी बोरकरांना कविता वाचुन दाखवली. कविता संपता संपताच ते कोमात गेले आणि दोनच दिवसांनी ही दुनिया सुद्धा सोडून गेले. मृत्यूशय्येवरही 'समुद्र बिलोरी एना, सृष्टीला पाचवा महिना' सारखी अवखळ कविता एकण्याची इच्छा करणारा कवि किती तरुण मनाचा असेल याची कल्पना येते. यानंतर बोरकरांच्या एक से बढकर एक कवितांची उधळणच होती. 'सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग', 'हवा पावसाळी, जरा रात्र काळी', 'मी विझल्यावर त्या राखेवर', 'कळत जाते तसे, कसे जवळचेही होतात दूर', सगळ्याच कविता सुनिताबाईंनी अप्रतिम सादर केल्या.

कार्यक्रम कितीही रंगला तरी शेवट हा अपरिहार्यच असतो. या कार्यक्रमाचा शेवट सुनिताबाईंनी त्यांची प्रिय सखी 'पद्मा गोळे' यांच्या दोन कवितांनी केला. 'आता मी नसतेच इथे' ही कविता अगदी मनाला चटका लाउन गेली. सुनिताबाई त्यांच्या मनातले भाव तर बोलत नाहीत ना, असे काहीसे क्षणभर वाटून गेले. आज-काल त्यांचे एकटे-एकटे रहाणे आणि कवितेचा आशय यात कुठेतरी साधर्म्य जाणवले. कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू म्हणजे 'चाफ्याच्या झाडा' या कवितेचे सादरीकरण, कविता अर्थातच पद्माबाईंची. पण ही माझीच कविता आहे असे सुनिताबाईंनी म्हंटल्यामुळे कोड्यात पडलेल्या प्रेक्षकांसमोर, त्या मागचे गुपीत उलगडत सुनिताबाईंनी ती कविता जेंव्हा सादर केली तेंव्हा अंगावरचे रोमांच टाळ्यांचे रुप घेउन प्रेक्षागृहात दुमदुमले.


'चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा,
का बरे आलास आज स्वप्नात ?
तेंव्हाच तर आपलं नव्हत का ठरल,
दु:ख नाही उरल आता मनात'.


[* माझी हिंमत अशी की, काही कामाने गेले असता, मी हे लिखाण सुनिताबाईंना वाचायला दिले. हे सगळे मी माझ्या स्मरणशक्तीच्या भरवश्यावर लिहिले होते. वरील लिखाणात मी कवियत्री पद्मा गोळे यांचा उल्लेख 'सुनिताबाईंची प्रिय सखी' असा केला आहे.
"तुमच्या लिखाणात एक चुकीचा संदर्भ आहे, त्या माझी सखी आहेत असे मी कधीच म्हंटलेले नाही. त्यांचा आणि भाईचा स्नेह होता" असा शेरा मला सुनिताबाईंकडून मिळाला. 😊*]

- आरती.
[२००३ च्या हितगुज दिवाळी अंकातुन]

0 प्रतिक्रिया: