Monday, December 12, 2011

पु.ल. संचिताची बखर - प्रशांत असलेकर

पु. ल. देशपांडे यांचे पुतणे जयंत देशपांडे यांना त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच पुलंची व्याख्याने, गप्पांचे फड, आप्तमित्रांच्या मैफली यांचे ध्वनिमुद्रण करण्याचा छंद जडला. त्यातून त्यांच्या हाती लागला एक अनमोल खजिना. या अलिबाबाच्या गुहेबद्दल..

जेहत्ते काळाचे ठायी महाराष्ट्र नामक भूप्रदेशी काका-पुतणे यांचे नाते बहुत बदनाम असे. प्रंतु याच महाराष्ट्र देशी दुसऱ्या एका पुतणियाने मात्र आपुले थोर काकांचे सांस्कृतिक संचित जतन करण्याचा मोठा शर्थीचा यत्न चालविला असे. ते श्रीमान म्हंजे दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे पुतणे रा. रा. जयंतराव देशपांडे! पुलंचे कनिष्ठ भ्राता उमाकांत यांचे चिरंजीव!

स्वर्गीय पु. ल. देशपांडे यांणि कोठेही गुळाचा गणपती न बनता साहित्याचे प्रांती खाशी मुशाफिरी केली. टवाळांसी रोचणारा विनोद नामक पदार्थ निर्विखार करून तो मवाळांचे गळी उतरविला. विनोदास हीन लेखणारी, भाषांतरास निकृष्ट समजणारी समीक्षकशाही, आढय़ताखोरी, राजकीय हुकूमशाही आदी पातशाह्य़ा दबवून आनंदाचे राज्य स्थापित केले. बेकेट, बर्नाडची लूट करून मराठी दौलत वाढविली. पराक्रमाचे विविध दुर्ग सर केले. मराठीयांची हृदये काबीज केली. अनंत गडकोट-लष्कर उभारिले. समानधर्मीयांची मांदियाळी मेळविली. तमाम महाराष्ट्राची अभिरुची एका उच्च पातळीस नेवोन भिडविली.

ऐशा पराक्रमी काकांचे माघारी त्यांचे जे जे म्हणोन संचित दृक्श्राव्य माध्यमात उरले असे, ते पुढील पिढीसाठी जतन करण्याची मोठी मोहीम जयंतराव देशपांडे यांणि हाती घेतली असे. जयंतराव म्हणितात, ‘पुलं ही चीजच अशी होती, की त्यामागे सदासर्वकाळ ध्वनिरेखाटन यंत्रणा घेवोनच धावावे. त्यांचे बोलणे, भाष्य करणे, गप्पा मारणे- सारेच अमृतासमान.’ जयंतरावांसी विद्यार्थीदशेतच याची जाणीव झाली. पुढती त्याणि असा मनसुबा केला की, पुलंचे मुखातून जी अमृतवाणी स्रवते ती शक्य तितुकी ध्वनिमुद्रांकित करावी.

ध्वनिमुद्रांकनाचे तंत्र त्याकाळी बहुत खर्चिक तथा जडबंबाळ होते. कॅसेट नामक सुबक ध्वनिफिती अवतीर्ण जाहल्या नव्हत्या. ध्वनिरेखाटन स्पूल नामक अवाढव्य रिळांवरी करावे लागे. जयंतराव मुंबईतील मौजे पारलई येथे राहतात. त्याकाळी पारलईत नंदू कुलकर्णी नामक गृहस्थांची ध्वनिक्षेपण यंत्रणेची मक्तेदारी होती. जयंतराव याणि नंदू कुलकर्णी यांच्याशी मसलत करोन भाईंचे पाल्यात जे जे कार्यक्रम घडो येतील त्यांची ध्वनिमुद्रिका रेखांकित करण्याचा परवाना हासिल केला. जयंतराव त्याकाळी विद्यार्थीदशेत होते. ध्वनिमुद्रांकनासाठी लागणारे स्पूल खरेदी करण्यासाठी त्यांसि बहुत यातायात करावी लागे.

त्याणि ध्वनिमुद्रित केलेले पुलं यांचे प्रथम भाषण म्हणिजे जनता पार्टीचे उमेदवार एच. आर. गोखले यांचे प्रचार सभेतील पुलंचे भाषण. मोहतरमा इंद्रा गांधी याणि त्यावेळी त्यांचे वीस कलमी कार्यक्रमास भगवद्गीतेची उपमा दिली होती. त्यावरी भाष्य करताना पुलं म्हणाले, ‘इंद्राजींची २० कलमे धुंडाळण्यास आम्ही गीता उघडली. प्रंतु पहिलेच वाक्य ‘संजय उवाच’ ऐसे आढळून आल्यावर घाबरून मिटोन टाकली.’

या प्रसंगाचे ध्वनिमुद्रण जयंतराव यांणि स्पूल नामक स्थूल ध्वनिफितीवरी केले. त्यानंतरही काही काळ हा सिलसिला चालू होता. काही काळ त्यांणि त्यांचे आत्याचे यजमान तेलंग- जे गुप्त पोलीस वार्ता विभागात होते- यांच्याकडून पोलिसांचे ब्रीफकेससदृश ध्वनिरेखाटन यंत्र उसने आणून पुलंच्या बऱ्याच भाषणांचे, संगीत मैफिलींचे तथा दोस्तांबरोबर रंगलेल्या गप्पाष्टकांचेही ध्वनिमुद्रण केले.

काळाचे ओघात ध्वनिमुद्रण पद्धतीत पुढे बहुत फर्क पडला. स्पूल ते कॅसेट ते सीडी ऐशी स्थित्यंतरे होत सांप्रतकाळी ती डीव्हीडी नामक स्वरूपात करिना कपूरप्रमाणे ‘झीरो फिगर’ची होवोन अवतीर्ण झाली असे. जयंतराव यांणि या सर्व आधुनिक तंत्रांचा अवलंब करून पु. ल. देशपांडे यांचे मुखातून बाहेर पडलेला शक्य तितुका शब्द तथा सूर जतन करोन ठेविला असे. जयंतरावांचा पुलंविषयीचा ध्वनिमुद्रिकासंग्रह म्हणजे एक अलिबाबाची गुहा असे. ज्यांची आपण कल्पनाही करो शकत नाही, अशी काही अतिदुर्मीळ ध्वनिमुद्रिते त्यांचे संग्रही आहेति.

साहित्यिक व. कृ. जोशी यांचे शुभमंगलप्रसंगी लग्नमंडपातच वसंतराव देशपांडे यांचे गायन व संवादिनीवर पुलं ऐसी मैफील रंगली होती. त्याची ध्वनिफीत या खजिन्यात असे. पुलं यांणि संगीत दिलेली (सहाय्यक संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे) मंगेश पाडगांवकरलिखित आकाशवाणीवरील ‘भिल्लन’ या संगीतिकेची ध्वनिफीत, गोविंदराव पटवर्धनांचे षष्ठय़ब्दीपूर्तीप्रसंगी पुलंनी केलेले भाषण तथा त्यानंतर गोविंदरावांबरोबर त्यांची रंगलेली जुगलबंदी, ‘वस्त्रहरण’ नाटकाचे १७५ व्या प्रयोगानिमित्त पुलं यांणि दिलेले आशीर्वचन, जागतिक मराठी परिषदेतील भाषण, ग्वाल्हेर गायकीवरील पुलंचे विवेचन, बालगंधर्व जन्मशताब्दी सोहळ्याचे प्रसंगी पुलंनी केलेले गुणगान, तसेच पुण्यभूषण पुरस्कार, गदिमा सन्मान, पुणे कानडी समाजातर्फे झालेल्या गौरवप्रसंगी पुलंनी केलेल्या भाषणांच्या ध्वनिफिती या संग्रहात आहेति.

ध्वनिमुद्रितांचे जोडीने पुढे दृक्श्राव्य मुद्रिताचीही (व्हिडीओ रेकॉर्डिग) सोय उपलब्ध झाली. जयंतराव देशपांडे यांचे संग्रही अशा अनेक दृक्श्राव्य चित्रफितीही उपलब्ध आहेति. पंडित सी. आर. व्यास यांचे षष्ठय़ब्दीपूर्तीप्रसंगी पुलंनी केलेले सांगीतिक भाषण, जनाबेअली मल्लिकार्जून मन्सूर यांचे पंच्याहत्तरीप्रसंगीचे पुलंचे भाषण आणि तदोपरांत मलिक्कार्जून मन्सुरांबरोबर झडलेली आणि उत्तरोत्तर चरमसीमेला पोहोचलेली जुगलबंदी, भार्गवराम आचरेकरांचा सन्मान व त्याप्रसंगीची जुगलबंदी, देवधर म्युझिक स्कूलच्या अमृतमहोत्सव प्रसंगीचे पुलंचे हृद्गत, पुण्यभूषण पुरस्कार प्रसंगीची ध्वनिचित्रफीत, ‘गुळाचा गणपती’ चित्रपटाचे पुन:प्रक्षेपणाचे वेळी भाईंनी केलेले भाषण अशा असंख्य ध्वनिचित्रफितीही या खजिन्यात समाविष्ट आहेति.

संगीत हा पु. ल. देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता. तसाच तो समस्त देशपांडे कुटुंबीयांचाच मूल जीवनाधार जाणावा. स्वभावत: जयंतराव देशपांडे यांच्या संग्रहात पुलंनी रंगविलेल्या असंख्य संगीत मैफिलींच्या ध्वनिफिती आहेत. त्यांची केवळ जंत्री देणेही अशक्य! १९७० साली घडलेल्या ‘मर्मबंधातली ठेव ही’ या कार्यक्रमाची ध्वनिफीत तर केवळ लाजवाब! जणू या संग्रहातील कोहिनूर हिराच! या कार्यक्रमात वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, माणिकताई वर्मा व भार्गवराम आचरेकर यांणि सहभाग घेतला होता. या नावांवरूनच ती मैफल किती रंगली असेल याचा अंदाज करावा. याशिवाय जयंतरावांचे संग्रही माणिकताई वर्मा व शोभा गुर्टू यांची पुलंनी घेतलेली मुलाखत व मैफल, गंगुबाई हनगल- फिरोज दस्तूर- भीमसेन जोशी यांच्यासमवेत रंगलेली मैफील यांच्याही ध्वनिचित्रफिती आहेति. तसेच न्यू जर्सी येथे महाराष्ट्र मंडळाच्या सभेत पुलंनी केलेले भाषण, डॉ. सुनील दुभाषी (अमेरिका) यांचे निवासस्थानी रंगलेला पुलंच्या गप्पांचा फड, त्यास संगीताची फोडणी, चतुरंग पुरस्कार प्रदानसमयी वसंत सबनीस आदींनी पुलंची घेतलेली प्रकट मुलाखत, त्याचप्रमाणे दस्तुरखुद्द पुलं यांणि घेतलेली बाकीबाब बोरकरांची तरल काव्य-मुलाखत, पुलं व सुनीताकाकू यांचे वेळोवेळीचे काव्यवाचन यांच्या ध्वनिचित्रफितीही जयंतरावांचे दफ्तरी जतन केलेल्या आहेति. पुलं यांचे प्रत्येक शब्दावरी अवघा महाराष्ट्र लट्टू होता आणि त्यांच्या तोंडून बाहेर पडलेला होता होईतो प्रत्येक शब्द जतन करण्याचा जयंतराव यांणि प्रामाणिक यत्न केला असे.

जयंतराव देशपांडे महोदयांचा हा खजिना केवळ पु. ल. देशपांडे या व्यक्तिसापेक्ष नसून संगीतविश्वातील जे जे अव्वल आहे, ते ते त्यांच्याकडे उपलब्ध असे. पुलंच्या निमित्ताने त्यांचा साहित्य-संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी स्नेह जुळला. तो स्नेह पुलंच्या माघारी आजही वर्धिष्णू असे. विविध गायकांच्या ध्वनिमुद्रिकांचा त्यात समावेश असे.
ध्वनिमुद्रिकांव्यतिरिक्त पुलंसंबंधित अनेक दृश्याचित्रांचाही त्यांच्यापाशी ठेवा असे. पुलं यांचे मौजीबंधन नरसोबाची वाडी येथे झाले. त्यासमयीचे कटीवस्त्र नेसलेले, हाती रुईचा दंड धरलेले बटू पुलं एथपासोन ते स्वयं जयंतरावांचे मौजीबंधनप्रसंगी धार्मिक विधीप्रसंगी बसलेले यजमान पुलं (वामांगी सुनीताबाईंची करडी नजर), दूरदर्शनच्या उद्घाटनप्रसंगी जवाहरलाल नेहरूंसमवेतचे पुलं अशा अनेक दुर्मीळ, ऐतिहासिक, माहितीपर छायाचित्रांचाही संग्रह जयंतरावांनी जतन करोन ठेविला असे.

ध्वनिचित्रफिती, छायाचित्रे याखेरीज जयंतराव यांचेकडोन पुलं यांच्याविषयी काही मनोरंजक, अप्रसिद्ध माहितीही कळते. देशपांडे कुटुंबीयांचे मूळ आडनाव गडकरी असे होते. कोल्हापूर जिल्ह्य़ातील चंदगड तालुक्यातील गंधर्वगड व कलानिधीगड या कलाक्षेत्राशी संबंधित नावांच्या गडांचे पुलं यांचे पूर्वज किल्लेदार होते. सारावसुलीच्या कामानिमित्ते त्याणि पुढती देशपांडे हे पदनाम आडनाव म्हणून धारण केले. पुलंना वडिलांचा सहवास अत्यल्प लाभला. त्यांच्यातील सारा कलावारसा हा त्यांच्या मातोश्री व मातुलवेशीयांकडून लाभला होता. पुलंमधील सर्व गुण अल्प प्रमाणात त्यांचे एक मामा महारुद्रमामा यांचे अंगीही होते. हे महारुद्रमामा मिश्कील बोलणे, हकिगत रंगवून सांगणे, नाटय़पदांचे कोकणीतून विनोदी विडंबन करणे यांत माहीर होते. हे सर्व गुण पुलंनी उचलिले व त्यांचा स्वतंत्र विकास केला. पुलं हे वास्तविक या महारुद्रमामांचीच विकसित आवृत्ती होती. त्यांचे अजून एक मामा मंगेशमामा हे मूक, बहिरे, पण अत्युत्कृष्ट चित्रकार होते. सतीश दुभाषींचे वडील नारायणमामा हेही गायनकलेत निपुण होते. पुलंना पेटीवादनाची गोडी लावण्यात महारुद्रमामा व नारायणमामांचा मोठा वाटा होता. पुलंना लहानपणी आजोळी ‘बाबुल’ म्हणायचे.

जयंतराव देशपांडे यांणि पुलंसंबंधित सारे संचित आधुनिकतेची कास धरोन मऱ्हाटीत ज्यास ‘सॉफ्ट कॉपी’ अथवा वलंदेजांचे भाषेत ज्यास ‘संगणकीय प्रत’ म्हणितात, त्या स्वरूपात रूपांतरित केलेली असे. याकामी त्यांस त्यांची धर्मपत्नी दिपाकाकू तथा ताम्रमुखी टोपीकरांचे प्रदेशी स्थायिक त्यांचे सुपुत्र निखिल, स्नुषा गौरी, तसेच कन्या नेहा कामत यांचीही साथ असे.
जयंतराव देशपांडे यांच्यापाशीचा हा संग्रह खासगी असला तरी पुलंप्रेमी व जिज्ञासू यांचेसाठी व्यापारी उपयोग न करण्याचे अटीवर तो खुला आहे. प्रस्तुत संग्रह जरी पु. ल. देशपांडे यांच्यासंबंधी असला तरी वस्तुत: ते साऱ्या महाराष्ट्राचे गेल्या अर्धशतकाचे सांस्कृतिक संचित असे. त्याची निगराणी राखून जयंतराव देशपांडे एक प्रकारे तमाम महाराष्ट्राचेच सांस्कृतिक धन जपण्याचा प्रयत्न करीत आहेति. इति लेखनसीमा.

प्रशांत असलेकर
रविवार ६ नोव्हेंबर २०११
लोकसत्ता