(स्मिता मनोहर आणि मनोज प्रभू यांनी श्री.उमाकांत व रमाकांत देशपांडे यांची घेतलेली मुलाखत - दि. ४ जून २००२)
'५, अजमल रोड, त्र्यंबक सदन'.... पार्ल्यात पोहोचलो आणि 'त्र्यंबक सदना'च्या दिशेनी आम्ही भारावल्यासारखे चालू लागलो. गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न.....पु.लं.च्या घरी जायचं... जे कदाचित स्वप्नच राहिल असं वाटत होतं, ते आज पूर्ण होत असल्याचा आनंद, बरीचशी उत्सुकता, पण एक हुरहुर अशा संमिश्र भावना मनात दाटून येत होत्या. पु.लं.चं बालपण, त्यानंतरचं समृध्द जीवन याच्या अनेक वर्षांच्या आठवणी जिथे दडल्या आहेत, तिथे आम्ही आज जात होतो, पण पु.ल. नसतांना. पु.ल. आज पार्ल्याचाच काय पण या जगाचाच निरोप घेऊन गेल्यानंतर आज त्र्यंबक सदन कसं असेल?.... अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा योग यावा, पण प्रत्यक्ष परमेश्वरानी त्याआधीच तिथून आपला मुक्काम कायमचा हलवावा, अशा वेळी भक्ताची जी अवस्था होईल ती अनुभवत मी आणि मनोज गेट जवळ पोहोचलो.
मनोज मूळचा पार्लेकरच. त्यामुळे पूर्वीचं त्र्यंबक सदन, त्यासमोरचा रस्ता, रोज संध्याकाळी तिथल्या बाकावर पु.लं.चे भाऊ उमाकांतकाका बसत ती जागा आणि ते हुबेहुब पु.लं.सारखे दिसत असल्याने फसलेला मनोज आणि त्याचा मित्र. अशा गमती जमती त्याच्याकडून ऐकतच आम्ही जिना चढून वर गेलो.
रमाकांतकाका आमचीच वाट बघत होते. हे पु.लं.चे सर्वात धाकटे भाऊ. पु.लं.पेक्षा १० वर्षांनी लहान. तर उमाकांतकाका ३ वर्षांनी लहान. ते आम्हाला उमाकांतकाकांच्या खोलीत घेऊन गेले. ८० वर्षांचे उमाकांतकाका आता पूर्णपणे अंथरुणावरच असतात. 'भावाची साहित्यिक नाही तरी ही गादी मात्र चालवत आहे,' असं ते म्हणाले आणि आम्ही हेलावून गेलो. गेल्या ८० वर्षांच्या काळात पु.लं.ची लहानपणापासूनची जडणघडण, अनेक चांगले वाईट अनुभव, लाभलेले मानसन्मान, पु.लं.ना रसिकांचे मिळालेले उदंड प्रेम आणि हेवा करायला लावणारे पु.लं.चे समृध्द आयुष्य या दोघांनीही अगदी जवळून पाहिले असल्याने, असंख्य आठवणींचा खजिनाच त्यांच्याकडे आहे. आज या खजिन्यातील काही आठवणी प्रत्यक्ष या दोघांकडून ऐकायला मिळणार होत्या. स्वत:च्याच भाग्याचा हेवा करत त्यांचा शब्द न शब्द मी कानात साठवू लागले.
बोलता बोलता उमाकांतकाका ६०-७० वर्ष मागे गेले. आम्ही सुरुवातीला जोगेश्वरीला ज्या सोसायटीत रहायचो तिचं नाव 'सरस्वती बाग'. सुरुवातीला आम्हाला तिथे रहायला जागा मिळेना. सोसायटीतच एका पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही रहायचो. मग वर्ष- दोन वर्षानी आम्हाला रहायला जागा मिळाली. त्याकाळी जोगेश्वरीत टाकी महाराज म्हणून होते. 'पुरुषोत्तम' हे नाव त्यांनी ठेवलं. हल्लीच्या महाराजांसारखे ते बुवाबाजी वगैरे करणारे नव्हते. ते education inspector होते. Retire झाले होते आणि प्रवचन करायचे. भाईचं, माझं, रमाकांतचं नाव त्यांनीच ठेवलं. २८-३० साली आम्ही जोगेश्वरीहून पार्ल्याला आलो ते आत्तापर्यंत इथेच आहोत. भाई, मी आणि रमाकांत आमच्यापासून ते आमची तिसरी पिढी सुध्दा 'पार्ले टिळक' मध्येच शिकली. आम्ही शाळेत असतांना, जात-पात वगैरे गोष्टींबाबत लोक जागरुक असत. 'मासे कोण खातात त्यांनी हात वर करा' असंही चक्क शाळेत विचारत. मग आम्हीही आपले इमाने इतबारे हात वर करत असू. कोकणस्थ नाही तो अस्पृश्य असंच समजलं जायचं. अर्थात आम्हालाही कधी या गोष्टीचं वाईट वाटलं नाही. राग यायचा कधीकधी पण ते त्यावेळचे संस्कारच होते तसे. पण जे दोस्त होते ते मात्र सगळे ब्राह्मण. एकदा माझ्या समोरच घडलेला हा किस्सा- आमची आई शेव छान करायची. संध्याकाळी शाळा सुटली कि शेव खायला सगळे जण आमच्या घरी. एकदा भागवत आडनावाच्या एका मित्राने भाईला विचारलं,"पुरुषोत्तम, तू देशपांडे म्हणजे सारस्वत ना?" भाई म्हणाला, "हो""मग तुम्हाला काय म्हणायचे माहितीये?""काय?""तुम्हाला शेणवी म्हणत असत. कारण तुमचे पूर्वज शेण विकायचे."भाईनी ताबडतोब उत्तर दिलं. "तुमचे पूर्वज शेण खायचे म्हणून आमचे पूर्वज शेण विकायचे."
शाळकरी वयापासून अशा प्रसंगांना हसत हसत पु.ल. टोला मारत. जाती व्यवस्थेविषयी पु.लं.च्या मनात चीड म्हणूनच निर्माण झाली असावी. पुढे वयाने, कार्याने मोठे झाल्यावर पु.ल. हा राग बाहेर काढू शकत होते.पण उलट त्यांनी माणूस ही एकच जात कायम मानली आणि ते स्वत:ही कायम तसेच वागले.
लहानपणापासूनच हजरजबाबी असलेल्या पु.लं.चा आणखी एक किस्सा सांगताना रमाकांतकाका म्हणाले, नागपूरच्या एका सभेमध्ये सुरुवातीला अत्रे बोलले. नेहमीप्रमाणे हशा, टाळ्या सगळी सभा अत्र्यांनी जिंकली. मग भाई उभा राहिला. आता हा काय बोलणार असा सगळ्यांना प्रश्न पडला. पण सुरुवातीलाच अत्र्यांची ओळख करुन देताना भाई म्हणाला,'नरसिंहासारखी बलदंड शरीरयष्टी असलेल्या या माणसाचे नाव प्रल्हाद!' आणि या एका वाक्याने भाईने सभा फिरवली. तसंच एकदा वहिनीनी काहितरी काम सांगितलं. दोन-तीनदा सांगूनही ते काम झालं नाही. तेव्हा वहिनी म्हणाली," हे बरं आहे, तुम्हा पुरुषांची सगळी कामं बायकांनी केली पाहिजेत. पण बायकांचं काम मात्र तुम्ही पुरुष कधीच करत नाहीत." भाई म्हणाला," असं बोलू नको, बालगंधर्वांनी आयुष्यभर बायकांचीच कामं केली."
वहिनीला सुध्दा तो गमतीनी 'उपदेशपांडे' म्हणायचा. शिस्त, नियम या बाबतीत ती फारच कडक होती, पण तिला तसं रहावंच लागलं. जिद्द, मेहनत, धडाडी अशा गुणांमुळे संपूर्ण देशपांडे कुटुंबाला सुनीताबाईंनीच सावरलं, सांभाळलं. त्यांच्याविषयीचा आदर उमाकांतकाका आणि रमाकांतकाकांच्या शब्दा शब्दात जाणवत होता." तुम्हाला सांगतो, ती जर व्यवस्थित नसती ना तर भाईला लोकांनी हैराण केलं असतं हे मात्र नक्की. त्याचं काय होतं काहीही झालं की जाऊ दे ना, असू दे ना, पण वहिनी मात्र अगदी Particular होती. 'वाऱ्यावरची वरात' मध्ये सुरुवातीचे प्रसंग हे अनुभवातूनच लिहीलेले आहेत. कुठेही भाषणाचं वगैरे बोलावणं असेल आणि भाईला वेळ नसला तर हे लोक 'ते येणार होते पण येणार नाहीत म्हणून कळ्वलं आहे' असं सांगून मोकळे. म्हणजे दोष भाईलाच. असे प्रसंग घडल्यावर वहिनीनी मग कुठलेही कार्यक्रम, सगळं ठरवणं वगैरे ताब्यात घेतलं. आणि ती ते व्यवस्थित सांभाळायची. कारण कोणाला दुखवायचं वगैरे भाईला जमत नसे. पण वहिनी सुरुवातीला सेवादलात असल्यामुळे एक प्रकारची शिस्त, व्यवस्थितपणा तिच्यात होता."
पु.लं.च्या यशामागे सुनीताबाईंचा असलेला वाटा, त्यांची जिद्द याविषयी उमाकांतकाका आणि रमाकांतकाका भरभरुन बोलत होते. पु.ल. आणि सुनीताबाईंनी दिलेल्या देणग्यांचा विषय निघाला. "देणग्या तर भाईनी लाखो रुपयांच्या दिल्या. पण एकदाही घरात काही सांगितलं नाही. आम्ही पेपरात वाचायचो, तेव्हा आम्हाला समजायचं. तो लोकांना म्हणायचा, तुम्ही मला दाता वगैरे म्हणू नका. मी दाता वगैरे कोणी नाही. जिथे मला असं वाटतं खड्डा आहे तिथे तो बुजवता आला तर शक्य तेवढं मी करु शकतो. दाता वगैरे म्हटलं तर ते घेणारा कोणीतरी कमी आहे असं वाटतं. म्हणून तो म्हणायचा मी दाता वगैरे नाही."
मी एकदा बंगलोरला गेलो होतो. एका तलावाजवळ आम्ही होडीने फिरण्यासाठी म्हणून गेलो. एक बाई धावत आली. म्हणाली, 'तुम्ही देशपांडे का?' मी म्हटलं, 'हो'. 'पु.लं.चे भाऊ का?' 'हो. का?' तर म्हणाली,'मी परवाच पु.लं.कडे गेले होते. चेक आणायला.' असं म्हटल्यावर मला आश्चर्य वाटलं. भाईकडे चेक मागायला कोण गेलं असेल? मी म्हटलं, 'असं का. का बरं?' तेव्हा समजलं, सोलापूर जवळ कुठेतरी एक Open University होती. तेथे भाईनी देणगी दिली होती. मी विचारलं,'किती?' तर ती म्हणाली,'बारा लाख!' हे मला त्या दिवशी त्या बाईकडून समजलं. पण भाईनी किंवा वहिनीनी आम्ही कोणाला इतके पैसे दिले, हे कधी आयुष्यात आम्हाला सुध्दा सांगितलं नाही.
होतकरु वयात भाईनी सहन केलेले अपमान मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. आमचे वडील अचानक गेले. तेव्हा भाई १९ वर्षाचा होता. मी १७ वर्षाचा तर रमाकांत १०-११ वर्षाचा. भाई तेव्हापासूनच शिकवण्या करायला लागला. भावगीतं गायचा. शाळेत असल्यापासूनच चाली लावायचं त्याला वेड होतं. 'माझिया माहेरा जा' ची चाल त्यांनी तो कॉलेजमध्ये असतानाच बसवली होती. नंतर मग ती ज्योत्स्नाबाईंनी गायली. राजा बढे आमच्या घरी यायचे. तेव्हा त्यांनी लिहिलेली ती कविता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना ती चाल भाईनी बसवली. आम्ही तेव्हा पैशासाठी म्हणून १५ रुपयाला कार्यक्रम करायचो. तशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते. भाई पेटी वाचवून गायचा. मी तबल्यावर आणि मधू गोळवलकर सारंगीवर. १५ रुपये मिळायचे. ५-५ रुपये आम्ही वाटून घ्यायचो. त्या काळात अशा परिस्थितीतून आम्ही गेलो होतो. असं होतच असतं प्रत्येकाच्या आयुष्यात. रिक्षाने जायला पैसे नसायचे, म्हणून मग चालत जावं लागे. याचा परिणाम म्हणून असेल भाईकडे दातृत्व आलं. अनेकांना ही गोष्ट माहित नाही, त्यांनी अनेक साहित्यिकांना पुष्कळदा मदत केली आहे. पण परत मागणं वगैरे काही नाही. आणि वहिनीचा Support हा भाईला कायम होता. एक प्रसंग मला आठवतो, एक साहित्यिक नवीनच मुंबईला आला. त्याचं नाव नाही सांगत, पुढे तो खुपच मोठा झाला. पण सुरुवातीला त्याला रहायला जागा नव्हती. एक खोली मिळत होती, पण ९०० रुपये हवे होते. आणि त्याच्याकडे पैसेच नव्हते. त्यावेळेला भाईचं 'बटाट्याची चाळ' फार जोरात चाललं होतं. आणि त्या बुकिंगवर मी असायचो. भाई तेव्हा सांताक्रूझला रहायचा. त्या दिवशी जमलेली कॅश घेऊन मी भाईकडे गेलो होतो आणि त्याच वेळेला तो लेखक आला होता. तो म्हणत होता, वसईला अशी - अशी जागा मिळतेय, पण ९०० रुपये मागतायेत. भाई जरा विचारात पडला. ५ मिनिटांत वहिनी बाहेर आली आणि ९०० रुपये त्याच्या हातावर ठेवले. आमचं जे Collection होतं त्यातले ते ९०० रुपये होते. पण तरी तू परत कधी करणार असं विचारलं सुध्दा नाही. याचं कारण मला असं वाटतं, लहानपणी जे भोगावं लागतं, त्याची दोन reactions होतात. माणूस एक तर फार सूडबुद्धीने तरी वागतो, किंवा अत्यंत प्रेमळ तरी बनतो. सुदैवाने सूडबुद्धी भाईकडे नव्हतीच.
यासंदर्भात आणखी एक उदाहरण सांगतो. नाव नाही सांगत त्या व्यक्तिचं. कारण ती सुद्धा मोठी लोकं आहेत. भाई All India Radio वर होता. Program Executive म्हणून. नंतर त्याची लंडनला बी. बी. सी. वर टेलिव्हिजनच्या शिक्षणासाठी निवड करण्यात आली. जायच्या आधी त्याला सांगितलं गेलं, तुझ्या जागेवर योग्य व्यक्तिची तू निवड करुन ठेव. हे कळल्यावर रेडिओवर applications यायला लागली. एकेकाळी भाई ज्या नाटक कंपनीत होता, त्या नाटक कंपनीचा बोजवारा उडाल्यामुळे तिचा मालक कामाच्या शोधात होता. त्यानीही application दिलं. इतरही ओळखीच्या लोकांनी application केलं होतं. पण भाईनी त्यांना सांगितलं, की तुम्ही सगळे आधीपासून नोकरीवर आहात. त्याला खरी गरज आहे. आणि त्याची निवड भाईनी केली. पण याच माणसाकडे जेव्हा भाई नोकरीला होता आणि एम.ए. करायचं म्हणून भाईनी नोकरी सोडायची ठरवली, तेव्हा तो मालक म्हणाला होता, परत माझ्या दारात आलास तर तुला नोकरी देणार नाही. आणि आज तोच माणूस भाईकडे आला होता. पण भाई त्याच्याशी सूडबुद्धीनी वागला नाही.
भाईची नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पार्ल्यात भाईचा मोठा सत्कार झाला होता. अनेक मोठी माणसं त्यावेळी उपस्थित होती. अतिशय ह्रदयस्पर्शी असा तो कार्यक्रम झाला. कार्यक्रम संपल्यानंतर भाईभोवती लोकांची गर्दी जमली. भाईला प्रत्येकजण हार वगैरे घालत होते. तेवढ्यात गर्दीतून माझा एक मित्र एका व्यक्तिला हाताला धरून घेऊन येत होता. बघतो तर भाईचे शाळेतले तारपुंडे मास्तर होते! भाईला ज्यांनी नाटक शिकवलं. ते गिरगावात रहायचे. गर्दीमुळे त्यांना आत यायला मिळत नव्हतं. आमचा एक मित्र त्यांना हाताला धरुन स्टेजवर घेऊन आला. त्यांनी भाईच्या गळ्यात हार घातला. भाईनी साष्टांग नमस्कार घातला त्यांना. लोक आश्चर्याने बघायला लागले. ते आमचे शाळेतले शिक्षक होते. सायन्स शिकवायचे. पण नाटक, sports activities या गोष्टींना त्यांचे सतत प्रोत्साहन असे."
पु.लं.च्या पेटीविषयी ऐकण्याची माझी खूपच उत्सुकता होती. "भास्कर संगीत विद्यालयात राजोपाध्ये म्हणून मास्तर होते, त्यांच्याकडे आम्ही शिकायला जायचो. आमच्याकडे एक असा नियमच होता, वडील संध्याकाळी ऑफिसमधून आले, की ७ ते ८ भाई पेटी वाजवायचा आणि मी तबल्यावर साथ करायला. पण एक तास पेटीचा रियाझ झाल्याशिवाय आम्ही जेवायला बसत नसू. आमची आईसुद्धा ऐकायला बसत असे. वडील बसत असत. आई चांगली गायची सुद्धा. पेटीची आणि सूरांची ओढ भाईला लहानपणीच लागली. पेटीतर त्यानी ऐकूनच वाढवली. दरवर्षी त्या क्लासचा समारंभा व्हायचा. त्यात कार्यक्रम व्हायचे. एका कर्यक्रमाला बालगंधर्व आले होते. भाई तेव्हा पेटी वाजवायला बसला. त्यांनी कुठलं तरी नाट्यगीत वाजवलं होतं. गंधर्व खुर्चीवरुन उठले आणि भाईच्या समोर येऊन बसले. त्यांनी ते इतकं मन लावून ऐकलं, आणि संपल्यावर भाईच्या पाठीवर शाबासकी दिली! ती पेटी त्यानी पुढे आयुष्यभर सुरु ठेवली. जपली, वाढवली."२२ रु. ला घेतलेली पेटी, आणि ३ रु. ला घेतलेल्या तबल्याची आठवण उमाकांत काकांना अजून आहे. तो तबला त्यांनी अजूनही आठवण म्हणून जपून ठेवला आहे.
"गाणी ऐकायला आणि नाटकं बघायला वडीलांनी कधीही अटकाव केला नाही. रमाकांत अगदी लहान होता. भाईला आणि मला घेऊन वडील शनीवारी ऑपेरा हाऊसला जायचे. रात्रीचं नाटक असे. बालगंधर्व, मा. कृष्णराव सगळ्यांना स्टेजवर आम्ही शाळकरी वयात होतो, तेव्हा पाहिलं आहे. रात्री पार्ल्याला परत यायला गाड्या नसायच्या. १-१:३० वाजता नाटक संपलं, की मराठा हायस्कूल मध्ये बाक ओढून मी, भाई आणि वडील आम्ही तिघेही झोपायचो आणि सकाळी पहिली गाडी पकडून परत यायचो. पण वडीलांनी कधीही मनाई केली नाही. गणेशोत्सवातल्या सगळ्या गाण्यांना आम्ही न चुकता जात होतो. या सगळ्यासाठी वडीलांकडून, आईकडून खूप प्रोत्साहन मिळालं आणि त्याचा भाईनी खूप चांगला उपयोग करुन घेतला.भाईकडे लेखन आलं, ते आजोबांकडून. आमचे आजोबा- ऋग्वेदी, यांनी त्या काळात बरंच लिखाण केलं होतं. 'आर्यांच्या सणांचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास' असं त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. आपले सगळे सण, त्यांची माहिती, त्यांचं महत्त्व असं बरंच अभ्यासपूर्ण आणि वेगळं पुस्तक होतं ते. टागोरांची गीतांजली त्यांनी संपूर्ण अभंगात रचली होती. त्यांचं शिक्षण कानडीत झालं होतं, पण मराठी लेखन करायचे ते. शिवाय गीतांजली वाचण्यासाठी म्हणून बंगाली सुद्धा शिकले. मग ती संपूर्ण अभंगात रचली आणि ते पुस्तक टागोरांना नेऊन दाखवलं. त्यामुळे लेखनासाठीचं प्रोत्साहन भाईला आजोबांकडून मिळालं.
भाषणाच्या बाबतीत सुद्धा वडील सांगत तुझं भाषण तूच लिहून काढलं पाहिजेस. वडीलांच्यामुळेच शाळकरी वयात भाईंच्या वकतॄत्व कलेला प्रोत्साहन मिळालं. मला शाळेत असतानाच त्यानी किर्तन सुद्धा लिहून दिलं होतं. अगदी पूर्वरंग, उत्तररंगासकट! 'बेबंदशाही' हे नाटक भाईनी स्त्री पात्र वर्ज्य करुन लिहिलं. आम्ही ते शाळेत असतांना सादर सुद्धा केलं होतं. भाई स्वत: संभाजी झाला होता. आम्हाला मावळे केलं होतं. (कारण मावळ्यांना भाषण नव्हतं.)
हे करु नको, ते करु नको, असं आम्हाला घरुन कधीही सांगितलं गेलं नाही. अभ्यासातही लक्ष असायचं, तसंच ह्या activities मध्येही. आईवडीलांचा यात खूप मोठा हात आहे.भाईच्या उत्स्फूर्तपणा, वक्तृत्व या गुणांना यामुळे लहानपणीच प्रोत्साहन मिळालं. कुठेही काही कार्यक्रम झाले, खाडिलकरांनी पोवाडे म्हटले, की दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पोवाडा. पुढे जे एकपात्री त्यानी केलं, ते तो लहानपणापासूनच करत होता."
एकपात्री वरून सहाजिकच 'बटाट्याच्या चाळी'चा विषय निघाला. उमाकांतकाका म्हणतात,'चाळीवर' ते एक पुस्तक लिहू शकतील एवढ्या आठवणी आहेत त्यांच्याकडे. अत्रे, नाथ पै, मामा वरेरकर अशा दिग्गज मंडळींनी 'चाळीच्या' प्रयोगाला दिलेल्या भेटीच्या आठवणी ते सांगत होते.मामा वरेरकर दिल्लीहून खास प्रयोग बघण्यासाठी म्हणून आले होते. interval ला काही हवं का म्हणून विचारलं, तर म्हणाले, नको. तो दमला असेल. मी बसतो इथेच. आणि खुर्चीत बसून राहिले. मी भाईला जाऊन सांगितलं. त्यांना तुला भेटायचं आहे, पण म्हणाले तू दमला असशील. जरा वेळाने भेटतो. भाई म्हणाला, नाही नाही. मी येतो आत्ताच. भाई आला. तोपर्यंत लोक निघून गेले होते. मामा वरेरकर खुर्चीतच बसून होते. भाई आल्याबरोबर ये, बस म्हणाले. आपल्या शेजारी बसवलं आणि पाठीवरुन हात फिरवत म्हणाले, 'बाळा दमला असशील रे.' इतकं त्यांचं प्रेम होतं भाईवर. भाईनी रेडिओवरची नोकरी सोडल्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटलं असेल ते मामा वरेरकरांना. मला न सांगता तू नोकरी कशी सोडलीस म्हणून त्यांना रागही आला होता. इतके प्रेमळ होते ते.
एकदा अत्रे 'चाळीच्या' प्रयोगाला आले होते, पण न भेटताच निघून गेले. भाईला वाटलं त्यांना प्रयोग आवडला नसेल. प्रयोग संपल्यावर रात्री आम्ही सगळे भाईच्या घरी जायचो. तिथे जेवून वगैरे गप्पा मारत बसलो होतो. १-१:३० वाजता फोन वाजला. भाईनी फोन उचलला. कानाला लावला. आम्ही सगळे बघत होतो. 'मी बाबुराव अत्रे बोलतोय. आत्ताच तुझ्यावर अग्रलेख लिहून संपवला आहे. आता मी मरायला मोकळा.' आणि खरोखरीच त्यांनी दुसऱ्या दिवशी मराठा मध्ये 'चाळी'वर चार कॉलमचा अग्रलेख लिहिला! तो अजूनही 'टिळक मंदिरात' ठेवला आहे.
'बटाट्याची चाळ' नंतर, 'पु.ल.देशपांडे सहकुटुंब सहपरिवार'.. 'वराती'च्या प्रयोगाबद्दल ऐकायला साहजिकच आम्ही उत्सुक होतो.रमाकांतकाका सांगायला लागले, "आम्ही सगळे नातलग, मित्र मिळूनच 'वाऱ्यावरची वरात' करायचो. भाई, वहिनी, मी, काही दिवस उमाकांत, माझा एक भाचा, एक बहीण आणि आमची इतर सगळी मित्र-मंडळी सुद्धा अगदी घरच्यासारखीच. आमची अशी नाटक कंपनी वगैरे नव्हती. सगळे घरचेच. त्यामुळे वातावरण सुद्धा खेळीमेळीचं असायचं. आणि प्रयोग सुद्ध कसे, तर दररोज व्हायचे. 'असा मी असामी' चा प्रयोग सुद्धा भाईनी १५ दिवस सलग केला आहे. 'वराती'च्या वेळेला प्रत्येकाची नोकरी धंदा यामुळे आम्ही शनिवार, रविवार सलग पाच प्रयोग सुद्धा केले आहेत. शनिवारी २ प्रयोग आणि रविवारी ३ प्रयोग.
तेव्हा आम्ही सगळे खूप काही actor वगैरे नव्हतो. पण एकत्र मिळून करायचो. आता लालजी देसाई, त्याला स्टेजवर जाऊन एक वाक्य बोलता येत नाही. स्टेजवर गा म्हटलं तर गाईल, पण नाटकात काम कर म्हटलं तर शक्य नाही. भाईनी सांगितलं, मी तुला असं काम देतो, की त्यात फक्त तुला गायला लागेल. वाक्य दोन-चारच असतील. आणि मग त्याला 'देसाई मास्तर'चं काम दिलं ती ४-५ च वाक्य होती काहितरी. पण ती सुद्धा तो बिचार पाठबिठ करुन म्हणत असे. श्रीकांत मोघे, दत्ता भट, शशी झावबा हे सगळे मित्रच होते त्याच आमचे.
आमचा एक भाचाही होता. त्याल नुसतं येऊन बसायचंच काम होतं. कोणीतरी गावातला वगैरे माणूस म्हणून. बोलायचं काही नव्हतं. मग तो आपला येऊन नुसता बसायचा. म्हणजे अशी सगळी घरचीच मंडळी होती. लालजी देसाईला तसं फक्त गायचंच काम होतं. आणि ४-५ वाक्य. पण एकदा त्याला यायला उशीर होणार होता, म्हणून भाईनी त्याला मुंबईहून पुण्याला विमानानी नेला. भाईची प्रत्येकालाच अशी घरच्यासारखी treatment होती. त्यामुळे ते ही सगळे फार खूष असायचे. आणखी एक जण म्हणजे मधू गानू. जो भाईचा आयुष्यभर सेक्रेटरी म्हणून राहिला. आणि अजूनही वहिनीला मदत करतो. पुरुषोत्तम मंत्रीसारखा ऑफिसरसुद्धा धोब्याचं काम करायचा वरातीत. नीला देसाई (नीलम प्रभू), विजया मेहता असे आम्ही सगळे जण एकाच कुटुंबातले असल्यासारखे होतो."
पु. लं.ना मिळालेली लोकप्रियता, रसिकांचे उदंड प्रेम याचेही अनेक किस्से या दोघांकडे आहेत. उमाकांत काका अगदी भाईंसारखे दिसत असल्यामुळे फसलेलेही बरेच लोक आहेत. त्यांनी एक किस्सा सांगितला. "आम्ही म्हैसूरला फिरायला गेलो होतो. एक ठिकाणी तलावाजवळ उभे होतो. तिथेच मला वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर भेटले. आम्ही तिघेही बोलत होतो. तेवढ्यात एक फोटोग्राफर धावत आला आणि दोघांना म्हणाला, "तुम्ही दोघे बाजूला व्हा. मला पु.लं.चा फोटो घ्यायचा आहे." वसंत बापटांनी डोक्याला हात लावून सांगितले, हा पु.लं.चा भाऊ आहे. मी वसंत बापट आणि हे पाडगावकर आहेत.
तसंच एकदा पार्ल्यात रस्त्यावरुन फिरत असतांना पु.लं.चे भाऊ म्हणून मला एका साऊथ इंडियन माणसाने अक्षरश: साष्टांग नमस्कार घातला होता."उमाकांत आणि रमाकांत काका आठवणींची एकेक लड उघडत होते. आम्ही ज्या खोलीत बसलो होतो, त्या खिडकीबाहेरुन निरनिराळ्या पक्ष्यांचे गोड आवाज पार्श्वसंगीताचं काम करत होते. आणि त्या काळचं ते घर, वातावरण याची कल्पना येत होती. त्या खिडकीबाहेरची ती झाडं, आम्हीसुद्धा या सगळ्याचे साक्षीदार आहोत बरं का! असंच जणू सांगत होती.
शब्दांशी लीलया खेळणारा, सुरांच्या हातात हात घालून चालणारा, जीवनातला प्रत्येक क्षण अक्षरश: जगलेला आणि मराठी माणसाच्या गळ्यातला ताईत बनलेला तो जादूगार... त्याच्या आठवणी एका तासात थोडीच संपणार होत्या? पण त्यातल्या ज्या काही आमच्या वाट्याला आल्या, त्या मात्र आमची 'पुलकित' संध्याकाळ सोनेरी करुन गेल्या.
- स्मिता मनोहर.
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Thursday, March 29, 2007
पुलकित संध्याकाळ - स्मिता मनोहर
Labels:
PL Deshpande,
Pula,
Pula Deshpande,
pulaprem,
आठवणीतले पु.ल.,
पु.ल.,
पु.लं.,
पुलं
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 प्रतिक्रिया:
I really appreciat what you have done here.All articles are beautiful but i cant stop wondering that how could you collect so much good stuff?Kuthun milavali hi articles?
Lekh aawadala. Pulanvishayi navin mahiti milali. Ha bloghi pushkal mehanatine tayar kela aahe. Dipakchya mehenatila dad deto
Smita- Tuza Lekh wachla aNi bharavun gelo.. Mi Swakshrichya nimittane 2-3 veLa PuLa nna bheTlo hoto, tevdhya shidorivar aaj paryant phushrki marat hoto , paN tuza lelkh wachla aNi akharshaha out jhalo.. Tu kiti lucky aahes he aaj kaLale ..Abhinandan, Pulanchyach shabdat lihayche tar - Kiti lihile ya peksha kaay lihile he mahatvache ! Too Good, navhe 3 good !!!!
Vijay Deshpande
ha blog kharach chan ahe ......thnks thnks alot .......kharach apratim
Post a Comment