Saturday, October 30, 2021

चित्रपटातले पु.ल. - सतीश जकातदार

पु. ल. म्हणत असत की, 'मी चित्रपटात ! होतो त्यापेक्षा मी चित्रपटात नव्हतो, हेच अधिक महत्त्वाचे!'

पु. ल. देशपांडे यांनी १९४७ साली 'कुबेर' या चित्रपटातून मराठी चित्रसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. त्यावेळी देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. 'प्रभात' काळाचा अस्त झाला होता. युद्धोत्तर मराठी सिनेमाची पायाभरणी करत मराठी सिनेमा आकाराला येत होता. मध्यमवर्गासह कामगारवर्गही मराठी सिनेमाकडे आकर्षित होत होता. व्ही. शांताराम यांच्या 'लोकशाहीर रामजोशी' आणि 'जय मल्हार' सारख्या ग्रामीण-तमाशापटांना लोकाश्रय मिळत होता. राजा परांजपे, दत्ता धर्माधिकारी व अनंत माने हे आस्ते कदम आपला प्रभाव मराठी चित्रपटावर उमटवत होते.

बालगंधर्वांचा काळ ओसरला होता. तरीही त्यांच्या संगीताची मोहिनी रसिकांवर होती. मराठी रंगभूमी कात टाकून नवतेची कास धरली होती. पु. लं. याच काळात रंगभूमीवर कार्यरत होते. 'फर्गसन'मध्ये मराठी घेऊन बी.ए. करत असतांनाच त्यांनी धाडस करून चिंतामणराव कोल्हटकरांच्या 'ललितकला कुंज' या व्यावसायिक नाटक कंपनीत प्रवेश केला. तिथेच राम गणेश गडकरींच्या 'भावबंधन' व 'राजसंन्यास' या नाटकात ते चमकले. गडकरींच्या विनोदाची संथा त्यांना तिथे मिळाली. याच काळात त्यांनी मो. ग. रांगणेकरांच्या या 'नाट्यनिकेतन' या नवोन्मेषशाली नाटक कंपनीत प्रवेश मिळवला. तिथेही त्यांनी 'वहिनी' नाटकातील वल्लभच्या छोट्याशा भूमिकेनं लक्ष वेधून घेतलं.

नाटयनिकेतनच्या रांगणेकरांनी 'कुबेर' चित्रपटाची निर्मिती केली. त्यात पु. लं. नी नायिकेच्या भावाची भूमिका केली. धनाढ्य कुटुंबातील गाण्या-बजावण्यात रमलेल्या लाडावलेल्या तरुणाची ती भूमिका होती. या भूमिकेत त्यांना 'जा जा गं सखी...' हे गाणं म्हणण्याची संधीही मिळाली. या चित्रपटापासून पु. लं. चा चित्रपटप्रवास सुरू झाला. 'कुबेर' पाठोपाठ 'भाग्यरेखा' मध्ये नायिकेच्या भावाची भूमिका त्यांनी केली. इथे मात्र शांता आपटे नायिका होती.

"कुबेर' चे चित्रीकरण 'प्रभात स्टुडिओ'त चालू होतं. या दरम्यानच त्यांना नायकाची भूमिका चालून आली ती पु. रा. भिडे यांच्या 'वंदे मातरम' या चित्रपटात. विशेष म्हणजे पु. लं. च्या पत्नी सुनीता देशपांडेच या चित्रपटाच्या नायिका होत्या. भिडे स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेले. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवरचे कथानक घेऊनच चित्रपट आकाराला आला होता. पुढे मराठीविश्वात अजरामर ठरलेल्या पु. ल. गदिमा व सुधीर फडके या त्रिकुटाचा हा पहिला चित्रपट. 'वेद मंत्राहून महान, वंद्य वंदे मातरम्' हे अजरामर गीत याच चित्रपटातील.

'वंदे मातरम' चे दिग्दर्शक होते राम गबाले. गबाले, गदिमा अशा मित्रमंडळीत गप्पाष्टकं चालत आणि त्यातूनच एखाद्या चित्रपटाचं बीज उमलत असे. या मित्रांच्या आग्रहाखातरच पु. लं. नी आपल्या बहुविध पैलूंचे दर्शन चित्रपटातून घडवलं. तो काळ या मित्रमंडळीच्या दृष्टीने मंतरलेला होता. कच्चा आराखडा गप्पांगप्पांतून आकाराला येत असे आणि त्यातूनच पु. लं. च्या प्रतिमेला पंख फुटत असत. त्यातूनच पु. लं. नी चित्रसृष्टीतील लेखक, पटकथाकार, गीतकार, संगीतकार व प्रमुख अभिनेता-दिग्दर्शक आदि शिखरं पादाक्रांत केली. राम गबाले या मित्राखातर त्यांनी सात-आठ चित्रपटांतून आपल्या विविध पैलूंचे दर्शन घडविलं. 'कुबेर', 'भाग्यरेखा' व 'वंदे मातरम' या तीन चित्रपटांसह पु. लं. नी अवघ्या सात वर्षात (१९४७ ते १९५४) २४ चित्रपट केले. त्यातील फक्त पाच चित्रपटात त्यांनी नायिकाची भूमिका केली. या सा-या भूमिका परस्परांपेक्षा भिन्न होत्या.

'वंदे मातरम' मध्ये स्वातंत्र्य चळवळीचा कार्यकर्ता म्हणून ते दिसले तर व्यंकटेश माडगूळकरांच्या कथेवरील 'पुढचं पाऊल (१९५०)' या चित्रपटात किस्न्या ढोलकीवाल्याची भूमिका त्यांनी केली. राजा परांजपे दिग्दर्शित या चित्रपटात किस्न्या पाऊल (१९५०)' या चित्रपटात शहरात पैसे कमवून खेड्यात शेती फुलविण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या ढोलकीवाल्याची भूमिका पु. लं. नी झोकात सादर केली. गदिमा, सुधीर फडके व पु. लं. या त्रिकुटाला आणखी एक चित्रपट 'जोहार मायबाप जोहार' हा संतपट होता. त्यात भाबड्या संतपणाला साजेशी संत चोखामेळ्याची भूमिका पु. लं. नी अपार समजुतीने केली. 'चष्मा काढला की पु. लं. अगदी संत दिसतो' अशी प्रतिक्रिया गदिमांनी दिली होती. हाच चित्रपट १९७१ मध्ये 'ही वाट पंढरीची' या नावाने पुनर्प्रदर्शित झाला होता.

रशियन नाटककार निकोलाय गोगॉल यांच्या 'द गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर' या नाटकाचे पु. लं. नी 'अंमलदार' या नावाने स्वैररूपांतर केले होते. एका विलीन झालेल्या संस्थानात लाचलुचपत कशी चालते याचा खरपूस समाचार घेणारी ही कथा. सर्जेराव हा गुंड तरूण या संस्थानात येतो. लोक त्याला सरकारी अंमलदार समजतात आणि त्यातून जी धमाल उडते त्याची गोष्ट! याच नाटकावर आधारित 'अंमलदार' चित्रपटात पु. लं. नी नाटकाप्रमाणेच पु. सर्जेरावची भूमिका केली. सर्जेरावने केलेल्या अखेरच्या भाषणात नकलाकार म्हणून पु. लं. चे सारे गुण या भूमिकेत सामावले होते.

जेम्स थर्बरच्या 'द सिक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिटी' या चित्रपटावरून स्फूरलेला 'गुळाचा गणपती' हा चित्रपट 'सबकुछ पु. ल.' असा होता. त्यात त्यांनी स्वप्नाळू व बावळट ध्यान असणाऱ्या हरकाम्या पोराचं सोंग हुबेहूब उभं केलं होतं. 'गळाचा गणपती हा त्यांचा अजरामर विनोदी चित्रपट विविध छटांच्या सादर केलेल्या त्यांच्या या "सबकुछ पु. ल.' असा होता. त्यात त्यांनी स्वप्नाळू व बावळट ध्यान असणाऱ्या हरकाम्या पोराचं सोंग हुबेहूब उभं 'केलं होतं. 'गुळाचा गणपती' हा त्यांचा अजरामर विनोदी चित्रपट. विविध छटांच्या सादर केलेल्या त्यांच्या या बहुविध भूमिकेत पु. लं. चे अभिनय कसब दिसले पण 'परफॉर्मर पु. लं.' च्या तुलनेत हे प्रमाण अल्पच होतं.

चित्रपटात त्यांना अभिनय क्षमतेपेक्षा त्यांच्या लेखन व सांगितिक क्षमतेला अधिक वाव मिळाला. चित्रपटाचे संगीतकार म्हणून त्यांनी सुमारे दहा चित्रपटांना संगीत दिले. पु. लं. नी चित्रपटासाठी एकूण ८८ गाण्यांना चाली दिल्याची नोंद आहे. त्यातील निम्म्याहून अधिक आज उपलब्ध आहेत. संगीताबाबत सूक्ष्म नजर असणारे व उत्तम पेटीवादक असणारे पु. ल. चित्रपटात येण्याअगोदर सुगम संगीतात मुशाफिरी करत होते. त्यांची अनेक भावगीतं लोकप्रिय होती. बालगंधर्व व मास्टर कृष्णराव यांच्या संगीताचा संस्कार घेऊनच त्यांनी चित्रपटातून आपलं सांगितिक कसब दाखवलं. श्रीधर पार्सेरकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 'जा जा गं सखी, मुकुंदा (कुबेर)' हे गाणं पेटीवर म्हणत त्यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं तर 'मोठी माणसं (१९४९)' या चित्रपटाच्या निमित्ताने 'संगीतकार' म्हणून स्वतःची नाममुद्रा उमटविण्यास प्रारंभ केला. 'मानाचं पान', 'देव पावला', 'दूध भात', 'देवबाप्पा' आणि 'गुळाचा गणपती' असे त्यांची संगीतकार म्हणून गाजलेले चित्रपट.

पु. लं. स्वतः उत्तम गायक व उत्कृष्ट पेटीवादक असल्याने चित्रपटातील प्रसंगांना अनुरूप अशा अवीट गोडीच्या चाली ते सहजगत्या लावीत असत. 'नवरा-बायको' चित्रपटातील विष्णूपंत जोगांनी हे गाणं तर त्याकाळी बेफाट लोकप्रिय आहे. ही कुणी छेडिली तार' किंवा 'करू देत श्रृंगार' अशी अवीट गोडीची गाणी पु. लं. नी रसिकांना बहाल केली. त्यांची गाणी खास मराठी ढंगाची होती. काही उडती व सहजपणे ओठांवर रेंगाळणारी होती तर काही रागदारी संगीताचा प्रभाव असलेली होती. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या 'दूध भात' मध्ये गायलेला 'तोडी’ तर 'अंमलदार' मधील 'पुरिया' तर 'गुळाचा गणपती' मधील 'ही कुणी छेडिली तार' मधील केदार ही उदाहरणे चटकन आठवतात.

'गुळाचा गणपती' मधील 'इंद्रायणी काठी... देवाची आळंदी' हे तर कृष्णरावांचा प्रभाव लख्खपणे दिसणारं भजन.. पं. भीमसेन जोशींनी तर या भजनाला आपल्या मैफिलीत 'भैरवी' चं स्थान दिलं. पु. लं. नी चित्रपटातील गीतांना .पु. लं. नी कधी स्त्रीगीतं-लोकगीतांचे रंग भरले तर कधी ग्रामीण टच दिला. तर कधीकधी 'इथेच टाका तंबू' सारख्या गीतात" अरबी सुरांची लकेर साधली. मराठी वातावरणातला सच्चा सूर सांभाळणारा आणि पूर्वसुरींच्या संस्काराची लय जपणाऱ्या संगीताची पु. लं. नी चित्रपटातून पेरणी केली. आणि म्हणूनच आजही त्यांची अनेक गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. संगीताइतकेच पु. लं. नी चित्रपटाच्या पटकथा व संवादलेखनात आपले कसब दाखवलं. सुमारे १७-१८ चित्रपटांसाठी त्यांनी कधी कथालेखन केलं. तर कधी पटकथा-संवादलेखन केलं. 'मी लेखक होतोच, मला पटकथा सहज समोर दिसायची, मग मी आपला छोट्या-छोट्या प्रसंगाची माळ रचत जायचों' असं म्हणत पु. लं. नी सहजपणे पटकथा लिहिल्या. पु. लं. ची भाषाशैली लवचिक असल्याने त्यांनी संवादलेखन प्रसंगाला साजेसे पण खुमासदार केले.

जागा भाड्याने देणे आहे (१९४९) या चित्रपटात प्रियकर-प्रेयसी एकांत मिळावा म्हणून हॉटेलात जातात, पण वेटर सारखा घुटमळत असतो; आणि 'साब, क्या लाऊँ 5' असे सारखे विचारतो. त्यावर 'दो ऑम्लेट लाव और थोडसा वेळ लाव' असे चलाख उत्तर देणाऱ्या संवादाला पु. लं. स्पर्श होता. संवादातील सहजपणा पु. लं. च्या चित्रपटातील संवादलेखनात डोकावत होता. अनेक चित्रपटात त्याची उदाहरणे सापडतील. संवादातील नाटकीपणाला पु. लं. नी छेद दिला. अगदी अलीकडच्या डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित 'एक होता विदूषक (१९९३)' मधील संवादलेखन पु. लं. च्या लिखाणातील लवचिकपणाचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारे आहे. या चित्रपटासाठी पु. लं. ना संवादलेखनाचे पारितोषिकही मिळाले होते. चित्रपटासाठी त्यांना मिळालेला बहुर्थी हा एकमेव बहुमान!

अवघ्या आठ-दहा वर्षांत २५-३० चित्रपटांची कारकीर्द, असूनही पु. लं. चित्रसृष्टीत रमले नाहीत. 'गुळाचा गणपती (१९५४) नंतर खरंतर चित्रसंन्यास घेतला. नंतर एक-दोन चित्रपटांसाठी कथा-पटकथा लेखन केले इतकेच पण ते रमले नाहीत. त्यांच्या लेखन, संगीत, नाटक या प्रांतातच अधिक रंगले. चित्रपटाच्या निमित्ताने भेटलेल्या अवलियाची शब्दचित्रे मात्र त्यांनी रंगविली. संगीतकार वसंत पवार, गदिमा, डॉक्टर केशवराव भोळे यांच्यावरील लेख त्याचीच साक्ष आहेत. पु. लं. चा सहभाग असलेल्या २८ चित्रपटांपैकी फार थोडे चित्रपट आज उपलब्ध आहेत. काळाच्या ओघात त्यांचे अनेक चित्रपट नामशेष झाले आहेत. चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. पु. लं. चे निवेदन असलेला दामूअण्णा मालवणकर अभिनित अनोखा 'लघुपट' राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध आहे, हे सुदैव!

पु. लं. नी स्वतः निवेदन केलेली 'फिल्म्स डिव्हीजन' निर्मित 'पु. ल.' ही डॉक्युमेंटरी 'निवडक पु. ल.' सारख्या अभिवाचनाच्या दृष्यफिती, पु. लं. चे पेटीवादन, काव्यवाचन, 'वाऱ्यावरची वरात' नाटक व पु. लं. भाषणाच्या दृष्यफिती हा सारा खजिना आजही मराठी माणसाचं विश्व 'इंटरनेट'वर व्यापून आहे. त्याचा आस्वाद वेळोवेळी लोक उत्साहाने घेत आहेत. पु. लं. ची जीती जागती ही दृक-प्रतिभा रसिकांना सदोदित स्मरणदायी ठरत आहे, हेही नसे थोडके!

आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे सदा सर्वकाळ मराठी मनात स्मरणाधीन राहिलेले पु. ल. चित्रसृष्टीत अल्पकाळ रमले तसेच त्यांच्या लेखनावर आलेल्या काही चित्रपटांत प्रेक्षक फारसे रमले नाहीत. 'म्हैस' या गाजलेल्या विनोदी कथेवरील 'चांदी' व 'म्हैस' हे दोन्ही चित्रपट बेतास बेतच होते. ते गाजले त्यांच्या 'स्वामीत्व हक्काच्या वादामुळे' तर पु. लं. च्या लेखनावर आधारलेला 'गोळा बेरीज' हा चित्रपट केवळ 'गल्ला बेरीज' ठरला. पु. लं. च्या विनोदाचे उथळ सादरीकरण म्हणूनच या चित्रपटाकडे बघितले गेले. अगदी या वर्षी आलेला पु. लं. च्या आयुष्यावरचा बायोपिक 'भाई' हा विपर्यास्त सादरीकरणामुळे गाजला. त्यात पु. लं. मधील अचाट अवलियामागे लपलेल्या दुर्दम्य माणसाचे दर्शन घडण्याऐवजी नको त्या प्रसंगांचे दर्शनच घडले. काळाच्या पडद्यावर अजरामर ठरलेला हा अष्टपैलू असामी रूपेरी पडद्यावर मात्र दुर्दैवी ठरला इतकेच! पु. लं. म्हणत असत की, 'मी चित्रपटात ! होतो त्यापेक्षा मी चित्रपटात नव्हतो, हेच अधिक महत्त्वाचे!'

सतीश जकातदार
१२ जून २०२१
सकाळ 
- (सदर लेखाचे लेखक हे आशय फिल्म क्लबचे संस्थापक-सचिव आणि चित्रपट चळवळीचे संयोजक आहेत.)

Wednesday, October 27, 2021

सुनीताबाईंच्या प्रेमाचं कठीण कोवळेपण - शुभदा पटवर्धन

सुनीताबाईंच्या ‘आहे मनोहर तरी’ या आत्मपर लेखनातून त्यांच्यातले स्वभावविशेष अधिक ठळकपणे वाचकांसमोर आले आणि तोपर्यंत एका ठरीव ठशाचं साहित्य वाचण्याची सवय झालेलं साहित्यविश्व ढवळून निघालं. मंगला गोडबोले यांनी लिहिलेलं ‘सुनीताबाई’ हे पुस्तक वाचायला घेताना ही पाश्र्वभूमी मनात तयार होते. ‘हा स्मृतिग्रंथ किंवा गौरवग्रंथ भाबडय़ा भावुक स्मरणरंजनाची पखरण करणारा आरतीसंग्रह नाही.’ ही या पुस्तकामागची भूमिका मंगलाबाईंनी मनोगतातच स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुस्तकाकडे बघण्याच्या आपल्याही दृष्टिकोनाला दिशा मिळते.

‘त्यांच्या घरी जाते आहेस, पण घरात ये म्हणतीलच अशी अपेक्षा ठेवून जाऊ नकोस हं.’

‘ज्या वेळेला बोलावलं आहे, तेव्हाच पोच. पाच मिनिटंसुद्धा मागेपुढे नको.’

‘बोलतीलच याची खात्री नाही आणि बोलल्याच तर नेमकी उत्तरं दे. उगीच फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची.’

‘एकदम कडक काम आहे. पुलंच्या अगदी विरुद्ध. त्यामुळे जरा जपूनच.’
काही वर्षांपूर्वी अगदी पहिल्यांदा सुनीताबाईंना भेटण्यासाठी जाणार होते, तेव्हा मिळालेल्या या सूचना.

खरं तर ज्या कामासाठी जाणार होते ते काम तसं काही फार महत्त्वाचं नव्हतं. त्यांच्याकडून फक्त एक लेख आणायचा होता. ‘सुनीताबाईंकडून लेख आणायचा आहे, कुणालाही पाठवून चालणार नाही,’ अशी सावध भूमिका घेत संपादकांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मीही नाही म्हटलं नाही. इतकंच. तरीही एक प्रकारचं दडपण मनात घेऊनच गेले. प्रत्यक्षात मात्र अगदी सर्वसाधारणपणे जसं आगतस्वागत होईल, तसंच झालं. खूप उबदार नाही पण अगदीच कोरडंठक्कही नाही. दोन्हीच्या मधलं. समंजस. त्या अशा वागतील, तशा वागतील असं जे चित्र निर्माण केलं गेलं होतं, तसं काहीही झालं नाही. ‘वाचते मी तुमचं लिखाण’, असं सांगून एक धक्काच दिला. एवढंच नाही तर हे तोंडदेखलं म्हणत नाही हे दर्शवण्यासाठी काही लेखांचाही उल्लेख केला. हे सगळं माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होतं. गेल्या पावलीच परतायचं असं मनाशी ठरवून गेलेली मी चक्क अध्र्या तासानंतर बाहेर पडले. पुढच्याही मोजक्या भेटींमध्ये कधी ‘असा विक्षिप्त’ अनुभव आला नाही आणि त्यामुळे असा ताणही कधी जाणवला नाही. पहिल्या भेटीची आठवण नंतर कधी तरी त्यांना सांगितल्यावर काहीही न बोलता त्या फक्त हसल्या होत्या. पण एखाद्या घटनेची, गोष्टीची, विधानाची कानगोष्ट व्हायला वेळ लागत नाही. सुनीताबाईंच्या बाबतीत असंच झालं. सामाजिक रूढ चौकटीत न बसणाऱ्या त्यांच्या स्वभावविशेषांची आवर्तनं पुन:पुन्हा आळवली गेली आणि कळत-नकळत त्यावर शिक्कामोर्तबही होऊन गेलं.

सुनीताबाईंच्या ‘आहे मनोहर तरी’ या आत्मपर लेखनातून त्यांच्यातले हे आणि इतर बरेच स्वभावविशेष अधिकच ठळकपणे वाचकांसमोर आले आणि तोपर्यंत एका ठरीव ठशाचं साहित्य वाचण्याची सवय झालेलं साहित्यविश्व ढवळून निघालं. मंगला गोडबोले यांनी लिहिलेलं ‘सुनीताबाई’ हे पुस्तक वाचायला घेताना ही पाश्र्वभूमी मनात होतीच. ‘हा स्मृतिग्रंथ किंवा गौरवग्रंथ भाबडय़ा भावुक स्मरणरंजनाची पखरण करणारा आरतीसंग्रह नाही.’ ही या पुस्तकामागची भूमिका मंगलाबाईंनी मनोगतातच स्पष्ट केली आहे, ते बरं झालं. पुस्तकाकडे बघण्याच्या आपल्याही दृष्टिकोनाला दिशा मिळते. कारण आजकाल एखादी नामवंत व्यक्ती गेल्यानंतर विविध ठिकाणी प्रसिद्ध होणाऱ्या श्रद्धांजलीपर लेखांचं संकलन करून पुस्तकं प्रकाशित होतात. अशा संकलनाची एक वेगळी गोडी असते. नाही असं नाही. पण तरीही त्यातला सरधोपटपणा त्रासदायक होतोच. सुनीताबाईंसारख्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाला या सरधोपट चौकटीत बसवण्याची कल्पनाही करवत नाही. पण वाचकांची नस अचूक ओळखलेल्या राजहंस प्रकाशनानं ‘असं जगणं’ (जन्मापासून ते मृत्युपर्यंतचा कालावधी), ‘असं लिहिणं’ (लेखनप्रवास) आणि ‘असं वागणं’ (स्वभाव वैशिष्टय़) या तीन धारणा आणि जोडीला अरुणा ढेरे यांचा दीर्घ लेख अशा चौकटीतून सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतलेला आहे.

विनायक प्रसादमधील एक खोलीच्या छोटय़ा बिऱ्हाडापासून ते लंडन-पॅरीसमधल्या बिऱ्हाडांपर्यंत अशा अनेक घरांबद्दल सुनीताबाईंच्या चांगल्या-वाईट अनेक आठवणी निगडित आहेत. कुठे मर्ढेकरांची पिठलं-भाकरीची फर्माईश पूर्ण केल्याचा आनंद, तर कुठे पुलंमधले कलागुण बहरायला लागले, म्हणून समाधान.

सुनीताबाई आठ भावंडांतल्या चौथ्या. लहानपणापासूनच वेगळेपणामुळे उठून दिसत. पण त्यांचं व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थानं झळाळून उठलं ते बेचाळीसच्या चळवळीतल्या सहभागानं. स्वत:मधल्या क्षमता त्यांना कळल्या. त्यामुळेच परजातीतल्या - निर्धन - बिजवराशी लग्न करण्याचा निर्णय त्या घेऊ शकल्या आणि हा निर्णय घरच्यांच्या गळी उतरवण्यातही यशस्वी झाल्या. लग्नानंतर त्यांचं सगळं आयुष्यच बदललं. आयुष्यभरात सात गावं आणि बावीस घरांमध्ये बिऱ्हाडं मांडावी लागली. अशा किती जागा बदलायला लागल्या तरी प्रत्येक नव्या ठिकाणी सुनीताबाई त्याच उभारीनं उभ्या राहात. कितीही अडीअडचणी आल्या तरी कर्तव्यदक्षतेत कधी कमी पडल्या नाहीत. कुठेही मनापासून रुजायची जणू त्यांनी मनाला ताकीदच दिली होती. पुलंच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं व्रत घेतलं असल्यामुळे येणाऱ्या अडीअडचणींची झळ त्यांनी पुलंना कधी बसू दिली नाही.

असं लिहिणं’ हे प्रकरण अर्थातच सुनीताबाईंच्या लेखिका या भूमिकेतील प्रवास मांडते, पण लेखिका म्हणून त्यांच्या आयुष्यातलं पर्व सुरू झालं तेच मुळी साठीनंतर. तोपर्यंत लेखिका होण्यासाठी पोषक अशी परिस्थिती असतानाही सुनीताबाईंनी कधी या वाटेचा विचारही केला नव्हता.

विनायक प्रसादमधील एक खोलीच्या छोटय़ा बिऱ्हाडापासून ते लंडन-पॅरीसमधल्या बिऱ्हाडांपर्यंत अशा अनेक घरांबद्दल सुनीताबाईंच्या चांगल्या-वाईट अनेक आठवणी निगडित आहेत. कुठे मर्ढेकरांची पिठलं-भाकरीची फर्माईश पूर्ण केल्याचा आनंद, तर कुठे पुलंमधले कलागुण बहरायला लागले, म्हणून समाधान. कुठे घरात जेवण बनवता येत नसे, तर कुठे खालून पाणी भरायला लागत असे. पुलंना आकाशवाणीत नोकरी लागल्यानंतर ते प्रॉक्टर रोडवरील ‘केनावे हाऊस’मध्ये राहायला लागले. या घराच्या घरमालकाला साहित्याबद्दल ना फारशी गोडी होती ना जाणकारी. पण पुलंबद्दल मात्र प्रचंड अभिमान. पुलं लिखाणात गर्क असताना हा घरमालक भक्तिभावानं त्यांच्यासमोर बसून राहात असे. या घरातील वास्तव्यादरम्यान पुलंच्या आकाशवाणीवरील कामगिरीची सरकारदरबारी तसंच रसिकमनात नोंद झाली होती. ‘तुज आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ही इतिहास घडवणारी नाटकं, तसंच ‘मोठे मासे छोटे मासे’ या एकांकिकेनं याच घरात जन्म घेतला होता. केनावे हाऊस सोडल्यानंतर ते ‘आशीर्वाद’मध्ये राहायला गेले. या बििल्डगमध्ये अकरा खोल्या आणि तीन बिऱ्हाडं राहात होती. त्यात सुनीताबाईंचे भाऊ डॉ. श्रद्धानंद ठाकूर आणि त्यांची पत्नी निर्मलाबाई, त्यांचे मेहुणे नारायण देसाई आणि त्यांच्या पत्नी नलिनीबाई, आणि पुलं व सुनीताबाई राहात असत. म्हणजे नलिनीबाईंची नणंद निर्मलाबाई आणि निर्मलाबाईंची नणंद सुनीताबाई असा नणंद-भावजयांचा गोतावळा तिथं एकत्र आला होता. यावर पुलंनी मल्लिनाथी केली नाही तरच नवल. पुलं या बििल्डगचा उल्लेख ‘नणंदादीप’ असा करत असत. मान्यवरांच्या घरावर महापालिका पाटय़ा लावते, पण इतक्या वेळा बिऱ्हाडं बदलली असल्यामुळे इतक्या घरांवर पाटय़ा लावणं महानगरपालिकेला परवडणार नाही, असंही गमतीत ते म्हणायचे. पॅरीसमध्ये माधव आचवल त्यांच्या शेजारी राहात आणि त्या काळात भारतीय जेवण मिळत नसल्यामुळे सुनीताबाईंकडे जेवायला येऊ लागले. दिल्लीतलं त्यांचं घर तर ‘महाराष्ट्र सांस्कृतिक केंद्र’च झालं होतं. आशीर्वादमधून पुलं आणि सुनीताबाई ‘मुक्तांगण’ या स्वत:च्या मालकी हक्काच्या घरात राहायला गेले. हे घर सुनीताबाईंच्या मनासारखं असलं तरी पुलंनी निवृत्त आयुष्य पुण्यात काढायचं ठरवलं आणि ते ‘रूपाली’त राहायला गेले. यानंतरचा शेवटचा टप्पा होता तो ‘मालतीमाधव’चा. कारण तोपर्यंत सगळ्यांचीच वयं झाली होती, तब्येतीच्या कुरबुरी सुरू झालेल्या होत्या, त्यामुळे ठाकूर कुटुंबीयांना एकत्र राहावंसं वाटायला लागलं होतं. मालतीमाधव पुलं आणि सुनीताबाईंच्या मृत्यूची साक्षीदार ठरली. ऐंशी र्वष सुंदर-संपन्न आयुष्य जगल्यानंतर मृत्यूही वैभवशालीच यावा असं सुनीताबाईंना वाटत असलं तरी ते दोघांच्याही बाबतीत खरं झालं नाही. पुलंची अवस्था तर शेवटी शेवटी इतकी केविलवाणी झाली होती की पूर्णपणे परावलंबन नशिबी आलेलं होतं. मृत्यूनंच त्यांची या अवस्थेतून सुटका केली. सुनीताबाईही जाण्याआधी दीडेक वर्ष अशाच क्लेशपर्वातून गेल्या.

‘असं लिहिणं’ हे प्रकरण अर्थातच सुनीताबाईंच्या लेखिका या भूमिकेतील प्रवास मांडते, पण लेखिका म्हणून त्यांच्या आयुष्यातलं पर्व सुरू झालं तेच मुळी साठीनंतर. तोपर्यंत लेखिका होण्यासाठी पोषक अशी परिस्थिती असतानाही सुनीताबाईंनी कधी या वाटेचा विचारही केला नव्हता. सुनीताबाईंचं वाचन दांडगं होतं. इंग्रजी, बंगाली, उर्दू भाषाही त्यांना अवगत होत्या आणि या भाषातील साहित्य त्यांनी वाचलं होतं. कविता हा त्यांचा एक हळवा कोपरा होता. त्यामुळे भाषिक आकलन आणि जाणिवाही चांगल्या विकसित झाल्या होत्या. पुलंनीही कधी त्यांच्यावर अशी बंधनं घातलेली नव्हती. जी. ए., श्री. पु. भागवत, माधव आचवल यांनी वारंवार त्यांना हे सुचवलं होतं, त्यालाही सुनीताबाईंनी कधी भीक घातली नाही. मोठय़ा प्रमाणावर पत्रलेखन करणाऱ्या सुनीताबाई साहित्यनिर्मितीचा विचारही करायला तयार नव्हत्या. स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याची रसरशीत क्षमता असूनही ‘पुलंची बायको’ याच चौकटीत राहात होत्या. पुलंच्या सगळ्या व्यापातील पडद्याआडची भूमिका त्यांनी स्वीकारली होती आणि अतिशय कर्तव्यकठोरतेनं सांभाळली, हे मान्य केलं तरी त्यामुळे त्यांना लिखाणाकडे लक्ष देता आलं नसावं असं वाटत नाही. कारण त्यांची एकंदरीतच काम करण्याची अत्यंत काटेकोर आणि नेमस्त पद्धत पाहिली तर वेळ मिळत नाही हे कारण त्यांच्या बाबतीत तरी लागू होत नाही. त्यामुळे वयाच्या साठीपर्यंत सुनीताबाईंनी लेखन का केलं नाही, या अनेक वषर्ं अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर याही पुस्तकात सापडत नाही. अर्थात ‘देर आये दुरुस्त आये’ असं काहीसं झालं. साठीनंतर मात्र अचानक एकदम त्यांनी लेखणी हाती धरली आणि ‘आहे मनोहर तरी..’ सारखं पुस्तक लिहून जी झेप घेतली ती अतुलनीय होती. आता पुस्तक लिहायचं म्हणून लिहिलेलं हे पुस्तक नव्हतं, तर वेळोवेळी लिहून ठेवलेल्या या आठवणी एवढंच त्यांचं प्राथमिक स्वरूप होतं. या आठवणींचा काही भाग महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आणि त्याला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्यावरून या आठवणी पुस्तकरूपात प्रसिद्ध कराव्यात असं निश्चित झालं. खरं तर आधीही एकदा या आठवणी सुनीताबाईंनी श्री. पु. भागवतांना वाचायला दिल्या होत्या, पण तेव्हा ‘काही काळ हे लिखाण बाजूला ठेवून द्यावं’ असा सल्ला त्यांनी दिला होता. कदाचित या लिखाणाचं स्वागत वाचक कसं करतील अशी सुनीताबाईंप्रमाणेच त्यांच्याही मनात शंका असेल. कारण मुळात हे आत्मचरित्र नाही. त्यामुळे आत्मचरित्राचा गुळगुळीत बाज त्यात नव्हता. उलट हे पुस्तक म्हणजे आपल्याच आयुष्याची अत्यंत निष्ठुरपणे फेरतपासणी करत घेतलेला आत्मशोध. सुनीताबाईंच्या कडक-करकरीत स्वभावाला साजेल अशा पद्धतीनं केलेला. यात त्यांनी स्वत:ला ‘गुण गाईन आवडी’ या पद्धतीनं सादर केलं नाही, तसं पुलंनाही केलं नाही. पती-पत्नी नात्यातले वेळोवेळी जाणवलेले पीळ उलगडून दाखवताना त्यांनी हातचं काही राखलं नाही. त्यामुळेच पुलंच्या प्रेमात असलेल्या वाचकाला हे रुचेल? पटेल? अशी शंका मनात होतीच. पण मायबाप वाचकांनीच या आठवणीवजा लेखाला कौल दिल्यानंतर या आठवणींचं पुस्तक प्रकाशित करणं आणि तेही मौजेनं प्रकाशित करणं हे अपरिहार्य होतं. या पुस्तकानं साहित्यविश्वात अनेक विक्रम घडवले. या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. चर्चा-परिसंवाद झाले. उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पत्रव्यवहार झाला. साहित्यविश्व आणि समाज दोन्ही ढवळून निघाला. त्यानं सुनीताबाई सुखावल्या. पण त्याहीपेक्षा ‘आपलं पुस्तक वाचून सर्वसामान्य महिलांना मन मोकळं करावंसं वाटलं. सामान्य माणसं निर्भय होत आहेत हेच लेखक म्हणून आपल्याला मोठं प्रशस्तिपत्रक वाटतं’, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘आहे मनोहर तरी..’च्या यशानंतर ‘सोयरे सकळ’. ‘मण्यांची माळ’. ‘प्रिय जी. ए.’, ‘मनातलं अवकाश’ ही पुस्तकेही प्रसिद्ध झाली. सुनीताबाईंनी कवितांवर मनापासून प्रेम केलं. या प्रेमानेच त्यांना आणि पुलंना एकत्र आणलं. एवढंच नाही तर ज्या व्यक्तीला कविता आवडते, त्या व्यक्तीशी त्यांची नाळ पटकन जुळायची. कवितेच्या प्रेमापायीच त्यांनी काव्यवाचनाचे कार्यक्रम केले आणि काव्यवाचन कसं असावं याचा एक आदर्शच निर्माण केला. कविता हे त्यांच्यासाठी जगण्याचं माध्यम होतं. जी.एं.बरोबरचं मत्र यामागंही कवितेची ओढ हे एक कारण होतंच.

एखाद्या व्यक्तीमध्ये किती परस्परविरोधी गुण एकवटलेले असावेत, ते एकाच तीव्रतेचे असावेत आणि त्याचा एकत्रित परिणाम होऊन एक अमिट ठसा कसा उमटावा, हे ‘असं जगणं’ या प्रकरणावरून लक्षात येतं. जीवन कसं जगायचं यासाठी सुनीताबाईंची विशिष्ट विचारांवर श्रद्धा होती. याच निष्ठांवरच्या अढळ श्रद्धेतून त्यांनी आंतरिक बळ मिळवलं. महत्त्वाचं म्हणजे जीवनविषयक त्यांच्या या निष्ठा ठाम होत्या. वयोपरत्वे त्या डळमळीत झाल्या नाहीत की परिस्थितीला शरण गेल्या नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या या निष्ठांची झळाळी कमी झाली नव्हती. हे जमवणं किती कठीण असतं, हे या वाटेवरून चालणाऱ्यांनाच कळू शकतं. आज अशा निष्ठावान व्यक्ती शोधायलाच लागतील. सुनीताबाईंचं वेगळेपण अधोरेखित होतं ते याच बाबतीत. म्हणूनच अरुणा ढेरे म्हणतात, ‘सुनीताबाईंच्या प्रेमाचं कठीण कोवळेपण इतरांना समजणं अवघडच. फार फार अवघड.’ पसा, प्रसिद्धी, पत, प्रतिष्ठा याचं आणि फक्त याचंच व्यसन असलेल्या आणि त्यासाठीच आयुष्य पणाला लावणाऱ्या समाजाला कमीत कमी गरजा, जीवननिष्ठांमधला कर्मठपणा, साधेपणाची ओढ, काटकसरी स्वभाव, काटेकोर वृत्ती, टोकाचा स्पष्टवक्तेपणा, सत्यप्रियता, स्वच्छता, नीटनेटकेपणा, साधनशुचिता, कर्मवाद, त्याग, आत्मसमर्पण, व्यक्तिस्वातंत्र्याची आस, श्रमप्रतिष्ठेचा ध्यास.. असे अनेक गुण अनाकलनीय वाटले तर नवल नाही. पण याच गुणांच्या बळावर सुनीताबाईंनी आíथक नियोजन ज्या पद्धतीनं केलं आणि वाचनालयं, प्रयोगशाळा, नाटय़मंदिरं, शिक्षणसंस्था, बालवाडय़ा, हॉस्पिटल्स, व्यसनमुक्ती, विज्ञानप्रसार, सांस्कृतिक कार्य आणि चळवळी, अंधश्रद्धा निर्मूलन, गिर्यारोहण.. अशा अनेक उपक्रमांना पु. ल. देशपांडे प्रतिष्ठाननं सढळ हातानं मदत केली. या मदतीतला सुसंस्कृतता, पारदर्शीपणा आणि निर्मोहीपणा याची अनेक उदाहरणं या प्रकरणात सापडतात आणि सुनीताबाईंना एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. ‘पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान’ ही एक अत्यंत नमुनेदार ‘एन. जी. ओ.’ होती असं वर्णन केलं जातं ते उगीच नाही. आíथक मदत मागण्यामागचं कारण उचित आहे का नाही, याची सुनीताबाई कठोरपणे तपासणी करायच्या. आपला पसा योग्य ठिकाणीच खर्च होणार आहे, याची खात्री पटली की, कोणीच त्यांच्याकडून विन्मुख परत जायचा नाही आणि या मदतीचा त्यांनी कधी गवगवाही केला नाही. किंवा प्रसिद्धी मिळवण्याचं साधन म्हणूनही उपयोग केला नाही.

या पुस्तकात पानोपानी विखुरलेल्या सुनीताबाईंमधील गुणांबद्दल लिहावं तेवढं थोडंच आहे. त्यामुळे हे पुस्तक परत परत वाचावं, सुनीताबाईंच्या जीवननिष्ठा समजून घ्यायचा प्रयत्न करावा. आज ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, आयुष्याला वळण देण्याचा प्रयत्न करावा, पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करावा, लवून नमस्कार करावा असं मनापासून वाटावं, अशी उत्तुंग व्यक्तिमत्त्वं अभावानंच सापडतात. ‘सुनीताबाई’ या पुस्तकाच्या रूपात एक असं व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यांसमोर उभं करून मंगला गोडबोले यांनी आपल्यासमोर एक आव्हानच ठेवलं आहे. सुनीताबाईंचे विचार, धारणा, निष्ठा जेवढय़ा झिरपवता येतील तेवढय़ा झिरपवून आपल्या जीवनाचा आणि जगण्याचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न करावा, यासाठी.

शुभदा पटवर्धन
४ जुलै २०११
लोकसत्ता 

Thursday, October 21, 2021

पु.ल. आणि गदिमांची एक आठवण -- शरद पवार

बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर मी नेहमीच माझ्या मतदारसंघातल्या सर्व घटकांमधल्या लोकांच्या भेटी वेगवेगळ्या कामांच्या निमित्तानं घेत असे. पुण्यापासून जवळच असलेल्या बारामतीत होणाऱ्या साहित्य, कला, संगीत, नाटक आदी उपक्रमांमध्येही मी बारकाईनं लक्ष घालत असे व अशा संस्थांमधून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमागं उभा राहत असे. त्या काळी सर्व छोट्या-मोठ्या शहरांमध्ये ‘सानेगुरुजी कथामाला’ हा कार्यक्रम उत्साहात साजरा होई. आमच्या बारामतीच्या ‘सानेगुरुजी कथामाले’च्या एका मोठ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ख्यातनाम कवी-गीतकार ग. दि. माडगूळकर आणि सिद्धहस्त साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना एकत्रितपणे आमंत्रित केलं होतं. ठरल्याप्रमाणे कथामालेचा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीनं पार पडला. या मोठ्या पाहुण्यांसाठी माझ्या घरीच दुपारच्या भोजनाची व्यवस्था केलेली होती. त्याप्रमाणे कार्यक्रम संपवून आम्ही घरी आलो.

भोजनाची सर्व तयारी झालेली होती. पानंसुद्धा घेतलेली होती. तर्कतीर्थांच्या पानाभोवती सुरेख रांगोळी घातलेली होती आणि पानात सर्व शाकाहारी पदार्थ वाढलेले होते. बाकी आम्हा सगळ्यांच्या ताटांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांची रेलचेल होती. जेवण सुरू करण्यापूर्वी तर्कतीर्थांनी मला जवळ बोलावलं आणि विचारलं - ‘‘हा ‘पंक्तिप्रपंच’ कशासाठी? तसं बघितलं तर, तुमच्या पानात जे वाढलेलं आहे, तेही चालतं आम्हाला आणि जमलंच तर आम्ही घेतोसुद्धा!’’ हे ऐकून तर्कतीर्थांचं ताट बदलण्यात आलं. तर्कतीर्थ स्वत-च्या वाहनानं बारामतीला आलेले होते. त्यामुळं त्यांची परतीची सोय झालेली होती; परंतु गदिमा ऊर्फ अण्णा आणि पुलं यांना पुण्याला पोचवायचं होतं. त्या वेळी माझ्याकडं स्वत-ची जीपगाडी होती; परंतु एवढ्या थोरा-मोठ्यांना जीपनं प्रवास घडवावा, याबद्दल मला थोडा संकोच वाटत होता. गावातले माझे एक सहकारी भगवानराव काकडे बऱ्यापैकी सधन होते आणि त्यांच्याजवळ एक चांगली मोटारगाडीही होती. मी त्यांना विनंती केली - ‘‘आपण तुमच्या गाडीनं पाहुण्यांना पुण्यापर्यंत सोडू या.’’ माझे पाहुणे म्हटल्यानंतर साहजिकच काकडे यांची कल्पना अशी झाली, की कुणीतरी फार मोठी माणसं असली पाहिजेत. काकडे लगेच तयार झाले आणि आम्ही गदिमा व पुलं यांना घेऊन पुण्याकडं निघालो. काकडे स्वत-च गाडी चालवत होते आणि मी पुढच्या सीटवर त्यांच्या शेजारी बसलो होतो. प्रवास सुरू झाला तशी काकडे यांनी पाहुण्यांची विचारपूस करायला सुरवात केली. त्यांनी पहिलाच प्रश्न टाकला - ‘‘कोणच्या गावाकडचं म्हणायचं?’’‘‘आम्ही पुण्यालाच असतो,’’ असं उत्तर दोघांनीही दिलं. त्यांचा पुढचा प्रश्‍न - ‘‘काय काम करता?’’ आता या प्रश्नाचं उत्तर काय येईल, याबाबत मी थोडासा धास्तावलोच होतो; तर अण्णांनी म्हणजे गदिमांनी उत्तर दिलं - ‘‘आम्ही लिव्हतो.’’

त्यांचा परत प्रश्न आलाच - ‘‘कुठं पोस्टाबाहेर बसता की मामलेदार कचरीसमोर?’’ आता संभाषणाची सूत्रं पुलंनी स्वत-कडं घेतली आणि सांगितलं - ‘‘मी पोस्टात बसतो आणि हे (गदिमा) मामलेदारांच्या कचेरीबाहेर बसतात.’’ काकडे यांचं समाधान अर्थातचं झालेलं नव्हतं.

त्यांनी पुन्हा विचारलं - ‘‘काय, घरदार चालंल इतकं पैसं मिळतात का ?’’

पुलंनी लगेच उत्तर दिलं - ‘‘लोक आम्हाला लिहिल्याचे बऱ्यापैकी पैसे देतात.’’ काकडे यांच्या शंका अद्यापही संपलेल्या नव्हत्या. त्यांनी पुढं विचारलं - ‘‘तुम्ही या एवढुशा कामाचे लोकांकडून फार पैसं घेत असला पाहिजे. आवं, जरा विचार करा...काय एक-दोन-चार तर कागद लिव्हायचे आन्‌ किती पैसं घ्यायचे? बरं, तुम्ही पडला शिकली-सवरलेली माणसं आणि तुमच्याकडं कागद लिव्हायला येणारा अडाणी, गरीब. हे काय बरोबर नाही. तुमचं सगळं शिक्षण तर सरकारच्या पैशातच व्हतं ना; मग थोडं माणुसकीनं वागा की राव. कशाला गरिबांचे तळतळाट घ्यायचे?’’ हे सगळं ऐकून महाराष्ट्राचे ते दोन मोठे साहित्यिक, अर्थातच गदिमा आणि पुलं, एकमेकांकडं बघून हसत होते. मीही या संभाषणात माफक सहभाग दाखवून शांतपणे बसलो होतो.

- शरद पवार
१५ फेब्रुवारी २०१५
सकाळ

Monday, October 18, 2021

समेळकाकांची मुलगी रतन समेळ हिच्या वासरीतील (डायरी) काही पाने..

समेळकाकांची मुलगी रतन समेळ हिच्या वासरीतील (डायरी) पाने फारच रम्य आहे. तिच्यातली काही पाने एकही अक्षर कानामात्रेसह न बदलता देत आहोत.

१ जानेवारी : "जगात शुद्ध प्रीतीला स्तान नाही हे चाळींतले सुप्रसीद्द काद्रंबरीकार माळसाकात पोंबुरपेकर यांचे मत मला अगदी पटलें. - मधूजवळ मी आज दूपारीं जीन्याखाली बोलत असतांना त्यांच्या बाबांनी पायलें आणि त्याच्यावर ते रागावले. - खरं म्हणजे माजं त्याच्यावर व त्याचं माज्यावर शूद्द प्रेम आहे. -मधूचें मन हळूवार आहे. त्याची मत्वाकांक्षा एक अभिनयपटू सीनेमांतील हीरो व्हायची आहे. मलाहि चाळींत सर्वजण नरगीस म्हणतात. मधू डायरेक्टर होऊन मला हीराइनचीं कामें देणार आहे. फील्म लाइनमदी त्यांचे कीतीतरी दोस्त आहेत. मधू गाणं कीती छान बोलतो. तो मूजिक डायरेक्टरसुद्धा होईल. चाळीतल्या गणेशोत्सवांत आमच्या 'राणी चंपावती' नाटकांत त्याने किती छान मूजिक डायरेक्शन केलें होतें. पण जगाला कलावंताची पारक नाही. मधू म्हणतो की सर्वच कलावंताना हालपेष्टाच काढाव्या लागतात..."

८ जानेवारी : "काशीनाथ नाडकर्ण्याचा मूलगा दूष्ट आहे. त्यानेच बहुतेक बाबांना नीनावी पत्र लीहीलं असेल. मधूने मला जिन्यांत प्रेमपत्र दीलें. कीति छान आहे. मधू कवीता पण काय लीहतो! - तुझी माझी प्रीत - चंद्राची आणि चांदणीची... अय्या - मधू चंद्र आणि मी चांदणी ही कल्लपना कीती सुंदर आहे..."

२ मार्च : "मधू फार वाईट आहे. चौबळांच्या कुमुदला घेऊन तो सीनेमाला गेला होता असें काशीनाथ नाडकर्ण्याच्या मुलाने मला सांगितलें. - काशीनाथ नाडकर्ण्याच्या मुलाने मला 'जादुई नग्री' चा फुकट पास दिला. पण उद्यापासून परिक्षा आहे. - मला परिक्षेला बसायला आवडत नाही. देवाने परिक्षा नीर्माण का केल्या? वाळिंबेबाई दूष्ट आहेत. वर्गात 'आता बापाला सांगा उजवायला' असं मला म्हणायला लाज वाटत नाही? - तरी बरं, केस पीकले तरी लग्नाचा पत्ता नाही स्वतःच्या..." 

१० नवेंबर : "पुढल्या महिन्यांत पिक्चरचं शूटिंग सुरु होणार. तोपर्यंत मधू एक नाटक कंपनी काढणार आहे. सुरुवातीला नाटकांत काम केलं की सीनेमात काम करणं अगदी सोप्पं. नाटकांत मात्र मला हीराईनचं काम आहे.."     

२४ नवेंबर: "मी आणि मधू लालबागला गेली. तिथे नटवर्य माष्टर सावळाराम मिठबावकर ह्यांच्या सांतेरीप्रसादसुबोनाट्यमंडळाच्या नव्या नाटकाचा मुहूर्त झाला. नाटकाचं नांव  'हातांत हात' असं आहे. मधुने माझी ओळख आपली मीसेस अशी करून दिली. मला खूप लाज वाटली. मधू मिस्चिफ आहे. पण असं सांगावं लागतं असं मधू म्हणाला, म्हणून मी रागावली नाही. कलेसाठी प्राण दिले पाहिजेत असं मधू म्हणतो..." ;

१ डीसेंबर : "काशीनाथ नाडकर्ण्याच्या मुलग्याने बाबांना मला लालबागला पाह्यली हे सांगितलं. मी शाळेत गेली होती म्हणून सांगितलं. दुपारी बाबा शाळेत गेले. मी सबंध वर्षात शाळेंत गेलीच नाही, असं वाळींबेबाईंनी बाबांना सांगितलं. म्हणून रात्री बाबांनी आणि आईनी मला उपाशी टाकून स्वैपाकघरांत कोंडलं. मी सगळीजण झोपल्यावर दुध पिली. असल्या लोकाशी असच वागलं पायजे. बाबांच्या गजकर्ण फार्मशीच्या मलमाच्या बरण्या सैपाकघरात होत्या. त्यांत मिर्चीची पूड कालवून ठेवली आहे..."

काही वासऱ्या 
बटाटयाची चाळ 
पु. ल. देशपांडे 

Thursday, October 14, 2021

मी ब्रम्हचारी असतो तर...

ब्रम्हचर्याच्या त्या स्वतंत्र अमदानीत आम्ही आमचे बादशहा होतो. आणि आज... पूर्वेला जाण्याचा विचार सुद्धा त्या सुर्यनारायणाच्या मनात येण्यापूर्वी आमच्या गृहलक्ष्मीचा गजर होतो : "उठा! दूध आणायच आहे. उशिरा जाता आणि मग दुध संपलं म्हणून सांगत येता!" ही भुपाळी!

पूर्वीच्या बायका म्हणे सकाळी उठून सडासंमार्जन करून गाईची धार काढत होत्या. कुठं गेल्या त्या माऊल्या? आमचं कुटुंब पहाट फुटण्यापूर्वी आम्हांला धारेवर धरतं. दिवसा तिच्या एकूण अवतारामुळं तिच्या डोळ्याला डोळा देण्याचं धाडस मला होत नाही आणि रात्री तिच्या घोरण्यामुळं माझ्या डोळ्याला डोळा लागतं नाही. वर पुन्हा मीच घोरतो ही तीची तक्रार. स्वप्नातसुद्धा कधी घोरल्याचं मला आठवत नाही. आमच्या लग्नाला आता एक तप होत आलं. बारा वर्षांना एक तप कां म्हणतात हे मला आता लग्न झाल्यावर कळायला लागलं. वैवाहिक जीवनाचं हे एक तप खरोखरीच उग्र आणि खडतर आहे. काॅलेजमध्ये एक तप काढलं. शेवटच्या वर्षी म्हणजे इंटरला असताना माझ्या आराधनेला यश येण्याची संधी आली होती ; पण हुकली आणि शांत हिमकन्या गौरीची आराधना करावी आणि महिषासुरमर्दिनी प्रसन्न व्हावी असं काहीसं झालं. आपलेच दात आणि आपलेच ओठ! घरात बोलायची चोरी, बाहेर काय बोलणार?

माझ्या कुठल्याही मताला विरोध करायचं तर तिनं कंकणच बांधलय! साधी बाब, मी कधीतरी खुषीत येऊन सांगायला जातो, " अग ऐकलंस का? गेल्या महिन्यात आपल्याला ते गणपतराव भेटले होते ना?
लगेच तिचा विरोध : "गेल्या महिन्यात कुठले, परवा तर भेटले होते."

मी : (नरमाईनं) हो. परवा आपण बघ सिनेमाला चाललो होतो-

ती : परवा कुठले सिनेमाला चाललो होतो? सिनेमाला जाऊन झाले चार महिने! बंडूला दाखवायला नेलं नव्हतं का डाॅक्टरांकडे?

मी : हो हो! डाॅक्टर जोशांच्याकडे-

ती : डाॅक्टर जोशी कुठले? डॉक्टर जोशांकडे मी गेले होते-विमलच्या खेपेला! हे डाॅक्टर टेंबे-

मी : हो- म्हणजे बुधवारातले.

ती : बुधवारात केव्हा गेले ते? सदाशिव पेठेतच नाही का? हौदापाशी.

मी : तेच, म्हणजे तुझी मावशी राहते तिथंच की समोर--

ती : मावशी राहते! काय मेलं जिभेला हाड? आज वरीस झालं मावशी जाऊन! मायेच्या माणसांच्या आठवणीसुद्धा राहात नाहीत कशा त्या बरोबर! माझ्या माहेरची ना माणसं? तुम्हाला ती रीतीभाती नसलेली तुमच्याच घरची माणसं हवीत. आपल्या लग्नात मेला खण दिला होता माझ्या आईला, तोसुद्धा सुती! इथून सुरवात होते आणि शेवट कसा होतो हे सुज्ञ जाणतातच-मी कशाला सांगू? बायको काही असं वेडंवाकडं बोलायला लागली की वाटतं, की मी ब्रम्हचारी असतो तर असल्या बायकोला चांगली वठणीवर आणली असती--पण... ब्रम्हचारी असतो तर बायको तरी कुठली म्हणा! मुद्दा चुकलाच जरासा!

----------------------------------------

मोकळ्या हवेतलं फिरणं दूर राहातं आणि तासाभरानं संसाराचं ओझं घरी आणून हुश्श करत खाली बसतो, तोच ट्रिपला गेलेली अपत्यं परत येतात. त्या पैकी एकीला खोक पडलेली असते, दुसरीच्या पायाला नवा बूट लागलेला असतो. काही वेळानं तो लागणारा बूट हरवल्याचं ध्यानात येतं आणि धांदरटपणाबद्दल प्रत्येकास पारितोषिकं मिळून, हा धांदरटपणा बापाच्या वळणावर सगळी कार्टी गेल्यामूळं आला, असा मौलिक शोध लागतो! समस्त पूत्ररत्नांचा आक्रोश आटोपल्यावर आम्हाला गिळायला येण्याचा हुकूम होतो. मी निमूटपणे गिळून उठतो आणि रविवार संध्याकाळ असल्यामुळं दुपारची जेवणं उशिरा होतात ह्या सबबीखाली केलेला कागद चिकटवायच्या खळीसारखा खिचडी नामक पदार्थ खाल्ल्याचा अभिनय करून उठतो. त्या बद्दल तक्रारीचा सूर काढल्यास "चाळीतल्या सगळ्या शेजाऱ्यांच्या घरी काय खातात एकदा बघून या-" असा हुकूमनामा होतो, हे ठाऊक असल्यामुळं मी "वा! छान झाली आहे खिचडी!-- तू खा की." असा तिला आग्रह करतो. परवा असाच आग्रह केला. लाजण्याचा कठोर प्रयत्न करत ती म्हणाली, "नको."

"का?" मी ही खुशीत येऊन विचारलं.

"नको. खिचडी जात नाही मला. बंड्याच्या खेपेसदेखील खिचडी नकोशी झाली होती मला. विमल, सुमी, बिट्टया, हुप्या ह्यांच्या खेपेला बरीक तसलं काही झालं नाही!" पुढले शब्द मला ऐकू येत नाहीत. खिचडी का नकोशी झाली ह्याचं कारण कळल्यावर सारं जग माझ्या भोवती फिरू लागलं आणि मग मात्र मी आगदी कळवळून ओरडलो,
"अरे अरे, मी ब्रम्हचारी असतो तर..."

मी ब्रम्हचारी असतो तर सुर्योदय सोडा, पण सुर्यास्ता पर्यंत झोपून राहिलो असतो. धोब्याचे कपडे मांडून ठेवावे लागले नसते. सिगारेटी ओढल्याबद्दल कोणाचा उणा शब्द ऐकला नसता. आंघोळीची घाई केली नसती. वाटेल तितक भटकून रात्री बारा वाजता न भिता घरी आलो असतो. पण तो योग नव्हता. कोण्या गाफील क्षणाला मी मान वाकवली आणि माझं स्वातंत्र्य गमावून बसलो. फार कशाला, इथं रेडिओवर भाषण करण्यापूर्वी घरचा रेडाओ नादूरूस्त करून आलो असतो. शेजाऱ्याच्या रेडिओवर जाऊन ही ऐकेल ही भिती नाही. कारण चाळीतली सगळी माणसं मेली भांडखोर आहेत असं तिचं ठाम मत आहे.

तात्पर्य, माझ्या अविवाहित आणि म्हणून सुखी श्रोत्यांनो, पश्चात्तापदग्ध शुक्राचार्याच्या कळवळ्यानं मी तुम्हांला सांगतो, की लग्न करण्यापूर्वी एकदा सावधान!

- पु.ल. देशपांडे
रेडिओवरिल भाषणे आणि श्रुतिका - भाग १

Tuesday, October 12, 2021

पुलं वाचतची गेलो, तेथे पुलं होवूनिया ठेलो..! - नितीन साळुंखे

पुलस्पर्श होताच दु:खे पळाली
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली..

नैराश्येतुनी माणसे मुक्त झाली
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली..!
– कविवर्य मंगेश पाडगावकर

पुलंच्या साहित्याचा माझ्या किंवा समाजाच्या जडणघडणीवर झालेला परिणाम, पुलंच्या लिखाणाचा समाजावर काय परिणाम झाला याचे मूल्यमापन करण्याइतका काही मी मोठा नाही, परंतु माझ्या स्वत:च्या वैचारिक जडणघडणीवर पुलंच्या साहित्याचा नि:संशय परिणाम झाला आहे. आज मी जे काही चार वेडेवाकडे शब्द लिहू शकतो, त्यामागे पुलंच्या साहित्याचा सिंहाचा वाटा आहे.
मला पुलं पहिल्यांदा भेटले ते ‘बटाट्याच्या चाळी’त. कुतूहल जागं असणार्‍या शाळकरी वयातच मला पुलं भेटले हे माझं भाग्य. लहान वयातच मला वाचनाची सवय लागण्यामागे जसा रोजचा पेपर, चांदोबा, किशोर, चंपक यांचा मोलाचा वाटा होता, तेवढाच मोठा वाटा पुलंचा होता. पुढे जसजशी मला पुस्तकं उपलब्ध होत गेली, तसतसा पुलंची पुस्तकं वाचायचा मी सपाटा लावला. पुलंच्या पुस्तकांचं पहिलं वाचन मी आधाशासारखं केलं. त्या वाचनामागे निश्चित असा काही विचार नव्हता. पोटभर हसता यावं याच एका उद्देशाने मी पुलंच्या साहित्याचा अक्षरक्ष: फडशा पाडता झालो.

पुढे जसजशी समज येत गेली, तसतसे पुलं मी सावकाशीनं वाचत गेलो आणि दरवेळी पुलं मला नव्याने उलगडत गेले. पुलंवर खरंतर विनोदी लेखक म्हणून शिक्का मारून आपण त्यांच्यावर अन्याय केला आहे असं मला वाटतं. पुलं तत्त्वचिंतक होते. विचारवंत होते. तत्त्वज्ञानासारखा निरस, रुक्ष विषय पुलंनी आपल्याला विनोदाच्या माध्यमातून हसत खेळत शिकवला. आपण मात्र पुलंच्या सांगण्याकडे विनोद यापलीकडे पाहिलं नाही. त्यांचं साहित्य आपण डोक्यावर घेतलं, पण त्यातल्या विचाराकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्षच केलं. रोजच्या जगण्यातून नेमकी विसंगती पकडायची आणि ती न दुखावता विनोदाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवायची कशी हे पुलंनीच दाखवून दिलं. खरंतर विनोदाच्या माध्यमातून पुलंनी तत्त्वज्ञानाचे जहाल डोस समाजाला पाजले असं मी समजतो. हेच जर त्यांनी जड शब्दांतून आणि उपदेश करायच्या आवेशाने शिकवलं असतं, तर पुलं हे ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ कधीच होऊ शकले नसते. तसं झालं असतं तर महाराष्ट्रातले एक विचारवंत म्हणून त्यांची पुस्तकं वाचनालयात वाचकांची वाट पाहत बसली असती. तसं झालं नाही हे महाराष्ट्राचं सुदैव आणि पुलंनी साध्या सोप्या शब्दांतून सांगितलेला विचार महाराष्ट्राने फारसा मनावर घेतला नाही हे मात्र महाराष्ट्राचं दुर्दैवं..!

पुलंची बहुतेक सर्व पुस्तकं मी वाचली आहेत. पुन्हा पुन्हा वाचली आहेत. जेवढ्यांदा ही पुस्तकं मी वाचली, तेवढ्यांदा त्यातून नवीन काहीतरी सापडत गेलं. गव्हापासूनच पोळ्यांचं पीठ, करंज्यांचा मैदा आणि गोडाच्या किंवा तिखटाच्या शिर्‍यासाठी रवा सापडावा तसं. लिखाण एकच, पण दरवेळी नवीन, अधिक रसदार आणि विचाराच्या तब्येतीला मानवणारं असं काहीतरी सापडतंच सापडतं. पुलंचं लेखन विचार करायला भाग पाडतं. उदाहरणच द्यायचं तर मी पुलंच्या ‘एक शून्य मी’ या लेखसंग्रहाचं देईन. पुलंचा हा लेखसंग्रह माझ्यासाठी गीता, कुराण, बायबल काय म्हणाल ते आहे. जीवनातील प्रत्येक समस्येवर उत्तर आणि जीवनातले आनंदाचे क्षण कसे साजरे करावेत यावरचं उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात मला सापडते. जेव्हा जेव्हा मी अस्वस्थ असतो, तेव्हा तेव्हा मी हे पुस्तक काढून त्यातला जो समोर येईल तो लेख काढून वाचत बसतो आणि माझ्या अस्वस्थपणावर त्यात ‘उतारा’ हमखास सापडतो आणि माझ्यातला तो अस्वस्थपणा शब्दांतून कागदावर उतरत जातो आणि मन मोकळं मोकळं होत जातं. हा लेख लिहितानाही मला पुलंवर काय लिहावं आणि काय नको ते कळत नव्हतं. पुलं माझं दैवत आहे. नको नको, दैवत म्हटलेलं पुलंना आवडणार नाही. पुलं मला माझे मित्र वाटतात. चांगल्यासाठी पाठीवर हाताने थाप मारणारे आणि चुकीच्या गोष्टीसाठी त्याच हाताने कान पिळणारे. अशा मित्रावर काय आणि किती लिहावं हेच मला समजत नव्हतं. अशा अवस्थेत मी सवयीप्रमाणे ‘एक शून्य मी’ उघडलं आणि पुढचं सर्व आपोआप शब्दबद्ध होत गेलं.

समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेची एखाद्या कुशल शल्यविशारदाच्या नजाकतीने शल्यक्रिया कशी करावी, हे पुलंनी फार उत्तम रितीने दाखवलंय. ‘एक शून्य मी’ या पुस्तकातल्या त्याच नावाच्या लेखात पुलंनी म्हटलंय, मुंबईतील वांद्य्राच्या एका देवीची ‘दुखरे अवयव बरी करणारी देवी’ म्हणून ख्याती आहे. आपला जो अवयव दुखत असेल त्या अवयवाची मेणाची प्रतिकृती करून देवीच्या चरणी वाहिली की त्या अवयवाचं दुखणं नाहीसं होतं अशी सर्वच भाविकांची श्रद्धा. यापेक्षा पुलंनी विनोदी अंगाने शंका विचारली, की त्यांच्या शेजारच्यांना मूळव्याध आहे, तर त्यांनी कोणता अवयव देवीला अर्पण करावा. यावर उत्तर नव्हतं. लोकांनी हसून वेळ मारून नेली, परंतु पुलंच्या प्रश्नातलं मर्म त्यांना बरोबर समजलं होतं. हेच जर ’ह्या तुमच्या सार्‍या अंधश्रद्धा आहेत’ असं जर पुलंनी एखाद्या तत्त्ववेत्याचा आव आणून सांगितलं असतं, तर धार्मिक भावना दुखावल्या म्हणून समाजात बरंच काही विपरीत घडलं असतं. पुलं पुढे म्हणतात की, देवी जर खरंच असे दुखरे अवयव दुरुस्त करत असेल, तर तिला सर्वांनी आपापल्या मेंदूची प्रतिकृती अर्पण करायला हवी, जेणेकरून लोकांचे मेंदू दुरुस्त होतील, पण तसं घडणार नाही, असा विश्वासही पुलं व्यक्त करतात. कारण खरोखर तसं झाल्यास सर्वात पहिली देवळं, मशिदी नि चर्चेस इत्यादी दुकानं बंद होतील. देवालाही स्वत:च्या भवितव्याची चिंता आहेच की. लोकांनी मेंदू जागृत ठेवून वागावे हे पुलंनी विनोदाच्या आधाराने सांगितलं. माझेही देव आणि दैव यांच्यावरचे विचार काहीसे असेच असून, पुलंच्या पुस्तकांच्या वाचनाने त्यांना बळ मिळालं आहे. पुलंनी समाजातील अंधश्रद्धा आणि राजकारण यावर बरंच काही लिहिलंय. माझेही हे दोन चिंतेचे विषय. मी माझ्या कुवतीने लिखाणाच्या माध्यमातून समाजात वाढीला लागलेल्या बुवाबाजी, अंधश्रद्धा आणि हल्लीच स्वार्थांध राजकारणावर लिहायचा जो प्रयत्न करत असतो, त्यामागे पुलंची प्रेरणा आहे.

पुलंच्या निरीक्षणाबद्दल मी काय बोलावं? अगदी साध्या साध्या गोष्टीतून पुलंनी जे चिंतन केलंय त्याला तोड नाही. साधी विरामचिन्ह घ्या. रोजच्या वापरातल्या प्रश्नचिन्हावर लिहिताना पुलं म्हणतात, प्रश्नातून या जगातल्या कुणाचीच सुटका नाही. मग जगणे म्हणजे नुसते श्वासोश्वास घेणे की वेळोवेळी पडत असलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. त्या प्रश्नाचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकृतीखालीच टिंब म्हणजे शून्य हे त्याचे उत्तर असते. वर वर पाहताना हे वाचायला छान वाटते, पण या छोट्या वाक्यांतून पुलंनी आपल्याला आपलं रोजचं आयुष्य जगताना पडणार्‍या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायला हवा, असा संदेश दिला आहे. ती उत्तर शोधताना कदाचित हाती काहीच लागणार नाही, परंतु ती उत्तरे शोधताना काहीतरी दुसरं, अनपेक्षित आणि मनाला उभारी देणारं काहीतरी नक्की सापडेल, असाही संदेश पुलंनी दिला आहे, असं मी मानतो. कुठे काही काळ थांबायचं, हल्ली कुठे पूर्ण थांबायचं, कुठे वळायचं आणि कुठे काय बोलायचं, याचं कुणाला फार भान असेल असं वाटत नाही. अलीकडे

विरामचिन्हेही कुणी वापरताना दिसत नाही. मग ती योग्य त्या ठिकाणी असावीत याची काळजी करण्याचं कुणाला काही कारणच उरत नाही. आपल्या आजच्या जगण्याचं प्रतिबिंब असं विरामचिन्हांतून दिसत असतं. पुलंचा हा उपदेश आता माझ्या जगण्याचा पाया झाला आहे. मीही अनेक प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात भटकत असतो. त्या भटकण्यातून माझ्या हाती बरचंस ठोस असं काहीतरी सापडत असत. त्या सापडलेल्यातून पुन्हा नवे प्रश्न उभे राहत असतात आणि पुन्हा त्यांची उत्तरं शोधण्याच्या मागे मी जात असतो. निखळ आनंदाचा खेळ आहे हा. पुलंचा माझ्या वैचारिक जडणघडणीवर झालेला हा सर्वात सुंदर परिणाम आहे. पुलंनी विनोदाच्या माध्यमातून माणसाने माणूस म्हणून कसे वागावे आणि कसे नाही हे फार सुंदर रीतीने दाखवून दिले आहे आणि मी तसं जगण्याचा प्रयत्न करत असतो. मी पुलं व्हायचा प्रयत्न करतोय, सातत्याने करतोय.

वारकरी साहित्यात देव पाहायला गेलेला भक्त हा देवच होतो अशी मान्यता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देव

पाहावया गेलो। तेथे देवची होवूनी ठेलो। पुलंबद्दल माझी नेमकी अशीच भावना आहे. मी तुकाराम महाराजांसारखा थोर भक्त नाही किंवा पुलंसारखा थोर विचारवंत लेखकही नाही, परंतु तुकाराम महाराज जसे नेहमी पांडुरंगाच्या वाटेवर चालत राहिले, तशीच काहीशी माझीही भावना पुलंच्या साहित्याचं वाचन करताना असते. म्हणून म्हणालो, पुलं वाचतची गेलो, तेथे पुलं होवूनिया ठेलो..!’

-नितीन साळुंखे (मो. क्र. 9321811091)
https://ramprahar.com/15462/


Saturday, October 2, 2021

गांधीजी - पु. ल. देशपांडे

महात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रसंगी केवळ भारतातच नव्हे, तर सार्‍या जगभर त्यांचे पुण्यस्मरण होत आहे. केवळ राजकारणी पुढारीच नव्हेत; तर गायक, नर्तक, चित्रकार, शिल्पकार सारेच जण शब्द, स्वर, रंग, रेखा, अभिनय ह्यांतून आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालू शकलो नाही, हा त्यांचा दोष नव्हे. गांधीजींच्या चरित्राचे हे लेखन ही त्यांच्या चरणी वाहिलेली माझी लहानशी फुलाची पाकळी आहे. ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, अशा मराठी वाचकांसाठी मी हे चिमुकले पुस्तक लिहिले आहे. भारतातले सुप्रसिद्ध चित्रकार मुरलीधरपंत आचरेकर यांच्या कुंचल्याचा जादूचा स्पर्श ह्या पुस्तकाला झाला. आता हे पुस्तक पाहताना मला असे वाटते की, आचरेकरांची चित्रेच इतकी बोलकी आहेत की, माझा मजकूर त्या चित्रांच्या बोलण्याच्या उगीचच मध्येमध्ये येऊ लागला आहे. त्यांनी श्रद्धायुक्त अंत:करणातून केलेले हे कार्य असल्यामुळे त्यांच्याबद्दल आभाराची भाषा वापरणे औचित्याला सोडून होईल. हे पुस्तक वाचल्यावर गांधीजींच्याविषयी अधिकारी लेखकांनी लिहिलेली चरित्रे वाचण्याची आणि त्यांचे तत्त्वज्ञान अधिक बारकाईने समजून घेण्याची इच्छा झाली, तर माझ्या ह्या लेखनकामाचे चीज झाले, असे मला वाटेल. हे चरित्र लिहिताना श्री. फ्रान्सिस फ्रेटस्‌ ह्यांनी मला केलेल्या साहाय्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. 
पु.ल. देशपांडे 
________________________________
... शेगावला गांधीजींनी खेड्यातल्या लोकांचे जीवन त्यांच्यात राहून पाहिले. अनेक अनुभव आणि प्रयोग ह्यातून त्यांची खात्री पटली की, आपल्या देशातल्या मुलांचे प्राथमिक शिक्षण एखाद्या हस्तोद्योगातूनच झाले पाहिजे. एखादा हुशार सुतार नेमावा. पट्टीने मोजमापे घेण्याच्या निमित्ताने त्याने गणित शिकवावे. लाकूड कुठले आहे, कसले आहे हे सांगतांना भूगोल सांगावा. त्यातून थोडीशी झाडांच्या लागवडीची माहिती द्यावी आणि मग लाकडाची जी वस्तू बनवायची तिचा आराखडा, सुतारकीची हत्यारे वापरावयाची माहिती, हे सांगावे. म्हणजे सारे विषय हाताने विणलेले कापड, शेती किंवा सुतारकाम ह्यांच्यासारख्या हस्तोद्योगांच्याच आधाराने शिकवावेत. ह्या शिक्षण पद्धतीला 'बेसिक शिक्षण' किंवा 'जीवन शिक्षण' म्हणतात. आजवरचे शिक्षण हे पोपटपंचीचे शिक्षण झाले. आता शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही श्रमांची सांगड घालून शिक्षण द्यावे, हा शिक्षणाच्या क्षेत्रातला संपूर्णपणे नवा विचार गांधीजींनी मांडला. वर्ध्याला अखिल भारतीय शिक्षण परिषद भरली. त्यात हे प्राथमिक शिक्षण सरकारने फुकट दिले पाहिजे, असा विचार गांधीजींनी मांडून सरकारला धक्काच दिला. गांधीजींची प्राथमिक शिक्षणात नवा बदल घडवून आणण्याची सूचना मान्य झाली.

वर्ध्याची शिक्षण परिषद संपल्यावर लगेच त्यांना कलकत्याला जावे लागले. काही राजकीय कैद्यांवर हिंसाचाराचा आरोप करुन त्यांना तुरूंगात डांबून ठेवले होते. रात्रंदिवस खटपट करुन गांधींनी त्यांची सुटका करुन घेतली. पण ह्या परिश्रमांनी त्यांची प्रकृती फारच बिघडली. नोव्हेंबरच्या सुमारास ते कलकत्याहून परतले, त्यावेळी तर ते फारच क्षीण झाले होते. डॉक्टरांचा सल्ला न मानता ते त्या राजबंद्यांच्या सुटकेसाठी धावले होते. शेवटी जेव्हा प्रकृती फार खराब झाली, तेव्हा विश्रांतीसाठी मुंबईतल्या जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर आपल्या एका मित्राच्या टुमदार बंगलीत ते गेले. ह्या किनाऱ्याची शोभा, १९२५ साली ते तिथे राहिले, त्यानंतर फार बदलली होती. किनाऱ्यावर पूर्वी अजिबात वस्ती नव्हती. तिथे आता श्रीमंतांनी मोठमोठे बंगले उभारले होते. पूर्वीच्या काळातली होती ती अफाट पसरलेली वाळू आणि तो विशाल पश्चिम समुद्र. मनाला शांती देणाऱ्या ह्या दोनच गोष्टी होत्या. तिथे त्यांच्या प्रकृतीत खूप सुधारणा झाली. थोडेसे ताजेतवाने होऊन ते शेगावला परतले. पण आता साऱ्या जगापुढेच एक भीषण संकट येऊन
उभे राहिले होते. हिटलरने आपल्या पाशवी अत्याचारांनी युरोपला त्राहि भगवान करायला सुरुवात केली होती. गांधीजी ह्या नव्या संकटाकडे निर्भय नजरेने पाहू लागले. हिटलरच्या टाचेखाली तुडवल्या जाणाऱ्या झेकोस्लोव्हाकियातील जनतेला त्यांनी दोन जाहिर पत्रे पाठवली. त्यात 'हिटलरचा अहिंसात्मक मार्गांनी प्रतिकार करा,' असा संदेश पाठवला होता. नाझी अत्याचाराला बळी पडणाऱ्या पददलित ज्यू लोकांचा उल्लेख 'ख्रिस्ती समाजातले अस्पृश्य' असा केला होता. म्यूनिख कराराला गांधीजींनी 'स्वाभिमान शून्य तह' असे म्हटले होते. 'लोकशाही आणि हिंसा एकत्र नांदूच शकणार नाहीत. जगाला केवळ अहिंसाच विनाशापसून वाचवू शकेल,' हे त्यांचे ठाम मत होते.

गफारखान्यांच्याबरोबर त्यांनी सरहद्द प्रांताचा दौरा केला. सरहद्द गांधींचे कार्य पाहून महात्माजींना अतिशय समाधान वाटले. तिथल्या पठाणांची 'खुदाई खिदमतगार' (देवदास) ही अहिंसेच्या आधारावर उभी केलेली संघटना पाहिल्यावर त्यांना वाटले की, जे इथे प्रत्यक्षात घडत आहे, तसेच इतरत्र देशातही घडावे. हाच वारसा सर्वत्र चालू राहिला पाहिजे. रक्तपिपासू युद्धखोरांपुढे निर्भयतेने उभी राहणारी शांतिसेनाच जगाला तारील, अशी गांधीजींची नितांत श्रद्धा होती. ह्याच सुमाराला त्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भेटायला आले होते. ऑक्सफर्ड
विद्यापीठात पौर्वात्य तत्वज्ञान शिकवण्यासाठी मोठ्या सन्मानाने त्यांना बोलावले होते. परदेशी जाण्यापूर्वी ते गांधीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. गांधीजींना ते म्हणाले की, "पौर्वात्य तत्वज्ञान शिकवायला, गांधीजी
तुम्ही मला जिवंत आधार आहात. एकेकाळी तिकडले मिशनरी इकडे येत. आता मनू पालटला. आता शांतीचे आणि अहिंसेचे तत्वज्ञान शिकवायला इथून आपले तत्वज्ञ जातील. जागतिक युद्धात तत्वासाठी भस्मसात होणे हे हिंसाचाराने जगण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. तत्वभ्रष्ट होऊन जगण्यापेक्षा तत्वनिष्ठ राहून मरणे अधिक मानाचे आहे."

गांधीजींच्या परिवारात राधाकृष्णनांसारख्या महापंडितांना जितका मान होता, तितकाच उत्तम वहाणा करणाऱ्या चांभारालाही होता. हिंदी स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे केवळ इंग्रजी राज्याचे जोखड फेकून देण्यासाठी नव्हती. हिंदी
संस्थानिकांची राजवट नाहीशी करणे आवश्यक होते. हे हिंदी राजेमहाराजे म्हणजे भारतीय वेषातले ब्रिटीश अधिकारीच आहेत, असे गांधीजींचे मत होते. नेहरूंनी तर ह्या आपमतलबी संस्थानिकांच्या हकालपट्टीची केव्हाच मागणी केली होती. आता सत्याग्रहाच्या चळवळीचे लोण संस्थानांतही जाऊन पोहोचले आणि ब्रिटीश
हिंदुस्थानातली जनता आणि संस्थानी जनता हा भेद नाहीसा होऊ लागला. हे राजेमहाराजे म्हणजे घरच्या म्हातारीला काळ होणारी ब्रिटीशांच्या ताटाखालची मांजरे आहेत, हे संस्थानी जनतेने ओळखले. संस्थानिकांची रिकामी मोटारगाडी गेली, तरी घाबरून वाकून वाकून मुजरे करणारी जनता 'महात्मा गांधी की जय' आणि 'इन्किलाब झिंदाबाद'च्या घोषणा निर्भयपणे देऊ लागली. ऐषआरामी, व्यसनी आणि प्रजेकडून जुलूम-जबरदस्तीने पैसे उपटणाऱ्या संस्थानिकांनी इंग्रजांनासुद्धा लाज वाटावी, असे अत्याचार केले. परंतु सुशिक्षित संस्थानिकांनी मात्र काळाची पावले ओळखून प्रजेला अधिकाधिक अधिकार द्यायला सुरुवात केली. आपल्या महाराष्ट्रातल्या चिमुकल्या औंध संस्थानाने ह्या कार्यात अग्रमान मिळवला.

(... अपूर्ण)
पुस्तक - गांधीजी
लेखक - पु.ल. देशपांडे