Tuesday, November 10, 2020

पुलकित आठवणींचे आजोळ

महाराष्ट्राचे लाडके दैवत, पु. ल. देशपांडे.. उत्तम, दर्जेदार विनोदाचे संस्कार ज्यांनी उभ्या महाराष्ट्रावर केले, उत्कृष्ठ वक्ते, ललितलेखन, प्रवास वर्णन ह्या द्वारे मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे, जाणकार संगीतकार, नाटककार, चित्रपट क्षेत्रात ही ज्यांनी आपला ठसा उमटवला असे हरहुन्नरी कलाकार, असे अनेक पैलू असलेले बहुरंगी बहुढंगी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या प्रतिभेचे वर्णन करण्याइतकी प्रतिभा आणि शब्द ह्या दोहोंची माझ्याकडे कमतरता आहे... पुल असे अवलिया आहेत की त्यांच्या हयातीत माणसं त्यांच्याकडे आपोआप आकर्षित व्ह्यायचीच आणि त्यांच्या सहवासाने प्रसन्न चित्त. तसचं आता ही त्यांच्या साहित्य रुपी ठेव्याने ते अजरामर आहेत... त्यांच्या साहित्यातील काहीही वाचायला घ्या... तुमचं मन आनंदी, प्रसन्न झालच पाहिजे...
(पुलंच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे , मी रेखाटलेले हे रेखाचित्र)

पुलं ना मी प्रत्यक्ष पाहिले नव्हते.. पण माझे आजोबा,आजी,आई, मावश्या ह्यांनी पाहिलं होते... पार्ल्यातील , अजमल रोड वरील पुलंचे त्र्यंबक सदन हे घर आणि माझे आजोळ जवळ जवळ. पुलंचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ आणि माझ्या आजोबांचा श्री. पु. करकरे ह्यांचा जन्म २० मे १९२०... पुलंची आई आणि माझ्या आजोबांची आई म्हणजे माझी पणजी (इंदिरा करकरे) ह्या छान मैत्रिणी... दोन्ही कुटुंबात जिव्हाळ्याचे संबंध, त्यामुळे माझ्या आजोबांच्या तसचं माझ्या आईच्या तोंडून ही पुलंच्या अनेक आठवणी मी ऐकल्या आहेत... पुलं पार्ल्यात कायम वास्तव्याला नसले तरीही ते , सुनीता बाई अधून मधून पार्ल्यात यायचे.. माझी आई, मावश्या लहान असताना त्यांच्या घरी कधीतरी जात...आई सांगते, तिच्या लहानपणी टेप रेकॉर्डर नवीन होता, पुलंच्या घरी तो होता, मग पुलं, सुनीता बाई, कधीतरी, तिला, माझ्या मावश्या, तसचं इतर आजूबाजूच्या लहान मुलांना त्यांच्या घरी बोलावून त्यांच्या आवाजात गाणी, गोष्टी रेकॉर्ड करून घेत, आपलाच आवाज टेप रेकॉर्डर वर ऐकताना ह्या सर्व लहान मुलांना भारी मौज वाटे...१९६१/६२, साली जेव्हा, पुलं, गदिमा, वसंत कानिटकर, वसंत सबनीस यां सारखी दिग्गज मंडळी सैनिकांचे मनोरंजन करणाऱ्या कार्यक्रमासाठी लडाख ला निघाली तेव्हा त्यांना विमानतळावर निरोप द्यायला पुलंच्या घरच्या मंडळींबरोबर माझी आई, मावश्या हि गेल्या होत्या.

ह्या आणि अशा अनेक छोट्या मोठ्या आठवणीत माझ्या आजोबांनी आम्हाला सांगितलेली एक पुलंची हृद्य आठवण माझ्या मनाला भावते.

१९६० साली माझी पणजी, आजारी होती, तिचे हे शेवटचे दिवस हे तिने जाणले होते, तेव्हा पुलं आले की त्यांना मला भेटायचंय अशी इच्छा तिने पुलंच्या आईपाशी व्यक्त केली होती, पुलं त्या दरम्यान जेव्हा पार्ल्याला आले तेव्हा आवर्जून माझ्या आजोबांच्या घरी पणजी ला भेटायला आले... पणजी ला त्यांना बघून खूप बरं वाटलं आणि तिने त्यांना छोटीशी भेट म्हणून रुमाल दिले.. पुढे काही दिवसांनी माझ्या पणजीचे निधन झाले... ही बातमी जेव्हा पुलं ना समजली तेव्हा पुलंनी माझ्या आजोबांना एक सांत्वन पर पत्र लिहिलं, त्यात पुलं म्हणतात,"मावशींच्या निधनाची बातमी ऐकून फार वाईट वाटलं , तुझी आई अन् माझी आई अतिशय चांगल्या मैत्रिणी, त्यांनी जणू स्वतःचे मरण आधीच जाणले होते... मी त्यांना भेटायला आलो होतो तेव्हा त्यांनी मला रुमाल भेट दिले, जणू भविष्यात घडणाऱ्या ह्या दुःखद प्रसंगाने डोळ्यात येणारे अश्रू पुसायलाच म्हणून हे रुमाल दिले.." पुलंचे हे भावपूर्ण पत्र माझ्या आजोबांनी जपून ठेवलं होतं.. मी ही माझ्या लहानपणी ते पाहिलं होतं.

पुलंना प्रत्यक्ष पहायचं भाग्य मला लाभलं नसलं तरी पुलं चे ,गोल जिना असलेले जुने घर, मला आठवतंय. उंच, शिडशिडीत बांध्याच्या पुलंच्या आई,(ज्यांना मीराच्या आई असं संबोधलं जायचं) पुलंसारखे दिसणारे त्यांचे भाऊ उमाकांत आणि धाकटे बंधू अन् अभिनेते रमाकांत देशपांडे ह्यांना मी पाहिले आहे. आता माझं आजोळ तिथे नाही तसचं पुलंचे ते जुनं घर ही नाही (त्र्यंबक सदन आहे पण नव्या इमारती स्वरूपात), पण त्या भागात गेले की अजूनही नॉस्टॅल्जिक वाटतं... पुलंच्या ह्या प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष आठवणीने मन पुलकित होते आणि पुलं आणखी जवळचे वाटतात.


डॉ स्वाती भाटवडेकर
८/११/२०२०

0 प्रतिक्रिया: