Wednesday, February 6, 2019

पोवाडा 'पुरुषोत्तमाचा'

                                    ।। श्री ।।

प्रथम गणराया तुला वंदन ।
वीणावादीनी दे मला वरदान ।
'पुरुषोत्तमाचे" गाइन गुणगान ।।
कुस धन्य केली त्यांनी मा s य मराठीची
जी जी जी ।। १ ।।


ज्ञानेशाने अमृताचे पैज जिंकलं ।
तुक्यामुळे मराठीपण तरंगलं ।
शिवबा, टिळक, सावरकर, फुलं ।
गडकरी, अत्रे, शिरवाडकर, बोरकर, जी. ए., पुलं ।।
जन्मले शाहीर मराठीचे फेडण्या ऋण हो
जी जी जी ।। २ ।।


मायमराठी सापडे पारतंत्र्याच्या विळख्यात ।
'वाघीणीचे दूध' प्यावया धावती अभिजात ।
लक्तरे भाषेची मराठी मुलखात ।
'उधार' विनोद, नाटके, कथा, संगीत भ्रांत ।।
पुरुषोत्तमाच्या लेखणीने फुंकले जनी प्राण हो
जी जी जी ।। ३ ।।


काव्यशास्त्र विनोदाला दिला सन्मान ।
भोळाभाबडा विनोद शारदे घरी विराजमान ।
हसवती बोचरे नेमके व्यंगावर बोट ठेवून ।
भाषेची वळणे, खोच, धार, ओघ धवल शालीन ।।
कर्ताना लिखाण भाषण न सुटे पुलंचे भान
जी जी जी ।। ४ ।।चौसष्ट कलांचे ध्यान जणु गणेशाचे ।
पुरुषोत्तम देशपांड्यांचे अंगी नाचे ।
गाणं, वादन, चित्रपट, कथा विनोदाचे ।
नाटक, एकपात्री, भाषण लेखन रचे ।।
मराठीमन विसरी तनमन, हसे खळखळून
जी जी जी ।। ५ ।।


वाऱ्यावरची वरातीस निघती व्यक्ती आणि वल्ली ।
नसती उठाठेव, खोगीर भरती, खिल्ली ।
गणगोत, अपुर्वाई, बटाट्याच्या चाळी ।
असा मी असामी गुण गाईन आ s व s डी ।।
फुटती हास्याच्या लाह्या कोरुनी करुण 'मैत्र' हृदयी
जी जी जी ।। ६ ।।


"पी एल्" मराठी मनाची साठवण खास ।
"पुल" मराठी मुलखाचे कोट्याधीश ।
'सुनीता' शोभे पार्वती अन पुलं ईश ।
'गुंतुनी गुंत्यात' परी त्यांचे मोकळे आकाश ।।
बघती कौतुके नवे मराठी उन्मेष हो
जी जी जी ।। ७ ।।


हास्य सदा वसे वदनी गोल गुबगुबीत ।
खोडकर 'मुलपण' मिस्किली सदा डोळ्यात ।
हसताना चमकती चतुर दोन दात ।
केश कुरळ, गोल देह, मायाळू सढळ हात ।।
'पुल प्रतिष्ठान' करी वर्षाव, वाढवी मराठी सृ s ज s न
जी जी जी ।। ८ ।।


ढोंगी, गुंड, पुंड, राजकारण ।
न सुटे त्यांचे लेखणीचे तडाख्यातून ।
गुणांचे, मूल्यांचे, नवनवतेचे रक्षण ।
हसवताना आत उठे कळ करुण ।।
घराघरात, लहान थोरां सांधणारा हाच एक पू s ल s
जी जी जी ।। ९ ।।


धन्य धन्य माय मराठीची कुस ।
पुत्र व्हावा ऐसा गुंडा ही पुरवली आस ।
त्याचा तिन्ही लोकी झेंडा हाच आपुला ध्यास ।
चिरंतन महाराष्ट्र धर्म ही शाहीराची आस ।।
चंद्र सुर्य गगनी तोवरी देशपांडे पुलं गाजतील खा s स s
जी जी जी


महाराष्ट भूषणा, पुरुषोत्तमा तुला वंदन
जी जी जी ।। १० ।।


पोवाडा ऐकण्यासाठी इथे क्लिक करा - पोवाडा ‘पुरुषोत्तमाचा’ video

मुळ स्रोत -http://mitramandal-katta.blogspot.com/p/povadapurushottamacha.html


विवेक प्र. सिन्नरकर,
कोथरुड – पुणे
मो. ९३७१० ०३७४८

0 प्रतिक्रिया: