Tuesday, December 14, 2021

सर्दी

सर्दी हा एक मोठा चमत्कारिक रोग आहे. वास्तविक रोग म्हणवून घेण्याच्या लायकीचाही हा रोग नाही. ‘रोग’ ह्या शब्दालाही काही दर्जा आहे. दमा, क्षय वगैरे भारदस्त मंडळींनाच ही उपाधी लागू पडते. रक्तदाब हा मला वाटते एक नुसता विकार आहे. मधुमेह हा विकार आणि रोग ह्यांच्या सीमारेषेवर घुटमळणारा चाळीशी उलटलेला गृहस्थ आहे. पण सर्दी ही नुसतीच एक पीडा आहे. पूर्वी नथ-पाटली वगैरे ‘दागिन्यां’च्या सदरांत मोजत नसत, बाई म्हटली की नथ-पाटली आपोआप यायची, ठुशी, लमाणी हे दागिने! त्या दागिन्यांचे कौतुक व्हायचे-चौकशी व्हायची. एखाद्या बाईच्या हातांत पाटली आली तर मुद्दाम होऊन तिने आपला हात पुढे नाचविल्याशिवाय तिथे कुणाचे लक्षच जात नसे.

सर्दीचे असेच आहे. हा रोग, रोग ह्या सदरांत येत नसल्यामुळे त्याचे कौतुक अगर चौकशी होत नाही. आपल्याला सर्दी झाल्याबद्दल सहानुभूती मिळत नाही. वास्तविक खऱ्या सहानुभूतीची आवश्यकता असते ती असल्या चिल्लर वाटणाऱ्या पीडांच्या बाबतीत! मान धरलेला इसम (आपोआप! दुसऱ्या कुणी नव्हे) हे इंद्रिय-गोचर सृष्टींतले माझ्या मते सर्वात करुण दृश्य! जेव्हा मान आखडते किंवा धरते तेव्हा माणसाच्या खऱ्या नाड्या आखडतात. तो खुळ्यासारखाच दिसायला लागतो. त्याचे एकूण व्यक्तिमत्वच कांहीच्या कांही होऊन जाते. परंतु ह्या प्रकरणांत सगळ्यांत दुःख असते ते सहानुभूतीच्या अभावाचे! कुणाला आस्थेने आपली मान धरल्याचे सांगावे आणि परिणामी त्याच्याकडून एखादी क्षूद्र कोटी किंवा ‘कोयता ओढा’, ‘पायाळू माणसाची लाथ खा’ असला कांही तरी आचरट इलाज ऐकायला मिळतो.

सर्दीचं असंच आहे. सर्दी का होते हेही कळत नाही आणि कां बरी होते हेही कळत नाही. औषधांनी ती बरी होत नाही हे मात्र निश्चित!

मान धरलेला माणूस आणि सर्दी झालेला माणूस ह्यांच्या दर्शनात मात्र खूप अंतर आहे! मान धरली की चेहऱ्यावर एकाएकी दैन्य येते. चेहरा कितीही उग्र असो, मिशांचे चढलेले आंकडे असोत, एकदां मान धरली की सारी जरब, सारा रुबाब, कडवेपणा कुठल्या कुठे पळून जातात आणि खर्चाशिवाय खटला काढून टाकल्यावर दिसणाऱ्या वादीसारखा माणूस गरीब दिसायला लागतो. सर्दीचे तसे नाही. सर्दीमुळे माणसाच्या चेहऱ्यावर एक व्यक्तिमत्व येते! गोरी माणसे सर्दी झाल्यावर अधिकच रुबाबदार दिसतात आणि गोऱ्यापान तरुणींना तर सर्दीमुळे निराळीच कांती येते! गर्भकांतीचे कौतुक सर्वांनीच केले आहे. परंतु शिंकेने हैराण झालेल्या युवतीच्या सौंदर्याची सर फक्त रुसव्यापोटी निघालेल्या रडण्यांतल्या सौंदर्यालाच आली तर येईल.

माणसाप्रमाणेच सर्दीला बाल्य-यौवन-वार्धक्य वगैरे असते. म्हणजे पहिल्या दिवशींची सर्दी अवखळ असते. फटाफट शिंकाच काय येतात, घसाच काय खवखवायला लागतो. ही बाळसर्दी आपल्याला एका जागी बसूं देत नाही. एकाएकी तहान लागते, तपकीर ओढावीशी वाटूं लागते, कडकडीत दुधांत हळद घालून प्यावेसे वाटूं लागते. परंतु हळूहळू तिच्यांतही एक प्रौढत्व येते आणि मग ती गंभीर होते आणि आपल्यालाही गंभीर करते. आपली छाती वाजूं लागते. छातीत नुसत्याच खर्जाचे तंबोरे ठेवल्यासारखे वाटायला लागते. डोके काठोकाठ भरलेल्या माठासारखे जड होते. किंवा खांद्यावर एरवी डोक्याचे वजन कधी भासत नाही ते भासूं लागते आणि नकळत आपल्या चेहऱ्यावर एखाद्या तत्त्वज्ञाची गंभीर कळा येते. एखाद्या विद्वान अध्यक्षाला व्यासपीठाकडे नेताना तालुक्याच्या गावांतल्या बालोत्तेजक किंवा तरुणोद्धार मंडळाच्या चिटणीसाचा चेहरा जसा एकदम गंभीर होतो किंवा सुपरवायझर वर्गात शिरले की शाळामास्तराच्या चेहऱ्यावर जसे अगतिकता आणि गांभीर्य यांचे चमत्कारिक मिश्रण लागते तसे कांहींसे आपण दिसायला लागतो. हे गांभीर्य सत्वगुणी नसते, त्याची मुळे तमोगुणांत शिरलेली असतात. हे गांभीर्य आपल्या चेहऱ्यावर लादलेले असते. अवघडलेल्या मानेच्या माणसाची मान ताठ असून जशी ताठ नसते तद्वत् सर्दी भरल्यामुळे चेहऱ्यावर आलेले गांभीर्य ‘इमिटेशन’ गांभीर्य असते. असल्या माणसाकडे पाहिले की आपली दर्शनी फसवणूक होते. परंतु तो बोलायला लागला की त्याच्या आवाजावरुन त्या गांभीर्याच्या झिरमिळ्यांचा जर खोटा आहे हे आपल्याला लगेच उमगते. बाकी ही देखील एक मौजच आहे. दातांची नवी कवळी बसवलेला म्हातारा काय विलक्षण तुकतुकीत दिसतो! विशेषतः दंतवैद्याच्या नजरचुकीने चेहऱ्याचा ठसाच बदलून टाकणारी कवळी बसवली जावी म्हणजे तर चेहऱ्याच्या मुळच्या सुरकुतलेल्या रेषांना पार इस्त्री होऊन गाल चांगले ताणून गेलेले असतात. पण हे सारे तोंड उघडेपर्यंत! एकदां असल्या इसमाने तोंड उघडले की ह्या साऱ्या तुकतुकीचे कारण चटकन उघडे पडते. सर्दीचे गांभीर्य असल्याचे जातीचे!

पण सर्दीची तिसरी अवस्था मात्र आस्वादाचे व्रत शिकवण्यासाठी जन्माला येते. ह्या अवस्थेत घ्राणेंद्रियांचा संप सुरू होतो. पोळी खाल्ली काय किंवा तीन पैशाचे कार्ड खाल्ले काय कांही फरक कळत नाही. वासांच्या दुनियेतले हर्ष खेद मावळतात. पोपईची आणि आंब्याची फोड ह्यांतला फरक नष्ट होतो. अशा एका अवस्थेंत मी वसईच्या कोळीवाड्यावरुन सकाळी फिरुन आलो. किनाऱ्याला भराभर वजन बसवलेले मचवे लागत होते. त्यातून टोपल्या भरभरून तऱ्हेतऱ्हेची मासळी किनाऱ्यावर येऊन पडत होती. सुकायला टाकलेल्या बोंबलांचे आणि ‘सुकटा’च्या रांगांनी बांबूंचे ते मांडव बहरले होते. परंतु माझ्या डोळ्यापर्यंतच ते पोहोचत होते. नाकाल वर्दी नव्हती. चांगला तासभर मी तिथून हिंडत होतो पण एकदांही हातरुमाल नाकाशी गेला नाही. किनाऱ्यावर पसरलेल्या असंख्य जातींच्या माशांच्या रंगांशी, आकारांशी आणि ताजेपणाशी स्पर्धा करणाऱ्या मत्स्यगंधा तेथे होत्या. पण माझ्या हिशेबी त्या मत्स्यगंधा नव्हत्या, नुसत्याच कोळणी होत्या.

गंधसृष्टीने माझ्यापुढे लोखंडी पडदा टाकला होता. रामनवमीला रामाच्या देवळांत जाऊन नुसतेच कीर्तन ऐकू यावे आणि सुंठवडा मिळू नये अशी माझी अवस्था होती. माशांचे मासेपण माझ्या लेखी (नाकी?) तरी हरपले होते. मांदेली खाल्ली काय-पापलेट खाल्ले काय किंवा सुरणाच्या फोडी तळून खाल्ल्या काय, मला सर्व सारखेच होते. मला एकदम एक निराळाच साक्षात्कार झाला. सर्वत्र समभावाने पहाणाऱ्या संतांची परिस्थिती काय करुण होत असेल याची जाणीव मला त्यावेळी प्रथम झाली. तळलेले पापलेट आणि तळलेला सुरण दोन्ही मला सारखे? मला माझी कीव आली. जीवनांतला सारा आनंद विषमभावांत आहे हे त्यावेळी मला कळलं! ओढ्याचे जिवंत खळाळणें आणि सोडावॉटरच्या बाटलीचे फसफसणे ह्या मूलतः किती निराळ्या गोष्टी आहेत हे मला तिथे उमजले.

नाद, रंग, रस आणि गंध ह्यांनी आपल्यावर काय अपार उपकार केले आहेत याची पहिली जाणिव माझ्या संपावर गेलेल्या नाकाने दिली. चौपाटीवरची भेळ चौपाटीवरच कां चांगली लागते ह्या मागले गूढ मला उकलले. तिथे लाटांचा नाजुक आवाज असतो, मावळत्या सूर्याचे रंग असतात, ओलसर वाळूचा स्पर्श असतो, अंगावरुन जाणाऱ्या अनोळखी रेशमी साडीची सळसळ असते आणि त्याशिवाय मग भेळ असते! म्हणून ती भेळ चांगली! युरेका! हे सारं निरनिराळेपण आपल्याला दिसतं, आपल्या कानावरुन जातं, आपल्या नाकाशी ओठाशी घोटाळतं म्हणून ह्या साऱ्या धडपडीला अर्थ येतो, छे छे! मखमालीची लव वठतां कामा नये—डोळ्यांत आंसू हवेत ओठावर हांसूं हवे—आणि ह्या साऱ्यांच्या वृंदवादनांत झपूर्झाही हवा!

मला एकाएकी वासाची ओढ लागली. खरपूस बाजरीच्या भाकरीचा वास, दुपारच्या झोपेतून उठलेल्या बालकाच्या अंगाचा वास, नव्या पुस्तकाचा वास, हळदीचे पान टाकून कढवल्या जाणाऱ्या लोण्याचा वास, घरांतले हळदीकुंकू आटोपल्यावर दिवाणखान्यांत रेंगाळणारा वास, गुऱ्हाळांतला वास, गोठ्यांतला वास, गाभाऱ्यांतला वास,.... माझ्या प्रत्येक श्वासाने नवा वास घेतला आहे. वास नष्ट होणे सारखेंच!

साधे साधे वास आपल्याला कुठल्याकुठे घेऊन जातात. अजूनही नव्या पुस्तकाचा वास मला माझ्या मराठी शाळेत घेऊन जातो. पुष्कळदां पूर्वी येत होता तसला वास येत नाही नव्या पुस्तकाला आणि आपल्याला फसल्यासारखे वाटते! बदलत्या साहित्याने पुस्तकांचे वासही बदललेले दिसताहेत! बाकी शब्दांनाच जर वास असता किंवा घाण असती तर साहित्याचे मूल्यमापन फार सोपे झाले असते. पण जिव्हाळ्याच्या शब्दांना वास असतो. नाही असे नाही. स्पर्श देखील असतो. अजूनही कोणी उभ्याउभ्या जरी मला “चिरंजीव हो” असा आशीर्वाद दिला तरी मला पाठीवरून हात फिरवल्यासारखा वाटतो. पण खराखुराच जर का वास असता शब्दांना तर भलतीच आफत झाली असती. कागदी शब्दांना कागदी फुलांसारखा वासच आला नसता आणि फुलराणीसारखी कविता उघडल्याबरोबर घमघमाट सुटला असतां. बाकी डोक्यांत भलतीच सर्दी शिरलेली नसली तर अजूनही तो वास येतो. ज्ञानेशाची ओवी कानावर पडली किंवा पंतांची आर्या खणखणली की उदबत्तीचा सुगंध ठेवून गेल्याशिवाय रहात नाही. अशा वेळी विचार येतो की ह्या नव-कविता कसला सुगंध ठेवून जातात? पण सुगंधाचा ठेवा हा कांही विचार करुन सांपडत नसतो. सुगंधाची खरी गंमत-खरा लुत्फ तो नकळत भेटतो तेंव्हा! कल्पनाही नसते आणि आपल्याला वास येतो. वास घेण्यापेक्षा वास येण्यांत आनंद आहे. पूर्वीच्या काळी बायका ठेवणीच्या लुगड्यांत वाळा घालून ठेवीत आणि मग सणासुदीला त्यांनी ट्रंक उघडली की अनपेक्षितपणे तो वाळ्याचा वास दरवळायचा. काव्याचा वास देखील असाच दरवळला पाहिजे! अलीकडे कित्येक वर्षांत असा वास ठेवून जाणारी कविताच वाचली नाही. ह्या नवकवितांनाच वास नाही की माझ्या नाकांत सर्दी भरली आहे देव जाणे! कदाचित् नव्या सुगंधाचा मला साक्षात्कार नसेल. मला देवळांतल्या गाभाऱ्यांतल्या मशालीच्या जळक्या कपड्याचा वास आवडतो पण मशीन पुसायच्या कापडाच्या चोथ्याचा वास माझ्यावर कांही संस्कार उठवून जात नाही. नवी गंधसृष्टी समजायला मला वाटते ह्या वासांची नाकाला सवय हवी! माझे नाक आतां जुने होत चालले, त्याला ओढ आहे ताज्या शेणाने सारवून हिरव्या झालेल्या जमीनीच्या वासाची! सिमेंटच्या वासांतून ते बिचारे फुलत नाही. आम्ही शहरची वस्ती सोडून एका बाळबोध गावांत राह्यला गेलो होतो. टुमदार गांव होते. सुसंस्कृत होते, कलाप्रिय होते, पण आम्हाला घर मिळाले ते शेणाच्या जमिनीचे! माझ्या पत्नीने पहिल्या दिवशी घर सारवले आणि शेणाने भरलेल्या हातांनी ती भिंतीला टेकून आपली कर्तबगारी पहात उभी राहिली होती. त्या ताज्या गोमयाच्या गंधाची त्या दर्शनाला साथ मिळाली होती. आणि म्हणून माझ्या नाकांत सारवलेल्या जमिनीच्या वासाला एक मनोहर आकार आहे! तो गंध नाही. गंधाची कन्या आहे. अजूनही मला तो वास आला की त्या वासाची सौभाग्यवती मूर्ती माझ्यापुढे रहाते! पुराणांत कुणी योजनगंधा होती म्हणतात. कित्येक योजने दूर असली तरी म्हणे तिचा वास येत असे. रेल्वेने जातांना देहूरोड गेले की पुणे दरवळायला लागते. ह्या नुसत्या वासांच्या आठवणींनी मी हिंदुस्थानांतल्या हिंदुस्थानांत तरी खूप भटकून येतो!

आज मात्र माझी पंचाईत झाली आहे. मी तऱ्हा तऱ्हा करुन पाहिल्या, पण माझे नाक ऐकायलाच तयार नाही. मी सकाळी उठलो आणि ब्रशवर पेस्ट ओतली. दांत घांसले, वास नाही. चहा प्यालो, पत्ता नाही. सिगरेट ओढली, जळकी काटकी ओढल्याचा भास झाला. जेवलो, भाजी, आमटी, भात आणि ताज्या माशाचे तळलेले तुकडे. कांही फरक नाही. पान खाल्ले. ते आंब्याचे किंवा केळीचे असते तरी चालले असते. सुपारी आणि कातरलेले लाकूड मला आज सारखेच! सर्वत्र समभाव, संतांची दृष्टी नसली तरी संतांची जीभ मला लाभली होती. आस्वादाने अन्न भक्षण करणाऱ्या, जाणिजे यज्ञकर्म म्हणून पोटातल्या वैश्वानराला आहुती टाकणाऱ्या संतांची रसहीन रसना! मला ती रसना नको आहे. सर्दीचा आणि संतांचा संसर्ग एकूण माणसांना उपयोगाचाच नाही. सर्दीचे गांभीर्यही नको, स्वादहीनता नको आणि संतांची तर समदृष्टी नकोच नको, त्यांना साऱ्याची चवच सारखी लागते एवढेच नव्हे तर सारे सारखेच दिसतात आणि सारे स्वर देखील सारखेच वाटतात म्हणे! अरे अरे अरे! माझ्या नाकांत जरी या क्षणी वास नसला, डोक्यांत जरी कांठोकांठ भरलेली सर्दी असली तरी अंतःकरणांत मात्र एकाएकी ह्या संतांविषयी विलक्षण कळवळा दाटला आहे! मात्र एक बारीक प्रश्न डोके वर काढतो आहे! संतांना आपल्याबद्दल कळवळा वाटतो म्हणतात तो कशासाठी मग?

लेखक - पु. ल. देशपांडे
नवाकाळ दिवाळी अंक
१९५८

0 प्रतिक्रिया: