Friday, June 18, 2010

सभ्य स्त्री-पुरुषहो,

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८चा! मुंबईतील प्रकाशक ग. पां. परचुरे यांच्या कुटुंबीयांनी पुण्यातील त्यांच्या जागेत आचार्य अत्रे यांचे स्मारक उभे करण्याचे ठरवले. पुण्यातील आचार्य अत्रे सभागृहाचे उद्घाटन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते २९ मार्च १९८१ रोजी झाले. या कार्यक्रमास बाळ सामंत, ग. वा. बेहरे, शिरीष पै, माधव गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेक्षकांमध्ये पु. ल. देशपांडे आणि संगीतकार सी. रामचंद्र यांना पाहिल्यावर उपस्थित प्रेक्षकांनी संयोजकांकडे चिठ्ठय़ा धाडून पुलंना बोलण्याचा आग्रह केला. ऐनवेळी पुलंनी केलेले हे भाषण ध्वनिमुद्रित करण्यात आले होते. पुलं आणि सुनीताबाई देशपांडे यांचे मानसपुत्र व भाचे, जगप्रसिद्ध गणितज्ज्ञ डॉ. दिनेश ठाकूर यांनी या भाषणाची तयार केलेली ही प्रत.
सभ्य स्त्री-पुरुषहो,

आतापर्यंत अत्र्यांवर प्रत्येकाने बोलण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न केला असे अशासाठी म्हणतो कारण, जे परमेश्वराच्याच बाबतीत म्हटलंय की ‘स्थिरचर व्यापून तो जगदात्मा दशांगुळे उरला’, तसं अत्र्यांच्यावर कितीही बोललं तरी ते दशांगुळे शिल्लक राहतात. या अत्र्यांचा मोठेपणा कशात आहे याचा पत्ता लावण्याचा, त्याचं संशोधन करायचा, काही धाडसी लोकांनी प्रयत्नसुद्धा करायचं ठरवलं आहे, असं मला कळलं. हा प्रयत्न चालू आहे, पण प्रत्येकाला असं वाटतं की- नाही, पण अजून मला काय म्हणायचं होतं, ते आलेलं नाही. बाळ (बाळ सामंत) आता म्हणाला तसं, की या महाराष्ट्रात काही व्यक्तीच अशा झालेल्या आहेत की, त्यांचा खरोखर घ्यावा तितका छडा कमी पडतो. जितकं आत शिरावं तितकं त्यांचं मोठेपण दिसतं. अत्र्यांच्या बाबतीमध्ये आम्ही जास्त बोलू शकतो, याचं कारण आम्हाला कुणी जर विचारलं की, तुम्ही कुठल्या काळात वाढलात, तर आम्ही अगदी न घाबरता सांगू की, आम्ही अत्र्यांच्या काळात वाढलो. मी एका माझ्या मागल्या भाषणांमध्ये सांगितलं होतं की, आम्ही जनात खांडेकर पण मनामध्ये अत्रे धरूनच बाकीचं सगळं बोलत होतो. याचं कारणच असं आहे की, लेखकाला आदर मिळतो, मान मिळतो, सन्मान मिळतो.

एक गोष्ट जी बालगंधर्वाना आणि अत्र्यांना मिळाली ती मला नाही वाटत फार आमच्याकडच्या प्रसिद्ध व्यक्तींना मिळाली. प्रत्येकाला, त्यांच्या शत्रूलासुद्धा, अत्रे हा आपला माणूस आहे, असं वाटत असे. मला जे काही म्हणायचंय, ते हा बरोबर बोलतो, असं वाटायचं. असं जर वाटलं नसतं, तर त्यांच्या बोलण्याला एवढा प्रतिसादच मिळाला नसता आणि अत्र्यांचे मला अनेक बाबतीतले उपकार माहिती आहेत, पण सगळ्यात मोठा उपकार जर कोठला असेल तर अस्सल मराठी भाषेचं तेज म्हणजे काय, ते अत्र्यांनी आम्हाला शिकवलं.

अत्र्यांच्या मराठीकडे, अत्र्यांच्या विनोदामुळे पुष्कळदा दुर्लक्ष होतं. विनोदी लेखकाचा एक तापच असतो की, भाषण संपल्यानंतर आपण काहीतरी सुंदर मुद्दा सांगितला, असं म्हणून आम्ही खाली उतरतो, आणि पहिलाच स्वाक्षरी घ्यायला येणारा मुलगा किंवा अधिक लालित्य पाहिजे असेल तर मुलगी, ही ताबडतोब सांगते की, आम्ही खूप हसलो. ‘बरं केलंत!’ आणखी काय सांगणार? अत्र्यांनी हसवलं, त्याहीपेक्षा अत्र्यांनी हसवता हसवता या महाराष्ट्राला शहाणं केलं, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे दिवस ज्यांनी पाहिले असतील, त्यांना माहिती असेल की, एखाद्या अन्यायाविरुद्ध संतापून उठणं म्हणजे काय आणि तो संताप व्यक्त करताना आपलं अर्धाअर्धा, पाऊणपाऊण, तासातासाचं भाषण हसवत, हसवत, हसवत सांगत तो वन्ही प्रज्वलित कसा ठेवावा, याचा विचार म्हणजे काय- या दोन्ही गोष्टींचं तारतम्य त्यावेळी कळलं. अत्रे काय त्याच वेळेला त्वेषाने उठले होते, असं काही नाही. अत्र्यांच्या जीवनाचं सारं सर्वस्वच मुळी उत्कटता हे आहे. त्यांना लहान काही दिसतच नसे.

मी एकदा म्हटलं होतं की, अत्र्यांना त्यांच्या मास्तरांनी ‘बे एके बे’ हा पाढा न शिकवता ‘दोन हजार एके दोन हजार’, ‘दोन हजार दुणे चार हजार’ हाच पाढा शिकवला असावा. आम्हाला म्युनिसिपालिटीच्या शाळेतल्या मास्तरांना दोन म्हणतानासुद्धा आपण जास्त सांगतोय, असं वाटतं. अत्र्यांना कोण ते सासवडचे गुरुजी मिळाले कुणास ठाऊक?
पुण्यातल्या एका समारंभाला आम्ही दोघेही बसलो होतो. त्यांचं आणि माझं, दोघांचंही भाषण होतं. मला म्हणाले, ‘काय रे पी.एल.? किती माणसं असतील असं वाटतं?’ आता माझा साधारणत: कारकुनी अंदाज. मी म्हटलं, ‘हजार-बाराशे असतील.’ ते म्हणाले, ‘अरे बघ, कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार लोक आहेत.’
म्हटलं, ‘कुठले आहेत?’

‘अरे, सत्तर ते ऐंशी हजार म्हणाला नाहीस तर जिल्हा पत्रकाचासुद्धा संपादक होणार नाहीस.’
मग मी सांगितलं त्यांना, ‘बरोबर आहे, ही सभा पुण्यात असल्यामुळे एक माणूस म्हणजे दहा माणसांच्या बरोबरीचा. असा हिशोब तुम्ही काढून हे लोक काढलेले असणार!’
अत्रे हे असं व्यक्तिमत्त्व की ज्या व्यक्तिमत्त्वाला सत्य दिसत होतं आणि ते दिसल्याबरोबर सांगितल्याशिवाय राहावत नव्हतं. अत्र्यांना घाईच असायची ते सांगायची. ‘जगात झालं नाही’ असं जेव्हा अत्रे म्हणत, त्यावेळेला त्या क्षणापुरतं ते खरं असे. हे लक्षात घ्या की, मोठेपणा अनुभवावा कसा हेसुद्धा आपल्याला कळत नाही, ते त्यांना कळलं होतं. जीवनातलं उदात्त म्हणजे काय, मोठं म्हणजे काय, भव्य म्हणजे काय हे ज्या माणसाला कळतं, तोच मनुष्य असं सांगू शकतो.

अत्र्यांना काय आपल्या व्याख्यानाला दहा लाख लोक जमले याची जाहिरात करण्यात काहीच रस नव्हता. ते दहा लाख लोकच गावभर सांगत जातच होते; पण एखादा प्रसंग उत्कटतेने मोजायचा आणि त्यांचं गणित मांडायचं, हे गणित कुठल्याही शाळेमध्ये शिकवलं जात नाही. जीवनाच्या शाळेमध्ये उघडय़ा डोळ्याने आणि विनोदबुद्धीने जो हे पाहात असतो, त्याच्या बरोबर लक्षात येतं की मोठं ते काय आणि मोठेपणाचा आभास तो कुठला! मोठेपणाचा आभासच पुष्कळ वेळेला आपल्याला माणूस मोठा आहे, असं भासवायला लावत असतो.
बऱ्याच लोकांनी माझा इथे अत्र्यांचा उत्तराधिकारी वगैरे असा उल्लेख केल्यामुळे मीही थोडासा चढूच गेलो आहे. पण मी उत्कटतेने सांगतो की, जीवनातलं सुसंगत म्हणजे काय ते तुम्हाला चांगलं कळल्याशिवाय विसंगत म्हणजे काय ते कळणार नाही. बाकीची नुसती चेष्टाच उरेल. आणि अत्र्यांना जीवनातलं सुसंगत म्हणजे काय हे कळलं होतं, याचे पुरावे कऱ्हेच्या पाण्यामध्ये आणि इतरत्र हजारो ठिकाणी दिसतील. कोणाची टाप आहे असं म्हणायची की लोकमान्यांचा आमच्यावरती आशीर्वाद होता? लोकमान्यांच्या तेजाने आम्ही दिपून गेलो होतो म्हणणारे अत्रे हे कुठल्या उत्कटतेच्या क्षणाला बसून ते लिहीत असतील? लोकमान्यांच्या बाबतीमध्ये गडकऱ्यांनीच, त्यांच्या गुरूंनीच म्हटलं होतं, की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचा कोणी राहिलेला नाहीये. म्हणजे पुणं दरवेळेला महान होतं, असा भ्रम काही आपल्याला ठेवायची गरज नाही. पुणं, पुणं केव्हा झालं की, ज्या वेळेला लोकमान्य होते, त्यावेळेला. तेव्हा त्या पुण्याला पुणेपणाचा अर्थ होतो. शेवटी शहरांना मोठं-लहान कोण करतं? त्या शहरातल्या व्यक्तीच. आणि मग आपल्यासारखी जी साधी माणसं असतात, ती हळूच आपलं नातं जमवायला ‘आम्हीसुद्धा त्याच आळीतले’ वगैरे सांगतात.

मला इथे कुणाला काही असं बोलायचं नाहीये! आपणही नाही का सांगत, महाराष्ट्राबाहेर गेल्यावर छत्रपतींचं नाव! इथे घेता येत नाही कारण इथे नक्की तुम्ही कोण आहात ते सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे हा जो काही अत्र्यांचा गुण होता की, चांगलं दिसल्यावर उडीच मारायची, मोठय़ाने शाबासकी द्यायची, जोरात पाठीत थाप द्यायची, ती थाप ज्याच्या पाठीत गेली त्याची पाठही तितकीच ताकदवाली असल्यामुळेच तो ती थाप सहन करू शकत होता. कारण लेच्यापेच्या पाठीवर त्यांनी थाप मारली नाही. महाभिकार, अगदी अद्भूत, भिकार वगैरे हे शब्द त्यांचे अतिशय लाडके होते आणि त्यांच्या सुदैवाने ते वापरायची संधी समाज त्यांना देत होता.

मगाशी कोणीतरी सांगितलं की, अत्र्यांनी कीर्तन केलं नाही. पण मी सांगतो तुम्हाला, त्यांनी कीर्तनही केलंय. एवढंच नव्हे, तर अत्रे समोर कीर्तन करत असताना मागे अभंग म्हणून टाळ धरायला मीच स्वत: होतो. त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी मला सांगितलं की, तुझ्यासारखा आवाज जगात नाही. त्यामुळे मला वाटलं, खरंच आहे. त्या कीर्तनाला आम्ही दोघेही उभे होतो. अत्रे पुढे कीर्तन म्हणायचे, प्रवचन गद्यामध्ये सांगायचे. आणि अभंगावर आले की, लगेच आम्ही अभंग सुरू करायचो- ‘चंदनाचे हात, पायही चंदन.’

मला तरी तो प्रसंग आठवतो. त्या रात्री १-१।। वाजेपर्यंत विल्सन हायस्कूलच्या पटांगणावर कीर्तन झालं. साने गुरुजींच्या स्मृतीसाठी काहीतरी कार्यक्रम होता. त्याच्यासाठी अत्र्यांनी ते कीर्तन केलं होतं, म्हणून मी गेलो होतो. नाहीतरी एरवी देवाशी सौदा करायला जी कीर्तनं होतात, त्याला मला जायची इच्छा नसते. पण चांगल्या कारणाने कीर्तन होतं. त्याच्यामध्ये ‘चंदनाचे हात, पायही चंदन’ सांगताना, वैष्णवांचा धर्म सांगताना, फुले, आगरकर वगैरे लोकांनी जी समाजसेवा केली त्याबद्दल अत्रे बोलले आणि मग बरोबर तुकारामांवर येऊन त्या संतांचं आणि आजच्या विचारवंतांचं नातं काय आहे, हे फार सुंदर शब्दांमध्ये सांगितलं.
त्यांचं कीर्तन लक्षात राहायचा दुसरा एक थोडा अप्रिय प्रसंग आहे. त्यादिवशी रात्री १-१।। वाजता कीर्तन संपलं. पाल्र्याला आम्ही राहात असल्याने आम्हाला पहिल्या गाडीची वाट बघावी लागत असे. सकाळी आलो तेव्हा कळलं की माझ्या खोलीत चोरी झाली. मी एक typewriter विकत घेतला होता, तो चोरीला गेला.

अत्र्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये कीर्तनकारी ढंग होता! अत्र्यांच्या विनोदामध्येही होता. अत्रे त्या त्या प्रसंगाला एक-एक गोष्ट चांगली सांगू शकत होते. सगळ्यात उत्तम म्हणजे पंडिताचीही पगडी हलावी आणि सामान्यांचं अंत:करण हलावं या दोन्ही गोष्टींचा तोल अत्र्यांमध्ये होता. याचं कारण होतं, मगाशी बाळ (सामंत) म्हणाला तसं, अत्र्यांचं वाचन अफाट होतं. लोकांना हे लक्षातच येत नाही की, विनोद म्हणजे सटकन सुचला, असं काही नसतं. कुणीतरी मराठीच्या विद्यार्थ्यांने हा अभ्यास करावा की, अत्र्यांच्या शैलीमधून अत्र्यांनी संतवाङ्मयाचे किती संस्कार घेतलेले आहेत. त्यांच्या भाषेचा अभ्यास करण्यासारखं आहे. अत्र्यांसारखं सरळ मराठी लिहायला फारच कष्ट घ्यावे लागतील. एकदा तुम्ही अत्र्यांचं वाचायला सुरुवात केली की, ते मानगुटीवर बसल्यासारखे तुम्हाला शेवटपर्यंत आपल्याबरोबर नेतात, ही साधी किमया नाही. ज्यावेळेला तुम्ही संत वाङमय, पंतवाङ्मय, पौर्वात्य वाङ्मय, पाश्चिमात्य वाङ्मय असं जेव्हा पचवलेलं असतं, तेव्हाच हे जमू शकतं. जेव्हा अत्रे युजीन ओनील वाचत होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की, हा वाचल्याशिवाय तुम्हाला गती नाही. याचं कारण, लेखक आवडला की, ते संपूर्ण फडशा पाडायचे त्याचा. फुल्यांच्या नादात असताना त्यांना पाहणं म्हणजे पुष्कळदा असं वाटायचं की, आपण साक्षात फुल्यांशीच बोलतोय की काय. संपूर्ण फुले असा पचवला की नंतर त्यांनी पिक्चर उभं केलं. साने गुरुजी वाचायला लागले की ते त्यांच्यात तल्लीन होत.

एखादा माणूस सुंदर कधी म्हणतो आपण, एखादं मुलं चांगलं केव्हा दिसतं की ते काहीतरी करण्यात तन्मय झालेलं असतं. तसं अत्रे हे चांगल्या गोष्टींमध्ये तन्मय झाले नाहीत, असं आयुष्यात कधी झालं नाही. मी मुळीच असं म्हणत नाही की, अत्रे कोणी सत्पुरुष होऊन गेले, वगैरे. अशा रीतीने त्यांची बदनामी करायची काही गरज नाही. सत्पुरुष हे सत्पुरुषच असतात. त्यांची समाजाला काही गरज नसते. समाजाला थोडासा गुंड मनुष्य लागतो. तो समाजाला दुरुस्त करतो. नाहीतर आमच्यासारखे लोक होतात. आम्ही लिहितो, पण ज्यावेळी रणांगणात जायचा प्रसंग येतो, त्यावेळी एखादाच येतो, अशा प्रकारचा मनुष्य!

एकद न. र. फाटक म्हणाले होते की, आपल्याकडे स्तुती करायला सुरुवात झाली की, अध्यक्षाला काही सांगायला राहातच नाही. मग म्हणाले, आजच ज्या कोणाची पुण्यतिथी, त्याच्यासंबंधी आता इतके बोलले गेले, की मी त्याच्याबद्दल एवढंच सांगतो की, ते आजानूबाहू होते. आता ते गेलेच आहेत म्हटल्यावर हात मोजायला कोण जाणार आहे?

तांब्यांची पुण्यतिथी होती. कवी तांब्यांची. एक प्राध्यापक बोलले कवीवर्य तांब्यावर. ते म्हणाले, ‘काय सज्जन मनुष्य होता! आपल्या स्वत:च्या लग्नाच्या बायकोवर त्यांनी कविता लिहील्या.’ हा सज्जनपणाचा पुरावा! आणि निव्र्यसनी, वगैरे वगैरे- तांब्यांना जाऊन पाच दिवस झाले होते. ‘चिकित्सक’मध्ये सभा होती. प्राध्यापकाचं नाव मी सांगत नाही. तर लगेच अत्रे त्यांना म्हणाले, ‘अहो, तुमचा काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. हे हॉटेलवाले तांबे आहेत. जे गेले, ते कवी. सज्जन असणं आणि कविता करणं याचा संबंध काय इकडे! एखाद्या कवितेच्या सुंदर दोन ओळी सांगा.’ कारण अत्र्यांनी जेव्हा तांबे वाचले, त्यावेळी उत्कटतेने वाचले.

अशा प्रकारचा हा माणूस, ज्याने महाराष्ट्रात चैतन्य निर्माण केलं. त्याचा हॉल पुण्यात झाला, हे चांगलंच झालं. त्याबद्दल प्रश्नच नाही. पण एक गोष्ट सांगून ठेवतो, अत्रे ही व्यक्ती नसून अत्रे ही एक जीवनाकडे बघायची दृष्टी आहे. त्यामुळे त्यांचे पुतळे, त्यांची चित्रं किंवा पुण्यतिथी, यात मला काही अर्थ वाटत नाही. अलीकडे या गोष्टींवरचा माझा विश्वास साफ उडालेला आहे. मला असं वाटतं की, त्यांनी ज्या रीतीने जिथे जिथे त्यांना अन्याय दिसला, तिथे ते गेले. आणि सदैव विचार असा ठेवला की, चांगलं असेल त्याला अति चांगलं करीन आणि त्याबरोबर वाईट असेल त्याला कदाचित अति वाईट म्हणून झोडपूनही काढीन. ते जोरात झोडपायचे. नाटकाच्या क्षेत्रात, चित्रपटाच्या क्षेत्रात, प्रत्येक क्षेत्रात ते गेले आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांचं कर्तृत्व पाहिलं की लक्षात येईल, अत्रे हे शिक्षक होते. शिक्षक असल्यामुळे माँटेसरीबाईची पद्धत कधी वापरावी आणि छडी कधी वापरावी, या दोन्हीचं तारतम्य त्यांनी बरोबर लक्षात ठेवलं. समाजाला ज्यावेळेला छडय़ा द्यायच्या, त्यावेळेला छडय़ाही दिल्या. गोड बोलून सांगायचं, त्यावेळेला गोडही बोलून सांगितलं. असा शिक्षक या महाराष्ट्राने जवळ केलेला आहे. आणि अशा माणसांना चटकन विसरून जाण्याइतकं मराठी मन कृतघ्न आहे, असं काही मला वाटत नाही. कधीतरी अत्रे आठवतातच, याही पुढे ते आठवणारच.

परचुर्‍यांनी आपल्या प्रेमाने हा हॉल इथे उभा केलेला आहे. मी एकच इच्छा करतो की, इथे अशा प्रकारचे कार्यक्रम (साहित्याचे) व्हावेत की, अत्रे समोर असते तर त्यांना आवडले असते आणि तिथून उठून हे काय महाभयंकर मराठी बोलताय, असं त्यांनी विचारलं नसतं. असं चांगलं कार्य इथे चालावं, अशी मी इच्छा व्यक्त करतो.

लोकसत्ता,
रविवार, १३ जून २०१०

1 प्रतिक्रिया:

Unknown said...

दिवाळीची आम्हा पुलकित लोकांना खास भेट!असेच समृद्ध वांगमय वाचावयास मिळावे ही सदिच्छा