Thursday, September 28, 2023

अंगण हा घराचा आरसा

एकदा एका खेडयात गेलो होतो. अंगणात बसलो होतो. सिगरेट काढली. नेहमीप्रमाणे  काडी नव्हती. पाटीलबुवांनी पोराला सांगितलं, "बावच्या आज्जाच्या कोपऱ्यांतून आगपेटी आन्!" आज्जाचा कोपरा! त्या चिमण्या घरातल्या एका कोपऱ्यात वर्षानुवर्षं म्हातारा आज्जा तरट टाकून बसायचा. त्यामुळं तो कोपरा आज्जाचा होता. आता आज्जा गेल्याला धा वर्स झाली तरी तो आज्जाचा कोपरा!

धोबी आणि तलाव दोघेही गेले तरी धोबीतलाव राहिला आहे तसा! अचेतनाला अशी सचेतनाच्या आठवणींची संगत असली की, लाकूड दगड-विटाही बोलक्या होतात. म्हणून मला 'नाना पेठ' म्हणणारांपेक्षा 'नानाची पेठ' म्हणणारी माणसं आवडतात. अजूनही पुण्यात 'शाळूकर बोळ' म्हणण्याऐवजी 'शाळूकराचा बोळ म्हणणारी माणसं भेटली शिवाजीनगरला भांबुर्ड म्हणणारे भेटले किंवा मुंबईच्या पाली हिलला, 'मोतमावली' म्हटलेलं आढळलं आणि सायनला, 'शीव' म्हणणारा दिसला की, माणूस माझ्या गोत्रातला वाटतो. मामंजी जाऊन पंचवीस वर्षं झाली तरी खोली मामंजींचीच झाली पाहिजे. बाप्पांच्या ओटीला बाप्पाचे पाय लागून दहा वर्ष होऊन गेली असतील, पण ती बाप्पांची ओटी! मग त्या ओटीला इतिहास येतो. तिथल्या आरामखुर्चीवर एकदम बसवत नाही. जस्ती काड्यांचा चष्मा लावून 'बलवंतराव म्हणजे अजब बुद्धीचा माणूस' म्हणणारे आणि पंचावन्नाव्या खेपेला 'गीतारहस्या'चं पारायण करणारे बाप्पा दिसतात आणि मग त्या खुर्चीवर बसून पुष्ट नितंबांचं वर्णन करणारी कथा वाचायला मासिक उघडायचं धैर्य नाही होत. मागली भिंतदेखील जस्ती काड्यांचा चष्मा लावून, "बघू रे, काय वाचतोस ते-" असं म्हणेल की, काय अशी भीती वाटायला लागते.

मुख्य म्हणजे असल्या घरांना अंगण असतं. अंगण हा घराचा आरसा आहे. आरश्यासारखं लख्ख सावरलेलं असतं म्हणून नव्हे. घरातलं कुटुंब किती नांदतय किती गाजतंय ते अंगणात पाहून घ्यावं. वयाची अदब सांभाळत पांडवासारखे बसलेले कर्ते मुलगे, माहेरवाशिणी, एकदोन पोक्त्यपूर्वतया आणि गुढग्यावर लुटलुटत अंगणपालथं घालणाऱ्या गुंड्यापासून ते दारीच्या आंब्यावर झोके काढणाऱ्या नातवंडांच्या संख्येवरून ते सारं घर पारखता येतं. 'अस्स अंगण सुरेख बाई' म्हणतात ते हेच! हे अंगण लखलखतं ते वडीलमंडळीविषयीच्या आदरातून, लेकी सुनांच्या गळ्यातल्या मण्यातून, आजी मावशीच्या लाडांतून आणि उघड्याबंब शरीराची लाज न बाळगता बसलेल्या तगड्या मुलांच्या गप्पातून! संसारातील सारी सुखं दुःख दारच्या प्राजक्तासारखी त्या अंगणात सांडलेली असतात. ती वेचत ही बैठक बसलेली असते.

- (अपूर्ण ) 
हि घरं ती घरं (पुरचुंडी)
हा लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा .

0 प्रतिक्रिया: