Monday, November 25, 2019

पु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी?'

प्रिय वामन इंगळे,

तुमच्या पत्रांना या पूर्वी उत्तर पाठवायचं राहून गेले याबद्दल मीच तुमची क्षमा मागायला हवी. माझ्या भूमिकेला तुम्ही जाहीर विरोध केल्याचे तुमचे १३/७/७९ चे पत्र येईपर्यंत मला ठाऊक नव्हते.आणि माझ्या मताला कुणी विरोध केला तर कुणालाही वाईट वाटेल किंवा राग येईल,तितकाच मला येतो. त्याबद्दल मनात राग धरून अबोला वगैरे धरणे माझ्या स्वभावात नाही याबद्दल खात्री बाळगा, अशी तुम्हाला मनापासून विंनती करतो.

आता जुन्या गोष्टींच्या प्रेमाविषयी.सुरवातीलाच मी तुम्हाला सांगतो,की कुठलीही गोष्ट केवळ जुनी म्हणून मला तिच्याबद्दल प्रेम नाही. धर्म आणि जात किंवा देव आणि देउळ यांच्याशी मी माझे नाते फार पूर्वीच तोडले आहे. माझ्या वयाच्या विसाव्या वर्षी(आता मी साठीत आलोय.) माझे वडील वारले. त्यांच्या निधनानंतर अस्थिविसर्जन, श्राद्धपक्ष यांतील मी काहीही केलेले नाही. जवळजवळ पंधरा एक वर्षे ‘अनामिका’ या आमच्या संस्थेतर्फे ‘बटाट्याची चाळ’,’वाऱ्यावरची व्रत’वगैरे नाट्यप्रयोग आम्ही केले. त्यात चुकुनही रंगभूमीची पूजा, नारळ फोडणे वगैरे केले नाही.असे असूनही जुन्यातले मला काय चांगले वाटले, त्याबद्दल मी लिहिले असेल.

समजा, एखाद्या देवळावरून जाताना आत भजन चालले असेल आणि मृदुंग वाजवणारा मस्त साथ करीत असेल तर तुम्ही थबकणार नाही का? त्या तालक्रियतेतल्या करामतींची स्मृती तुमच्या मनावर रेंगाळणार नाही का? माझ्या लहानपणी मी जे गाणे ऐकले त्याचा आनंद माझ्या मनात घर करून बसलेला आहे. याचा अर्थ मी नव्या संगीताला – ते केवळ नवे आहे म्हणून कुठे नाव ठेवले आहे का? सुर्व्यांच्या कविता मला आवडली म्हणून बालकवींची ‘फुलराणी’ नावडलीचं पाहिजे असे कुठे आहे? आणि कृत्रिमपणाने किंवा हट्टाने तो आवडलेला अनुभव आपण नाकारायचा का?

माणसांचे गट करणारा धर्म किंवा सत्तेतील राजकीय पक्ष ही कल्पना मला मानवत नाही. ज्या क्षणी मला लिहावसे वाटले ते माझ्या स्वभावाला धरून मी लिहिले. त्यात विसंगतीचे मीच अनेक उदाहरणे दाखवू शकेन. याचे कारण नवे संस्कार हे तत्पूर्वीच्या संस्करण पुष्कळदा उध्वस्त करीत असतात, तर काही टिकवीत असतात. आणि मी कुठल्याही एका विशिष्ट तत्त्वज्ञानाच झेंडा घेऊन निघालो नसल्यामुळे मला हट्टाग्रहाने काही पटवून देण्याची आवश्यकताचं वाटत नाही. मुख्यतः मी ज्याला सर्वसाधारणपणाने विनोदी लेखन म्हटले जाते असेच लिहिले आहे. त्यामुळे मला जिथे विसंगती वाटली त्यावेळीचं मला लेखनाची प्रेरणा झाली. विसंगती जुन्यातही आहेच आणि नव्यातही असू शकते.

मी अशा कालखंडात वाढलो, की ज्यावेळी गरीब, उपेक्षित यांच्याविषयीची भूतदया हा माणुसकीचा सर्वात मोठा अविष्कार मानला जात होता. आज तो संदर्भ बदललेला आहे, इथे कुणीही कुणावर उपकार करीत नसतो, या विचारला महत्त्व आले आहे. माणुसकीने वागवले गेलेच पाहिजे,हा हक्क झाला. त्या हक्काची कुणी पायमल्ली करीत असेल तर तो कायदेशीर गुन्हा झाला.

आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली याचा अर्थ चातुर्वर्ण्यावर आधारलेले न्याय आणि कायदा याविषयीचे जुने तत्वज्ञान जाळले. त्यातून त्यांनी केवळ दलितांच्याचं नव्हे, समाजात डोळे उघडे ठेवू इच्छीणाऱ्या सर्वांच्यातच परिवर्तन घडवून आणले. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय संस्कारात जगणाऱ्याच्या हे उशिरा लक्षात आले असेल. ते आणून देण्यात दलित साहित्यिकांचा फार मोठा वाटा आहे. तेव्हा जुन्याकालचे सारेच काही सुंदर होते, जुने ते सोने म्हणणे निराळे आणि माझ्या बालपणी किंवा तरूणपणी जे सौंदर्याचे, आनंदाचे संस्कार माझ्या मनावर झाले त्याचे स्मरण होणे , यांत फरक आहे.

तुम्ही तबला वाजवता. मी वयाच्या नाना प्रकारच्या अवस्थेत अहमदखान थिरकव्वांचा तबला ऐकलेला आहे. माझा व त्यांचा शेवटी शेवटी परिचयही झाला होता. मध्यंतरीच्या काळात मी अनेक चांगले तबलजी ऐकले पण तबल्याचे बऱ्याच समजदारीने अनुभव घेत जाऊन सुद्धा मला अजूनही थिरकव्वासाहेबांचे अदिव्तीयत्व विसरता येत नाही. नव्या तबलीयांत झाकीर हुसेन हा माझा आवडता तबलजी आहे. समजा, तालाच्या संदर्भात थिरकव्वांच्या मैफिलीचा उल्लेख केला, तर ती जुन्यात रमण्याची आवड, एवढाच त्याचा अर्थ होईल का?

जुने पूल जाळणे हे म्हणायला ठीक असते .ते संपूर्णपणे जाळता येत नसतात. एवढेच नव्हे तर सगळ्याच जुन्या पुलांवरचा प्रवास हा ‘समाजविरोधी’ या सदरात जमा होणारा नसतो.


त्यामुळे माझे सगळे लेखनच चुकले असे म्हणायचे मला यत्किंचीतही गरज वाटत नाही. उगीच स्वतःला मार्क्सवादी म्हणवून घेत राहण म्हणजे आपण प्रगतीशील आहोत म्हणून सिद्ध करणे नव्हे. साहित्यातून प्रगट होणाऱ्या किंवा याचक या नात्याने अनुभवास येणाऱ्या अनुभूतींना असे एकाच मापात मोजता येत नाही असे मला वाटते.

गीतेतला चातुर्वर्ण्य मला अजिबात मान्य नाही. जन्मसिद्ध, श्रेष्ठ-कनिष्ठत्व याला काडी इतकाही अर्थ नाही. या अनिष्ठ आणि पुष्कळदा अमानुष अशा विचारांचा मी पाठपुरावा केल्याचे एकही उदाहरण माझ्या लेखनात सापडणार नाही. हे तर ज्याला वैचारिक असे म्हणतात ते लेखनही मी फार केलेले नाही आणि जे केले आहे, त्यात जुन्या समाजपद्धतीचा कोठेही पुरस्कार केला नाही. मला कधी देवाची करुणा भाकत बसावे असे वाटले नाही. मात्र, दुसरा कोणी देवापुढे हात जोडून उभा असला तर त्याला तिथून ढकलूनही मी देऊ शकलो नाही.

भव्य मंदिरे किंवा युरोपातील प्रचंड कॅथड्रिलस पाहताना मी त्यातल्या शिल्पकलेने थक्क झालो आहे. संगीतातही मी जुने नवे मानत नाही. माझ्या सुदैवाने मला पाश्चात्य पॉप पासून बाख-बेथोव्हेन यांच्या सिफंनीज ऐकायचा योग आला. आणि खेड्यातल्या लोकगीतांपासून ते मंजिखांसाहेब किंवा आजच्या काळातले मल्लिकार्जुन, कुमार वगैरेही मी भान हरपून ऐकतो. लताही माझी आवडती गायिका आहे तिच्या सुरांचा मी चाहता आहे. सैगलच्या आवाजा इतकी बालगंधर्वांची ललकारी मला स्तिमित करते. यांच्या सुरांतली निराळी जादू जुन्या रेकॉर्ड्स ऐकतानाही मला हरवून जाते.

तुम्हाला कल्पना नसेल , सुर्वे यांची कविता मी प्रथम जेव्हा वाचली, त्याकाळात सुर्वेंच नाव साहित्यप्रांतात देखील कोणाला ठाऊक नव्हते. अशा वेळी मी होऊन त्यांची ओळख करून घेतली. केशवसुतानंतर एका निराळ्या वातावरणात रमलेली कविता पुन्हा नव्या जोमाने वर आली, असे मला सुर्वे किंवा वामन निंबाळकर, यशवंत मनोहर यांच्या सारख्यांच्या कविता वाचताना मला वाटले.

ढसाळांच्या ‘एक तीळ सगळ्यांनी रगडून खावा’ यांसारख्या ओळी तर मी माझ्या साहित्यसंमेलनातील अध्यक्षीय भाषणात उद्धृत केल्या आहेत. याचा अर्थ पाडगावकर किंवा सुरेश भटांची गझल मी नाकारली पाहिजे असा होत नाही. यातला साहित्यनिर्मिती साठीचा अमुकच मूड खरा, हे मला मान्य नाही. अध्यापनाच्या कार्यासाठी आवश्यक असलेलीही वर्गवारी माझ्या साहित्यनिर्मितीच्या किंवा आस्वादाच्या आड येत नाही.

तुम्ही गाण्यातले आहात म्हणून गाण्यातले उदाहरणे देतो. रात्रभर मन्सूरांचे ख्याल गायन ऐकून आल्यावर सकाळी उठून कुठून तरी बेगम अख्तरचा ठुमरीतला तुकडा शेजारच्या रेडियोवरून कानावर ऐकला तर तोही मला सुखावून जातो. तेव्हा माझी कशातूनही सुटका बिटका करून घ्यायची नाही. माझ्या या वृत्तीबद्दल मला कोण पुरोगामी म्हणता की कोण परंपरावादी म्हणतो याची चिंता मी का करू?

जे मी लिहिले ते वाचकांपुढे आहे. त्यातून ज्याला जो अर्थ काढायचं आहे त्याने तो अर्थ काढावा. तो काढण्याचा त्याला तो हक्क आहे. याची जी काही फुटपट्टी असेल, तिनेच माझी उंची किंवा बुटकेपणा मोजण्याचा त्याला हक्क आहे. त्याचा हा हक्क मी मानतो. कारण मला जे ज्या वेळी योग्य वाटेल ते लिहिण्याचा माझा हक्क मी मानतो, म्हणून. जग अफाट आहे. जीवनाचे सारे तत्वज्ञान एकाच पोथीत साठवले आहे असेही माणू नये. मग ती दासबोधाची पोथी असो किंवा दासकापितलाची! इथे जुने नवे वगैरे प्रश्न येतच नाहीत. कुठल्या संदर्भात कुठले मत प्रगट झाले आहे ते पहा.

एक उदाहरण देतो. मला मुंज हा प्रकार मान्य नाही. पण समजा, एखाद्या मुलाची मुंज लागत असताना भटजींचे धोतर होमात पडून तो पेटायला लागला आणि ते होरपळून मेले, या घटनेचे मला दुःख झाले तर मुंज लावणाऱ्या प्रतिगामी भटजीच्या मरणाचे दुःख झाले म्हणून माझी मते बुरसटलेली आहेत असे जर कोणी म्हणायला लागला तर त्याला मूर्ख या शिवाय दुसरे काहीच म्हणणार नाही.

जी.ए.सारख्यांची एखादी गोष्ट वाचली की आपले क्षण सत्कारणी लावणाऱ्या या कलावंताना आदराने नमस्कार करावासा वाटतो. काय नवे म्हणावे, काय जुने म्हणावे मनाला रेंगाळावेसे वाटते तिथे रेंगाळावे. त्याक्षणाशी मनाचे अद्वैत साधले जाते. तो भोग काय वाचा मनाने घेतला जातो. कधी तरी शब्दातून त्याला रूप येते.बस एवढेच !

आपुलकीने लिहिलेत म्हणून हे तुमच्यासाठी उत्तर. एरव्ही ज्यांना मला जुन्यात रमणारा म्हणायचे असेल प्रतिगामी म्हणायचे असेल त्यांचे तोंड किंवा हात धरायला मी जाणार नाही पण ज्या अनुभवांनी मला प्रभावित केले त्यांच्याशी मी प्रतारणा करणार नाही.

असो. पत्र खूप लांबले. माझे मन दुखावल्याची भावना मनात ठेवू नका. माझ्या ज्या कुठल्या भूमिकेचा तुम्हाला जाहीर निषेध करावसा वाटत असेल तो अवश्य करा. कोणाच्याही विचारस्वातंत्र्याच्या आड येणे मला योग्य वाटत नाही. मात्र, विचार स्वातंत्र्य याचा अर्थ कुठल्या ऐकीव माहितीवर विसंबून राळ उडवण्याचे स्वांतत्र्य नव्हे. पुराव्या खेरीज आरोप करण्याचे स्वातंत्र्य नव्हे. तुम्हालाही हे मान्य असावे.

तुमचा

पु.ल.देशपांडे
१७/०७/१९७९ 

मुळ स्रोत -->
http://www.bolbhidu.com/pl-deshpande-progressive-or-conservative/