Saturday, August 14, 2021

फिल्म इन्स्टिट्यूट दीक्षांत समारंभातील भाषण 1979 (kartavysadhana.in)

6 ऑगस्ट 2021 रोजी, पुणे येथील फिल्म इन्स्टिट्यूटमधील टीव्ही स्टुडिओचे नामकरण पु.ल. देशपांडे टीव्ही स्टुडिओ असे होत आहे. भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे. हे निमित्त साधून पु.ल. देशपांडे यांनी केलेले एक भाषण येथे प्रसिद्ध करीत आहोत. फिल्म इन्स्टिट्यूटच्या 16 व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी 2 नोव्हेंबर 1979 रोजी पुण्यात त्यांनी इंग्रजीमध्ये भाषण केले होते, त्याचा हा अनुवाद आहे. हे भाषण झाले तेव्हा प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते (ते त्यावेळी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष होते) सुनीताबाई देशपांडे यांचे भाचे दिनेश ठाकूर यांनी हे भाषण मिळवून दिले आणि नॅशनल फिल्म आर्काइव्हज ऑफ इंडियाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी त्याचा अनुवाद केला आहे. मूळ इंग्रजी भाषण kartavysadhana.in वर उपलब्ध आहे. 33 वर्षांपूर्वीचे ते भाषण प्रथमच इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध होत आहे. - संपादक

मित्रहो,

तुमच्या संचालकांनी अतिशय प्रसन्न अशा या कार्यक्रमासाठी मला आमंत्रण देण्यापूर्वी मी आपला निवांतपणे बसून होतो, की चित्रपट उद्योगाशी असलेला माझा पूर्वीचा संबंध लोक खूप अगोदर विसरून गेले असतील. या कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून माझी निवड करण्यात त्यांनी योग्य कास्टिंग केली आहे की नाही हे मला माहीत नाही. मी फिल्म उद्योगातून स्वखुशीने बाहेर पडल्याला आता जवळपास पंचवीस वर्षे लोटली आहेत. ज्या वेळी मराठी चित्रपट उद्योगात माझे तसे बरे चालले होते तेव्हा मी तो व्यवसाय सोडला. सर्वसाधारणपणे त्या वेळच्या कॉलेजमधल्या शिक्षकापेक्षा माझी थोडी जास्त कमाई होत होती आणि कोपऱ्यावरच्या माझ्या आवडत्या पानवाल्यापेक्षा किंचित कमी! मी जे काही लिहीत होतो त्याला तेव्हा पटकथा म्हणतात असे मला वाटायचे. मी अभिनय करायचो, संगीत द्यायचो आणि असे करता करता मी एक मराठी चित्रपटही दिग्दर्शित केला. एखाद्या कलावंताला त्या काळी जे जे करावयाला लागायचे ते ते सर्व मी केले. एकदा दिवसातल्या ठरवलेल्या वेळेपेक्षा दोन तास जास्तीचे शूटिंग करायचे होते म्हणून हिरोईनच्या खऱ्याखुऱ्या मातेला दोन तासांसाठी रंजवण्याची कामगिरी विनोदी कलाकार म्हणून मला करायला लागली होती ती एक दुखरी आठवण आहे. माझ्या चित्रपट क्षेत्रातील करिअरकडे मागे वळून पाहताना तिथे राहिलो त्यापेक्षा ती इंडस्ट्री सोडल्याचाच जास्त अभिमान वाटतो. तिथे असण्यापेक्षा नसण्यामुळे या क्षेत्राचा फायदाच झाला, अशा काही मोजक्या धोरणी व्यक्तींपैकी मी आहे असे मी विनयाने म्हणेन. मी काही इथे नम्रतेचे सोंग घेण्याचा प्रयत्न करत नाही. खरं म्हणजे उलटं आहे. फिल्म उद्योगातील एक पूर्वीचा कलाकार आणि अधून मधून चित्रपट पाहणारा सध्याचा प्रेक्षक म्हणून माझे बोलणे कदाचित तुम्हांला एक जुना शाळामास्तर धडा शिकवत असल्यासारखे वाटेल. तुमच्यासाठी या परिसरातील कदाचित हा असा शेवटचाच प्रसंग असेल. माझे विनोदावर किती प्रभुत्व आहे हे दाखवण्यासाठी तर मी मुळीच इथे आलेलो नाही. आपल्या देशातलाच नव्हे तर आधुनिक जगातला एक सर्वोत्तम असा कलावंत इथे माझ्या शेजारी बसला असताना तर नाहीच नाही. उलट मघापासून त्यांच्या शेजारी व्यासपीठावर बसल्यावर मला अगोदरच दडपल्यासारखे झाले आहे. फिल्म इन्स्टिट्यूटच्या सोसायटीचे अध्यक्ष श्री. आर. के. लक्ष्मण यांची निश्चल कार्टून्स माझ्या मते रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या हालचालींपेक्षा जास्त परिणामकारक असतात आणि सत्य आणि सौंदर्य यांचा निकटचा परिचय प्रेक्षकांना घडवतात.

होय, सत्य आणि सौंदर्य. या दोन गोष्टींपासून मी लांब राहावे अशी त्या काळी ज्या चित्रपट निर्मात्यांशी माझा संबंध आला- त्यांची इच्छा होती. माझे स्वत्व बाजूला सारून त्यांच्या भाषेत ज्याला लोकेच्छा किंवा लोकांची मागणी असे समजतात ते त्यांना माझ्याकडून हवे होते. ही लोकेच्छा काय असते ते मला अजूनपर्यंत समजलेले नाही. हे निर्माते डबल रोल खेळत आहेत हे मला लवकरच उमगून आले. लेखक किंवा कलावंत म्हणून माझ्याकडून त्यांची ही अपेक्षा होती की जेणेकरून त्यांचा गल्ला काठोकाठ भरेल. या बॉक्स ऑफिसची उंची अजूनपर्यंत कोणीही मोजू शकले नाही. दुसऱ्या बाजूला त्यांच्या भाषणांत आणि मुलाखतींमध्ये हे लोक खऱ्या कलाकृती बनवू शकत नसल्याबद्दल नक्राश्रू ढाळत होते. कारण पुन्हा तीच घाणेरडी सबब, लोकांची मागणी वेगळी असते. खरे म्हणजे चित्रपट हा त्यांच्यासाठी बाजारपेठेतील एक वेगळा व्यवसाय आहे. पूर्वी वितरक असलेल्या आणि नंतर निर्माता झालेल्या एका स्टुडिओ मालकाबद्दल त्या काळच्या एका खूप वरिष्ठ अभिनेत्याने म्हटले होते, ‘‘या माणसाला जर कळाले की चित्रपटाच्या निर्मितीपेक्षा चितेची लाकडे विकण्यात जास्त पैसा आहे तर तो आपला स्टुडिओ जळाऊ लाकडांनी भरून टाकेल आणि आपल्याला लाथ मारून हाकलून लावेल.’’

खूप कठोर शब्द आहेत माझ्या मित्रांनो, पण अजिबात खोटे नाहीत. मी तर एका निर्मात्याला हे बोलताना ऐकले आहे की त्याने एका अभिनेत्रीवर खूप सारे पैसे लावले होते जेणेकरून ती हमखास जिंकेल. जिथे अतिशय वेगळ्या प्रकारची कलात्मक स्वप्ने पाहिली जातात त्या जागी घोड्याच्या शर्यतीचे आणि जुगार अड्‌ड्याचे परवलीचे शब्द रूढ होऊ लागले होते. वाजंत्रीवाल्याला वऱ्हाडी जे सांगेल तेच गाणे वाजवण्याशिवाय पर्याय नसतो हे मला माहीत आहे. अधून मधून एखाद्या रविवारच्या संध्याकाळी टीव्ही पाहताना या जगरहाटीचा जास्तच विपर्यास झाल्याची त्रासदायक भावना माझ्या मनात येत असते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे घडते. कारण आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यामध्येसुद्धा हाच नियम लागू होतो. आण्विक शस्त्रांपासून ते अगदी टूथ पेस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू बनवणाऱ्या व्यापाऱ्यांनी सगळ्या क्लृप्त्या वापरून व्यक्ती आणि देशांना केवळ ग्राहक बनवून टाकले आहे हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. तुमची क्रयशक्ती किती आहे यावरून समाजातील तुमचे स्थान ठरवले जाते.

जसे प्रेमामध्ये आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते तसे व्यापारामध्येही असते, ही धारणा आपण सर्वांनी स्वीकारली आहे असे मला वाटते. जगाच्या संहाराला कारणीभूत अशी हिंसक शस्त्रे बनवणाऱ्याला जशी मानवी आयुष्याची काहीही चिंता पडलेली नसते किंवा माणसाच्या जगण्याच्या अधिकाराबद्दल काही देणे घेणे नसते त्याप्रमाणे पैशांच्या थैल्या घेऊन सिनेमाच्या बाजारात उतरलेल्या सट्टेबाजांना मानवी मूल्यांच्या नाशाची अजिबात काळजी नसते. दुसऱ्या व्यवसायाप्रमाणे चित्रपटधंद्यात पण जितका जास्तीतजास्त पैसा मिळेल तितका चांगला. अडाणी आणि भोळसर मनांवर सिनेमा माध्यमाच्या होणाऱ्या परिणामाची त्यांना काही एक पडलेली नसते. सांप्रत काळी मी एखाद्या मित्राच्या घरात जातो तेव्हा मला काय दिसते? त्याचा चार वर्षांचा मुलगा खेळण्यातली बंदूक माझ्यावर रोखतो आणि ओरडतो ‘‘हॅन्ड्‌स अप.’’ हा कोणत्या हिरोची नक्कल करतोय हे माझ्या मित्राची बायको किंवा मुलगी मला विचारते. अर्थातच मी या मुलाखतीत नापास होतो.

आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘विकणे’ हाच एकमेव परवलीचा शब्द आहे असे वाटते. या देशात जोपर्यंत अंधश्रद्धा टिकून आहेत तोपर्यंत त्यावर धंदा चालवायचा. नवीन देव निर्माण करायचे, किंवा जास्त खात्रीसाठी नवीन देवता तयार करायच्या, त्यांना सर्व प्रकारच्या शक्ती बहाल करायच्या, नवनवीन चमत्कार त्यांच्या नावाशी जोडायचे आणि मग सहजपणे भुलून जाणारा (फ्लॅटपासून ते झोपडपट्टीत राहणारा) एक मोठा समुदाय सिनेमा हॉलबाहेर ब्लॅकमध्ये तिकिटे खरेदी करायला तयार होतो. एका फिल्म मॅगझिनमध्ये पटकथा आणि संवाद लिहिणाऱ्या प्राध्यापकाची मुलाखत वाचून मला धक्काच बसला. एका यशस्वी विनोदी नट आणि निर्मात्याबरोबर केवळ बरोबरी दाखवण्यासाठी त्याने द्विअर्थी गलिच्छ संवाद लिहिले होते. म्हणजे अश्लीलता विकायची, सुंदर अशा लैंगिक भावनेला जितके कुरूप बनवता येईल तितके बनवायचे, हिंसाचार विकायचा, सामान्य जनतेला त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या काबाडकष्टांना विसरायला लावणारा पलायनवाद विकायचा आणि ही दुःखे मानवनिर्मितच आहेत हेसुद्धा कळायला नको अशी दृश्ये दाखवायची. थोडक्यात, भरपूर पैसा मिळवण्यासाठी जे काही शक्य आहे ते विकायचे. भरपूर रक्त सांडून झाल्यावर आणि बऱ्यापैकी हाणामारी, गोळीबार दाखवल्यानंतर शेवटच्या रिळामध्ये जो गुन्हेगार आहे त्याला हिरोच्या पातळीवर चढवायचे. मग त्याच्या खूप पूर्वी हरवलेल्या मातेच्या मांडीवर त्याला प्राण सोडू द्यायचा किंवा काही वेळा बदल हवा म्हणून आईला ह्या हिरोच्या मांडीवर अंतिम श्वास घेऊ द्यायचा, दांभिक तत्त्वज्ञान किंवा काव्यात्म संवाद बोलून मृत्युपंथावर असलेल्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांतला शेवटचा अश्रूही खेचून घ्यायचा आणि मग अशी ही रक्तरंजित हाणामारी पाहण्यासाठी प्रेक्षक पुनःपुन्हा येतील या खात्रीने निश्चिंत व्हायचं. हिरो आणि हिरोईनने एकदुसऱ्यांच्या मागे धावण्याची मुबलक दृश्ये दाखवायची. तीही काश्मीरच्या खोऱ्यातली असली तर जास्त चांगलं आणि जोडीला लता मंगेशकर आणि रफीच्या गाण्याची उठावदार साथ द्यायची. खऱ्या आयुष्यात एवढ्या जोरात पळून गाणी म्हणणारा किंवा गवतात लोळून गाणारी एकही व्यक्ती अजूनपर्यंत मला भेटलेली नाही. एका जागी स्वस्थ बसून हे लोक ही कामं का आटपत नाहीत हे मला खरेच समजत नाही. हा संगीतमय लपंडाव एक प्रकारे कर्मकांड झालेलं आहे. इतकेच नाही तर संवादातही तोचतोचपणा आहे. फिल्मी भजन आणि कॅबेरे नृत्याचीही तीच गत झाली आहे. अगदी शेवटच्या रिळातला पाठलागाचा सीनही जुनापुराना झाला आहे. आणि आपल्या लोकांना याची इतकी आवड निर्माण झाली आहे की, चित्रपटांमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश नसला तर तो खरा ‘शिनेमा’ नव्हे असे आपल्याला वाटते. आपल्या चित्रपट निर्मात्यांसोबत नट, नट्या, पटकथाकार, गीतकार आणि प्रसिद्धीमाध्यमे यांच्या अथक अशा प्रयत्नांमुळे सध्याच्या भारतीय चित्रपटाची जी अवस्था आहे ती अशी आहे... मी हे जे बोलतो आहे ते काही माझा नैतिक निषेध नोंदवण्यासाठी वगैरे नाही. खरं म्हणजे उलटे आहे. ही अनैतिकता कॅबेरे डान्सरच्या अंगप्रत्यंगांच्या प्रदर्शनामध्ये दडलेली नाही, तर मूळ सट्टेबाजीच्या प्रवृत्तीमध्ये आहे. सध्याच्या चित्रपट म्हणवल्या जाणाऱ्या निर्मितीमागचे हे खरे कारण आहे. तुम्ही जाणता त्याप्रमाणे सध्याच्या आपल्या चित्रपटांची ही ठळक वैशिष्ट्ये आहेत.
माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही ज्या वाटेवर चालण्यास तयार आहात त्यापासून घाबरवून तुम्हाला दूर लोटण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. तुम्ही इथे जे काही शिकलेला आहात आणि चॅप्लिन, फेलिनी, डेसिका आणि आपल्या येथील सत्यजित राय, रित्विक घटक, मृणाल सेन, श्याम बेनेगल, गिरीश कार्नाड, बी.व्ही. कारंथ अशा महान कलाकारांनी बनवलेल्या कलाकृती पाहिल्यानंतर ज्या पद्धतीचे चित्रपट इथे बनवले जातात त्याविषयी तुमच्या मनात संदेह निर्माण झाला असणार. असे असूनसुद्धा विशेष गोष्ट ही आहे की या व्यावसायिक चित्रपटांच्या गर्दीत माझे मित्र हृषिकेश मुखर्जी यांच्यासारखे काही दिग्दर्शक असे आहेत की ज्यांनी पातळी न सोडता चांगले यश कमावले आहे. लोकप्रियता मिळवण्यासाठी सवंग होण्याची गरज नाही. जुन्या काळच्या प्रभात आणि न्यू थिएटर्सचे चित्रपट खूप लोकप्रिय होते. पण त्यांना कोणी कमी दर्जाचे किंवा अश्लील म्हणणार नाही. या प्रसंगी मला हेही आवर्जून सांगायचे आहे की भूतकाळातील महान चित्रपट कलावंतांबद्दल सतत गहिवर काढणाऱ्यांपैकी मी नाही. त्यांना सादर दंडवत घाला आणि विसरून जा. सध्याचे जग आता त्यांच्यासाठी नाही. आपण भारतीय लोक कायम भूतकाळ उकरत बसतो आणि वर्तमान विसरतो. काही कलाकृती या सार्वकालीन महान आहेत असे आपण नक्कीच म्हणू शकतो. तुम्ही यातील काही अप्रतिम सिनेमे पाहिलेही असतील. कलेमध्ये अशी काही अज्ञात अनुभूती असते जी काळ आणि अवकाश यांच्या सीमारेषा ओलांडून जाते. आपण त्यांना अभिजात कलाकृती म्हणतो. परंतु हेही लक्षात ठेवायला पाहिजे की या अभिजात कलाकृती त्या त्या काळात आधुनिक मानल्या गेल्या. कलेच्या पारंपरिक तत्त्वज्ञानाला चिकटून बसलेल्या लोकांकडून जवळपास सर्वच महान कलावंतांना त्रासच सहन करावा लागला आहे. बहुतेकांसाठी परंपरा म्हणजे फक्त पुनरावृत्ती. (भारतीय संस्कृती, भारत की सुंदरियां, पतिदेव, खानदान की इज्जत इ.) कलावंत म्हणून ज्याला आपले स्वत्व जपायचे आहे आणि आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहायचे आहे त्याला जे लोक नवीन बदलांना तयार नाहीत आणि जुन्या गोष्टींना चिकटून राहायला आवडते अशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. ज्या जगात सौंदर्याऐवजी झगमगाटाला, विनोदाऐवजी चाळ्यांना, भावनेऐवजी अतिभावुकतेला, सांस्कृतिक परंपरेऐवजी कालबाह्य प्रथांना आणि मर्दुमकीऐवजी हाणामारीला जास्त महत्त्व दिले जाते तेथे तुमचे काम सोपे असणार नाही. फिल्म इंडस्ट्री म्हणजे जणू काही स्वर्ग आहे अशी सर्वसामान्य भारतीयाच्या मनात भावना असते. चमकदार आणि आकर्षक अशी मोहमयी दुनिया. झटपट पैसा मिळणारे विश्व. जणू काही पंचतारांकित आयुष्य, अशा चुकीच्या समजुतींचे खुसखुशीत चित्रण गुरु दत्त आणि हृषिकेश मुखर्जी यांनी त्यांच्या ‘कागज के फूल’ आणि ‘गुड्डी’ चित्रपटांमध्ये केले आहे. लोकांची मागणी या शब्दासारखाच ग्लॅमर शब्दाचा खरा अर्थ मला अजूनपर्यंत समजलेला नाही. ग्लॅमर शब्दाचा खरा संबंध आपल्या सुपरस्टार नट-नट्यांच्या शारीरिक आकर्षणात किंवा त्यांच्या मोहक अदांशी नाही, तर ते कमवत असलेल्या अकल्पनीय संपत्तीशी जादा आहे असा माझा धूर्त संशय आहे. फिल्म मॅगझिनमध्ये चकचकीत पानांवर छापून येणाऱ्या या तारकांचे विलासी आयुष्य पाहून हे नट जणू काही राजपुत्र-राजकन्याच आहेत अशी प्रतिमा आपल्या देशातल्या गरीब जनतेच्या मनात तयार झाली आहे. हिट झालेले जवळपास सर्व चित्रपट हे नशीबाचे धनी असतात याची तरुण मंडळींना पूर्ण कल्पना असते. अचानक प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचून नंतर गडगडत खाली कोसळणाऱ्या काही नट आणि नट्यांकडे पाहून आपल्या तरुण मंडळींची अशी समजूत झालेली असते की या देशात यश मिळण्यामध्ये गुणवत्तेपेक्षा शंभर पटींनी जास्त नशिबाचा वाटा असतो. अशा विचारातूनच ग्लॅमरच्या संकल्पनेला जास्त खतपाणी मिळते. तसे म्हटले तर उत्तम अभिनयाशी ग्लॅमरचा काडीचाही संबंध नसतो. हेलन हेस ही जगातील सर्वोत्तम संवेदनशील अभिनेत्रींपैकी एक आहे. पण तिच्याजवळ काय ग्लॅमर होते? कलेच्या अन्य प्रांतात असलेल्या कवी, कादंबरीकार, गायक, नर्तक आणि नाटककार यांच्याकडे कसल्याही प्रकारचे ग्लॅमर नसते. हे कलावंत आपल्याला आनंद देत नाहीत काय? ते करमणूक करतात ना? चार्ली चॅप्लिनपेक्षा थोर कलावंत झालाय का? कसदार मनोरंजन आणि कोणत्या प्रकारची लोकप्रियता यालासुद्धा महत्त्व असते.

ज्या चित्रपट कलावंतांना या माध्यमाची क्षमता माहीत आहे त्यांच्यासमोर करमणुकीच्या मूळ कल्पनेमध्येच बदल घडवून आणण्याचे आव्हान आहे. हे आव्हान आहे दिखाऊ सौंदर्याच्या आणि ग्लॅमरच्या तसेच ढोंगी पुरोगामित्वाच्या दुनियेत बदल घडवण्याचे आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या नावाखाली जी काही लबाडी दाखवली जाते त्यापासून सत्य, सौंदर्य आणि आनंदाच्या जगाकडे नेण्याचे. उत्तम विनोदाच्या माध्यमातून उच्चपदस्थांच्या वागणुकीतील अंतर्विरोध दाखवणे किंवा अश्रूंचा भरमार नसलेल्या शोकांतिकेमधून लोकांना जीवनातील वास्तवतेची जाणीव करून देण्याचे हे आव्हान आहे. विनोदाला शहाणपणाची जोड हवी आणि प्रेमाचे प्रकटीकरण अदबीने व्हायला हवे.

तुम्हाला खरोखर तुमच्यातल्या कलावंताशी निष्ठा राखायची असेल तर प्रसिद्धी, मान्यता, ऑस्कर इ.ची चिंता करणे सोडून द्या. अगत्यशीलतेसारखी प्रसिद्धीसुद्धा तुम्हाला नको असते तेव्हा तुमच्या मागोमाग येते. पॅरिसमधील लेखक आणि नाटककारांच्या सोसायटीचे अध्यक्ष श्री.रॉजर फर्डिनांड यांनी चार्ली चॅप्लिनला लिहिलेल्या पत्रातील एक उतारा इथे दिल्याशिवाय मला राहवत नाही. फ्रान्स सरकारने चार्ली चॅप्लिन यांना ‘ऑफिसर ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित केले होते तेव्हाचे हे पत्र आहे. चॅप्लिनच्या लोकप्रियतेबद्दल फर्डिनांड लिहितात की, ‘खरं म्हणजे लोकप्रियता ही बळकावली जाऊ शकत नाही. जर ही प्रसिद्धी चांगल्या कार्यासाठी वापरली गेली तरच तिला काही अर्थ, किंमत असते आणि ती टिकून राहते. तुमच्या स्वतःच्या दुःखातून, आनंदातून, आशा आणि निराशेतून स्फुरलेली मानवाबद्दल जी तुमची कळवळ आहे त्याला कोणत्याही बंधनांची आडकाठी नाही. तुमचे यश हा त्याचा आविष्कार आहे. ज्यांनी अपरिमित दुःख सोसले आहे, ज्यांना करुणा हवी आहे आणि आपल्या हालअपेष्टांना क्षणभर विसरून जाऊन आधाराची आकांक्षा आहे अशा लोकांना तुमचे हास्य हे दुःख मिटवण्यासाठी नाही, तर सांत्वनासाठी आहे याची जाणीव आहे.

शेवटी तुमचे खरे प्रेम कशावर आहे त्यावर हे सर्व अवलंबून आहे असे मला वाटते. इथल्या लोकांवर तुमचा लोभ असेल, त्यांच्या हालअपेष्टांनी भरलेल्या आयुष्यात थोडीफार आशेची किरणे तुम्ही दिलीत, जसे आत्ताचे राजकारणी करतात तशा मर्कटचेष्टा करून लोकांना मूर्ख बनवून पैसा मिळवण्यात तुम्हांला लाज वाटत असेल तर लोकांच्या आंधळ्या श्रद्धा, त्यांचे अज्ञान, त्यांचा प्रारब्धवादी दृष्टिकोन आणि त्यांची मानसिक आणि शारीरिक उपासमार यांच्या जिवावर पैसा कमावण्याचा मार्ग तुम्ही सोडून द्याल. रुपेरी पडद्यावर जे काही दाखवले जाते ते कालातीत सत्य आहे असा विश्वास ठेवण्यास भाग पाडून आपल्या भोळ्या अशिक्षित जनतेची फसवणूक केली जाते. आपण जे काही करतो आहोत ते त्यांच्या भल्यासाठीच आहे असे भासवून कित्येक राजकारणी जनतेला भुलवत आहेत. मग प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधी दाढी भादरून काढायची किंवा जयप्रकाश नारायण यांसारख्या विद्वत्तापूर्ण थोर माणसाला आधी तुरुंगात टाकायचे आणि नंतर त्यांच्या चितेवर चंदनाची लाकडे ठेवायची. आपल्या धूर्त फिल्मवाल्यांनी काही अज्ञात देवतांना उजेडात आणून त्यांना नवीन जन्म दिला आहे. अशा देवीदेवतांना मिळालेल्या ग्लॅमरचा उपयोग गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची मंदिरे उभारून झटपट पैसे मिळवण्यासाठी केला आहे.

अशा वेळी, जर खरोखर सरकारला सध्याच्या भारतीय चित्रपट उद्योगामध्ये सुधारणा करायची असेल तर चांगल्या सर्जनशील कलावंतांना ज्या सुविधांची गरज आहे त्या पुरवल्या पाहिजेत. सेन्सॉर बोर्डाचे नियम अधिक कडक करावेत असे मी इथे म्हणत नाही. इंडियन पीनल कोड आल्यामुळे गुन्हे घडायचे काही थांबले नाहीत. जी मूळ मनोवृत्ती आहे ती बदलायला हवी. लोकांच्या मनातली सिनेमाबद्दलची जी गैरधारणा आहे ती कौशल्यपूर्वक प्रयत्न करून बदलवायला हवी. अस्सल नाण्यांची किंमत लोकांना तेव्हाच कळेल जेव्हा खोटी नाणी बाद ठरतील. जे उत्कृष्ट चित्रपट आहेत ते महान साहित्यिकांच्या कथेवर आधारित आहेत हे तुम्हांला उमगलेच असेल. न्यू थिएटर्सच्या यशामध्ये शरदबाबूंचा (शरत्‌चंद्र चॅटर्जी ) मोठा वाटा होता हे विसरून चालणार नाही. सत्यजित रायपासून ते बी. व्ही. कारंथपर्यंत आधुनिक दिग्दर्शकांचे बहुतेक सर्व चित्रपट प्रख्यात लेखकांनी लिहिलेल्या दर्जेदार कथा आणि कादंबरींवर आधारित होते. सर्वच्या सर्व साहित्यकृतींवर काही चित्रपट बनू शकत नाही. परंतु जवळपास सर्वच भारतीय भाषांमध्ये उत्तम दर्जाच्या कथा लिहिल्या गेल्या आहेत, ज्यावर चित्रपट बनू शकतात. मराठी भाषेतल्याच अशा शंभरांहून अधिक कथा मी सांगू शकतो. आपल्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांचे आतापर्यंत अपरिचित अशा आशा आणि आकांक्षा, सुख आणि दुःख कलात्मकरीत्या मांडणारे नवीन लेखक भारतीय भाषांमध्ये पुढे आले आहेत. अशा कथांवर 16 मिली मीटरवर 60 ते 90 मिनिटांचे भाग बनवण्यासाठी तरुण कलाकार आणि दिग्दर्शकांना का बरे उत्तेजन देऊ नये? केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा चित्रपटांना अर्थसाहाय्य करण्याबरोबरच जागोजागी छोटी थिएटर्स बांधावीत. जेणेकरून हे चित्रपट तेथे दाखवले जातील. असे चित्रपट दूरदर्शनवरही दाखवण्यास भरपूर वाव आहे. करमणूक आणि प्रबोधन अशा दोन्ही दृष्टींनी या माध्यमाचे महत्त्व लोकांना कळू द्या. आपल्या संस्कृतीमधल्या अनेक मोहक लोककथा पडद्यावर आल्या पाहिजेत. बुद्धी आणि चातुर्याचा मोठा खजिना तेथे आहे. आपल्या बहुतांश चित्रपट कथांसारख्या त्या कृत्रिम नाहीत, तर इथल्या मातीतल्या या सजीव गोष्टी आहेत.

या आकर्षक कथांना रंग, रूप आणि आकार द्या. जेणेकरून जीवनातील खऱ्या सुखदुःखांची अनेकानेक अंगांनी प्रेक्षकांना अनुभूती मिळेल. सरळ आणि सोप्या प्रकारे त्यांना सादर करा. कला आणि प्रयोगाच्या नावाखाली संदिग्ध आणि अस्पष्ट राहू नका. तुमच्या चित्रपटांतून घटना आणि भावना सोप्या आणि थेट प्रकारे प्रेक्षकांसमोर मांडा. मला कन्नड भाषेतला एकसुद्धा शब्द समजत नाही. पण तरीसुद्धा गिरीश कार्नाड यांच्या ‘काडू’ किंवा शिवराम कारंथ यांच्या ‘चोमाना दोडी’ या चित्रपटांतील दर्शवलेल्या खोलवर दुःखाने मी हलून गेलो. सिम्फनी ऑर्केस्ट्रामधल्या प्रत्येक वादकासारखे जेव्हा लेखक, दिग्दर्शक, छायालेखक, अभिनेता आणि अभिनेत्री एका लयीमध्ये काम करतात तेव्हाच एक चांगला चित्रपट बनतो. म्हणूनच भावी चित्रपट कलावंताना प्रशिक्षण आणि फिल्म बनवण्याच्या विविध अंगांचा परिचय करून देण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की काळ बदलला आहे. काळ आपणहून बदलत नसतो. कलावंत, तत्त्ववेत्ता, शास्त्रज्ञ, चित्रकार, शिल्पकार, संगीतकार, जुन्या जमान्यातले राजे आणि सध्याच्या काळातील राजकारणी स्वतंत्र आणि सामूहिकरीत्या लोकांच्या आयुष्यात हा बदल घडवत असतात. बदलत्या काळाची जाणीव कलावंताला असावी लागते आणि त्या बदलावर कायम सावध दृष्टी रोखून आपल्या कलेमध्ये त्याचा योग्य तो आविष्कार करायचा असतो. प्रशिक्षणाचा हा कालावधी कधी संपत नसतो. हे खरे आहे की कलावंत जन्मजात असतात आणि घडवले जाऊ शकत नाहीत. परंतु केवळ जन्मजात कौशल्ये ही पुरेशी नसतात. ज्यांनी आपल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले आहे अशा सर्व जन्मजात कलावंतांनी रियाजाचा रिवाज कायम ठेवला आहे. एखादी कला आवडते याचा अर्थ असा नाही की तुम्हांला निर्मितीचे वरदान मिळाले आहे. ती एक हेतुपुरस्सर प्रक्रिया असते. जे कौशल्य आहे त्यामध्ये प्रावीण्य मिळवावे लागते. बाल कलाकार म्हणून लवकर प्रसिद्धी मिळाल्यामुळे पुढे जाऊन बहुतेकदा अपयश मिळालेले दिसते. कारण पुरेशी तालीमच मिळालेली नसते. कलाक्षेत्रातील आपण सर्व जण नार्सिसिस कॉम्प्लेक्सने बाधित असतो. अशा वेळी ज्यांचा तुम्ही आदर करता, असे कान उपटणारे लोक जवळ पाहिजेत. जे तुम्हांला तुमची योग्य जागा दाखवून देतील. चांगले समीक्षक हे काम करू शकतील. पण हीसुद्धा एक दुर्मीळ जमात आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर इथल्या शिक्षकांनासुद्धा वेळोवेळी रिफ्रेशर कोर्सची गरज आहे. आपल्या शिकवणुकीच्या पद्धतींचा कायम आढावा घेतला पाहिजे.

या संस्थेची एक विशेष जबाबदारी आहे. समाजात चांगला बदल घडवण्याची जबरदस्त शक्ती असलेल्या माध्यमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना इथे दिले जाते. ही संस्था चालवण्यासाठी सरकारने बऱ्यापैकी निधी उपलब्ध करून दिला आहे आणि पुढील विकासासाठी अजूनही जास्त देण्याची गरज आहे. इथल्या शिक्षकांना पुरेसे स्वातंत्र्य आणि सुविधा दिल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांचे शिष्य पूर्ण आत्मविश्वासासहित बाहेरच्या जगास तोंड देण्यास सज्ज असतील. इथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा दूरदर्शनने पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. मला खात्री आहे की अशा संधी मिळाल्यानंतर आपले तरुण दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार, लेखक आणि तंत्रज्ञ सध्याच्या फिल्म इंडस्ट्रीच्या नावाखाली चाललेल्या सट्टाबाजाराचा खोटा चकचकीत मुखवटा भिरकावून टाकतील आणि आपल्या नैसर्गिक कलात्मक चित्रपटांतून या उद्योगास गौरवाप्रत नेतील.

मित्रहो, मला माहीत आहे की ही संस्था सोडताना तुमच्या मनांत संमिश्र भावना असतील. जीवनातील विरहाचे सर्व क्षण दुःखाचे असतात. तुम्ही जी शिदोरी सोबत घेऊन चालला आहात ती भारताचे भावी चित्रपट कलावंत म्हणून तुमच्या करिअरमध्ये नक्कीच उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे. माझी तुम्हांला विनंती आहे की आपल्या हृदयामध्ये तुमच्या प्रेक्षकांविषयी नितांत प्रेम आणि आदर बाळगून तुमच्या कलाकृतीतून त्यांना एक समृद्ध अनुभव देण्याची लालसा ठेवा. तुमच्या कामातून प्रेक्षकांशी सरळ भिडा. मला खात्री आहे की तुम्ही त्यांची मने नक्की जिंकाल, जे बाकी कोणत्याही गोष्टींपेक्षा मोलाचे आहे. तुमच्या या नवीन रोमांचक प्रवासासाठी माझ्या शुभेच्छा!

या कार्यक्रमासाठी मला तुमच्या संचालकांनी खूप आपुलकीने आमंत्रण दिले. मी तुम्हांला ‘शुभास्ते पंथानः’ एवढेच म्हणू शकतो. एका अप्रतिम चित्रपट संग्रहालयाचे घनिष्ट सान्निध्य तुम्हांला लाभले आहे. चित्रपट व्यवसायात पूर्वी कधी असलेल्या आणि माझ्यासारखी ज्यांची काही किंमत राहिलेली नाही अशा लोकांची यादी श्री. नायर यांनी ठेवली आहे हे मला माहीत नव्हते. या संस्थेचे अध्यक्ष आणि कर्मचारी यांना आणि आपणां सर्वांना माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मी धन्यवाद देतो.

अनुवाद : प्रकाश मगदूम, पुणे
prakashmagdum@gmail.com
(अनुवादक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक आहेत.)


मूळ स्रोत --> https://www.weeklysadhana.in/view_article/ftii-convocation-speech-by-p-l-deshpande-marathi

मूळ इंग्रजी भाषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पु.ल.प्रेम: An unpublished speech of P. L. Deshpande (cooldeepak.blogspot.com)

1 प्रतिक्रिया:

परितोष गोडबोले said...

मगदूम सर अप्रतिम लेख. अनुवादही सुरेख