दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्या दिवशी पहिल्या तासाला दिवाळीच्या सुट्टीत कोणी कोणी काय काय केले, दिवाळी कशी साजरी केली, यापैकी एकाही गोष्टीची चौकशी न करता एकदम वर्गात आल्याबरोबर जॉमेट्रिचा थिअरम शिकवायला घेणाऱ्या मास्तरासरखा हा वार आहे. सोमवार नुसता नाकसमोर जाणारा. सोमवार कधी हसत नाही. हा सोमवार रुक्ष आहे,अरसिक आहे, पण कोणाच्या अध्यात ना मध्यात! आपले काम बरे की आपण बरे! आणि म्हणूनच एखादे दिवशी त्याला सुट्टी मिळाली की त्याची पंचाईत होते. दिवसभर बिचारा घरी पडून राहतो.
मंगळवाराचे श्रावणी सौंदर्य अफाट आहे. हा पठ्ठया त्या वेळी एरवीची सारी उग्रता विसरून कुटुंबातल्या सात्त्विक पुरुषासारखा वागायला लागतो ! घरोघर जमलेल्या पोरींना एरवी मनात आणील तर हाताला धरून खेचून फरफटत रस्त्यातून ओढीत नेण्याचे सामर्थ्य असलेल्या ह्या मंगळाचे मंगलात रूपांतर होते. ओठावर आणि हनुवटीवर दाढीची कोवळी पालवी फुटलेल्या काळात ह्या श्रावणातल्या मंगळवाराने आमची शनवाराची दृष्टी आपल्याकडे खेचली होती. त्यातून पाच मंगळवारांचा श्रावण आला, म्हणजे अधिकच रंग येई. लेकी-सुनांच्या मेळाव्यांतून, हिरव्या पत्रीतून लालसर कळ्या शोधाव्या, तशा (इतरांच्या) लेकी मन वेधून घेत. खालच्या माजघरात मंगळागौरींचा हसण्याखिदळण्याचा धिंगाणा सुरू झाला की, वरच्या खोलीतून पुस्तकावरचे लक्ष उडे. आणि मग कुठे पाणी पिण्याचे निमित्त कर, कुठे माजघरातल्या घड्याळाबरोबर आपले रिस्टवॉच जुळवायला जा, (हे बहुधा फर्स्ट इअरच्या परीक्षेत पास झाल्यावर मिळे!) असली निमित्चे काढून त्या खळखळत्या हास्याच्या काठाकाठाने उगीच एक चक्कर टाकून यावीशी वाटे ! अशा वेळी वाटे की, ही श्रावणी मंगळवारची रात्र संपूच नये.
तेवढ्यात एखादी जाणती आत्या "काय रे, फारशी तहान लागली तुला?" म्हणून टपली मारी, आणि कानामागे झिणझिणी येई. नेमकी ह्याच वेळी नव्या वहिनींची निळ्या डोळ्यांची धाकटी बहीण आपल्याकडे का पाहत होती हे कोडे उलगडत नसे. आजच दुपारी मधल्या जिन्यात तिने आपल्याला “ऑलजिब्राच्या डिफिकल्ट्या सोडवून द्याल का ?" म्हणून प्रश्न विचारला होता. डोक्यात एखाद्या गाण्याच्या चरणासारखा तो प्रश्न घोळत असे. मंगळवार आवडला तो फक्त तेव्हा. एरवी, हा वार सगळ्यांत नावडता.
बुधवार हा सात वारांतला हा मधला भाऊ. बुधवार हा थोडक्यात बिनबुडबंधू भाऊ आहे. ह्या वाराला कोणत्याही प्रकारचे व्यक्तिमत्वच नाही. दिवसाच्या व्यवहारात अकरा-साडेअकराच्या सुमाराला कसलेही वैशिष्ठ्य नाही, रंग-रूप-आकार नाही, त्याचप्रमाणे ह्या बुधवाराला काहीही आगापिछा नाही. एखाद्या श्रीमंत कुटूंबात एखाद्या भावाला जसे एखाद्या पेढीवर कोणतेही महत्वाचे काम न देता नुसते बसवून ठेवतात, तसे ह्या वाराला दोन्ही बाजूंनी दोन वार देऊन रविवारने बसवून ठेवले आहे. तापट मंगळवार आणि सौम्य गुरुवार यांच्या मधे उभा राहून हा दोन्हीकडे आपली गचाळ दंतपंक्ती विचकत गुंडाचा आणि संताचा आशीर्वाद घेऊन स्वत:चे स्थान टिकवू पाहणाऱ्या गावठी पुढाऱ्यासारखा आहे. बुधवारच्या नशीबी काही नाही. हिंदूचा गुरुवार, मुसलमानांचा शुक्रवार, यहुद्यांचा शनिवार आणि ख्रिस्त्यांचा रविवार. पण बुधवार कुणाचाच नाही.
गुरुवार सज्जन आहे, पण गचाळ नाही. हा दोन-दोन बोटे दाढी वाढवून मातकट धोतर आणि कुडते घालणाऱ्या सज्जनांतला नव्हे. हा मुळातलाच सात्विक, सौम्य, हसऱ्या चेहऱ्याचा, सडपातळ, गहू वर्णाचा, मिताहारी. हा शाकाहारी खरा, पण त्या आहाराने अंगावर सात्विकतेचे तूप चढून तुकतुकणारा नव्हे. मला शनिवारच्या खालोखाल गुरुवार आवडतो. मुख्य म्हणजे हा व्रत पालन करणारा असूनही मऊ आहे. कडकडीत नाही.
शुक्रवार थोडासा चावट आहे. पण स्वभावात नव्हे. खाण्यापिण्यात. कुठे चणेच खाईल, फुटाणेच खाईल. हा पठ्ठ्या केसांची झुलपे वाढवून, गळ्यात रुमाल बाधूंन हिंडतो. दिवसभर काम-बिम करतो, पण संध्याकाळी हातांत जाईचे गजरे घालून, अत्तर लावून हिंडेल. ह्याला उपासतापास ठाऊक नाहीत.
स्वभावाने अतिशय गुल्ल्या ! कपड्यांचा षौकिन ! वास्तविक शुक्रवार शनिवारसारखा थोडासा रंगेल आहे. पण त्याला गुरुवारच्या सौम्य देखरेखीची किंचीत बूज असते. गुरुवारच त्याला उठवून कामाला लावतो.
...शनिवार नावाच्या गृहस्थावर माझे मन जडले. वास्तविक शनिवार हा इतरांच्या दृष्टीने न-कर्त्यांचा वार आहे. पण आजदेखील मला शनिवारचे आकर्षण विलक्षण आहे. शाळेत असताना मी शनिवारची वाट जितकी पाहिली, तितकी रविवारची नाही. काही चतुर मुले शनिवारी अभ्यास उरकीत आणि रविवार मोकळा ठेवीत. ज्याने शनवारच्या स्वभावातला खट्याळपणा ओळखला नाही, अर्धाच दिवस पोटासाठी राबून उरलेल्या अर्ध्या दिवसात आणि संपूर्ण रात्रीत गंमत केली नाही, त्याने जीवनातला महत्वाचा वार ओळखला नाही. जीवनात रंगणाऱ्या लोकांचा हा वार आहे. शनिवारी संध्याकाळी जसे जग दिसते, तसे रोज संध्याकाळी ज्यांना पाहता आले, त्यांच्यासारखे भाग्यवान तेच ! अर्थात शनिवारचे मोठेपण रविवारच्या मोकळ्या स्वभावामुळे आहे हे अमान्य करु नये.
रविवार हा काही झाले तरी 'दादा' आहे. किंबहुना, घरातला कर्ता पुरुष आहे. एकत्र कुटुंबातला कर्ता पुरुष जसा स्वतः भाकरी बांधून कामाला जात नाही, त्याप्रमाणे इतर भावांप्रमाणे हा जरी स्वतः राबत नसला, तरी बाकीचे भाऊ याला मान देतात. हे सारे भाऊ आठवड्याच्या शेवटी याच्या जवळ येतात. सगळ्यांची हा प्रेमाने विचारपूस करतो. जेवू-खाऊ घालतो; आणि दुसऱ्या दिवसापासून सारेजण कामाला लागतात.
रविवार मात्र कर्त्या पुरुषाची सगळी जबाबदारी उचलतो. पोराबाळांना एरंडेल दे, कडुलिंबाचा पाला उकळून गरम पाण्याने आंघोळ घाल, बागेतला पाचोळा काढून जाळ, दुपारी जरा गोडाधोडाचे जेवण घाल, वगैरे कार्ये आपल्या देखरेखीने करून घेतो. एका गोष्टीसाठी मात्र मला रविवार आवडतो. तो दुपारी जेवून मस्तपैकी झोपतो. आजोबा देखील वामकुक्षी करीत - चांगली बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत. मग त्यांना चहासाठी उठवावे लागे. हे काम कठीण होते. पण आजीची त्यालाही युक्ती होती... गजबजत्या कुटुंबात एखादे तरी तान्हे मूल असायचेच ! त्याला घेऊन आजोबांच्या झोपायच्या खोलीत जायचे, आणि त्यांच्या श्वासाबरोबर वर खाली होणारे पोटावर ते रांगते मूल सोडून द्यायचे! ते पोर आपली बाळमूठ उघडून आजोबांच्या पोटावर चापटी मारून 'तँ पँ कँ पँ असे काहीतरी करी. मग आजोबा जागे होत. आणि संतापाची शीर फुगण्याच्या आत आपल्या पोटापर्यंत चढलेल्या नातवाला पाहिल्यावर "हात् गुलामा ! " म्हणून उठत. आजोबा उठले, की घरातला सारा रविवार उठे! आणि आजी हळूच म्हणे, "उठा, चहा झालाय केव्हाचा!" आजोबा उठत आणि आजी मोरीत चूळ भरायला तांब्या ठेवीत असे. चतुर होती माझी आजी. सगळ्या आज्या असतात तशी वारांची कहाणी सांगणारी आजी !
(अपूर्ण)
- साता वारांची कहाणी
पुस्तक - हसवणूक
पु.ल. देशपांडे
हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी पूर्ण पुस्तक खालील लिंकवरुन घरपोच मागवू शकता.
पु.ल. देशपांडे
हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी पूर्ण पुस्तक खालील लिंकवरुन घरपोच मागवू शकता.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment