Friday, May 6, 2022

देव माझा विठू सावळा - (शोभा वागळे)

साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा! अशीच काहीशी धामधूम त्या दिवशी अमेरिकेतल्या छोट्याशा अपार्टमेंटमध्ये चालू होती, खिडक्या-दारे लखलखीत करणे, कार्पेट साफसूफ करणे वगैरे जोरात सुरू होतं स्वयंपाकघरातही सुग्रास नैवैद्य बनविण्यासाठी आटापिटा चालू होता. आता 'गुळाच्या गणपती'साठी मखर बांधायचे तेवढे बाकी होते.

सूज्ञांच्या लक्षात आलेच असेल, अहो, मायदेशातून दूरदेशी आलेल्या या भक्तांच्या घरी त्यांची विठूमाऊली येणार होती. आमचे परम दैवत विठ्ठल रखुमाई म्हणजेच 'भाई आणि माई' येणार होते. आमचा दिवाळी-दसरा चक्क जूनमध्येच साजरा होणार होता.

'कुठल्याही गोष्टीचा आरंभ अगदी उगमापासूनच करावा' या आद्य नियमानुसार या 'विठ्ठलभेटीचा' खुलासा करते. 'पु. ल. देशपाडे' हे 'अव्यक्त' (जे कधी बघितले नव्हते) दैवत मी इयत्ता चौथीत असतानाच माझे 'आराध्य दैवत कसे बनले पहा! पु. ल॑.चे नाटक वाऱ्यावरची वरात त्यावेळी गाजत होते आणि माझ्या एका वर्गमैत्रिणीच्या दिग्दर्शनाखाली शाळेच्या मधल्या सुट्टीत आमचे 'वराती'चे अनेक प्रवेश दणक्यात चालायचे. पु. ल. देशपांडे काळे का गोरे(का सावळे) याचा थांगपत्ताही नव्हता. पण त्यांच्या शब्दांनीच आम्हाला वेड लावले होते. माझा परीक्षेत पहिला नंबर आला तेव्हा बाबांनी बक्षीस म्हणून पहिल्या रांगेतील तिकीट काढून मला 'वरात' घडवली, त्यावेळी पु.लं.चे पहिलेवहिले दर्शन आणि तेही इतक्या जवळून घडले. कटी न दिसणारी अंगकाठी,

डोक्यावर कुरळ्या केसांची दाटी, डोळ्यांवर जाडजूड चष्मा, चेहऱ्यावर भोळा भाव, बोलण्यात मिस्किल भाव असा हा सावळा माझा 'विठू' बनून गेला. आतापर्यंत केलेली निर्गुण अव्यक्ताची पूजा जणू सगुण रुपात साकारली. आणि मग ओढ लागली प्रत्यक्ष भेटीची!

त्यांची धम्माल पुस्तक अधाशासारखी फस्त करतानाच त्यांच्या मुंबईतल्या 'मुक्तांगण' बंगल्यावर माझी आणि माझ्या बहिणीची गस्त चालू असायची..कधीतरी ओझरते दर्शन' व्हावे म्हणून! पण पु. ल. 'पुण्यनगरी'ला स्थलांतरित झाले आणि आमच्या 'भेटीलागी जीवा' लागलेल्या 'आसे'वर पाणी पडले. पु. ल. आता संपूर्ण महाराष्ट्राचे 'भाई' बनले होते. हल्लीच्या 'भाई सारखा फसवण्याचा धंदा नव्हे, तर या "भार्हचा 'हसवण्याचा धंदा' तेजीत चालू होता. त्यांच्याभोवती चाहत्यांचा सदैव गराडा असायचा. त्या चिरेबंदीतून गाभाऱ्यापर्यंत शिरकाव होण्याची सुतराम शक्‍यता नव्हती.

अखेर भाईच्या साठीच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात माझे भाग्य फळाला आले. मी त्यांना एक लंबेचौडे अभिनंदनपर पत्र पाठवले. असंख्य मित्रमंडळीत हरवलेला हा देव मला उत्तर पाठवेल अशी अपेक्षाच नव्हती. पण काय सांगू महाराजा...तब्बल तीन महिन्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र लिहून भाईंनी माझ्या शुभेच्छांची पोच दिली. माल्या आनंदाचा वेलू गगनावेरी' गेला. मी हा प्रेमळ धागा पकडून ठेवला.

आणि भाईना पत्रांवर पत्रे पाठवीत राहिले. त्या कनवाळू देवालाही माझी व्याकुळ भक्ती कुठेतरी भावली असावी माझी पाच पत्रे गेली की त्यांचे एक पत्र यायचे. पंढरपूराहून कुणी नातलगाने आठवणीने पाठवलेला चण्याफुटाण्याचा प्रसाद कसा अनमोल असतो, तसेच हे छोटेखानी पण चटपटीत हसते खेळते पत्र मनाला ओलावा देऊन जायचे.

आणि अचानक एके दिवशी "सोनियाचा दिवस' उजाडला. माझा हा देव चक्क माझ्या घरी येण्यास तयार झाला. भाईंच्या अमेरिकेच्या प्रवासाची सुवार्ता माझ्या कानी पडली. माझ्या कळकळीच्या विनंतीला मान देऊन माझा हा सावळा 'विठ्ठल तो आला. आला मला भेटण्याला' सोबत (रखु)माईईही होती. त्या संध्याकाळी आम्ही भाई व माईंच्या संगतीत गमतीजमती करत राहिलो. दिलदार भाई व प्रेमळ माई जुनीपुराणी ओळख असल्यासारखे आमच्याशी सुखसंवाद साधत राहिले. पियानोवर जादूई बोटे फिरवत भाईंनी 'जन गण मन' काय वाजवले, टीवीवरच्या माणसाची हुबेहूब नक्कल काय केली, वाडवडिलांची चौकशी केली. हसवता हसवता डोळ्यात टचकन पाणी आणणारा हा विदूषक असामी आम्हालाही 'हसा आणि हसवा' असा आशीर्वाद देऊन गेला.

नंतरही त्यांना भेटायचे काही योग आले. आता मात्र उरली आहे फक्त आठवणींची शिदोरी आणि कृतज्ञतेचे अश्रू! पण खरं सांगू? माझा हा देव कुठे वैंकुठी वगैरे गेलेला नाही, आपल्या सर्वांच्या हृदयमंदिरात तो विराजमान झालेला आहे.

- शोभा वागळे
बृहमहाराष्ट मंडळाचे ११वे अधिवेशन २०१९, डॅलस.

1 प्रतिक्रिया:

Anonymous said...

भाग्यवान आहात! शब्दांकन खूप छान झालंय! त्यांच्याबद्दलची आत्मीयता लिखाणात जाणवते.