Monday, March 11, 2019

चरित्रपट की विडंबनपट?

सुनीताबाई देशपांडे यांचे बंधू सर्वोत्तम ठाकूर, त्यांच्या पत्नी अंजली ठाकूर, त्यांचे चिरंजीव उमेश ठाकूर आणि पुलं-सुनीताबाईंचे मानसपुत्र दिनेश ठाकूर, पुलंचे स्नेही रामभाऊ कोल्हटकर ही पुलं-सुनीताबाईंची निकटवर्ती माणसं. त्यांचे ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चरित्रपटावरील आक्षेप..

‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या पुलंवरच्या तथाकथित ‘चरित्रपटा’चे दोन्ही भाग नुकतेच प्रदर्शित झाले.चरित्रपटातील असंख्य प्रसंगांत दाखविलेली वास्तवाशी अनावश्यक फारकत, सत्य प्रसंग वाट्टेल तसे बदलून केलेले विद्रूपीकरण, कल्पनादारिद्रय़, त्याचबरोबर चरित्रनायकाच्या आणि कलाक्षेत्रातल्या अनेक मान्यवर व्यक्तिमत्त्वांच्या तोंडी घातलेले अतिसामान्य, टुकार, न शोभणारे (uncharacteristic) संवाद, त्यांचे या चरित्रपटातील अत्यंत उथळ, बेजबाबदार व बदनामीकारक चित्रण अशा अनेक गोष्टींवर कित्येक जाणकार रसिकांकडून, चाहत्यांकडून, मान्यवरांकडून जोरदार टीकाही झाली. खरं तर पुलंचे जन्मशताब्दी वर्ष म्हणजे जगभरातील मराठी माणसांना आनंदोत्सव साजरा करायला, त्यांच्या सुंदर आठवणींत रमायला मिळालेली सुवर्णसंधी. पण याला गालबोट लागले ते या चरित्रपटाने, हे दुर्दैव.

या चरित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०१७ च्या सुमारास दिनेश यांच्याशी आपल्याला पुलंवर बायोपिक करायचा आहे; त्यासाठी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सांगा म्हणून संपर्क साधला. दिनेश यांनी त्यांना पुलंची पुस्तके, त्यांच्यावरील डॉक्युमेंटरीज् वगरे स्वाभाविक माहिती पुरवत असताना त्यांना असे उत्तर मिळाले की, ‘‘मी काही पुलंची पुस्तके वाचलेली नाहीत, डॉक्युमेंटरीज् बघितलेल्या नाहीत. मला त्याची गरजही वाटत नाही. मी त्यांच्या आयुष्यातले नव्वद प्रसंग गोळा करणार. त्यातले साठ निवडून, चित्रित करून त्यावर ८ नोव्हेंबर २०१८ ला चरित्रपट प्रदर्शित करणार.’’ यावर दिनेश यांनी पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले आकलन झाल्याशिवाय (खरं तर झाल्यानंतरही) पुलंसारखे अष्टपैलू, बहुरंगी व्यक्तिमत्त्व चरित्रपटाच्या स्वरूपात उभे करणे कठीण आहे, असे सांगून दिग्दर्शकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. उत्तम चरित्रपट काढण्यासाठी लागणारा अभ्यास, तो करायची तयारी, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, मेहनत, चरित्रनायकाबद्दल वाटणारी व्यक्तिगत आपुलकी, आस्था, आत्मीयता या सगळ्याचाच अभाव भासल्याने- केवळ पुलंच्या नावाचे चलनी नाणे जन्मशताब्दीनिमित्त खपवायचे आहे- अशी रास्त शंका आल्याने दिनेश यांनी अशा प्रकारच्या निर्मितीसाठी आपली नाराजी दाखवून यात आपण सहभागी होऊ शकणार नाही असे त्यांना सांगितले.

या पार्श्वभूमीवर हा चरित्रपट सुमार दर्जाचा असणार, हा अंदाज दुर्दैवाने खरा ठरला. तेवढेच असते तर दुर्लक्ष करून सोडूनही देता आले असते. परंतु या चरित्रपटात cinematic liberty किंवा ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ अशा मोठमोठय़ा शब्दांच्या ढालीमागे लपत, स्वत: पुलं आणि सुनीताबाईंनी वर्णन केलेल्या, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या प्रसंगांचा केलेला विपर्यास, त्यांचे केलेले बेजबाबदार विकृतीकरण यांमुळे या चरित्रपटात पुलंचे व्यक्तिमत्त्व आत्मकेंद्रित, उथळ, वेंधळे दर्शवले गेले आहे.

खरे तर चरित्रपट करताना चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण, सखोल अभ्यास केल्यावरही काही बारकाव्यांची नोंद सापडतच नसेल तेव्हा आणि फक्त तेव्हाच अत्यंत काळजीपूर्वक आणि परिपक्वतेने cinematic liberty वा अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरणे वावगे ठरत नाही. इकडे तर पुलंची स्वत:ची इतकी पुस्तके, त्यांच्यावरील तीन उत्तम डॉक्युमेंटरीज् (पैकी दोनांत पुलं स्वत:च त्यांच्या आयुष्याबद्दल भरभरून बोलले आहेत.), त्यांची भाषणे, रेकॉìडग्ज्, सुनीताबाईंची पुस्तके, तसेच पुलंवर आणि चरित्रपटात दाखवलेल्या त्यांच्या निकटवर्तीयांवरही इतके अमाप साहित्य, माहिती उपलब्ध असताना त्याचा काटेकोरपणे वापर न करता असे उथळ, बेपर्वाईचे आणि विसंगत चित्रण का करावे? पुलं आणि सुनीताबाईंचे एकमेकांना पूरक असलेले सुंदर भावनिक नाते आणि सांस्कृतिक श्रीमंतीचे आयुष्य तर इथे दिसतच नाही. सुनीताबाईंना आणि इंग्रजीला घाबरणारे, आत्मविश्वास नसलेले, दुसऱ्याच्या सल्ल्याने वागणारे असे पुलंचे सत्याशी विसंगत व्यक्तिमत्त्व दाखवण्यामागचा हेतू तरी काय?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा चरित्रपट संदर्भ म्हणून (जो ‘बायोपिक’चा एक महत्त्वाचा उद्देश असतो.) पुलंसारख्या महाराष्ट्राच्या मोठय़ा व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासासाठी वापरण्याच्या लायकीचा नाही. मराठी शिकणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यांला पुलंवर, त्यांच्या साहित्यावर; फक्त विनोदीच नव्हे तर त्यांच्या विपुल वैचारिक साहित्यावर, विविध क्षेत्रांतल्या योगदानावर, त्यांच्या आयुष्यावर रिसर्च करायचा असल्यास पुलंवरचा हा चरित्रपट चुकूनही प्रमाण मानल्यास तो अनर्थच ठरेल. याच उद्देशाने पुलं-सुनीताबाई आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या आयुष्यातल्या वास्तव घटना आणि चरित्रपटात केलेले त्यांचे विकृतीकरण यामधील विसंगतींची नोंद होणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, चरित्रपटातील abortion चा प्रसंग.. सुनीताबाईंना दिवस गेल्याचे त्या पुलंना सांगू पाहतात- ते दुर्लक्ष करतात- त्या स्वत: एकटय़ाच निर्णय घेऊन, एकटय़ाच गर्भपात करून येतात असा दाखवलेला गडद आणि बटबटीत प्रसंग. तर हाच प्रसंग ‘आहे मनोहर तरी’ या सुनीताबाईंच्या पुस्तकात त्यांच्याच शब्दांत किती संवेदनशीलपणे आला आहे. (प्रथम आवृत्ती, पृष्ठ क्र. १९५-१९६) ‘‘डोहाळ्यांचा त्रास होऊ लागला... भाई मोठ्ठं डाळिंब घेऊन आला... आमच्यावरच्या जबाबदाऱ्या संपेपर्यंत स्वत:वर असली दुसरी कोणतीही जबाबदारी नको असा आम्ही दोघांनी विचारपूर्वक निर्णय घेतला.’’

‘अंमलदार’ प्रसंग (‘आहे मनोहर तरी’- पृष्ठ क्र. १७८)- सुनीताबाईंनी पैज जिंकल्यावर चैनीच्या गोष्टी न मागता ‘अंमलदार’ नाटक पूर्ण करून मागितले याचे केलेले सुंदर वर्णन! तर चरित्रपटात सिगारेट तोडण्याच्या दमदाटीने आणि भीतीने ‘अंमलदार’ पूर्ण झाले- हे त्याचे केवळ विचित्रीकरण.

विजया मेहता- ‘सुंदर मी होणार’ वाचनाचा प्रसंग- ‘आहे मनोहर तरी’ पृष्ठ क्र. १४५-१४६ शी ताडून पाहावा.

चरित्रपट बनवणाऱ्यांनी योग्य तो अभ्यास करूनच चरित्रपट बनवला असेल असा भाबडा विश्वास टाकणाऱ्या अनेक प्रेक्षकांचा हा विश्वासघातच नाही का?

वास्तवात आचार्य अत्र्यांचे, गडकऱ्यांचेच नव्हे, तर कुठचाही ऐकलेला चांगला विनोद मैफिलीत, गप्पांत खुलवून सांगणारे पुलं- ‘‘विनोद फक्त मी करायचे!’’ असला भिकार विनोद (?) पुन्हा पुन्हा करताना दाखवले आहेत. बरं, यावर पुलंच्या कोटय़ा लोकांना माहितीच असल्यामुळे आपल्याच कोटय़ा पुलंच्या तोंडी खपवल्याची कबुली संवादलेखकांनी दिलीच आहे. (मॅजेस्टिक गप्पा- पार्ले, १६ फेब्रुवारी २०१९) मग बायोपिकला पुलंचे नाव का?

तर अशा अनेक वास्तव घटनांची वाट्टेल तशी चिरफाड करून, तर काही न घडलेले प्रसंग कल्पनेने (की ‘कल्पनादारिद्रय़ाने’ म्हणावे?) या चरित्रपटात घुसडले आहेत. या चित्रपटातील अशा असंख्य विसंगतींची पुराव्यासकट नोंद अभ्यासूंना उपयोगी पडेल म्हणून आणि रसिकांनाही सत्य कळावे म्हणून आम्ही तयार करीत आहोत.

पुलं आणि त्यांच्याबरोबर ‘चरित्रपटा’त ये-जा करणारी इतर थोर व्यक्तिमत्त्वे आम्हाला अशीच दिसली, असे वेळोवेळी सांगून लेखक-दिग्दर्शकांनी आपल्या दृष्टिदोषाची तर कबुलीच दिली आहे. यात केवळ कमजोर आकलनशक्ती आहे, की मत्सराचा/ आकसाचा चष्माही आहे, की दारू, सिगरेटच्या मागे धावणारी बेजबाबदार, आत्मकेंद्रित व्यक्तिमत्त्वे यांना आरशात दिसली, असा प्रश्न पडतो.


१० मार्च २०१९
लोकसत्ता

https://www.loksatta.com/lokrang-news/article-about-autobiography-or-parody-movie-1854473/

Times of India Article -->

2 प्रतिक्रिया:

Unknown said...

मी दोन्ही चित्रपट पाहिले नाहित कारण केवळ trailer पाहिल्यावर लक्षात आले की हा मसाला movie आहे पुलची जीवनगाथा नाही.

Unknown said...

अरेरे... फारच क्लेशदायक आहे हे. मराठी साहित्य आणि कला ही कुठल्या अधोगतीकडे वाटचाल करीत आहे हे यातून स्पष्ट होते. स्वस्त आणि सवंग प्रसिध्दीच्या मोहाने असे घडत असावे.