Wednesday, April 24, 2024

कावळा

पशुपक्ष्यांत ज्या काळी मन रमायचे त्या वेळी रमले नाही, आणि आता वेळ निघून गेली. माझ्या शहरी जीवनात पहिला पक्षी आला तो कावळा! माझे बालपण शहरात गेल्याचे मला दुःखही नाही, तसेच माझ्या पाचवीला कावळा पुजल्याचेही नाही. "कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा," अशी आम्हांला एक कविता असे. लहान मुलांच्या कवितेलाही त्या काळी कविताच म्हणत, बालगीत नव्हे. कावळा आम्ही रोजच पाहत होतो. पण सफेत बगळा मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच पाहिला. आमच्या बालपणी बगळे फारसे नसावेत. पक्षीसृष्टीचा पहिला प्रतिनिधी म्हणून बालजीवनात कावळा हा अतिसामान्य प्रतीचा पक्षी आल्यामुळे त्या एकूण त्याच काळात वैराग्य उत्पन्न झाले. ह्या पक्षाच्या सर्व लीला मी बारकाईने पाहिल्या आहेत. वास्तविक हा तसा अगदीच गरीब परिस्थितीतला. पण मुंबईच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'साला आखडू' आहे. पूर्वी कडक कॉलर नावाचा, पांढऱ्या- स्वच्छ कापडी बांधणीचा, एक लाकडी गळफास पैरणीला जोडीत. ती कडक कॉलर वापरणारी मुंबईकर मंडळी थेट कावळयासारख्या माना फिरवीत. ते पाहणे खटखटक चाले काळे डगले किंवा सूट आणि कावळे यांचे माझ्या मनात तेव्हापासून समीकरण बसले आहे.


कावळा हा काही पाळीव पक्षी नव्हे. पिंजऱ्यात घातलेला कावळा मी एकदाच पाहिला. लंडनच्या झू मध्ये. अगदी पोपटाच्या ऐटीत हा कावळा बसला होता. आपला हिंदी कावळा. पिंजऱ्याबाहेर नावाची पाटी होती 'इंडियन क्रो' अशी. एखाद्या अस्सल इंग्लिश कंपनीत गोऱ्या साहेबांच्या पंक्तीत एखादा डिसोझा बसतो तसा. लंडनमधले इतर हिंदी साहेब जसे एकमेकांना पाहून न पाहिल्यासारखे करतात, तसेच काहीसे मला पाहून ह्या कावळ्याने केल्याचे मला अंधुक स्मरते. वास्तविक इतर रंगीबेरंगी पक्ष्यांत त्यालाही स्वतंत्र पिंजऱ्याचा मान मिळालेला पाहून मलाही बरे वाटले होते. कारण कावळा हा पाळीव नसल्यामुळे त्याचे माझे काही भांडणच नाही. इतर पक्ष्यांच्या मानाने हा पक्षी कितीतरी समंजस दिसतो. त्या काव काव" ओरडण्याचा 'काव काव" एवढाच अर्थ असतो. माणसाची बोली बोलण्याचा आव नसतो. सहसा पक्ष्यांच्यात न आढळणारा एक चार पावसाळे पाहिल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर असतो. काकाकुव्याच्या चेहऱ्यावर रिटायर व्हायला आलेल्या हायकोर्ट जजाचे गांभीर्य असते. फार वेळ ह्या पक्ष्याकडे पाहत राहिले, की काही वेळाने जस्टिस काकाकुवा एकदम " ज्यूरीतील सभ्य गृहस्य हो, ” अशी सुरवात करील काय, अशी मला नेहमीच धास्ती वाटत आली आहे. चारपाच कावळे तीन तिडयावर रिंगण करून बसले, की म्हाताच्या वकिलांची मुरब्बी टोळी एखाया दिवंगत इंग्रज न्यायाधीशाविषयी एकमेकांना आख्यायिका सांगत बसल्यासारखी वाटते. कावळा मेल्यावर इतर कावळे शोकसभा घेतात, आणि दिवंगत काकासाहेबांनी आपल्या ज्ञातीच्या उन्नतीसाठी फार प्रयत्न केले, ह्या चालीवर गुणवर्णनपर करतात असेही मी ऐकले आहे. कावळ्यांची ही कौतुके मी काही प्रत्यक्ष पाहिलेली नाहीत.

कावळा खिडकीशी बोलू लागला तर पाहणा येतो, असा एक समय आहे. हे खरे असते, तर मुंबईत खोली- दीडखोलीच्या खुराड्यात राहणाऱ्या सगळ्यांनी एव्हाना पिंडाला शिवण्यापुरताही कावळा जिवंत ठेवला नसता. एके काळी तो निरोप वगैरे आणीत असावा. त्याशिवाय त्या " काऊचे सोन्याने मढविन पाऊ" म्हणणारे निघाले नसते. हिंदीतही कागाला संदेसवा देण्यासाठी धाडले आहे. पण आमच्या पाहण्यातले कावळे असले काहीही करताना आढळले नाहीत. त्यामुळे त्याचे आवर्जून कौतुक करावे असे ज्याप्रमाणे काही घडले नाही, त्याचप्रमाणे त्याला नाव ठेवावे असेही त्याने काही केले नाही. क्वचित म्हशीच्या पाठीवरून सहलीला निघालेला कावळा पाहून पक्ष्यांनाही उडण्याचा कंटाळा येतो असा बोध मी घेतला आहे. मात्र पाळीव नसूनही ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा बऱ्याचश्या आहेत असा हा एकच पक्षी. कारण पिंडाला शिवण्याशी त्याचा संबंध येतो. पिंड ठेवले. कावळा शिवला. आणि मंडळी परतली. इतक्या तीन सरळ वाक्यांत ते शेवटले कार्य आटोपलेले क्वचित ऐकायला मिळते.


आमच्या एका मित्राची आजी एकदा - आणि एकदाची वारली. आता तिच्या पिंडाला न शिवण्याचे कावळ्याला काहीच कारण नव्हते. चांगली नव्वद व्याण्णव वर्षे पाहून तिने डोळे मिटले होते. मंडळी बुचकळ्यात पडली. 'तुझ्या मुलाबाळांची काळजी घेऊ," म्हणावे, तर मुलगा म्हणायचा तोच बावीस वर्षे पोष्टातून पेन्शन खाऊन आणखी बावीस वर्षे खाण्याइतका टुणटुणीत. (असो बापडा !) लेकी, सुना, नातू, पणतू सगळे काही 'यथासांग होते. शेवटी कोणीतरी "आजीबाई, एक मोठी बरणी आणि चार कपबश्या आल्या, तरच तुमची शालजोडी देईन हो बोहारणीला," असे हात जोडून म्हटले, आणि पटकन कावळा शिवला. कावळा हा प्राणी कौटुंबिक गोष्टीत इतक्या बारकाईने लक्ष घालीत असेल याची कल्पना नव्हती मला एरवीचा हा अतिपरिचयामुळेअवज्ञेला पोहोचलेला पक्षी त्या विशिष्ट ठिकाणी इंगा दाखवून जातो. स्टैंडवर डझनभर टांगे उभे असल्या वेळी "साहेब, बसा की. आपला टांगा आहे. " म्हणणारा लाचार टांगेवाला, एकटाच असला, आणि डेकन क्विनचा टाइम भरत आलेला असला, म्हणजे जी बेफिकिरी दाखवितो ती, आणि ही जात एकच अडचणीत गाठल्यावर कोण कसा वागेल, सांगता येत नाही. दुपारची रणरणती वेळ, माणसे वैतागलेली, भटजीच्या पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांची काव काव ऐकू येत असते, अशा वेळी हा कावळा अडून बसतो. इथे त्याचा दोष नाही. एकेकाची वेळ असते.

- पाळीव प्राणी (पु. ल. देशपांडे)
पुस्तक - हसवणूक

संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.

0 प्रतिक्रिया: