Tuesday, December 3, 2019

पु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा

नमस्कार मंडळी. पु लंचं हे जन्मशताब्दी वर्ष. महाराष्ट्राचे लाडके दैवत पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त माझा ‘पु. लं. आणि दि टॉवर ऑफ बटाटा’ हा लेख 'सारस्वत चैतन्य'च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. जर कां 'बटाट्याच्या चाळी' चा पुनर्विकास (Redevelopment ) झाला तर ..... हा लेख मी माझ्या वाचकांना सादर करत आहे.

पु लं च्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली आणि ‘पुल’कित विनोदाचं लेण ल्यायलेली बटाट्याची चाळ म्हणजे मराठी मना मनाचा अमोल ठेवाच म्हणावा लागेल. पु लं च्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून पु लं आणि ‘दि टॉवर ऑफ बटाटा’ चे रेखाटन करायचा प्रयत्न केला आहे. पु लं परत आले तर..

हल्लीचे दिवस चाळींचे पुनर्विकास करण्याचे दिवस आहेत. चाळीचे टॉवर संस्कृतीत होणारे संक्रमण बटाट्याच्या चाळीच्या पात्रांना धरून रेखाटन करण्याचा प्रयत्न केला आहे - ती ही पु.लं. ची माफी मागून - )पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे - म्हणजे आपले पु लं - भाईंनी १८ वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावरून एक्झिट घेतली. परंतु त्यांच्या अमोघ साहित्याने मराठी मनामनावर अधिराज्य केले. असा मना मनावर राज्य करणारा अनभिषिक्त सम्राट एकमेवाव्दितीयच ! त्याच रसिकांचं प्रेम मनात घेऊन भाई २००० साली गेले खरे, परंतु त्यांच्या मनातून त्यांच्यावर प्रेम करणारे रसिक काही जाईनात !

एकदा तरी त्या रसिकांची भेट घेऊन यावं, असं पु .लं. ना मनापासून वाटू लागलं. शेवटी, चित्रगुप्तांकडे एक दिवसाच्या ‘कॅज्युअल लीव्ह’ चा अर्ज दिला, तोही घाबरतच, आणि ती रजा मंजूर झालेली पाहताच, पु. लं. च्या आनंदाला पारावार उरला नाही..... कधी एकदा पृथ्वीवर जातो आणि समस्त रसिकांना भेटतो, असं त्यांना झालं..... त्यांना त्यांचं घर, चाहते, नाट्यप्रेमी मंडळी - सारे सारे आठवू लागले आणि …. आणि त्यांच्या लेखणीतून साकारलेली अजरामर बटाट्याची चाळ ..... ते बाबूकाका, त्रिलोकेकर, अण्णा पावशे - पु. लं. ना त्यांच्या मानस पुत्रांची, बटाट्याच्या चाळीची अनिवार्य ओढ वाटू लागली. झालं …. नक्की ठरलं, यावेळी फक्त बटाट्याच्या चाळीलाच भेट द्यायची, असं त्यांनी मनाशी ठरवलं.

बटाट्याच्या चाळीचे, पूर्वीचे ते दिवस आठवत, पु. लं. बटाट्याच्या चाळीच्या गल्लीत शिरले. इतक्या वर्षांत गिरगावात बरेच बदल झालेले, त्यांच्या संवेदनशील मनाने लागलीच टिपले. पण दूरवर नजर टाकली तरी, ती भली थोरली बटाट्याची चाळ काही दृष्टीस पडेना..... गेली कुठे ? रस्ता-गल्ली चुकलो तर नाही नां ? याची पु.लं. नी खातरजमा करून घेतली. पण छे, ‘बाप आहे मी, कधी विसरेन कां ?’ असंही त्यांच्या मनात क्षणभर येऊन गेलं.

पु.ल.ची भीती खरी होती. बटाट्याच्या चाळीच्या जागी, गगनचुंबी प्रकारात मोडणारी टोलेजंग इमारत उभी होती. त्या इमारतीचे मजले मोजायचा पुलंना मोह झाला ! मान दुखेल की काय, या विचारांनी त्यांनी तो विचार दूर सारला. उगीचच, त्यांना श्यामच्या डोक्यावरून खाली पडलेल्या टोपीची आठवण झाली ! तेवढयात, त्यांचे लक्ष इमारतीच्या पाटीवर गेले. ‘दि टॉवर ऑफ बटाटा’ ! बटाटा नावापाशी ते काहीसे घुटमळले आणि गेट मधून आत जाऊ लागले. लागलीच वॉचमनने त्यांना हटकले, ‘किधर जाने का है ?’ असा प्रश्न भाईंना नवा होता. बटाट्याच्या चाळीत शिरायला काय, किंवा कुणाच्या घरात शिरायला काय - कधी कोणाच्या xxxची परवानगी घ्यावी लागत नसायची !

“इधर वो चाल … वो लंबाचौडा चाल था … वो किधर गया ?” पु.लं.नी तरी मनातली शंका विचारून घेतलीच.

तो उत्तर भाषिक वॉचमन बुचकळ्यात पडला. तरी, भाईंना समजावत म्हणाला, “नही, यहां कोई चालवा नही है. तुम का गलत फैमी हुई गवा, हम सात साल से इधर नौकरी कर रहा हूं “

भाईंचा चेहरा गोंधळला. आपण या चाळीचे जनक ....... चाळ जमीनदोस्त झाली की काय ?, या विचारानेही त्यांच्या पोटात कालवाकालव झाली. मग आपल्या मानसपुत्रांचं काय ? ते त्रिलोकेकर शेट, बाबूकाका, अण्णा पावशे ........ तरी भाईंना काही शांत बसवेना...... “इधर वो त्रिलोकेकर शेट रहते थे...... वो बाबूकाका ...... या तो वो अण्णा ....... अण्णा पावशे ?” भाईंनी एकेकांची नाव घ्यायला सुरुवात केली ...... वॉचमन तर काही ऐकायला तयार नव्हता. तो ही आपल्या भाषेत मोठमोठ्याने बडबडू लागला.

गेटवर काही बाचाबाची झालेली पाहून, तीन-चार पेन्शनर मंडळी तिथे जमा झाली. पैकी एकाने डोळ्यांवरचा चष्मा वर-खाली केला, गळ्यातल्या मफलरने नीट पुसला, पुन्हा पाहिले, “अरे ये तो साला भाई लगता है !”

बाकीची मंडळी ‘भाई’ ऐकताच पळायच्या तयारीत राहिले, तर ते “अरे भागतो कशाला रे ? तो बंदूक वाला भाई नाय..... आपला भाई..... चाल वाला भाई- पी. एल. रे - देशपांडे !”

तेव्हा कुठे त्यांचे पेन्शनर मित्र थांबले व डोळे बारीक करून ओळख पटते का ते पाहू लागले ..... भाईंना देखील आवाज ओळखीचा वाटू लागला...... त्रिलोकेकर शेट तर नव्हे नां ?, अशी शंका वाटू लागली. कारण त्यांनी रेखाटलेले त्यावेळचे त्रिलोकेकर शेट आणि आज त्यांच्या पुढ्यात उभे असलेले पात्र - यांत जमीन-अस्मानाचे अंतर होते - गळ्यात मफलर, नाकावर फॅशनेबल चश्मा, पायात ट्रॅक सूट, टी-शर्ट आणि स्पोर्ट शूज ! - असा जामानिमा होता. पण आवाज आणि बोलण्याची लकब मात्र चाळीतल्या त्रिलोकेकर शेटची होती !

“भाई, मी सोकाजी …. सोकाजी दादाजी त्रिलोकेकर - ओळखला नाय काय ?”, त्रिलोकेकर शेठनां पाहताच भाईंना प्रेमाचे भरते आले. वयोवृद्ध त्रिलोकेकर शेटनी भाईंचे पाय पकडले, त्यांना नमस्कार केला.

“अहो, असं काय करता त्रिलोकेकर शेठ ?,“ भाई काहीसे गहिवरले. “अरे, तुम्ही तर आमचा बाप !”, त्रिलोकेकर शेट.

भाईंचे डोळे विस्फारले…. “त्रिलोकेकर शेट, तुम्हाला जनक म्हणायचे आहे का ?”, भाईंनी त्यावेळीही त्रिलोकेकर शेटची चूक दुरुस्त केली.

त्रिलोकेकर शेट , “तेच नां ? बाप, फादर ..... तुमी म्हणते तो ..... जनक, एकच नां ?,” भाईंच्या चेहर्‍यावर हास्य पसरले. त्रिलोकेकर शेटनी बरोबरच्या पेन्शनर्सची ओळख करून दिली, “अरे भाई, हे लोक बघ ..... जुना बटाट्याची चाळ वाला ..... हा बाबूकाका - अरे खरे रे … हिस्ट्री वाला .......”, धोतर-सदरा, हातात काठी घेतलेले बाबू काका कान देऊन ऐकू लागले, “आं ?”

“अरे बाबूकाका, साला ते कान मंदी घालायचा मशिन तू खिशा मंदी कशाला ठेवते ? कान मंदी घाल नां !” भाईंकडे वळून म्हणाले, “अरे, आता ओल्ड झाल्यावर बाबूकाकाला कान मंदी काय पण ऐकू येत नाही.”

बाबूकाकांनी शर्ट-पँटीचे सगळे खिसे थरथरत्या हातांनी चाचपडले आणि कानांत यंत्र घातले. भाई त्यांच्या या मानस पुत्राचं वार्धक्य जवळून निरखीत होते. त्रिलोकेकर त्यांच्या कानाशी कुजबुजले, “आपला भाई हाय रे …. बटाटा चाल वाला.....”

ओळख पटताच बाबूकाकांना कोण आनंद झाला. प्रेमाचं भरतं आलं, त्यांनी भाईंना चक्क मिठीच मारली ! इतकी कडकडून मिठी मारली की, बाबूकाकांना अफजलखानाने शिवाजी महाराजांना मारलेली मिठी आठवली असावी ! “भाई, ...... इतका आनंद झाला की.......”, त्यांना शब्द फुटेना. भाईंनी त्यांच्या प्रेमळ मिठीतून कशीबशी सुटका करून घेतली !

“भाई, मी अष्टेकर - कुशाभाऊ अष्टेकर”, कुशाभाऊंनी स्वत:ची ओळख स्वतःच करून दिली. भाई बारीक डोळे करून, त्यांना न्याहाळू लागले. कुशाभाऊंमध्ये फारसा फरक पडलेला भाईंना काही जाणवला नाही. केस पिकले असावेत, पण कलप इतका बेमालूम पणे लावला होता की, कुठूनही रुपेरी छटा दृष्टीस पडत नव्हती आणि शरीराचाही फापटपसारा नव्हता. नाट्यभैरव म्हणून चाळीत कुशाभाऊ प्रसिद्ध होते. म्हणजे, त्याकाळी ते ‘स्वयंघोषित’ नाट्यभैरव होते ! गंधर्व नाट्य कंपनीत ते होते आचारी, पण रुबाब मात्र मुख्य नटाचा होता ! त्यानुसार त्यांनी स्वतःची शरीरयष्टी तशी प्रयत्नपूर्वक राखली असावी. न जाणो, कधीकाळी, नाटकात भूमिका मिळाली तर .....

कुशाभाऊ जेष्ठ नागरिकांत मोडत असले तरी, आपलं शारीरिक तारुण्य त्यांनी जपलं होतं. त्यांच्या चालण्या-बोलण्यात काहीसा चपळपणा होता. “भाई, आशीर्वाद असावा,” असं नाटकातलं वाक्य फ़ेकावं, तसं म्हणत, भाईंना त्यांनी वाकून नमस्कार केला. भाईंनाही गहिवरून आलं !

“आणि भाई, हेनला ओळखलं का ?” पुढच्या पेन्शनर कडे वळत त्रिलोकेकर शेटनी विचारले.

भाई आपल्या स्मृतीला ताण देऊ लागले. चेहऱ्यावरचे ते पूर्वीचे हसू मात्र तसेच ठेवले. बरेचदा हसून वेळ मारुन नेता येते, हे भाईंना अनुभवांने माहीत होते. त्यांच्या मनात आले, मी जनक असलो तरी, जन्मलेलं बाळ आणि बाळसं घेतलेलं बाळ, यात फरक असणारच नां ? त्यावेळची ती मध्यमवयीन व्यक्तिरेखा आणि आणि आत्ताची ही वृद्धापकाळाने थरथरणारी व्यक्ती - यांचा ताळमेळ जुळवणे भाईंनाही नक्कीच भारी होतं ! शाळेतल्या कुठल्यातरी कठीण प्रश्नाचे उत्तर गुरुजींनी विचारल्यावर, उत्तर येत नसेल तर, विद्यार्थ्याचा जसा चेहरा होतो, तसा बाईंचा झाला होता !

“अरे भाई ...... हा तर साला पावशा रे !”, त्रिलोकेकर भाईंच्या मदतीला धावून आले. म्हणजे कोडयातही तेच टाकत होते नि उत्तरही तेच देत होते ! भाईंनी स्मृतीला ताण दिला...... अण्णा पावशे ..... म्युनिसिपालिटीच्या पाणी खात्यात नोकरी ...... ज्योतिषाची आवड ......

“हां हां ....... अण्णा पावशे !”, भाईंनी त्यांना ओळखले.

अण्णा पावशे भाईंनी रेखाटलेले मध्यमवयीन गृहस्थ होते, आणि आणि आत्ताचे हे अण्णा, तोंडाचं बोळकं झालेले, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा लावलेले, कृश झालेले - आणि त्यांचा तो कृश देह सतत थरथरत होता......

“भाई, बघ रे , या पावशाचा काय झाला...... साला पार्किन्सन झाला ...... ओल्ड एज लई बॅड रे ..... लई बॅड..... सारखा थरथरतो ....... थरथरतो ! हात पाय थरथरतो. आमी लोक तेला सांभाळतो. जुना नेबर नां चालवाला ?, “

भाई आपल्या मानसपुत्राची ही अवस्था विषण्णपणे पहात होते.

“भाई,” म्हणत अण्णा पावशांनी भाईंवर स्वतःला झोकून दिले. भाईंना त्यांचा अचानक आलेला भार सोसवेना, त्यांचा तोल जाऊ लागला ..... बाकीची मंडळी त्यांना सावरायचा प्रयत्न करू लागली. त्यांचीही ही ताकद यथातथाच होती. पण प्रसंगावधान राखून ‘द टॉवर ऑफ बटाटा’ चा वॉचमन पुढे आला आणि त्याने ‘टेकू’ दिला ! त्यामुळे भाई आणि अण्णा जमिनीवर लोटांगण घेण्यापासून वाचले !

अजून किती म्हातार्‍यांना आपल्याला ‘टेकू’ द्यावा लागेल या विचाराने बहुदा, “अरे, आप लोग वो बेंच पे बैठो नां ? “ वॉचमन सूचना केली आणि ती सगळ्यांना पटली.

“हां हां … यू आर राईट,” म्हणत त्रिलोकेकर भाईंकडे वळले आणि म्हणाले, “चला भाई, तिकडे बेंच हाय ..... तेच्यावर बसू...... “, सगळी चमू ‘द टॉवर ऑफ बटाटा’ च्या बाकड्यावर जाऊन विसावली आणि शिळोप्याच्या निवांत गप्पांना रंग चढला !

“अरे, आपली चाळ कुठे गेली ?,” भाईंच्या मनात दुःख खदखदत होतं.

“चाळ पाडली,” अण्णा पावशे थरथरते हात हवेत उडवून ताडकन बोलले.

“चाळ ही वास्तू इतिहास जमा झाली,” बाबूकाकांमधील इतिहासाचार्य मधूनच डोके वर काढत होता.

“सात वरस झाली ...... सेवेन इयर्स ..... “, त्रिलोकेकर उंच टॉवर कडे बघत बोलले .

“म्हणजे आपली बटाट्याची चाळ मालकाने - तिवारीने विकली,” कुशाभाऊंना मध्येच थांबवत बाबूकाका म्हणाले,

“त्या चाळीचा मूळ मालक धुळा नामा बटाटे - क्रॉफर्ड मार्केटचा टोपल्याचा व्यापारी,” प्रत्येक वेळी इतिहासाचे दाखले देण्याची बाबूकाकांची सवय आजमितीही कायम होती, हे भाईंनी हेरले.

“तर, नंतरचा मालक - तिवारीने ती एका बिल्डरला विकली आणि या चाळीचे रि-डेव्हलपमेंट झाले,” कुशाभाऊ वर्तमानात होते, “आणि आणि हा ‘टॉवर ऑफ बटाटा’ त्या जागेवर उभा राहिला नां !”

“ते चाल.....डिमॉलिश केला नां ..... तेव्हा काय दुःख झाला रे ...... मी आणि बाबलीबाय - माय वाईफ रडला रे रडला,” त्रिलोकेकरांचा आवाज कातरला.

भाईंच्याही पोटात गलबललं. त्यांच्या डोळ्यासमोरून चाळ जमीनदोस्त होतानांची काल्पनिक दृष्य चलचित्रपटासारखी सरकू लागली. ...... चाळ उभारतानां ....... चाळीची निर्मिती करतानां, भाईंच्या लेखणीने अमाप कर्तृत्व दाखवले होते ! विनोद- हशांनी त्यावर इमले चढवले होते !

“अरे भाई, आमचा होल लाइफ त्या खोलीमंदी गेला नां !” त्रिलोकेकर त्याच दुःखात होते.

“भाई, आमच्या पण पोटात कालवाकालव झाली ..... कोकणातून येऊन इथेच - चाळीत राहिलो नां - चुलत्याच्या बिऱ्हाडांत ! चाळीशी एक प्रकारची जवळीक होती !”, अण्णा पावशे सुद्धा जुन्या स्मृतींमध्ये गेले.

“हया टोलेजंग - उंच इमारतीत चाळीचे रूपांतर झाले,” कुशाभाऊ भाईंना सगळी माहिती देत होते, “प्रत्येकाला एकेक खोली आधी चाळीत होती. आता प्रत्येकाला ७५० स्क्वेअर फूटचा ब्लॉक मिळाला !”

“हो का ?” भाई चकित झाले. आपल्या बटाट्याच्या चाळीची भविष्यकाळात अशी काही उन्नती होईल, अशी त्यांना निर्मितीच्या वेळी कल्पनाही नव्हती !

“एका खोलीत सात-आठ माणसं गुण्यागोविंदाने राहायचो, त्यावेळी !” अण्णा पावशे जुन्या दिवसात रमले होते.

“आता प्रत्येक ब्लॉक मध्ये तीन किंवा चार माणसं !”, कुशाभाऊ.

“पाचवा माणूस आला की, गर्दी होते आत्ताच्या काळात !,” बाबूकाकांनी मनातली मळमळ ओकून टाकली.

तोवर कुशाभाऊंनी मोबाईल वरून बाजूच्या चहावाल्याला फोन केला. बघता बघता, लहान थर्मास व कागदी ग्लास घेऊन, चहावाला पोऱ्या आला. त्याने सगळ्यांना चहा दिला.

“भाई, चहा घ्या, बाजूच्या हॉटेल मधला आहे,” कुशाभाऊ.

“ असं कां ?”, भाईंना हे नवीनच होतं.

“तर काय भाई, इथे सगळं आता फोनवरून होतं - चहा, दूध, फळे, भाज्या, धान्य, हॉटेलचं खाणं ...... फोन करायचा, ऑन-लाइन पेमेंट करायचे, घरात सगळे हजर ! खिशात पैसा असायची गरज नाही !”

“पण साला..... अकाउंट मंदी पैसा पाहिजे ना !,” त्रिलोकेकर शेटनी मध्येच जोक मारला. सगळे त्यावर खळखळून हसले.

“या फ्लॅट मंदी लय सुविधा हाय …. मस्त हाय. पण चाल मंदली मजा नाय,” त्रिलोकेकर चाळीला मिस करत होते.

“आता घराघरात नळ, त्याला धो धो पाणी,” अण्णा पावशे.

“ त्यामुळे नळावरची भांडण थांबली नां !,” बाबूकाका.

“ आपला तो रामा गडी - त्याची सून येते इथे काम करायला ! ओळखता येणार नाही - शर्ट पॅन्ट घालते,” अण्णांनी बातमी पुरवली.

‘आणि ते……. आपले एचच मंगेशराव गायक आणि त्यांच्या त्या सौ. वरदा बाई ..... नृत्य ...... “, भाईंना एकेकाची आठवण येत होती

“हो हो, ते गातात नां ...... गाणं कसं सोडतील एचच. मंगेशराव ?,” कुशाभाऊ.

“फक्त दरवाजे- खिडक्या बंद करून गातात ! त्यांच्या गाण्याने आमची झोपमोड होते, अशी तक्रार त्यांच्या शेजाऱ्यांनी केली म्हणे,” बाबूकाका.

“असं कां ?,” भाई.

“आणि त्यांच्या त्या सौ. ...... कंबर दुखते म्हणून, पट्टा दिलाय डॉक्टरांनी ! तो घालून डान्स करतात. पूर्वी नृत्य करायच्या, आता पाश्चात्य संगीतावर तो रोंबा सोंबा का काय तो नाच करतात,” अण्णा पावशे.

“पण दरवाजे- खिडक्या बंद करून …. !,” बाबुकाका.

सगळे मनमुराद हसले.

“नाही म्हणजे, आम्हाला त्यांची कला पाहायला मिळते, गणेशा फेस्टिवल मध्ये - कार्यक्रमात !”, कुशाभाऊ.

“भाई, पूर्वीची चाळीतली मजा, एकमेकांमध्ये असलेले प्रेम - जिव्हाळा आता या टॉवर संस्कृतीत राहिलेला नाही, हे मात्र खरं ! गणेशोत्सव आता दि गणेशा फेस्टिवल झाला आहे !”, बाबूकाका.

“तेचा काय आहे भाई, आफ्टर रि-डेव्हलपमेंट आमी लोकांनला बिल्डरने फ्लॅट दिला. बाकीचा फ्लॅट विकला - ते मारवाडी- गुजराती लोक नी बाय केला,” त्रिलोकेकर.

“त्यांच्याकडे पैसा हाय नां, त्यामुळे त्यांची संख्या आता जास्त आहे. गणेशोत्सव होतो पण, पूर्वीसारखा नाही, “ अण्णा पावशे.

“मराठी सांस्कृतिक वातावरण लयाला गेलं !,” बाबूकाका.

“साला ..... मिक्स कल्चर आला इकडे !,” त्रिलोकेकर.

भाई सारं काही ऐकत होते.

“जरा काय झाला की, फोन करतात. समदी कामं साला फोनवरून करतात,” त्रिलोकेकर.

“माणसा-माणसांमध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत, प्रेम - ओलावा आटलाय. कोणाच्या घरी जायचं तरी इंटरकॉमवरून ‘ येऊ का ?’ विचारतात. अपॉइंटमेंट घेतल्यासारखे”, बाबूकाका.

“श्रीमंती आली, गाड्या आल्या, कॉम्प्युटर आले. पूर्वीची मुलं खाली मैदानात खेळायला यायची, आता एक तर, शाळेत डाबून ठेवतात, नंतर शिकवण्याना घालतात. उरला वेळ, तर ती मुलं कॉम्प्युटरवर खेळतात. पूर्वीसारखं व्हरांड्यात खेळणे राहीलेलं नाही, “ अण्णा पावशे.

“भाई, खूप बदल झाले हो, बटाट्याची चाळ ते द टॉवर ऑफ बटाटा - हे संक्रमण अनुभवणे आणि टॉवरची संस्कृती पेलणं , आम्हाला जड झालं - किंबहुना जड जातंय अजूनही ! ते पचनी पडत नाही आहे, “ बाबूकाका ताशेरे मारण्यापेक्षा खूपच भावनिक झाले होते

भाईंनाही हे संक्रमण पेलवणं जड जात होतं. वारंवार त्यांचा कंठ दाटून येत होता. त्यापेक्षा आपण ..... परत आपल्या स्थानी गेलेलं बरं, असं त्यांना वाटू लागलं.

त्यांनी त्यांच्या मानसपुत्रांकडे निरोप घेण्याची गोष्ट काढतातच, ते चौघेही गलबलले.

“भाई, बटाट्याच्या चाळीने आम्हाला काय काय दिलं, ते शब्दातीत आहे ..... आम्हाला - आमच्या व्यक्तिरेखांना आपण अजरामर करून ठेवलंय !,” कुशाभाऊंचा वाक्यांमधून नाटक डोकावत असलं तरी, अंतर्मनातील भावना त्यांना लपवता येत नव्हत्या.

बाकीच्यांना भावनावेगाने शब्द फुटत नव्हते. भाईंचा वियोग त्यांना सहन करणं कठीण जात होतं.

एकटे कुशाभाऊ काय ते भावना व्यक्त करत होते, “भाई, आपल्या बटाट्याच्या चाळीने मराठी मनामनावर अधिराज्य केले आहे आणि आजही अजूनही ते कायम आहे ! जोवर, मराठी भाषा आणि संस्कृती या पृथ्वीतलावर अस्तित्वात राहील, तोवर भाई आपल्या ‘बटाट्याच्या चाळी’च्या पाऊलखुणा अजरामर राहतील, यात तीळमात्र शंका नाही !

भाईंनी डबडबलेल्या अश्रूंनी ‘दि टॉवर ऑफ बटाटा’ चा निरोप घेतला...... जड पावलांनी ते परतीच्या प्रवासाला निघाले ....................

नेत्रा श्रीपाद वैद्य

1 प्रतिक्रिया:

Anonymous said...

What awesome post. Now I Am Going to Bookmark Your Blog Page. Khatrimaza Website 2020: Latest Hollywood South Hindi Dubbed Bollywood full HD Movies Download for free

Thanks Keep Writing.