Friday, August 31, 2012

पु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही - रवी आमले

पुलं इतिहासजमा झाले आहेत काय, हा प्रश्न तसा संतापजनक आहे. पुलं म्हणजे मराठी संस्कृतीची समृद्ध साठवण आहे. आजच्या भाषेत सांगायचे, तर महाराष्ट्राचे 'आयकॉन' आहेत. मराठी रसिकतेचे मानिबदू आहेत. 1942 पासून आजतागायत मराठी वाचकांच्या काही पिढ्यांना त्यांच्या विनोदाने शहाणीव दिलेली आहे. अशा परिस्थितीत ते, म्हणजे त्यांचे लेखन इतिहासजमा झाले आहे काय, असे विचारणे कुणासही वाह्यातपणा वाटू शकतो. पण आज अनेक ठिकाणांहून, खासगी वाड्मयीन चर्चातून हा प्रश्न समोर येताना दिसतो. त्या प्रश्नाचा सोपा अर्थ एवढाच असतो, की पुलंचे साहित्य आजच्या, समाजातील मध्यमवर्ग नामशेष होऊ घातलेल्या काळात शिळे झाले आहे काय?

आता येथे सर्व प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जेव्हा आपण पुलंचे साहित्य म्हणतो तेव्हा आपल्या नजरेसमोर केवळ त्यांचे विनोदी लेखन तेवढेच असते. त्यात आपण राजा ओयदिपौसची रंगावृत्ती धरत नाही की काय वाट्टेल ते होईल वा एका कोळीयाने या कादंब-या पकडत नाही. पुलंनी निखळ विनोदाच्या पलीकडे जाऊन खूप लिहिलेले आहे. त्यांनी त्यांच्या मिश्किल खुमासदार शैलीत आपल्या गणगोतांची व्यक्तिचित्रे लिहिलेली आहेत. नाटके लिहिली आहेत. त्यांच्या भाषणांचे संग्रहही सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक प्रस्तावना गाजलेल्या आहेत. तर याबद्दल कुणाचे काही म्हणणे दिसत नाही. हे लेखन कालबाह्य झाले आहे असे काही कुणी म्हणत नाही. कालबाह्यतेचा आक्षेप येत आहे तो त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, असा मी असामी, मराठी वाड्मयचा गाळीव इतिहास, खोगीरभरती आदी पुस्तकांतील विनोदाबद्दल. आक्षेप घेणारांचे म्हणणे असे असते, की पुलंचे विनोद ज्या कालपटलाच्या व संस्कृतीच्या पाश्र्वभूमीवर घडत आहेत ती आज स्वाभाविकच उरलेली नाही. नव्या पिढीला तर तिच्या स्मृतीही नाहीत. 'त्यांनी तुम बीन मोरीत तोंड घातले' यातील विनोद समजायचा, तर या पिढीला घरातलीही मोरी माहिती नाही आणि गाण्यातलीही. तेव्हा त्या काळी ज्या विनोदाने लोकांना खळखळून हसविले, तो विनोद आज वायाच गेला.

पुलं लिहित होते, तो काळ येथे लक्षात घेतला पाहिजे. त्यांची गाजलेली बटाट्याची चाळ 1958 मधली आहे आणि व्यक्ती आणि वल्ली 1966 मधील. हा स्वतंत्र भारताच्या दृष्टीनेही संक्रमणाचा काळ होता. जुनी संस्कृती, जुन्या जाणीवा निखळून पडत तेथे नवीन काही आकाराला येत होते. धोंडो भिकाजी जोशी हा पुलंच्या असा मी असामीचा नायक. तो या काळातल्या मध्यमवर्गीयांचा प्रतिनिधी होता. पुलं लिहित होते, ते या मध्यमवर्गीयांसाठीच. मराठी वाचक हा निर्वविादपणे मध्यमवर्गीय असल्याचे विद्याधर पुंडलिक यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत पुलंनीच म्हणून ठेवलेले आहे. पुलं हे त्यांच्याच गोष्टी त्यांनाच सांगत होते. त्यात नव्या जगण्यातले भेलकांडलेपण होते, खुपसे स्मरणरंजन होते आणि लोक ते ऐकून खळखळून हसत होते. एकूण लोकशाहीच्या व्याख्येप्रमाणे मध्यमवर्गीयांचे मध्यमवर्गीयांसाठी मध्यमवर्गीयाकडून असेच पुलंच्या विनोदाचे स्वरूप होते. आणि ते छान निर्मल होते. हे येथे आवर्जून सांगायचे कारण म्हणजे, मध्यमवर्गीय या शब्दाकडे आपल्याकडे उगाचच साम्यवादी चष्म्यातून पाहण्याची रुढी पडलेली आहे. या मध्यमवर्गाची खास अशी पांढरपेशी संस्कृती होती. पुलंचे विनोद त्या संस्कृतीतले आहेत.

नव्वदच्या दशकात आलेल्या जागतिकीकरणाच्या वा-याने या संस्कृतीला जोरदार हादरा दिला. खुल्या अर्थव्यवस्थेने आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे तंत्रक्रांतीने समाजातील मध्यमवर्गावरच घाला घातला. आज समाजात तसा वर्गच राहिलेला नाही. त्या वर्गातल्या अनेकांच्या हाती भगवी रेशनकार्डे आली. बाकीच्यांना नवश्रीमंत हा वेगळाच दर्जा मिळाला. स्वाभाविकच त्यांच्या जगण्याच्या पद्धती आणि सांस्कृतिक प्राधान्यक्रम बदलले. मराठी माणसे मराठी (ललित) पुस्तके वाचत नाहीत, ही ओरड होण्याचे कारणही हेच आहे. या काळाच्या अपत्यांना पुलंचे मध्यमवर्गीय संस्कृतीतून, त्यांच्या जगण्याच्या त-हांमधून आलेले विनोद न समजणे स्वाभाविकच होते. त्या दृष्टीने, पुलंचे विनोद कालबाह्य झालेले आहेत, या आक्षेपात तथ्य आहे.
पण येथे मौज अशी आहे, की पुलंचे विनोद नव्या पिढीच्या डोक्यावरून जात आहेत, असे म्हणताना दुसरीकडे आजही पुस्तकांच्या दुकानांतून, ग्रंथप्रदर्शनांतून, ग्रंथालयांतून त्यांना मागणी असल्याचे चित्र आहे. त्याहून कडी म्हणजे आज पुलंचे नाव गुगल केल्यास एका निमिषात तेथे सव्वा लाख शोधनिकाल येतात. तेच नाव देवनागरीतून गुगल केल्यास साडेअठरा हजार संकेतस्थळे समोर येतात. इंटरनेटवर आज त्यांच्या नावाचे गुगल ग्रुप आहेत, फेसबुक ग्रुप आहेत, ब्लॉग्ज आहेत आणि संकेतस्थळेही आहेत. पिकासावेबवर त्यांच्या कोणा चाहत्याने त्यांची अनेक छायाचित्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. यूट्यूबवर त्यांच्या अनेक ध्वनीचित्रफिती आहेत. या सगळ्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. फेसबुकवरील पुलंच्या नावाचे एक पान तब्बल एक लाख 40 हजार 234 जणांनी 'लाईक' केले आहे. पुलं या ग्रुपचे 309 सदस्य आहेत, तर पुलं आनंदाच्या दाही दिशा नावाच्या एका ग्रुपमध्ये 268 जण आहेत. लक्षात घ्या, ही सगळी तरूण मंडळी आहे. त्यातल्या अनेकांची प्रोफाईल्स तपासून पाहिली, तर हेही लक्षात येईल, की पुलंचे लिखाण ऐन भरात असल्याच्या काळात त्यांचा जन्मही झाला नव्हता. पुलंच्या नजरेसमोर जो मध्यमवर्ग होता, त्याच्याशी या मुलांचे सांस्कृतिकदृष्ट्या कोणतेही नाते नाही. ती संस्कृती, ते संस्कार, त्या जाणीवा, ते विचार यांपासून ते खूप दूर आहेत. त्यातील काही जण तर मायभूमीपासूनही खूप अंतरावर आहेत आणि तरीही त्यांना पुलंचे साहित्य साद घालीत आहे. हे पाहिल्यावर आता येथे वेगळाच प्रश्न निर्माण झाला. या मोबाईल पिढीला पुलंचे साहित्य आवडते, त्यांचे किस्से, कोट्या, आख्यायिका हे सगळं हे तरूण 'एंजॉय' करतात आणि मराठीत हा एवढा मोठा साहित्यिक झाला याचा अभिमान बाळगतात याची कारणे काय असावीत?

याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे पुलंचे विनोद हे काही संता-बंताचे वा कॉमेडीच्या सर्कशीतील विनोद नाहीत. त्यांच्या विनोदीच नव्हे, तर सर्वच साहित्यात जगण्यावरील नितळ प्रेम, सत्य आणि शिवाची असोशी, असुंदराने संतापणारी सात्विकता यांचे नितांत छान रसायन आहे. त्यात कुठेही असभ्यपणा नाही, विध्वंसकता नाही. छान गाणे असावे तसा त्यांचा विनोद आहे. आणि त्याच्या तळाशी कुठल्याही संस्कृतीत, कोणत्याही काळात कालबाह्य न ठरणारी माणूसपण, सौंदर्य ही मूल्ये आहेत. त्यामुळे तो सहजच तत्कालिकतेच्या पलिकडे जातो. त्यातील संदर्भ कदाचित आजच्या पिढीला माहित नसतील, संकल्पना, वस्तू, माणसे अपरिचित असतील, पण त्याने त्यांचे काही बिघडताना दिसत नाही. विनोदाने आपणांस सेन्स ऑफ प्रपोर्शनची जाणीव दिली असे पुलंनी म्हटले आहे. आजच्या अस्थिर, प्रदुषित पर्यावरणात वावरणा-या तरुण पिढीला हीच जाणीव पुलंचा - जीवन पुरेपूर कळलेल्या माणासाचा - अभिजात विनोद देत असावा. असा विनोदकार इतिहासजमा होत नसतो.
- रवी आमले
रविवार, ६ नोव्हेंबर २०११
लोकसत्ता

Wednesday, August 1, 2012

॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥

१९६४-६५ च्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रावरील भाषणांचा कार्यक्रम मुंबईत विलेपार्ले येथे पु. ल. देशपांडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. पु. लं. नी बाबासाहेबांना लिहिलेले मानपत्र त्याप्रसंगी काढण्यात आलेल्या स्मरणिकेत प्रसिद्ध झाले होते. आज ती स्मरणिका उपलब्ध नाही. परंतु पु. लं. च्या हस्ताक्षरात सापडलेला हा कच्चा खर्डा पु. लं. चे मानसपुत्र दिनेश ठाकूर यांनी खास ‘लोकसत्ता’साठी उपलब्ध करून दिला.. आज नव्वदी पार करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या झपाटल्या व्यक्तिमत्त्वाचा हा ‘पुल’कित प्रत्यय..


श्री बलवन्त मोरेश्वर तथा बाबा पुरंदरे यांसी-
शिवराय मंडळाच्या समस्त सदस्यांचे आणि हितचिंतकांचे सादर प्रणाम.
आपणास मनापासून जी गोष्ट मानवत नाही, ती आज आम्ही करीत असल्याबद्दल प्रथम आपली क्षमा मागतों. आपल्या स्नेहाचा मान लाभलेले आम्ही आपले सवंगडी आहों. मानसन्मानापासून अलिप्त रहाण्याचा आपला स्वभावधर्म आम्हास ठाऊक आहे. आपला स्नेह हा जसा आमचा सन्मान आहे, तसाच त्या स्नेहापोटी आम्हाला आपल्यापाशीं कांहीं हट्ट धरण्याचा अधिकारही आहे. त्या अधिकारापोटींच आम्ही ह्य़ा मानपत्राचा स्वीकार करण्यास आपणास भाग पाडणार आहों.

‘शिवरायाचे आठवावे चरित्र। शिवरायाचा आठवावा प्रताप।’ ही ऊर्मी आपण आमच्या मनांत उत्पन्न केलीत. जिथे कोणी कोणाचा नाहीं ह्य़ा भावनेपरती दुसरी भावना निर्माण होत नाहीं अशा ह्य़ा अफाट मुंबई शहरांत आपण शिवरायाचे चरित्र आमच्यापुढें उलगडून दाखवलेत आणि आमची अंत:करणे एका अलौकिक आणि चैतन्यमय बंधनाने एकत्र आणलीत. कैलासापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या ह्य़ा अफाट देशाला आपण सारे एका नात्यानें, पावित्र्याच्या एकाच कल्पनेने बांधलेले लोक आहों.. ह्य़ा लोकांचे हिंदवी स्वराज्य असावे ही श्रीं ची इच्छा आहे.. हा एकतेचा पहिला पाठ देणाऱ्या श्री शिवरायाच्या चरित्राच्या वाचनानें आमच्या मनातली किल्मिषें दूर झाली. परकीयांच्या अमलाखालीं केवळ स्वरक्षणार्थ बाहेर पडणाऱ्या म्यानांतल्या तलवारीच गंजत नाहीत, तर मनेही गंजतात. प्रथम घासूनपुसून उजळावी लागतात ती मनं. मनं उजळली की मनगटं उफाळतात. साडेतीन हात उंचीच्या मावळ्यांची भेदरलेली मनं सह्य़ाद्रीच्या गगनचुंबी कडय़ाएवढी उंच आणि कणखर करणाऱ्या शिवरायांच्या चरित्राचे आपल्या तेजस्वी शैलीतले लेखन हा आजच्या निराशजनक वातावरणांत आम्हाला दिसलेला पहिला आशेचा किरण.

श्री शिवरायांच्या महान कार्याला प्रत्यक्ष प्रारंभ होण्यापूर्वीचा तो पारतंत्र्याचा काळ. आपल्याच शब्दांची उसनवारी करून सांगायचं म्हणजे- हुंदकादेखील मोठय़ाने द्यायचा नाहीं असली दुरवस्था. साऱ्या जनतेची अवस्था ‘कोठें जावे, काय करावें’ अशी व्हावी ह्य़ात नवल नव्हतं. पण आज तर आम्ही आमचे धनी आहों, तरीही मनाच्या तसल्याच अवस्थेंत जगण्याचा प्रसंग उभा रहावा ही अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट. सर्वत्र निराशा. सर्वत्र अपेक्षाभंग. सर्वत्र ध्येयहीनता. असल्या ह्य़ा काळांत आपल्या अभ्यासिकेतला दिवा मात्र रात्र उलटून गेली तरी जळत होता. भोवती महागाईची खाई पेटलेली. पण आपण पानात पडलेल्या चतकोराला पक्वान्न मानून शिवचरित्राच्या लेखनांत रंगला होता. जिथे जिथे श्री शिवरायाचे चरण उमटले, त्या त्या ठिकाणची यात्रा करीत होता. जिवाची तमा न बाळगतां गडकोट चढत होतां. शिवचरित्राच्या ध्यासात रानावनातल्या काटय़ाकुटय़ांची आपल्या पायदळी जणु मखमल होत होती. भीषण रात्री, पावसाळी वादळें, अंगी चिकटून रक्त शोषण करणाऱ्या जळवा यांची तमा न बाळगतां शिवकालातला एखादा शिलालेख, एखादा कागद, एखादी नोंद, एखादे नाणे, एखादं शिवकालीन शस्त्र.. नव्हे, जिथे ह्य़ा हिंदवी स्वराज्यासाठी देहाची चाळण केलेल्या शिलेदार बारगिराच्या रक्ताचा थेंब सांडला असेल तिथली माती भाळी लावण्यासाठी आयुष्याची थोडीथोडकी नव्हेत, तर वीस र्वष आपण एखाद्या परिव्राजकाच्या निष्ठेने हिंडत राहिलात.

बाबासाहेब,
असल्या ह्य़ा तपश्चर्येतून निर्माण झालेले आपले शिवचरित्र. मुळांतच ओजस्वी. हिऱ्यासारखे लखलखणारे. त्या हिऱ्याला आपल्या तप:पूत प्रतिभेचे अलौकिक कोंदण लाभलें. आपण स्वत: इतिहासकार न म्हणतां बखरकार म्हणवतां. विद्वान न म्हणवतां शाहीर म्हणवतां. पण इतिहास म्हणजे केवळ तपशिलांची जंत्री नव्हे. इतिहासानें देशाचे शील दाखवावे; केवळ तपशील नव्हे. शिवरायाच्या स्मरणानें आपल्या भावना उफाळून येतात. ज्यांची अंत:करणे पूर्वजांच्या उपकारांची कृतज्ञता स्मरतात, ती उफाळून येणारच. शिवचरणांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या कडय़ाकपाऱ्यांच्या दर्शनाने जी अंत:करणे उचंबळून येत नाहीत त्यांच्या दुर्भाग्याची त्या दगडी कडेकपाऱ्याही कींव करीत असतील. पण आपल्या भावनांना शास्त्रकाटय़ांची कसोटी लागलेली असते. निरुपणामागे खात्री-पुराव्यांचे आधार असतात. प्रतिभेचे वारू सत्यावरची मांड सोडून उधळत नाही. प्रतिभेला परिष्करणाची जोड आहे. प्रज्ञेची धगधगती ज्वाला आहे. आपण शिवरायाच्या ठिकाणी सश्रद्ध आहात; अंधश्रद्ध नाहीं. आणि म्हणूनच आजच्या युगातही आमच्या अंतकरणाला स्पर्श करून जाते तें शिवचरित्रातील अंतर्यामीचे तत्त्व. लढायांचा तपशील नव्हे.
ज्या राज्यात अन्यायाचा नि:पात होईल, पापी माणसाला शासन होईल, शीलाचा सन्मान होईल, चारी धामाच्या तीर्थयात्रा सुखरूप पार पडतील, ज्याचा जो देव असेल त्याची उपासना तो तो निर्वेधपणे पार पाडील, शेतातल्या धान्याला शत्रूचा धक्का लागणार नाही आणि माताभगिनींच्या हातची कंकणं अखंड किणकिणत राहतील, असल्या शांतितुष्टिपुष्टियुक्त राज्याचे स्वप्न शिवरायांनी पाहिले. आपल्या आचरणानें प्रत्यक्षात आणले. आपण तो सारा चरित्रपट आमच्या डोळ्यांपुढे उभा केलात. आमच्या गंजू पहाणाऱ्या मनांना मानाने जगण्याचा अर्थ शिवचरित्रातून उलगडून दाखवलात.
बाबासाहेब, त्या कृतज्ञतेची ही पावती आहे. मानपत्राची भाषा आम्ही जाणत नाहीं. छत्रपतींच्या मावळ्याइतक्याच रांगडय़ा बोलीशी परिचय असलेले आम्ही आपले स्नेही. आपले संकल्प थोर. त्या संकल्पाचा जगन्नाथाचा रथ एकटय़ानें ओढण्याचे आपले सामथ्र्य आम्ही जाणतो. पण त्या रथाच्या दोराला आम्ही हात घातला तो आमच्या पदरी चिमुकल्या पुण्याचा संचय व्हावा म्हणून. शिवचरित्राचे सहस्रावधी श्रोत्यांपुढे आपल्या ओजस्वी वाणीने निरुपण करून आपण लक्ष रुपये समाजकार्याला देण्याचा संकल्प पार पाडलात. आज भोवताली द्रव्यलालसेची आणि सत्तालालसेची हिडिस भुतें नाचत असताना, केवळ आर्थिक गरिबीचा वसा घेतलेल्या शिक्षकाच्या आपल्यासारख्या सुपुत्राने लक्ष रुपये मिळवण्याचा संकल्प करायच्या या काळात लक्ष रुपये मिळवून एका महान कार्याला ते ‘इदं न मम’ ह्य़ा भावनेने अर्पण करण्याचा संकल्प करून तो पुरा करावा, हा एक चमत्कार आहे. व्यवहारी जगात हे वेड ठरेल. पण व्यवहारी जगाला ही भाग्याची वेडं कळत नाहींत. आम्ही आमच्या दुबळ्या डोळ्यांनी आणि चिमुकल्या अंत:करणांनी आपला हा पराक्रम पाहून चकित झालों आहोत. अंतर्यामी समाधान एवढेच, की ह्य़ा कार्यात आपल्यासोबत चार पावलें चालण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
बाबासाहेब, हे महान कार्य करण्याची जिद्द आपणांत श्री शिवरायांच्या चरित्रामुळे निर्माण झाली हे तर खरेंच; परंतु आपल्या जीवनातल्या सहचारिणीचा- सौभाग्यवती निर्मलावहिनींचा गौरवपूर्वक उल्लेख केलाच पाहिजे. यज्ञकर्म हे यजमान आणि यजमानपत्नी दोघांनी जोडीने केले तर सफल होते. आपण मांडलेल्या शिवचरित्राच्या वाग्यज्ञातले आपल्या सहधर्मचारिणीचे स्थान फार मोठे आहे. आपला यज्ञ निर्वेध चालावा म्हणून विकल्प निर्माण करणाऱ्या कुठल्याही प्रसंगाची झळ आपणापर्यंत पोहोंचू न देण्याचे सौ. निर्मलावहिनींचे कार्य हे यज्ञातल्या संरक्षक देवतेसारखे आहे अशी आमची मनोमन धारणा आहे. म्हणून हे मानपत्री त्यांना आमचे लक्ष प्रणाम.

बाबासाहेब, महन्मंगल कुलस्वामिनी श्री जगदंबेच्या चरणी आमची शेवटी एकच प्रार्थना आहे कीं, आपणा उभयतांना आणि आपल्या सुकन्या-सुपुत्रांना उदंड यश आणि दीर्घायुरारोग्य लाभों. आपल्या महान कार्यात आम्ही सहाय्य तें कसले करणार? पण शिवचरित्राच्या कार्यविषयक चाकरी सांगावी, आम्ही इमानाने पार पाडू असे अभिवचन देतो. आम्हास साक्षात् रोहिडेश्वराची आण. सेवा करावया लावा। देवा हा योग्य चाकर.

लोकसत्ता 
रविवार , २९ जुलै २०१२

हा लेख ब्लॉगसाठी सुचविल्याबद्दल पिनाकीन गोडसे ह्यांचे आभार.