Saturday, January 20, 2024

अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना

शांता शेळकेंनी श्री. म. माटेंना एकदा विचारलं होतं 'माणसाचं आयुष्य किती?' माटेंचं उत्तर होतं, "माणूस मेल्यावर जितका काळ लोक त्याची आठवण काढतात तितकं...!"

या अर्थानं‌ अत्रे-पुलं ही जोडगोळी अमरच म्हणायला हवी ! ही नावंच मुळी मराठी मनांच्या सुगंधी कप्प्यात आदरानं विसावली आहेत. दोघांनीही साहित्याच्या सर्वच क्षेत्रात उच्च दर्जाची मुशाफिरी केली व रसिकजनास न्हाऊन काढलं!

एकदा नांदेडच्या नाट्यसंमेलनात आचार्य अत्रे आणि पुलं देशपांडे एकाच व्यासपीठावर ! मराठवाड्यातल्या रस्त्यांची तत्कालीन अवस्था दारूण अशी होती. रस्त्यावरचे खड्डे, प्रचंड धूळ यांमुळे अत्रे वैतागले होते. त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ टीका केली. कोडग्या राजकारण्यांची चामडी सोलणं काय असतं तेच श्रोत्यांनी अत्र्यांच्या वाग्बाण आणि वाक्ताडनातून जाणलं.

अत्रेंनी तोंडसुख घेऊन झालं आणि तत्पश्चात पुलं भाषणासाठी उभे राहिले व ते म्हणाले,
‘‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्या आचार्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ, छत्रपती शिवाजीमहाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्यांच्यातील माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे, असेच वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाड्यात अत्रेसाहेब आपण आहात.’’

टाळ्यांचा कडकडाट ! 

नियमावली किंवा आचारसंहित किंवा सभाशास्त्राचे सर्व नियम मोडून अत्रे उभे राहिले व पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे".अत्र्यांच्या नंतर अवघा महाराष्ट्र निरंतर हसवण्याचे काम पुलंनी चोख केले!

गुणि गुणं वेत्ति, न निर्गुणा
तेथे माझे जुळती
लेखक : अज्ञात
मूळ स्रोत
https://anandghare.wordpress.com/

0 प्रतिक्रिया: