Monday, August 9, 2021

वल्ली पुलंना आठवताना! - समीर जावळे

पुलंच्या कथांचं गारुड आजही कायम

“एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंथ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये? याला काही उत्तर नाही” असं वाक्य पुलंच्या रावसाहेब या कथेत आहे. हेच वाक्य अगदी त्यांच्याबाबतीतही तंतोतंत खरं आहे. कारण पुलंशी महाराष्ट्राशी जी नाळ जोडली गेली त्याप्रमाणात इतर अनेक दिग्गज लेखकांशी, साहित्यिकांशी ती जोडली गेली नाही. त्या साहित्यिकांचं साहित्य आणि साहित्यनिर्मितीतलं योगदान हे प्रचंड होतं. मात्र महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व हे विशेषण लागलं ते पुलंच्याच नावाच्या आधी. होय पुलंवर महाराष्ट्राचं कालही प्रेम होतं आणि आजही आहे आणि उद्याही राहिल. याचं कारण त्यांची खुमासदार शैली. गोष्ट सांगण्याची त्यांची शैली आजही आपल्याला गुंगवून ठेवते. त्याच्या कथा वाचून, ऐकून, नाटकं पाहून, चित्रपट पाहून, विचार ऐकून कैक पिढ्या घडल्या आहेत. यापुढेही घडतील.

‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातलीच काही उदाहरणं घ्या. नारायण लग्नात स्वयंसेवकगिरी करणाऱ्या माणसांचं निरीक्षण करुन पुलंनी ही कथा लिहिली. यातल्या नारायणाची शब्दांमधून भेट घडवून आणली. या कथेत पुलंनी काढलेली आवाज हेदेखील या कथेचं खास वैशिष्ट्य आहे. जी गोष्ट नारायणची तशीच अंतू बर्व्याचीही. ‘देवाने माणसाची एक निराळीच घडण केली आहे त्यांच्यामध्ये रत्नागिरीच्या लाल चिऱ्याचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट् म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकटवून आहेत. अंतू बर्वा याच मातीत उगवला आणि पिकला.’ अंतूशेठ कसे होते हे सांगत असतानाच पुलं त्यांचं यथार्थ वर्णन करतात. ‘आमची ही चाळीस वर्षांपूर्वी गेली तेव्हापासून दारचा हापूस मोहरला नाही.’ हे वाक्य ऐकताच अंगावर काटा येतो. ‘पहाटेच्या इवल्याश्या प्रकाशात त्यांचं ते खपाटीला गेलेलं पोट उगाचच माझ्या डोळ्यांवर आघात करुन गेलं’ वाक्य आलं की डोळ्यात आपोआप पाणी येतं. त्यांच्या विनोदाला कुठेतरी कारुण्याची झालर आपल्या डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या करुन जाते. हसता हसता डोळ्यातून पाणी काढण्याचं कौशल्य त्यांच्या ठायी होतं.

सखाराम गटणे, नामू परिट, नाथा कामत, हरितात्या ही पात्रंदेखील पु.ल. त्यांच्या बोलण्यातून अक्षरशः जिवंत करतात. त्यांच्या म्हैस या कथेत तर सगळ्या बसचं वर्णन आहे. मास्तर, ऑर्डरली, मधु मालुष्टे, ड्रायव्हर, कंडक्टर, बाबासाहेब मोरे, म्हशीचा मालक धर्मा मांडवकर ही सगळी पात्र पु.ल. फक्त शब्दांमधून उभी करतात. त्यांचं निरीक्षण कौशल्य आणि गोष्ट सांगण्याचं कसब इथे पणाला लागलंय.

पाळीव प्राणी ऐकताना, वाचतानाही त्यांचं निरीक्षण कौशल्य आणि ती कथा सांगण्याची विशिष्ट शैली आपल्याही नकळत आपल्यावर कथा सांगण्याचा एक संस्कार करुन जाते. ‘चार-पाच कावळे एकत्र बसले की म्हाताऱ्या वकिलांची एक मुरब्बी टोळीच बसली आहे असं मला वाटतं.’ ‘कबुतरांचं गळ्यात आवाज काढून बोलणं हे मुंबईच्या पारशी लोकांच्या बोलण्याशी मिळतंजुळतं असतं आणि काहीबाबतीत वागणं सुद्धा!’ कुसुकूला आवाज देणारे आजोबा हे सगळं आठवलं की हसू येतं. आजोबांचा विशिष्ट पद्धतीने काढलेला आवाज हादेखील दखल घेण्याजोगा.

‘बिगरी ते मॅट्रीक’मध्ये पु.ल. सांगतात, बिगर इयत्तेपासून ते मॅट्रीकपर्यंतचा माझ्या सगळ्या प्रवासाचं वर्णन हे खडतर असंच करता येईल. बालपण सुखात गेलं असं म्हणताना माझी जीभ चाचरते, दामले मास्तरांचं वर्णन करताना पु.ल. वर्गातल्या विद्यार्थ्यांबाबतही बोलत असतात. सगळा वर्ग त्यांच्या कथेतून आपल्या डोळ्यासमोर उभा करतात. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर पु.ल. कागदावर उमटवलेल्या ओळींमधून निर्माण झालेल्या पात्राशी आपली भेट घडवून आणतात. इतिहासात रमणारे हरितात्या, बाबा रे… तुझं जग वेगळं, माझं जग वेगळं म्हणणारा नाथा कामत, इस्त्रीला कपडे घेऊन गेला की हमखास घोळ घालणारा नामू परिट ही पात्रं आजही आपल्या आजूबाजूला फिरत आहेत का असं वाटतं याचं कारण आहे ते पुलंची आगळी वेगळी शैली. त्यांच्या कथा वाचताना ऐकताना त्यांच्या खास शैलीचं दर्शन होतं.

व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात जशी पुलंना भेटलेली माणसं त्यांनी आपल्या कल्पनेतून साकारली आणि त्यांचं वर्णन केलंय अगदी तसंच त्यांच्या आयुष्यात खरीखुरी आलेली जी माणसं होती त्यांचं वर्णन गणगोत या पुस्तकात आहे. रावसाहेब म्हणजेच बेळगावचे कृष्णराव हरीहर यांचं जे वर्णन पुलंनी केलं आहे त्याला तोड नाही.

मंगेश साखरदांडे, भाई, बटाट्याच्या चाळीचे मालक, पुरुषराज अळूरपांडे, कोट्यधीश पु.ल. अशा टोपण नावांनी पु.ल. ओळखले जातात. अघळपघळ, अपूर्वाई, असा मी असामी, आपुलकी, उरलंसुरलं, गोळाबेरीज, पूर्वरंग, अपूर्वाई, खिल्ली, हसवणूक, गाठोडं, एक शून्य आणि मी अशी कितीतरी पुस्तकं त्यांनी लिहिली.

अंमलदार, एक झुंज वाऱ्याशी, तुका म्हणे आता, ती फुलराणी, तीन पैशांचा तमाशा, सुंदर मी होणार, वटवट सावित्री ही नाटकंही लिहिली. पुढारी पाहिजे आणि वाऱ्यावरची वरात ही लोकनाट्यंही लिहिली. कुबेर, भाग्यरेषा, वंदे मातरम या चित्रपटांमधून अभिनय केला. मानाचे पान, मोठी माणसे, गोकुळचा राजा, नवरा बायको, पुढचं पाऊल, वर पाहिजे, दूधभात, संदेश, देवबाप्पा, गुळाचा गणपती या चित्रपटांसाठी कथा, पटकथा लेखनही केलं. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो गुळाचा गणपती या चित्रपटाचा. कारण या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत, दिग्दर्शन आणि अभिनय हे सारंकाही पुलंच्या नावे आहे. सबकुछ पु.ल. असलेला हा सिनेमा आजही रसिकांच्या स्मरणात आहे. ती फुलराणी या नाटकाचा विशेष उल्लेख करावा लागेल. कारण हे नाटक भक्ती बर्वे साकारत होत्या. यातली मंजुळा ही भूमिका भक्ती बर्वेंनी अजरामर केली. जॉर्ज बर्नॉड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचं हे मराठी रुपांतर होतं. भक्ती बर्वेनंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष यांनीही ही भूमिका साकारली. हेमांगी कवीनेही फुलराणी साकारली.

पुलंनी लिहिलेलं नाच रे मोरा आंब्याच्या वनात हे गीत आजच्या पिढीसाठीही बालगीत ठरलं. मोराचं इतकं सुंदर वर्णन या गीतामध्ये केलं आहे की ते गीत आजही सहज आपल्या ओठी येतं. उत्तम संगीत देखील ते देत. गाणं, नाटक, साहित्य, रेडिओ, दूरचित्रवाणी या सगळ्या क्षेत्रात ते लीलया वावरले. त्यांनी जिवंत केलेली बटाट्याची चाळही आजही आपल्या मनात एक घर करुन राहिली आहे.

असा मी असा मी हे त्यांचं नाटकही चांगलंच गाजलं. व्यक्ती आणि वल्ली या नाटकाचे प्रयोग करताना यामध्ये पुलंची भूमिका साकारली ती अतुल परचुरे या गुणी अभिनेत्याने. पुलंच्या समोर मला त्यांची भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलं अशी प्रतिक्रिया अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत दिली होती. पुलंकडूनही त्यांच्या कामाचं कौतुक झालं. निखिल रत्नपारखी, आनंद इंगळे, संजय मोने यांनीही पुलंच्या भूमिका साकारल्या. मात्र विशेष कौतुक झालं ते अतुल परचुरे यांचंच.

पुलंच्या हजरजबाबीपणाचे अनेक किस्सेही प्रसिद्ध आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की मी एक खेळिया आहे. मला हे असंच जगायला आवडतं. पुलंच्या पत्नी सुनिताबाई देशपांडे यांनीही त्यांना कायमच साथ दिली. आहे मनोहर तरी हे त्यांचं पुस्तक प्रचंड गाजलं. तसंच मण्यांची माळ, मनातलं आकाश, सोयरे सकळ या पुस्तकांचंही लेखन सुनिता देशपांडे यांनी केलं. त्या सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. पुलंच्या सुंदर मी होणार या नाटकात त्यांनी दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिकाही साकारली होती.

एक पोडियम आणि माईक, शेजारी टेबलवर भरुन ठेवलेलं तांब्या भांडं आणि त्या माईकवर आपली कथा सांगणारे पु.ल. हे चित्र अवघ्या महाराष्ट्राला परिचित झालं. कथाकथन हे महाराष्ट्राच्या मातीत रुजवलं ते पुलंनीच. स्टँड अप कॉमेडी हा प्रकार सध्याच्या काळात चांगलाच लोकप्रिय ठरतोय. मात्र त्याचे जनक हे पु.ल. आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. पानवाला, मी आणि माझा शत्रुपक्ष, म्हैस, पाळीव प्राणी, तुम्हाला कोण व्हायचं आहे मुंबईकर पुणेकर की नागपूरकर? या आणि अशा अनेक कथा त्यांनी नुसत्या सांगितल्या नाहीत तर त्यातल्या पात्रांशी आपली भेट घडवून आणली. शब्दांच्या या जादुगाराने निर्माण करुन ठेवल्या साहित्यकृतींंवर, नाट्यकृतींवर, संगीतावर आणि भाषणांवर महाराष्ट्राने अतोनात प्रेम केलंय करत राहिल. ते गेले त्याला आता वीस वर्षे झाली आहेत. मात्र आजही ते आपल्यातच आहेत असंच वाटतं ते त्यांच्या लिखाणामुळेच.

पु.ल. गेले ही बातमी आली तेव्हा आपल्या घरातलंच ज्येष्ठ माणूस गेलंय अशी भावना महाराष्ट्राच्या मनात होती. त्यांचं जाणं चटका लावून गेलं असलं तरीही त्यांनी जी निर्मिती करुन ठेवली आहे ती त्यांना अमर करुन गेली. शेवटी जाता जात त्यांच्याच रावसाहेब या कथेतलं शेवटलं वाक्या आठवतं.. देवाने आमची छोटीशी जीवनं समृद्ध करण्यासाठी दिलेल्या या देणग्या! न मागता दिल्या होत्या.. न सांगता परत नेल्या.

समीर जावळे 
sameer.jawale@indianexpress.com
लोकसत्ता 
१२ जून २०२०

0 प्रतिक्रिया: