Tuesday, December 7, 2010

'पुल'कित! - फादर फ्रान्सिस दिब्रिटो

मुंबईला गोरेगाव येथे पूर्वेला आरे रस्त्याला लागून असलेला संत पायस कॉलेजचा परिसर म्हणजे हिरव्या वनराजीने विनटलेले एक उपवनच. या ठिकाणी कॅथॉलिक ख्रिस्ती धर्मगुरूंना प्रशिक्षण देणारे केंद्र आहे. अभ्यासाचा एक भाग म्हणून दर वर्षी इंग्लिश नाटक सादर केले जात असे. मराठी भाषक प्रशिक्षणार्थींच्या प्रयत्नांमुळे मराठी नाटकही सादर होऊ लागले. एके वर्षी आम्ही विद्यार्थ्यांनी "डॉ. कैलास' हे नाटक बसविले होते. या नाटकाच्या प्रयोगासाठी प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना निमंत्रित करावे, असे ठरले. भाईंना मी अधूनमधून पत्रे लिहीत असे. त्यांच्याकडून न चुकता उत्तर येत असे. त्यांना बोलावण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती.

तेव्हा भाई सांताक्रुझला राहत असत. आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो. भाई आणि सुनीताबाई यांनी आमचे आनंदाने स्वागत केले. आमच्या अभ्यासक्रमाबद्दल आणि जीवनाबद्दल त्यांनी जिव्हाळ्याने माहिती विचारली. मराठी भाषेवरील आमच्या प्रेमामुळे ते भारावून गेले व त्यांनी आमचे आमंत्रण स्वीकारले. आम्हा साऱ्यांना आनंद झाला.

नाटकाला दोन दिवस असताना भाईंना फ्लूचा संसर्ग झाला. त्यांनी दूरध्वनीवरून तसे कळविले. आमच्या आवाजातील नाराजी त्यांना जाणवली.
""मी वसंत सबनीस यांना पाठवतो. तुम्ही चिंता करू नका,'' ते म्हणाले.
""तुमचा संदेश मिळाला तर रसिकांचे समाधान होईल,'' मी त्यांना सांगितले.
""तुम्ही उद्या सकाळी या. मी संदेश तयार ठेवतो. भाईंनी पानभर मराठी संदेश लिहून दिला. त्याची सुरवात त्यांनी इंग्लिशमधून केली. सलमीाचे वाक्‍य होते ः मॅन प्रपोजेस अँड गॉड इनडिसपोजेस!'

""मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी काय करावे?'' असा प्रश्‍न आम्ही त्यांना एकदा विचारला होता. तेव्हा ते मला म्हणाले होते, ""तुकोबांच्या अभंगगाथेची तुम्ही पारायणे करा. संतसाहित्यातील आध्यात्मिक परिभाषेचा तुम्ही परिचय करून घ्या.''
भाईंबरोबर माझा पत्रव्यवहार सुरू होता. त्यांनी एका लेखात तुकोबांचा एक अभंग उद्‌धृत केला होता. त्याच आठवड्यात तुकोबांच्या निवडक अभंगांचे पुस्तक मी वाचीत होतो. पुलंनी दिलेल्या अवतरणात शब्दांची रचना निराळी होती. मी धीर करून, भाईंना पत्राद्वारे तसे कळविले. त्यांनी तुकोबांच्या अभंगांच्या शासकीय प्रतीतून शहानिशा केली आणि मला पत्र पाठवून मनःपूर्वक आभार मानले. भाईंच्या मनाचा मोठेपणा पाहून मी संकोचून गेलो.
1972 च्या डिसेंबरमध्ये मी गुरुदीक्षा स्वीकारणार होतो. मी भाईंना त्यासाठी निमंत्रित केले होते. त्यांनी त्या विधीसाठी येण्याचे मान्यही केले होते; मात्र, त्यांना अचानक परदेशी जावे लागले. अमेरिकेतून त्यांनी मला, प्रार्थना करण्यासाठी जोडलेल्या हाताचे चित्र असलेले त्रिमिती कार्ड पाठविले व संदेश दिला ः "तुष्टिरस्तु, पुष्टिरस्तु. शांतिरस्तु!'

"तेजाची पाउले' या माझ्या, "अक्षर प्रकाशना'ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाची एक प्रत मी भाईंना भेट म्हणून पाठवली. भाईंचे सविस्तर उत्तर आले. भाईंच्या विचारसौंदर्याची एक झलक म्हणून त्यातील काही भाग उद्‌धृत करावासा वाटतो.

""तेजाची पाउले हा तुमचा लेखसंग्रह वाचून संपवला आणि "अन्नदाता सुखी भव' या चालीवर "ग्रंथदाता सुखी भव' म्हणत तुमचा ग्रंथ मिटला आणि हे पत्र लिहायला घेतले. वास्तविक गेली दोन-अडीच वर्षे मी कंपवाताच्या विकाराने, माटेमास्तरांच्या भाषेत सांगायचे म्हणजे, रकमेचा झालो आहे. हाता-पायांचीच नव्हे, तर सर्व शरीराची थरथर चालू असते. लेखन-वाचन, हिंडणे-फिरणे जवळजवळ बंद असल्यापैकी. मे महिन्यातल्या उकाड्यापेक्षा मनाचा उकाडा अधिक तापदायक वाटतो. मर्ढेकरांच्या कवितेतील "कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो । कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो।।' या ओळी सतत मनात घोळत असतात. देहाच्या आणि मनाच्या या असल्या अवस्थेत रखरखल्यासारख्या वातावरणात यात्रा चालू असताना तुमची "तेजाची पाउले' हे पुस्तक हाती आले आणि बोरकरांच्या कवितेतल्या सरींवर सरींमध्ये सचैल न्हाऊन निघाल्यासारखे वाटले...''
     
प्रकृती साथ देत नसतानाही थरथरत्या हातांनी लिहिलेल्या त्या अभिप्रायामुळे मी भारावून गेलो. तसल्या पत्राची अपेक्षा न केल्यामुळे आनंद शतपटींनी वाढला.

सन 1962 नंतर कॅथॉलिक चर्चमध्ये नवविचारांचे वारे वाहू लागले. चर्चचा दृष्टिकोन अधिक उदार झाला. चर्चला भक्तिगीतांची प्राचीन परंपरा आहे. मदर जी. एम. धाला या मुंबईतील संगीतप्रेमी विदुषीने चर्चमधील प्रार्थनेच्या वेळी वापरासाठी "वंदना' नावाचा भारतीय रागदारीतील भक्तिगीतांचा आगळा संग्रह तयार केला. त्यात बृहद्‌उपनिषदातील "असतो मा सद्‌गमय' या ऋचेपासून भा. रा. तांबे यांच्या अनंतस्तोत्रापर्यंतच्या अनेक रचनांचा समावेश आहे. त्याला भाईंनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तीत ते म्हणतात, ""...निरनिराळ्या धर्मांची किंवा प्रांतांतील किंवा देशांतील माणसे एकत्र येऊन प्रभू येशूची वाणी आणि ज्ञानोबा-तुकोबांची वाणी भारतीय संगीताच्या सुरांत गाऊ लागतील, तेव्हा त्यांना नवे जिव्हाळे लाभतील, नवे नातलग मिळतील. आपले हे माणसांचे कुटुंब फार मोठे आहे, याचा साक्षात्कार होईल. पूजेचा आनंद पूजा करीत राहण्यात असतो आणि पूजेचे फळ पूजाबुद्धी टिकून राहावी, यातच असते...''
"सुंदरतेच्या सुमनावरचे दंव चुंबुनि घ्यावे' हा भाईंच्या जीवनाचा ध्यास होता. जिथे जिथे त्यांना सौंदर्याचा साक्षात्कार झाला, तिथे तिथे त्यांनी त्याला मनमुराद दाद दिली. 1960 नंतर मराठी दलित साहित्याचा धगधगता आविष्कार होऊ लागला. हे सृजनाचे नवनवे कोंभ पाहून अनेक प्रस्थापितांना धक्के बसले. "अश्रूंचा आणि वेदनेचा व्यापार' अशी मुक्ताफळे काहींनी उधळली. भाईंनी मात्र "जो जे वांछील, तो ते लिहो' असे नवे पसायदान गाऊन मराठीला फुटणाऱ्या रसरशीत कोंभांचे मनःपूर्वक स्वागत केले.

भाई माणसांचे लोभी; परंतु, प्रकृतिअस्वास्थ्यामुळे भाईंच्या जनसंपर्काला मर्यादा आली. त्यांची भेट घेऊन आपली भक्ती व्यक्त करण्याची अनेक चाहत्यांची इच्छा होती; परंतु सुनीताताईंना कठोरतेने पाहुण्यांच्या वर्दळीला आवर घालावा लागला.

जून 2000 मध्ये कामानिमित्ताने पुण्याला गेलो होतो. भाईंना भेटण्याची अनिवार इच्छा मनात होती. भाईंना त्रास देण्याची इच्छा नव्हती. सुनीताताईंच्या संमतीने त्यांना फक्त दुरून नमस्कार करायचा होता. शिवाजीनगरमधील "777, रुपाली'च्या दरवाजावर आम्ही टक्‌ टक्‌ केली. गानू घरात होते. त्यांनी आमचे स्वागत केले आणि आम्हाला ते सरळ भाईंकडे घेऊन गेले. वळवाच्या पावसामुळे सर्वत्र सुखद गारवा पसरलेला होता. मृद्‌गंधामुळे आसमंत मंतरलेला होता. त्यापेक्षा भाईंचा सहवास अधिक सुखद वाटला.

भाई आरामखुर्चीत बसले होते. आम्ही त्यांना सविनय नमस्कार केला. भाईंनी प्रेमाने आमच्या अभिवादनाचा स्वीकार केला. त्यांचा चेहरा खुलला, फुलला. डोळे नक्षत्रांसारखे चमकले. त्यांची स्मित करण्याची ती आगळी ढब, ओठांचं विलग होणं आणि वृत्तीतील निर्व्याज खेळकरपणा यांचे मनमोकळे दर्शन झाले.
नेहमीच्या सरावाप्रमाणे भाईंना खूप खूप बोलावंसं वाटत होतं. आम्ही स्मृती जागवीत होतो. भाई हातवारे करून दाद देत होते. जवळजवळ अर्धा तास भाईंचा सहवास लाभला. पुष्कळसा वेळ मौनात; परंतु परमानंदात गेला...

सोळा कला ज्यांच्यावर प्रसन्न होत्या, ज्यांच्या परीसस्पर्शाने कलेची दालने पुलकित झाली, आपल्या विनोदाने ज्यांनी लाखोंना रिझविले आणि चिंतनशीलतेने विचारमग्न केले, अशा महाराष्ट्राच्या लाडक्‍या व्यक्तिमत्त्वाचा लाभलेला सहवास अविस्मरणीय होता. त्यांच्या मौनाची अवीट गोडी चाखण्याचे भाग्य आम्हाला लाभले होते. ता. 12 जून 2000 रोजी है मौन परमशांतीमध्ये कायमचे विलीन झाले!

फादर फ्रान्सिस दिब्रिटो
सकाळ
१४ नोव्हेंबर २०१०

0 प्रतिक्रिया: