Tuesday, December 14, 2010

पुलंची खडूस बायको

सुनीताबाई ग्रेट होत्या. त्यांनी आयुष्यभर वाईटपणा घेण्याचं धाडस केलं. चांगुलपणा सोपा असतो. तो बाजूला ठेवून जाणूनबुजून वाईटपणा घ्यायला, मोठं धाडस लागतं. पुलंच्या अंगभूत चांगुलपणाला बाईंच्या ‘खडूस’पणाचं संरक्षक कवच लाभलं म्हणून महाराष्ट्राचं ते अक्षरधन सुरक्षित राहिलं.

कोणी काही म्हणो, जनसामान्यांमध्ये सुनीताबाईंची प्रतिमा ‘पुलंची खडूस बायको’ अशीच होती.

सुजाण साहित्यरसिकांना सुनीताबाई या संवेदनशील लेखिका आणि उच्च अभिरुचीच्या आस्वादक म्हणून ठाऊक आहेत. पण, अशांची संख्या किती? पुलंसारख्या अष्टपैलू खेळियाचा चाहता असायला वाचक असण्याचीही गरज नव्हती. त्यांना ऐकणं-पाहणं पुरेसं होतं. साहजिकच त्यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा. त्यांच्या तुलनेत सुनीताबाईंचं लेखन आस्वादण्यासाठी आवश्यक प्रगल्भ, उच्च साहित्यिक अभिरुची लाभलेल्या रसिकांची संख्या किती असेल? त्यातही सुनीताबाईंचं सर्वात गाजलेलं पुस्तक होतं ‘आहे मनोहर तरी’. ते गाजलं ते त्यातल्या वादग्रस्ततेमुळे. ‘पुलंच्या बायको’ने जाहीरपणे पुलंची उणीदुणी काढली आहेत, याची मनुष्यसुलभ पण साहित्यिक निकषांवर कमअस्सल उत्सुकता त्यामागे होती. या पुस्तकाच्या ‘यशा’ने सुनीताबाईंच्या, तोवर एका उच्च वर्तुळात आणि सांगोवांगीत असलेल्या, ‘खडूस’पणावर शिक्कामोर्तब झालं..
..बाईंची पहिली भेट हा सगळा गदारोळ होण्याच्या आणि सुनीताबाईंची स्वतंत्र ओळख समजण्याच्या आधी झाली. एकोणीसशे त्र्याऐंशीच्या उन्हाळ्यात दोन शाळकरी मुलांनी ‘१, रूपाली’ची बेल वाजवली, तेव्हा सेफ्टी डोअरच्या आतलं दार उघडलं गेलं. समोर बाई. गो-यापान. त्रासिक मुद्रा.

‘पु. ल. आजोबा आहेत का? त्यांना शाळेत नाट्यशिबिराच्या उद्घाटनाला बोलावायचंय.’

‘बाळांनो, ते आराम करताहेत. त्यांना बरं नाहीये. ते तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकतील असं वाटत नाही.’

बाई ‘बाळांनो’ असं म्हणाल्या, पण त्यात ‘माया’ जाणवली नाही.

तेवढ्यात आतून हाक.. ‘सुनीता, येऊ दे त्यांना आत.’

आत पु. ल. सोफ्यावर गुडघे दाबत बसलेले. त्यांनीही ‘नकार’च दिला, पण कसा, तर त्यांच्या मिष्कील शैलीत हसत हसत म्हणाले, ‘तू घेणार आहेस का शिबीर. दहावीत गेलायस का? अरे वा! आमचा भय्या वैद्यही मुलांना काय काय उपक्रम करायला लावतो. मला आवडलं असतं रे यायला. पण, माझे ना गुडघे खूप दुखतायत. डॉक्टरनी मनाई केलीये कुठे जायला. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला.’

आम्ही खूष. तेव्हा वाटलं, पु. ल. किती चांगले आहेत आणि बाई काय खडूस आहेत.. आता असं वाटतं, बाईंनी उगाच वाईटपणा घेतला. पण, त्यांच्या जागी त्या बरोबर होत्या. पुलंचा सांभाळ करणं, ही त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेली जबाबदारी होती. ती त्या ११० टक्के पार पाडत होत्या. आमची कोवळी मनं वगैरे सांभाळण्याचं काही कारण नव्हतं.

पुढे ‘आहे मनोहर तरी’वरचा गदारोळ वाचून- प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याच्या आधी- बाईंची हीच इमेज पक्की झाली. बाई स्वत:ला समजतात कोण? पु. ल. आहेत म्हणून त्या आहेत, त्यांची जी काही ओळख असेल समाजात, ती ‘पुलंची बायको’ म्हणून आहे. एवढ्या मोठ्या ‘पदा’साठी बाईंना जरासे पु.ल. सहन करावे लागले असतील, तर त्यात एवढा काय त्रागा करायचा? इतर नवरे- ते पु. ल. नसताना- यापेक्षा किती वाईट वागतात. या गदारोळावर पु. ल. गप्प राहिले. त्यांनी सुनीताबाईंचं कौतुक केलं.

लोकांच्या मनात पु. ल. मोठे झाले. बाईंना मोठं मानणारे तेव्हा फारच थोड्या संख्येने असतील.
यानंतर बाईंशी पुन्हा भेट झाली ती ‘मित्रहो’, ‘रसिकहो’, ‘श्रोतेहो’ या पुलंच्या भाषणांच्या संग्रहांच्या निमित्ताने. ही भाषणं कॅसेटवर रेकॉर्डेड होती. ती ऐकून त्यांची मुद्रणप्रत तयार करण्याचं काम आलं. पुलंच्या कामाला नकार देणं शक्यच नव्हतं. या कामात तर पुलंशी थेट भेट होण्याचा बोनस होता. (फक्त बोनसच मिळाला ते सोडा.) एव्हाना पु. ल. थकले होते. पावलाला पाऊल जोडून चालण्याची कसरत त्यांना करावी लागे. साहजिकच सगळं ठरवलं ते बाईंनीच. ‘या कॅसेट आम्ही तुम्हाला देणार नाही. त्यांची कॉपी होऊ शकते. वॉकमन घेऊन आलात, तर कॅसेट देईन. तुम्ही इथेच बसून मुद्रणप्रत तयार करायची,’ त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
‘किती वाजता येऊ?’

‘आम्ही सहाला उठतो. साडेसहानंतर कधीही या. लवकर आलात तर चांगलं. सात वाजता या.’

सकाळी सात वाजता कपभर चहा घेऊन कामाला सुरुवात. बाहेर हॉलमध्ये काम सुरू होतं. पु. ल.-बाई आत. आठ-साडेआठला बाईंनी सांगितलं, ‘नाश्ता करायला या.’

नाश्त्याला पोहे होते. या दोघांशी ‘गप्पा’ काय मारणार? ते केवढे मोठ्ठे, आपण किती लहान, अशा विचाराचा दबाव. पण, तरीही वर्तमानपत्र, त्यातलं काम, संपादकांची मैत्री वगैरे बोलणं होत राहिलं. भीड चेपल्यावर ‘पोहे छान झाले आहेत’ अशी दाद दिली, तर बाई म्हणाल्या, ‘शेजारच्या जोशी हॉस्पिटलच्या कँटीनमधून आलेले आहेत. आमचा नाश्ता तिथूनच येतो. माझे हात काही आजारामुळे थरथरतात. साधं पातेलंही नीट पकडता येत नाही. स्वयंपाक कुठून करणार? दुपारचा डबा एकीकडून येतो, रात्रीचं जेवण दुसरीकडून.’

हे सगळं सांगताना बाई मॅटर ऑफ फॅक्ट बोलत होत्या. कुठेही ‘पाहा पुलंसारख्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची अवस्था. म्हातारपणाचे भोग’ वगैरे करवादेपणाचा लवलेशही नाही.

नंतर पुन्हा मुद्रणप्रतकार हॉलमध्ये, कोचावर आणि कथानायक-नायिका आतल्या खोलीत. नंतर लक्षात आलं की मुद्रणप्रतकाराला त्याचं काम नीट करता यावं, त्याला डिस्टर्बन्स होऊ नये, म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. एकदा- बाईंचा डोळा चुकवून आल्यासारखे- पु. ल. हॉलमध्ये आले. एका खुर्चीत बसले. हातात पुस्तक. पण लक्ष पुस्तकाबाहेर. मुद्रणप्रत तयार करण्याच्या कामाकडे.

‘स्पीड चांगला आहे हो तुमचा.’

हे आइसब्रेकिंग.

‘हे कामच आहे माझं.’

‘बरं आहे का भाषण? जमलंय का नीट?’

‘छान आहे.’

तेवढ्यात बाई बाहेर आल्या. पुलंनी पुस्तकात डोकं घातलं. त्या शांतपणे म्हणाल्या, ‘भाई, त्यांना डिस्टर्ब करू नकोस. ते आपल्यासाठी काम करतायत.’

काही वेळ शहाण्या मुलासारखं पुस्तक वाचून पु. ल. पुन्हा आत.

एके दिवशी ‘सुयोग’ची मंडळी नाटकांचं मानधन घेऊन आली. हा तर पैशांचा व्यवहार. पण, बाईंनी त्यांना सांगितलं, ‘ते भाईंच्या पुस्तकाचं काम करतायत. फार कॉन्सन्ट्रेशनचं काम आहे. त्यांना डिस्टर्ब करायला नको. आपण आत बसू.’

त्यांचा पुढचा व्यवहार डायनिंग टेबलावर झाला.

बाईंचा हा ‘खडूस’पणा असेल, तर तो ग्रेट होता. पुलंच्या कामाची आणि ते करणा-याची किती काळजी! पुलंनी लिहिलेला शब्द न् शब्द बाईंनी जपून ठेवला होता. तो जादूचा पेटाराही एकदा पाहायला मिळाला.

नंतर कधीतरी मुंबईच्या फेरीत त्यांनी आठवणीने एनसीपीएवर मासे जेवायला बोलावून घेतलं. आमच्या ‘१, रूपाली’मधल्या नाश्त्याच्या चर्चामध्ये कधीतरी माशांचा विषय झाला होता. ‘आईच्या हातचे मासे खिलवतो’, असंही बोलून गेलो होतो. तो योग आला नाही. पण, हे लक्षात ठेवून, काम संपून बराच काळ लोटलेला असताना बाईंनी आठवणीनं मासे खायला बोलावून घेतलं होतं.

बाई खडूस होत्या?

असतील. पु. ल. गेले, त्याची आदली संपूर्ण रात्र आम्ही काही पत्रकार पुण्यात ‘प्रयाग हॉस्पिटल’समोरच्या फुटपाथवर मुक्काम टाकून होतो. कोणत्याही क्षणी ‘दिनेश’ येईल आणि तो आल्यावर ‘निधन’ जाहीर होईल, सरकारी इतमाम टाळण्यासाठी बाई कदाचित पहाटेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतील, अशी भीती होती. त्यामुळे, सगळे रात्रभर ‘पहा-या’वर. मध्यरात्रीच्या सुमारास तिथे आलेल्या जब्बार पटेलांनी विचारलं, ‘पुलंना पाहिलंस का? चल दाखवतो.’ मागच्या खिडकीतून अचेतनाच्या सीमारेषेवर शांतपणे पहुडलेले पु. ल. दिसले. दार उघडून बाई बाहेर आल्या. त्या कोणाला ओळखण्याच्या स्थितीत नव्हत्या. ओळख दिली नाही. त्या अगदी शांतपणे, स्थितप्रज्ञतेने, जणू तिथे आपला जन्माचा जोडीदार मृत्युशय्येवर पडलेला नाहीच, अशा रीतीने बोलत होत्या.

त्या इतक्या कोरड्याठाक होत्या का?

तसं असतं, तर पुलंच्या जयंतीच्या एक दिवस आधी बाई कशा गेल्या? हा निव्वळ योगायोग?

बाई ग्रेट होत्या. त्यांनी आयुष्यभर वाईटपणा घेण्याचं धाडस केलं.
चांगुलपणा सोपा असतो. तो अंगभूत असतो. तो बाजूला ठेवून जाणूनबुजून वाईटपणा घ्यायला, मोठं धाडस लागतं. पुलंच्या अंगभूत चांगुलपणाला बाईंच्या ‘खडूस’पणाचं संरक्षक कवच लाभलं म्हणून महाराष्ट्राचं ते अक्षरधन सुरक्षित राहिलं. ‘खडूस बायको’विना पु. ल. अपूर्ण होते..
..खडूस बायको मात्र संपूर्ण होती.

- मुकेश माचकर
१५ नोव्हेंबर २००९
प्रहार

13 प्रतिक्रिया:

Anand Kale said...

मस्तच... आवडलं....
"आहे मनोहर तरी" वाचायला घेतोय...

Anonymous said...

इतकं हृदयस्पर्शी लिहील्याबद्दल मुकेश माचकरांचे आणि लेख इथे देण्यासाठी दिपकचे अनेक आभार!

Shasha said...

'त्या अगदी शांतपणे, स्थितप्रज्ञतेने, जणू तिथे आपला जन्माचा जोडीदार मृत्युशय्येवर पडलेला नाहीच'
नुसत्या या ओळी वाचल्या तरी आमच्या सारख्यांच्या आतड्याला पीळ पडतो. पण अशा कठीण-प्रसंगी सुद्धा स्वतः 'न डगमगता', आहे त्या परिस्थितीचा स्विकार करणे म्हणजे निव्वळ असामान्य बाब. अशी स्थितप्रज्ञता आयुष्यभराच्या साधनेनंतरच प्राप्त होऊ शकेल.
अशा या सुनितबाईना त्रिवार सलाम...!!!

Serendipity said...

अप्रतिम!
सुनीताबाईंचं स्वायत्त व्यक्तिमत्त्व खोलात जाऊन जाणून घेणं तसं अवघडच काम.
’आहे मनोहर तरी’ आणि ’प्रिय जी.ए.’ मध्ये त्यांच्या धारदार बुद्धीचा प्रत्यय आलाच होता.या लेखाच्या निमित्ताने ते जुळून आलं किंबहुना थोडाफ़ार प्रयत्न करता आला.
इतक्या सुंदर लेखाबद्दल खरंच आभार!

**** said...

पण हे देहारदार बुधीमत्ता लाभलेलं व्यक्तिमत्त्त्व, पु.लं. चं संरक्षक कवच होण्यापलिकडे अजूनही खोप काही होऊ शकलं असतं, या समाजाला खूप काहे देऊ शकलं असतं, स्वत:च्या गुणांचा यापोक्षा अधिक आनंद घेऊ शकलं असतं. ते सारं राहून गेलं घडायचं. खूप खूप वाइट वाटतं. त्या बाईमाणूस म्हणऊन नको होत्या जन्मायला, निदान या समाजात तरी.

अपर्णा said...

दीपक काटा आला रे वाचून....कुठून मिळवतोस असे लेख...इतके दिवस माझ्याही मनात ती खडूस प्रतिमाच होती...बर झालं हा लेख वाचला ते...
तुला अनेक शुभेच्छा..

Smit Gade said...

Thanks a lot for the article Deepak

सिद्धार्थ said...

सध्या "आहे मनोहर तरी"चे वाचन सुरू झालेय आणि त्याच वेळी सुनीताबाईंबद्दलचा तुमचा हा लेख देखील वाचनात आला. खूपच प्रॅक्टिकल आणि अतिशय व्यवहारी होत्या त्या.

धनंजय गोखले said...

फार सुंदर लेख आहे हा? अप्रतिम

Unknown said...

Me PL chi 1 bhakta te gelya nantar chya 8 nov la me Malti Madhav la gele Sunita Aji eaktich hoti.....chan gappa zalya mag nantar barecda tyana ph karat ase....aamcha 1 niyam hota olakh sangayachi nahi mhanje Sunita aji mhanali ki tichya lakshat rahat nahi.Me tila ph karit ase aani amhi vegveglya vishyawr gappa marit asoo....charli chapin la pratkshya pahilela prasaang tini mala sangitla.....khoop chan anubhav

Unknown said...

JABARADASTTTTTTT

pradeep said...

वाह

Unknown said...

वाह! सुंदर लेख..