काही वर्षांपूर्वी भारतात माझ्या ऑफिसमधील एक सहकारी मैत्रीण पु.लं.च्या 'व्यक्ती आणि वल्ली'चा नवीन संचातील प्रयोग बघून आली होती. मी अत्यंत उत्सुकतेने तिला त्याबद्दल विचारलं तर म्हणाली की मूळ पुस्तक सुरेखच आहे, आताच्या या प्रयोगातील कामंही छानच आहेत, पण आता सगळे संदर्भ बदलले आहेत Enjoy नाही करता येत. माझ्या डोळ्यांसमोर 'व्यक्ती आणि वल्ली' मधले बबडू, चितळे मास्तर, नाथा कामत, सखाराम गटणे तरळायला लागले.
'बबडू' मधील 'स्कालर' पावसामुळे भिजून कागदी पिशवीतील साखर विरघळल्याबद्दल चिंता करतो. आणि आज कागदाऐवजी प्लास्टिकच्या पिशव्या आल्या आहेत. एवढाच संदर्भ बदलला आहे. ह्याच प्लास्टिकच्या पिशवीला भोक पडलं आणि एखाद्या मध्यमवर्गीय गृहिणीची साखर रस्त्यावर सांडून फुकट गेली तर त्या मनाला वाटणारी हळहळ तीच आहे !
'मास्तरांच्या बायकोच्या गळ्यात नाही पण डोळ्यांत मोती पडले आहेत' असे स्वत:च्या पत्नीच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगणारे चितळे मास्तर आठवले. आजही भारतातील खेड्यांमध्ये, गावांमध्ये असे कित्येक चितळे मास्तर आहेत की ज्यांनी घडवलेले विदयार्थी समाजाला आणि देशाला भूषण ठरतात, पण स्वत: गुरुला मात्र आपल्या कुटुंबासाठी आभूषणच काय, पण प्राथमिक गरजादेखील पुरवणं सोपं नसतं.
आजही शिवाजी पार्कच्या मैदानाला एक फेरी मारली की आपली मान ३६० अंशांत फिरवणारे कितीतरी नाथा कामत दिसतील !
माझ्या बहिणीचा मुलगा ओम (वय वर्षे ७) वयाच्या मानाने खूपच पुस्तकं वाचतो. साधी 'खूप भूक लागलीय' हे सांगायलादेखील तो "I'm Ravernously hungry" असे अवजड शब्द वापरतो. त्यामुळे आम्हा दोघींना पु.लं.चा तोंडी छापील भाषा वापरणारा सखाराम गटणे आठवतो. इथे फक्त साने गुरुजी, मालतीबाई दांडेकर यांसारख्या लरेखक-लेखिकांची जागा जे. के. रोलिंगने घेतलीय. बाकी कुठे बदलले आहेत हो संदर्भ ?
मी आणि माझी बहीण आम्ही दोघीजणी आपापल्या प्रत्येकी दोन मुलांना घेऊन अमेरिकेत न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डी.सी. व ओर॒लँडो, फ्लोरिडामधील डिस्नेवर्ल्डच्या टूरवर गेलो होतो. परदेशातसुध्दा प्रत्येक ठिकाणी पु.लं.च्या पुस्तकातील संदर्भ प्रकट होऊन आम्हाला हसवत होते.
वॉशिंग्टन डी.सी.ला आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो तेथे नाश्त्याच्या रुमचे नाव होते 'आयसेनहावर रुम'. माझ्या चार वर्ष वयाच्या मुलीला ते नाव उच्चारणं जरा कठीण गेलं. पण माझ्या मनात मात्र बटाट्याच्या चाळीतील उखाण्यांमुळे आयसेनहावर अगदी चपखल बसला आहे. 'काही स्त्रीगीते' या भागातील हा उखाणा - 'उंचात उंच राजाबाई टॉवर, गणपतरावांना भितो आयसेनहावर'. बटाट्याच्या चाळीतील सौ. काव्यकलाबाई कोरकेंच्या मते या उखाण्यादवारे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पडसाद बटाट्याच्या चाळीत उमटले होते.
डिस्नेवर्ल्डच्या 'It's a small world' या एका ride मध्ये जगातील निरनिराळ्या भागांतील बाहुल्या व इतर खेळणी अत्यंत आकर्षक रितीने मांडलेली आहेत. त्यांच्या दर्शनासाठी आपल्याला एका बोटीतून फिरावं लागतं. ह्या खेळण्यांचं असं दुरून दर्शन होऊनसुध्दा माझी मुलगी त्या 'It's a small world' च्या गाण्याच्या तालावर बोटीतल्या बोटीत अशी काही डोलायला, टाळ्या वाजवायला लागली की माझ्या मनाने 'अपूर्वाई' च्या नाताळ वर्णनाकडे धाव घेतली. खरोखर आजूबाजूच्या बाहुल्या बघण्यापेक्षा मझ्या मुलीच्या डोळ्यांतील बाहुल्यांचा नाच मला अधिक मोहक वाटला. 'अपूर्वाई' मधील ते नाताळ वर्णन वाचतानाही इंग्लंडच्या खेळण्याच्या दुकानातील बँडच्या तालावर मंत्रमुग्ध होऊन नाचणारी ती गुबगुबीत इंग्लिश मुलं अशीच माझ्या मनात घर करून बसली होती.
ह्या लेखात आधीच सांगितल्याप्रमाणे अमेरिकेतील डिस्नेवर्ल्ड वगैरेंची टूर फक्त मी, माझी बहीण आणि आमची एकूण चार मुलं यांनीच केल्री होती. मुलं सोहन (१२ वर्ष), मैत्रेयी (११ वर्ष), ओम (७ वर्ष) आणि शौना (४ वर्ष) या वयोगटातत्री. त्यांच्या वागण्याच्या तर्हा, त्यांचे हट्ट आम्हाला वारंवार 'असा मी असामी' मधील शंकर्या, शरी, उल्हास, नूतन यांची आठवण करून देत होते. अमेरिका-सिंगापूरमध्ये राहिलेली ही मुलं. या देशांमध्ये soda हा पाण्यासारखा वापरतात. पण तरीही थंड पेयांचं दुकान पाहिल्यावर त्यांना शंकर्या-शरीसारखीच 'orange' वगैरेची तहान लागत होती. अमेरिका-सिंगापूरमध्ये 'sidewalk, traffic rules, safety crossing च्या शिस्तीत वाढलेली ही मुलं, Disney World च्या वाहनरहित रस्त्यांवर शंकर्यासारखीच अगदी पाचोळ्यासारखी भिरभिरत होती. 'असा मी असामी' च्या काळी मुंबईच्या छोट्या रस्त्यावरही वाहनांची रहदारी माफक प्रमाणातच असणार. त्यामुळे शंकर्यासारख्या मुलांना रस्त्यावर पाचोळ्यासारखं मिरमिरणं शक्य होतं. आता ते अशक्य आहे. काळानुसार एवढाच संदर्भ बदललाय, पण शंकर्या, शरी, उल्हास, नूतन आणि सोहन, मैत्रेयी, ओम आणि शौना यांच्या वात्रटपणात, मिश्किलपणात, निरागसतेत. काडीमात्र फरक पडलेला नाही.
एकदा मी सिंगापूरच्या एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये सूट-बूटवाल्या चार-पाच भारतीय तरुणांना काटे-चमचे वापरून जिलेबी खाताना पाहिलं. पु.लंनी ज्याप्रमाणे 'बिगरी ते मॅट्रिक' मध्ये शिवबांना कळवळून विचारावसं वाटलं की "शिवबा, तुम्ही नाटकातच का नाही राहिला? तसंच मला या तरुणांना कळवळून विचारावसं वाटलं की "सभ्य गृहस्थहो, इथे कॅरॅमेल कस्टर्ड सुध्दा मिळतं. तुम्ही ते का नाही खाल्लं ?" कारण खाण्याचा आसन आणि 'बासन यांच्याशी असल्लेला संबंध जो 'हसवणूक' मधील 'माझे खाद्यजीवन' मध्ये पु.लंनी अगदी चेवी-चवीने उलगडला आहे. तो माझ्या मनावर छान कोरला गेला आहे. जिलबी हा हाताने खाण्याचा पदार्थ व त्यातील साखरपाक ही बोटाने चाखण्याची गोष्ट. तरच जिलेबीचा आस्वाद घेता येतो हा माझा पिंड. पु.लं.नीच लिहिल्याप्रमाणे केळीचं पान, वरणभाताची मूद, गणपतीबाप्पा मोरयाच्या संस्कृतीत वाढलेला माझा पिंड.
त्याने आकार घेतलाय तो देशी मडक्याचा ! तकलादू विदेशी कपबश्यांनी जगातील/भारतातील. कितीही संदर्भ बदलले असं म्हटलं तरी पु.लं.चं लिखाण आणि त्यांचं धुवपद अढळ आहे आणि माझ्यासारख्या अगणित निस्सीम पु.ल.प्रेमी देशी मडक्यांसाठी ते अढळच राहणार आहे.
- शिबानी नाबर
स्नेहदीप
दीपावली विशेषांक
२०१३
1 प्रतिक्रिया:
खूप छान👌 पुलंचं वाङमय भिनलंय तुमच्यात.
Post a Comment