Friday, November 26, 2021

मी सिगारेट सोडतो

‘‘मी सिगारेट सोडली - मी सिगारेट सोडली - कायमची सोडली - यापुढे सिगारेट वर्ज्य - प्राण गेला तरी सिगारेट नाही ओढणार - माझा निश्चय कायम - त्रिवार कायम.’’ - वास्तविक हे मी कुणालाही सांगत नाही - माझे मलाच सांगतो आहे. हा आजचा प्रसंग नाही -‌ हे अनेकवेळा मी माझे मलाच सांगितले आहे. सिगारेट सोडण्याविषयी मी माझ्या धुरकट मनाला आजपर्यंत जो उपदेश केला आहे तो जर श्लोकबद्ध केला असता तर मनाच्या श्लोकासारखे माझे धुराचे श्लोक घरोघर म्हटले गेले असते. पण चार चरणांचा श्लोक तयार करणे हे माझ्या आवाक्यापलीकडले काम आहे. म्हणून बहुधा हा उपदेश मी गद्यातच करतो - मना, ह्या धुराच्या भोवऱ्यात फसू नकोस. रोज अडीच-तीन रुपयांची राख करणे हे बरे नव्हे. हे सज्जन मना - हा मोह आवर. बाकी मनातल्या मनात देखील माझ्या स्वत:च्या मनाला ‘मना सज्जना’ म्हणताना मला लाजल्यासारखे होते. ह्या माझ्या अचपळ मनाची-माझी बालपणापासूनची ओळख आहे-तरी देखील त्या माझ्या मनाला माझा मीच गोंजारीत असतो. वास्तविक हे स्वत:च्या गळ्यात हात घालून आपणच आपल्याला आलिंगन देण्यापैकी आहे.

बाकी सिगारेट सोडण्याचा किंवा अशाच प्रकारच्या सन्मार्गाने जाण्याचा उपदेश करणारा हा कोण आपल्या अंत:करणात दडून बसलेला असतो हे काही कळत नाही. पुष्कळदा वाटते की ‘आत्मा आत्मा’ म्हणून ज्याला म्हणतात तो हा प्राणी असावा. पण मन देखील अंत:करणातच असावे. मला वाटते ‘मन’ हे आत्म्याकडे पोटभाडेकरू म्हणून रहात असेल आणि एखाद्या प्रेमळ घरमालकाने गच्चीवरच्या एका खोलीत भाड्याने रहाणाऱ्या आणि वेळीअवेळी भटकणाऱ्या कॉलेजविद्यार्थ्याला नीट वागण्यासंबंधी उपदेश करावा त्याप्रमाणे हा ‘आत्माराम’पंत त्या ‘मन्याला’ उपदेश करीत असावा. पूर्वी काही नाटकांतून आत्मारामपंत, विवेकराव, क्रोधाजीबुवा, मनाजीराव वगैरे पात्रे असत. त्यांची अशावेळी आठवण येते. ‘मन’ हे नेहमी उनाड. ते नाही नाही त्या ठिकाणी जडते. कुठे कुणाच्या केसांच्या महिरपीतच गुंतेल - तर कुठे एखाद्या नाजूक जिवणीजवळ उगीचच फेरी घालून येईल - बरे ही जडायची ठिकाणे काय मोठी - काव्यमय - सुंदर - मोहक असायला हवीत असे थोडेच आहे. नाक्यावरच्या हॉटेलात संध्याकाळी - पहिली कांद्याची भजी चुरचुरायला लागली की मन धावले तिथे. चौपाटीवरच्या वाऱ्याबरोबर येणाऱ्या भेळवाल्याच्या ठेल्याची खबर नाकाशी आली की विवेकराव - क्रोधाजीराव - आत्मारामपंत वगैरे मंडळींना न जुमानता धावले तिथे - छे - ‘मन ओढाळ ओढाळ’ म्हटले आहे ते काय खोटे नाही. मला वाटते मनाचा ओढाळपणा सिगारेट, विडी, हुक्का, चिलीम वगैरे ओढण्यात जितका शाबीत होतो तितका इतरत्र कुठेही होत नसेल.

बाकी ज्या कुण्या मराठी माणसाने धूम्रपानाला ‘ओढणे’ हे क्रियापद लावले त्याची धन्य आहे. इतर भाषांत विडी पितात - आपण ‘ओढतो.’ इंग्रजीत तर सरळ ‘धूर सोडणे’ अशाच अर्थाचे क्रियापद वापरले जाते. याचे मुख्य कारण सिगारेट किंवा बिडीत काय ‘ओढतात’ हे पुष्कळांना कळलेले नसते. ‘काय, ‘फू फू फू फू’ करण्यात सुख वाटते कोण जाणे - हा आणि अशा चालीचा फुंफाट कुठल्या दिशेने येतो हे काय सांगायला हवे. बरे बायकाच नव्हे तर चांगले पुरुष म्हणवणारे लोक देखील ह्या ‘ओढण्या’ला विरोध करतात. पुरुषांच्या ओठाशी लडिवाळ खेळ करणाऱ्या आणि बोटाशी खेळणाऱ्या कुठल्याही वस्तूचा बायकांनी हेवा करावा हे मी समजू शकतो-पण पुरुषांनी? हॅ. अर्थात ह्याचे मुख्य कारण एकच. सिगारेट ओढणाऱ्याच्या ओठी असते ते पोटी नसते हे येरागबाळांना कसे कळावे. सिगारेट पिण्याला माझा विरोध आहे. कोरडी - धगधगती वस्तू प्यायची कशी? - बरे फू फू फू फू करायला सिगारेट ही काय फुंकणी आहे. 'विड्या फुंकतात' म्हणणाऱ्या लोकांना फुंकण्याचा अर्थ कळत नाही. काही लोक तर चक्क 'धूर काय ओढीत बसता?' म्हणतात. ह्या बाळबुद्धीला काय म्हणावे-सिगारेट ओढणारा माणूस हा धूर सोडणारा असतो - ओढणारा नव्हे. एका जिज्ञासू माणसाने मला 'तुम्ही सिगारेटीत नेमके काय ओढता?' असा सवाल केला होता. हा खरा अर्जुनाचा प्रश्न. त्याला उत्तर मात्र एकच-ओढून पहा.

बाकी सिगारेट ओढून पहा हे सांगणे जितके सोपे तितकेच सोडून पहा हे सांगणे बिकट आहे. कधी कधी मनाजीरावावर आत्मारामपंताचा विजय होतो आणि सिगारेट सोडण्याची आपत्ती ओढवते. काही दिवस आत्म्याचे राज्य सुरू होते -‌सिगारेट सोडायचा निश्चय झाला रे झाला की आत्म्याचा अंमल चढायला लागतो. अध्यात्माची पहिली प्रतिक्रिया म्हणजे वैराग्य. सिगारेट सोडण्याचा निश्चय करून तास - अर्धा तास होईपर्यंत ती वैराग्याची कळा चेहऱ्यावर दिसायला लागते - समोर चहाचा कप असतो. वास्तविक रोजचा क्रम एक घुटका चहाचा आणि सोबत झुरका सिगारेटचा असा असतो. आता चहा 'एकला पडलो रे' म्हणत ओठांतून पोटात जातो. पुष्कळ वेळा मला आतला आवाजच नव्हे तर आतले अनेक आवाज ऐकू येतात. पोटातली पचन विभागातली यकृत-प्लीहा-पित्ताशय-अन्ननलिका वगैरे स्त्री-पुरुष कारकूनमंडळी - त्या एकट्याएकट्याने येणाऱ्या घुटक्याला ‘काय आज एकटेच?’ असा प्रश्न विचारू लागलेले आतल्या आत उमगते. सिगारेट सुटली की - पोटात चहाला एकलेपणाची आग लागली आहे हे ताबडतोब समजते आणि सिगारेटबरोबर चहादेखील सोडायचा निश्चय व्हायला लागतो. चहा-सिगारेट आणि पान ही त्रिगुणात्मक विभूती आहे. जरा खोलवर विचार केला तर अत्रिने दिलेल्या तीन शिरांच्या दत्तगुरूप्रमाणे पत्रीने दिलेले हे त्रिविध दर्शन आहे. चहाचीही मूळ पत्री-तंबाखूचीही पत्री आणि पान म्हणजे तर साक्षात पत्री.

ह्या तिघांचा सोडा पण एकेकाचा त्याग करणे म्हणजे आपत्तीच म्हणायला पाहिजे. पण तरीदेखील आत्यंतिक रतीनंतर उपरती यावी त्याप्रमाणे सिगारेट ओढण्याप्रमाणे सोडण्याची लहर येते. आत्म्याचे प्राबल्य म्हणा किंवा त्याहूनही जबरदस्त असे पत्नीचे वर्चस्व म्हणा आपण सिगारेट सोडतो. इथे मी आपण हा शब्द ‘माझिया जातीच्या’ मंडळींना उद्देशून वापरला आहे. तात्पर्य - एखादा दिवस असा उजाडतो की त्या दिवशी भल्या पहाटेच आत्मा मनाला गाफील अवस्थेत गाठतो. मला ‘आत्मा’ हा इसम नेहमी गोरापान-थोडेसे दोंद सुटलेला-उघडा-आखूड धोतर नेसलेला-रूपेरी शेंडी तुळतुळीत डोक्यावर चमकते आहे-भरघोस मिशा आहेत-जानवे स्वच्छ आहे-आणि गाईचे धारोष्ण दूध पिऊन भेटायला आला आहे-असे वाटते. त्याच्याबरोबर विवेकराव असतात. हे गृहस्थ एखाद्या ग्रामसुधार कमिटीच्या चिटणीसासारखे पांढरे स्वच्छ कपडे घातलेले-बुटुकले-रोज दाढी करणारे-काळसर असले तरी नीटनेटके असे असतात. ही थोर माणसे शिरली की माझ्या गटातले मोह, क्रोध, लोभ वगैरे लोक निरनिराळी निमित्ते काढून पळतात. हा लाभ मात्र वारंवार पगडी बदलणाऱ्या पुढाऱ्यासारखा कधी आत्मारामपंताच्या गटांत तर कधी मोहाच्या पार्टीत आढळतो. आत्मा आणि विवेक एखाद्या निवडणुकीतल्या उमेदवाराने नवशिक्या मतदाराला पकडावे तसे - माझ्या मनाला पकडतात. एक अध्यात्माची जडीबुटी देतो. हृदय म्हणजे देवाचा देव्हारा - तो मंगल ठेवा - पवित्र ठेवा - तिथे तंबाखूचा का धूर न्यायचा? - तिथे पानाची थुंकी का साठवायची? व तिथे तो कोवळ्या पानांना चुरगळून केलेला चहा का ओतायचा? माझ्या हृदयात सोन्या मारुतीसारखे लहानसे देऊळ आहे - आणि एरवी पोटात जाणारी घाण - जीवजंतू - रक्तवाहिन्या वगैरे त्या देवळाच्या आजूबाजूंनी वहाणाऱ्या - गटारांसारख्या वाहतात. हे ऐकून मी गदगदतो. ह्या हृदयातल्या खेळांत बडवण्यासाठी घंटा असतील का असा एक चावट विचार मनाच्या मनात येतो. आणि मग विवेक आपल्या हातांतली कातडी पिशवी उघडतो. त्यांत निकोटीन, टॅनिन वगैरे भयंकर मंडळींची यादी असते. ही शरीराचा विध्वंस करणारी माणसे सिगारेट, चहा वगैरे मंडळींच्या पोटातून आपल्या पोटात जातात - शिवाय कॅन्सर. अरे बापरे! माझे भित्रे मन दचकून थरथरायला लागते आणि पोटातल्या ह्या खलबतांतून ओठांत उद्‌गार येतात -‌ मी सिगारेट सोडली. आजन्म सोडली.

तास-दोन तास जग किती पवित्र, मंगल दिसायला लागते. स्वत:च्या बायकोवर देखील खूप प्रेम करावेसे वाटायला लागते. वास्तविक तिचे ‘सिगारेट सोडा, सिगारेट सोडा’ हे टुमणे लग्न ठरल्या दिवसापासून चाललेले आहे. हर हर! ह्यासाठी मी त्या माऊलीचा किती वेळा अपमान केला. एकाएकी तिच्यापुढे जाऊन सौभद्रातल्या अर्जुनाप्रमाणे ‘‘कोण तुजसम सांग मज गुरुराया कैवारी सद्‌या’’ हे पद अंगविक्षेपासह म्हणावे असे वाटू लागते. पण आजूबाजूच्या विड्या ओढणाऱ्यांबद्दल मला घृणा वाटायला लागते. कचेरीत - ‘हं काढा सिगारेट’ म्हणणाऱ्या मित्रांना मी शांतपणाने - ‘मी सोडली सिगारेट’ असे सांगतो. ते हसतात मला. पण मी दाद देत नाही. मग नंतर सिगारेट सोडलेले लोक मला उपदेश करतात. कुणी म्हणतात हळूहळू कमी करा नाहीतर हार्टवर परिणाम होतो. कुणी म्हणतात - छे छे सोडायची म्हणजे सोडायची. - दिवसभर माझ्या डोक्यात एकच विचार. मी सिगारेट सोडली - त्या नादात कचेरीतल्या कामात चुका होतात. चेकवर सही करताना 'आपला नम्र' असे लिहून सही होते-डिस्पॅच्‌ क्लार्कदेखील हसतो - डिसोझा चिरूट ओढीत खोलीत येतो ती घाण सहन होत नाही म्हणून त्याला मी अत्यंत तुटकपणे खोलीतून हाकलून देतो - तो पलीकडल्या खोलीतून मला टेलिफोन करून "बायकोचा राग आमच्यावर कशाला काढतोस रे?" असे विचारतो. सगळ्यांचा समज आमचे घरात काहीतरी वाजले आहे असा होतो. माझे मलाही माझे असे का होते ते कळत नाही.

नेहमीप्रमाणे - ऑफिसच्या लंचरूममध्ये मंडळी जेवायला जमतात. आमच्या सेक्शनमधली नुकतेच लग्न होऊन रजेवर काश्मीरला गेलेली टायपिस्ट आजच रिझ्यूम झालेली असते - ती लडिवाळपणे जवळ येते - आणि - माझ्या नवऱ्याने हे तुम्हाला काश्मीरहून छोटेसे प्रेझेंट दिलेय म्हणते‌ - मी त्याला तुम्ही कसे जॉली आहात - तुम्ही आम्हाला आमचे बॉस आहात असे मुळीसुद्धा कसे वाटत नाही हे सगळे सांगितले आहे… वगैरे सांगून सुरेख कागदात बांधलेले प्रेझेंट देते - त्यात अक्रोडच्या की कसल्या लाकडाची सिगारेट केस असते. त्यात सिगारेटी देखील भरलेल्या असतात.

"हाच ना तुमचा ब्रॅण्ड?" मी निमूटपणाने हो म्हणतो. माझ्या अंत:करणात एका खाटेवर दम्याची उबळ आलेल्या म्हाताऱ्यासारखा आत्मा बसलेला आणि त्याच्या बाजूला डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारासारखा विवेक उभा असतो. आणि ते सज्जन मन एकेका झुरक्याबरोबर उर्दू मुशाहिऱ्यांतल्या रसिकांसारखे ‘‘वाहवा-क्या बात है-बहोत अच्छा सुभानल्ला’’ करीत असते.

- पु. ल. देशपांडे
अंक: केसरी सप्टेंबर १९६० (आकाशवाणी-मुंबईच्या सौजन्याने)

Monday, November 22, 2021

चिमणी - (पाळीव प्राणी - हसवणूक)

कावळ्या मागोमाग येणारा पक्षी म्हणजे चिमणी. वास्तविक या दोघात काहीच साम्य नाही .केवळ काऊशी यमक जुळावे म्हणून चिऊ येते .मात्र काऊ आणि चिऊ ह्या निदान मुंबईच्या पक्षीजमातीतला अनुक्रमे बहूजन समाज आणि कनिष्ठ मध्यम वर्ग आहे. संखेने विपुल ,कष्टाने जगणारा .सुबक पिंजऱ्यात बसून डाळींबाचे दाणे खाणारा ऐदी नव्हे .काऊ चिऊ बिचारे आपली स्वताची बोली बोलतात त्याना नागरांची शिकाऊ पोपटपंची जमत नाही . खाण्यापिण्यातला चोखंदळपणा परवडत नाही .खाऊ तर पेरू नाहीतर मरू ! हे गाणे पोपटाला ठीक आहे. किंबहुना आधी पेरू खाऊनच ती असली गाणी म्हणत असतात. चिमणा-चिमणीची आर्थिक परिस्थिती कावळ्यापेक्षा जरा बरी असते. नाही म्हटले तरी त्या सभ्य घराच्या वळचणीचा आसरा घेतात. काही माफक प्रणयक़ीडा करतात. फिरत्या वाचनालयातील मासिकातल्या कथा वाचून कारकूनाची पोर -पोरी जितपत प़ेम करतात तितक्याच. कावळे मात्र अगदी मजुर वर्गातले. शहरात पहाटे उठून कामावर जायचे नशीबात असेल ते शिळेपाके खाऊन दाटीवाटीनी राहायचे. चिमणा-चिमणी त्या मानाने लोअर डिव्हीजन क्लार्कच्या दर्जाने राहतात. सुट्टीत देशावर जाऊन पिकाच्या तूरयावर बसून येतात. 'हे' कामावर गेल्यावर चार घरट्यातल्या चिमण्या जमून मंडळे चालवतात थोडा चिवचिवाट करतात. एका खोलीच्या घरट्यात का होईना पण स्वतंत्र संसार थाटतात. कावळ्यांची घरे मजुराच्या खुराड्यासारखी दृष्टी आड सृष्टीत मोठ्या मोठ्या लोकांच्या पंख्यावर दिव्याच्या टोपणात, दिवाणखान्याच्या तुळईजवळ पोट भाडेकरू म्हणून राहण्याची धिटाई चिमण्याना जमते तशी कावळ्याला जमत नाही.

ह्या पक्ष्याला विलक्षण न्यूनगंड आहे. तो चिमण्या सारखा किंवा पारव्यासारखा एकदम कधीही घरात शिरत नाही. चिमण्याचिमणीपैकी चिमणी हा स्त्री समाज बराच पुढारलेला असल्याने तीही संसाराला हातभार लावते कावळी चारचौघात मोकळेपणाने वावरताना दिसतच नाही. मी तर तशी कावळी काळी की गोरी पाहिलीच नाही. गोरी नसावी कारण इतक्या कावळ्यापैकी एक तरी आईच्या वळणावर गेला असता. काक समाजात काकूना फारसे पुढे येऊ देत नसावेत म्हणूनच काॅलेजमधल्या मागासलेल्या मुलीना "काकू म्हणत असावेत .की काय ? कावळी मी पाहीली नाही तरी दामले मास्तर मुलीना "ए कावळे" म्हणत हे ऐकले आहे. त्याना गोविंदा ,अंतू ,हरी ,वेणू प़भी इत्यादी नावे समोर दिसत असूनही आठवत नसत. आमच्या काळी अमिताभ हर्षवर्धन,आशुतोष ,अर्चना सस्मिता इत्यादी मास्तरांची कवळी उडवणारी नावे नव्हती. पण आमची नावे सोपी असूनही दामले मास्तर बैलोबा ,गाढवा ,कावळे याच नावाने हाक मारत असत. हजेरी देखील ,देशपांड्या ,फडक्या ,साठ्या अशा लाडीक नावाने घेत असत .इतक्या गद्य वातावरणात बालपण गेल्यावर कुठली फुले व कुठले पक्षी ? खिडकीपाशी आपण होऊन येणारे कावळे चिमण्या आणि तळमजल्यावरच्या वाण्याकडले वळचणीला घुमणारे पारवे सोडले तर आमच्या बालजीवनातून पक्षी केव्हाच उडले होते आमच्या लहानपणी पक्षी उडत नव्हते असे नाही .पण चाळीच्या खिडकीतून जिथे आकाशच दिसायची पंचायत तिथे पक्षी कुठले दिसायला ?

पु.ल. देशपांडे 
(पाळीव प्राणी  - हसवणूक)

Friday, November 19, 2021

संगीत चिवडामणी

एकदा क्लासच्या दारात एक बगी उभी राहिली. बगीत एक म्हातारे सरदार, त्यांच्या तितक्याच म्हाताऱ्या सरदारीणबाई आणि एक तरुण मुलगी होती. बुबा दरबारी अदबीने बगीजवळ गेले.

"नारद संगीत विद्यालयाचे चालक आपणच का ?" "होय मीच!" "हं. गाणं शिकविण्याचे दर काय आहेत आपले?" "कोणाला- आपल्या ताईसाहेबांना- गाणं शिकायचं आहे का?" ताईसाहेबांकडे चोरून पाहात बुवांनी विचारले. "तिला गाणं शिकवून काय सिनेमात नाचायला पाठवायला सांगता काय आम्हाला?" बुवा चरकले. गाणे शिकवून नाचायला कसे पाठविता येईल?- हे कोडे तर त्यांच्यापुढे होतेच; परंतु ह्या म्हाताऱ्याला शिकवावे लागणार की काय ही भीती त्यांच्यापुढे उभी राहिली. "तसं नाही, आजकाल सरदार हुरगुंजीकरांच्या सूनबाईसाहेबांना मी शिकवितो गाणं-" "सरदार हुरगुंजीकर सेकंड क्लास सरदार आहेत; आम्ही फर्स्ट क्लास आहो!" सोन्याच्या घड्याळाचा छडा चाळवीत सरदार म्हणाले. "ह्यांना गाणं शिकवायला काय घ्याल?" म्हणजे? ह्या म्हातारीला सिनेमात नाचायला पाठवणार की काय? त्यांच्या बोटाच्या दिशेने त्या थेरङ्याकडे पाहात बुवा मनात म्हणाले. नशीब! पागेतल्या घोड्यांना सुरात खिंकाळायला शिकवा म्हणून नाही सांगितले! "काय?" "हो, शिकवू की!" बुवांच्या तोंडून शब्द गळून पडले. "शिकवा. तिला दमा आहे. गाण्यानं दमा बरा होतो म्हणे. परवाच काठेवाडच्या एका राजवैद्यानं सांगितलं आम्हांला. पाहायचं एकेक इलाज करून! उद्या या वाड्यावर." बगी पुढे गेली. बाहेरच्या बोर्डावर 'येथे दमाही बरा केला जाईल' ही अक्षरे लिहिण्याचा विचार बुवांच्या मनाला चाटून गेला. हे वैद्यकीय गाणे शिकवायला बुवा दोनचार महिने जात होते. 'सा' लावला की म्हातारी पाऊण तास खोकायची. एकदा पंचमापर्यंत जेमतेम पोहोचली आणि सुराला एक ह्या हिशेबाने पाचही प्राण तिच्या डोळ्यात गोळा झाले. दुसऱ्या दिवसापासून स्त्रीहत्येच्या पातकाच्या भीतीने बुवांनी शिकवणी सोडली. त्या शिकवणीला जाताना बुवा 'संगीताच्या व्हिजिट' ला निघालो म्हणायचे.
- पु. ल. देशपांडे संगीत चिवडामणी
नसती उठाठेव

Tuesday, November 16, 2021

कालातीत विचारवंत -- पिनाकीन गोडसे

शहर मेलबर्न. दिवस मे महिन्याचे. आमच्याकडे काही मैत्रिणी आल्या होत्या (पुणेकर नसल्याने तिसऱ्या वाक्यात हशा मिळवायची अट मला नाही). एकीने पुलंची पुस्तके बघून दुसरीला सांगितले की, "अरे हे फार विनोदी लेखक होते". मला कळेना की कीव कोणाची करावी माहिती देणारीची की माहिती जिला मिळाली तिची? की विनोदी लेखक एवढीच ओळख उरलेल्या पुलंची ? पण ते शब्द त्रास देत राहिले हे मात्र खरे. आधी एका लोकप्रिय कार्यक्रमात पु. ल. देशपांडेंच्या उल्लेख आद्य मराठी stand up comedian असा केला होता. हे म्हणजे रम चा उल्लेख शरीरात उष्णता निर्माण करणारे द्रव्य असा करण्यासारखे आहे. खरा आहे की नाही हा प्रश्न नाही पण पुरेसा नक्कीच नाही. ह्या पुरुषोत्तमाच्या अचाट आयुष्यातील एका उत्कृष्ट विचारवंताचा भाग थोडा उपेक्षल्यासारखा वाटतो म्हणून हा लेखन प्रपंच. पुलंवर एवढे विपुल लेखन झाले आहे की ह्यापुढे काही लिहणे म्हणजे पुनरोक्तीचा दोष पत्करुन लिहणे क्रमप्राप्त आहे. तसेच या लेखात पुलंचे शब्दच जास्त आहेत कारण ते वाचल्यावर आपण काही लिहूच नये अशी भावना प्रबळ होते.

पु. ल. देशपांडे ह्या असामीने महाराष्ट्राचे सांस्कृतिक विश्व अजूनही व्यापून टाकले आहे. पुलंना जाऊन २० पेक्षा जास्त वर्षे झाली, त्याआधी काही वर्षे ते आजारी होते. तरीही त्यांचे सांस्कृतिक ऋण महाराष्ट्र अजून अभिमानाने मिरवतो. हे न फिटणारे ऋण! ह्यांना आपण काय देणार! तेथे कर माझे जुळती असे म्हणून धन्य व्हावे. पुलंनी संस्कृतीच्या प्रत्येक अंगाला कडकडून मिठी दिली. संस्कृतीचे असे कुठले दालन नसेल जिथे पु. ल. बागडले नाहीत. हा समाजकारणी आपल्या विचारांचे मोती मुक्तहस्ते उधळत राहिला पण असे असताना जिथे काही अमंगल दिसले तिथे हाच माणूस पहार घेऊन उभा होता. ह्या सर्व सांस्कृतिक पराक्रमामागे एक सुंदर वैचारिक बैठक होती आणि ती पु.लंनी सदैव लख्ख ठेवली.

एखाद्या विचारवंताचे विचार समाज नेहमी एका प्रखरतावादी दृष्टिकोनातून पाहत आलाय. विचारवंत म्हटले की तो एखाद्या प्रखर विचारांची पाठराखण करणारा असतो असा एक ग्रह आहे. ह्याच ठिकाणी पुलंचे विचार निराळे ठरतात. ह्या माणसाने नेहमी मानवतावादी, सौंदर्यसाधक आणि आनंददायी विचारांची पाठराखण आणि पखरण केली. हे विचार तसे म्हटले तर साधेच आणि नेहमीचे होते. हे काय विचार झाले का? असा सुध्दा प्रश्न काहींना पडू शकेल. त्या काळी सुध्दा पुलंवर ते भाषणातून काही विचार देत नाहीत हा आरोप झाला होता. आचार्य अत्रे, S. M. जोशी, नरहर कुरुंदकर, दुर्गाबाई भागवत इ. परखड विचारवंतांची सवय तेव्हा महाराष्ट्राला होती, तेव्हा ह्या पुरुषोत्तमाच्या सरळ विचारांची थोडी उपेक्षाच झाली. जीवनातील श्रेयस आणि प्रेयस दोघांवर मनापासून प्रेम करणारे विचार सोप्प्या शब्दांत मांडताना पुलंनी कधी विचारांची सक्ती केली नाही. बरं, पुलंना काही अनुयायी तयार करायचे नव्हते की खुर्च्या मिळवायच्या नव्हत्या त्यामुळे लोकप्रियता किंवा समाजमान्यता त्या विचारांना थोडी आली नाही असे जाणवते. आज, इतक्या वर्षांनंतर समाजात जेंव्हा गुणग्राहकता, सहिष्णूता, सामाजिक उत्तरदायित्व, धर्मनिरपेक्षता इ. मूल्यांची सार्वत्रिक गरज जाणवते तेंव्हा ह्या कालातीत विचारवंतांची आठवण येते.

आजच्या 'वाद'ग्रस्त जगात एक मानवतावाद हरवलेला वाटत असताना महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्वाने सदैव केलेल्या मानवतावादी विचारांची आठवण येते. मानवतावादात माणुसकीचे महत्व अधिक आणि ते जागोजागी पुलंनी मांडले. संस्कार आणि संस्कृती ह्या मानवतावादावर परिणाम करत असतात आणि तो परिणाम चांगलाच असावा असा आग्रह त्यांनी धरला. संस्कृतीचा संदर्भ फक्त धर्मकार्य आणि सणासुदींशी जोडणाऱ्या जगाने पुलंचे संस्कृतीचे विचार उमजून घेतले पाहिजेत. एखाद्या समाजाने एकत्र येऊन केलेल्या कृतीस संस्कृती म्हणतात. ह्यात उच्च-नीच असणे हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. पुलंनी सर्व संस्कृतीचे धागेदोरे दाखवले पण ते उसवण्याचा किंवा मलिन करण्याचा प्रयत्न नाही केला. 'गणपतीबाप्पा मोरया'ची मुक्त आरोळी ही सुद्धा संस्कृती आणि आठवडाअखेरीस पब्ज मध्ये जाणे ही सुद्धा संस्कृती. पिठले आणि झुणका ह्याच्या सीमारेषा कळणे ही सुद्धा संस्कृती आणि केकवर ब्रॅंडीची फोडणी देणे ही सुद्धा संस्कृती. कंठ फुटला की गावे आणि सुकला की प्यावे ही सुद्धा संस्कृती आणि टिळकमंदिरात शिरताना वाकून नमस्कार करणे ही सुद्धा संस्कृतीच. संस्कृती ही फक्त कुळाचार अथवा परंपरेशी निगडित नसून मानवी मनाशी निगडित आहे. सवाई गंधर्व महोत्सवाच्या भाषणात पुल म्हणतात की, "वर्षाची जत्रा आणि आठवड्याचा बाजार ह्यावर सारी संस्कृती उभी राहिली आहे." ह्यामागे मानवी मनाची अचूक जाण पुल सहजतेने दर्शवतात आणि संस्कृतीचा संदर्भ हा माणसांच्या एकत्र येण्याशी आहे हे ठसवतात.

तसेच संस्कार ह्या शब्दाचा अर्थ नमस्कार करणे, शुभंकरोती म्हणणे असे मानणाऱ्यांस पुलंनी मानवी संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. एका मुख्याध्यपकास "संडास कसा वापरावा ह्याचे तुम्ही काही संस्कार मुलांच्यावर केलेत का?" असं प्रश्न विचारून संस्कारांची व्यापकता दाखवतात. पुल लिहतात, 'संस्काराचे वर्तुळ अशा धार्मिक मानल्या गेलेल्या जुन्या रुढींपुरतेच मर्यादित केलेले असल्यामुळे, त्या रूढी पाळणारे ते सुसंस्कृत आणि बाकीचे असंस्कृत असे सोयीस्कर गणित मांडले जाते. आपल्या घरातला केरकचरा शेजारीच्या वाडीत टाकणे, खिडकीतून पान थुंकणे अगर केसांची गुंतवळ टाकणे हा संस्कारहीनतेचा नमुना मानला जात नाही. वरच्या गॅलरीत लुगडी, चादरी वगैरे वाळत टाकून ती खालच्या मजल्यावरच्या लोकांच्या गॅलरीपर्यंत लोंबू देणे किंवा वेळेचे बंधन न पाळता आपल्यासाठी कुणालाही तिष्ठत ठेवणे किंवा पूर्वसूचना न देता कुणाहीकडे गप्पांचा अड्डा जमवयाला जाणे आणि भेटीची वेळ ठरवूनही वेळेवर न जाणे, लोकांना तिष्ठत ठेवणे- असली वागणूक हे एक संस्कार नसल्याचे लक्षण आहे हे फारसे कुणाला पटलेलं दिसत नाही. जे संस्कार समाजात जबाबदार नागरिक म्हणून जगायची शिकवण देत नाहीत त्यांना काहीही अर्थ नसतो. समाजाच्या वागण्यातून सिद्ध होते ती खरी संस्कृती; ग्रंथात असते ती नव्हे.' माणुसकी ह्या विचारांची इतकी स्पष्ट पाठराखण पुलंसारखा विचारवंतच करू जाणे.

ह्या मानवतावादाला विवेकवादाची आणि सर्वसामावेशकतेची भरजरी झालर होती. मनाचे आणि बुद्धीचे कोपरे उजळून टाकणाऱ्या विचारवंताचे पुलंना नेहमी आकर्षण राहिले आणि त्या सर्व ठिकाणी पुल नतमस्तकच दिसतात. मग ते फुले असोत, शाहू महाराज असोत, साने गुरुजी असोत, आगरकर असोत, टिळक असोत, गांधी असोत, सावरकर असोत, की सेनापती बापट असोत. ह्या विचारधारेत बुवाबाजीचा बुरखा फाडणे, हमीद दलवाईंवर लेख लिहणे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मदत करणे हे ओघाने आलेच. खाद्यविशेषांच्या परंपरागत संरक्षणासाठी जाती टिकाव्यात ह्या एकाच ठिकाणी पुलंनी (विशिष्ट हेतूपुरतीच आणि विनोदी अंगाने) जातीची पाठराखण केलेली दिसते. आपल्या अनेक लेखांतून, भाषणांतून आणि कृतींतून पुलंनी जात, धर्म, पंथ, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, घातक परंपरा, ईत्यादींचा समाचार घेतला आहे. शाहू, फुले, गाडगेमहाराज, आंबेडकर यांची नावे घेऊन आणि पुतळे उभारून त्यांचे विचार विसरणाऱ्या वृत्तीवर पुलंनी खरमरीत भाष्य केले. भगवंतापेक्षा मला भक्त आवडतो असे लिहणाऱ्या पुलंनी वारी आणि वारकऱ्यांमधील आनंद टिपतानासुद्धा 'भेदाभेद भ्रम अमंगळ' ही शिकवण विसरून दिंड्या काढणाऱ्या समाजाचा धि:कारच केला. हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, बुद्ध, जैन, शीख इ. सर्व धर्मांतील अनिष्टतेवर पुलंनी नेमके बोट ठेवले. पापमुक्तीचे पास विकणाऱ्या पोपची आणि नाण्यांनी हात ओले करून स्वर्गाची दारे उघडणाऱ्या गयेच्या पंड्यांची कधी गय केली नाही की पूर्वजन्म, प्रारब्धयोग, ग्रहयोगाची भीती ठेवून ज्योतिषाकडे धाव घेणाऱ्यांची तळी उचलली नाहीत. संतांची जात पाहणाऱ्या समाजाची कानउघाडणी केली तर सत्तेसाठी जात-धर्म आदींचा उपयोग करणाऱ्या राजकीय वृत्तीचा निषेध केला. व्यक्तीपेक्षा विचार श्रेष्ठ असतो हे जाणणाऱ्या या पुरुषोत्तमाने एखाद्या व्यक्तीचे सामाजिक भान सुटल्यास कानपिचक्या देण्यास हयगय केली नाही. मग ते कुळ-गोत्र-प्रवर-शाखा बघून मुलगी ठरवणारे तरुण असोत की शंकराचार्यांच्या दर्शनाला जाणारे पंतप्रधान असोत. एका पत्रात पुल लिहतात, 'विज्ञानाने निसर्गाची रहस्ये शोधायची चढाओढ सुरु केल्याक्षणी ह्या जुन्या व्यवस्थेचे धाबे दणाणू लागले. आजदेखील विध्वंसक अण्वस्त्रे हा विज्ञानाचा शाप नसून कधी राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली तर कधी स्वतःची सत्तापिपासा भागवण्यासाठी सज्ज असणाऱ्या गटांची ती निर्मिती आहे ही वस्तुस्थिती किती हुशारीने डावलली जाते आहे पाहा. धर्माच्या नावाखाली रक्ताचे पाट वाहत आलेले आहेत. त्या आसुरी वैरामागे विज्ञानाचा हात नसून स्वाधिकार प्रमत्त्तांचे डावपेच असतात ह्या सत्याकडे सत्तेच्या हातात हात घालून चालणारे धर्ममार्तंड आणि अध्यात्मिक गुरु किती निर्लज्जपणे कानाडोळा करत असतात. गौतम बुद्धांनी धर्मचक्रपरिवर्तन केले. यापुढे आवश्यकता आहे ती विज्ञान-धर्माची शिकवण देणाऱ्या एक नव्हे, असंख्य बुद्धांची. बुद्ध-निष्ठ; जर बुद्धी-निष्ठ नसेल तर तोही जुन्या चाकोरीतून निघून नव्या चाकोरीत जाऊन पडला आहे असेच मी मानेन. समोरची मूर्ती बदलेली असेल; पण पूजा, नावे बदलून त्याच आरत्या आणि नवा पुरोहितवर्ग! ख्रिस्ताच्या करुणेचा धर्मदेखील शेवटी पोप आणि पाद्री यांच्या चरितार्थाचा धर्मच झाला. तिथेही व्यापाराचीच तत्त्वप्रणाली आली. प्रत्येक पंथाने आपापली गिऱ्हाईके वाढवण्यासाठी कुठलेही अमानुष उपाय करायला मागेपुढे पाहिले नाही. वैरभावनेतून युद्धाची शस्त्रच नव्हे, तर शास्त्रेही तयार झाली.'

हे विचार मांडताना आजूबाजूला होणाऱ्या सामाजिक क्रांतीचे पुलंनी नेहमी स्वागतच केले. अशा वेळी पुलंची लेखणी आणि वाणी क्रांतीचे गुणगान करताना हातचे राखून काहीच करत नाही. ही क्रांती रक्तरंजित नव्हती. ही तळागाळात पोचणारी आणि मूलतत्व मानणारी क्रांती होती. शिवाजी जन्मावा पण बाजूच्याच्या घरात मानणाऱ्या मराठी मानसिकतेला चपराक देणाऱ्या क्रांतीची स्वप्ने पुलंनी पाहिली. पुल लिहतात, 'काशीची गंगा तृषार्त गाढवाच्या मुखी जेव्हा एकनाथ महाराजांच्या हातून जाते, तेव्हा तिथे मला क्रांती दिसते. आदिवासी घरट्यांतून बालआवाजीत वाचलेला धडा माझ्या कानी पडतो, तो क्रांतीचा मंजुळ सूर मला आवडतो. कॉलेजातला फॅशनेबल तरुण बसस्टॉपवर अनोळखी म्हातारीला हात देऊन बसमधे वर चढवतो आणि क्यूमधला स्वतःचा नंबर खुशीने गमावतो हे दृश्य मला मोठ्या शहरात दिसते, तेव्हा मला क्रांतीचे स्मित पाहायला मिळते. आजारी मोलकरणीला जेव्हा एखादी मालकीण "तू चार दिवस विश्रांती घे; मी भांडी घासीन", असे सांगताना मला आढळते, तेव्हा गोपद्मासारखी क्रांतीची पावले तिच्या दारी उमटलेली मला दिसतात'

पुलंच्या या विवेकवादाला विज्ञानवादाची जोड होती. 'पंढरपूरच्या यात्रेत हजारो माणसे कॉलऱ्याने मारत होती. ते मरण लाखो लोकांनी केलेल्या नामाच्या गजराने थांबले नाही. ते थांबवले कॉलऱ्याची लस शोधून काढणाऱ्या वैज्ञानिकाने.' असे ठणकावून सांगताना पुलंचा विज्ञानवाद झळाळतो. हाच विज्ञानवादी आपली विचारांची बैठक पुढील वाक्यातून दर्शवतो. पुल लिहतात, 'आपल्या देशात इतके संत जन्माला येण्याऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखून ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा ऍनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणार संशोधक हा अधिक महत्वाचा वाटतो.'

सौंदर्योपासकता हा पुलंचा एक विशेष गुण होता. अतुलनीय निरीक्षणशक्तीतून जाणवलेले सौंदर्य दुसऱ्याला पोचवणे ह्याला त्यांनी आपले कर्तव्य मानले. हे सौंदर्य वसंताच्या गाण्यात त्यांना जसे दिसले तसेच रावसाहेबांच्या शिव्यांत दिसले. एका झाडावर येणाऱ्या पोपटांच्या थव्यात ते होते आणि चिवड्यातल्या शेंगदाण्यातसुद्धा. आगाऊ नामूमध्ये त्यांनी सौंदर्य पहिले आणि चौकोनी कुटुंबातसुद्धा. सौंदर्य द्राक्ष संस्कृतीतसुद्धा आहे आणि रुद्राक्ष संस्कृतीतसुद्धा आहे हे आग्रहाने सांगताना देशप्रेमाच्या चुकीच्या कल्पनांचा स्पर्शसुद्धा होऊ दिला नाही. चॅप्लिन जेवढा प्रिय तेवढाच शंकर घाणेकर. फ्लोरेन्समधील चित्रकार प्रिय आणि शर्वरीरॉय चौधरीसुद्धा. चितळे मास्तर प्रिय आणि जपानी प्राध्यपक तनाष्कासुद्धा. हॅम्लेटमध्ये सौंदर्य आहे आणि सौभद्रमध्येसुद्धा. वुडहाऊस जितका प्रिय तितक्याच इरावतीबाई प्रिय. शेक्सपिअर प्रिय आणि गदिमासुद्धा. रसेल मुखोद्गत आणि उपनिषदांचासुद्धा अभ्यास. एकाच सौंदर्यापायी! सौंदर्य टिपताना पुलंनी सौंदर्य हा एकच निकष मानला आणि म्हणूनच पुलंची व्यक्तिचित्रेसुद्धा व्यक्तित्वचित्र जास्त आहेत. आपले पूर्वग्रह, संस्कार आणि सामाजिक परिस्थितीच्या आहारी न जाता नीरक्षीरविवेकबुद्धीने सौंदर्य टिपणे फार कठीण असते. भल्याभल्यांना हे जमत नाही पण पुलंचा सौंदर्यग्राहक आणि सौंदर्यआग्रहक विचार हा सर्व अनिष्टांवर मात करून दशांगुळे पुढेच होता.

सवाई गंधर्वांचे 'तू है मोहम्मद सा दरबार' आणि अब्दुल करीम खां साहेबांचे 'गोपाला मेरी करुना' ऐकताना बाकी कुठल्याही बाबींचा विचार सुद्धा मनात येणे त्यांनी पाप मानले. रामदास, ज्ञानेश्वर आणि तुकारामाचे दाखले देताना तसेच भगवद्गीतेतील वचने उद्धृत करताना त्यांनी आपला निरीश्वरवाद कधी मध्ये येऊ दिला नाही. निरीश्वरवादी असूनसुद्धा मला गजाननाची मूर्ती आवडते असे लिहताना किंवा कोलंबोतल्या बुद्धासमोर नतमस्तक होताना सौंदर्याची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती हाच भाव. पंढरीच्या वारकऱ्यांच्या डोळ्यात त्यांना जे सौंदर्य दिसले तेच आनंदवनातल्या बोटे झडलेल्या माणसात. त्यामागील विचारांची चिकीत्सा किंवा खिल्ली उडवण्यापेक्षा त्यामागील सौंदर्य हुडकून ते दाखवण्यात पुलंच्या विचारांची जातकुळी दिसते. ह्याचा अर्थ पुलंनी बोटचेपेपणा किंवा लाळघोटेपणा केला असा मुळीच नाही. पुरस्कार स्वीकारताना त्यामागील दंडेलीशाहीचे वास्तव जगासमोर आणण्यास ते कुचरले नाहीत की आणिबाणीविरुद्ध आगपाखड करताना मागेपुढे पाहिले नाही. सेन्सॉरशिपची अपरिहार्यता सांगतानासुद्धा पुल म्हणाले होते की, 'प्रत्येक ठिकाणी निरनिराळ्या प्रकारची सेन्सॉरशिप आहे. एका गोष्टीला मात्र माझा विरोध आहे. सत्तेचा जो पक्ष असेल त्याचे तत्त्वज्ञानच सांगण्याची परवानगी आणि इतर तत्वज्ञाने सांगण्याची परवानगी नाही, अस जर सेन्सॉरशिप असेल तर ते मात्र लेखकाने फोडून काढले पाहिजे असे माझे मत आहे. कुठल्याही एका विशिष्ठ तत्वज्ञानाचा आग्रह धरणारे सरकार हे मी कधीही मान्य करणार नाही. हे म्हणजे माणसाला गुदमरून टाकण्यासारखे आहे. मला ज्याप्रमाणे लिहण्याचे स्वातंत्र्य पाहिजे तसेच न लिहण्याचे स्वातंत्र्यसुद्धा पाहिजे.' जेव्हा अनिष्ट गोष्टी समजत घडत होत्या तेव्हा त्यांचा समाचार घेण्यास ते चुकले नाही आणि वेळीप्रसंगी आपली सर्व सांस्कृतिक ताकद पणाला लावून हा विचारवंत त्या त्या गोष्टीतील सौंदर्य दाखवण्यास पुढाकार घेता झाला. मर्ढेकरांच्या कवितेंच्यामागे पुल उभे राहिले. आंनंदवनातल्या आनंदमेळा यशस्वी होण्यासाठी पुल उभे होते. बालगंधर्व आणि बालगंधर्व रंगमंदिरामागे पुल उभे होते. मराठी विज्ञान परिषद, NCPA, टिळक मंदिर, मुक्तांगण अशी किती नावे घ्यावीत! विविध ठिकाणी सौंदर्याचा साक्षात्कार होत असताना त्याबरोबरील विसंवादी बाबींची दखल घेण्यास पुलंनी कधी दिरंगाई केली नाही. संगीतातली अप्रतिम जाण असल्याने वादी-संवादी सुरांना बरोबर घेऊनच जायचे असते हे त्यांना पक्के माहित होते. आजच्या एका सापेक्षी दुर्गुणाबरोबर माणसाचे अस्तित्वच नाकारणाऱ्या जगात ह्या विचारांचे मोल फार आहे. मदर तेरेसांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या संततिनियमनाच्या भूमिकेवर टीका ते करू शकले. विष्णु दिगंबराच्या आणि भातखंड्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यातील उणिवा त्यांनी नजरेस आणल्या. आदरणीय विनोबांवर आमीत्यतेने लिहले पण त्यांच्या 'अनुशासन पर्व' ह्या उद्गाराचा समाचार घेतला. स्वतःचे श्रद्धास्थान असलेल्या बालगंधर्वांच्या उतारवयातील नाट्यप्रवेशांवरसुद्धा त्यांनी टीका केली. अशा वेळी त्या त्या प्रसंगावर भाष्य करणे जरुरी असते पण त्यासाठी त्या व्यक्तीचा आणि कार्याचा अनादर न होऊ देणे ह्याला एक वैचारिक अधिष्ठान लागते. विचारांचा सामना विचारांनी करावा त्यासाठी लाठी घेऊन धावण्याची किंवा चिखलफेक करण्याची गरज नसते हे पुलंनी सप्रमाण दाखवून दिले. या विचारांपायी हा सौंदर्यउपासक गांधींवर लिहू शकत होता आणि सावरकरांवर भाषण करू शकत होता. नाथ पै, अत्रे, SM, लोहिया, नानासाहेब गोरे, साने गुरुजी, सेनापती बापट अशा विविध विचारधारेच्या व्यक्तींवर भाष्य करताना त्यांच्यामागील सौंदर्यतेचा साक्षात्कार पुल सशक्तपणे दाखवून देतात. 'जो जो जयाचा घेतला गुण' हाच भाव.

ह्या सौंदर्यउपासकाच्या आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग आले की आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थानाचा विचार करून एखादा मूग गिळून गप्प बसला असता पण पुल बाह्य सरसावून पुढे झाले. ह्यामागे त्या सौंदर्याचा मला जो साक्षात्कार झाला तो तुम्हालाही व्हावा हा उद्दात हेतू होता. लंडनच्या आजीबाईंसमोर गणपतीची आरती म्हणणे असो की वस्त्रहरण नाटकाची स्तुती करणे असो. तमाशापरिषदेचे अध्यक्षपद असो की कोसलाची स्तुती असो. 'शाहिरी लावण्या आणि बिलोरी बांगड्या' असणाऱ्या मराठीवर पुलंनी निरतिशय प्रेम केले पण म्हणून दुसऱ्या भाषांचा किंवा बोलीभाषांचा दुस्वास नाही केला. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातल्या भाषणात पुल म्हणतात, "जगातल्या प्रत्येक प्रकारच्या ज्ञानाची किंवा साहित्यातली प्रत्येक गोष्ट सर्वांच्या तोंडी असलेल्या भाषेत यावी असा दुराग्रह मी करत नाही. मला इंग्रजी कळतं म्हणून इंग्रजीत लिहलेला आईन्स्टाईनचा सिद्धांत कळतो किंवा सर्व शब्द कळत असूनही मराठी कविता कळते असे नाही. पण शब्दांच्या बाबतीत तो शब्द संस्कृतमधील असला, तर तो अधिक सभ्य आणि त्या जागी मराठीतला रूढ शब्द असला, तरी तो गावरान म्हणून काढून टाकण्याचा जो प्रकार आहे तो मला समजू शकत नाही". बोलीभाषेचा आदर करताना पुलंनी कोंकणी हि स्वतंत्र भाषा नाही हे ठासून सांगितले. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यातील बलस्थाने तसेच मर्यादा दाखवताना त्यातील सौंदर्य महत्वाचे असते हे सहज दाखवले. प्रमाण भाषा आणि बोली भाषा दोन्ही महत्वाच्या पण त्या दोहोंच्या मर्यादासुद्धा लक्षात घेणे महत्वाचे. एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या गोष्टीची मर्यादा असल्याने त्याचे सौंदर्यमूल्य कमी होत नाही हे पुलंना उमगले होते आणि ते आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न त्यांनी मनापासून केला. रूढी-परंपरा-नियम ह्या बाबी पुलंनी सौंदर्याच्या साक्षात्कारापुढे गौण मानल्या. म्हणूनच कुमारांनी जेव्हा भूप रागात शुद्ध मध्यम लावला, किंवा पहाटे मारवा गायला, अथवा बालगंधर्वांनी बिहागाला कोमल निषाद लावला म्हणून अब्रह्मण्यम मानले नाही. हे सर्व करताना एखादा नकारात्मक सूर लागणे साहजिक असते पण हा स्वर पुलंनी शिताफीने टाळला. पुलंच्या प्रत्येक आविष्कारात एक आशावादी सूर असतो. विसंवादी सूर दाखवतानासुद्धा विरोधासाठी विरोध हा पुलंनी कधीच केला नाही. जी वृद्ध पिढी असते तिचे हल्लीच्या पिढीबद्दल तक्रार करणे हे वार्धक्याचेच लक्षण आहे असे म्हणणाऱ्या पुलंनी तरुणाईचे आणि नावीन्याचे स्वागतच केले. दीनानाथांचे कौतुक तसेच भीमसेनचे आणि तसेच अश्विनी भिडे-देशपांडेचेपण. केशवराव दात्यांचे कौतुक तसेच विजया मेहतांचे आणि तसेच अतुल परचुरेचेसुद्धा. जुने जरी उगाळत बसले नसले तरी जुने जाऊ द्या मरणालागुनी असे सुद्धा म्हटले नाही. एखाद्या कलेची किंवा असामीची कालनिरपेक्ष आनंद देण्याची शक्ती पुल जाणून होते

हे सौंदर्य हुडुकुन काढताना आणि तो दर्शविताना पुलंचा सर्वसामावेशकपणा सौंदर्याची खोली दर्शवतो. पॅरिस बद्दल पुल लिहतात, 'पॅरिस म्हणजे केवळ 'त्या रम्य रात्री' नव्हेत. केवळ ती निशामंडळे नव्हेत.- इथे लोकशाहीचे पहिले उष:सूक्त गायिले गेले. इथे एका झोलासारख्या साहित्यिकाने आपली लेखणी अन्यायाविरुद्ध तलवारीसारखी उगारली. इथे सोरबॉ विद्यापीठात उन्मत्त यौवन ग्रंथसंग्रहालयात नतमस्तक होऊन तासच्या तास समाधिस्थ झालेले दिसते आणि इथेच प्रस्तूसारख्या लेखकाने जीवनातला क्षण न क्षण पिंजण्याचा विराट प्रयत्न केला. आजही 'सारा बर्नहार्ट' थिएटरात मोलिअर लोकांना हसवतो आहे. ह्या शहराच्या अंतःकरणात दाटलेल्या सीन नदीने जे पाहिले ते जगातल्या फार थोड्या नद्यांनी पहिले असतील.'

पुलंवरच्या अनेक लेखांत त्यांना आनंदयात्री असे संबोधले आहे. हे अतिशय चपखल वर्णन आहे. त्यांच्या प्रत्येक लेखात, भाषणात, नाटकात, चित्रपटात, आणि आविष्कारात ह्या आनंददायी विचारांची पखरण सहज जाणवून येते. अगदी हुक्क्याचे झुरके घेणाऱ्या काकाजींपासून अमीनाचे गाणे ऐकणाऱ्या भैया नागपूरकरापर्यंत. दिनेशच्या बोबड्या बोलांत जसा आनंद आहे तसाच तर्कतीर्थांच्या ज्ञानोपासनेत आहे. आनंद घेणे आणि आनंद वाटणे ह्या विचारांवर पुलंनी निरतिशय प्रेम केले. जेथे जेथे हा आनंदाचा झरा त्यांना जाणवला तेथे तेथे ते समरसून गेले आणि हा आनंद आपल्या सर्वांपर्यंत पोचवायला कष्ट उपसले. आपण आनंदात असताना कुणाला तरी आनंदाची गरज आहे, हे लक्षात ठेवणं हेच पुलंनी माणुसकीचे लक्षण मानले. ह्या आनंदरंगात बाकी कुठल्याच मानवनिर्मित बंधने गौण ठरतात हे पुलंनी वारंवार दाखवून दिले. ह्या आनंदसागरात ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्यांचे ऋण पुलंनी मानले आणि यथोचित कृतज्ञता व्यक्त केली. मग देवधर मास्तरांच्या भाषणात त्यांच्या पत्नीला वंदन करणे असो की कुरुंदकरांवरील पुस्तकाविषयी बोलताना ग्रंथ छपाईबद्दल तारिफदारी असो. अगदी केसरबाईंच्या गाण्याचे कौतुक करतानासुद्धा श्रीपाद नागशेकरच्या तबल्याचा उल्लेख येतोच. शेवटी विंदांनी पुलंना एका पत्रात म्हटलेच आहे की 'आनंद घेत घेत आनंद देणे आणि आनंद देता देता आनंद घेणे हे तुझ्या सगळ्या लिखाणाचे, कार्यक्रमाचे आणि आयुष्याचेच प्रधान सूत्र आहे.'

तळटीप - या लेखातील पुलंचा उल्लेख पुल आणि सुनीताबाई असा नाही वाचला तरी चालेल. सुनीताबाई हे एक स्वतंत्र विचारांचे सहृदय व्यक्तिमत्व होते. त्या एक स्वतंत्र लेखाचाच विषय आहेत.

ता. क. - अक्षरास हसू नये.

'ह्या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायचीय' ह्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत,

-पिनाकीन गोडसे

पूर्वप्रसिद्धी- हितगुज २०२१ (दिवाळी अंक- महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया)

Monday, November 8, 2021

‘पुलं’चं साहित्य ‘टाइमलेस’ - आदित्य सरपोतदार

महाराष्ट्राच्या मातीतला कोणताही कलाकार पु. ल. देशपांडेंबद्दल विचारलं तर अगदी भरभरूनच बोलेल. आजच्या पिढीचे कलाकारही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने आजच्या पिढीच्या काही निवडक कलावंतांकडून त्यांच्या ‘पुलं’बद्दलच्या भावना जाणून घेतल्या. त्यातील पहिला लेख आहे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा. ‘पुलं’चं साहित्य टाइमलेस असल्याची भावना आणि ‘पुलं’च्या ‘पुढचं पाऊल’ चित्रपटावर काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

‘पुलं’ची नाटकं, सिनेमे, साहित्य मी लहानपणापासूनच पाहिलं, वाचलं. माझ्याकडे सुरुवातीपासूनच ‘निवडक पुलं’च्या कॅसेट्स होत्या. त्या मी नेहमीच ऐकल्या. आता त्या ‘सीडी’च्या माध्यमात आहेत. त्यांचं ‘व्यक्ती आणि वल्ली,’ ‘बटाट्याची चाळ,’ ‘असा मी असामी,’ ‘वाऱ्यावरची वरात’ हे सगळंच ‘ग्रेट’ आहे. विशेषतः
त्यांचा विनोद जास्त भावतो. त्यांच्या साहित्यात आपली वाटणारी पात्रं आणि आपला वाटणारा विनोद खूप होता. ते लोकांना जास्त जवळचं वाटायचं.

आदित्य सरपोतदार, दिग्दर्शक‘पुलं’च्या लेखणीतून आलेली नाटकं अजरामर आहेत. त्या काळात फार लहान असल्याने ती प्रत्यक्ष पाहण्याचा योग कधी आला नाही. परंतु नंतर केलेलं त्याचं सादरीकरण जरूर पाहिलं. मुळात ‘पुलं’ हे कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही पिढीला भावणारे असेच आहेत. कारण त्यांचा विनोद अगदी साधा, सरळ, सोपा असायचा आणि त्यातून त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही खास आहे. इतकंच नाही, तर प्रत्येक साहित्यातली ‘पुलं’ची पात्रंही खूप इंटरेस्टिंग आहेत.

पु. ल. देशपांडे‘पुलं’ म्हणजे अशी एक व्यक्ती जी एकाच वेळी दिग्दर्शक, लेखक, संगीतकार आणि विविधरंगी भूमिका साकारणारा चांगला नट अशा सगळ्याचं मिश्रण आहे. हे सगळं एका व्यक्तीच्या अंगी असणं म्हणजे खरंच कलेचं एक खूप मोठं वरदानच आहे. जगात अशी फार कमी लोकं सापडतील, जे सगळंच इतक्या उत्तम पद्धतीनं करतात. ‘देवबाप्पा’, ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटांमधून भेटणारे ‘पुलं’ खरंच खूप वेगळे आहेत. वेगळे भासतात. नवीन पिढीला त्यांची ही ओळख होणं गरजेचं आहे, ती करून दिली गेली पाहिजे असं वाटतं. पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव असे अनेक मोठमोठे पुरस्कार मिळवलेले ‘पुलं’ हे मराठी सृष्टीतले एकमेव असले पाहिजेत. ते खरंच ते ग्रेट होते. त्यांना किंवा त्यांची निर्मिती पाहणाऱ्या आजच्या पिढीतल्या प्रत्येकालाही एक वेगळीच प्रेरणा मिळते. आपणही असं काहीतरी करावं, असं मनोमन वाटतं.

‘पुलं’च्या बाबतीत घडलेली एक चांगली गोष्ट अशी, की त्यांच्या कामाचं ‘अर्काइव्हल’ बऱ्यापैकी केलं गेलं आहे. नाटकं सगळी झाली नाहीत, ती करणं अवघडही होतं; पण त्यांचे बरेचसे चित्रपट अजूनही महोत्सवांमध्ये दाखवले जातात. असं असलं तरी हे सगळं नवीन पिढीच्या सतत समोर येत राहिलं पाहिजे. ते आजवर येत राहिलं आहे आणि पुढेही येत राहील, असं मला वाटतं. प्रत्येक पिढीतला कोणीतरी ‘पुलं’बद्दल अगदी मनापासून काही तरी करत असतो.

‘पुलं’च्या लिखाणाच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी, की त्यांच्या संपूर्ण लिखाणाचा बाज वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो बाज समजून घेऊन त्यावर कलाकृती निर्माण करणं गरजेचं आहे. त्यात थोडंसं जरी चुकलं, तर ते मग ‘पुलं’ राहत नाहीत. त्यांच्या साहित्यावर नवीन काही निर्माण करत असताना हा एक थोडासा धोका असतो.

'गुळाचा गणपती' चित्रपटात एका दृश्यातील 'पुलं'बहुतेक जणांना ‘पुलं’च्या नाटकांबद्दल जास्त वाटतं. का कोणास ठाऊक, मला मात्र त्यांच्या नाटकांपेक्षाही त्यांचे सिनेमे खूप आवडले. त्यांचे काही सिनेमे म्हणजे अगदी साधे, सरळ असे आणि सामान्य माणसाची कथा सांगणारे होते. त्यांचा कोणताही चित्रपट घेतला, तरी त्यात एका ठराविक मर्यादेपर्यंत विनोद आहे आणि एक सामाजिक संदेशही आहे. अशा त्यांच्या कोणत्याही एका सिनेमावर काम करायला मला आवडेल. तसं कामच करायचं, तर त्यांचा कोणताही एक सिनेमा निवडणं हे नक्कीच अवघड आहे. त्यांचं हे एक काम चांगलं आहे, असं म्हणणं खरंच अवघड आहे. त्यांनी अगदी निखळतेनं आणि निरागसतेनं केलेलं कोणतंही काम घ्या, ते काम बघण्याजोगं आहे आणि करण्याजोगंही आहे.

'पुढचं पाऊल' चित्रपटातील एक दृश्यत्यातल्या त्यात ‘पुलं’च्या कोणत्या साहित्यावर काम करायला आवडेल, असं मला विचारलंत, तर मी त्यांचं ‘पुढचं पाऊल’ हा चित्रपट निवडेन. या चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद या दोन बाजू भन्नाट आहेत. हा एक खूप वेगळ्या धाटणीचा सिनेमा वाटतो. ‘चिमणराव गुंड्याभाऊ’मध्येही ते भावतात. अगदी शेवटपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत ते चित्रपटासाठी काम करत होते. त्यामुळे ‘देवबाप्पा’, ‘दूधभात’, ‘मोठी माणसं’, ‘मानाचं पान’ असे त्यांचे सगळेच सिनेमे कलाकृती म्हणून अप्रतिम आहेत.

‘पुलं’च्या बाबतीत अगदी खूप कमी लोकांना ठाऊक असलेली एक बाब म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना बरंचसं सामाजिक कार्यही केलं आहे. ‘मुक्तांगण’सारख्या अनेक संस्थांशी ते जोडलेले होते. याची नोंद फारशी घेतली जात नाही असं वाटतं. ती ही घेतली गेली पाहिजे. ‘पुलं’ म्हणजे संपूर्ण पुलं पाहिले गेले पाहिजेत असं वाटतं. ‘फिल्म अर्काइव्ह्ज’ला आजही ‘पुलं’चे चित्रपट उपलब्ध आहेत आणि ते कृष्णधवल स्वरूपात आहेत. त्यांनी अशा चित्रपटांचे खास महोत्सव आयोजित केले पाहिजेत, जेणेकरून ते आजच्या पिढीसमोर येतील. त्यासाठी मीही अनेकदा त्यांच्याशी बोलून याबाबत प्रयत्न केले आहेत.

आजही मी प्रवासात असताना गाडीत ‘निवडक पुलं’ ऐकत असतो. त्यात मग सखाराम गटणे असो किंवा ‘पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर’ असो किंवा मग आणखी काही... ते सगळंच मजेशीर आहे आणि हे खरं तर ‘टाइमलेस’ आहे असं मला वाटतं. ‘पुलं’ना तुम्ही कोणत्याही एका काळात थांबवू किंवा अडकवू शकत नाही. ‘पुलं’च्या साहित्यातलं काहीही घेतलं तरी ते आजच्या पिढीला चालणारं आणि कोणत्याही पिढीला आपलंसं वाटेल असंच आहे. ते साहित्य कोणत्याही एका काळात अडकणारं असं नाही. माणसाची वृत्ती कधीच बदलत नाही आणि ‘पुलं’चं साहित्य असंच प्रत्येक माणसाच्या वृत्तीशी खेळणारं आहे. त्यामुळे ते आजही आपलंसं वाटतं. केवळ आजच असं नाही, तर पुढच्या दहा पिढ्यांतही जे कोणी ते वाचेल, त्यालाही ते तेव्हाचंच वाटेल. असं ‘टाइमलेस’ असणं हेच ‘पुलं’च्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे.

- आदित्य सरपोतदार
मूळ स्रोत -> https://www.bytesofindia.com/P/IZVOBI
(शब्दांकन : मानसी मगरे)

Saturday, November 6, 2021

माझे जीवनगाणे - डॉ. प्रतिमा जगताप

सात नोव्हेंबर हा पं. जितेंद्र अभिषेकी यांचा स्मृतिदिन, तर आठ नोव्हेंबर हा पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन. याचं औचित्य साधून ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या ‘माझे जीवनगाणे’ या मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या, अभिषेकीबुवांनी गायलेल्या आणि ‘पुलं’नी संगीत दिलेल्या गाण्याबद्दल...

‘माझे जीवनगाणे’ हे गाणं ऐकतांना गाण्यातल्या पहिल्या तीन शब्दांबरोबर एकाच वेळी अभिषेकीबुवा, पु. ल. देशपांडे आणि मंगेश पाडगावकर या तीन महान व्यक्तींचं स्मरण होतं. एखादं गाणं असं जन्मत:च रत्नजडित स्वरमुकुट लेवून येतं. अनमोलत्वाचं बिरुद घेऊनच जन्माला येतं. तसंच या गाण्याचं झालं असं वाटतं... गाणं सुरू झाल्याबरोबर रसिकमनात आनंदलहरी उमटू लागतात. आपलं अवघं भावजीवन व्यापून टाकणारे मंगेश पाडगावकरांचे शब्द, अभिषेकीबुवांचे स्पष्ट उच्चार आणि लयकारीनं नटलेली गायकी आणि ‘पुलं’चं हवंहवंसं, रसिकांना आपलंसं करणारं, नव्हे पुलकित करणारं संगीत म्हणजेच ‘माझे जीवनगाणे’ हे गीत. रसिकहो हे लिहिता लिहिताच गाणं कानामनात सुरू झालंय...

माझे जीवनगाणे
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा ना दिसू दे
गात पुढे मज जाणे... माझे जीवनगाणे...

कुणाचं आहे हे स्वगत? कवी पाडगावकरांचं, बुवांचं की ‘पुलं’चं ? आत्ता या क्षणी वाटतंय, की तिघांचंही... पं. जितेंद्र अभिषेकी यांचा आज स्मृतिदिन. उद्या म्हणजे आठ नोव्हेंबरला ‘पुलं’चा जन्मदिन... या दिग्गजांच्या स्मरणयात्रेत कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या शब्दांची पालखी मन:चक्षूंपुढे झुलत चाललीय. खरंच हे गाणं ऐकणं म्हणजे एक अलौकिक अनुभव! शब्दांचा, स्वरांचा आणि गायनाचा... हा त्रिवेणी संगम आकाशवाणीतच व्हावा हा किती सुंदर योगायोग. ‘पुलं’ आकाशवाणीतच नाट्यनिर्माते होते, पाडगावकरही आकाशवाणीत कार्यरत होते आणि अभिषेकीबुवांनीही एका मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांनीही जवळजवळ साडेनऊ वर्षं आकाशवाणीत काम केलं होतं. ‘रेडिओत नसतो, तर असं चौफेर मी काहीच करू शकलो नसतो. नाटक, संगीत, दिग्दर्शन, स्वररचना या सगळ्या गोष्टी मी रेडिओमुळे मी करू शकलो,’ असं त्यांनी म्हटलं होतं. अभिषेकीबुवा १९४२च्या सुमारास पुण्यात आले. ‘गाणं हेच आपलं जगणं’ हाच ध्यास घेऊन बुवा मार्गक्रमण करत राहिले. अभिषेकीबुवांबद्दल ‘पुलं’ म्हणायचे, की दत्तगुरूंसारखे २१ गुरू त्यांनी केले. अभिषेकीबुवांनी विविध घराण्यांचा अभ्यास केला. मिंड, मुरकी, तान अशा प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास केला, प्रचंड मेहनत आणि रियाजानं कमावलेला आवाज ही बुवांची वैशिष्ट्यं. या सर्व वैशिष्ट्यांनिशी बुवांचं गाणं बहरत गेलं.

कधी ऐकतो गीत झऱ्यातून
वंशवनाच्या कधी मनातून
कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून
झुळझुळतात तराणे... माझे जीवनगाणे...

‘पुलं’ नाट्यनिर्माते म्हणून आकाशवाणीत असताना त्यांनी ‘भिल्लण’ ही संगीतिका केली होती. मंगेश पाडगावकरांचं काव्य, ‘पुलं’चं संगीत, मुख्य गायक पं. जितेंद्र अभिषेकी, विदुषी किशोरी आमोणकरही होत्या. आकाशवाणीवरून ही संगीतिका प्रसारित झाली होती, तेव्हा रसिक श्रोत्यांना श्रवणसुखाची पर्वणी अनुभवायला मिळाली असेल! आसमंतात ध्वनिलहरींऐवजी आनंदलहरी प्रसारित झाल्या असतील. ही संगीतिका प्रसारित होणार होती, तेव्हा बुवांनी आपल्या आईला, बहिणीला मोठ्या अभिमानानं सांगितलं होतं, ‘आज रात्री साडेआठ वाजता रेडिओ ऐका. तुम्हाला कळेल, की मी कोणत्या कामात गुंतलो होतो.’ रेडिओवर संगीतिका प्रसारित झाली आणि त्या संगीतिकेतील गाण्यांच्या आनंदलहरींवर आजतागायत मराठी मनं पुलकित होताहेत.

‘पुलं’ नेहमी म्हणायचे, की माझं पहिलं प्रेम संगीत! आणि मग साहित्य... बालगंधर्वांचं गाणं बालपणी कानावर पडलं आणि चांगल्या गाण्याचा बालमनावर झालेला संस्कार कधीही पुसला गेला नाही. गवई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही; पण उत्तम संगीतकार म्हणून ‘पुलं’ची ओळख अवघ्या संगीतविश्वाला झाली. ‘मी गाणं शिकतो’ या ‘पुलं’च्या एका लेखात त्यांच्या गाणं शिकण्याच्या धमाल गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. मुंबईला गेल्यावर पांडुबुवांकडच्या गायनाच्या क्लासच्या गमती वाचून आपली हसून हसून पुरेवाट होते. पांडुबुवा सगळ्यांना ‘देवराया’ म्हणायचे. हे सांगून ‘पुलं’नी गाण्याच्या क्लासमधल्या गंमती सांगताना त्यांच्यातला एक मजेदार संवाद लिहिलाय.

‘आवाज आणि आवाजी यात फरक कोणता?’ मी तसा चेंगट आहे.
‘तसा फरक नसतो देवराया.’
‘पण मग आवाज केव्हा म्हणायचा न् आवाजी केव्हा म्हणायचं ?’
‘हे पहा, एखाद्या बाईला बाई केव्हा म्हणायचं न् बया केव्हा म्हणायचं, याचा काही कायदा आहे का? पोराला पोरगंही म्हणतात, कार्टंही म्हणतात. आमचंच बघा ना, गायन क्लासला कधी आम्ही कलेची सेवा म्हणतो, तर कधी पोट जाळण्याचा धंदा म्हणतो. आता ‘सा’ लावा देवराया.’
‘का हो बुवा, ‘सा’ला ‘सा’ का म्हणतात?’
‘देवराया, आता आपलं डोकं...’
‘काय?’
‘नाही, उदाहरणार्थ... आपलं डोकं..’
‘माझं डोकं, त्याचं काय?’
‘आपल्या डोक्याला काय म्हणतात?’
‘डोकं’
‘डोकं, खोकं का नाही म्हणत? तसंच ‘सा’ला ‘बा’ म्हणून कसं चालेल ?’
आणि मग मी ‘सा’ लावला.

‘पुलं’च्या गळ्यातल्या ‘सा’ऐवजी पेटीवरचा ‘सा’ मात्र फुलत गेला. त्या ‘सा’ने त्यांची आयुष्यभर संगत केली. संगीतातला ‘सा’ आणि साहित्यातला ‘सा’ त्यांचं जीवनगाणं बनून राहिले. पार्ल्यातल्या अजमल रोडवरच्या त्रिंबक सदनात २२ रुपयांना विकत घेतलेली पेटी ‘पुलं’ना खूप प्रिय होती. पुलं म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या नुसत्या नावानं मराठी मन हरखून जातं. तुसड्या, माणूसघाण्या चेहऱ्यावरही स्मितरेषा उमटवणारं नाव म्हणजे ‘पुलं’! जिवंतपणी दंतकथा होण्याचं भाग्य लाभलेलं नाव म्हणजे ‘पुलं’! संगीतकलेबद्दल विलक्षण प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता असणाऱ्या ‘पुलं’नी संगीताविषयी भरभरून लिहिलंय. आपल्या भाषणांमधून सांगितलंय. भावगीत गायनाबद्दल अतिशय तळमळीनं त्यांनी लिहिलंय, ‘भावगीत गायन हा संगीत प्रकार टिकावा, असं गायकांना वाटत असेल, तर अभिजात संगीताचा अभ्यास अपरिहार्य आहे. त्याशिवाय लयीची आणि स्वरांची मूल्यं समजणं अशक्यच आहे.’

पं. जितेंद्र अभिषेकी यांचा आज स्मृतिदिन आणि उद्या ‘पुलं’चा जन्मदिन साजरा करताना कवी मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली आणि या दोन दिग्गजांच्या संगीतकलेनं मोहरलेली कविता गुणगुणत राहू या...

गा विहगांनो माझ्या संगे
सुरावरी हा जीव तरंगे
तुमच्या परी माझ्याही सुरातून
उसळे प्रेम दिवाणे... माझे जीवनगाणे...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४
(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)

(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदराचे पुस्तक आणि ई-बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)
https://www.bookganga.com/R/7W56G

मूळ स्रोत --> https://www.bytesofindia.com/