Wednesday, May 7, 2008

काही साहित्यिक भोग क्रमांक दोन

शिक्षणपध्दतीत बदल व्हायला हवा ही मानवी इतिहासात पहिली शाळा निघाली तेव्हापासुनची तक्रार आहे. हल्लीची पिढी बिघडली हे आदमने इव्हला म्हंटले होते, असे परवाच कुठेतरी वाचले. (`परवाच कुठेतरी वाचले' हे पळवाटीचे वाक्य शोधून काढणाऱ्या आद्द साहित्यिकाला आमचे दंडवत प्रणाम. ) शिक्षणपध्दती बिघडो की सुधरो, ह्या पध्दतीत विद्यार्थ्याचे हस्तलिखीत मासिक केव्हा शिरले कोण जाणे. आता हा साहित्य यातला उमलत्या कळ्यांच्या भुंगा गळत्या कळयांच्या मागे कसा लागतो तो भोग पहा.

स्थळ - आमचे तीन खॊल्यांचे घर पात्रे -
मुख्य पात्र - मी शिवाय `बालकिरण' हस्तलिखिताचे बाल संपादकमंडळ. एकुण तिघांचे. त्यात एक इयत्ता दहावी (क) मधील वर्गभगिनी कु. कुणीतरी. ती मुळी आमचा हाल कम बेडरुम हा फोटोग्राफरचा स्टुडिओ असावा अशा समजुतीने यत्किंचितही हालचाल न करता आणि चेहऱ्याची घडी बिघडली तर इस्त्रीला टाकावा लागेल अशा भीतीने बसल्यासारखी पोज घेऊन बसते. उरलेल्या दोन संपादकाचे वय आवाज नुकताच फुटतो त्या सुमाराचे. आता हा `भोग' मुलाखातीचा. ही मुलाखात शक्य तितकी जोडारक्षरविरहीत द्यावी असे अनुभवाने आमच्या ध्यानात आले आहे. लेखन म्हणावे, वाड:मय म्हणू नये. त्याचे `वांगमय' होते. काही काही शब्दांतुन त्या हस्तलिखीत मासिकात सत्याच्या अधिक जवळ जाणाऱ्या चुका होतात. उदाहरणार्थ, साहित्याची `मुढभुत' प्रेरणा, साहित्यातील `समीक्ष शहा'. नवकथेचे `आद्य' प्रवर्तक, इ.इ. तरीही शेवटी आपली मुलाखत पहा. त्यात बालचित्रकार उर्फ भावी रंगसम्राट अरूण खोडवे ( इयत्ता ११ वी, ब) यांनी बाबू जगजीवनराम, डॉ. लोहिया किंवा मार्शल टोटो यांपैकी कुणाच्या तरी वित्रावरुन पेन्सिल, कोळसा आणि अर्थातच रबर घालुन चित्र काढले होते. त्याखाली `ओळखा पाहू' असे शिर्षक. (चित्राच्या तळाशी मजकुर लिहीतात त्याला खरे तर `तळक' म्हणायला हवे. किंवा वर देतात तो मथळा असल्यास लिखामध्ये आल्यावर `कोथळा' आणि खाली दिल्यास `लाथळा' म्हणावे.) पान सत्तावन पहा म्हटल्यावर मी त्या पानावर गेलो. त्यावरुन ते चित्र आमचे होते हे उघडकीला आले. मी मुलाखत दिली होती ती येणेप्रमाणे 

बालसंपादक कुमार अजित रेवणकर - हल्लीच्या शालेय विद्यार्थ्याबद्दल आपल्याला काय वाटत? 

मी - (`कान उपटवुन अभ्यासाला बसावावं, असं वाटतं' हे उत्तर गिळून ) मला अभिमान वाटतो. विद्यार्थ्याची प्रत्येक क्षेत्रातली प्रगती पाहून मी थक्क होतो आणि विद्यार्थीनीचीही. (इथे ती बालसंपादिका जरा तरी गाल वाकडा करील असे वाटत होते. पण छे!) 

बालसंपादक - आपला आवडता लेखक कोण? 

मी - (अर्भकांनो, या प्रश्नाचं तुम्हांला कुठल्याही हाडाच्या, रक्ताच्या, अश्रूच्या किंवा चरबीच्यासुध्दा साहित्यिकाकडुन कधीही खरे उत्तर मिळणार नाही.) आता खरं सांगायचं, तर माझा आवडता लेखक अमुक एक असं सांगता येणार नाही. पण कालिदास, भवबूती, शेक्सिपीअर, टॉलस्टॉय, ज्ञानेश्वर, व्हाल्टेअर, रुसो, बर्नाड शॉ.. (हस्तकिखितात टॉलस्टॉयचा `स्टॉलटॉय' आणि बर्नाड शॉचा `बलाढ्य शहा' असे झालेच. मी ह्या यादित आणखीही चारपाच युरोपीय घुसवले होते, पण संपादकांना त्याची नावे टिपता आली नव्हती.) 

विद्या - हरी नारायण आपट्यांबद्दल आपलं काय मत आहे? 

मी- (असे बोला. दिवंगत साहित्यिकाला आकाशापर्यंत पोहोचवायची आपली तयारी आहे.) हरी नारायण आपटे, राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्यासारखे साहित्यिक पुन्हा होणार नाहीत. बा.सं. आपल्याला सुरुवातीच्या काळात खरं मार्गदर्शन कोणी केलं? मी - माझी शालेय गुरुजी घोडेगावकर सर यांनी (`गधड्या' ऎक माझं असल्या काऊ चिऊच्या गोष्टी लिहीण्याऎवजी जरा अभ्यास कर. पुस्तक लिहुन कधी कोणाचं भलं झालंय?' माझ्या त्या घोडेगावकर सरांचं हे मार्गदर्शन त्या वेळी ऎकलं नाही म्हणून तर हे भोग) घोडेगावकर सर म्हटले की तेथे कर माझे जुळती. (वास्तविक ह्या घोडेगावकर सरांनी मी मॅट्रिकच्या वर्गात असताना चौदा मुलींच्या देखत मला बाकावर उभे केले होते. पण मुलाखतीत मात्र-) घोडेगावकर सरांनी मला जीवनाचं विहंगमावलोकन करायला शिकवलं (हस्तलिखितात `विहंगमावलोकन' चे `हंगामी लेखन' करायला शिकवले असे लिहीले होते.)

बा.सं. - आपला आवडता छंद कोणता? 

मी - पोस्टाची तिकीटं जमवणं, डोंगर चढणं, काड्याच्या रिकाम्या पेट्या गोळा करणं, जुनी नाणी गोळा करणं. यावरील बा.स. चे भाष्य;"आम्ही हा संग्रह पाहावयास मागितला त्या वेळी काकांनी आम्हाला जी दारुण कहाणी सांगितली ती तर `हृदयदावकच होती. काका म्हणाले, `ती एक करुण कहाणी आहे. माझे हे सारे संग्रह पानशेतच्या पुरात वाहुन गेले'" ( डझनभर साहित्यीकांची न केलेल्या संशोधनाची हस्तलिखिते वाहुन गेली, तर आपण कधी न केलेला संग्रह पुरात ढकलून दिला म्हणुन काय बिघडले?) "काकांच्या तोंडुन जी कथा ऐकतांना आमचे डोळे पाणावले, म्हणुन आम्ही म्हणालो, "आपल्याला खूप दु:ख झाले असेल." मी - लहानपणापासून कसलेही दु:ख पचवण्याची स्वय आमच्या आजोबांनी आम्हाला लावली. (त्यांनी. (त्यांनी आम्हाला पहाटे उठा, अभ्यास करा, शिवाय हे करा- इथे जा, हे आणा, तिथे जा, ते आणा - अशी नाना दु:ख द्यायची आणि आमची दु:खांची पचनशक्ती वाढवायची ही आमच्या घराण्याची परंपरा ह्या नव्या पिढीला कशाला सांगा?) 

बा.सं. - मग आता पोष्टाची तिकीटे वगैरे जमवता का? 

मी - नाही, आता अधूनमधून नाणी जमवतो. (बाळांनो, त्याशिवाय दुपार टळत नाही हे तुम्हाला आणखी आठ दहा वर्षात कळेल.) 

बा.सं. - आपला आवडता खेळ कुठला? (बालसंपादक मंडळ `आवडत्या' पलीकडे सहसा जात नसत.) 

मी - मला सर्वच खेळ आवडतात (साहित्याच्या रिंगणात `चिखलपेक' हा एक अत्यंत लोकप्रिय खेळ आहे हे तुम्हाला आता सांगण्यात अर्थ नाही) पण क्रिकेट हा माझा आवडता खेळ. आमच्या कॉलेजच्या टीममधे मी होतो. (स्कोअररचा मदतनीस हा तपशील संगीतला नाही) जाऊ दे, ती एक निराळी कथा आहे. बा.सं. चे हस्तलिखीत भाष्य- `आपण क्रिकेट कां सोडला हे काकांनी आम्हाला सांगितल नाही. पण त्या कथेतली व्यथा आम्हाला जाणवली. `(बालसंपादकाच्या हाती मराठीतला समिक्षात्मक केळ कधी तरी लागलेला दिसतो. एरवी कथा-व्यथा प्रास त्याला ह्या वयात सुचु नये.) 

बा.सं. - आपला आवडता नट कोणता? 

मी - अखिम टिमेरॉफ, तुम्ही नाव ऎकलच असेल. बा.सं. - हो, हो (होणार, हा पोरगा नक्की पत्रकार होणार. ह्याच्या जन्मा आधी आखिम टिमेरॉफ थडग्यात गेला होता. हस्तलिखितात `अखिम टिमेरॉफ' चा `अफिम टिमेराव' झाला होता.) 

बा.सं. - लेखक व्हायला काय पूर्वतयारी करावी लागते? 

मी - (कोरे किंवा शाळा कॉलेजात परिक्षक होण्याचा चान्स मिळत असल्यास पाठकोरे कागद साठवून ठेवावे लागतात. पेनात शाई भरावी लागते.) पूर्वतयारी? सतत चिंतन. साहित्यिक जीवनासंबधी विचारग्रस्त असावा लागतो. (हस्तलिखितात `विचार गृहस्थ' झाले होते.) 

बा.सं. - आपण चिंतन केव्हा करता? 

मी- भल्या पहाटे. 

बा.सं. - लेखकाने पहाटे उठायला हवं का? 

मी- (अर्थात म्हणजे काय दूधवाला आहे?) अर्थात! जगातले सारे लेखक पहाटेच उठायचे. शेक्सपिअर पहाटे पाच वाजता उठून, आव्हन नदीत स्नान करुन, चर्चला तीन प्रदक्षिणा घालायचा आणि मगच नाटक लिहायला बसायचा, असे मी अलिकडेच कुठेसे वाचले आहे. लंडनला रहायला आल्यानंतर त्याची टेम्स नदीची आंघोळी आणि सेंट पॉलच्या चर्चची प्रदक्षिणा चुकली नाही ( हस्तलिखितात टेम्स नदिची `टम्स' नदी आणि सेंट पॉलच्या चर्चचे `संपलेले चर्च' झाले होते.) 

बा.सं. - काका, तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय आनंदाचा प्रसंग कुठला?

मी - पुष्कळ आहेत. (खरे प्रसंग (अ) गेल्याच आठवड्यात शेजारच्या शेंडे डॉक्टरांचे रात्रंदिवस उच्छाद मांडणारे कुत्रे मेले. (ब) वरच्या गोखल्यांची सुमी त्यांच्याच ड्रायव्हरचा हात धरुन पळाली. (क) आमचे किराणा भुसारवाले गणुशेट (आन्ड सन्संचे फादर) यांनी मोड परत करताना वीस पैसे अधिक दिले. किती म्हणुन अविस्मरणीय प्रसंग सांगावे? पण ह्यात साहित्यिक अविस्मरणियता नाही.) माझा आयुष्यातला अविस्मरणीय आनंदाचा प्रसंग म्हणजे एस. टी. स्टांड वरून एका वृद्ध बाई ची भाजीची टोपली मी स्वत: उचलून डोक्यावर घेतली आणि स्वारगेट पासून मंडई पर्यंत तिला सोबत केली. (न्या. मू. महादेव गोवींद रानडे यांच्या आत्म्याने मला क्षमा करावी. त्यांनी एका म्हतारीच्या टोपलीला उचालायला हात लावल्याची कथा मी वाचली होती. ती सत्यकथा मी ललित केली एवढेच. कथेचे बीज फुलवुन तिला गतिमान करणे म्हणजे नाही तरी दुसरे काय असते?) 

बा.सं. - हल्लीची तरुण पीढी बेजबाबदार झाली आहे का? (हा प्रश्न हेडमास्तरांनी लिहुन दिलेला असावा. पाहुण्याच्या हातुन विंचू मारायचा डाव आम्ही ओळखत नाही की काय?) 

मी - भलतंच? हल्लीच्या तरुण पिढिएतकी जबाबदार पिढी मी यापुर्वी कधीही पाहिली नाही (संपादक मंडळ खूष!) 

बा.सं. - भारताचं भवितव्य तरुण पिढिच्या हातात असावं का?

मी - अर्थात. (आपल्या `बा' चे काय जाते!) बा.सं. नी जोडलेले शेपूट- `हल्लीचे वृध्द आता म्हातारे झाले आहेत' असे काकांचे स्पष्ट मत ऎकुन आम्हाला आनंद झाला. आम्ही काकांचा निरोप घेतला हास्यविनोदाच्या लहरीवर पोहण्यात आमचा वेळ कसा गेला ते आम्हाला कळले नाही. `उद्दाच्या ज्ञानेश्वर, गोविंदाग्रजांनो या.' हे काकांचे वाक्य आमच्या कानात घुमत होते.

- पु. ल. देशपांडे 
अघळपघळ 

2 प्रतिक्रिया:

villager said...

...awe..some, grt..

Learn Marathi by Kaushik Lele said...

सगळीकडे "विद्दार्थी" लिहिलंय ते बदलून त्याचे विद्यार्थी करा.