Friday, November 8, 2019

पुलंचा आठव..

एखाद्या रागात वर्ज्य मानलेला सूर दुसऱ्या रागात संवादी असू शकतो, हे सच्चा संगीतप्रेमी समजू शकतो. पु. ल. देशपांडे हे तसे होते..

आपापले वैविध्य जपूनही धर्मजातपातविरहित राहणाऱ्या मोकळेपणाच्या संस्कृतीची गोष्ट ‘बटाटय़ाच्या चाळी’तून सांगणारे पु.ल. हे या महाराष्ट्रीय संस्कृतीतील खरेपणाच्या मूल्यास मानणारे होते. त्यामुळेच सर्व राजकीय विचारधारांच्या टोप्या त्यांनी उडवल्या, तरी दुस्वास कोणाचा केला नाही. पुलंचे हे गुण पुलंसोबतच संपले, असे म्हणावे लागते..

बळवंतराव टिळकांचा कित्ता घेण्यापेक्षा त्यांचा अडकित्ता घेणे हे सर्वकालीन सोयीचे होते. म्हणून समाजाने तेच केले. यात विशेष काही नाही. कारण सर्वसामान्यांना नेहमीच सुलभतेचा सोस असतो. हे अटळ आहे. लोकमान्यांनंतर महाराष्ट्रात इतकी लोकप्रियता लाभलेली व्यक्ती म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. टिळक ते पु.ल. यांदरम्यानच्या टप्प्यात आचार्य अत्रे नावाचे एक अजस्र व्यक्तिमत्त्व या राज्यात होऊन गेले. अत्र्यांवर मराठी माणसाने प्रेम केलेच. पण त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय होती. त्यात अत्र्यांची शत्रू निर्माण करण्याची खुमखुमी. पुलंच्या बाबत असे काही घडले नाही. याचा अर्थ शत्रुत्व नको म्हणून पु.ल. नेहमी व्यवस्थेशी जुळवून घेण्याचे मराठी कलावंतांचे अंगभूत चातुर्य कुरवाळत बसले असे नाही. जेथे घ्यायला हवी तेथे त्यांनी आवश्यक ती भूमिका घेतली. पण त्या भूमिकेची आवश्यकता संपल्यावर देशपांडे पुन्हा आपल्या ‘पु.ल.’पणात परत गेले. टिळकांप्रमाणे महाराष्ट्राने पुलंवर भरघोस प्रेम केले खरे. पण अंगीकार मात्र कित्त्यापेक्षा अडकित्त्याचाच केला. समग्र ‘पु.ल.’पणातील त्यांच्या नावचे खरेखोटे विनोद तेवढे पुढे पुढे जात राहिले. अफवा ज्याप्रमाणे माध्यमाखेरीजही पसरू शकतात, तसेच हे. अशा वेळी महाराष्ट्रधर्म आणि ‘पु.ल.’पणा यांचा आढावा घेणे गरजेचे ठरते. तो घेताना पु.ल. नेमके कशासाठी आठवायचे, या प्रश्नास भिडावे लागेल.

याचे कारण आजच्या सर्वार्थाने फ्लॅट संस्कृतीतील उच्चभ्रू मध्यमवर्गीय आपल्या सांस्कृतिक जिवंतपणाचा पुरावा म्हणून पु.ल. तोंडी लावत असतो आणि ‘बटाटय़ाच्या चाळी’चे गोडवे गातो. ही ‘बटाटय़ाची चाळ’ हे वाङ्मयीनदृष्टय़ा स्मरणरंजन आहे. पण सामाजिकदृष्टय़ा पाहू गेल्यास ते निर्मम, धर्मजातपातविरहित मोकळेपणाच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. त्या मोकळेपणाच्या वातावरणात पापलेटे आणणाऱ्या कामतमामांच्या हातात जोडीला कोचरेकर मास्तर आहेत. त्रिलोकेकरणीने खास प्रवासासाठी करून दिलेला गोडीबटाटीचा रस्सा मांडीवर सांडला तरी सहन करणारे शेजारी आहेत. ते वाचताना विनोदाने हसू फुटते हे नैसर्गिक. पण त्यामुळे त्यातील खरा आशय दुर्लक्षित राहतो किंवा तो मुद्दामहून दुर्लक्षित ठेवला जातो, असेही म्हणता येईल. ज्या मुंबईत ही बटाटय़ाची चाळ दिमाखात उभी होती, त्याच मुंबईत आज मांसमच्छी खाणाऱ्यांना घरे नाकारणाऱ्या इमारती उभ्या राहतात, याइतका पुलंचा पराभव दुसरा नसेल. तो त्यांना प्रिय मुंबईने केला हे विशेष. या अशा ‘फक्त शाकाहारी’ इमारती उभारणाऱ्यांना मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी वगरे लढणाऱ्या पक्षांचेच संरक्षण आहे, ही बाब पुलंचा पराभव मराठी माणसांनीच केला हे सिद्ध करण्यास पुरेशी ठरते. ‘मी माझा’ या संकुचित वातावरणात ‘बटाटय़ाची चाळ’ ‘एन्जॉय’ करणारे (आनंद घेणारे नव्हेत) दुसरे काय दर्शवतात?

तीच बाब ‘होल केऑसमधून कॉसमॉस निर्माण’ होत असतानाची बाष्कळ बडबड करणाऱ्या ‘असा मी असामी’तील ‘स्पिरिच्युअल’ बाबांबाबत आजही लागू पडते. या बोगस बाबाची यथेच्छ टवाळी पु.ल. करतात. त्यांचा अप्पा भिंगार्डे या बाबाच्या प्रवचनात ‘‘पारशिणीच्या उघडय़ा पाठीकडे’’ पाहात ‘‘ईऽ ठय़ांऽऽश’’ अशा केवळ पुलंच लिहू शकतील अशा आवाजात शिंकतो. अशा दरबारी बाबांकडे जाण्याची गरज वाटणाऱ्या श्रीमंत वर्गाचे प्रतीक म्हणजे ती पारशीण आणि या सगळ्याविषयी अंगभूत तुच्छता दाखवणारा अप्पा भिंगार्डे हा खरा मराठी. या मराठीस काहीएक प्रबोधनाची परंपरा आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा, रामदास आदी हे संत होते. पण बाबा वा बापू नव्हते. आजच्या मराठी माणसास या दोहोंतील फरक कळेनासा झाला आहे. त्यामुळे या मराठी माणसाची अवस्था पिठात पाणी घालून दूध म्हणून प्यायची सवय झालेल्या अश्वत्थाम्यासारखी झाली आहे. जेव्हा त्यास खरे दूध मिळाले तेव्हा त्याने थू थू म्हणत ते थुंकून टाकले. आजचा सर्वसामान्य मराठी हा असा खऱ्या मूल्यांना झिडकारतो. असे होते याचे कारण तेच. पुलंचा कित्ता न घेता अडकित्ताच घेतला, हे.

पुलंच्या नंतर महाराष्ट्रास विसर पडलेला तिसरा मुद्दा म्हणजे विनोद आणि विद्वत्ता एकत्र नांदू शकते, हे वास्तव. पुलंच्या ठायी ती होती. त्यामुळेच राजकीय विचारधारा असोत वा रवींद्रनाथांचे वाङ्मय वा शेक्सपीअर आदींच्या अभिजात कलाकृती. पुलंनी त्या केवळ नुसत्याच वाचलेल्या नव्हत्या, तर आत्मसात केल्या होत्या. यामुळे त्यांच्यातील लेखकाने विद्वत्तेस पर्याय म्हणून कधी विनोदाचा आसरा घेतला नाही. पुलोत्तर काळात नेमके हेच दिसून येते. या काळात विनोदाचे निर्बुद्धीकरण सामूहिकरीत्या झाले. खाली पडणे नैसर्गिक असते. त्यासाठी गुरुत्वीय बल काम करतेच. त्याविरोधात, म्हणजे गुरुत्वीय बल खाली खेचत असताना त्याविरोधात काम करणे हे खरे आव्हान. ते पुलंनी आयुष्यभर पेलले. त्यामुळे त्यांच्या विनोदास गुरुत्वीय बल खाली ओढू शकले नाही. त्यास विद्वत्तेचा वरून आधार होता. त्यानंतरच्या काळात विनोदाचा दर्जा किती खालावला, हे सांगण्यास उदाहरणांची कमतरता नाही. उलट ती मुबलक आहेत. परिणामी विनोदकार गांभीर्याने घेण्याच्या लायकीचे नसतात, असा समज दृढ झाला. असे होणे या विनोदकारांचा दर्जा पाहता खरे असले, तरी पुलंना घडवणाऱ्या महाराष्ट्राचा तो अपमान आहे, हे आपण विसरलो आहोत. हे अधिक दु:खदायी.

चौथा मुद्दा विरोधक म्हणजे शत्रू असे मानण्याचा. ज्ञानेश्वर ‘दुरिताचे (दुरितांचे नव्हे) तिमिर जावो’ अशी इच्छा बाळगतात. कारण हे ‘तिमिर’ वगळले तर उर्वरित व्यक्ती ही नकोशी वाटायचे कारण नाही. पुलंचा जीवनविषयक दृष्टिकोन हा असा होता. त्यांनी गांधीवाद्यांच्या साधेपणाच्या अतिरेकाची चेष्टा केली, समाजवाद्यांच्या भोंगळपणाची यथेच्छ टिंगल केली, काँग्रेसी बनेलपणाच्या आणि संघीयांच्या साजूक सात्त्विकतेच्या टोप्या उडवल्या. पण वैयक्तिक आयुष्यात यातील कोणाचाही दुस्वास पुलंनी कधी केला नाही. आपल्या विचाराचा नाही, म्हणजे त्याचे सर्वच निंदनीय असे मानणारे महाराष्ट्राचे संकुचित वर्तमान पुलंच्या भूतकाळात या राज्याने कधीही अनुभवले नाही. यातील सर्वच विचारसरणींतील त्रुटी पुलंनी आपल्या शैलीने दाखवल्या. पण एस. एम. जोशी ते स. ह. देशपांडे अशा अनेकांच्या गौरवांकित कार्याशी पु.ल. आपुलकीने समरस झाले होते. हा मोकळेपणा पुढच्या काळात महाराष्ट्राने गमावला. म्हणजे पुलंना पुन्हा एकदा आपण विसरलो.

हे असे सांस्कृतिक- सामाजिक मोकळेपण त्यांच्या संगीतप्रेमामुळे आले असेल का? असेलही तसे. कारण रागात एखादा वर्ज्य स्वर असला म्हणून त्या स्वराच्या नावाने बोटे मोडायची नसतात, ही संगीताची शिकवण. तो एखाद्या रागाशी विसंवाद असणारा एखादा सूर दुसऱ्या रागात संवादी असू शकतो हे सच्चा संगीतप्रेमी समजू शकतो. पु.ल. तसे होते. पण त्यांचे हे संगीतप्रेमही आपण मागे सोडले आणि गोंधळास जवळ केले.

हा गोंधळ म्हणजे लग्नघरातला हवाहवासा गोंधळ नव्हे. ‘नारायणा’ची जागा कंत्राटदारांनी घेतल्यावर तो गोंधळही ठरावीक- उदाहरणार्थ ‘जूते’ लपविण्यासारख्या प्रसंगीच तेवढा होतो. म्हणजे काळ बदलला, हे खरेच. आपण असे नव्हतो, असे रडगाणे गाण्यात आता अर्थ नाही हेही खरे. पण आपण कसे होतो समजण्यासाठी पुलंचा आठव आवश्यक असतो. आज ते असते तर शंभर वर्षांचे झाले असते. या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांचा हा आठव.

लोकसत्ता
८ नोव्हेंबर २०१९


1 प्रतिक्रिया: