आपल्या प्रतिभेने साहित्यविश्व प्रकाशित करणारे लेखक थोडेच असतात; पण ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आणि व्यक्तित्व साहित्याच्या सीमा ओलांडून समाजाच्या सांस्कृतिक खजिन्यात जमा झालेले असते, असे लेखक त्याहून थोडे असतात. असे लेखक केवळ वाङ्मयीन व्यवहाराचे नाही, तर समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे नेतृत्व करीत असतात. ग्रंथालयाच्या कपाटांतून बाहेर पडणारे त्यांचे साहित्य केवळ वाचकांपर्यंतच नव्हे, तर समाजातील अ-वाचकांपर्यंतही संस्काररूपाने पोहोचलेले असते.
पु.ल.देशपांडे हे अश्या लेखकांपैकी आहेत, ते कोठल्याही वाङ्मयीन पंथाचे वा उपपंथाचे नाहीत, ते सर्व समाजाचे झालेले आहेत. समाजाच्या केवळ आदराचेच नव्हे, तर हार्दिक प्रेमाचेही धनी आहेत. अक्षरांशी थोडा-फार, प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध असलेला असा एकही मराठी माणूस नसेल, की पु.ल.देशपांडे हे नाव उच्चारताच, ज्याच्या मनामध्ये निर्मळ आनंदाची लहर उमटणार नाही. पुलंचे अस्तित्व ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील एक सुखदायी घटना आहे. या बहुरूपी आणि बहुस्तरीय अस्तित्वाचा मूलाधार अर्थात विनोद हा आहे. माणसाचे जगणे इतके गुंतागुंतीचे आणि बहुधा इतके तणावपूर्ण असते की; स्वच्छ, सुंदर विनोदाचा अनुभव त्याला केतकीच्या बनातून येणाऱ्या वाऱ्यासारखा आल्हाददायक आणि संजीवक वाटतो.
अशा निर्मळ, आल्हाददायक विनोदाचा अनुभव मराठी वाचकांना त्यांनी दिला आहे. पुन्हा हा विनोद नेहमी मनुष्यगणी राहिलेला आहे. कधी राक्षसगणी झालेला नाही. मनुष्यगणी विनोद हसवणारा, पण संस्कृतीच्या मूलभूत मूल्यांची राखण करणारा; तर इतर राक्षसगणी विनोद हा द्वेषाची दुर्गंधी असलेला आणि सत्प्रवृत्तीवर वा कार्यावर ओरखडे काढणारा असतो. पुलंनी ही लक्ष्मणरेषा सतत सांभाळली आहे. विनोदप्रमाणेच नाट्य, चित्रपट, अभिनय, काव्यवाचन अशा अनेक लोकाभिमुख कलाप्रांतांतही त्यांनी आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. खरे तर या सर्वांमुळे 'एक ज्येष्ठ साहित्यिक' एवढीच मर्यादित प्रतिमा त्यांना लाभली असती, पण तसे घडलेले नाही.
प्रारंभी म्हटल्याप्रमाणेच त्यांच्या लोकमानसातील प्रतिभेला केवळ वाङ्मयीन नव्हे, तर एक खूप अधिक असे सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. मूलभूत जीवनमूल्यांवर त्यांची अविचल आणि अभेद्य निष्ठा आहे. त्यांच्या लेखनातून, भाषणातून आणि कलाकृतींतून या श्रद्धांचा प्रकाश समाजाला सतत लाभला आहे. म्हणून पु.ल. केवळ थोर वाङ्मयकार नाहीत, तर समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे नेतेही आहेत. या नेतृत्वाचा हा अमृतोत्सव. माझ्या बरोबर सर्व नाशिककरांचीही शुभेच्छा!
शत शरदांचे सुभग चांदणे, उजळो वाटेवर।
लाभो संसारातिल सारे, सुखदायी सुंदर।।
- कुसुमाग्रज
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Wednesday, March 2, 2022
पु.ल. हे सांस्कृतिक जीवनाचे नेते - कुसुमाग्रज
Labels:
PL Deshpande,
Pula,
pulaprem,
कुसुमाग्रज,
पु.ल.,
पु.लं.,
पुलं
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment