आता साठीच्या उंबरठ्यावरून माझ्या गतायुष्याकडे पाहू जाते तेव्हा वाटतं, देवाने अनेक गोष्टींबाबत माझ्या पदरात अवास्तव झुकतं माप टाकलंय. आयुष्यात मला अनेक मित्रमैत्रिणी लाभल्या हे त्यातलंच एक. कुणालाही हेवा वाटावा अशी ही आमची मित्रसंपदा. या सार्यांनी इथवर निरलसपणे सोबत केली. माझ्यावर खूप प्रेम केलं आणि वेळोवेळी माझं वाजवीपेक्षा कांकणभर जास्तच कौतुकही केलं. अशा या गोतावळ्यात स्वतःच्या अगदी खास वेगळेपणानं आमच्यातलं मैत्र जपणारा एक पराकोटीचा सुसंस्कृत मित्र या वाटचालीत आमच्या सोबतीला होता, त्याचं नाव होतं पु. ल. देशपांडे.
पुलंच्या साठीनिमित्त अगोदरच्याच रविवारी सर्व मराठी वृत्तपत्रांनी भरभरून पुरवण्या पुलंचं अभीष्टचिंतन करण्यासाठी काढल्या होत्या. सकाळी उठून त्या वाचल्यावर वाटलं, या पुलंना जाऊन प्रत्यक्ष भेटावंच आता. लगेचच सलील घोषला उतावळेपणानं फोन करून सांगितलं, तर तो म्हणाला, ‘चला आताच जाऊ.‘ वेड्यासारखे आम्ही दोघं (मी व माझे पती), सलील आणि त्याची पत्नी शार्लट असे निघोला आणि भर दुपारी पुलंच्या घरी जाऊन थडकलो. पुल आणि सुनीताबाईंनी प्रेमानं आमचं आगतस्वागत केलं. मग दुपारभर सलील हुकूम सोडत होता आणि पुल ते ते करत होते. सलील म्हणाला, या दोघांबरोबर तुमचा फोटो काढतो. लगेच पुलंनी आमच्यासोबत फोटो काढू दिला. त्यानंतर सलील म्हणाला, ‘ही दोघं तुझी चाहतेमंडळी आहेत. त्यांनी तुझं सारं लेखन वाचलंय. तर त्यांना आता नवीन काही वाचून दाखव.‘ रविवार दुपारच्या भरपेट जेवणानंतरचा वामकुक्षीचा अधिकार आपल्याच घरात आगंतुकपणे येऊन आपल्याला नाकारणार्या या मित्रावर न रागावता, उलट त्याचा मान राखत पुलंनी शेजारच्या टेबलावरचा मौजेचा दिवाळी अंक उचलला आणि त्यातला बेगम अख्तरवरचा ताजा, ताजा लांबलचक लेख अगदी आनंदानं खास पुलशैलीत आम्हाला वाचून दाखवला. पुलंशी झालेल्या या पहिल्याच भेटीत पुल आणि सलीलमधल्या मैत्रीचं दर्शन आणि ते मैत्र जपणार्या पुलंचं एक देखणं सुसंस्कृतपण मला अगदी दिपवून गेलं.
घरी परतल्यावर मी पुलंना पत्र लिहिलं, ‘इतकी वर्षं माझ्या मनात आदरापोटी मी बहाल केलेल्या एका उच्चासनावर तुम्ही विराजमान झालेले होतात. पण प्रत्यक्ष भेटीत मात्र तुमच्यातला मित्रच मला खूप भावला. तुमच्याशी मैत्री जुळावी असं खूप वाटतंय, पण त्याच वेळी तुमच्या आणि आम्हा दोघांच्या बुद्धीतलं अंतर ठाऊक असल्याने ते अशक्य आहे, हेही ध्यानात येतंय.‘ या पत्राला अगदी उलटटपाली उत्तर आलं की, ‘मी वयानं जरी खूप वडीलधारा असलो, तरी या बाबतीत मी रवींद्रनाथांसारखंच म्हणेन की, मी सर्वांच्याच समवयस्क आहे, मग माझ्या केसांनी कितीही रूपेरीपणा का धारण केलेला असेना. आता बुद्धीबद्दल म्हणायचं तर बुद्धी ही सापेक्ष गोष्ट आहे. तुम्हाला वैद्यकात असलेली बुद्धी माझ्यापाशी कुठं आहे?‘
स्वतःची थोरवी नेमकेपणानं ओळखूनही समोरच्या आम्हा दोघांसारख्या सामान्य माणसांसाठी पुढे केलेला हा मैत्रीचा हात पुलंनी कधीही आखडता तर घेतला नाहीच, पण आमच्या मुलांवरही ते माया करीत राहिले, एका मित्राच्या भूमिकेतूनच.
वास्तविक तो काळ आमच्या कौटुंबिक जीवनात कसोटीचाच होता. अचानक आम्हा दोघांच्या तब्येती पार ढासळल्या होत्या. ज्या आप्तेष्टांवर आजवर तनमनधनाची पर्वा न करता प्रेम केलं होतं, त्यांनी सोयिस्करपणे काढता पाय घेतला होता. मुलं वाढवताना तेव्हा आम्हाला एक विचित्र एकाकीपण जाणवत होतं. त्याबाबतीत काहीच आम्ही कधी शब्दात पुलंना सांगितलं नव्हतं. पण त्यांच्यातला स्नेही हे सारं जणू ओळखूनच वागत राहिला. माझ्या पत्रांना प्रेमानं उत्तर पाठवत राहिला. पुण्याहून येताना दरवेळी सुनीताबाई कॅम्पातले खोबर्याचे मशरूम्स माझ्या लेकीसाठी हमखास आणायच्या, तशी उस्तवारी पुलंनी कधी केली नाही. कदाचित सुनीताबाई ते सारं तितक्याच मायेने आणि अगत्याने करत असल्याने पुलंना तशी तसदी घ्यावीशी वाटली नसेल. पण अशा देवाणघेवाणीपलीकडचा स्नेह ते जाणीवपूर्वक जपताना दिसायचे. मुलांना काय दाखवावं, त्यांनी काय ऐकावं, हे तर ते आम्हाला सांगतच, पण मुलांना वाढवण्यासाठी आम्हीही सतत वाढत राहाणं आवश्यक आहे, त्यासाठी आमचे छंद जोपासणं आवश्यक आहे, म्हणून आम्हालाही सतत काही ना काही ते सुचवत राहिले. आज विचार करू लागले तर वाटतं की, आज आम्ही चौघंही ज्या विविध गोष्टीत रमतो, त्यातली आमची पहिली काही पावलं पुलंनी आम्हाला सोबत दिल्यानंच त्या त्या मार्गावर पडली होती.
एकदा आम्ही आनंदवनात गेलो असताना विकासने बाबांना पुलंनी पाठवलेल्या पत्रांची फाईल दाखविली. ती पाहिल्यावर माझ्या जेमतेम पहिलीतल्या लेकाने पुलंना पत्र पाठवण्याचा सपाटा लावला. त्यातल्या प्रत्येक पत्राला उलटटपाली त्याच्या वयाला साजेल, समजेल अशा भाषेत उत्तरं येत गेलेली पाहून मी अगदी संकोचून गेले. पुलंना फोन केला आणि म्हटलं, ‘हा त्याचा एक पोरखेळ आहे, त्यासाठी तुम्ही एवढी तसदी नका घेऊ.‘ त्यावर ते म्हणाले, ‘अगं लहान मूल असं काही जेव्हा करत राहातं नं, तेव्हा त्याला मनातूनच ते करावंसं वाटत असतं म्हणून. मग त्याला तसाच प्रतिसाद देण्यात मोठ्यांना त्रास कसा वाटेल?‘ मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. मुलांची कोवळी मनं जपली पाहिजेत, वगैरे भाषणबाजी आपण नेहमी ऐकतो, पण प्रत्यक्षात त्या मुलांशी प्रेमानं वागताना स्वतः तोशीस घेणारे किती जण असतात?
पुढे मुलं मोठी होतानाच पु.ल. एन.सी.पी.ए.त डायरेक्टर म्हणून आले. तिथं खरं तर डायरेक्टरसाठी खास बंगला आहे. पण तो नाकारून एन.सी.पी.ए.च्या गेस्ट हाऊसमध्येच ते राहायचे. सपाटून काम करायचे. त्यांचा समवयस्क मित्रपरिवारही मुंबईत भरपूर होता. पण तरीही आवर्जून ते आमच्यासाठी आणि विशेषतः मुलांसाठी वेळ काढत राहायचे. मुलांनी एन.सी.पी.ए.त होणारा केलूचरण महापात्रांच्या नृत्याचा कार्यक्रम पाहावा, मार्सेल मार्सेचा मुखवटे आणि चेहर्यांचा मूक प्रयोग पाहावा, म्हणून व्यवस्था करत राहिले. जे कार्यक्रम तिकिटं लावून केले जात, त्या कार्यक्रमांचे फुकट पास न घेता स्वखर्चानं आमची तिकिटं ते आठवणीनं काढून ठेवायचे. मुलांसमवेत आम्हाला एका तमाशा परिषदेच्या कार्यक्रमाला घेऊन गेल्यावर यमुनाबाई वाईकरांसारख्या कलावंताच्या कर्तृत्वाची ओळख मुलांना शेजारी बसवून कार्यक्रमभर ते करून देत होते.
तळागाळातून जाग येत गेलेल्या नवोदित कवी-लेखकांबद्दल त्यांना खूप कौतुक वाटायचं. त्यांच्याबद्दलची आपुलकी त्यांच्या बोलण्या-वागण्यातून प्रत्ययाला यायची. एकदा सकाळी त्यांच्या घरी गेलो असता ते म्हणाले, ‘‘बरं झालं, आता यायचं केलंत ते. टीव्हीवर आता महानोरांच्या कवितांचा कार्यक्रम आहे. महानोर पळसखेडचे शेतकरी आहेत. पण फार छान कविता लिहितात.‘‘ त्यावर अवघडून आम्ही म्हणालो, ‘‘आम्ही थोड्या वेळानं येऊ. मुलं काही तुम्हाला नीटपणे कार्यक्रम पाहू देणार नाहीत.‘‘ त्यावर पु.ल. म्हणाले, ‘‘मुलांना आवडणार गं कार्यक्रम. मुलं आपल्यासारखी थोडीच शांतपणे पाहणार कार्यक्रम!‘‘ आम्ही निरुत्तर होऊन कार्यक्रम पाहायला बसलो. कार्यक्रमभर माझा मुलगा सोफ्यावर निजून दोन्ही पाय सोफ्याच्या पाठीवर टाकून उलटा पडून कार्यक्रम पाहत होता, पण पुलंनी त्याबाबत आम्हाला अवघड वाटू दिलं नाही. मुलांचं वेडं बालपण त्यांनी सहज स्वीकारलं होतं.
आमची मुलं नेहमी ‘सुनीताबाईंकडे जाऊ‘ असंच म्हणायची. सुनीताबाई त्यांना खरवस, द्राक्षं, सोललेले डाळिंबाचे दाणे आयतेच देत, त्यामुळे त्यांना सुनीताबाईंचं प्रेम समजायचं. त्या त्यांना खूप आवडायच्या. त्या तुलनेत पुलंचं मोठेपण न जाणवल्यानं मुलं पुलंशी फारशी बोलत नसत. पुलंच्या ते ध्यानात येत नसे असे नाही, पण त्यांनी कधीही मुलांना आपला मोठेपणा पटवून द्यायचा प्रयत्न केला नाही. उलट तुम्हीच मोठ्ठे आणि खास, असंच मुलांना वागवत ते वावरायचे. एकदा जेवण झाल्यावर ते म्हणाले, ‘चला, आता मी तुमचा सगळ्यांचा फोटो काढतो.‘ मग सोफ्यावर सुनीताबाई, आम्ही दोघं आणि मुलं असे सारे दाटीवाटीनं बसलो आणि पुलंची फोटोग्राफी सुरू झाली. पुढच्या दीड-दोन मिनिटांत त्यांनी अशी काही धांदल केली, की वाटावं हा कॅमेरा फार गुंतागुंतीचा असावा आणि ते बहुधा तो प्रथमच हाताळत असावेत. फोटो झाल्यावर आम्ही म्हटलं, ‘काय पण मज्जा आली नाही?‘ त्यावर पुलं म्हणाले, ‘हा कॅमेरा इतका ऑटोमॅटिक आहे की फोटो काढणार्याला काहीही कौशल्य अंगी असण्याची गरज नाही. एवढंच कशाला वर आणखी फोटोवर तो काढल्याची तारीखदेखील तोच टाकतो. माझी आपली मुलांसाठी ही थोडी गंमत.‘ असं म्हणणार्या पुलंनी प्रत्यक्ष फोटो आल्यावर मात्र प्रत्येक फोटोमागे आमची नावं लिहून खाली लिहिलं, फोटोग्राफर- आणि पुढे पु. लं. देशपांडे अशी लपेटदार सहीदेखील केली. अलीकडे एकदा तो फोटो पाहताना मुलांना ती थट्टामस्करी आठवली आणि माझी लेक म्हणाली, ‘‘पुल भलतेच ग्रेट! तेच करू जाणेत असली थट्टा!‘‘ बालपणातल्या आठवणीतल्या त्या पोरखेळामागलं पुलंचं असं हे वेगळेच मोठेपण मुलांपुढे कालांतरानं हळूहळू उलगडत गेलं.
सारं काही आलबेल असताना एक मान्यवर व्यक्ती म्हणून समाजात वागता, वावरताना बहुतेक सारे अगदी काटेकोरपणे अपेक्षित शिष्टाचार पाळताना दिसतात. पण व्यक्तिगत जीवनात नियतीनं पदरात टाकलेल्या एखाद्या थोट्याशा विपरीत दानाचा स्वीकार करतानाही त्यांचा तो मुखवटा अलगदपणे गळून पडताना दिसतो. पार्किन्सोनिझमसारखा आजार दत्त म्हणून पुढे उभा पाहिल्यावर पुल अजिबात विचलीत झालेले दिसले नाहीत. त्या आजाराची वाटचाल आणि हुकमत नुकतीच आपल्या बहिणीच्या त्या आजारात पुलंनी जवळून पाहिली होती. तोच आजार स्वतःला झालाय हे समजताच एखाद्याची घाबरगुंडी उडाली असती, चिडचिड वा उद्वेग दिसत राहिला असता, हे सारं माझ्याच वाट्याला का, असा प्रश्न उमटणंही स्वाभाविक झालं असतं. पण शेवटपर्यंत पुलंनी या आजाराचा स्वीकार त्यांना मिळालेल्या अनेक मानसन्मानांइतकाच सहजतेनं केला. ‘आलिया भोगासी असावे सादर‘ यातला ‘सादर‘ शब्दाचा अर्थ मला त्यांच्या आजारात नेमका ध्यानात आला. आजाराच्या सुरुवातीच्या काळात त्यांना पुस्तकं हातात धरून वाचणं जमेना, हिंडणं- फिरणंही होईना, त्या दरम्यान एका भेटीत मी विचारलं की, मग तुम्ही वेळ कसा घालवता हो? ते म्हणाले, ‘‘गाणं ऐकतो. वॉकमनवर ऐकायला मजा येते. पण तेही जिकीरीचं वाटलं तर रेडिओ ऐकतो. अग तुला सांगतो, काल सकाळी लहान मुलांसाठी असलेला कार्यक्रम ऐकत पडलो होतो. त्यात एक गाणं लागलं. ऐकताना वाटलं हे सूर, ही चाल खूप ओळखीची आहे. म्हणून मग गाणं संपल्यावर लक्ष देऊन संगीत दिग्दर्शकाचं नाव ऐकलं, तर ती मधूची चाल होती. आपल्या मधू गोळवलकरची ग. मग मी दुपारी त्याच कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण होतं त्यात ते गाणं पुन्हा एकदा ऐकलं. किती बरं वाटलं सांगू मधूचं गाणं ऐकून!‘‘
पुढे त्या आजारावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी पुलंचं अमेरिकेला जायचं ठरलं. तत्पूर्वी ते एन.सी.पी.ए.त आले होते. तिथं त्यांना भेटायला आम्ही, मंगेश पाडगावकर, श्री. पु. भागवत असे सारे गेलो होतो. एव्हाना पार्किन्सोनिझमची पकड घट्ट झालेली दिसत होती. चार पावलं सरळ चालतानाही त्यांना अवघड झालं होतं. सुनीताबाईंनी उपचारासंबंधी, त्याच्या यशापयशाबाबत सारं काही तपशीलवार सांगितल्यावर सारेच क्षणभर निमूट झाले. ते पाहून पुल लगेच म्हणाले, ‘‘मला मात्र भीती वगैरे वाटतच नाही. तुला आठवतं मंगेश? आपण आकाशवाणीच्या नोकरीत असताना आपली नोकरी जाणार अशी आवई उठली होती. तेव्हा तू म्हणाला होतास, ‘आपलं कसं रे होणार?‘ त्यावेळी मी तुला म्हटलं होतं, ‘आपल्याला बुवा कसलीच चिंता नाही. गळ्यात बाजाची पेटी अडकवून गाणी गात फिरेन आणि आमच्यापुरता आरामात कमवेन.‘ इतक्या विपरीत अवस्थेतली जीवनाबाबतची निवांतता पाहून वाटलं, ऊप जज्दऊ त्दन् ैप्ग्त प त्ग्न् असं रवींद्रनाथांच्या बाबतीत कुणीसं म्हटलंय, तेच पुलंबाबतही म्हणता येईल.
त्या आजारात पुढे पुढे तर दाढी करणं जमेना म्हणून ती वाढलेली दाढी, कपडे बदलणं सोपं जावं म्हणून पायजम्याऐवजी अर्धी चड्डी घातलेली, असेच ते दिवसभर घरात वावरत. अशावेळी कुणीही भेटायला आलं तरी आनंदानं ते त्याला भेटत. स्वतःचा फोटोही काढू देत. स्वतःच्या प्रतिमेची काळजी अशी त्यांना कधी वाटलीच नाही. ती माणसांच्या बाह्य रूपापेक्षा त्याच्या अंतर्यामीच्या सुसंस्कृतपणाशी निगडित असते, हे त्यांना उमगलेलं होतं.
एकदा पत्रात त्यांनी लिहिलं होतं, ‘‘खूप वर्षांपूर्वी गोपाळकृष्ण भोबेंनी तुझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तू या आयुष्याबद्दल काय म्हणशील असं विचारलं होतं. त्यावेळी मी सांगितलं होतं की, निघून नरजातीला रमविण्यात गेले वय, असंच मी म्हणेन. माझ्या रमवण्यामुळे जे रमले ते माझे. जे रमले नाहीत त्यांच्याविषयी मला रागलोभ नाही. ते रमले नाहीत एवढंच काय ते खरं!‘‘
जीवनाकडे असं साक्षीभावनेनं मला कधी पाहता येईल?
- डॉ. लता काटदरे
लोकसत्ता
१२ जून २००४
1 प्रतिक्रिया:
Khup chan lihilay.. Pu.La baddal khup kahi navya goshti kalalya..
dhanyavad
Post a Comment