Wednesday, April 19, 2023

कसं काय, बरं आहे !

....साऱ्या व्यवहारात "कसं काय" या सारखा निरर्थक प्रश्न आणि "बरं आहे" यासारखं निरर्थक उत्तर नाही. ह्या शब्दाला निश्चित असा अर्थ नाही, कळा नाही, चव नाही. एखाद्या वृद्ध माणसाची आपण चौकशी करतो, "काय अण्णा साहेब, काय म्हणतेय प्रकृती?" त्यावर वय सत्तर वर्षे, 500 रुपये पेंशन, सर्व मुले कमावती, मुलींची लग्न बिनहुंड्याने झालेली असं सविस्तर उत्तर मिळतं. परंतु, "कसं काय अण्णा साहेब?" हा प्रश्ण टाका, त्याला त्यांचे उत्तर "बरं आहे" हेच येईल. लहानपणी मास्तर निबंधावर " बरा" असा शेरा देत असत ज्याचा अर्थ वाईट नाही आणि चांगलाही नाही असा असे.

परंतु ह्या सृष्टीत सर्वस्वी चांगला आणि वाईट कोणी नाही त्याप्रमाणे "बरं आहे" ह्या शब्दाला केवळ अवगुणच चिकटलेले आहेत अस नाही. उदाहरणार्थ, नुसतं पाहून घेईन' म्हणण्याऐवजी 'बरं आहे, पाहून घेईन" म्हणा आणि वाक्याला किती जोर चढतो बघा. त्याचप्रमाणे नको असलेला माणूस भेटला की "बरं आहे" चे समारोपदाखल दोन शब्द अगदी वेळेवर कामाला येतात.

बोध एवढाच घ्यायचा की व्यवहारात निरुपयोगी असे काही नाही. बिऱ्हाड बदलताना जसे स्वगृहिणी चातुर्याने केरसुणीची काडीदेखील आयडीनचा कापूस लावायला उपयोगी पडेल म्हणुन जपते तसेच "बरं आहे" ला मला संग्रही ठेवावा लागतो.... बरं आहे!
...

समजा, 'कसं काय?' म्हटल्यावर 'छान आहे' म्हणायची रूढी असती तर उत्तराला डौल आला असता. 'छान' शब्द कसा छान आहे ! चांगल्यापेक्षा देखील 'छान' शब्दाला अधिक डौल आहे. ह्या शब्दाने आपली टोपी वाकडी घातली आहे. धोतराचा सफाईदार काचा मारला आहे. सिल्कच्या झकास शर्टावर वुलन कोट घातला आहे. आणि पायात सुरेख कोल्हापुरी जरीपट्टयाचे पायताण घातले आहे. छान आहे ! 'चांगलं आहे' ह्या शब्दप्रयोगाला अधिक भारदस्तपणा आहे. ह्या शब्दाने पोषाख साधाच घातला आहे; पण गळ्याचे बटण लावले आहे, आणि टोपी नाकासमोर घातली आहे.

वास्तविक 'बरं', 'चांगलं' आणि 'छान' हे नातलगच; पण स्वभावात किती फरक ! 'बरं' हा शब्द आळशी आहे, निरुत्साही आहे. ‘चांगला' इमानी आहे कसा कुणाच्या अध्यात ना मध्यात. आणि 'छान' हे कनिष्ठ बंधू दोस्तांच्या घोळक्यात हास्यविनोद करीत उभे आहेत. ‘छान’ आणि ‘चांगल्या'चे चांगले चाललेले पाहून 'बऱ्या'ला तितकेसे बरे वाटत नाही. ह्याच मंडळीत एक 'ठीक' नावाचे गृहस्थ आहेत. 'कसं आहे? ठीक आहे.' 'ठीक आहे' मध्ये समाधान आहे. ते फारसे मोठे नसले तरी एफिशियन्सी बारमध्ये फार दिवस अडकून न राहाता बढती मिळालेल्या कारकुनाच्या समाधानासारखे ते समाधान आहे. पण 'बरं आहे' मागे मात्र कुरकूर आहे. ह्या 'आहे' मागला 'नाही'चा बदसूर मोठा कुजकट आहे. त्या दृष्टीने एकूणच 'बरे' ह्या शब्दात एक क्षुद्रपणा दडलेला आहे. वरपांगी साळसूद वाटणाऱ्या ह्या शब्दाला अगदीच स्वभाव नाही म्हणावे, तर तसे नाही. तसा स्वभाव आहे, आणि तो आपले खरे स्वरूप कधीकधी विलक्षण रीतीने उघड करून दाखवतो.

पु. ल. देशपांडे 
कसं काय, बरं आहे !
पुस्तक - खोगीरभरती

हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून पुस्तक घरपोच मागवू शकता.

Thursday, April 6, 2023

दर्शनमात्रे - सुनीता देशपांडे

आता बाबाही थकले, आम्हीही थकलो. पण एक काळ असा होता की त्या वेळी आनंदवनात वर्षातून निदान एक तरी फेरी होतच असे. प्रत्येक वेळी आम्हांला काहीतरी नवं दाखवायची योजना बाबांच्या मनात असे आणि त्या उत्साहातच 'आनंदवन - कुटुंबियांकडून स्वागत होई. हा भाग्यलाभ आमच्या भाळी लिहिला गेल्याचा पोटभर आनंद घेऊनच आम्ही परत कधी यायचं तो बेत ठरवून आनंदवनाचा निरोप घेत असू. परतताना 'कन्या सासुरासी जाये, मागे परतुनी पाहे' अशी अवस्था होत नसली तरच नवल.

या वेळी बाबांनी ठरवलं होतं, आम्हांला ताडोबाला नेऊन वाघ दाखवायचा सर्व पूर्वतयारी झाली होती. आवश्यक ते निरोप त्या-त्या ठिकाणी गेले होते. बाबांकडे त्या काळी ड्रायव्हरची सीट डावीकडे असलेली एक जुनी जीपगाडी होती. उन्हापावसासाठी वर ताडपत्रीवजा कव्हर असलेली. बाबा स्वतः उत्तम मेकॅनिक, ड्रायव्हर, सर्व काही. त्या काळी ड्रायव्हिंग तेच करत. आमचा प्रवास त्या जीपमधून सुरू झाला. बाबांच्या शेजारी साधनाताई आणि पलीकडे मी मागे भाई, विकास आणि प्रकाश हे बाबांचे दोघे मुलगे आणि त्या दोघांचा जोडीदार आनंदवनातला तरुण कार्यकर्ता शहा. असे चौघे. गाडीत प्यायचं पाणी आणि वाटेत हवं तर खायला म्हणून टोपलीभर उकडलेली रताळी साधनाताईंनी घेतली होती. बाकी जेवणखाण काहीही सोबत नव्हतं; पण बाबा आणि ताई असताना काहीतरी व्यवस्था नक्कीच केलेली असणार ही मनोमन खात्री असल्यानं मीही निश्चित होते. त्यामुळं एकही प्रश्न न विचारताच हा प्रवास सुरू झाला होता. बाबांचा उत्साह तर अवर्णनीय होता. वेगवेगळ्या अनेक विषयांवर ते बोलत होते ताडोबाच्या दिशेनं धावणाऱ्या त्या आमच्या प्रवासपट्ट्याला बाबांच्या अनुभवाच्या उन्हापावसाचे काठ लाभत होते.

जंगलाची ओळख करून घ्यायची तर प्रथम भेट रात्रीच्या वेळीच व्हायला हवी. म्हणून त्या दृष्टीनेच आम्ही निघालो होतो. ताडोबाच्या अभयारण्यात रात्री गाडी शिरली तेव्हा चांगला काळोख पडला होता. भरपूर भुका लागल्या होत्या. तिथल्या प्रथम वर्गाच्या अतिथिगृहात खोल्या राखून ठेवायची बाबांनी व्यवस्था केली होती; म्हणून गाडी प्रथम तिकडेच नेली. तर तिथं सगळी सामसूम दिसली. कुणालाही काही पत्ता नाही, पर्वाही नाही म्हणताच बाबांचा पारा चढायला सुरुवात झाली. अफगणिस्तानचा राजा की कुणीसा बडा सरकारी पाहुणा पुढल्या पंधरवड्यात येणार म्हणून त्याच्यासाठी आणि त्याच्या लवाजम्यासाठी तिथली सगळी सरकारी अतिथिगृहं साफसफाई, रंगरंगोटी, मोडतोड दुरुस्ती वगैरे पूर्वतयारीच्या दृष्टीनं अचानक बंद करण्यात आली होती.

तळहातावर भाकरी घेऊन खाताखाता त्यातलाच घास कुष्ठरोग्यांनाही भरवत त्यांची सेवा करणारा हा बाबा, पाहुण्यांना सायीचे घट्ट दही देता आलं नाही तर अत्यंत अस्वस्थ होतो. मनासारखा पाहुणचार करायला न जमणं हा त्यांना एकदम विदर्भ प्रांताचाच अपमान वाटायला लागतो. ती नामुष्की सहन करण्याची ताकद, इतक्या पारंब्यांनिशी धरणीवर भक्कम उभ्या असलेल्या या 'वटवृक्षात ' नाही.

आम्ही त्या अभयारण्यातल्या झाडावर बांधलेल्या एखाद्या मचाणावर रात्रीचा मुक्काम करायचं ठरवलं. निराशा सर्वाचीच झाली होती. पण या प्रवासाला सुरुवात केल्या क्षणापासून आम्हां साऱ्याजणांचा जो एकच एकसंध गट होता, त्याचे आता दोन गट झाले. साधनाताई, ती तीन मुलं आणि आम्ही दोघं याचा एक गट आणि बाबांचा एकट्याचा दुसरा गट. तिकडे एवढ्यातेवढ्यान अंगार धगधगत होता. कारणाशिवायच बाबा मुलांवर आणि ताईंवर डाफरत होते. त्यांना थंड करण्याचे आणि खुलवण्याचे आम्हां सर्वाचे अयशस्वी प्रयत्न चालूच होते..

प्रथम वर्गाच्या सरकारी अतिथिगृहातला त्या रात्रीचा 'डिनर दुसऱ्या दिवशीचा 'ब्रेक फास्ट आणि 'लंच सर्व काही आम्हांला त्या उकडलेल्या रताळ्यांच्या टोपलीत सापडलं आणि आरामगृहातल्या गादयागिरद्या त्या लाकडी मचाणावर..

मनात आणलं तर किती गप्प बसता येतं ते अरण्याकडून शिकावं, त्या नीरव शांततेचा भंग करण्याचं धाडस म्हणा किंवा उद्धटपणा म्हणा, आम्हां कुणातच नव्हता. अगदी जरूरच पडली तर एकमेकांशी कानगोष्टी बाबांचा वेध घेत होतो. रात्रीच्या फेरफटक्यासाठी बाहेर पडणाऱ्या वन्य चाहूल घ्यायला बाबा पंचप्राण कानात गोळा करून बसले होते. त्या प्राण्यांच्या पदरवांवरून, एकमेकांना घातलेल्या सादाप्रतिसादांवरून, कोण, कुठल्या दिशेनं कशासाठी निघाला असेल ह्याचा ते अंदाज घेत होते. वाघाचा मागोवा लागताच ताडोबाचा तो औरस रहिवासी आम्हांला दाखविण्यासाठी ते जीपमधून अरण्यदर्शनाला निघणार होते. करत आम्ही पशूंची

पण कुठल्या मुहुर्तावर हा ताडोबाचा बेत केला कोण जाणे, असं वाटावं अशीच काहीशी ग्रहदशा होती. ती रात्र वाघोबांच्या पंचांगातली 'निर्जळी एकादशीची असावी. ताडोबाच्या जंगलातले सारे वाघ ध्यानस्थ होऊन बसले होते आ आपल्या तपाचरणानं बाबा आमटे नामक नरसिंहाला अधिकाधिक त्रस्त करत होते. शेवटी बाबांनी मनाशी काहीतरी निश्चय केला आणि आम्हांला पुन्हा गाडीत घालून ते अरण्यदर्शनाला निघाले. प्रखर दिवे असलेल्या त्या जीपगाडीतून ती. अख्खी रात्र आणि पहाट, आणि मग दिवसाउजेडी सकाळी-दुपारी पायीपायीदेखील त्या जंगलात सगळीकडे आम्ही बाबांबरोबर खूप चकरा मारल्या. लहानमोठ्या अनेक रानवाटा पालथ्या घातल्या. एखादया वळणावर समोर एकदम शेकडो पणत्या पेटलेल्या दिसल्या की हरणांचा तो कळप जास्तीत जास्त जवळून पाहता यावा म्हणून बाबा गाडीच्या दिव्यांची सावध उघडझाप करत, आवाज न येईल अशी हळूहळू जीप पुढं पुढं नेत आम्हांला त्या वनवाशांशी ओळखी करून देत होते. त्या बावीसतेवीस तासांत आम्ही एकटे-दुकटे आणि कळपांनी किंवा छोट्याछोट्या गटानं फिरणारे अनेक प्राणी पाहिले; पण बाबांनी योजिलेलं व्याघ्रदर्शन काही घडलं नाही. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीची आमची शेवटली शोधयात्रा करत हळूहळू जीप जात असताना तर मला एक नवलच पहायला मिळालं. आमच्या मार्गापलीकडेच थोड्याशा मोकळ्या जागेत एक मोर आणि एक हरणाचं पाडस मिळून मजेत खेळताना दिसलं. आम्ही जागच्या जागी गाड थांबवली. पण आमची चाहूल लागताच ते दोघे पळून आडोशाला गेले. आम्ह पुढं निघून गेलो; आणि त्या सफरीमधल्या अशा अनेक लहानमोठ्या तृप्त क्षणांची बेरीज करत असताना बाबांच्या दिशेनं नजर गेली की मला धडकी भरत होती शेवटी अंधार पडू लागला आणि ताडोबाच्या जंगलातून आनंदवनाच्या दिशेन परतीचा प्रवास सुरू झाला.

शौक म्हणून शिकार करणं हे मला अत्यंत असंस्कृत मनाचं लक्षण वाटतं. पण या शौकासाठी आपल्या देशात तर बडेबडे लोक सोयीचं असेल तर अभयारण्याच्या दिशेनंही जातात; आणि अभयारण्यात जनावरं मारणं हा गुन्हा नोंदवला जाईल आणि न जाणो उद्या प्रकरण अंगावर शेकेल म्हणून त्या अरण्याच्या सीमेवर बाहेर बकऱ्या वगैरे प्राणी बांधून ठेवतात. ते प्राणी भुकेनं ओरडायला लागले की अभयारण्यातल्या वाघाबिघांनी त्या दिशेनं भक्ष्यासाठी । जंगलाची सीमा ओलांडून बाहेर यावं म्हणजे तो वाघ टिपून आयती शिकार 'साधता येते. भारतात वाघाची शिकार करण्याची कधी स्वत:ची, तर कधी पाहुण्यांची हौस भागवणाऱ्या अनेक राजकारण्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनो, अशा रीतीनं अभयारण्यातल्या आपल्या वाघांची संख्यादेखील खूप कमी केली आहे, असं मी ऐकलं होतं. ताडोबा सोडून बाहेर पडताना उगाच शंका चाटुन गेली; चोवीस तासांत इतका आटापिटा करूनही इथं एकही वाघ दिसला नाही; म्हणजे इथले सगळे वाघ असेच या लोकांनी संपवले की काय?

परतीचा तो प्रवास सुरू झाला तेव्हा पोटात भूक, डोळ्यांवर झोप, आणि डोक्यात अशा अनेक शंका होत्या. बाबा मात्र फारच अस्वस्थ होते. ताडोबा म्हणजे वाघांचा राजा. साक्षात वाघ! बाबांची आणि त्याची जुनी दोस्ती. या आपल्या मित्रानं आपल्याला असा दगा दयावा? हे दुःख, चीड असह्य होती. आम्हांला हे सगळं कळत होतं; पण 'अपराध बाबांनी केलेलाच नाही त्याबद्दल ते असा त्रागा करून घेत असलेले पाहून आम्ही सगळेच भांबावून गेलो. काल ताडोबाच्या दर्शनाला निघतानाचा बाबांचा उत्साह आणि आज तिथून परततानाचा हा मूड याचं काहीही नातं नव्हतं. बाबांना खुलवण्यासाठी आम्ही सगळेच आपापल्या परीनं त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होतो.

मी पाहुणी म्हणून असेल, बाबा माझ्यावर उखडत नव्हते, पण प्रतिसादही देत नव्हते. साधनाताई किंवा मुलांपैकी कुणी काही बोलायचा प्रयत्न केला की बाबा त्यांना एकदम फटकारू लागले, तेव्हा भाईनं ताबा घेतला आणि तो त्यांच्याशी संवाद साधू लागला. "जाऊ दे हो बाबा. ही जनावरंदेखील आपल्या राज्यात अशीच वागणार" इथून सुरुवात करून मग आमच्याऐवजी कुणी मंत्रीबिंत्री आला असता ताडोबाला तर काय घडलं असतं याचं वर्णन करायला भाईनं सुरुवात केली. मग गाणी, नकला, विनोदी किस्से, कायकाय तो करत राहिला. आम्ही सगळे सुखावून हसत होतो; पण तरीही बेताबेतानं. बाबाही मधूनच काही बोलून आपण ऐकत आहोत हे दाखवत पाहुण्यांचा आब राखत होते. पण हे काही खरं नव्हे अशी जाणीव सर्वानाच होती. ताण फारसा सैलावत नव्हता.

कालपासून या गाडीनं केलेल्या प्रवासात प्रत्येकाच्या बसायच्या जागा ठरूनच गेल्या होत्या. पुढच्या बाजूला मधे ताई, डावीकडे ड्रायव्हर, बाबा, उजवीकडे मी माझ्या ताब्यात बाबानी एक भलामोठा टॉर्च दिला होता. कुणा परदेशी 'आनंदवनाच्या मित्रानं बाबांना तो भेट दिलेला होता. गाडीच्या बॅटरीवर पेटवायचा. खूप शक्तिमान, दूरवर तेजस्वी प्रकाश पाडणारा. साधारणतः वाघाची उंची लक्षात घेऊन जनावरांच्या डोळ्यांत प्रकाशझोत गेला पाहिजे असा कोन साधून तो टॉर्च मांडीवर घेऊन बसण्याची आणि त्या दिशेनं जनावर दिसतं का पहाण्याची कामगिरी बाबांनी माझ्यावर सोपवली होती आणि काल रात्री मी ती व्यवस्थित पारही पाडली होती. आता त्या प्रकाशाच्या टप्प्यात वाघच आला नाही तर कोण काय करणार? आजही मागच्या बाजूला चाललेल्या भाईच्या कार्यक्रमाला दाद देत असतानाही मी माझं काम विसरले नव्हते.

परतीची वाट बाबांनी वेगळी निवडली होती. ताडोबाची हद्द संपली तेव्हा आमची गाडी एका अगदी चिंचोळ्या पाणंदीतून चालली होती. बैलगाड्यांसाठीची ती रानातली वाट असावी. दोन्ही बाजूंना बोरूची गर्द रानं होती. बोरूच्या काटेरी फांदया गाडीला मधूनमधून घासत होत्या. कपडे फाटू नयेत, हातापायांवर ओरखडे येऊ नयेत, म्हणून कडेला बसलेल्यांनी सावधगिरी घ्यायला हवी होती. माझ्या मागेच बसलेल्या भाईनं आपले पाय गाडीबाहेर काढले होते, ते मी त्याला 'काटे लागून पँट फाटेल' म्हणून आत घ्यायला सांगितले. 'पायाला ओरखडा येईल त्याची काळजी नाही, पँट फाटेल तिची काळजी' असा त्यावर त्यानं शेरा मारून सर्वांना हसवलं आणि पाय आत घेतले. आम्ही सगळे गप्प होतो. बाबांच्या मौनासारख्याच घट्ट काळोखातून जीप चालली होती. अचानक या वाहनाचा अडथळा मध्येच आल्यानं बावरून जागच्या जागी थबकलेला एक वाघ प्रकाशझोतात आला. मी दबलेल्या स्वरात एकदम म्हटलं वाघ!

क्षणात बाबांनी तिथंच गाडी थांबवली. पुढं मी आणि मागं भाई गाडीच्या उजव्या अंगाला होतो. आम्हांपासून तर तो वाघ फार तर हातभर अंतरावर असेल. जरा पुढं वाकले असते तर त्याच्या गळ्याला किंवा कपाळाला स्पर्श करता आला असता, इतकं जवळ उभं असलेलं ते अगदी तरुण, उंचपुरं भरलेल सुंदर उमदं जनावर दिसताच तो वाघ आहे, पुढच्या क्षणी एकच पाऊल पुढे टाकून आमच्यापैकी दोघातिघांना तो सहज ओढत कुठंही घेऊन जाऊ शकेन इतका दांडगा आहे, वगैरे कोणताही विचार किंवा कसल्याही भीतीचा लवलेशही आमच्यापैकी कुणाच्याही मनात उमटला नाही. त्याची उंची सर्वसाधारण वाघांपेक्षा थोडी अधिक होती; त्यामुळे प्रकाशाचे किरण सरळ रेषेत त्याच्या डोळ्यात घुसलेच नव्हते. तसे ते घुसावे आणि दिपून जनावर आंधळं व्हावं याची काळजी घेऊनच त्या टॉर्चचा कोन साधला होता. अशा वेळी डोळे बारीक केल्यानं कपाळाला आठ्या पडलेला वाघ पहायला मिळतो. पण इथं प्रत्यक्ष किरणांचा झोत त्यान्या गळ्यावर, छाताडावर पडला होता आणि त्याच्या त्या उत्फुल्ल - हसा तेजस्वी डोळ्यांतल त्याच्या उमदया काळजाचं ओलसर प्रतिबिंब आम्ही भरल्या डोळ्यांनी पहात होतों, जन्मजन्मांतरीचा जिवलग इतक्या प्रदीर्घ ताटातुटीनंतर अचानक कडकडून मिठीत घेता यावा अशा भरल्या आनंदात आम्ही तिथून निघालो ते थेट आनंदवनात येऊन पोचेपर्यंत मग कुणी कुणाशी फारसं बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतंच. ताडोबा सोडताना पोटात ओरडणारे ते कावळे कुठे उडून गेले ? थकव्याचं तृप्तीत रूपांतर होताना कोणती प्रक्रिया होते? त्या स्थित्यंतराला किती वेळ लागत असतो? गेले अखंड चोवीस तास आमच्यापासून सतत दूर दूर जात असलेले बाबा नेमक्या कोणत्या क्षणार्धात आमच्याशी पुन्हा एकजीव होऊन गेले? ही अशी कोणती जादू कुणी केली? आणि या सगळ्या घटनेमागचं प्रयोजन कोणतं? अलगअलग सातजणांचं आमचं ते कुटुंब एका धूलिकणाइतकं क्षुल्लक होऊन त्या वाघाच्या पावलाशी असलेल्या मातीत मिसळायला इतकं आसुसलं ते का? ही ओढ कसली ? आजच्या या क्षणी पडणारे हे असले प्रश्नदेखील त्यावेळी मूक झाले होते.

जिम कॉर्बेट हा माझा एक आवडता लेखक त्याच्याच जातीच्या इतरही विश्वमित्रांच्या साहित्यातून माझी खूप वाघांशी ओळख आहे. प्रत्यक्षातदेखील मी बंदिस्तच नव्हे, तर मुक्ता वाघही पाहिले आहेत. बाबांनी तर आयुष्यात कित्येक वाघ पाहिले, मारले आणि खेळवलेही. पण सर्वार्थानं इतकं सुंदर जनावर वाघांच्या जातीत जन्माला येऊन जगाच्या पाठीवर नांदू शकतं असं कुणी सांगितलं असतं तर त्या क्षणापर्यंत आमच्यापैकी कुणालाही ते खोटंच वाटलं असतं. आपल्या जाणिवेच्या कक्षेबाहेरचा विश्वाचा पसारा, स्वतःच्या सामर्थ्याची झलक ही अशी मधूनच कधी तरी दाखवतो. अशा वेळी एक दैवदुर्लभ साक्षात्कार घडल्याचा अलौकिक अनुभव लाभतो. माझ्या बाबतीत तो वाघ आज असंख्य अज्ञात विश्वबांधवांचं एक प्रतीक होऊन बसला आहे. दर भाऊबीजेला तरी त्याला आठवणीनं मनातल्या मनात ओवाळाव वाटतं. लीन होऊन त्याच्या हाती राखी बांधावी वाटते' आपलं माहेर खऱ्या अर्थानं श्रीमंत असल्याचाच हा साक्षात्कार. हसतहसत सारा निसर्गच आपल्या आनंदात सहभागी झाल्याचा साक्षात्कार !

('हंस', दिवाळी १९९१ )

हा लेख उपलब्ध करून देण्यासाठी श्री आमोद घांग्रेकर ह्यांचे मनापासून आभार. 

Tuesday, March 14, 2023

यक्षाचं तळं

प्रत्येक सुखाला, दुःखाला संदर्भ असतात. या धामापूरच्या तलावालाही माझ्या जीवनात, स्मृतीत संदर्भ आहेत. प्रत्यक्षात मी त्या तलावाच्या पोटात गेले तर मृत्युनंतर तरंगत वर येणाऱ्या माझ्या ऐहिक मेंदूबरोबर ते संदर्भ नाहीसे होतील की त्या जलाशयाच्या गर्भाशयात पुनर्जन्मासाठी, पुनर्निर्मितीसाठी, दुगदुगत राहतील? तिथे त्यांना पोसणारी नाळ कोणती? 

असंख्य दुःखतांनी सासुरवाशिणींनी, चोचीतच दुखावलेल्या राजबंशी पाखरांनी शेवटच्या क्षणी विहिरीचा आसरा घेतला आहे. ज्या पाण्याची त्यांना अखेरीला ओढ लागली. त्याच्या पृष्ठभागापर्यंतचा त्या जीवांचा प्रवास गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने, गतीने झाला, हे मान्य आहे. पण त्या पृष्ठभागाला त्यांचा स्पर्श झाल्या क्षणापासून प्राण जाईपर्यंत क्षणापर्यंत त्या पाण्याच्या पोटात काय घडले? सोबत आणलेले ते सगळे दुःख, तो जिवंतपणा तो लाख मोलाचा प्राप्त ती ताटातुटीची हुरहूर, क्वचित त्या हतबल क्षणींचा पश्चाताप सगळे सगळे संचित त्या पाण्याच्या पोटात जपून ठेवायला त्याच्या स्वाधीन केले गेले असणार. अशी किती जणांची, युगानुयुगांची या तलावाच्या पाण्याला पहिला मानवी स्पर्श झाला तेव्हापासूनची किती संचिते इथे गोळा झाली असणार! ती वाचायला मला प्रत्यक्षच तिथे जायला हवे? एक्स-रे रेसारखा एखादा नवा किरण ती टिपून उजेडात आणू शकणार नाही का? त्या पाण्यातले सनातन दगड, सूर्यकिरण, मासे, इतर जलचर, तिथे वाढणाऱ्या वनस्पत्ती, काठावरच्या झाडांची पाळेमुळे, पण्याचा तळाचा भूभाग, यांना कुणाला या साऱ्याची पुसटशी तरी कल्पना असेल का? हा धामापुरचा तलाव म्हटला की त्याच्या अंतरंगात शिरून तिथल्या कविता वाचाव्या.

अशीच जबरदस्त ओढ मला लागते खरी. या तलावाच्या तिन्ही बाजूंना झाडाझुडपांनी भरलेल्या टेकड्या पुरातन काळापासून तशाच आहेत. चवथ्या बाजुच्या टेकडीवर ही भगवती केव्हा वस्तीला आली मला माहीत नाही. पण कोणे एके काळी ज्या कुणी या टेकडीवर हे भगवतीचे देऊळ बांधले, त्यानेच बहुधा त्या टेकडीवरून तलावाच्या काठापर्यंतच नव्हे तर पाण्यातही अगदी आतपर्यंत बऱ्याच पायऱ्याही बांधून काढल्या आहेत. एके काळी म्हणे गावातल्या जनसामान्यांपैकी कुणाकडे लग्नकार्य असले आणि दागदागिने कमी पडत असले तर हाच तलाव गरजू गावकऱ्यांना सोन्यारुप्याचे, हिऱ्यामोत्यांचे दागिने पुरवत असे. आपल्याला हवे ते दागिने कळ्या फुलांचे करायचे आणि ती परडी संध्याकाळी तळ्याकाळी पायरीवर येऊन ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी खऱ्या दागिन्यांनी भरलेली ती परडी घेऊन जायची आणि कार्यसिध्दीनंतर ते दागिने तलावाला परत करायचे. गावावर अशी माया करणारा, पाखर घालणारा हा तलाव. काम झाल्यावरही दागिने परत न करण्याची दुर्बुध्दी झालेल्या कुण्या गावकऱ्याला ज्या दिवशी धामापुराने सामावून घेतले त्या दिवशी त्या तलावाच्या मनाता केवढा हलकल्लोळ उडाला असेल! मायेचे मोल न उमजणाऱ्या लेकरांना तो अजूनही पाणी देतो; पण केवळ कर्तव्यबुध्दीने.
      
आणि त्या टेकड्या? भोवतालच्या जीवसृष्टीतले किती जन्म आणि किती मरणे त्यांनी तटस्थतेने पाहिली असतील!  इथले हे प्रचंड दगड युगानुयुगे कुणाची वाट पाहत इथे उभे असतील? शांत, थंड, पण शक्तीशाली दगड! या दगडदगडांतही किती जाती, पोटजाती आहेत! कलावंताच्या अपयशाने अशा दगडांच्या काळजाच्या ठिकऱ्या उडतात. पण यशाने मात्र त्यांची छाती फुगत नाही, उलट एक सात्विक, नम्र भाव त्यांच्या रोमारोमांतून प्रगट होतो.

ऐकून तिच्या पाठिवरून हात फिरवायला आणि आडोसा करायला धावून आलेले ढग नक्की निळेसावळेच ; असणार. माझा हा तलावही एरवी सदैव मला निळासावळाच दिसतो. माझा तलाव, या पुरातनाच्या संदर्भात मी कोण, कुठली, आणि कितपत ? हे सगळे प्रश्न | खरेच आहेत. पण त्याचबरोबर त्या तलावाशी माझे काहीतरी नाते आहे, हेही एक शाश्वत सत्य आहे. । त्याशिवाय का ही भरती ओहटीसारखी ओढ चालू राहील.

आज या सुंदर काळ्याभोर रात्री काळी वस्त्रे लेऊन आणि काळी घागर घेऊन मी गुपचूप तुझ्यापाशी आले आहे. मला आज तुझ्या पोटात शिरून तिथले वैभव एकदा डोळे भरून पहायचे आहे. तुझ्या काठाशी पायरीवर बसून तुझ्यापाशी आले आहे. मला आज तुझ्या पोटात शिरुन तिथले वैभव एकदा डोळे भरून पहायचे आहे. तुझ्या काठाशी पायरीवर बसून तुझ्या त्वचेला मी आजवर अनेकदा स्पर्श केला. पण या क्षणी तुझ्या पोटात शिरताच लक्षात आले ते सुर्यप्रकाशात दिसणारे छोट्या छोट्या माशांचे विभ्रम तो पावलांना आणि हातांच्या बोटांना जाणवणारा गारवा, हे सगळे तुझे वरवरचे रुप आहे. हा आतला ओलावा या जिवंत ऊर्मी, या आजीच्या आई- आप्पांच्या स्पर्शासारख्या रेशमी आहेत. उन्हात उडणारी पाखरे आपल्या पंखांनी निळ्या हवेचा वारा घेतात ना तशी माझ्या हातांनी मी हे तुझ्या पण्याचे काळे झुळझुळीत रेशमी शेले पांघरत आत आत शिरते आहे. द्रौपदीनेही एकटेपणाच्या त्या अंतिम क्षणी असेच कृष्णाच्या मायेचे अनंत रेशमी शेले पांघरले नव्हते का? मीही आता तशीच निर्धास्तपणे कुठल्याही यमाच्या राजदरबारात जाऊ शर्केन.

आजवरची सगळी धावपळ कधीच मागे पडली आहे. तुझ्या अंतरंगातल्या या प्रवासाचा मार्ग आखीव नाही. त्यामुळे किती मोकळे वाटते आहे! निवृत्त होऊन या जगात स्थिर होण्यापेक्षा मृत्युच्या दिशेने नेणारी का होईना पण गती किती सुंदर, विलोभनीय असते! जिवंत पाण्याने भरलेला हा आसमंत. खऱ्याखुऱ्या शांतीचा साक्षात्कार आज प्रथम होतो आहे. श्वासाचीही हालचाल. नसलेली, केवळ जाणिवेतली शांती. तुझे सगळे वैभव पाहायला पाहुणीसारखी आज कसल्या तरी अनाकलनीय ओढीने ही माहेशवाशीण तुझ्या राज्यात प्रवशे करतेय.

तुझ्या आसऱ्याला आलेल्या साऱ्या दुःखितांना तू तुझ्या लौकिकाला साजेसाच निरोप दिला असशील. सतीला शृंगारतात तसे दागदागिने घालून, शेवाळी शालू नेसवून, ओटी भरून, जलचरांची सोबत देऊन किंवा कसाही, पण तुझ्या परिने भरभरून. पण मी त्या अर्थी दुःखजडीत होऊन इथे आलेली नाही. तशी मी संपन्न आहे. मला काही म्हणता काही कमी नाही हे तूही जाणतोसच ना ? पण माझ्या भाळी सुखाची व्याख्या लिहिताना नियतीने एक वेगळीच अदृश्य शाई वापरली आहे. ती व्याख्या, ते सुख तुलादेखील वाचताही येणार नाही आणि पुसताही येणार नाही. म्हणून सांगते, इथून परतताना मी मोकळ्या हातीच माघारी येणार आहे. माझी ही भरली घागरही मी तिथेच ठेवून येणार आहे.

तुझ्याकंडे यायला निघाले तेव्हा मी पाण्याला म्हणून इथे आले खरी, पण आता ती तहानही निवाली आहे. परतीच्या प्रवासात शिदोरी म्हणून मला एकच निश्वास सोबतीला हवा आहे. हा तुझा, माझा आणि आपल्या जातीच्या साऱ्यांचा अटळ एकटेपणा आहे ना, त्याच्या वेणा आतून जेव्हा जेव्हा टाहो फोडू लागतील. त्या त्या क्षणापुरती तरी तुझी ही मौनाचीच भाषा माझ्या ओठी नांदेल, असा आशीर्वाद मला देशील का?

सुनीता देशपांडे 
साभार : सोयरे सकळ
लोकसत्ता २०११

हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

Wednesday, March 1, 2023

आठवणीतील पु.ल. - मंगेश पाठक

पुलंच्या निधनानंतर साहित्य किंवा चित्रपटसृष्टी- प्रमाणेच आणखी एक मैफल सुनी झाली. ती साहित्यिक गप्पांशी किंवा वाङमयीन वैशिष्ट्यांशी संबंधित नाही, पुलंच्या धमाल विनोदी नाटकांशीही संबंधित नाही. ही मैफल आहे कायमस्वरुपी स्मरणात राहणाऱ्या पुलंच्या फिरक्यांची ! वेळोवेळी संधी मिळेल तिथे पुलं हास्याची कारंजी फुलवायचे. त्यांच्या धमाल विनोदांमुळे आणि कोट्यांमुळे छोट्या वाटणाऱ्या अनेक गाठीभेटीही अविस्मरणीय झाल्या. प्र. के. अत्रे एकदा एका अंत्ययात्रेला गेले तेव्हा तिथले गंभीर वातावरणही बदलले. तशा वेळी अवघड परिस्थितीतही हास्यतुषार उडू लागले अशी आठवण सांगतात. पुलंबाबत असं घडल्याचं ऐकीवात नसलं तरी त्यांच्या मृत्युच्या बातमीनंतरही त्यांचे सुहृद अशा किस्स्यांबाबत आवर्जून बोलले. दुःखावेग आवरत त्यांनी अशा किस्स्यांना वाट मोकळी करुन दिली. कारण हे केवळ किस्से नव्हते तर त्यात अस्खलित विनोदबुध्दी आणि उच्च श्रेणीचा हजरजबाबीपणा यांचा मिलाफ होता. कदाचित म्हणूनच एका डोळ्यातून आसवं वाहताना दुसरा डोळा ठराविक प्रसंग समोर उभा करून विनोदात रमताना दिसत होता.

पुलंबाबत एक आठवण सांगितली जाते. आयुष्यातलं पहिलंच भाषण करताना बाल्यावस्थेतील पुलं नेमक्या क्षणी अडखळून बसले. त्यांचं भाषण पुढे सरेना. परिणामी बोबडी बंद झाली. पण वेळ मारुन न्यायचे आणि हजरजबाबीपणाचे बाळकडू त्यापूर्वीच त्यांना मिळाले असावे. म्हणून तर 'आता माझी दूध घ्यायची वेळ झाली' असा बहाणा करत पुलं तिथून निघून गेले. पुलंच्या व्यक्तिमत्वापासून तसूभरही दूर न करता येण्याजोग्या अशा किस्स्यांची कमतरता त्यांच्या साहित्यिक मित्रांना कधीच जाणवणार नाही. ज्येष्ठ समीक्षक बापू वाटवे यांनी असाच किस्सा कथन केला होता. बापूंचा पुलंशी जवळचा परिचय होता. त्यांना पुलंच्या घरी जाण्यासाठी कधीच परवानगी लागायची नाही. एकदा बापू असेच गणांगण रंगवण्यासाठी पुलंच्या घरी पोहोचले. पुलं झोपले असतील किंवा विश्रांती घेत असतील असा त्यांचा अंदाज होता. कारण त्या सुमारास त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची चर्चाही सुरु होती. बापूंनी दबकतच त्यांच्या घरी पाऊल ठेवलं आणि पाहतात तो काय, पुलं एका हातात पेटीचा भाता ओढत गायन- वादनात रमले होते. हे दृश्य पाहून बापूही चक्रावले. विनाविलंब पुलंच्या मैफलीत सहभागी होत त्यांनी कौतुक सुरू केलं. शेजारीच भरपूर उकडलेल्या शेंगा होत्या. त्या रसरशीत शेंगांची चव चाखत बापूंनी संगीताला दाद द्यायला सुरूवात केली. बराच वेळ ती मैफल रमली. मैफल संपताच बापू म्हणाले, 'वा भाई, छानच पेटी वाजवली. या वादनाचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर लोकांना पैसे मोजावे लागतात. मी तर फुकटातच आनंद घेतला'. बापूंचं बोलणं ऐकून शांत बसतील ते पुलं कसले ? एक क्षणही न गमवता त्यांनी विचारलं, 'फार वाईट वाटतंय का ? तसं असेल तर पाच-पंचवीस रुपये देऊन टाक!' पुलंच्या या मल्लिनाथीनंतर उपस्थित हास्यसागरात बुडून गेले.

असाच आणखी एक किस्सा बापूंनी रंगवला होता. पुलंच्या आजाराविषयी सर्वत्र चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली. जवळचे मित्र अनेक डॉक्टरांची आणि उपचारपध्दतींची माहिती देऊ लागले. पण दूरदूरचे काही हितचिंतकही पुलंकडे गर्दी करु लागले. त्यांना नव्या आणि वेगळया उपचारपध्दतींविषयी माहिती देऊ लागले. अशाच एक बाई पुलंना भेटायला आल्या. त्या सुमारास 'रेकी'ची बरीच चर्चा होती. या उपचारपध्दतीचा पुलंना फायदा होईल असं वाटल्याने ती "बिचारी बाई लांबून आली होती. पुलंकडे बराच वेळ थांबून त्या बाईने रेकीची माहिती सांगितली. बराच वेळ ती बाई या उपचारपध्दतीचा फायदा पुलंनी घ्यावा असं सुचवत होती. पुलंच्या लेखी तिचं समजावणं आणि मागे लागणं थोडसं अतीच होत होतं. पण ते काही बोलले नाहीत. थोडया वेळाने त्या बाई निघून गेल्या. बापू त्यावेळी तिथेच होते. त्या बाई निघून जाताच पुलंनी दार लावून घ्यायला सांगितलं. दार लावून घेताच बारीक नजरेने तिथे पहात ते बापूंना म्हणाले, 'काय रे ती 'अति-रेकी' गेली का ?' पुलंनी केलेली ही कोटी त्यावेळी चांगलीच दाद मिळवून गेली. बघता बघता दोघेही जोरजोरात हसू लागले.

पुलंना ज्या प्रयाग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथल्या मंडळींनाही पुलंनी सोडलं नाही. डॉ. शिरीष प्रयाग यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह जुळला होता. १९८६ मध्ये डॉ. प्रयाग यांच्या रुग्णालयाचं उद्घाटन पुलंनीच केलं होतं. या उद्घाटनप्रसंगी पुलंनी डॉ. प्रयाग यांची फिरकी घेतली. त्यांनी भाषणाला सुरूवात केली आणि संपूर्ण रुग्णालयावर एक नजर टाकली. आजूबाजूला डोकावून पाहिल्यानंतर ते उत्तरले, 'शिरीषकडे येणारे रुग्ण अत्यवस्थ असू शकतात. शक्यतो लोकांना त्याच्याकडे यायची गरज पडू नये. पण अशी गरज पडलीच तर हे रुग्णालय सर्व बाबतीत सुसज्ज आहे'.पुलंचं हे म्हणणं ऐकून उपस्थित मंडळींमध्ये चांगलीच खसखस पिकली होती.

एखाद वेळी स्वत: एखाद्या कामासाठी जवळच्या स्नेह्याला फोन केला तरी पुलंची विनोदबुध्दी जागृत असायची. आपलं काम आहे म्हणून ते समोरच्याची फिरकी टाळायचे नाहीत. त्यांच्यासंदर्भातला असाच एक किस्सा इथे सांगण्याजोगा. एकदा पुलंना 'धर्मात्मा'चं बुकलेट हवं होतं. त्या बुकलेटवरील बालगंधर्वांचा फोटो ते शोधत होते. एका मित्राला त्यांनी फोन केला आणि म्हणाले, 'काय रे, तुझ्याकडे 'धर्मात्मा'चं बुकलेट आहे का ? मला ते हवं आहे.' पलिकडून मित्र म्हणाला, 'हो, माझ्याकडे ते बुकलेट आहे.' यावर पुलंनी विचारलं, 'काय रे, तुझ्याकडे हे बुकलेट कुठून आलं? तू तर 'धर्मात्मा'मध्ये कामही केलं नव्हतस.' मित्र उत्तरला, 'अरे मी काम केलं असतं तर तो चित्रपट चालला असता ना !' मित्राच्या या विधानावर पुलंची प्रतिक्रिया आली नाही. हे लक्षात येताच त्याने पुन्हा विचारलं, 'काय पीएल, दुसऱ्याच्या विनोदांना हसायचा रिवाज तुमच्याकडे नाही का? का आम्हीच तुमच्या विनोदांना दाद द्यायची?'

मित्राच्या या प्रश्नावर पुलं शांतपणे उत्तरले, 'अरे मित्रा, विनोदाला दाद देण्याचा रिवाज आमच्याकडे अवश्य आहे. पण त्यासाठी मुळात विनोद घडायला हवा ना.' पुलंचा हा शेरास सव्वाशेर प्रतिसाद ऐकल्यानंतर मात्र मित्राची आणखी काही प्रश्न विचारायची हिम्मत झाली नाही. पुलंनी परिचित, स्नेही, मित्रमंडळी सर्वांनाच आपल्या फिरकीचं लक्ष्य बनवलं. मात्र, स्वत: वरील विनोदही नाकारले नाहीत. प्रयाग हॉस्पिटलबाहेर चित्रपट निर्माते राम गबाले, जब्बार पटेल, दिलीप माजगावकर आणि इतर अनेकजण पुलंबद्दल भरभरुन बोलत होते. त्याच वेळी आणखी एक आठवण पुढे आली. शेवटी पुलंना पायावर जोर देऊन उभं राहता यायचं नाही. ते व्हिलचेअरवरच असायचे. अशाही परिस्थितीत मित्रमंडळींना बोलावणं, त्यांच्याशी गप्पा मारणं कमी केलं नव्हतं. मित्रमंडळीही चलाख. पुलंबरोबर गप्पा मारायची संधी मिळाली की त्यांची थोडीशी टर खेचायची संधी तेही सोडायचे नाहीत. पुलं व्हिलचेअरवर बसून गप्पा मारताना त्यांना पाय टेकवून उभं राहता येत नाही हे एका मित्राच्या लक्षात आलं. त्याने लगेच मल्लिनाथी केली, 'आता पीएलचे पाय जमिनीला लागत नाहीत पहा.' त्याचं हे विधान ऐकून एक समयोचित सुंदर विनोद घडल्याचं पाहून सारे जण हसू लागले. पुलंनीही समरसून त्यांना दाद दिली. पुलंच्या अशा असंख्य आठवर्णीना अजूनही उजाळा दिला जातो. त्यांच्या शाब्दिक कोट्या, प्रसंगनिष्ठ विनोद आणि हजरजबाबीपणा यावर आवर्जून बोलले, लिहिले जाते. खंत एकच आहे, ती म्हणजे आता अशा कोट्या फारशा ऐकायला मिळत नाहीत आणि प्रसंगनिष्ठ विनोदातली ती नजाकत दुर्मिळ झाली आहे.

मंगेश पाठक
दैनिक महानगर

Monday, February 20, 2023

रोज एक . . . - उरलंसुरलं

मेहेरबाण संपादक ' अणिल ' यास
संभा नाभाजी कोतमिरे याचे
प्रेमप्रूर्वक दंडवत ...

अनंतचतूर्दशीला श्री. गनरायाचे वीसर्जण केले आनी तुम्हास हे पत्र लीहावयास बसलो आहे. खरोखर त्या दाहा दीवसांत शेकेट्री म्हनून माला जे अणुभव आले ते तुम्हांला दाहा पुस्तके वाचूण सूधा येनार नाहीत. आपल्या देशात जे जे काही चालत आहे — ज्या ज्या भयंकर गोस्टी घडत आहेत त्या सर्वांचे काय कारन असावे याचा अणुभव मला त्या दाहा दीवसांत आला. फक्त कुठल्याही बाबतीत शीस्त नाही हेच खरे.

सादी गोश्ट. मंडपामधे बायकांणी कूठे बसावे व पुरसाणी कुठे बसावे ह्याचे केवढे मोठे बोरड लावून ठेवले होते. पन एकजन शीस्तीणे बसले तर शपथ. तरी बरे, मी स्वैंयसेवकाची टोळी शिकवून तालिममास्तराच्या हाताखाली तयार ठेवली होती. पन काही उपयोग नाही. सर्व गोंधळ. नऊचा कार्यक्रम आसला तर दाहापासून येक वाजेपर्यंत केव्हाही यावे, केव्हाही जावे.

भासन असो वा चांगले गाने असो यांच्या आपल्या गफ्फा चाललेल्या. मग त्या गानाराबोलना-याला आपन कीती गोंधळात टाकीत आहो याचा वीचारच नाही. बरे मधूनच एकदम उठून जाने—जाताना नीमूटपणे जावे तेही नाही. आपल्या कुठेकुठे बसलेल्या पोराबाळांना मोठमोठ्याणे हाका मारीत सर्व मंडळींचा चालू कार्यक्रमातील लक्ष्य काढूण आपल्याकडे ओढने असला आचरटपणा करन्यात आपले लोकांणा काडीचीही लाज वाटत नाही हे पाहून मी मणातल्या मणात भडकून जात असे. प्रंतु मी जबाबदारीच्या जागेवरआसलेणे आपले डोक्यावर बर्फाचा खडा आहे आशा समजुतीणेच वागन्याचे ठरिवले होते. त्यामुळे शक्य तीतके भांडनतंट्याचे प्रसंग टाळले.
प्रंतु दूर्दैवाणे एक प्रसंग मला टाळता आला नाही. स्त्रियांचा कार्यक्रम चालू असताणा काही हलकट लोक आचरटपना करन्याच्या ऊदेशाणे तेथे आलेले दीसले. त्यांच्यापैकी एक नीसटला पन् चौगेजन मात्र खात्रीणें हळदमीटाचे पलिस्तर बांदून बसले आसतील. भलता चावटपना माला खपत नाही आनी तसा दीसला तर मी तोंडाचा ऊपयोग न करता हाताचाच करतो.

आपले लोकांणा बरेच गोशटीचे शीक्षण द्यावयास पाहिजे हे मात्र खरे. ऊदाहरनार्थ रस्त्यात पाण खाऊन थूकने. परवा आमच्या मंडपात एकजन पीचकारी मारत आसताना आमच्या मेव्हन्याने त्याचे तोंड भाहेरुणही रंगिवले. माला वाटते बरेच वेळा पायातल्या वहानेला हाताशी धरल्याशिवाय सुदारना होत नाही. हा आपला माजा रांगडा न्याय आहे. पन जगात दुबळेपना सारका श्राप नाही. नम्रपना असावा पन लाचारी नसावी. आता मी यवढ्या मोठमोठ्या बंगलेवाल्यांकडे चीकी विकतो पन कदी कोनाची लाळ घोटत नाही. ऊगाच ' साहेब ' 'हुजूर ' कशाला ? माला येक गोश्ट कळते. चीकी अशी हवी की जी पाहून तोंडाला पानीच सुटले पायजे. मग ते तोंड कुनाचे आहे हा सवाल नाही. एकदा त्या वस्तूवर मण गेले की मानूस ते घेनारच. फक्त लोकांची मणे ओढन्यासाठी तुम्ही मासीकवाल्याप्रमाने बायाबापड्यांची रंगीबेरंगी अब्रू चवाठ्यावर मांडली नाही. म्हनजे झाले ! चिकीच्या वरच्या कागदावर बाईचा मुखवटा चिटकावून चीकी खपवन्याची पाळी जर मजवर आली तर खुशाल हमालाचा धंदा करीन.

माज्या म्हनन्याचे तात्पर्य हेच. धंदा असो, लीहीने छापने असो, आथवा चारचौघांत वागने असो आपल्या लोकांला जंवर शीस्तीची आवड नाही तंवर आपल्या देशाचे पाऊल कधीच फुडे पडनार न्हाई. स्वताच्या जबाबदारीची जानीवच आपनाला नाही. परवाच येका शाळेच्या दारात मी चीकी वीकत उभा होतो. पाच मास्तरांपैकी चार मास्तरांची धोत्रे कळकट दाड्या वाडलेल्या आनी चेह-यावर मुडद्याची कळा ! धोत्रे फाटकी आसती तर गरीबुमुळे आहेत म्हटले आसते पन कळकटपनाचे गरीबीशी काय नाते ? बरे साहापैशाच्या पात्यात दाहा दाढ्या होतात. आता संपादक माहाराज , तुम्हीच सांगा पोरांना वळन लावना-या मास्तरांना स्वताची शीस्त सांभाळायला नको का ?

परवाच्या ऊच्छवात असेच. दोनतीन भाषने ठेवली होती. पन भाव न देनारा एक जन वेळेवर आला आसेल तर शपत. कोन तास भर ऊशीरा तर कोनाचा येतच नाही म्हनून निरोप ! आनी हिते आपला शेकेट्री बसला आहे ताम्हनात देव बुडवून ! आनी लोक जांभया किंवा शिव्या देताहेत. आपल्याला आपल्या कामाचे, वेळेचे, जबाबदारीचे, कसलेच महत्त्व नाहि त्यामूळे आसे होते. पन ह्या सर्वांचे मूळ ती 'शीस्त' तीचा दुष्काळ ! मग सुदारना कसली नी काय कसले ?

तुमचा क्रुपाबिलाशी,
संभा नाभाजी कोतमिरे
( चीकीचे व्यापारी )
अनिल साप्ताहिक, १८/०९/१९४७

— पु. ल. देशपांडे 
संग्रह - उरलंसुरलं

ता.क. — पंतप्रधानांनी केलेले सार्वजनिक स्वच्छतेचे आवाहन अन् 'आप'च्या झाडूने राजधानीत केलेली ' राजकिय साफसफाई ' या पार्श्वभूमीवर पुलंचा १९४७ मधे लिहिलेला सार्वजनिक शिस्तीवरचा हा लेख खरोखरचं अप्रतिम !!!
उपरोक्त ता.क. नुसार फेब्रुवारी २०१५ साली प्रसृत केलीली ही पोस्ट आहे...
संग्रहक -  संजय आढाव

Tuesday, February 14, 2023

वेध सहजीवनाचा !

'आहे मनोहर तरी' या आत्मलेखनातून सुनीताबाईंनी पुलंसोबतच्या सहजीवनाचा वेध घेतला आहे. त्यांच्या लेखनशैलीचा हा एक संक्षिप्त परिचय...

भाई आणि मी. दोन क्षुल्लक जीव योगायोगाने एकत्र आलो. त्यानंतरचा आजपर्यंतचा आयुष्याचा तुकडा एकत्र चघळताना अनेक लहानमोठी सुखदुःखे भोगली. कधीतरी हे संपून जाईल. राहिलीच तर भाईची पुस्तके तेवढी, त्यांचे त्यांचे आयुष्य सरेपर्यंत त्याच्या मागे राहतील.

आजच्या काळातला एक मराठी लेखक म्हणून भाईचे निश्चितंच एक स्थान आहे, असे मला वाटते. तो अमक्या कवीपेक्षा श्रेष्ठ आहे का किंवा तमक्या कथालेखकापेक्षा अगर कादंबरीकारापेक्षा त्याचे स्थान वरचे आहे का, हा प्रश्नच अप्रस्तुत आहे. हे सगळे स्वतंत्र वाङ्मयप्रकार. त्यांची तुलना करणेच चूक; पण भाईच्या लिखाणाचेही एक खास वैशिष्ट्य आहे. ते सदैव ताजे, प्रसन्न, वाचतच राहा - वे, असे वाटण्याच्या जातीचे आहे, असे मला वाटते. स्वच्छंदी फुलपाखरासारखे. मनोहारी, आनंदी, टवटवीत. फुलपाखरांच्या लीलांकडे केव्हाही पाहा, लगेच आपला चेहरा हसराच होतो. ते आनंदाची लागण करत भिरभिरते. शेवटी सुबुद्ध, सुसंस्कृत मनाच्या वाचकांची मोजदाद केली. तर भाईला अशा वाचकांचा फार मोठा वर्ग लाभला आहे, हे कबूल करण्यावाचून गत्यंतर नाही. आता टिकाऊपणाचाच विचार करायचा झाला तर भरधाव वाहत्या काळाच्या संदर्भात एखादाच शेक्सपिअर, सोफोक्लिस किंवा व्यास यांच्यासारख्यांना फारतर टिकाऊ म्हणता येईल. आजच्या साहित्याला असा कस लावायचा झाला, तर त्यासाठी इतका काळ जावा लागेल, की त्या वेळी आपण कुणी तर नसणारच; पण आपल्या पुढल्या अनेक पिढ्याही मागे पडलेल्या असणार. त्यात आपण टिकणार नाही, केव्हाच विसरले जाणार, याची जाणीव भाईला स्वतःलाही पुरेपूर आहे. पण शेवटी तोही माणूसच. - स्वतःच्या हयातीतच विसरले गेलेले काही साहित्यिक किंवा समीक्षक जेव्हा त्याच्या लिखाणाला उथळ म्हणतात, तेव्हा तो नको तितका दुखावतो. 'गेले उडत!' म्हणण्याची ताकद त्याच्यात नाही. ती वृत्तीही नाही. 
जरादेखील असूयेचा स्पर्श न झालेल्या माझ्या पाहण्यातला हा एकमेव माणूस. त्याच्या आंतरमनातले सगळे स्वास्थ्य त्याला या दैवी गुणातून लाभले आहे; पण हे सुख तो प्रत्यक्ष भोगत असतानाही, साहित्याच्या अधूनमधून होणाऱ्या मूल्यमापनात त्याची क्वचित उपेक्षा झाली, की लगेच त्याची 'मलये भिल्लपुरंध्री' सारखी अवस्था होते आणि तो मग आपल्यातल्या इतर साहित्यबाह्य गोष्टींतल्या मोठेपणाला घट्ट पकडून ठेवू पाहतो. भूषवलेली पदे, केलेलं दान, मिळालेला मानसन्मान वगैरे. त्याचे चाहते त्याच्या या असल्या पराक्रमांचे पोवाडे गातात ते तो लहान मुलासारखा कान देऊन ऐकतो. ही एक मानवी शोकांतिकाच असावी. अशा वेळी मी फार दुःखी होते. वाटते, त्याला पंखाखाली घ्यावे आणि गोंजारून सांगावे, "नाही रे, या कशाहीपेक्षा तू मोठा आहेस. तुझी बलस्थानं ही नव्हेत. थोडं सहन करायला शिक म्हणजे तुझ्या लक्षात येईल, की साहित्यिक म्हणून या आयुष्यात तरी ताठपणे उभं राहण्याचं तुझ्या पायात बळ आहे. या कुबड्यांची तुला गरज नाही." याचा उपयोग होतोही; पण तो तात्कालिक; टिकाऊ नव्हे. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. त्याने ढळू नये. आपल्या मातीत पाय रोवून ताठ उभे राहावे वृक्षासारखं. आपल्या वाट्याचं आकाश तर हक्काचं आहे! माझ्यासारख्या वठलेल्या झाडाला हे कळतं, तर सदाबहार असा तू. तुझ्या वाट्याला गाणं घेऊन पक्षीही आले. तुला आणखी काय हवं?... हे असले सगळे मी डोळे मिटून सांगते; पण कान मिटता येत नाहीत. त्यामुळे मग देशपांडे घोरायला लागले की उपदेशपांडेही त्या वेळेपुरते प्रवचन थांबवून झोपायला निघून जातात.

अनेकदा वाटते, या माणसाकडून माझ्यावर थोडाफार अन्यायच झाला. तो त्याने जाणूनबुजून केला असता तर मग त्याची धडगत नव्हती. मी त्याचा बदला घेतलाच असता, मग त्यासाठी कितीही किंमत द्यावी लागो, कारण माझ्यात 'दयामाया' नाही असं नाही; पण त्या प्रांतावर 'न्याया'चं अधिराज्य आहे. त्यामुळे माझ्याकडून त्याला खासा न्यायच मिळाला असता; पण झाले असे, की त्याला प्रेम करताच आले नाही. ती ताकद यायला जी विशिष्ट प्रकारची प्रगल्भता लाभते ती वयाप्रमाणे वाढत जाते.

दुर्दैवाने या बाबतीत त्याचे वय वाढलेच नाही. तो मूलच राहिला आणि लहान वयालाच शोभणारा स्वार्थ म्हणा किंवा आत्मकेंद्रितता म्हणा, त्याच्या वाढत्या वयातही त्याच्यात वसतीला राहिली. इतर सर्व बाबतींतले त्याचे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व घराबाहेरच्यांना लाभले आणि हे मूलपण माझ्या वाट्याला आले.

लोकसत्ता 
संपादकीय 

Thursday, February 9, 2023

चार शब्द - पु.ल. - एक वाचनीय पुस्तक

नुकतेच पु. ल. देशपांडेंचे 'चार शब्द' हे पुस्तक वाचनात आले. पुलंनी कित्येक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्यातल्या निवडक प्रस्तावनांचा संग्रह म्हणजे 'चार शब्द' हे पुस्तक! अतिशय विचारपूर्वक, गांभीर्याने, आणि मुद्देसूद लिहिलेल्या या प्रस्तावना खरोखर वाचनीय आणि मननीय आहेत. काही प्रस्तावना आपल्या इतिहासाचं, दैनंदिन जीवनाचं, अध्यात्माचं, तत्वज्ञानाचं, आणि जीवनपद्धतीचं इतकं कठोर आणि तर्कशुद्ध परीक्षण करणार्‍या आहेत की वाचतांना आपले डोळे खाडकन उघडतात. पुलंची अशा पद्धतीचं लिखाण करण्याची हातोटी वंदनीय आहे. हे पुस्तक विनोदी नाही. चुकून कुठेतरी विनोदाचा हलकासा शिडकावा झाला असेल तर तेवढेच. हे पुस्तक मुख्यत्वेकरून गंभीर आणि विचार करायला प्रवृत्त करणारे आहे.

'विश्रब्ध शारदा' खंड २ (१९७५) या पुस्तकाची प्रस्तावना दीर्घ आहे. दिग्गजांनी कधीकाळी लिहिलेली पत्रे हा या पुस्तकाचा गाभा आहे. या प्रस्तावनेतून पुलंनी बालगंधर्वांच्या काळातील जगण्याचे संदर्भ खूप सुंदर पद्धतीने विशद केले आहेत. बालगंधर्वांचा हट्टीपणा, त्यांचे गोहरबाईंशी असलेले संबंध, त्यांचे दारिद्र्य, म्हातारपणी झालेली त्यांची अवहेलना, शून्य व्यवहारज्ञान असल्याने त्यांची झालेली दुरवस्था आणि मानहानी, मनमानी कारभारामुळे झालेली त्यांच्या परिवाराची फरफट असे बरेच पैलू या प्रस्तावनेत येतात. कितीही महान असले तरी एकूणच बालगंधर्व हे एक बेजबाबदार व्यक्तिमत्व होते हे वाचकांच्या लक्षात येते. त्याकाळचे संगीत आणि एकूण संगीतविषयक सामाजिक दृष्टी यावरदेखील पुलं प्रकाश टाकतात.

'माणूसनामा' या न्या. चंद्रशेखर धर्माधिकारीलिखित पुस्तकाची (१९८५) प्रस्तावना नुसतीच कठोर नाही तर आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. या पुस्तकात लेखक भारतीय जीवनपद्धतीवर आणि अध्यात्मावर चिंतन करतांना खूप उपयुक्त असे महत्वाचे सल्ले देतात. या प्रस्तावनेत पुलंनी आपल्या संतपरंपरेवर, अध्यात्मावर, आणि एकूणच सामाजिक उदासीनतेवर परखड भाष्य केले आहे. तुकारामांनी आपल्या पत्नीला आणि मुलांना 'रांडापोरे' म्हटले, तुलसीदास नारीला 'ताडन की अधिकारी' म्हणतो हे कुठल्याप्रकारचे अध्यात्म आहे असा खडा सवाल पुलं करतात. आपली पत्नी आणि कोवळी मुले भुकेने तडफडत असतांना त्यांची भूक मिटवणे तर दूरच राहिले वर त्यांना 'रांडापोरे' म्हणून संबोधणे हे कुठल्या अध्यात्मात बसते असा सवाल केल्यावर आपण निरुत्तर होतो. लाखोंच्या संख्येने वारीला आणि तीर्थक्षेत्रांना जाणारी जनता असणार्‍या देशात इतका अन्याय, दारिद्र्य कसे हा प्रश्न अस्वस्थ करून जातो. मंदिरे, मस्जिदी, चर्चेस यापेक्षा आपल्याला शाळा, इस्पितळे यांची जास्त गरज आहे असे पुलं म्हणतात ते पटते. लेखक पुस्तकात म्हणतात 'आपले अध्यात्म हे जन्माविषयीच्या अज्ञानातून आणि मृत्यूविषयीच्या भितीतून उगम पावले आहे.' - थोडा विचार करता हे पटते.

'माओचे लष्करी आव्हान' (१९६३) हे दि. वि. गोखलेलिखित पुस्तक वाचायलाच हवे असे असावे. १९६२ च्या चीन युद्धात आपण कसा सपाटून मार खाल्ला, नेहरूंचा फाजील आत्मविश्वास आणि गाफीलपणा आपल्याला कसा नडला हे समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचायला हवे. चीनने हल्ला केला तेव्हा पुलं अमेरिकेत होते. त्याकाळी तिथे जॅक पार नावाचा लोकप्रिय नट होता. त्याने भारताची खिल्ली तर उडवलीच परंतु नेहरुंच्या पंतप्रधानपदाची जी लक्तरे त्याने तिथे टांगली ती बघून पुलं खूप दु:खी झाले. लहान मुलाचा आवाज काढून नेहरू कसे अमेरिकेच्या अध्यक्षाकडे मदतीची भिक मागायला आले हे त्या नटाने साभिनय करून दाखवले. भारतीय जवान किड्या-मुंगीसारखे मरत असतांना अमेरिका मनमुराद हसत होती. नेहरूंनी आपली दुर्बलता तत्वांनी झाकण्याचा प्रयत्न केला आणि फसले. तिथेच एक कृष्णवर्णीय बुट-पॉलीशवाला पुलंची आणि भारताची खिल्ली उडवतो. तो म्हणतो - भारतावर मुघलांनी राज्य केले, मग ब्रिटिशांनी केले आणि आता चीनी भारताला गुलाम बनवायला येत आहेत. भारतीय लोक स्वातंत्र्याच्या खरोखर लायकीचे आहेत का? ही प्रस्तावना वाचून संताप आल्याशिवाय राहत नाही.

'करुणेचा कलाम' (१९८४) या बाबा आमटेंच्या कवितासंग्रहाला दिलेली प्रस्तावना नुसतीच वाचनीय नाही तर त्यातून बाबा आमटेंनी त्यांचे आयुष्य दु:खी, कष्टी रोग्यांसाठी कसे सहजतेने उधळून दिले हे व्यवस्थित कळते. बाबा आमटे इंग्रजीत कविता करत असत ही नवीन माहिती या प्रस्तावनेतून मिळते. येशू ख्रिस्तावर त्यांची अपार श्रद्धा होती ही माहिती आपली उत्सुकता चाळवते.

'अस्मिता महाराष्ट्राची' (१९७१) या डॉ. भीमराव कुळकर्णीलिखित पुस्तकाची प्रस्तावना मराठी मनोवृत्तीवर कोरडे ओढते. महाराष्ट्रात उद्योग-धंदे, व्यापार-उदीम असूनदेखील महाराष्ट्रात राहणारी मराठी जनता या भरभराटीपासून दूर का असा सवाल पुलं आपल्या प्रस्तावनेतून विचारतात. शिवाजीमहाराज, टिळक, फुले, आगरकर वगैरे वंदनीय माणसे आहेत पण आपण फक्त त्यांचा जप करत राहिलो तर खोट्या अहंकाराने आंधळे होऊ असे स्पष्ट प्रतिपादन करतात. शिवाजीमहाराजांना अठराव्या शतकात डचांनी स्थापन केलेला एक छापखाना राजापूरजवळ सापडला होता. ते तंत्र आपल्या इथे प्रसिद्ध झाले असते तर भारताचा इतिहास वेगळा असू शकला असता. दुर्दैवाने छापखाना चालवू शकणारे कुशल कामगार आपल्याकडे नव्हते. शेवटी महाराजांनी तो छापखाना एका गुजराती व्यापार्‍याला विकून टाकला. मराठी प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी अशी ही प्रस्तावना आहे.

'झोंबी' (१९८७ - आनंद यादव) या कादंबरीवरील प्रस्तावना वाचूनच माझ्या अंगावर शहारे आले. हे पुस्तक मी अजून वाचलेले नाही. ही प्रस्तावना वाचून हे पुस्तक वाचायचेच असे ठरवले आहे. भयानक दारिद्र्यात आयुष्याची कशी वाताहत होते आणि कर्ता पुरुष बेजबाबदार, रानटी, दारुडा असल्यावर स्त्रियांच्या आयुष्याची कशी फरफट होते याचे हृदयस्पर्शी वर्णन या प्रस्तावनेत आहे. डॉ. आनंद यादव अशा विपरित परिस्थितीतून झेप घेऊन समाजात मानाचे स्थान मिळवतात याचे कौतुक या प्रस्तावनेतून ओसंडून वाहते.

'गदिमा - साहित्य नवनीत' (१९६९) या पुस्तकाच्या प्रस्तावनेतूनच गदिमांच्या अफाट प्रतिभेची आणि बेफाम उंचीची आपल्याला कल्पना येते. अनेक गीते, कविता, बालगीते, लावण्या, पटकथा, गीतरामायण, गीतगोपाल, गीतसुभद्रा, लघुकथा लिहून वयाच्या अवघ्या अठ्ठावन्नाव्या वर्षी जगाचा निरोप घेणारे पद्मश्री माडगुळकर एक महान प्रतिभावंत होते हे या प्रस्तावनेतून पुलं अधोरेखित करतात.

या व्यतिरिक्त 'रंग माझा वेगळा' (सुरेश भट), 'संगीतातील घराणी' (ना. र. मारुलकर), 'एक अविस्मरणीय मामा' (गंगाधर महांबरे), 'अवतीभवती' (वसंत एकबोटे), 'थोर संगीतकार' (प्रा. बी. आर. देवधर), 'मी कोण?' (राजाराम पैंगीणकर - मी नायकिणीचा मुलगा असे जगजाहीर करणारा लेखक), 'अशी ही बिकट वाट' (वि. स. माडीवाले), 'मातीची चूल' (आनंद साधले), 'मनाचिये गुंफी' (प्रकाश साठ्ये), 'प्रतिमा - रूप आणि रंग' (के. नारायण काळे) या पुस्तकांच्या प्रस्तावनादेखील अतिशय उद्बोधक, वाचनीय, उत्कंठावर्धक, आणि दर्जेदार आहेत.

चांगले, सकस, विचार करायला प्रवृत्त करणारे, मन गुंतवून ठेवणारे असे काही दर्जेदार वाचावयाचे असल्यास 'चार शब्द' हे पुस्तक आपल्याला तो आनंद खचितच देईल यात शंका नाही. नुसते इतकेच नाही तर आपली दृष्टी स्वच्छ करणारे, विचार नितळ करणारे, आणि आपल्या कृतीमध्ये चांगला विचार ओतण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करणारे असे हे पुस्तक आहे.

लेखक - समीरसूर 

हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

Tuesday, February 7, 2023

ऐसी सखी, सहचरी पुन्हा होणे नाही - मंगला गोडबोले

दिवंगत साहित्यिक सुनीताबाई देशपांडे यांच्याविषयीच्या आठवणींतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर एका लेखिकेने टाकलेला प्रकाश.

माझ्या पिढीच्या अनेक लेखकांप्रमाणे मीही माझं अगदी सुरुवातीचं एक पुस्तक पु. लं. ना अर्पण केलेलं होतं. सन १९८५ ! नाव 'झुळूक' अर्पणपत्रिकेतले शब्द 'अर्थातच पु. लं. ना ज्यांनी आयुष्यातले निरामय आनंदाचे क्षण दिले!' पुस्तकाचे प्रकाशक दिलीप माजगावकर आणि मी पुस्तक द्यायला 'रूपाली'च्या फ्लॅटमध्ये गेलो होतो. मला काही सुधरत नव्हतं. पु. लं. ना पुस्तक द्यावं, वाकून नमस्कार करावा आणि उलट पावलो घरी यावं एवढीच कल्पना होती. पु. लं. च्या घरामध्ये पाच-सहा मंडळी बसली होती. हॉल आणि स्वयंपाकघर यांच्या जोडावर सुनीताबाई बसल्या होत्या. त्या एकटक माझ्याकडे बघत होत्या. पु. लं. ना आत्यंतिक भक्तिभावानं नमस्कार करून झाल्यावर मी सुनीताबाईंसमोर नमस्काराला वाकले. त्यांनी पटकन पाय मागं घेतले. म्हणाल्या, "भाईला नमस्कार केलात की तेवढा पुरे. लेखकानं उगाच याच्या त्याच्या समोर वाकू नये." 'उगाच नव्हे, तुमच्या विषयी पण वेगळा आदर वाटतो म्हणून...,' असं काहीतरी मला बोलता आलं असतं; पण धीर झाला नाही. धारदार नजर आणि त्याहून धारदार वाक्यं यांनी माझी बोलती बंद झाली होती.

१९९२ मध्ये 'अमृतसिद्धी पु.ल. समग्रदर्शन' या ग्रंथाच्या कामाला सुरुवात केली. पु. लं. च्या जीवनकार्याचा समग्र आढावा घेण्याचा तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, त्याचा आराखडा ठरवण्यासाठी प्रा. स. ह. देशपांडे आणि मी पु. लं.कडे गेलो होतो. कसं कधी काम करायचं, कोणाकोणाची मदत घ्यायची अशी बोलणी सुरू असताना पु. लं. ना सारखी सुनीताबाईंची मदत लागत होती. 'आपला कोण ग तो... सुनीता?' 'मला आठवत नाही; पण सुनीता नक्की सांगल,' 'सुनीतानं ते कात्रण नक्की ठेवलं असेल,'
     
अशा असंख्य वाक्यांमधून पु. लं.चं त्यांच्यावरचं अवलंबित्व जाणवत होतं. कोणतंही काम त्यांच्यावर सोपवून पु. ल. किती सहजपणे अश्वस्त होतात हे वारंवार दिसत होतं. आम्ही निघताना सुनीताबाई सहज बोलून गेल्या, "बाकी सगळं तुम्ही लोक बारकाईनं करालच; पण एक लक्षात ठेवा, विशेषणं जपून वापरा. "
  
बेहिशेब विशेषणं वापरल्यानं व्यक्तिपर लेखनाचं काय होतं हे आजही कुठेकुठे दिसतं तेव्हा सुनीताबाईंचं ते वाक्य मला आठवतं. सुनीताबाईंची वाङ्मयीन जाणीव आणि साक्षेप किती लखलखीतपणे व्यक्त झाला होता त्यातून! सुनीताबाईंची प्रखर बुद्धिमत्ता, कर्तव्यकठोरता, उत्तम स्मरणशक्ती, सदैव जागा असणारा मूल्यविवेक, जे जे उत्तम उदात्त उन्नत याचं आकर्षण आणि खोटेपणाचा दंभाचा तिटकारा याचं प्रत्यंतर त्या काळात अनेकदा आलं. एवढी वर्ष एवढ्या लोकप्रियतेला तोंड देणं हे सोपं नसणार. सतत लोकांच्या नजरेत राहायचं, तरीही आपल्याला हवं ते कटाक्षानं करून घ्यायचं, कोण काय म्हणतं याच्या आहारी जायचं नाही, जनापवादांचा बाऊ करायचा नाही असं एक प्रकारे अवघड आयुष्य त्या जगल्या. त्यांची तर्ककठोरता अनेकांना तर्ककर्कशता वाटली; पण त्यांनी स्वेच्छेनं पत्करलेल्या रस्त्याला माघार नव्हती.

स्वभावातःच परफेक्शनिस्ट आदर्शवादी असल्यानं सुनीताबाई चटकन दुसऱ्याचं कौतुक करत नसत; तसंच स्वतःचंही कौतुक करत किंवा करवून घेत नसत त्या स्वतःला ललित लेखक मानत नसत. 'तेवढी प्रतिभा माझ्यात कुठली?' असं म्हणून त्यांच्या लेखनाची स्तुती उडवून लावत. घेतलेल्या आक्षेपांवर मात्र जरूर तेवढा विचार करत, चर्चा करत. संदर्भात कुठेही चूक झाली, तर वारंवार दिलगिरी व्यक्त करत. त्यांना आवडणाऱ्या माणसांवर विलक्षण माया करत. कुमार गंधवांचे पुत्र मुकुलजी यांच्या व्यसनाबद्दल काही उलटसुलट बोललं जात असताना त्या एकदम म्हणाल्या होत्या, "कुठेतरी दुखावला असणार हो तो... त्याला मी नुसती हाक मारली, तरी सुतासारखा सरळ होतो तो... लोकांना त्याला नीट वागवता येत नाही म्हणून...'

सुनीताबाईंची ती हाक नक्कीच आर्त असणार. त्यांच्या आवाजाचा पोत, हाका लांबविण्याची- हेल काढण्याची शैली आणि वाक्यं मध्येच सोडून देऊन साधलेला परिणाम माझ्या पूर्णपणे स्मरणात आहे. 'सुंदर मी होणार 'मधली त्यांची दीदीराजेची स्मरणारे जे अगदी थोडे वृद्ध लोक मला भेटले ते एकमुखानं म्हणाले, की सुनीताबाईंना दीदीराजे जशी समजली तशी कोणाला समजली नाही. नाटकात चाकाच्या खुर्चीवर बसून त्यांनी जशी कविता सादर केली तशी कोणालाही करता आली नाही. याविषयी त्या एकदा म्हणाल्या, "दीदीराजे करताना नुसतं शरीर अपंग दिसून चालत नाही. अभिनेत्रीचा चेहरापण अपंग दिसावा लागतो.' सुनीताबाईंना किती आणि काय दिसलं होतं, हे अशा वेळी दिसायचं! सुनीताबाई हे एक अदभूत रसायन होतं. पु.लं. आणि त्या ही एक विलक्षण सांगड होती. सगळी मतमतांतरं गृहीत धरूनही अशी व्यक्ती पुन्हा होणार नाही, असा गहिरा नातेसंबंध वारंवार दिसणार नाही. असंच वाटतं.

'तुझे आहे तुजपाशी' या नाटकात पु.लं.नी 'उषा'चं जे वर्णन केलं ते सुनीताबाईना बव्हंशी लागू होतं. हे वर्णन सतीशच्या तोंडी असे होते कधी गौरीसारखी अल्लड.... कधी पार्वतीसारखी निग्रही... कधी उमेसारखी प्रेमळ..... तर कधी साक्षात महिषासुरमर्दिनी... अशी अनेक रूपं धारण करणारी देवता होती; असे सांगताना तो पुढे म्हणतो, पण... जाऊ द्या. जखमेवरच्या खपल्या बेतानं काढाव्यात. . उगाच भळाभळा रक्त वाहायला लागायचं.' सुनीताबाईंना आठवताना मला हीच भीती वाटते. म्हणून इथेच थांबते.

मंगला गोडबोले
दैनिक सकाळ
९/११/२००९

Tuesday, January 31, 2023

ती फुलराणी (प्रथम प्रयोग २९ जानेवारी १९७५) - प्रसाद जोग

अजरामर मराठी नाटक..
ती फुलराणी
प्रथम प्रयोग :
२९ जानेवारी १९७५

इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती "फुलराणी" या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

जॉर्ज बर्नार्ड शॉचे ‘पिग्मॅलिअन’ वाचत असताना त्यातल्या पात्रांच्या संवादाची मराठी रूपे पुलंना दिसायला लागली आणि हे नाटक मराठीत आणावे असे त्यांना वाटत होते. पुलंनी स्वतः जरी ‘ती फुलराणी’ला ‘पिग्मॅलिअन’चे रूपांतर म्हंटले असले तरी ते अस्सल देशी वाटत.

सतीश दुभाषी पु.लं. कडे नवीन नाटकाची मागणी करायला गेले असता , त्यांच्या मनात हा पिग्मॅलियन पुन्हा जागा झाला. सतीशसारखा गुणी नट त्यांना प्रो. हिगिन्सच्या भूमिकेत दिसायला लागला आणि मग त्यांनी ‘ती फुलराणी’ हे नाटक लिहून काढले ते मुख्यत: सतीशसाठी. मंजुळेच्या भूमिकेसाठी भक्ती बर्वे यांना आणि विसूभाऊसाठी अरविंद देशपांडेंना घेण्याचा आग्रह धरला तो पु.लं च्या पत्नी सुनीताबाईंनी. इंडियन नॅशनल थिएटरने हे नाटक रंगमंचावर आणले. सतीश दुभाषी, भक्ती बर्वे, अरविंद देशपांडे, राजा नाईक, मंगला पर्वते ह्या गुणी कलावंतांना बरोबर घेऊन ह्या नाटकाचे दिग्दर्शन करणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव पु.लं.ना मिळाला . ह्या नाटकाच्या स्वभावाला धरून त्यातल्या शब्दाशब्दात,वाक्यावाक्यात प्रयोगातल्या कलावंतांनी नाटकात रंग भरला.

पु.लं. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’ नाटकाने भक्ती बर्वे यांना ओळख प्राप्त झाली. या नाटकातील ‘मंजुळा’ हे पात्र रंगभूमीवरील अजरामर भूमिकांपैकी एक. या नाटकाच्या तालमींच्या आठवणीही तितक्याच खास आहेत.’ती फुलराणी’ मधील स्वगत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ पुलंनी स्वत: भक्ती यांच्याकडून बसवून घेतले होते. या स्वगताला वन्स मोअर येणार हे भाकीत पुलंनी तालमीतच केले. गाण्याला वा वादनाला वन्स मोअर येण स्वाभाविक होत पण स्वगताला वन्स मोअर म्हणजे भक्ती यांच्यासाठी ती कल्पनाच अविश्वसनीय होती. ती फुलराणी च्या पहिल्या प्रयोगात भक्ती‌ यांनी हे स्वगत सादर केलं आणि प्रेक्षकातून एकदा नाही अनेकदा वन्स मोअर आला…पुलंचं भाकीत खरच ठरल.


मंजुळा : ………” असं काय मास्तरसाहेब ? गधडी काय? नालायक, हरामजादी ? थांब…..

थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा
मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर
तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वांडात घालीन शान
तुजा क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा
तुला शिकवीन चांगलाच धडा

तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज
माजी चाटत येशील बुटां, मी म्हनन, काय आज इकडं कुठ ?
हात पसरून मागशील भीक, मी म्हनन, जरा शुद्ध बोलायला शीक
मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चाल भाईर मुकाट
उगं वळवळ करतोय किडा ! तुला शिकवीन चांगलाच धडा !

तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा,
ओ हो हो, आहाहा, ओ हो हो, आहाहा, हाऊ स्वीट, हाऊ स्वीट
लव्हली, चार्मिंग, ब्युटी, हाय, समदे धरतील मंजूचे पाय
कुत्र्यावानी घोळवीत गोंडा, तरन्या पोरांचा दारात लोंढा
हाय मंजू, हाय दिलीप….हाय मंजू, हाय फिलीप
मंजू बेन केम छो, हाऊ डु यू डु,
कम, कम, गो हेन्गिंग गार्डन, आय बेग युवर पारडन ?
कुनी आनतील सिलीकची साडी, कुनी देतील मोत्यांची कुडी
कुनी घालतील फुलांचा सडा ! तुला शिकवीन चांगलाच धडा !

मग? कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होउन स्वार
नदरेला जेव्हा नदर भिडल, झटक्यात माझ्या पायाचं पडल
म्हनल,रानी तुज्यावर झालो फिदा, क्या खुबसुरती, कैसी अदा
माग, माग, काय हवं ते माग, प्यारी माज्यावर धरू नकोस राग
मी मातर गावठीच बोलीन, मनाची गाठ हळूच खोलीन
गालावर चढल लाजेची लाली, नदर जाईल अलगद खाली
म्हनेन त्याला, ह्ये काय असं ? लोकांत उगंच होईल हसं
कुंपणापातर सरड्याची धाव, टिटवीन धरावी का दर्याची हाव
हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा? गटारीच्या पान्याला सोन्याचा घडा ?
मग राजाच येईल रथात बसून, म्हनंल, कसं बी कर, पन हो माझी सून
दरबारी धरतील मुठीत नाक, म्हनत्याल राजाचा मान तरी राख
तोरणं बांधा नि रांगोळ्या काढा, त्या अशोक्याला शिकवीन चांगला धडा !

मंग मंजू म्हनल, महाराज ऐका, त्या अशोक मास्तराला बेड्याच ठोका
शिशाचा रस त्याच्या कानांत वता, आन लखलख सुरीन गर्दन छाटा
मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा, आन पालटून काढून चाबकानं फोडा
महाराज म्हनत्याल, भले हुशार, धाडून द्या रं घोडस्वार
हां हां हां हां
जवा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हनशील मंजे सोडीव मला
धरशील पाय आन लोळशील कसा, रडत ऱ्हाशील ढसाढसा
तुझा ए, तुझा ओ, तुझा न, तुझा ण, तुज्या श्या, तुजं वसकन आंगाव येणं
भोग आता गप तुज्या कर्माची फळं, तुज्या चुरूचुरू जिभेला कायमचं टाळं
महाराज म्हनत्याल, ह्याची गर्दन तोडा, मी म्हनन, जाऊ द्या, गरिबाला सोडा
तू म्हनशील, मंजुदेवी आलो तुला शरन
मी म्हनन, शरन आल्यावं देऊ नये मरन. “

पुलंनी हे इतकं अफलातून लिहिलंय ना, की अगदी मंजुळेसारखं ते त्याच ठसक्यात बोलावसं वाटतं. पूर्ण फुलराणीचं नाटक तर अनेक महाविद्यालयांमध्ये अजूनही बसवलं जातंच पण फक्त या स्वागताचे कितीतरी प्रयोग शाळा, महाविद्यालयांमध्ये झाले असतील.

प्रसाद जोग
सांगली
९४२२०४११५०

'ती फुलराणी' पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


Friday, January 27, 2023

पंडित गजाननराव

श्री. गजाननबुवांच्या वयाला ६१ वे वर्ष लागत असल्याच्या प्रसंगी त्यांचा गौरव करण्याची योजना केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
         
मी पुण्याला कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हापासूनचा म्हणजे सुमारे तीस वर्षांपूर्वीपासूनचा त्यांचा आणि माझा परिचय आहे. टिळक रोडवरील गोखल बिल्डिंगमध्ये बुवांचे बिन्हाड असे, तळमजल्यावर. समोर बहावा टिळक रोड. हल्लीच्या इतका धोधो वाहणारा नसला तरी वर्दळीचाच रस्ता. बुवांची तिथे सतत मेहनत चाले. व्हायोलिन वादक म्हणून त्यांचा खूप लौकिक झालाच होता. परंतु त्यांनी आता गायनाकडे अधिक लक्ष द्यायला सुरवात केली होती. आवाजाची तयारी एखाद्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे चाले. वास्तविक गाण्याच्या मेहनतीला ती जागा अत्यंत गैरसोयीची. म्हणजे बिऱ्हाडाचे प्रवेशद्वार फुटपाथवरच उघडते. पण तिथे भान हरपून बुवांची मेहनत चाले. तशी ती खोली नशीबवान आहे. तिथे बुबांच्या वेळेपासून जी सुरांची साधना सुरू झाली ती आजतागायत श्री. मारुलकर युवा वगैरे मंडळीनी चालू ठेवली आहे.

गेल्या महायुद्धाचे दिवस. वातावरण संगीताला प्रतिकूल, विलक्षण आर्थिक कुचंबणा, अशा परिस्थितीत बुवांनी जे मेहनतीचे पहाड फोडले त्याला तोड नाही. त्यांचे तीर्थरूप कै. अंतुबुवा ह्यांच्याकडून मिळालेला वारसा त्यांनी नुसताच सांभाळला नाही तर त्यात आणखी भर घातली. स्वतः गायक-वादक म्हणून कीर्ती मिळविली. याहूनही मला त्यांचा गौरव, स्वतःला लाभलेली आणि मेहनतीने मिळविलेली विद्या कंजूषपणाने लपवून न ठेवता योग्य शिष्याना त्यानी मोकळ्या मनाने दिली, ह्यासाठी करावा असे वाटते.

मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ति झाली होती. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांना लवकर निवृत्त व्हावे लागले. परंतु त्या अवधीत त्यानी आपल्या तालीम देण्याच्या पद्धतीने नव्या पिढीतल्या विद्यार्थ्यांतही अभिजात गायकी विषयी फार मोठी आवड उत्पन्न केली. वरपांगी परंपराभिमानी वाटणारे 'बुवा' कमालीचे चौकस आहेत. नवे प्रयोग काय चालले आहेत हे समजून घेण्याविषयी उत्सुक आहेत.

आयुष्यभर 'सूर आणि लय' ह्याखेरीज दुसरा कसलाही विचार न करता जगणारी ही बुवांसारखी माणसेच संगीतकलेची खऱ्या अर्थाने उपसना करतात. त्यांची ही 'पार्ट-टाइम' उपासना नसते, किंबहुना जीवन ह्याचा अशा माणसांच्या कोशातला अर्थ 'सुरलयीची उपासना करायला नियतीने दिलेली संधी हाच असतो. बुवा साठी ओलांडीत आहेत. आणखी अनेक वर्षे त्यांना प्रिय असलेले स्वरमय जीवन जगण्यासारखे सर्व प्रकारचे स्वास्थ्य त्यांना लाभो ही ह्याप्रसंगी शुभकामना व्यक्त करतो.

- पु. ल. देशपांडे

Tuesday, January 24, 2023

मराठवाड्याच्या धुळीत अत्रे साहेबांनी दिलेला वसा पुलंनी आयुष्यभर टाकला नाही - प्रा. मिलिंद जोशी

पु.ल.देशपांडेंचे नुसते नाव जरी उच्चारले तरी मराठी माणसांच्या मनात आनंदाचं कारंजं सुरू होते. वक्तृत्व, साहित्य, नाट्य, संगीत, विनोद अशा सर्व कलांमध्ये रममाण होणार्‍या पुलंनी स्वत: आनंद घेतला आणि रसिकांनाही तो दिला. म्हणून तर आपण पुलंना ‘आनंदयात्री’ म्हणतो. श्री. म. माटे मास्तर म्हणत, ‘माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते, तितका काळ तो माणूस जिवंत असतो.’ महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी पुलंची आठवण निघत नाही. इतकं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड आजही कायम आहे.

नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु.ल. अध्यक्ष होते. या संमेलनात आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे एका व्यासपीठावर आले होते. त्या वेळेस मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट होती. रस्त्यावर असणारे खड्डे, प्रचंड धूळ यामुळे अत्रे त्रासलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ तोंडसुख घेतले. अत्रे म्हणाले, ‘काय हे मराठवाड्यातले रस्ते आणि काय ही धूळ! या धुळीनेच मी हैराण झालो आहे.’

नंतर पु.ल. भाषणासाठी उभे राहिले. अत्रेंच्या या भाषणाचा संदर्भ घेत म्हणाले, ‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली त्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्या माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे असे वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही. अशा मराठवाड्यात अत्रे साहेब आपण आहात.’ लोकांनी टाळ्यांचा अक्षरश: कडकडाट केला.

सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, ‘‘मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे’’. आचार्य अत्रेंचे शब्द खरे ठरले. अत्रेंच्या नंतर महाराष्ट्राला हसवण्याचे काम पुलंनी केले.

पुलंचा जन्म ८ नोव्हेंबर, १९१९ रोजी गावदेवी इथल्या कृपाळ हेमराज चाळीमध्ये झाला. त्यांचे वडील बेळगाव जवळच्या चंदगड गावचे. त्यांचं घराणं बेळगावजवळच्या जंगमहट्टीचं. घरासमोर गंधर्वगड आणि कलानिधीगड हे दोन गड होते. या दोन गडांचे दर्शन पुलंना रोज घडत होते. त्यांना ललित कलांविषयी आणि बालगंधर्वांविषयी जे आकर्षण वाटत होते ते कदाचित यामुळेच असेल.

पुलंचे आजोबा म्हणजे कारवारचे वामन मंगेश दुभाषी. त्यांनी ‘ऋग्वेदी’ या टोपण नावाने ग्रंथ लिहिले. त्यांनी ‘आर्यांच्या सणाचा इतिहास’ हा ग्रंथ लिहिला. टागोरांच्या गीतांजलीचे त्यांनी भाषांतर केले. नातवाने लेखक व्हावे असे आजोबांना वाटत होते आणि मुलाने गायक व्हावे असे वडिलांना वाटत होते. पुलंनी दोघांनाही नाराज केले नाही. पुलंच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांचा गळा गोड होता. त्यांना पेटीवादनाची आवड होती. हे सारे वंशपरंपरेने पुलंमध्ये आले.

शाळकरी वयातच त्यांनी मास्तरांवर विडंबन लिहिलं होतं. ‘आजोबा हरले’ नावाचं प्रहसन लिहिलं होतं. नकला करणे, गाणे म्हणणे, पेटी वाजवणे, नाटकं लिहिणे, ती बसवणे, त्यात भूमिका करणे अशा अनेक गोष्टीतून पुलंचं व्यक्तिमत्त्व विकसित होत गेलं. १९४१ साली वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे पुलंना त्यांचे मुंबईचे बिर्‍हाड आवरून पुण्याला स्थलांतरीत व्हावे लागले.

१९४२ साली त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए.साठी प्रवेश घेतला. त्याकाळात त्यांना चरितार्थासाठी भावगीताचे कार्यक्रमही करावे लागले. १९५० साली सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून ते एम.ए. झाले. त्यानंतर बेळगावच्या राणी पर्वतीदेवी महाविद्यालयात, मुंबईच्या कीर्ती विद्यालयात आणि मालेगाव शिक्षण संस्थेत त्यांनी काही काळ अध्यापनाचे काम केले. १९४३ साली बडोद्याच्या अभिरूची मासिकामध्ये पुलंनी लिहिलेले अण्णा वडगावकर हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले. तिथून त्यांची अर्धशतकी लेखकीय कारकीर्द सुरू झाली.

चिंतामणराव कोल्हटकरांच्या ललित कलादर्शनाच्या नाटकानंतर मो. ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन कंपनीच्या नाटकांमध्ये पु.ल. काम करीत असत. रांगणेकरांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘कुबेर’ या चित्रपटात पुलंनी भूमिका केली. ‘जा जा गं सखी, जाऊन सांग मुकुंदा’ हे गीत पुलंनी गायले. इथून त्यांची मराठी चित्रपटसुष्टीतली कारकीर्द सुरू झाली. चोवीस मराठी चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात पुलंची कामगिरी घडली.

‘तुका म्हणे आता’ हे मंचावर आलेले पुलंचे पहिले नाटक. त्याचा पहिला प्रयोग १९४८ साली पुण्यात झाला पण या नाटकाला यश मिळाले नाही. या नाटकात वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे आणि वसंत सबनीस असे तीन ‘वसंत’ होते. एक संत आणि तीन वसंत असूनही नाटक चालले नाही असं पु.ल. म्हणत. त्यानंतर अंमलदार हे नाटक आलं, ‘तुका म्हणे आता’ हे गंभीर नाटक होते, ते लोकांनी विनोदाच्या अंगाने घेतले. अंमलदार हे विनोदी नाटक आहे, ते लोकांनी गंभीरपणे घेऊ नये असं पु.ल. म्हणाले.

२६ जानेवारी, १९५७ रोजी ‘तुझे आहे तुजपाशी’ हे त्यांचे नाटक रंगभूमीवर आले. ते मराठी नाट्यसृष्टीतील मैलाचा दगड मानले जाते. सौंदर्यासक्त काकाजी आणि जीवनविरक्त आचार्य या दोन जीवन प्रवृत्तीमधला संघर्ष पुलंनी या नाटकात मांडला. पुढे आलेल्या भाग्यवान, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, एक झुंज वार्‍याशी, ती फुलराणी, राजा ओयरीपौस या सारख्या नाटकांनी मराठी रंगभूमीला समृद्धी देताना प्रयोगशीलतेचे आणि नावीन्याचे भानही दिले. विशिष्ट विषयाचा आणि मांडणीचा आग्रह नाही. आपल्याला जे आवडते तेच लोकापर्यंत पोचवायचे हा पुलंचा सरळ हेतू होता.

पुलं स्वत: उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, निर्माते असल्यामुळे रंगमंचावर प्रायोगिक कसे व्हावे याचे प्रगल्भ भान त्यांना होते. म्हणूनच रंगभूमीच्या इतिहासात पुलंनी आपल्या विविधांगी कर्तृत्वाने मानाचे स्थान मिळवले. १९५५ मध्ये पुलं आकाशवाणीच्या सेवेत पुणे केंद्रावर रूजू झाले. १९५१ ते १९६१ या काळात भारतातल्या दूरदर्शनचे पहिले निर्माते म्हणून त्यांची दिल्लीतली कारकीर्द संस्मरणीय ठरली. याच काळात जनवाणी, साधना, दीपावली, शिरीष, विविध वृत्त वगैरे नियतकालिकांमधून बटाट्याच्या चाळीतल्या गमतीजमती विनोदी शैलीत मांडणारे त्यांचे लेख प्रसिद्ध होत होते. ते खूप गाजत होते. १९५८ साली मौज प्रकाशनगृहाने ‘बटाट्याची चाळ’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध केले.

पुढे युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास एज्युकेशनचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनला गेले. लंडनमधल्या मुक्कामात बटाट्याची चाळमधील निवडक निवडक भागांचे अभिवाचन त्यांनी केले. त्यातूनच ‘बटाट्याची चाळ’ प्रत्यक्ष अवतरली. पुढे वार्‍यावरची वरात, असा मी असामी, वटवट, हसवणूकच्या माध्यामातून पुलंनी मांडलेल्या खेळाने मराठी माणसांना भरभरून आनंद दिला. बटाट्याची चाळ मधून पन्नास-साठ बिर्‍हाडांचा एक मानस समूह त्यांनी निर्माण केला आणि मध्यमवर्गीयांच्या जगण्याची त्यांनी मार्मिक उलटतपासणी केली. ती लोकांना भावली. पुलंच्या या सर्व प्रयोगांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

एका व्यक्तिला चारच तिकीटे मिळतील असा तो सुवर्णकाळ होता. प्रयोगाची वेळ आणि संहिता याबाबत पुलं आणि सुनीताबाई दोघेही खूप दक्ष होते. संहितेतला एक शब्दही बदलला जाता कामा नये. याबाबत ते आग्रही होते. कितीही मोठा अधिकारी किंवा पुढारी प्रयोगाला येणार असला तरी पुलंनी प्रयोगाची वेळ कधी बदलली नाही. ‘रसिकांनी पाच वर्षाखालील मुलांना प्रयोगासाठी आणू नये’ अशा त्यांना सूचनाच होत्या. नटांचे पाठांतर असलेच पाहिजे. ‘पाठांतर नसणे म्हणजे हातात लगाम न घेता घोड्यावर बसण्यासारखे आहे’ असं पुलं म्हणत.

त्या काळात या प्रयोगाचे पंधरा रूपये तिकिट ठेवले असते तरी लोक आले असते पण पुलंनी पाच रूपयेच तिकिट ठेवले. ‘बटाट्याची चाळ’ फॉर्मात असतानाच पुलंनी ‘वार्‍यावरची वरात’चे प्रयोग सुरू केले. नवे-नवे प्रयोग ते सतत करीत राहिले. पुलं थकताहेत, दम लागतोय हे लक्षात येताच त्यांनी प्रयोग बंद केले. सदाभिरूची न सोडता प्रेक्षकांपुढे आसू व हसूचे खेळ करून त्यांची करमणूक केली.

‘गर्दी खेचण्यासाठी सदाभिरूचीच्या मर्यादा ओलांडण्याची गरज नसते’ हे पुलंचे सांगणे आजच्या रसिकांच्या अभिरूचीवर स्वार होणार्‍या कलावंताना खूप काही सांगणारे आहे.

इंग्लंडमधल्या वास्तव्यावर, एकूण प्रवासावर आधारलेले ‘अपूर्वाई’ हे पुलंचे प्रवासवर्णन किर्लोस्कर मासिकात क्रमश: प्रसिद्ध झाले. १९६० मध्ये ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर आलेल्या ‘पूर्वरंग’, ‘जावे त्यांच्या देशा’, ‘व्यंगचित्रे’ या प्रवास वर्णनातून पुलंनी मराठी माणसाला जगाचे दर्शन घडवले आणि त्यांच्या जाणिवांचा परिघ विस्तारला. पुलं गुणग्राहक होते. चांगलं काम करणार्‍या सर्व क्षेत्रातील माणसांविषयी त्यांना कमालीची आस्था होती. त्यांचा गुणगौरव करण्यासाठी पुलंनी व्यक्तिचित्रं लिहिली ती व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, गुण गाईन आवडी आणि मैत्री या पुस्तकात संग्रहित झाली आहेत. पुलंची ही व्यक्तिचित्रं शब्दशिल्पच आहेत.

‘माझं पहिलं प्रेम संगीतावर आहे’ हे पुलंनी अनेकदा सांगितलं. संगीतात जो कैवल्यात्मक आनंद मिळतो त्याची सर दुसर्‍या कशालाही नाही असं पुलं म्हणत. दूरदर्शनवरच्या एका मुलाखतीत पुलं म्हणाले, ‘‘माझ्या लेखी शंभरपैकी साठ गुण संगीताला आहेत. संगीताकडं पुरेसं लक्ष देता आलं नाही याची खंत या जन्मात आहे. पुढच्या जन्मी ही चूक नक्की सुधारेन. माझ्या समाधीवर ‘याने कुमारगंधर्वांचे गाणे ऐकले आहे’ एवढेच लिहा.’’

पुलंच्या वाढदिवसाला किशोरी आमोणकरांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. किशोरीताई म्हणाल्या, ‘पुलं तुमच्यासाठी काय करू?’ पुलं म्हणाले, ‘‘गा’’. किशोरीताई फोनवर खंबावती गुणगुणल्या. पुलं म्हणत, ‘‘कालचक्राबरोबर फिरणारं ध्वनीचक्र माझ्या मनात नेमकं राहतं. माझ्या आवाजाच्या दुनियेत जास्त रंग भरला असेल तर तो संगीताने! ज्या वयात लहान मुलांचं प्रसादाच्या खिरापतीकडे लक्ष असायचं, त्या काळात माझं लक्ष कीर्तनकाराच्या कथेमध्ये, ते गात असलेल्या अभंग, श्‍लोक, आर्या यांच्या गायनामध्ये असायचे.’’

पुलं समर्थ पेटीवादक होते. लहान वयातच बालगंधर्वांच्या समोर त्यांचीच गाणी वाजवून पुलंनी त्यांची शाबासकी मिळवली होती. पुलं म्हणत, ‘माझ्या हातात प्रथम पेटी पडली त्याऐवजी सतार पडली असती तर माझी संगीतातली वाटचाल वेगळी झाली असती. रागवादन, आलापी, घरंदाज ख्याल, गायकी या दिशांनी झाली असती. पेटीवाले गोविंदराव पटवर्धन यांच्या सत्काराला पुलं प्रमुख पाहुणे होते. भाषणात पुलं म्हणाले, ‘‘मी इथं अध्यक्ष म्हणून आलो नाही. पेटीवाला म्हणून आलोय.’’

गीतरामायणात व्हायोलिन वाजविणार्‍या प्रभाकर जोग यांचा पुलंच्या हस्ते सन्मान झाला तेव्हा पुलं म्हणाले, ‘‘माणसं पराधीन असतात हे गदिमांच्या गीतरामायणात ऐकलं होतं पण इतकी स्वराधीन असतात हे जोगांचं व्हायोलिन ऐकल्यानंतर समजलं.’’

संगीत क्षेत्रातील कलावंतांविषयी पुलंना किती आस्था आणि आपुलकी होती, हे यातून दिसून येतं. पुलंची संगीत दिग्दर्शनाची कामगिरी दोन स्तरावरील आहे. एक भावगीतासाठी संगीत दिग्दर्शन आणि दुसरं चित्रपटगीतासाठीचं. पुलंनी बोलपटातील 88 गाण्यांना चाली दिल्याची नोंद आहे. संगीतकार जेव्हा साहित्यातून संगीताकडे येतो तेव्हा सूर, त्यांना वाहणारे शब्द व त्यामागील अर्थ यांचे परस्सर संबंध घट्ट होतात. अर्थ, भावना, सुरांवर तरंगतात. त्यात बुडून जात नाहीत म्हणूनच ते संगीत हृदयाला अधिक भिडतं, हे पुलंच्या संगीताचं वैशिष्ट्य आहे.

पुलंच्या सर्व आविष्कारामध्ये विनोदाची सुखद पखरण आहे. त्यांच्या विनोदाचं आणि विनोदबुद्धीचं मर्म प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी नेमकेपणानं उलगडलं आहे. त्या सांगतात, ‘‘पुलंची कल्पनाशक्ती अव्वल दर्जाची होती. पुलं स्वत:च्या संवेदना स्वत:वर उधळणारे साहित्यिक होते. म्हणून ते कलेच्या विविध प्रांतात सहजपणे वावरले आणि रमले.’’ पुलंची दृकसंवेदना, नाट्यसंवेदना, अर्थसंवेदना, रससंवेदना, श्रोतृसंवेदना अतिशय तल्लख आणि सजग होती. ती संवेदना एकांगी आणि सामान्य पातळीवरची नव्हती तर ती अनेकांगी आणि असामान्य पातळीवरची होती, म्हणूनच त्यांचं साहित्य अनुभवसमृद्ध आहे.

सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भाषेवर विलक्षण प्रभुत्व, उपहास, उपरोध, विडंबन यांचा सहज वापर, विविध क्षेत्रातील संदर्भांची समृद्धी, सहजता आणि तारतम्याचे भान यामुळं पुलंचा विनोद सहजसुंदर आणि निर्विष झाला. जगातल्या दोन महायुद्धांनी हादरलेली, देशाच्या पारतंत्र्याने पिचलेली, महागाई, टंचाई, कुचंबणा, कोतेपणा यांनी गांजलेली, वेळोवेळी येणार्‍या साम्यवाद, समाजवाद, स्त्रीवाद या नवविचारांचा अर्थ लावताना गांगरलेली, जीवनाचा उपभोग घेताना अपराधगंडाने पछाडलेली माणसं पुलंचं लक्ष्य होती. त्यांना पुलंनी मोकळं ढाकळं केलं. जीवनोन्मुख केलं.

खोगीरभरती, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक, खिल्ली, मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास ह्या त्यांच्या विनोदी लेखसंग्रहांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. पुलंनी विनोद लिहिला. अभिनित केला. उत्तम वक्तृत्वाने तो लोकापर्यत पोचवला. सिनेमा-नाटकातून तो दाखवला. इतका दीर्घकाळ मुक्तहस्ताने विनोदाची चौफेर उधळण करणारा दुसरा विनोदकार मराठी समाजाला मिळाला नाही. अपार करुणा आणि आयुष्याविषयीची खोल समज यामुळे पुलंनी जे काही निर्माण केलं ते रसिक मनांचा ठाव घेणारं ठरलं. जीवनातील विसंगती आणि विकृतीकडं त्या बुद्धीनं पाहणार्‍या पुलंच्या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या विनोदानं कोणालाही जखमा केल्या नाहीत, बोचकारलं नाही आणि रक्तही काढलं नाही.

पुलंच्या विनोदानं मराठी माणसाला खळखळून हसवताना रसरशीत जीवनदृष्टी दिली. एखाद्या घरंदाज सुनेनं चार-चौघांसमोरून जाताना स्वत:चा पदर सावरत ज्या अदबीनं जावं तितक्या सभ्यपणे पुलंचा विनोद मराठी समाजात वावरला. शाब्दिक, प्रसंगनिष्ठ, कोटीबाज अशा सर्व प्रकारच्या विनोदाची उधळण पुलंनी केली. उत्तम लेखक उत्तम वक्ते असू शकत नाहीत याची अनेक उत्तम उदाहरणं आपल्याकडं आहेत. लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपं पुलंवर प्रसन्न होती. बोलताना पुलंचा विनोद एखाद्या कारंज्यातल्या पाण्याच्या धारेप्रमाणं सहज उसळून येत असे. याचा प्रत्यय त्यांच्या लहानपणापासूनच येत होता.

पुलं दहा-अकरा वर्षाचे होते तेव्हाची गोष्ट. पार्ल्याला टिळकमंदिरात साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांचे ‘गर्व्हमेंट ऑफ इंडिया ऍक्ट’ या विषयावर व्याख्यान होते. व्याख्यानानंतर शंका निरसनासाठी प्रश्न-उत्तरं सुरू झाली. पुलं म्हणाले, ‘‘फेडरेशन राबविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगाल का?’’ पुलंकडे पाहत केळकर म्हणाले, ‘‘बाळ, तुझ्या वयाला साजेसा प्रश्न विचार.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘सध्या पुण्यात अंजिराचा भाव काय आहे?’’ त्यावर न. चिं. केळकर यांनाही हसू आवरलं नाही.

पुलंनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. एका मुलाखतीत त्याचा संदर्भ देत संवादक म्हणाला, ‘‘यांचं मन वकिलीत रमलं नाही.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘माझं मन वकिलीत रमलं नाही असं म्हणण्यापेक्षा अशिलाचं मन माझ्यात रमलं नाही असं म्हटलं तर जास्त योग्य ठरेल. ज्याप्रमाणे निष्पक्षपाती न्यायाधीश असतात त्याप्रमाणे मी निष्पक्षकार झालो असतो. ’’

पुलं आणि सुनीताबाईंनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू यांच्याप्रमाणेच बा. सी. मर्ढेकर या कवींच्या काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. मुंबईला मर्ढेकरांच्या कवितांचं वाचन पुलं आणि सुनीताबाई करणार होते. मध्यंतरात पुलंना थोडंस काहीतरी खायला लागायचं. तशा सूचना त्यांनी संयोजकांना दिल्या होत्या. संयोजकांनी ढोकळे, सामोसे, बर्फी इतके पदार्थ आणले होते की ते पाहून पुलं म्हणाले, ‘‘लोक ‘मर्ढेकर’ ऐकायला आले आहेत. ‘ढेकर’ ऐकायला नाही.’’

विजापूरला शाळेत पुलंचं भाषण होतं. टेबलावर पाणी नव्हतं. पुलंना ते हवं होतं. संयोजक कळशी व तांब्या घेऊन आले. पुलं म्हणाले, ‘‘पाणी प्यायला हवंय. आंघोळीला नकोय.’’ जालन्याला पुलंच्या सभेत शेळी शिरली. पुलं म्हणाले, ‘‘येऊ द्या तिला, महात्माजींच्या नंतर प्रथमच तिला सत्य ऐकायला मिळणार आहे.’’ पुलंच्या लेखनाकडं आणि भाषणाकडं गांभीर्यानं पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते, मराठी भाषेवर पुलंचे प्रेम आहे. म्हणूनच पुलंच्या शैलीविषयी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत लिहिलेल्या लेखात स. ह. देशपांडे म्हणतात, ‘‘पुलंचे भाषेवर प्रेम आहे तसा त्यांना भाषेचा अभिमानही आहे.’’

पुलं इंग्लंडला गेले. वर्डस्वर्थच्या स्मारकाजवळ जगातल्या इतर अनेक भाषातले त्या स्मारकाजवळ माहिती देणारे फलक होते, पण मराठीतला एकही फलक नव्हता. पुलंना ही गोष्ट खटकली. त्यांनी व्यवस्थापकाला विनंती करून परवानगी मिळवली. मराठीतला फलक स्वत: लिहिला.

पुलंनी भाषा वापरली, वाकवली आणि वाढवली. मानवेतर गोष्टींचं मानवीकरण हे पुलंच्या शैलीचं वैशिष्ट्य होतं. समाजात ज्यावेळी कसोटीचे प्रसंग येतात तेव्हा समाज विचारवंताच्या भूमिकेकडं मोठ्या आशेनं पाहत असतो. अशा काळात विचारवंतांचं सत्त्व पणाला लागलेलं असतं. आज कोणतीही भूमिका न घेणं, एवढीच एक भूमिका समाजातील विचारवंत घेत असतात. पुलंच्या बाबतीत मात्र असं घडलं नाही. त्यांनी गरज असेल तेव्हा नेहमीच ठाम भूमिका घेतली. आणीबाणीच्या काळात दुर्गाबाई भागवत वगळता अन्य साहित्यिकांनी भूमिका घेतली नाही असा अपप्रचार जाणीवपूर्वक काही मंडळींनी केला पण त्यात तथ्य नव्हतं.

जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझन डायरीचा अनुवाद पुलं करत होते. त्याचा पक्का मसुदा सुनीताबाई करत. या कामासाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून ते सभा, सत्याग्रह यात सहभागी झाले नाहीत. या गोष्टीची पुलं आणि सुनीताबाईंनी कधीही जाहिरात केली नाही. आणीबाणीनंतरच्या निवडणुकात इंदिरा गांधींनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले, ‘ही वीस अध्यायाची गीता आहे.’ त्याचा समाचार घेताना पुलं भाषणात म्हणाले, ‘ही गीता आहे हे बरोबरच आहे, कारण सुरुवातीला संजयउवाच आहे.’ त्यावर एक राजकीय नेता म्हणाला, ‘यांना आता कंठ फुटला आहे.’ पुलं म्हणाले, ‘गळा यांनीच दाबला होता, मग कंठ कसा फुटणार?’ आपली ठाम भूमिका पुलंनी नेहमीच स्पष्टपणे मांडली.

आणीबाणीनंतरच्या निवडणुकात जनता पक्षाचा विजय झाला. एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होती. पुलंना न विचारताच त्यांचं नाव वक्ता म्हणून बोलणार्‍यांच्या यादी टाकण्यात आलं होतं. लोकाग्रहाला पुलंनी बळी पडू नये असे सुनीताबाईंना वाटत होते. पुलंनाही ते पटले. स्वत: न जाता पुलंनी त्यांच्या भाषणाची कॅसेट या सभेसाठी पाठवली. पुलं लोकप्रियता आणि लोकमान्यतेच्या शिखरावर होते. जनमानसात त्यांची एक प्रतिमा होती. पती म्हणून पुलंचे सुनीताबाईंना आलेले अनुभव वेगळे होते. ते आपण मांडले तर चाहत्यांच्या मनातील पुलंच्या प्रतिमेला धक्का बसेल का? असा विचार दुसर्‍या कोणीतरी निश्चितच केला असता. जे घडून जायचं ते घडून गेलं आहे. त्याचं चर्वितचर्वण कशाला? असा विचारही मनात आला असता पण तो सुनीताबाईंच्या मनात आला नाही.

पुलंच्या अलौकिक प्रतिभेविषयी, त्यांच्या माणसं जोडण्याच्या कलेविषयी, त्यांच्या हजरजबाबीपणाविषयी सुनीताबाईंना नितांत आदर होता. प्रतिभावंत म्हणून घडणारं पुलंचं दर्शन आणि पती म्हणून घडणारं पुलंचे दर्शन या दोन्हीची अतिशय सुरेख मांडणी ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकात सुनीताबाईंनी केली. अनेकदा पतीच्या प्रतिभेच्या, प्रसिद्धीच्या, मोठेपणाच्या तेजात त्याच्या पत्नीचं तेज लुप्त होऊन जातं. मग त्या तेजाचं लुप्त होणं हा कौतुकाचा विषय होतो. ‘पुलंचे मोठेपण निर्विवाद आहे, पण माझी म्हणून स्वतंत्र ओळख आहे, ती जपली गेली पाहिजे. इतर कुणी ती जपावी अशी अपेक्षा नाही, मात्र मी ती प्राणपणाने जपेन’ या भूमिकेतून सुनीताबाई स्वत्वाची आणि सत्त्वाची जपणूक कशा करीत राहिल्या, ते या पुस्तकात वाचायला मिळतं.

पुलंच्याकडं अलौकिक प्रतिभा होती. सुनीताबाईंकडं व्यवहारदृष्टी होती. प्रतिभेचं लेणं त्यांच्याकडेही होतं. पुलंचं यश घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता हे मात्र निर्विवाद. पुण्यात २००२ साली जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्यात ज्येष्ठ लेखिकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सुनीताबाईंनी हा सत्कार स्वीकारावा यासाठी संयोजकांनी प्रयत्न केला होता. सुनीताबाईंनी हे निमंत्रण नाकारलं. सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी तसेच स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका, वत्सल कुटुंबिनी तसेच कर्तव्यकठोर विश्‍वस्त, काव्यप्रेमी रसिक तसेच परखड समाज हितचिंतक असे सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते.

आधुनिक महाराष्ट्रातल्या स्पष्ट, निर्भय, तेजस्वी आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांमध्ये सुनीताबाईंचं स्थान अगदी वरचं आहे. पुलंच्या उत्साहाला आणि अफाट सर्जन ऊर्जेला विधायक वळण देत सुनीताबाईंनी जे पुलंसाठी केलं त्याबद्दल मराठी माणसं नक्कीच त्यांच्या ऋणात राहतील, कारण त्यांच्यामुळंच पुलंच्या निर्मितीचा आनंद रसिकांना भरभरून घेता आला. पुलं आणि सुनीताबाईंनी केवळ भांड्याकुंड्यांचा संसार केला नाही. त्यांनी संसार केला तो सर्जनाचा. त्यामुळंच मराठी माणसांची सांस्कृतिक श्रीमंती वाढली.

पुलंची जन्मशताब्दी साजरी होत असताना सुनीताबाईंचं स्मरण केलं नाही तर ती कृतघ्नता ठरेल. पुलंनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि भरभरून आनंद दिला. त्याचबरोबर निखळ जीवनदृष्टी दिली. विनोदकाराबरोबरच विचारवंत आणि कलावंत म्हणूनही पुलंचं स्थान महत्त्वाचं आहे. ‘विनोदबुद्धीची ढाल हातात असली आणि अंगात रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना नामोहरम करता येतं’ हे जीवनतत्त्व त्यांनी मराठीजनांना हसतखेळत सांगितलं.

भाई, पुलं, पीएल, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशा विविध रूपात वावरणारे पु. लं. देशपांडे ही केवळ एक व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. या जगातलं दु:खं नाहीसं करता येत नाही पण ते हलकं करण्याची आस या वृत्तीत होती. या वृत्तीला रसिकतेची आणि शुभंकराची ओढ होती. ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते’ अशा सगळ्या गोष्टींचा ध्यास होता. स्वत: पुलंना इतरांना फुलवायचं आणि स्वत: आनंद घेताना तो इतरांनाही मिळावा यासाठी प्रयत्न करायचा हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं. त्यांनी स्वत:साठी काहीच साठवलं नाही. उलट समाजाकडून घेतलेलं समाजालाच वाटून टाकलं. पुलंची जन्मशताब्दी साजरी करत असताना ही ‘पुलकितवृत्ती’ अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर ते पुलंचं कृतज्ञ भावनेनं केलेलं खरं स्मरण ठरेल.

प्रा. मिलिंद जोशी
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.
९८५०२७०८२३

सदर लेख साप्ताहिक चपराक मध्ये पूर्वप्रकाशित आहे

मूळ स्रोत - > https://thepostman.co.in/pu-la-deshpande/

Wednesday, January 18, 2023

आनंदयात्री - वंदना गुप्ते

प्रत्येक नाटकानं मला काही ना काही दिलं आहे. अभिनेत्री म्हणून, माणूस म्हणून आणि नाट्यप्रवाहातील एक प्रवासी म्हणून मला ते आयुष्यभर पुरतंय आणि तरीही ओंजळ अजून भरलेली नाही. मागच्या लेखात मी ‘प्रेमाच्या गावा जावे’ विषयी लिहिलं होतं, त्याची आणखी एक आठवण सांगण्यासारखी आहे. त्या नाटकाचा दौरा कोकणात नेहमीप्रमाणं मे महिन्याच्या सुट्टीत होता. ‘देवरुख’ गावी प्रयोग, ‘ओपन एअर’ला शाळेचं भक्कम स्टेज होतं. पहिला अंक संपण्यापूर्वी दोन मिनिटं आधी माझ्यासमोर, स्टेजवर मागच्या आंब्याच्या झाडाची वर आलेली फांदी होती, त्यावरून एक आंबा पडला. मी, अरविंद देशपांडे आणि निवेदिता जोशी (सराफ) आम्ही तिघंच स्टेजवर होतो. माझी लगेच एक्झिट होती. माझ्या मनात आलं, ‘हा आंबा मी इथेच ठेवला, तर पडदा पडल्या पडल्या निवेदिता तो उचलणार.’ म्हणून, मी आंबा उचलला आणि एक्झिट घेतली. कोकणच ते. तिथला एक प्रेक्षक ओरडला, ‘आरं नटीनं आंबो चोरलोऽऽ.’ तो प्रवेश संपला आणि पहिला अंकाचा पडदा पडला.

अरविंद देशपांडे आत आले आणि त्यांनी अशी काही कानउघाडणी केली माझी. ‘नाटकाच्या कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन तू असं कसं करू शकलीस? आणि हे कसं चुकीचं आहे? किती अव्यावसायिक वागलीस तू आज? आपण प्रत्येक प्रयोग प्रेक्षकांसाठी करीत असतो. तुझी भूमिका लेक्चररची आणि तू भूमिकेचा आब सोडून हे असं कसं केलंस? हे कसं चुकीचं आहे...’ वगैरे खूप बोलले, रागावले. त्यांचं म्हणणं आणि शिकवण आजतागायत विसरलेले नाही. रंगभूमीवरचे तीन तास तुम्ही बाकी कुणाचे नसता, तर ते घर, ते कुटुंब, त्यांचं राहणीमान, ती नाती, ते बोल हे सगळं बिनचूक झालंच पाहिजे. त्या तीन तासांत नाटकाबाहेरचा विचार तुमच्या डोक्यात येता कामा नये, हे मला तेव्हा मनोमन पटलं. ते करण्याचा १०० टक्के प्रयत्न मी करीत आले आणि करीत राहीन.

‘शो मस्ट गो ऑन’ हे शेक्सपिअरनं म्हणून ठेवलंय, ते १०० टक्के निभवावंच लागतं. नाटक करताना अनेक अडचणी आल्या, दुःखद घटना घडल्या, अनेक आनंदाच्या क्षणांना मुकले. आज ५० वर्षं नाटक करते; पण अरविंद देशपांड्यांची शिकवण कधीच विसरले नाही. एकाच नाटकाचे ५००/१००० प्रयोग झाले, तरी तीच इंटेन्सिटी, तीच उत्स्फूर्तता, तेच भाव तेवढ्याच ताकदीनं जगावे लागतात. आपण तेच असतो; पण प्रत्येक वेळी प्रेक्षक वेगळे असतात. पटलं नाही, तरी स्वीकारलंय. ते तितक्याच ताकदीनं केलं, तर लोकही तुमच्याबरोबर तोच आनंद घेतील, समरसून आस्वाद घेतील. हे लक्षात ठेवून प्रयोग करत राहणं, हीच व्यावसायिकता असते, तरच तुम्ही टिकाल. यश मिळणं सोपं असतं; पण सातत्यानं टिकवणं फार कठीण असतं, हे पदोपदी जाणवत राहतं. प्रत्येक प्रयोग म्हणजे बारावीचा पेपर. या घटनेचा शेवटही सांगितला पाहिजे.

अरविंद देशपांडेंचा राग, शिकवण ऐकता ऐकता मी तो अर्धवट पिकलेला आंबा सुरीनं कापत होते. कापता कापता एक फोड त्यांच्या हातात दिली. त्यांनीही तिचा आस्वाद घेतला आणि मग लक्षात आल्यावर मेकअप रूममधला तणाव नाहीसा झाला.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १९९३मध्ये वर्षभरात त्यांनी लिहिलेली तीन-चार नाटकं रंगभूमीवर आणून, त्यांचा सत्कार करायचा, असं समितीतर्फे ठरवण्यात आलं. ही नाटकं वेगवेगळे निर्माते सादर करणार होते. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘बटाट्याची चाळ’ वगैरे नाटकांचे प्रयोग अधूनमधून रंगभूमीवर होत असत; त्यामुळं ती सोडून इतर काही नाटकं सादर करायचं ठरलं. त्यात ‘सुंदर मी होणार’, ‘अंमलदार’ आणि ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकांच्या तालमी सुरू झाल्या. त्या वेळी रंगभूमीवर माझी ‘चारचौघी’, ‘संध्याछाया’ वगैरे नाटकं तुफान चालू होती; तरीदेखील पुलंचं नाटक त्यांच्या ७५व्या वर्षी, त्यांच्या उपस्थितीत करायला मिळणार, तर ती संधी सोडायची नाही, असं मी ठरवलं. या निमित्तानं अशा असामान्य कलावंताला मानाचा मुजरा करायला मिळणार होता. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातली दीदीराजेची भूमिका मी स्वीकारली.

हे नाटक ३०-३५ वर्षांपूर्वी पहिल्यांदा सादर झालं होतं. त्यात स्वतः पु. ल. आणि सुनीताबाई काम करीत होते. ते नाटक म्हणजे जणू एक काव्यच होतं. या नाटकातले संवाद, व्यक्तिचित्र, नाट्य आणि नाटकाची गुंफण सगळंच इतकं सुंदर होतं, की प्रेक्षकांचे कान तृप्त होत असत. सबंध नाटकभर पायानं पांगळी झालेली दीदीराजे व्हीलचेअरवर बसून खिडकीतून जग बघायची आणि त्यातून न दिसणाऱ्या जगाचं काव्यातून वर्णन करायची. अतिशय हळवी, मृदू, कवी मनाची, भावंडांवर प्रेम करणारी, त्यांचं मन समजून घेणारी अशी ही दीदीराजेची तरल भूमिका आणि मी अशी कणखर आवाजाची वंदना गुप्ते. माझ्या आवाजात या भूमिकेशी साधर्म्य साधणारे कुठलेच सूरही नव्हते आणि गुणही नव्हते. म्हणूनच ते आव्हान मी स्वीकारलं आणि तालमी सुरू केल्या.
                 
विजय केंकरे याच्या ‘स्फूर्ती’ संस्थेतर्फे ‘सुंदर मी होणार’ नाटक सादर झालं. लोकांना अतिशय आवडलं. विजयच्या दिग्दर्शनाखाली आधी एक-दोन नाटकं केली होती; पण यात डॉ. श्रीराम लागूंबरोबर काम करायची संधी मिळाली. निरीक्षणातून खूप काही शिकता आलं. पुढं काम करताना मला ते उपयोगी पडलं. या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीला एक चुणचुणीत मुलगी मिळाली, ती म्हणजे कविता लाड. बेबीराजेची भूमिका तिनं लीलया निभावली. अतिशय मन लावून मिळेल ते काम तेवढ्याच तन्मयतेनं करीत आली ती. डॉ. श्रीराम लागू, रवी पटवर्धन, गिरीश ओक, ज्ञानेश पेंढारकर, प्रशांत दामले असा नटसंच होता. प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य आणि प्रकाशयोजना, विजयचं दिग्दर्शन आणि पु. ल. देशपांड्यांचे संवाद सगळंच खूप छान जुळून आलं होतं; त्यामुळं प्रयोग फार सुरेख व्हायचा. ११० प्रयोगांनंतर सुधीर भटच्या ‘सुय़ोग’नं या नाटकाचे पुढं भरपूर प्रयोग केले.

मला आजही आठवतंय, पुण्याच्या ‘बालगंधर्व’च्या प्रयोगाला पु. ल. आणि सुनीताबाई समोर बसून नाटकाचा आनंद घेत होते. नाटक संपल्यावर व्हीआयपी रूममध्ये भाई आले आणि मला मांडीवर घेऊन खूप कौतुक केलं त्यांनी माझ्या कामाचं. मला म्हणाले, ‘या नाटकात वडिलांना आपल्या मुलीविषयी वाटणाऱ्या आकर्षणाबद्दल स्पष्टपणे लिहायला मी कचरलो; पण तू ते स्वरातून आणि अभिनयातून बरोब्बर दाखवलंस, शाब्बाश वंदना!’ बस्स एवढे शब्द ऐकले आणि आजवरच्या नाट्यप्रवासाच्या तपश्चर्येचं फळ मिळालं.

भाईंना माणिकबाईंचं गाणं खूप आवडायचं. त्यांनी संगीत दिलेल्या प्रत्येक सिनेमात आईचं गाणं असायचंच. आमच्या दादरच्या आणि पुण्याच्या घरी किती तरी नवीन, तरुण कलाकारांच्या मैफली जमवून आणल्या भाईंनी. ते म्हणायचे, ‘माणिक तुझ्या घरामध्ये कला आहे. इथं ज्या ज्या नव्या कलाकारांनी आपली कला सादर केली, ते खूप नावारूपाला आले.’

खरंच, आई-वडिलांमुळं किती मोठ्या मोठ्या लोकांचा सहवास मिळाला आम्हाला! नेपियन्सी रोडवरचं घर खूपच मोठं होतं; त्यामुळं तिथं सगळे दिग्गज कलाकार राहायलाही येत किंवा मैफलीसाठी जमत. पु. ल., वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, सी. आर. व्यास, राम मराठे, मल्लिकार्जुन मन्सूर, मालविका कानन अशी किती नावं घेऊ? अल्लारखाँ तर शेजारच्याच सोसायटीत राहत; त्यामुळं त्यांचं आणि छोट्या झाकीरचंही येणं-जाणं होत असे. सुधीर फडकेही येत असत दादरच्या घरी छोट्या श्रीधरला घेऊन. अशा सुरेल घरामध्ये वास्तव्य करून, आमचं कुटुंबही कलासक्त होऊन गेलं, हे केवढं भाग्य आमचं!


असेच एकदा पु. ल. मुंबई आकाशवाणीवर कामासाठी आले होते, तिथं माणिकबाईंची भेट झाली. तिनं आग्रह केला म्हणून आमच्या घरीच मुक्कामाला आले. रात्री जेवणानंतर आमच्या पप्पांबरोबर खूप गप्पा रंगल्या सिनेमाच्या, प्रभात फिल्म कंपनीच्या. फक्त साहित्य, संगीतच नाही, तर सिनेमाविषयी अफाट ज्ञान आणि प्रेम होतं त्यांना. सकाळी उठून ‘दूरदर्शन’वर जाता जाता मला कॉलेजला सोडायला आले, तेव्हा गाडीत आमच्या खूप गप्पा रंगल्या. दुसऱ्या दिवशी घरी आईला फोन केला आणि म्हणाले, ‘माणिक मी माझ्या विनोदी लेखांमधून, नाटकातून बायकांवर खूप विनोद करतो; पण बायकांना विनोदबुद्धी असते, हे वंदनाबरोबर गप्पा मारताना जाणवलं. चतुर आहे तुझी मुलगी, हे खास सांगण्यासाठी फोन केला तुला.’

खरंच किती मोठा माणूस, आनंदमूर्ती जणू! त्यांच्या लिखाणातून, बोलण्यातून, उमटलेल्या प्रत्येक शब्दातून त्यांची सांस्कृतिक वतनदारी भारतातच नाही, तर सातासमुद्रापारही पोचली. आजच्या तंत्रज्ञानाच्या जीवनातही तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड टिकवून ठेवण्याची क्षमता त्यांच्या लिखाणात आहे. आजही त्यांनी लिहिलेल्या कुठल्याही पुस्तकातलं, कुठलंही पान वाचून काढलं, तरी सगळी दुःख, कष्ट विसरून एकदम ताजेतवाने आणि आनंदी होऊन जातो आपण. असं विनोदाचं पांघरुण अंगावर लेवून झोपलं, की स्वप्नही छान पडतात माणसाला. हे असं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, देवांचं मनोरंजन करायला पृथ्वी सोडून गेलं आणि आपण सगळेच सुन्न झालो, जगण्यातला आनंदच नाहीसा झाला जणू.

त्यांच्या जाण्याचं दुःख विसरायला लावणारं शब्दभंडार त्यांनीच तर निर्माण करून ठेवलंय आपल्यासाठी. एकाच माणसाला साहित्यिक, सांस्कृतिक, सांगीतिक, सामाजिक, वैचारिक विषयांवर गुदगुल्या करत निखळ सत्य मांडता येतं कसं? त्यासाठी लागणारे नेमके शब्द सुचतातच कसे? श्रीमंत-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित, शहाणी-अडाणी या सगळ्यांना जोडणारं लिखाण कसं करू शकतात? वेगवेगळ्या स्वभावाच्या काल्पनिक ‘व्यक्ती आणि वल्ली’ त्यांनी निर्माण केल्या आणि नुसत्याच लिहिल्या नाहीत, तर अमरही केल्या. इतका बहुआयामी कलंदर माणूस माझ्या मते चार्ली चॅप्लिननंतर पु. ल. देशपांडेच!

वंदना गुप्ते
महाराष्ट्र टाईम्स
१५ जानेवारी २०२३