Wednesday, November 9, 2011

‘पुलं’च्या प्रस्तावना - विवेक आचार्य

पुलंचे साहित्य म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण. त्यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे विविध प्रकार हाताळले. त्यात त्यांच्या प्रस्तावना म्हणजे एक आगळेवेगळे साहित्य दालनच. त्यावर एक झोत.

सुदैवाने मराठी साहित्यामध्ये प्रस्तावनेला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. अनेक मान्यवरांनी विविध विषयांवरील पुस्तकांना प्रस्तावना लिहून साहित्याचे हे वैशिष्ट्यपूर्ण दालन समृद्ध केले आहे. आचार्य अत्रे व पु. ल. देशपांडे ही दोन अष्टपैलू व्यक्तिमत्त्वे महाराष्ट्रात झाली. दोघांनी आपली स्वत:ची साहित्यनिर्मिती केलीच. शिवाय अत्यंत रसिकपणे दुसर्‍या लेखकांच्या वाङ्मयीन कलाकृतींचे कौतुक केले. मराठी भाषेतील अनेक पुस्तकांना या दोघा रसिकराजांच्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत. मराठी भाषेच्या अभ्यासकाला या प्रस्तावनांचे परिशीलन केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही.

पु. ल. स्वत: रसिक वाचक होते, मराठी भाषेतील अनेक साहित्यकृती पुलंच्या रसाळ प्रस्तावनेने सजलेल्या आहेत. पुल विनोदाने म्हणत की, पुढेमागे माझी ओळख लेखक म्हणून करून न देता सुप्रसिद्ध प्रस्तावना लेखक म्हणून केली जाईल इतक्या प्रस्तावना मी लिहिल्या आहेत.कुठल्याही साहित्यकृतीमध्ये प्रस्तावनाकाराचे नेमके कार्य काय हे समजावण्यासाठी पुल मोठे चपखल उदाहरण देतात. ते म्हणतात, लग्नमंडपातील मुलीचा मामा ज्याप्रमाणे मुलीला बोहल्यावर नेतो व नंतर तो दुरूनच तिचा संसार बघतो त्याचप्रमाणे प्रस्तावना लिहून झाल्यानंतर प्रस्तावना लेखक अलिप्तपणे पुस्तकाचे यशापयश अनुभवतो.

पुलंनी स्वत:च्या अपूर्वाई, गणगोत इ. पुस्तकांना छोटेखानी प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. अपूर्वाईला पुलंनी मोठी खुमासदार प्रस्तावना जोडलेली आहे. मुकुंदराव किर्लोस्करांच्या पत्राला मान देऊन त्यांनी किर्लोस्करमध्ये आपल्या युरोपवारीचे वर्णन केले व अपूर्वाई जन्मली. पुलंनी त्यांच्या त्या ‘अनामिक’ मित्राचे ऐकून प्रवासवर्णन लिहिले नसते तर प्रवासवर्णनाच्या एका नवीन बाजापासून मराठी साहित्य वंचित झाले असते. स्वत: पुलंनीही प्रवासवर्णन व आत्मचरित्र न लिहिण्याचा संकल्प केला होता. अपूर्वाईच्या निमित्ताने त्यांनी एक संकल्प मोडला; परंतु आत्मचरित्र न लिहिण्याचा संकल्प भाई मोडू शकले नाहीत. मराठी सारस्वत एका रसिकराजाच्या आत्मवृत्ताला मुकले हेच खरे.

‘गणगोत’ या गाजलेल्या पुस्तकात आपल्या सुहृदांची अत्यंत भावपूर्ण ललित चित्रे पुलंनी रेखाटली आहेत. ही चित्रे साकारताना आपली मन:स्थिती कशी होती, आपली भूमिका काय होती याचे मार्मिक विश्‍लेषण त्यांनी प्रस्तावनेत केले आहे. ‘‘या पुस्तकातून दिसणारी माणसे खरोखरीच तशी आहेत की नाहीत हे मला ठाऊक नाही. आपुलकीच्या डोळ्यांनी पाहताना त्यांचे जे दर्शन मला घडले त्याची ही चित्रे आहेत. न जाणो त्यांचा आणि माझा जो सहवास घडला त्या सहवासाचीच ही चित्रे असतील एखादवेळी.’’ पुस्तकातील व्यक्तिरेखांप्रमाणे पुलंचे हे प्रास्ताविकही हृदयंगम आहे.

शेक्सपिअरच्या साहित्याबद्दल ‘रंगविश्‍वातील रसयात्रा’ या प्रा. के. रं. शिरवाडकरांच्या पुस्तकाला पुलंची रसिली प्रस्तावना लाभलेली आहे. हिंदुस्थानवरील ब्रिटिश राजवटीमुळे झालेल्या फायद्यातोट्यांविषयी नेहमीच उलटसुलट चर्चा होत असते. पुल म्हणतात, ‘‘इंग्रजांना शंभर खून माफ करावेत अशी एकच गोष्ट त्यांनी आणली ती म्हणजे शेक्सपिअरची नाटके. इंग्रजी साम्राज्यावर न मावळणारा सूर्य शेवटी मावळलाच; परंतु शेक्सपिअरचे साहित्यसाम्राज्य अबाधित आहे. लेखक शेक्सपिअर, कलाकार शेक्सपिअरचे वर्णन करताना पुलंची लेखणी बहरली आहे.’’

‘विश्रब्ध शारदा’ हा मराठी पुस्तक प्रकाशनातला एक अभिनव प्रयोग होता. प्रसिद्ध व्यक्तींच्या अप्रकाशित पत्रांचा हा त्रिखंडात्मक संग्रह. शारदाच्या दुसर्‍या खंडात नाट्य आणि संगीत कलांशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी लिहिलेल्या पत्रांचा संग्रह आहे. अर्थातच या संग्रहाला पुलंची रसिली प्रस्तावना आहे. रंगभूमी आणि संगीत कलेच्या क्षेत्रातील चढउतार टिपत असतानाच पुलंनी या क्षेत्रांच्या आर्थिक स्थितीचाही मार्मिक ऊहापोह केलेला आहे.

पुलंनी असंख्य प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तावनांचा विचार आपण केला (अधिक प्रस्तावनांसाठी जिज्ञासूंनी ‘दाद’ हे पुस्तक वाचावे). पु. ल. देशपांडेंच्या या प्रस्तावनांतून त्यांचे कलासक्त मन सतत प्रतीत होत राहाते. ओघवती, प्रवाही भाषा, एखाद्या हृदयस्पर्शी वाक्यावर सम गाठण्याचे त्यांचे हुकमी कसब, नर्म विनोदाचा शिडकावा करत असतानाच एखादा मौलिक विचार सांगण्याची लकब, मानवी स्वभावाचे सूक्ष्म अवलोकन, त्यांची बहुश्रुतता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसर्‍या लेखकांचे, कलावंतांचे मनमोकळेपणाने कौतुक करणारी त्यांची सहृदयता या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या प्रस्तावनांत पडले आहे. पुलंच्या प्रस्तावना वैचारिक धनाने समृद्ध आहेत. पुलंच्या प्रस्तावना हे मराठी सारस्वताचे एक कोरीव लेणेच आहे!

विवेक आचार्य
सामना
१२ जून २०११

1 प्रतिक्रिया: