Monday, October 31, 2022

पु.ल.- सुनीताबाई आणि आयुका (मंगला नारळीकर)

ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन येत्या आठ नोव्हेंबरला आहे. पु. ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई या दोघांनी विविध संस्थांना प्रचंड मदत केली. डोळसपणानं हे दोघे ही मदत करत असत. राज्यातल्या अनेक संस्थांशी तसेच शास्त्रज्ञांशी त्यांचा स्नेहबंध होता. वैज्ञानिक जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांच्याशी त्यांचे कौटुबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांचे काम आवडल्यानं देशपांडे दंपतीनं आयुकाला मोठी देणगी दिली. त्याबद्दल आणि त्या दोघांच्या मायेच्या ओलाव्याबद्दल अंतरीचे बोल....
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पुल यांचे आणि आमचे तसे जुने संबंध. अगदी पूर्वी, सुनीताबाई आणि ते इंग्लंडला गेले होते, त्या वेळी त्यांची जयंतशी गाठ पडली होती, कुमार चित्रे या त्याच्या मित्राबरोबर जयंतनं त्यांना केम्ब्रिज हिंडून दाखवले होते, तो फार जुना किस्सा झाला. नंतर आम्ही मुंबईत नेव्हीनगर मध्ये ‘टी आय एफ आर’ च्या कॉलनीमध्ये राहत होतो, त्यावेळी प्रथम मराठी नाटकं आणि संगीताचे कार्यक्रम पहायला गिरगाव किंवा दादर भागात जावे लागे. रात्री परत येताना टॅक्सी मिळायला त्रास होई, एवढ्या लांब जाऊन तिकिटं काढणं हे देखील जिकिरीचं असे. `एन सी पी ए ’ चे सेंटर नरीमन पॉइन्ट ला तयार झाले आणि तेथील सांस्कृतिक कार्यक्रमांची धुरा पुल सांभाळू लागले, त्यामुळे आम्हाला तिथे दर्जेदार मराठी नाटके आणि संगीत कार्यक्रम पहायला मिळू लागले. त्यावेळी कधी कधी कार्यक्रमानंतर त्यांच्या तिथल्या ऑफिसमध्ये पुलंना भेटल्याचे आठवते. १९८९ साली आम्ही पुण्यात रहायला आलो कारण तिथे आयुका ची निर्मिती चालू झाली होती. एकदोनदा त्यांच्या आमंत्रणावरून पुल आणि सुनीताबाई यांना भेटायला आम्ही दोघे रूपाली मध्ये गेलो होतो.

१९९१ साली आम्ही आयुकाच्या संचालकासाठी बांधलेल्या घरात राहण्यास आलो. अजून आयुकाची मुख्य बिल्डिंग पुरी व्हायची होती, तिला जरा वेळ लागणार होता, पण आयुकाचं काम जोरात सुरू झालं होतं. पुरेसे प्राध्यापक नेमले नव्हते, पण संस्थेच्या इमारतीपेक्षा राहण्याची घरे लवकर बांधून होतात म्हणून भविष्यकाळात येणाऱ्या प्रोफेसरांच्या साठी घरे लवकर बांधून घेतली आणि त्या घरांतूनच आयुकाची कामे चालू झाली. एका घरात लायब्ररी, एकात कॅन्टीन, एक किंवा दोन घरांत विद्यार्थी होस्टेल, अशी तात्पुरती रचना झाली. एकूण अतिशय उत्साहानं भारलेले दिवस होते ते. सगळे लोक अगदी उत्साहानं, आपल्याला काही तरी सुरेख, विधायक रचना करायची आहे, अशा विश्वासानं काम करत होते. त्या काळात पुल आणि सुनीताबाई आयुकाला भेट देण्यास आले. आम्हाला अर्थात आनंद झाला. जयंतनं ज्या उत्साहानं त्यांना पूर्वी केम्ब्रिज हिंडून दाखवले होते, त्याच उत्साहानं आयुकाची माहिती दिली. आमच्या घरी, मागची बाग आणि तिथली हिरवळ पहात आमचे चहापान झाले. ते १९९२ किंवा १९९३ चा कालखंड असावा, नंतर काही वेळा आम्ही दोघे पुल आणि सुनीताबाई यांना भेटायला, बहुतेक वेळा त्यांच्या आमंत्रणावरून, आधी रूपालीमध्ये आणि नंतर मालतीमाधवमध्ये जात होतो. लहान किंवा तरुण मुलांनी काही चांगलं काम केलं की ज्या उत्साहाने ते आपलं काम ज्येष्ठांना दाखवतात, त्याच उत्साहाने आम्ही आयुकाची माहिती देत असू. ते दोघेही आपुलकीने विचारत.

काही दिवसांनी, बहुधा १९९९-२००० मध्ये आम्ही त्यांच्या घरी गेलो असता, सुनीताबाईनी एक आश्चर्याचा आणि आनंद देणारा त्यांचा निर्णय सांगितला. त्या म्हणाल्या, की त्यांचा रूपाली मधला फ्लॅट ते दोघे आयुकाला देणगी म्हणून देऊ इच्छित आहेत. आम्हाला अर्थात आनंद झाला. जयंतने लगेच या देणगीचा कसा उपयोग करता येईल, याचा विचार केला. आयुकाच्या स्थापनेच्या वेळी आयुकाची खगोलशास्त्राशी संबंधित अशी आठ कर्तव्ये ठरवली गेली होती. खगोलशास्त्रातील संशोधन, पी एच डी साठी विद्यार्थ्याना मार्गदर्शन, विविध युनिव्हर्सिटींमधील खगोलशास्त्रात काम करू इच्छिणाऱ्या शिक्षकान्ना मदत व मार्गदर्शन, जवळ असलेल्या जी एम आर टी ची दुर्बीण चालवणाऱ्या संस्थेशी सहकार्य, खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी कार्यशाळा भरवणे, विविध दुर्बिणीन्च्यावर काम करण्यासाठी वेळ मिळवून देणे, दुर्बिणी व इतर यंत्रांची देखभाल व कम्प्युटरवर आवश्यकतेप्रमाणे प्रोग्राम तयार करणे, समाजामध्ये विज्ञानप्रसार करणे अशी ती कर्तव्ये होती. शालेय विद्यार्थ्यांच्या साठी खास असे काही त्यात नव्हते पण त्याची आवश्यकता दिसत होती. विज्ञानाचे शिक्षण अधिक चांगले देणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे शालेय जीवनात व्हायला हवे. देशपांडे दंपतीच्या देणगीचा या कामासाठी उपयोग करावा असा जयंतने विचार केला व तसे त्यांना सांगितले. त्यासाठी वेगळी इमारत बांधण्यासाठी आणि तशी संशोधिका सुरु करण्यासाठी देशपांडे दंपतीच्या देणगीचा उपयोग होणार हे त्यांना आवडले. समाजोपयोगी अशा अनेक संस्थांना त्यांच्या फाउंडेशनने मदत केल्याचे माहित होते. मुलांचे आनन्दमय विज्ञानशिक्षण हा देखील त्याच्या जिव्हाळ्याचा विषय होता हे समजून आम्हाला त्यांच्या विषयी वाटणारा प्रेमादर वाढला. पण हे जेव्हा जयंतने आयुकामधील लोकांना सांगितलं, तेव्हा तेथील अकौंटंट श्री अभ्यंकर यांनी नियम सांगितला, की आयुका सरकारी संस्था आहे, तिला स्थावर मालमत्ता देणगीच्या रूपात स्वीकारणे सोयीचे नाही. तो फ्लॅट विकून त्याच्या पैशांत काही उपक्रम करण्यात प्राप्तीकराच्या नियमांचा खूप त्रास झाला असता. त्यामुळे त्यांचा पहिला बेत जरी बारगळला, तरी सुनीताबाईंनी जरा नंतर, रूपालीच्या अपेक्षित किमतीएवढे, म्हणजे एकूण २५ लाख रुपये आयुकाच्या स्वाधीन केले.

शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञानशोधिकेला कोणते नाव द्यावे हे विचारल्यावर समजले, की त्यांच्या प्रेरणेने चालू झालेल्या संस्थांना “ मुक्तांगण ” हे नाव देणे त्यांना आवडते. आम्हालाही ते नाव आवडले. आमचेही मुक्तांगण बांधून तयार झाले. इमारतीला जयंतने नाव दिले “ पुलस्त्य ”. हा सप्तर्षींमधला एक तारा आहे आणि या नावातच पुल आहेत. सुदैवाने या मुक्तांगणासाठी प्रा. अरविंद गुप्ता यांच्या सारखा, मुलांना खेळणी बनवायला शिकवून, त्यातून विज्ञान शिकवणारा अवलिया संचालक म्हणून मिळाला आणि आमचे मुक्तांगण जोरात चालू झाले. प्रा गुप्ता यांच्या हाताखाली अनेक तरुण-तरुणी मुलांना हसत खेळत विज्ञान शिकवू लागले. विविध शाळातील मुले तिथे येऊन त्याचा लाभ घेऊ लागली, अजूनही घेतात. दुर्बिणीतून तारे दाखवण्याचे कामही तेथे होते.

“ पुलस्त्य “ बांधून झाले, तिथे मुक्तांगण ही विज्ञान शोधिका चालू करताना लहानसा समारंभ केला, त्यावेळी पुल हयात नव्हते. सुनीताताईंना आग्रहाचे आमंत्रण आम्ही केले, परंतु त्या आल्या नाहीत. त्यांचा एक डोळा काम करत नव्हता, दुसराही अधू होता, त्याला धक्का बसू शकेल या भीतीने त्यांनी बाहेर जाणे जवळ जवळ बंद केले होते. त्यांच्या वतीने त्यांचे सुहृद, श्री श्री. पु. भागवत मुक्तांगणाच्या उद् घाटनास आले होते. तो दिवस होता, २७ डिसेंबर, २००२. मुक्तांगण तर जोरात चालू झाले. पुणे व परिसरातील अनेक शाळातील मुले, आपल्या विज्ञानशिक्षकांसह तेथे येतात, २-३ तास थांबून साध्या, कधी कधी टाकाऊ साहित्यातून मजेदार खेळणी बनवायला शिकतात, मग त्यातील विज्ञान शिकतात. आपली खेळणी आणि अशा मजेदार रीतीने विज्ञान शिकण्यातला आनंद ती मुले घरी नेतात. महिन्यातून एकदा इंग्रजी व मराठी किंवा हिंदी मधून शालेय मुलांसाठी जवळच्या आयुकाच्या सुसज्ज अशा मोठ्या चंद्रशेखर हॉलमध्ये व्याख्यान आयोजित केले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या शाळातून मुले व त्यांचे शिक्षक येतात.

एकदा आम्ही सुनीताताईना हे मुक्तांगण पाहायला येण्याचा खूप आग्रह केला. त्यांचा भाचा दिनेश, त्याचा मुलगा आशुतोष आणि भाचीचा मुलगा आश्विन हे त्यांच्या बरोबर येणार होते. त्यावेळी आमचे जुनी, पण पुढचे दार मोठे असून प्रवेशाचा भाग रुंद असणारी टाटा इस्टेट गाडी होती. तिच्यातून त्यांना सांभाळून नेण्याचे ठरले. त्या आल्या. तो दिवस होता, १८ जून, २००७. म्युनिसिपल शाळेतील मुले आनंदाने विज्ञान शिकताना त्यांनी पाहिली. मुक्तांगणकडे नुकतेच एक फुगवून उभारण्याचे, लहानसे फिरते तारांगण आले होते. त्यात रांगत प्रवेश करून त्यांनी आपल्या नातवांसह तारे पाहिले. एकंदरीत त्या खूष झाल्या आणि आयुकासाठी, मुक्तांगणच्या लोकांसाठी त्यांची भेट हा एक मोठा सण झाला. सुनीताताईंच्या हस्ते दोन झाडे आवारात लावून घेतली.

या भेटीच्या जरा आधी, २००६ मध्ये, सुनीताताईनी आयुकाकडे त्यांच्या मृत्युपत्रातील एक भाग पाठवून दिला. त्यात पुलं आणि त्यांच्या स्वत:च्या पुस्तकांचे कॉपीराईट त्यांच्या मृत्युनंतर आयुकाला मिळणार असे लिहिले होते. नंतर सुनीताताई आजारी झाल्या, काही काळ अंथरुणावर होत्या. त्याही काळात आम्ही शक्य तेव्हा त्यांना भेटण्यास गेलो. नोव्हेंबर २००९ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर पुल आणि सुनीताताई यांच्या पुस्तकांचे कॉपीराईट आयुकाकडे आल्याने आयुकाला त्याची रॉयल्टी मिळत आहे. मुक्तांगणमधील उपक्रमांसाठी तिचा विनियोग होतो. एखादे समाजोपयोगी काम पटले, आवडले, तर कोरडे कौतुक करून न थांबता त्यासाठी अतिशय उदारपणे आर्थिक मदत देण्याची सुनीताताईंची वृत्ती स्पृहणीय होती. पुलंच्या जन्मशताब्दीच्या सांगतेला पुल आणि सुनीताताई यांच्या आयुकाबरोबरच्या या खास नात्याबद्दल लिहून त्याना आदरांजली वाहते.

- मंगला नारळीकर
सकाळ वृत्तपत्र
८ नोव्हेंबर २०२०


Friday, October 21, 2022

दिनेश

               
दिनेशची आणि माझी ओळख होऊन जवळ जवळ सव्वादोन वर्षे झाली. त्याहून जास्त होणे शक्‍यही नाही; कारण दोनतीन महिन्यांपूर्वीच त्याला दोन वर्षे पूर्ण झाली. लहान मुलांत माझी फारशी मैत्री नाही. तसा मी मुलांत मूल-फुलांत फूलसंप्रदायातला नाही. मला लहान मुलांशी फारसे खेळताही येत नाही. क्कचित प्रयत्न करतो, पण त्या मुलांनाच माझा कंटाळा येत असावा. मुलांच्या मेळाव्यापुढे जाताना तर मी भयंकर भ्यालेला असतो. कधी एखाद्या शाळेच्या गॅदरिंगचा अध्यक्ष वगैरे होऊन गेलो तर समोर बसलेला तो शिशुवर्ग तुकडी अ, ब इत्यादी बालगण मला राक्षसगणासारखा वाटायला लागतो. त्या संपूर्ण तुकड्यांच्या चेहऱ्यांवर “हा कोण येडा बसलाय इथं!” अशासारखा भाव असतो! जगातल्या मी मी म्हणणाऱ्या कोणत्याही व्याख्यात्याचा पाडाव करायचा असेल तर त्याच्यासमोर बालसेना असावी. माझ्या एकूणच रंगारूपात किंवा प्रौढ बोलीत बोलायचे तर माझ्या एकूणच व्यक्तित्वात बाळगोपाळांना न पटणारे असे बरेच असावे.
                            
अशा वेळी दिनेशची मैत्री मला मोठी मोलाची वाटते. आज दोन वर्षे ही मैत्री टिकून आहे. कारण नियमितपणे हापिसात किंवा त्याच्या वडलांसारवा हॉस्पिटलात जाणारांतला मी नाही; केव्हाही घरी असतो. त्याच्याइतका नसलो तरी बराचसा उघडाबंब वावरतो. त्यामुळे स्वतःइतकाच हाही एक घरात नुसता बसुन खाणाऱ्यांपैकी आहे अशी त्याने काहीशी कल्पना करून घेतली आहे. हा इसम आपल्याच जोडीला खेळायला आणून ठेवण्यात आला आहे असा त्याचा समज करून देण्यात त्याच्याहून दोनतीन वर्षांनी थोर असणाऱ्या त्याच्या शुभाताईचाही वाटा आहे. त्यांचे वडील डॉक्टर आहेत. ते पहाटेच रग्णसेवेला बाहेर पडतात आणि रात्री परततात. मुंबईत रुग्णच फार, त्याला ते तरी काय करणार ? घरातला स्त्रीवर्गही आपापल्या, कामात दंग असतो. माझा पोटापाण्याचा उद्योग नाटकांचा असल्यामुळे आम्ही कलेच्या सेवेला जातो त्या वेळी हा शिशुवर्ग झोपलेला असतो. दिवसा दोघेही रिकामे. कधी टेबलाशी बसून साहित्यसेवा करण्याचा प्रयत्नही चाललेला ही मुले पाहतात. टाक, दऊत इत्यादी माझी साघने आणि पाटीपेन्सिल इत्यादी त्यांची साधने ह्यांच्यातल्या साम्यामुळे की काय कोण जाणे, मी शाळा बुडवून 'आभ्यास' करीत असतो

असे त्यांना वाटत असावे. त्यांच्या भातकुली, लपाछपी वगैरे खेळांत माझा समावेश असतो. भातुकलीत शेजारच्या 'वईट्ट' मुलांपासून संरक्षण करण्यासाठी मला गॅलरीत गुरखा होऊन बसावे लागते आणि लपाछपीत शिवण्यासाठी माझा भोज्या करतात. माझी पत्नी ही ह्या मुलांची आत्या. अभ्यासातल्या शंकादेखील तिला विचारल्या जातात. कारण माझी बौद्धिक प्रगती फारशी झाली आहे यावर दिनेश्च्या दोन्ही वडील भावंडांचा विश्वास नाही. "माईआत्ते कुठे आहे ?” असा प्रश्न विचारीत आपादमस्तक गहन शंका होऊन आलेल्या शुभाला मी विचारले,

“कश्याला हवी आहे माईआत्ते?”

“गणित आहे." नुसत्या दोन शब्दांत गणित ह्या शब्दातला धोका व्यक्त होत नाही म्हणून भुवया उंचावल्या जातात. डोळे मोठ्ठे होतात आणि पेन्सिल छडीसारखी नाचवली जाते. "गणित आहे?” याचा अर्थ गणितविषयक शंका आहे असा होतो हे कळण्याइतके मलाही बालवाड्मय कळते.

"इकडे आण. मी सांगतो."

"हॅट ! सतीशदादालासुद्धा आलं नाही, तुला काय येणार?" सतीशदादा, वय वर्षे सात.

मग माईआत्तेदेखील विजयी मुद्रेने इयत्ता पहिलीचे ते कठीण गणित सोडवून देते. घरात परंपराच अशी असल्यामुळे माझी जिम्मा सारा शिशुवर्ग आपल्याचमध्ये करतो. मराठी भाषेत बहुवचन नावाचा एक प्रकार आहे याचा फक्त मला हाक मारताना विसर पडतो. अलीकडे अलीकडे ह्या बालक मंडळींनी 'भाईकाका' हे मला हाक मारण्याचे आणि पु. ल. देड्पांडे हे चीडवण्याचे नाव आहे अशी समजूत करून घेतली आहे.

दिनेशच्या बारशाच्या दिवशी त्याचे नाव काय ठेवावे ही चर्चा चालली होती. दहा घरच्या सुवासिनी आणि कुमारिका होत्या. तेवढ्यात वय वर्षे तीनच्या शुभातांईंनी आपल्या भावाचे नाव “काय ठेवायचं ! मी सांगू--मी सांगू?” करीत पु. ल. देशपांडे ठेवा असे सुचविले. सानेगुरुजींनंतर बाळगोपाळांत मीच लोकप्रिय आहे अशा सुखद विचारात होतो. तितक्यात तिच्या आत्याने “पु. ल. देशपांडे कां ग ! आपण अशोक ठेवू या--अशोक” असे म्हणताच, “ शी!-- पु ल देशपांडेच पाहिजे.”

"कां ग?"
"इतक्या काळ्या मुलाचं नाव काय अशोक ठेवतात ?” आपल्या आत्याला वेड्यात काढीत ती म्हणाली. चेहऱ्यावर ओढूनताणून हसू आणणे हे किती अवघड आहे याचा मला आणि आलेले हसू आवरणे किती बिकट आहे याचा त्या सगळ्या माउल्यांना अनुभव आला, तात्पर्य, काळेपणा, लठ्ठपणा, निर्बुद्धपणा इत्यादिकांचे माप म्हणूनही त्या बालराज्यात मला 'किलो' सारखा वापरतात!

......
मुले अनुकरण करतात ही समजूत खोटी आहे. मुले अनुकरण करीत नाहीत. खरोखरीच तन्मय झालेली असतात. दिनेश मला जेव्हा रिकाम्या थाळीतून पाव खायला देतो त्या वेळी मला तो पाव दिसत नसतो; त्याला दिसतो. एकदा मी तो अदृश्य पाव मटकन खाऊन टाकल्यावर मला दम मिळाला होता, "थोला थोला खा. हावलत्!" तेव्हापासून त्या रिकाम्या बशीतून मला हळूहळू खावे लागते. कपातला चहा फुंकून फुंकून 'उशील उशील' प्यावा लागतो. "हगलं नाही खायचं - मग वेडी मुलं म्हणतात." हे ऐकावे लागते. इथे 'हगलं' याचा अर्थ 'सगळं'! त्याला शब्दाच्या सुरुवातीचा सकार वर्ज्य आहे. अधलामधला चालतो. सशाचा 'हशा' होतो, सांगचे हांग' होते, शुभाताईंची 'हुभाताई' आणि सतीशदादाचा 'हतीशदादा'! त्याच्या ह्या रिकाम्या थाळीतून खाण्याच्या तंत्रात बसणे मला अवघड जाते. 

पावाचा तुकडा खायला लागणाऱ्या वेळेचे त्याचे काही गणित आहे, तितकाच वेळ लागावा लागतो. मला न दिसणारे केळे दिल्यावर ते सोलून खाण्याचे अवधान ठेवावे लागते. कारण केळे 'हाल' काढून खाले नाही तर मी 'वेडी मुलं' होतो! माझ्या बाबतीत एवढे एकच विशेषण तेवढे मला बहुवचनी मिळते, एरवी सगळा कारभार एकवचनी आहे. कधी झोपल्याचे सोंग करून पडावे तर " ए डुक्कल, ऊठ" अशी कोणतीही आचारसंहिता न पाळणारी भाषा सुरू होते. दिवाणखान्यातल्या चौपाईवर पडलेला अध्यक्षीय हार कोमेजायच्या आतच “ए थोंब्या' अशी हाक ऐकू येते आणि हे मूल मला माणसांत आणते ! त्यातून त्याचे दादा आपल्या प्राथमिक शाळेतून 'पाद्या', 'टोण्या', 'लिंबूटिंबू' वगैरे शब्दांची आयात करतात; त्यांचा पहिला वापर माझ्याचवर केला पाहिजे अशी ह्या कनिष्ठ बंधूंची धारणा आहे!
........
जगातल्या साऱ्या कलानिर्मितीचे रहस्य हाती लागल्यासारखे मला वाटायला लागते. पण उडत्या म्हातारीच्या पिसांसारखे ते रहस्य चिमटीत सापडेसापडेपर्यंत निसटून जाते. बाळबोलीतल्या मंत्रांनी त्या दिवाणखान्याचा राणीचा बाग झालेला एकच क्षण माझ्या हाती लागल्यासारखा झालेला असतो. तो क्षण घट्ट पकडून मला कोचाच्या हत्तीवरून फिरता येत नाही. झोपेच्या गाडीतून बागेतल्या सहलीलाही जात येत नाही. अशा वेळी कोचात आपल्या चिमुकल्या देहाची मुटकुळी करून पडलेल्या त्या मुग्ध कलावंताच्या लालचुटुक पावलांचा मुका घ्यावासा वाटू लागतो. अनिमिष नजरेने मी माझ्या निद्रिस्त मित्राकडे पाहू लागतो. काही वेळाने मला काहीच दिसेनासे होते, कारण माझ्या चष्म्याच्या काचेमागे कोण्या अज्ञात आनंदाचे गहिवर दाटलेले असते.


(अपूर्ण)
- पु.ल. देशपांडे
 
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक घरपोच मागवा.

Tuesday, October 18, 2022

मला पाह्यला आवडतात माणसे..

कुठल्याही गावी गेल्यानंतर हे जे काही प्रेक्षणीय स्थळे पाहणे प्रकरण असते, त्याच्याशी माझे गोत्र जमत नाही. बरेचसे पाहणे उगीचच 'पाहिले नाही' म्हणायला नको, ह्या भीतीपोटीच होते की काय कोण जाणे.

मला पाह्यला आवडतात माणसे! सकाळी उठून पर्वतीला फिरायला जाणारी माणसे. विशेषत: पेन्शनर मंडळी, त्यांच्यामागून जावे. रोज सकाळी न कंटाळता उठणारी, न कंटाळता स्वतःला लोकरीत गुंडाळून घेणारी आणि न कंटाळता आपली विट्याहून अष्ट्याला बदली झाली, तेव्हा काय गंमत झाली ते सांगणारी ! ह्या म्हाताऱ्या माणसांसारखीच प्राथमिक शाळेतली पोरे शाळा सुटल्यावर गटागटांनी जातात तेव्हा त्यांच्याहीमागून त्यांच्या नकळत जाण्यात विलक्षण आनंद असतो ! ज्याला विशेष काही बोलायचे असते तो मुलगा त्या गटाच्या पुढे येऊन रस्त्यात उलटा उलटा जात असतो. दहा मिनिटे त्यांच्यामागून चालावे; विषयाचा पत्ता लागत नाही, पण सगळी तोंडे हलत असतात. त्यातून मग त्या गटाच्या चार पावले मागे राहून चालणाऱ्या चिमण्या सखूबाई-साळूबाईचे काही विशेष हितगूज चालू असते. चालताचालता थांबून उगीचच एकमेकींच्या कानांत काही तरी गुप्त गोष्टी सांगितल्या जातात. 'अगदी कंठाशप्पत' म्हणून गळ्याला चिमटा काढला जातो आणि पुन्हा वाटचाल सुरू होते !

अश्याच प्रेक्षणीय माणसांच्या यादीतली माझी आवडती माणसे म्हणजे रस्त्यावर खडी किंवा डांबर पसरून, तांबड्या फडक्याचा बावटा रोवून जवळच्या एखाद्या झाडाखाली तंबाखू चोळीत बसणारे मजूर ! ह्यांचेही विषय अफाट असतात. सारांश काय, माणसाने माणूस पाहावा ! तरुण पाहावा, म्हातारा पाहावा, सुरूप पाहावा, कुरूप पाहावा. पुष्कळदा वाटते की, जीवनाविषयीचे चिंतन माणसांच्या गर्दीत होते तसे एकान्तात होत नाही.

परदेशच्या प्रवासात मला सगळ्यांत अधिक ओढ होती ती तिकडची माणसे पाहण्याची, त्यांच्याशी बोलायची. पण हे कलम म्हणावे तसे जमले नाही. 'भावबंधना'तल्या धुंडिराजाच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'जो तो आपला ह्यात ! ' बरे, जी ओळखपाळख झाली ती सुंदर शिष्टाचारांचा मेकप करूनच बोलायची. तुम्ही किती चांगले, आम्ही किती चांगले, यापुढे भाषणाचे तट्रू पुढे सरकायचेच नाही !

- पु. ल. देशपांडे 

Monday, October 17, 2022

पु.लं.च्या आठवणींना पुन्हा उजाळा

मराठी वाचकांना आणि प्रेक्षकांना आपल्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहायला लावणारा, नव्याचा स्वीकार निखळपणे करायला शिकविणारा, सामान्यातील असामान्यत्व हु कणारा माणूस म्हणजे पु. ल. देशपांडे आणि अशा या भल्या माणसाच्या आनंदोत्सवात आपण सहभागी होतो, याबद्दल स्वतःचाच हेवा वाटतो, अशा शब्दांत ज्येष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता यांनी पु.लं.च्या आठवणींना उजाळा दिला.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात २०२१ साली झालेल्या 'पु.लं.च्या आठवणींना पुन्हा उजाळा' या पु.लं.च्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना विजयाबाई पु.लं.च्या आठवणींमध्ये अक्षरशः हरवून गेल्या होत्या. जबरदस्त मित्रवर्ग लाभलेला 'अवलिया' पण भला माणूस असलेल्या पु.लं.ना कायम आपला म्हणून जो अनुभव आहे, तो इतरांनाही जाणवून देण्याचा ध्यास होता. त्यामुळेच त्यांचा विनोद आणि लिखाण हे दोन्ही आयुष्यभर आपल्याकडे ठेवणीतला साठा जसा जपून ठेवावा तसे टिकून आहेत. एवढेच नव्हे तर पु.लंचे लिखाण वाचताना नकळत ते आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास होतो. पु.लं.च्या सान्निध्यात असताना, “या माणसाकडे अशी कोणती जादू आहे !', याचं कायम अप्रूप वाटत असे, असं सांगताना विजयाबाईंनी भावनाविवश होत पु.लं.ची एखाद्याचं कौतुक करण्याची अगर प्रोत्साहन देण्याची हुबेहूब नक्कल करून दाखविली, त्या वेळी प्रेक्षकही गहिवरले होते.

कोणत्याही चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याच्या पु.लं.च्या स्वभावाविषयी सांगताना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, विजय तेंडुलकरांनी “घाशीराम कोतवाल'चे केलेले पहिले वाचन ऐकल्यानंतर पु.लं.नी, हे नाटक फार मोठे असून हे आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर व वेगळ्या पद्धतीने करावे लागेल, असे वारंवार बजावत प्रोत्साहन दिले. तसेच “घाशीराम...'चा प्रयोग पाहिल्यावर, मी तुझ्यासाठी नाटक लिहायला घेतोय आणि त्याचे नाव असेल 'तीन पैशांचा तमाशा', असं सांगून 'घाशीराम'साठी शाबासकी दिली. 'तीन पैशांचा तमाशा'चे पु.लं.नी पहिले वाचन केले, त्या वेळी हे नाटक मुंबईच्या वास्तवाशी जुळवून करू या, असे आपण सुचविताच, आता हे नाटक तुझे आहे, तुला हवे ते बदल कर, असं पु.लं. सहजपणे म्हणाले. त्यानंतर पु.लं. एकदाही नाटकाच्या तालमीला आले नाहीत. नाटकाचा पहिला प्रयोग बघितल्यानंतर, “आपण याला काय लिहून दिले अन्‌ याने हे काय केले ?' असे भाव पु.लं.च्या चेहऱ्यावर होते. परंतु पं. वसंतराव देशपांडे आणि सी. रामचंद्र यांनी नाटकाचा बाज आणि त्यातील जाझ संगीताचे कौतुक करून नाटक आवडल्याची पावती देताच पु.लं. खुलले... ही आठवण सांगताना जब्बार पटेलांनी, दिग्दर्शकाने केलेले बदल खुलेपणाने स्वीकारणारा नाटककार, अशी पु.लं.ची वेगळी ओळख करून दिली. 'देव नावाची गोष्ट कधी कधी मला कळत नाही', असं मार्मिक विधान करणारा अतिशय मर्मग्राही भाष्यकार म्हणूनही पु. ल. मोठे होते. आणीबाणीच्या काळात पु.लं.नी शनवारवाड्यासमोर केलेले भाषण म्हणजे त्यांचं खरं व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविणारं स्वगत आहे, असे जब्बार पटेल म्हणाले.

“मोठा कलावंत व्हायचे असेल तर तुझ्यातल्या लहान मूलाला जप“, अशी फार मोलाची शिकवण देणारे पु.ल. स्वतःही एखाद्या खट्याळ मुलाप्रमाणे होते, असे सांगताना प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांनी आपल्या आठवणींमधून, पु.लं.च्या निरागस आणि निस्पृह व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडून दाखविले. एखाद्याची अमूक एक गोष्ट वा उपक्रम आवडला की, पु.ल. त्याला अवघडायला होईल, इतकं त्याचं कौतुक करायचे, असं सांगून प्रा. केंद्रे यांनी “झुलवा'च्या पहिल्या प्रयोगानंतरची आठवण सांगितली. नाटक बघितल्यानंतर पु.ल. दोन दिवस बोलले नाहीत. मी एनसीपीएतच त्यांच्या हाताखाली काम करायचो, त्यांच्यासमोर गेलो तरी ते माझ्याशी काही बोललेच नाहीत. त्यामुळे आपलं काही तरी चुकलं, म्हणून पार गोंधळून गेलो होतो. तिसऱ्या दिवशी सकाळी एनसीपीएमध्ये गेल्यावर चौकीदारापासून जो भेटेल तो, पु.लं.नी तुम्हाला तातडीने भेटायला सांगितलं आहे, असं सांगत होता. मी पु.लं.च्या पुढ्यात दाखल होताच, 'नाटक बघितल्यानंतर बोलता येईल याचा आत्मविश्वास मला नव्हता', असं सांगितलं. त्या वेळी एखादा माणूस किती मोठा असू शकतो, याचं पु.लं.च्या रूपाने आपल्याला दर्शन झाल्याचे प्रा. केंद्रे म्हणाले. ते नेहमी म्हणायचे तु मला एखादी चांगली कथा सुचव, मी तुला चांगले नाटक लिहून देतो. त्यामुळे आपण एक रशियन कथा त्यांना वाचायला दिली. पु.लं.ना कथा कशी वाटली म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांना विचारायला गेलो तर म्हणाले, कथा छानच आहे, बरोबर चार दिवसांनी मी या कथेच्या नाटकाचे वाचन करणार. तु तयार राहा. पु.लं.नी केवळ चार दिवसांत 'एक झुंज वाऱ्याशी' या नाटकाचे वाचन केले. ही आठवण सांगताना प्रा. केंद्रे यांनी जेव्हा असं काही केवळ पु.ल.च करू शकतात, असे उद्गार काढले. पु.लं.च्या व्यक्तिमत्त्वाचा चिंतनशील भाग विषद करताना प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांनी, एनसीपीएतील कनिष्ठ कर्मचारी गफूर'भाईंना पु.ल. आपल्या वॉर्ड क्र. ५ मध्ये भेटायला आले तो प्रसंग सांगितला.

तसेच पु.ल. आणि सुनीताताई यांच्यातील काही किस्सेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात पु.लं.बरोबर 'वाऱ्यावरची वरात'मध्ये मालूची भूमिका करणाऱ्या करुणा देव, पु.लं.वर 'अमृतसिद्धी' हे पुस्तक लिहिणाऱ्या मंगला गोडबोले आणि पु.लं.च्या साहित्यावर वेबसाइट बनविणाऱ्या स्मिता मनोहर यांनी आपले अनुभव सांगितले. पु.लं.वरच्या स्मृतिपटाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण यांनी वक्‍त्यांचे स्वागत केले. तर पत्रकार अंबरीश मिश्र यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पुलोत्सव 
२०२१
महाराष्ट्र टाईम्स 

Thursday, October 6, 2022

कविता 'जगणारी' विदुषी सुनीताबाई देशपांडे

सुनीताबाई देशपांडे म्हटलं, की आपल्या चटकन् आठवतं पु.लं.ची पत्नी. पु.लं.ची पत्नी ही त्यांची ओळख आहेच, किंबहुना तो त्यांचा बहुमान आहे हे नक्की. पण केवळ पु.लंमुळे त्यांना ओळख नाही. एक अतिशय समर्थ आणि व्यासंगी लेखिका आणि विदुषी म्हणून सुनीताबाईंना महाराष्ट्र ओळखतो. त्यांचं कवितेवरिल जिवापाड प्रेम, पु.लं.सोबत संसार करण्याचं विलक्षण कसब आणि त्यांनी केलेलं प्रामाणिक लेखन यातून त्यांच्या आयुष्यातील समृद्धीचा अंदाज लागू शकतो. पूर्वाश्रमीच्या सुनीता ठाकूर यांचा जन्म रत्नागिरीमधे ३ जुलै १९२६ रोजी झाला. त्या एक अत्यंत हुशार विद्यार्थिनी होत्या हे वेगळं सांगायला नको.
 
सुनीताबाईंचे वडिल, सदानंद ठाकूर हे फार मोठे वकील होते. काँग्रेसमधे असणार्या त्यांच्या मामांनी १९४२मध्ये भुमीगत रेडिओ पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. परंतु काही कारणांस्तव ते काम पूर्ण झाले नाही. सुनीताबाईंनी मोर्चाचे नेतृत्वही केले होते. आणि मुख्य म्हणजे त्या एकदा मिलिट्रीच्या गाड्यांच्या ताफ्यालाही सामोर्या गेल्या होत्या! वाटतं, की कदाचित याच सगळ्या अनुभवसंचितातून त्यांच्यामधे एक अढळ कणखरता निर्माण झाली असावी. नाहितर, अवघ्या अस्तित्वावर कवितेचा हळवा संवेदन धागा तोलून धरताना अशी कणखरता आणि खरंतर शिस्तही सांभाळणं किती अवघड आहे! शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या रत्नागिरीहून मुंबईला स्थायिक झाल्या. तिथे त्या ओरिएंटल हायस्कूलमधे शिकवत होत्या. आश्चर्य म्हणजे पु.ल.ही तेव्हा ओरिएंटल हायस्कूलमधे शिक्षक म्हणून काम करत होते. तेव्हा दोघांच्याही कवितेवरच्या नितांत प्रेमामुळे त्यांच्या मनाचा धागा जुळला, आणि दोघांच्याही जीवनाची कविता बहरुन आली! १२ जून १९४६ रोजी त्यांचा विवाह झाला. तोही नोंदणी पद्धतीने.

त्यांनी अनेक चित्रपट व नाटकांमधून उत्तम अभिनयही केला. 'नवरा बायको' या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. 'वंदे मातरम्' या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रसिद्ध झाली. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी केला. 'सुंदर मी होणार' मधली दीदीराजे ही महत्वाची भूमिकाही त्यांनी साकारली. पु.लं. बरोबर त्यांनी अनेक नाटकं साकारली. 'वार्यावरची वरात' 'बटाट्याची चाळ' अशा अनेक नाटकांमधे त्यांनी भुमिका केल्या. सहचरणीच्या आपल्या भूमिकेत त्यांनी पु.लं.च्या कामात वेळोवेळी हातभार लावला. अर्थात्, त्यांच्यासरख्या इतक्या हरहुन्नरी माणसासोबत संसार करणं हेही कर्तृत्वच म्हणावं लागेल!

सुनीताबाईंना अवघा महाराष्ट्र पु.लं.ची पत्नी म्हणून मुख्यत्वे ओळखत असला, तरी पु.लं.च्या इतक्या भव्य यशामधे सुनीताबाईंचा सिंहाचा वाटा आहे यात संशय नाही. ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ जयंत नारळीकर म्हटले होते, की "पुलं पुरुषोत्तम झाले, ह्यामागचं कारण, त्यांना वेळोवेळी "सुनीत" करणाऱ्या सुनीताताई." या शब्दांतून, या विदुषीचं आपला व्यासंग सांभाळून पतीला अखंड साथ देण्याचं सहजव्रत स्पष्टपणे जाणवतं. पण पु.लं.च्या मनात सुनीताबाईंबद्दल नक्कीच एक सप्रेम आदर होता. तेच एकदा म्हटले होते, की “सुनीता फार बुद्धिमान आहे, मॅक्ट्रिकला गणिताला तिला शंभर पैकी शंभर मार्क मिळाले होते. नंतर बेचाळीसच्या चळवळीत गेली, संगिनी रोखून गोरे शिपाई समोर असताना मोर्चातील सर्व पळाले, ती एकदम ताठ उभी होती! तिला वजा केले, तर बाकी उरेल; पण चार लोकांची असते तशी. वारा प्यालेल्या वासरासारखी माझी अवस्था झाली असती. बंगल्यात राहिलो असतो. ए सी गाडीतून फिरलो असतो. बंगल्यासमोर नाना क्षेत्रातील कलावंतासमवेत मैफिली भरल्या असत्या. एकूण भोगाशिवाय कशाला स्थान राहिले नसते.”
 
यातूनच पुलंच्या जीवनातील सुनीताबाईंचा अविभाज्य वाटा दिसून येतो. या दांपत्याचं जीवन सर्वांगाने समृद्ध होतंच, पण लौकिक अर्थाने समृद्ध असूनसुद्धा सुनीताबाई फार काटकसर करत. त्यांचा हा स्वभाव हे पुलंच्या मिश्किल विनोदांचं अनेकवेळा मूळ होत.
 
कविता हा सुनीताबाईंचा आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय. मुळातच रसिकतेने काठोकाठ भरलेल्या मनाला कविता दूरची कशी बरं वाटेल? ती नेहमीच त्यांच्या जवळ रराहिली. त्यांची होऊन राहिली. अगदी शेवटपर्यंत! लहान मुलांंनी मुग्धपणे आनंदासाठी बडबड गाणी म्हणावीत, श्लोक, स्तोत्र वगैरे अस्खलित म्हणून दाखवावं तशाच त्या कविता म्हणत. त्याच आनंदात, त्याच आस्थेने. अगदी गोविंदाग्रजांपासून कित्तीतरी कवींच्या कविता त्यांना संपूर्ण तोंडपाठ असायच्या. त्या वारंवार म्हणताना, मनात खोलवर होत जाणारं त्याचं चिंतन याचा केवळ अंदाजच आपण बांधू शकतो. कवितेच्या याच उत्कट प्रेमामुळे पुढे पु.ल. आणि सुनीताबाईंनी मिळून काव्यवाचनाचे जाहिर कार्यक्रम सुरू केले. बा.भ. बोरकर, बा.सी. मर्ढेकर, आरती प्रभू अशा काही निवडक कविंच्या कवितांचा मागोवा घेणार्या या कार्यक्रमाला रसिकांची अलोट गर्दी होत असे. ते कार्यक्रम केवळ कवितेच्या प्रामाणिक प्रेमातून केले असले, तरी त्यातून सुनीताबाईंना बरेच नावलौकिक मिळाले. सुनीताबाईंचं मराठी भाषेवर प्रभुत्व तर होतंच, शिवाय बंगाली आणि उर्दू भाषेचाही त्यांचा उत्तम अभ्यास होता.

सुनीता देशपांडेंशी निगडीत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा जी.एं. सोबतचा पत्रव्यवहार. जी.ए. कुलकर्णींच्या लेखनाचं मोठेपण सुनीताबाई आणि पु.ल. जाणून होते. ते या दोघांच्याही आवडीचे लेखक होते. पण सुनीताबाई आणि जी.ए. कुलकर्णी या दोघांमधलं मैत्र हे काही विलक्षणच होतं. त्यांचा पत्रव्यवहार हा फार मोलाचा होता. पुस्तकांबद्दल, इतर चांगल्या साहित्याबद्दल, आणि अशा आणखी बर्याच गोष्टींबद्दल त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र म्हणजे वाचकाला समृद्ध करणारा संवाद आहे. तो पत्रव्यवहार २००३साली 'प्रिय जीए' या नावाने सुनीताबाईंनी प्रकाशितही केला आहे. 'समांतर जीवन' (१९९२), 'सोयरे सकळ' (१९९८), मनातलं आकाश, मण्यांची माळ (२००२) ही त्यांची प्रकाशित झालेली पुस्तकंही वाचकपसंतीस पात्र ठरली आहेत. सुनीता देशपांडेंचं पुस्तक म्हटल्यावर अनेकांना आठवतं ते 'आहे मनोहर तरी'. १९९० मधे प्रकाशित झालेलं सुनीताबाईंचं हे आत्मचरित्र त्याच्या नावानेही आपल्याला भुरळ घालतं! यामधे त्यांच्या सहजिवनाचा अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे व्यक्त केलेला आहे. हे पुस्तक प्रकाशित होताच त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता, अजूनही लाभतो आहे.
 
सुनीताबाईंच्या आणि खरंतर या दांपत्याच्या अगणित वैशिष्ट्यांपैकी आणखी एक म्हणजे औदार्य! अनेकानेक सामाजिक साहित्यिक संस्थांना त्यांनी भरभरुन देणग्या दिल्या. विशेष म्हणजे त्या प्रत्येक संस्थेला ती देणगी त्यांची असल्याचे अनुच्चारीत ठेवायला सांगून दिलेल्या त्या देणग्या म्हणजे सामाजिक कर्तव्याचं निर्मोहीपणे जपलेलं भान म्हणावं लागेल. पु.लं.च्या निधनानंतर त्यांनी 'पु.ल.देशपांडे' फाऊंडेशनची स्थापना करुन अशाच अनेक देणग्या निर्वाच्यता ठेऊन दिल्या. देणग्या योग्य त्या संस्थेच्या आणि योग्य त्या हातांतच जायला हव्यात हा त्यांचा कटाक्ष सदैव असे.
 
'इतकं समृद्ध जगल्यावर, मृत्यूही तितकाच वैभवशाली यावा. त्याने उगाच रेंगाळू नये. माणसाला केविलवाणं करु नये' असं एकदा त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या शेवटच्या दिवसांत ग्लानीत असतानाही त्यांच्या ओठांवर कविता असायची! माणसाने इष्टदेवतेचा अखंड जप करावा तसं ग्लानी अवस्थेतही त्यांचं कविता म्हणणं चालूच असे. आयुष्यसाराचं तीर्थ ओंजळीत वहाणारी कविता, तिच तर त्यांची देवता होती. शेवटच्या क्षणापर्यंत या विदुषीने तिला जपलं होतं. ७ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांच्या देहातून कविता बाहेर पडली!
कविता जगणार्या विदुषीने शब्दांचा निरोप घेतला.

~ पार्थ जोशी

Saturday, October 1, 2022

चैतन्यानं भरलेलं गाणं

स्वरसम्राट कुमार गंधर्व आज हयात असते तर (८ एप्रिल १९९९ रोजी) ७५ वर्षांचे झाले असते. हे औचित्य साधून पु. ल. देशपांडे यांनी कुमार गंधर्व यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त देवास येथे झालेल्या तीन दिवसीय संगीत महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केलेले भाषण प्रसिद्ध करीत आहोत. या कार्यक्रमाचा समारोपही पुलंच्याच भाषणाने झाला होता. अप्रकाशित राहिलेली ही भाषणे राम कोल्हटकर यांच्या सौजन्याने उपलब्ध झाली.

मित्रहो,
माझ्या आधी राहुल (बारपुते) आणि राम (पुजारी) हे इतकं छान आणि इतकं चांगलं बोललेले आहेत, की त्यांच्यानंतर खरं म्हणाल तर- या दोघांसारखंच मलाही वाटतं, असं म्हणून मी माझं भाषण संपवलं पाहिजे असं माझं मत आहे. पण असं करून चालत नाही. मलासुद्धा आज बोलायचं आहे. कारण आयुष्यामध्ये मी असंख्य जाहीर भाषणं केली. काय करता, या प्रश्नाला उत्तर ‘भाषण’ असंच द्यावं, इतकी भाषणं अलीकडील काळात मी केली. परंतु इतक्या सुंदर भाग्यवंतांच्या मेळाव्यापुढं भाषण करायचा योग मला आलेला नव्हता. हा मेळावा नुसतं गाणं ऐकणाऱ्यांचा मेळावा नाही. नुसता सुरांवर प्रेम करणाऱ्यांचा मेळावा नाही. सुरांवर प्रेम करता करता, गाणं ऐकता ऐकता ज्यांची भाग्यं अंतर्बाह्य़ उजळली अशा भाग्यवंतांचा हा मेळावा आहे. ती उजळायला कुमार गंधर्व कारणीभूत झाला. या भाग्यवंतांना त्यांच्या भाग्याची शब्दामध्ये मी काय कल्पना देणार?
‘कुमार गंधर्वाचं गाणं’ असा शब्दप्रयोग ज्यावेळी वापरला जातो, त्यावेळी मला आरती प्रभूंची एक ओळ आठवते. त्यांनी एका ठिकाणी लिहिलं आहे की, ‘तो न गातो, ऐकतो तो सूर अपुला आतला..’ कुमार गंधर्व गायला लागला की असं वाटतं, की हा गातो ते गाणं आत चाललेलं गाणं आहे. ते स्वत:च ऐकता ऐकता जे काही सूर बाहेर पडतात त्यांचं गाणं तयार होतंय. ही वीणा कुमार जन्माला आला त्यावेळी सुरू झालेली आहे. ही अक्षय अशा प्रकारची आजतागायत चाललेली वीणा आहे. ही मैफल आज चालूच आहे. जसा आपण एखादा पिंजरा उघडावा आणि आतील पक्षी बाहेर पडावा, तसे कुमार ‘आ’ करतात आणि त्यातून गाणं बाहेर पडतं. ही गाण्यातील नैसर्गिकता आहे. हा सहजोद्भव गंगोत्रीसारखा आलेला आहे. एखाद्या झऱ्यासारखं आलेलं असं हे गाणं अत्यंत दुर्मीळ, दुष्प्राप्य अशा प्रकारचं आहे.

तानसेन कसे गात होते हे मला माहीत नाही. परंतु त्यांच्याबद्दल जे काही म्हणतात, ते आधुनिक काळात ज्यांच्याबद्दल म्हणावं, अशा गवयांतील कुमार गंधर्व सर्वश्रेष्ठ गवई आहेत असं मी म्हटलं तर ती अतिशयोक्ती केली असं कोणी म्हणू नये. आणि मी अतिशयोक्ती केली असं ज्याला वाटेल, त्याला अतिशयोक्ती म्हणजे काय हे कळत नाही, हे मला ठाम माहीत आहे. मी जवळजवळ तीस वर्षांपूर्वी कुमारांचं गाणं मुंबईत ऐकलं त्यावेळी सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगतो. तुकारामांनी म्हटलंय, ‘आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणाशी, बोलले जे ऋषी, साचभावे वर्ताया.’ त्या देहूच्या वाण्यानं ते असं मिजाशीत सांगितलेलं होतं. कुमारांसारख्याचं गाणं ऐकताना ते आतून ऐकल्यासारखं आम्हाला वाटतं. भारतीय संगीताची ज्यांनी स्थापना केली, भारतीय संगीत नावाची कल्पना ज्यांनी काढली, त्यांना जे काही म्हणायचं होतं, ते साचभावे सांगण्यासाठी कुमार गंधर्व आलेला आहे, असंच काही असावं असं मला वाटतं. मी ते भाषण केल्यानंतर त्यावेळी अनेकांना ते आवडलेलं नव्हतं. मनुष्यस्वभावामध्ये दुसऱ्याला चांगलं म्हणणं हासुद्धा एक भाग आहे. तसं दुसऱ्याला चांगलं म्हटलेलं नावडणं हासुद्धा मनुष्यस्वभावाचाच एक भाग आहे. त्यामुळे कोणाला दोष देण्याचे कारण नाही. पण मी हे उगाच म्हटलेलं नव्हतं. कुमार गंधर्वामध्ये जशी ५० वर्षे गायल्याची पुण्याई आहे, तशी माझ्यामध्येसुद्धा वयाच्या आठव्या-नवव्या वर्षांपासून गाणं ऐकल्याची पुण्याई आहे. ती काही फुकटची पुण्याई नाही. गवयांनासुद्धा स्थान मिळतं, प्राप्त होतं, ते ऐकणारा कोणीतरी असतो म्हणूनच.
या जगामध्ये भक्त नसते तर भगवंताला कुत्र्यानंसुद्धा विचारलं नसतं. भक्त आहे म्हणून भगवंताची किंमत आहे. हा देवाणघेवाणीचा प्रकार आहे. मला आनंद एवढाच आहे की, कोठेतरी आमचा धागा असा जमला आहे की, तो जे काय सांगतो ते माझ्या मनामध्ये आपोआप साठून जातं. रक्तामध्ये काही रक्त असं असतं की, दुसऱ्याचं रक्त दिलं तरी ते टाकून देतं असं म्हणतात. तसंच गाण्याचं आहे. काही गाणी आपलं शरीर फेकूनच देत असतं. स्वीकारायला तयार नसतं. त्याच्या उलट काही गाणी अशी असतात, की ती आपल्या शरीरात कधी मिसळतात त्याचा पत्ताच लागत नाही. कुमार गंधर्वाचं गाणं माझ्या सबंध व्यक्तिमत्त्वामध्ये कधी मिसळलं याचा पत्ताच लागला नाही.
कुमारला जसा तो किती उत्तम गातो याचा पत्ता नाही, तसं आम्ही ऐकताना किती उत्तम ऐकतो याचा आमचा आम्हालाच पत्ता नाही. असा अनुभव कुमारांच्या गाण्यामध्ये मला मिळाला. तो मला गाण्यातूनच जेव्हा काही सांगतो, तेव्हा मी कोणीतरी मोठा झालो, मी कोणीतरी निर्मळ झालो असं मला वाटतं. हे सांगताना मला गाण्यातील फार कळलं असं म्हणायचं कारणच नाही. कारण मला ते सर्टिफिकेट दाखवून कोणत्याही गाण्याच्या कॉलेजचा प्रिन्सिपॉल व्हायचं नाही, किंवा मी फार मोठा मनुष्य आहे, हे मला कोणाला मुद्दाम सांगायला जायची गरज नाही. मला जो आनंद मिळालेला आहे, जी श्रीमंती मिळालेली आहे, ती मला मिळालीच नाही, म्हणून फाटके कपडे घालून हिंडावं, अशा प्रकारचं ढोंग करायची मला गरज नाही. मी एक कमालीचा श्रीमंत मनुष्य आज तुमच्यासमोर बोलायला उभा आहे.
कुमारांचं दहाव्या वर्षी जे गाणं झालं ते ऐकलेला मी मनुष्य आहे. आज हर्षे मास्तर सोडले तर ते गाणं ऐकलेला दुसरा कोणी या मेळाव्यात असेल असं मला वाटत नाही. आमचे दुसरे एक अतिशय ‘तरुण’ श्रोते आहेत- दत्तोपंत देशपांडे. ७५ वर्षांचे. त्यांनी ते गाणं ऐकलेलं आहे. तेही देशपांडेच आहेत. माझ्यासारखे. त्या दिवशी काहीतरी असं झालं की, आपण काहीतरी अद्भुत ऐकलं असं श्रोत्यांना वाटलं. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी त्यांचं गाणं ऐकलेलं आहे, तेव्हा तेव्हा घरी आल्यानंतर ‘अस्वस्थता’ याखेरीज आणखी काही मी अनुभवलेलं नाही. मला आठवतंय, ५३ सालची गोष्ट आहे. आमचे गणूकाका कात्रे होते. कुमार गंधर्व त्यावेळी आजारातून बरे होऊन पुण्याला आले. फडतऱ्यांच्या वाडय़ामध्ये. त्यांच्या माडीवर. त्या वास्तूला विचारलं की, तुझ्याकडं कोणाकोणाचं गाणं झालं? आणि तो वाडा जर बोलायला लागला, तर भारतीय संगीताचा गेल्या दीडशे वर्षांचा इतिहास आपल्याला ऐकायला मिळेल. दिसायला अतिशय साधी अशी ती वास्तू आहे. आणि काय सांगायचं! तिथं कुमार आले आणि त्यांनी गायला सुरुवात केली. त्यावेळी वसंतराव देशपांडे माझ्या शेजारी बसलेले होते. मंगरुळकरही होते. असे आम्ही सगळेजण बसलो होतो. तुम्हाला सांगतो, संध्याकाळी कुमारनं गायला सुरुवात केली. त्याला फार गायला परवानगी नव्हती. तास- दीड तासच गायचं होतं. परंतु त्या तास- दीड तासात जवळजवळ दोनशे तासांचं संगीताचं भांडवल आमच्या शरीरामध्ये गेलेलं होतं. ते झाल्यानंतर रात्री दहा-अकराच्या सुमारास आम्ही घरी आलो. आणि मला ते अजून आठवतंय, की मी आणि वसंत देशपांडे दोघेजण दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत एकमेकांशी काहीही न बोलता खोलीमध्ये बसलो होतो.

कुमारांसारखा गवई गातो, त्यावेळी आपली भूमिका अशी पाहिजे की तो जो भूप गातो, त्याला भूप म्हणायचं. कुमार जे गातो, त्याला ख्याल म्हणायचं. ख्यालाची व्याख्या उलट करीत बसायचं नाही.

ख्याल म्हणजे काय, याचा परीक्षेसाठी अभ्यास केला तर प्रमाणपत्र मिळेल; पण गाणं नाही मिळणार. ‘बालगंधर्वाचा अभिनय म्हणजे काय?’ असं मला कोणीतरी विचारलं तेव्हा मी म्हटलं, ‘बालगंधर्वाचा अभिनय नव्हता. बालगंधर्व जे करतात त्याला अभिनय म्हणतात.’ त्याप्रमाणं कुमार जे गायचा त्याला आम्ही गाणं म्हणायचो. तेथे आम्हाला राग दिसायला लागला. त्याचा साक्षात्कार झाला. कोणीतरी आता म्हणालं की, गौडमल्हार मला तसा वाटलाच नाही. तर त्यानं गायलेला गौडमल्हार काय होता, हे परमेश्वरालाच ठाऊक. एक प्रसिद्ध गोष्ट आहे. द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा याला पिठाचं दूध त्याची आई देत असे. एकदा ते दुयरेधनाच्या घरी गेलेले असताना त्यांनी त्याला खरं दूध दिलं. परंतु ते त्यानं थू थू करून थुंकून टाकलं. त्याला या दुधाची चव माहीत नव्हती. तो पिठाचं दूधच प्यायला होता. तसं पिठाच्या पाण्याचा गौडमल्हार ज्यानं ऐकला असेल त्याला कुमारांचा गौडमल्हार हा गौडमल्हार न वाटणं यात त्याची काही चूक नाही. पण हे सगळं जे आलं ते काही आपोआप आलं असं नाही. कुमार गंधर्व किती लहानपणी गायला लागले, त्याला जे गाणं स्फुरलं, ते किती मोठं होतं, हे सांगायची गरज नाही. वयाच्या दहाव्या वर्षीची त्याची ‘रामकली’सारखी रेकॉर्ड ऐकली तर त्यावेळी आणि आता ऐकताना तेच चैतन्य गातंय असं तुम्हाला वाटेल. परवासुद्धा त्याच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त निरनिराळ्या लोकांनी लेख लिहिले. आत्मीयतेने लिहिले. कुमार काही कोणी राजकीय मंत्री किंवा पुढारी नाही, की त्याच्याबद्दल चांगलं लिहिल्यानं आपल्याला मुंबईत एखादा फ्लॅट वगैरे मिळेल. तर प्रेमानं सगळ्यांनी लिहिलं. सगळ्यांचे लेख मी वाचले. अतिशय तन्मयतेने वाचले. आणि माझ्या लक्षात आलं की, एवढं सगळं झालं तरीसुद्धा या लेखकांना वाटत असेल की, अजूनसुद्धा काहीतरी राहिलंय. परमेश्वराबद्दल जे म्हणतात, स्थिरचर व्यापून अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला, तसं कुमार गंधर्वाच्याबद्दल सगळं लिहूनसुद्धा पुन्हा दशांगुळे राहतातच. त्यामुळे हे गाणं आम्ही सांगूच शकत नाही. आमचा अहंकार जर कुठं जिरत असेल, तर कुमार गंधर्वाचं गाणं कसं आहे हे सांगा, असं म्हटलं की तेथेच जिरतो. ही अनुभवाची गोष्ट आहे. ही प्रचीतीची गोष्ट आहे. आणि प्रचीतीच्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला काय सांगणार? मला राहुल म्हणाला, आज तुला कुमारबद्दल बोलायचं आहे. मी मनात म्हटलं की, आज तुला चांदण्याबद्दल बोलायचं आहे. ज्यानं चांदण्याचा आनंद घेतलाय, त्यानं बोलायची गरज नाही. ज्यानं हा आनंद घेतला नाही, त्याला बोलून कळणार नाही. तसं कुमारचं गाणं आहे. ज्याच्या अंतरंगामध्ये ते शिरलं, त्याला कळणार. याचं कारण आहे- कुमारसारखे जे गवई गातात ते काहीतरी दुसरं सिद्ध करण्यासाठी गात नाहीत. ते गातात त्यावेळी त्यांचं सगळं व्यक्तिमत्त्व, त्यांचं रंध्र न् रंध्र गात असतं. स्टेथस्कोपसारखं एखादं यंत्र निर्माण झालं आणि कुमार समजा भूप गातोय आणि त्यावेळी ते यंत्र त्याच्या गुडघ्याला लावलं तर त्या गुडघ्यातून, त्या नळीमधूनसुद्धा भूपच ऐकू येईल. सबंध शरीरात, सबंध रक्तात, आपल्या सबंध चिंतनात जेव्हा तो राग मिसळतो, त्यावेळीच तो राग जिवंत होऊन आलेला असतो. काही लोकांचं पाठांतर इतकं चोख असतं, की उत्तम कारागीरसुद्धा उत्तम कलावंत होऊ शकतो. उत्तम कारागिराला मी नावं ठेवीत नाही. त्यालासुद्धा तपश्चर्या लागते. कुमारसारखा गवई ज्यावेळी गायला लागतो, त्यावेळी ते चैतन्य आतून काहीतरी प्रॉम्प्टिंग करतं आणि बाहेर हे गाणं येतं. याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. कुमार माझ्या घरी भूप गात होते. ‘ध्यान अब दीज्यो गुनिजन..’ आणि तितक्यात गोविंदराव टेंबे आले. गोविंदराव टेंब्यांचं मैफलीत येणं म्हणजे काळोख्या रात्री एकाएकी चांदणं पसरल्यासारखंच होतं.

काळोखी रात्र असताना ‘फुल मून’ दिसला म्हणजे कसं वाटेल, तसं गोविंदराव नुसते मैफलीत आले की वाटायचं. मी खरोखर सांगतो की मैफलीची रोशन, मैफलीची शोभा काय असते, तर ती म्हणजे गोविंदराव होते. गाणाऱ्या माणसाला आपलं जीवन धन्य झालं असं वाटावं अशा रीतीनं ते गाणं ऐकत असत. चांगलं असेल तर. नाहीतर मग त्यांचा चेहरा बघवत नसे. कुमारचं गाणं झालं. तो भूप संपला. त्याबरोबर गोविंदरावांनी उद्गार काढले, ‘तुला काय दाद द्यायची? गेल्या तीन जन्मांतील गाणं या जन्मात आठवावं अशी जर विधात्यानं तुझ्याकडं सोय करून ठेवलेली असेल, तर दाद कसली द्यायला पाहिजे!’

एखाद्याला लहानपणी एकदम अशा प्रकारची कीर्ती मिळाली की फार धोकाही असतो. मला नेहमी असं वाटतं, की ज्याला प्रॉडिजी म्हणतात, अशा प्रकारचा जन्म देणं हा एक प्रकारचा त्याच्यावरचा अन्यायच असतो. परंतु कुमार हा एक असा निघाला, की लहानपणी तो बालकलावंत असूनसुद्धा आजन्म कलावंतच राहिला. बाल्यामध्ये ‘हा फार चांगलं गात असतो’ या तारीफेवर पुढे ५० वर्षे गात राहणं, असा प्रकार झाला नाही. त्याचं नाव ज्या कोणी कुमार गंधर्व ठेवलं असेल, त्याच्या कानामध्ये त्या क्षणी जगातील सर्व शुभदेवता आल्या असतील आणि त्या कुजबुजल्या असतील की, हा कुमार- ‘गंधर्व’ आहे.

‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे, बाणा कवीचा असे’ असं म्हटलंय. वार्धक्यामध्येसुद्धा शैशव जपणे हे फार कठीण असते. कुमारच्या गाण्यातील ताजेपण हे एखाद्या शैशवासारखे आहे. कुमार गंधर्व पान लावायला लागले तरी ते मैफिलीत बसल्यासारखे किंवा ख्याल गायला बसल्यासारखे वाटतात. असं म्हटलेलं आहे की ‘मधुराधिपतेरखिलम् मधुरम्’! जो मधुर असतो त्याचं चालणं, बोलणं, गाणंसुद्धा मधुरच असतं. असं सगळं मधुर बरोबर घेऊन तो आला, हे खरंच आहे. ते घेऊन आला, परंतु मिजाशीत राहिला नाही. ते वाढवीत गेला. त्याला अखंड चिंतन कारणीभूत आहे. कुमार गंधर्वाचं गाणं म्हणजे चिंतनाच्या तपश्चर्येतून निघालेली एक किमया आहे. त्याला कोणीतरी विचारलं की, तुमची साधना केव्हा चालू असते? कुमारनं त्याच्याकडे असं पाहिलं, की ‘केव्हा नसते?’ साधना याचा अर्थ रोज सकाळी उठून ‘पलटे घोकत बसणे’ असा नव्हे. साधना म्हणजे तो राग दिसला पाहिजे, स्वर दिसला पाहिजे. शंकराचार्याबद्दल असं म्हणतात की, त्यांनी परकायाप्रवेश केला. कुमार गंधर्व गायला लागले की ते स्वरकायाप्रवेश करतात असं वाटतं. गंधार म्हणजे कुमारच, मध्यम म्हणजे कुमारच आणि पंचम म्हणजे कुमारच असं वाटतं. भाविक लोक असं म्हणतात की, ‘पूर्वसुकृताचि जोडी म्हणुनि विठ्ठली आवडी..’ मला पूर्वसुकृताचं माहीत नाही, परंतु मी असं म्हणेन की, ‘पूर्वसुकृताचि जोडी म्हणुनि आज संगीत आवडी’ असं वाटायला लावणं, हे कुमारचं गाणं आहे. आज आपल्याला केवढं श्रीमंत केलंय या माणसानं! गेल्या चाळीस वर्षांच्या याच्या सहवासातून मला फक्त ऐश्वर्यच मिळालं आहे. बाकी काही नाही. फक्त ऐश्वर्य, ऐश्वर्य आण ऐश्वर्यच. प्रत्येक बैठक मला प्रचंड श्रीमंत करून गेली. त्यानं आम्हाला किती बदललं, हे त्याचं त्यालाच माहीत नसेल. हे बदलताना कमालीच्या सहजभावनेनं त्यानं बदललं. चारचौघांमध्ये चारचौघांसारखं. हा कोणीतरी मोठा आहे, हे सामान्यांना मुद्दाम सांगावं लागलं नाही. आज एखादा वादकही पुढे-मागे दोन-चार शिष्य घेऊन येतो. अशा वरातीतून आल्यावर त्याला मोठं वाटतं. परंतु साध्या रीतीने स्वत:च्या गाण्याच्या मैफलीला स्वत:च स्वत:ची बैठक घालणारा हा गायक आहे. 
कुमारचं दुसरं वैशिष्टय़ असं की, भारतीय संगीतकलेला ज्यांनी अतोनात मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, त्यांच्यात मला कुमार गंधर्वाचं स्थान फार मोठं वाटतं. हे करण्यासाठी त्यानं खोटे प्रयत्न केले नाहीत. पण बैठक हे एका यज्ञकर्मासारखं अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं कर्म आहे, अशा भावनेनं त्याकडे बघितलं. कसंतरी चालेल, काहीतरी चालेल, असं केलं नाही. दोन वर्षांपूर्वी आलेलो असताना तुम्हाला काय दिलं, दोन वर्षांनंतर काय द्यायचं, याचा विचार करून त्याचा मेनू तयार करणं आणि तो देणं, हे कोणता गवई करतो? तुम्ही मला सांगा. आम्हा कलावंतांमध्ये नेहमीची पद्धत असते, की ज्या गोष्टीसाठी आम्हाला टाळ्या आणि वाहवा मिळालेली असते ती ट्राय करायची. त्यावेळी तो शुअर शॉट असतो. काही घाबरायचं कारण नसतं. कुमार गंधर्वाचं मोठेपण याच्यात आहे, की त्यांना पेटंट लागतच नाही. ते जो राग गातील तोच या जगातील सर्वश्रेष्ठ असा राग वाटत असतो. त्यांना न आवडणाऱ्या रागाबद्दलसुद्धा त्यांनी त्या दिवशी गंमत केली. त्यानं मी थंडच झालो. त्यांच्याकडे कोणीतरी परीक्षेला बसणारा शिष्य आला होता. तो म्हणाला की, मला हिंडोलमधील चीज पाहिजे. कुमार म्हणाले, अरे, हिंडोल हा मला न आवडणारा राग आहे. कुमारलासुद्धा न आवडणारा राग असतो, याच्यावर माझा विश्वास नव्हता. पण त्या दिवशी त्यानं ठरवलं होतं, की हिंडोलशी जमलेलं नाही. तो आवडत नाही म्हटल्यानंतर मला हिंडोल का आवडत नाही, यावरचीच चीज त्यांनी म्हटली. तो मला आवडत नाही, बिलकूल आवडत नाही म्हणून त्यांनी त्या रागाला वेगळीच पीठिका दिली. ते इतकं सुंदर आहे, की भारतीय संगीताच्या इतिहासात ते कोणाला साधलेलं असेल असं मला वाटत नाही. त्याला अतोनात सुंदर अशा वात्सल्याची पीठिका आहे. त्यांचा नातू फार दंगा करतो. आणि ते त्याला सांगतात की, ए बदमाशा, तू मला आवडत नाहीस. म्हणजे न आवडणाऱ्या हिंडोलला त्यांनी लहान मुलाच्या खटय़ाळपणाची पीठिका दिली. हे साध्यासुध्या बुद्धिमत्तेचं काम नाही. मला नेहमी वाटतं की, कुमार गंधर्व कधी नाटककार झाले नाहीत, नाहीतर आमचं कोणी नाटककार म्हणून नावही घेतलं नसतं. त्यांच्या नाटकात आम्ही पडदे ओढायला जाऊन उभे राहिलो असतो. ते गवई झाले ते बरं झालं. आणि आम्ही गवई झालो नाही, हे भारतीय संगीताच्या दृष्टीनं फार बरं झालं. आपण गवई झालो नसतो तर बरं झालं असतं, असं जर काही गवयांना वाटलं असतं तर भारतीय संगीतावर उपकारच झाले असते. ते कळत नाही, हीच फार मोठी ट्रॅजेडी आहे. परंतु कुमारनं हा सगळा आनंद दिला. प्रत्येक क्षेत्रात आनंद दिला. त्याचं नुसतं येणं हेच आनंददायी असतं. कुमार गंधर्व पुण्यात आला- ही बातमी कळल्यानंतर आमच्यासारखे लोक जागच्या जागीच आनंदी व्हायचे. त्याच्या गाण्याला जायचं लांबच राहिलं. हे भाग्य कुणाला लाभलं? ते चिंतनानं लाभलं, तपस्येनं लाभलं. प्रतिभेच्या जोडीला उत्तम प्रज्ञा असल्यामुळेच त्याचे प्रयोग महत्त्वाचे ठरले.

खरं सांगायचं तर कुमार गंधर्वाचं गाणं वयाच्या दहाव्या वर्षांइतकंच साठाव्या वर्षीही तरुण आहे. साठावं वर्ष कुमार गंधर्व नावाच्या माणसाला लागलेलं वर्ष आहे. त्याचं गाणं त्याच्यासारखंच चिरतरुण आहे. काही गोष्टी म्हाताऱ्या होऊ शकत नाहीत. जसं चांदणं किंवा गंगेचं पाणी. त्याचं गाणं चैतन्यानं भरलेलं गाणं आहे.

(लोकरंग – ४ एप्रिल १९९९ )

मूळ स्रोत -->https://www.loksatta.com/lokrang/lekha/pu-la-deshpande-speech-delivered-on-occasion-of-music-festival-inauguration-1291518/