Saturday, November 29, 2008

मुलायम आवाजाचा भीमसेन -- पु.ल. देशपांडे

पु. ल. देशपांडे यांनी पंडित भीमसेन जोशी यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा हा संपादित भाग...

मुळ स्त्रोत -- महाराष्ट्र टाईम्स
.........

पु.ल. : आतापर्यंत अनेक वेळा भेटलो आहोत आपण, परंतु तुम्हाला भेटल्यावर मला न चुकता कसली आठवण होत असेल, तर पहिल्यांदा तुमची माझी भेट झाली त्या क्षणाची; आणि प्रत्यक्ष झाली नाही, तर ती तुमच्या सुरांतून झाली. आणि मग तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो. पस्तीस-छत्तीस वर्षं झाली असतील. एचएमव्ही स्टुडिओमध्ये मी गेलो होतो. तिथं तुमचं त्या वेळेला एक रेकॉडिर्ग चाललेलं होतं. मला आठवतं की, ते कानडी गाणं होतं.

ते ऐकल्याबरोबर मी त्या रेकॉडिर्ंग बूथमध्ये उभा राहिलो. तिथे जी. एन. जोशी होते. त्यांना म्हटलं, ''कोण आहे हा?'' ते म्हणाले, ''धारवाड, गदग वगैरे भागातून तरुण मुलगा आलेला आहे, आणि त्याचं नाव भीमसेन जोशी आहे.'' त्या वेळी तुमच्या आवाजातील मुलायमपणा आणि तुमचं भीमसेन हे नाव या दोन्ही गोष्टी मला विसंगत वाटल्या. तुम्ही हे गाणं अतिशय सुंदर गायलं होतं. तर त्या गाण्यानं आपल्या गप्पागोष्टींची सुरुवात करू या.

भीमसेन : (गातात)

पु.ल. : वा, वा, वा.... पस्तीस वर्षं झाली. तुम्हीही साठी ओलांडली आहे. मी तर केव्हाच ओलांडलेली आहे, पण तुम्ही साठी ओलांडूनसुद्धा पस्तीस वर्षांपूवीर्चं तुमच्या गळ्याचं तारुण्य तसंच आहे, आणि त्यामधली जी कोवळीक आहे ती या क्षणालासुद्धा तशीच राहिली आहे. ही काय जादू आहे मला कळत नाही. तुम्हाला गाण्याचा हा ध्यास खूप लहानपणी लागला, नाही का?

भीमसेन : हो. म्हणजे तसं आपल्याला माहीतच आहे, की आमच्याकडं जुन्या काळातील माणसं होती. घरात संध्याकाळी दिवे लागले की माझी आई गायची. देवदासाचं भजन वगैरे म्हणायची. ती इतकी गोड गायची की, त्यामुळेच सुरुवातीला मला गाण्याचा नाद लागला.

पु.ल. : बहुतेक गवयांची हीच कथा आहे. त्यांच्यावर गाण्याचे पहिले संस्कार झाले, ते त्यांच्या आईच्या गाण्याचे झाले. आणि ते जे संस्कार झाले त्याच्यामागे एक जिव्हाळासुद्धा होता. या दोन्हींमुळे ते गाणं अतिशय गोड वाटत होतं. अशा प्रकारचं गाणं ऐकत-ऐकत तुम्ही मोठे झालात...

पण मला सांगा, की आपल्याला आता गाण्याचा ध्यास घ्यायलाच पाहिजे किंवा गाणं शिकलंच पाहिजे. किंवा गवई व्हायलाच पाहिजे, असं तुम्हाला वाटावं अशी एखादी घटना घडली की आणखी काही झालं?

भीमसेन : घटना म्हणजे, तुम्हाला माहीत आहे की, खाँसाहेबांची पहिली रेकॉर्ड निघाली 'पिया बिन...' आमच्याकडं एक दुकानदार होता. तो नवीन रेकॉर्ड आली की जाहिरातीसारखी लावायचा. आतासारखं पेपरमध्ये वगैरे येत नव्हतं. शाळा सोडून मी तिथं जाऊन बसायचो. ते इतक्या वेळेला ऐकलं की, असं वाटायचं, अशा प्रकारचं गाणं मला यायला पाहिजे. हा निश्चय मनात पक्का केला.

आमच्या वडिलांची एवढीच इच्छा होती, की आधी थोडं तरी शिक्षण घ्यावं, निदान ग्रॅज्युएट तरी व्हावं. पण मला काही धीर नव्हता. मी म्हटलं, हे काही जमत नाही. मी पळून गेलो.

पु.ल. : तुम्ही लहान होतात. काय वय होत तेव्हा?

भीमसेन : बारा-तेरा वर्षांचं.

पु.ल. : बारा-तेरा वर्षांचं? तुम्ही गेलात ते गदगहून निघालात आणि धारवाडला आलात?

भीमसेन : हो. धारवाडहून पुण्याला आलो. पुण्याहून मंुबईला गेलो.

पु.ल. : म्हणजे कुठं जायचं. ते माहीत नव्हतं.

भीमसेन : माहीत नव्हतं, पण ग्वाल्हेर वगैरे असं मनात होतं. तिथपर्यंत पोहोचलो.

पु.ल. : तुम्ही हाल काढत ग्वाल्हेरपर्यंत गेलात, ते मला माहीत आहे. गाडीचा प्रवास करत करत खिशातील पैसे संपले की गाडीत गाणं म्हणायचं. लोकांना वाटायचं, हा भिकाऱ्याचा पोरगा लहान असूनसुद्धा छान गातो. म्हणून जेवायला द्यायचे. कोणी पैसे द्यायचे. आणि त्या काळी तुम्ही चतुराईनं रेल्वेला बरंचसं फसवून विदाऊट तिकीट ग्वाल्हेरपर्यंतचा प्रवास केलेला आहे.

भीमसेन : हो. दोन-तीनदा जेलमध्येसुद्धा जाऊन आलोय.

पु.ल. : तिथंसुद्धा तुम्ही, मला वाटतं, तो जो शिपाई होता, त्याला गाणं ऐकवल्यावर त्यानं तुम्हाला सोडलं.

भीमसेन : काय आहे, गाण्याचे शौकीन भेटले की, आपला पुढचा प्रवास सुखकर व्हायचा.

पु.ल. : तुम्हाला गुरू कुठं भेटले?

भीमसेन : तिथं मी असा हिंडत-हिंडत गेलो. मी पंजाबमध्ये जालंदरला पोहोचलो. तिथं 'आर्य संगीत विद्यालय' आहे. तिथे त्या काळातील भक्त मल्होत्रा नावाचे ध्रुपद गायक होते. ते प्रसिद्ध होते. त्यांच्याकडं मला एका मिल ओनरनं ठेवलं. म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हतं. ते म्हणाले, ''काही हरकत नाही. तू गाणं शिकत जा.'' आणि मी तिथं शिकायला सुरुवात केली. शे-दीडशे ध्रुपदं शिकलो त्या वेळेला. तिथं 'हरी वल्लभका मेला' भरायचा. तिथं आपल्याकडचे सगळे गायक यायचे. वामनराव, नारायणराव व्यास, विनायकबुवा. कोणी आलं की मी आपला तंबोरा घेऊन आहेच मागं उमेदवारीला. विनायकबुवांनी तिथं विचारलं, ''इथं काय करतोयस तू?'' मी म्हटलं, ''गाणं शिकायला आलोय.'' ''वेड्या, तुला माहीत नाही? तुझ्या गावाजवळच एवढी मोठी व्यक्ती आहे, सवाईगंधर्व. त्यांच्याकडं जा तू.'' मग तिथून गाडी परत फिरली.

पु.ल. : म्हणजे 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' म्हणतात तसं. मग रामभाऊंनी सुरुवात कशी केली?

भीमसेन : ते परीक्षा बघत होते. कारण माझ्यासमोरच दोन-चार माणसं गाणं शिकायला आली. तिथं पाण्याचा दुष्काळ होता. पाणी भरणं वगैरे बघून ती पळून गेली. हा खरा टिकणारा आहे की नाही, खरा शिकतो की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी वर्षभर आम्हाला शिक्षा दिली. दोन-दोन घागरी घ्यायच्या आणि विहिरीवरून पाणी आणायचं. तेव्हा त्या परीक्षेत मी पास झालो. कारण पंजाबमध्ये ते सगळं होतं ना.

मी पहाटे चारला उठत होतो. मग एक तासभर पाणी वगैरे भरायचं. पन्नास-साठ घागरी पाणी आणायचं. मग तंबोरा घ्यायचा. मग त्यानं सुरुवात करायची. भैरव रागाचा रियाज सप्तकात करायचा. खर्ज वगैरे लावून. एकदा मी शिकत असताना माझा आवाज बसला होता. तरीसुद्धा गुरुजी रियाज करून घेत होते. पण मला त्याचा त्रास झाला नाही. मंदामध्ये रियाज करायला लावला जायचा. मध्य सप्तकात वगैरे नाही. विश्रांती देत-देत असा रियाज करत करत मग तो त्रास नाहीसा झाला.

पु.ल. : तुमच्या गाण्यामधलं जे वैशिष्ट्य मला जाणवतं ते असं की, तुमचा स्वर जो आहे ते आ-काराचं गाणं आहे. हा आ-कार तेजस्वी लावला पाहिजे हे तुम्हाला गुरुजींनी सांगितलं की...

भीमसेन : नाही. ते तो तसा लावत नव्हते. ते सांगायचे. माझ्यावरती जे गायक आहेत, त्यांचे हे परिणाम आहेत. हा स्पेशल म्हणजे माझ्यावर केशरबाईंचा प्रभाव आहे. आमच्या वेळेला माईक वगैरे काही नव्हतं. आमचे गुरू थिएटरमध्ये विदाऊट माइक ऐकलेले आहेत मी.

पु.ल. : मी रस्त्यावरूनसुद्धा ऐकलेले आहेत. हजार लोकं पुढं बसलेले आणि गुरुजी गाताहेत. तर हे जे सगळं तुम्ही रियाज करत करत केलंत, हे किती वर्षं चाललेलं होतं?

भीमसेन : जवळजवळ पाच-सात वर्षं मी रियाज केला. थोडंसं यायला लागल्यानंतर मी अठरा-अठरा तास रियाज करत होतो.

पु.ल. : रियाज करताना रागांचा रियाज कसा करायचात?

भीमसेन : एक राग घेऊन, त्यातलं जे आपल्याला येत नाही ते गायचं.

पु.ल. : मला तुम्ही सांगा की, तान वगैरे घेताना तुम्ही हे लिहून करता की नोटेशन घेऊन त्या नोटेशनच्या अंदाजानं तान घेता?

भीमसेन : नोटेशन्स असतात, पण ती मनात.

पु.ल. : ते मनातलं नोटेशन वेगळं.

भीमसेन : एक राग घेऊन, त्याची प्रॅक्टिस करायची. काही कलावंतांचा रियाज म्हणजे हाच असतो. हल्ली रियाज आणि बैठकीचं गाणं एकच झालंय.

पु.ल. : 'घराणं' या विषयावर तुमचं काय मत आहे?

भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे.

पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं वाटतं, की तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत जी रचना तुम्ही केलीत, त्याच्यामध्ये नावीन्य आहे. जुन्या घोड्याला शिंगं काढून म्हणायचं, की मी नवा घोडा काढला, असं ते नावीन्य नाही.

भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून, म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करत करत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो, कोणी मोठा असतो, पण असं केल्याशिवाय स्वतंत्र गायक होऊ शकत नाही.

पु.ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?

भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?

पु.ल. : पुण्याला.

भीमसेन : अरे, तुमच्याच घरामध्ये गायला बसलो होतो. तुम्ही आणि ते गोडबोले होते.

पु.ल. : हो, आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमधली बैठक सुरू केलीत, त्या वेळेला लोकांपुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे, याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये काही अदलबदल केलेत का?

भीमसेन : नाही. असं काही नाही. बदल वगैरे काही विशेष केलेले नाहीत मी. जे तेव्हा गात होतो, ते अजूनही गात आहे. मुख्य एवढंच की, त्याला वेळेचं बंधन वगैरे पाळतो. उगीच आपलं आपल्याला येतंय म्हणून तास-सव्वातास गायचं, ही फॅशनच होऊन गेलीय. लोक म्हणतात, अरे हा राग यांनी तासभर पिसला. आता ते पिसणं नकोच.

पु.ल. : तुमच्या असंख्य मैफली नाना तऱ्हेच्या श्रोत्यांसमोर झाल्या, पण भीमसेन, मला असं वाटत की, तुम्ही इकडले असे पहिले गवई होता की, ज्यांनी बंगालमध्ये श्रोता मिळवला.

भीमसेन : एकदम असं शास्त्र वगैरे त्यांना कळत नाही, पण ते जे कान आहेत, ते सुरेल गाणं ऐकणाऱ्यांचे आहेत, आणि कलावंताला ते देव मानतात.

पु.ल. : सुराला स्वभाव अथवा भावना नसतात. त्याला आर्तता असते. तुमच्या गाण्यात जी आर्तता आहे, ती जास्तीत जास्त प्रतीने तुमच्या गाण्यात आहे.

भीमसेन : आणि पहिल्यापासून माझा स्वभाव आहे, की मी कुठल्याही तऱ्हेचं गाणं कमी प्रतीचं मानत नाही. ठुमरी असो, गझल असो किंवा भजन असो, सूर पक्का पाहिजे.

( परचुरे प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या 'सुजनहो!' या पुस्तकातून साभार.)

हि मुलाखत आपण इथे ऎकु शकता --> भिमसेन जोशी आणि पु.ल.

2 प्रतिक्रिया:

Unsui said...

खुप खुप आभार !! संग्राह्य मुलाखत

myoutdoors said...

टंकलेखनातील काही चुका वगळता बाकी अतिशय उत्तम. एवढे मोठे भाषण व ह्यासारखीच इतर अनेक उत्तमोत्तम भाषणे आपण आमच्यासारख्या पु ल प्रेमींसाठी अतिशय कष्ट घेऊन उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.