Wednesday, September 3, 2025

भाई माझ्या सोयगावला आले तेव्हा.. (ना.धों. महानोर)

जून, २०००. मृग नक्षत्राचा पाऊस सुरू झाला होता. माझी पेरणी, झाडं लावणं चाललेलं होतं. १२ जूनला पु. ल. देशपांडे गेल्याची बातमी कळली. मी पेरणीची कामं थांबवली आणि त्या रात्रीच पुण्याला निघालो. दुसऱ्या दिवशी पुण्यात भाईंचं अंत्यदर्शन घेतलं. तिथे दिवसभर माणसांची प्रचंड गर्दी होती, पण सारं कसं शांत, नि:शब्द!

त्यानंतर तीन महिन्यांनी मी आणि माझी पत्नी पुन्हा सुनीताबाईंना भेटायला गेलो. आम्ही तिघांनीच दीड तास फक्त भाईंच्या, त्यांच्या मित्रांच्या आठवणी जागवल्या. सुनीताबाई भावविवश न होता कमालीच्या शांतपणे एकेक आठवण सांगत होत्या. “ऐंशी वर्षांचं आयुष्य भाईला मिळालं. त्याने त्याला आवडतील त्या त्या गोष्टी मनापासून केल्या. त्याच्याकडून इतकं काम कसं झालं याचं आज नवल वाटतं. त्याला सहज सुचत असे, आणि तो लिहीत जाई. रसिकांनी त्याच्या सगळ्याच कलाकृतींना मनापासून दाद दिली. त्यामुळे तो खूपच आनंदाने भरभरून जगला. त्याचा विनोद कोणाला बोचणारा नव्हता, उलट प्रसन्न करणारा होता. प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे, अशा हेतूने तो लहान मुलासारखं सगळं धुंडाळत गेला. भाषणाला उभा राहिला म्हणजे त्याला आपोआप सुचत असे. लोकांशी सहज गप्पा माराव्या असं त्याचं भाषण असायचं. लोकांच्या मनातलं तो बोलायचा. भाईच्या मनात कुणाविषयीही कटुता नव्हती. त्याच्या सगळ्याच गोष्टींमध्ये मी त्याला साथ दिली. आपल्याकडचं सगळं वाटून देऊन तो गेला. शेवटी शेवटी त्याला असह्य त्रास व्हायचा. हयात नसलेल्या जिव्हाळ्याच्या मित्रांच्या आठवणी काढून तो उदास व्हायचा. पण तो खूप तृप्त मनाने, आनंदाने लोकांमध्ये राहिला. यापेक्षा चांगलं काय असू शकतं? हजारो लोकांशी पत्रव्यवहार असायचा त्याचा. मी तेच आता जुळवत बसले आहे. त्याच्यावर लोकांचं प्रेम होतंच, पण इतकं असेल असं वाटलं नव्हतं. या तीन महिन्यांत ते मी पाहते आहे. अजूनही भाई घरभर असतो...” सुनीताबाई सांगत होत्या.

माझ्या पत्नीचे अश्रू थांबत नव्हते. मी माझ्या आणि भाईंच्या एकमेकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याबद्दल विचार करत राहिलो. मला प्रश्न पडला होता : आम्ही कोण-कुठले, इतके कसे एकमेकांशी बांधले गेलो? आमच्या अशा नात्याविषयी ज्यांना माहीत होतं त्यांनी मी त्याबद्दलच्या थोड्या तरी आठवणी लिहून काढाव्यात असा तगादा लावला होता. ‘अनेक आठवणी आहेत, तरीही मला लिहायला अवघड वाटतं,' असं मी म्हणायचो. पण सुनीताबाईही म्हणाल्या, “लिहिता आलं तर लिहा, वेगळं होईल.” त्यांच्या घरून निघताना मी ठरवलं, थोडं का होईना, लिहून काढू. औरंगाबादला परत गेल्यानंतर माझा मित्र चंद्रकांत पाटील याच्याशी बोलत होतो. आम्ही सुनीताबाईंना भेटून आल्याचं त्याला माहीत होतं. त्याबद्दल मी काही बोलण्याआधीच तो म्हणाला, “नामदेव, पुलंच्या सहवासातल्या आठवणी लिही. तुझा नेहमीचा आळशीपणा सोडलास तर एका आठवड्यात ते लिहून पूर्ण होऊ शकेल.”

मग मी लिहिण्याचं मनावर घेतलंच.

पु. ल. देशपांडे यांचं नाव साहित्य, कला, नाटक, चित्रपट, गीत, संगीत अशा अनेक क्षेत्रांत सर्वदूर थेट पोहोचलेलं होतं अशा काळात मी एका खेड्यातल्या माध्यमिक शाळेत शिकत होतो. आमचे शिक्षक साहित्यप्रेमी असल्याने आम्हाला अवांतर वाचनासाठी पुस्तकं वाचायला मिळत. त्यातच कधी तरी पु. ल. देशपांडे यांची अगदी नवीन पुस्तकंही झपाटून वाचली. ‘गुळाचा गणपती', ‘देवबाप्पा' यांसारख्या चित्रपटांतली गाणी तोंडपाठ झाली होती. त्यांनी संगीतबद्ध केलेली आणखीही किती तरी गाणी ऐकलेली होती. शाळेतल्या उत्सवात ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात' हे गाणं हमखास सामूहिकच म्हटलं जात असे. पुस्तकातील त्यांचे धडे शिकवताना शिक्षकांची व शिकताना आमची हसून हसून मुरकुंडी वळायची. असा छान काळ होता तो. त्या काळात पु. ल. देशपांडे यांचं नाव मनावर घट्ट कोरलं गेलं.

मात्र पु. ल. देशपांडेंशी आपली भेट होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. ती भेट घडली माझ्या कवितेमुळे. मला कवितांचा छंद कसा जडला हे सांगणं आजही कठीणच आहे; परंतु काहीच आगापीछा नसताना कवितेने मला वेढून टाकलं होतं हे खरंच. १९६०च्या दशकात वेगवेगळ्या नियतकालिकांमधून माझ्या कविता छापून यायला लागल्या होत्या. (बऱ्याचदा त्या ‘साभार परत' देखील यायच्या.) १९६४ सालच्या ‘मौज' दिवाळी अंकात ‘चार कविता रानातल्या' या शीर्षकाने माझ्या कविता प्रकाशित झाल्या. लगोलग दिवाळीतच मला एक पत्र आलं : ‘मौज' दिवाळीतल्या ‘चार कविता रानातल्या' वाचल्या, माझी दिवाळीच नाही, तर वर्ष साजरं झालं; कधी, कुठे भेटणार; काय करता; इत्यादी बरंच काही त्या पत्रात होतं. पत्र पार्ल्याहून आलेलं होतं आणि खाली नाव होतं- पु. ल. देशपांडे. केवळ कवितेमुळे हा पत्रव्यवहार झाला आणि ध्यानीमनी नसताना माझा भाईंशी परिचय झाला.

१९६५च्या डिसेंबर महिन्यात हैदराबादला अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं. प्रसिद्ध समीक्षक वा. ल. कुलकर्णी संमेलनाचे अध्यक्ष होते. मी आणि चंद्रकांत पाटील, आम्ही दोघांनी मिळून केवळ कवितेच्या निस्सीम प्रेमापोटी ‘पुन्हा कविता' या कवितासंग्रहाचं संपादन केलं होतं. प्रकाशक म्हणून आमचे मित्र रायभान यांचं नाव टाकलेलं होतं. पुस्तक वा. ल. कुलकर्णी यांना अर्पण केलेलं होतं. या कवितासंग्रहाची एक एक प्रत संमेलनाच्या ठिकाणी आलेल्या मान्यवरांना भेट द्यावी असं आमच्या मनात होतं. संमेलनाच्या उद्घाटनासाठी कामराज, यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी इत्यादी मोठी मंडळी आलेली होती. उद्घाटनाचा मुख्य समारंभ आटोपल्यावर त्यांच्या गाड्यांचा ताफा भर्रकन निघाला आणि गर्दी पांगली. चंद्रकांत व मी मिळून नरहर कुरुंदकरांना भेटलो. आमच्याजवळ ‘पुन्हा कविता'चा मोठा गठ्ठा होता. कुरुंदकर म्हणाले, “आधी त्यांना द्या.” त्यांनी ज्या दिशेला बोट दाखवलं तिथे एक लांबसडक मोठी मोटारगाडी उभी होती; मोटारीजवळ पाच-दहाजण बोलत उभे होते. ती मोटारगाडी पु. ल. देशपांडेंची होती. कुरुंदकरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पु. ल. देशपांडे यांना पुस्तक दिलं. त्यांच्याशी प्रथमच प्रत्यक्ष भेट झाली होती. चंद्रकांत, मी, आमचे आणखी दोन मित्र रवींद्र सुर्वे, बाळ कवठेकर असे जरा संकोचूनच उभे होतो. पु.ल.नी आनंदाने माझ्या खांद्यावर हात टाकला. त्यांनी अगदी अगत्याने ‘पुन्हा कविता' चाळलं आणि म्हणाले, “पाडगावकर, करंदीकर, बापट यांच्यानंतरच्या अतिशय ग्रेट कविता लिहिणाऱ्या कवींचे कवितासंग्रह यावेत असं मला खूप दिवसांपासून वाटत आहे. ‘साहित्य', ‘छंद', ‘अभिरुची', ‘सत्यकथा', ‘प्रतिष्ठान' यांमधून एकेक कवी काय छान लिहितो आहे! तुम्ही हे प्रातिनिधिक का होईना, ओळख करून देणारं पुस्तक केलं, म्हणून मनापासून धन्यवाद! आरती प्रभू, चित्रे, पुरुषोत्तम पाटील, भालचंद्र नेमाडे, म. म. देशपांडे, मधुकर केचे, नारायण सुर्वे, तुळशीराम काजे, ग्रेस, अरुण कोलटकर, आनंद यादव, वि. ज. बोरकर, आ. ना. पेडणेकर असे पस्तीस तरणेबांड कवी म्हणजे काय बहार आहे!” गेल्या वर्षी कोणकोणत्या दिवाळी अंकांत या नव्या कवींच्या मराठी कविता वाचल्या हे देखील त्यांनी सांगितलं. ते ऐकल्यावर आम्ही चाटच पडलो. पु.ल. कवितेचे इतके चाहते असतील याची आम्हाला जराही कल्पना नव्हती. त्यांनी आमच्या कवितासंग्रहाच्या आणखी दोन प्रती आवर्जून मागून घेतल्या; ‘लिहीत रहा' म्हणाले. तिथे आचार्य प्रल्हाद केशव अत्रेही होते. त्यांनी ‘पुन्हा कविता'ची प्रत चाळली आणि ते म्हणाले : “अरे बाप रे! इथे पुन्हा कवी, इतके कवी... कठीण आहे.” जयवंत दळवी व ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनाही आम्ही एक एक प्रत दिली. (दोघांनी ‘ललित'मध्ये व एका इंग्रजी नियतकालिकात त्यावर जोरदार लिहिलं.)

१९६७ साली ‘रानातल्या कविता' हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. महाराष्ट्रभर त्याचं उत्तम स्वागत झालं. शासनाचे व इतर अनेक पुरस्कार त्याला लाभले. त्या कवितांशी मराठी रसिकांचं निस्सीम प्रेमाचं नातं जुळलं. भाई कुठल्याकुठल्या भाषणांमध्ये त्या कवितांचा उल्लेख करत असत. भाईंचा आणि माझा पत्रव्यवहार वाढत होता. सुनीताबाईही अनेकदा पत्रं लिहीत. माझ्या कवितेबरोबरच माझं खेडं, कुटुंब, जगणं, शेतीवाडी, सगळं काही दोघांनी आपलं मानलं होतं. त्यांचं पत्र यायचं-‘पळसखेडला यायचं मनात आहे.' त्यावेळी पळसखेड म्हणजे जेमतेम दोनशे उंबऱ्याचं, हजार लोकवस्तीचं लहानसं खेडं होतं. तिथे या दोघांना कसं काय बोलावणार, असा मला प्रश्न पडायचा. गावात साहित्यपूरक वातावरण तर दूर, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणंही अवघड होतं. मी माझ्या शेतातल्या लहानशा झोपडीत राहायचो. घरात किंवा गावात दैनंदिन मूलभूत सोयीही नव्हत्या. त्यामुळे अनेक दिवस मी हा विषय टाळतच होतो.

मात्र १९७४च्या आसपास एकदा भाईंचं पत्र आलं- ‘बाबा आमट्यांच्या आनंदवनाला भेट देऊन परत येताना आम्ही जळगावी उतरून तुमच्या घरी तुमच्या शेतावर दोन-तीन दिवस थांबणार आहोत. यात बदल नाही. सोबत कविवर्य बोरकर, त्यांची मुलगी, तुमचे-आमचे शेतकरी मित्र बापू कांचन व गोविंदराव तळवलकर, मधू गानू, सुनीता असे सर्वजण आहोत. मजा येईल.'

पत्र वाचून मला खूप आनंद झाला. पण गावात या सर्वांचा पाहुणचार कसा करायचा या विचाराने घामही फुटला. जळगावहून माझे मित्र डॉ. राम आणि डॉ. उषाताई आपटे सर्वांना घेऊन पळसखेडला आले. एकूण तीन-चार मोटारगाड्या होत्या. पण गावात आल्यावर एकाच गाडीभोवती मुलांची, लोकांची गर्दी झाली. भाई प्रसन्नपणाने हसत बाहेर आले. मी म्हणालो, “भाई, यांना पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल अजिबातच माहिती नाही. सुनीताबाई गाडी चालवत आल्या हे त्यांना फारच नवलाईचं वाटतंय, इतकं हे खेडं आहे.” ते ऐकून सुनीताबाई छान हसल्या. भाईंनी आम्हाला चक्क टाळी वगैरे दिली. त्यांच्या मनमोकळ्या वागण्याने आम्हालाही जरा हलकं वाटलं. माझ्या घराच्या ओट्यावर लाल पागोटं व रुमाल बांधलेले, धोतर नेसलेले माझे वडील उभे होते. कपाळावर लालजर्द कुंकू लावलेली आईही होती. सोबत माझी पत्नी, भाऊ, सगळं घरच स्वागताला उभं होतं. भाईंनी बाबांना, आईला नमस्कार केला. माझ्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी तरळलं. भाईंचे डोळेही आनंदाने भरून आले होते.

घरात ऐसपैस मनमोकळं बसल्यावर भाईंची मैफल सुरू व्हायला वेळ लागला नाही. त्यांनी त्यांच्या बरोबरच्या सगळ्यांची ओळख करून दिली. कोकणात म्हणजे बोरकरांच्या प्रदेशात खेडंही रम्य व सुंदर असतं. आता सगळे माझ्या दुष्काळी, उद्ध्वस्त चेहऱ्याच्या लहानग्या खेड्यात आले होते. बापू कांचन यांनी त्यांच्या द्राक्षांच्या बागेतली चविष्ट द्राक्षं भेट दिली. माझे वडील लिहिता-वाचता न येणारे; बापू थोडीफार शाळा शिकलेले. पण शेती या आवडत्या विषयामुळे दोघांची बघता बघता गट्टी जमली. दोघं शेतीच्या, इकडच्या तिकडच्या पिकांच्या, विहीरपाण्याच्या, शेतीच्या परिवर्तनाच्या गप्पा मारत होते. भाई म्हणाले, “अहो, आम्हाला यातलं काहीच कळत नसलं तरी मोठ्यांदा बोला. काही शिकता आलं नाही, तरी तुमचं बोलणं समजेल तरी. सगळ्या क्षेत्रातलं चांगलं ते समजून घेतलंच पाहिजे.” आणि मग बापू, माझे वडील आणि अधूनमधून मी अशा आमच्या तिघांच्या शेतीवरच्या गप्पा भाई व इतर तासभर मनसोक्त ऐकत बसले. गोविंदरावांनाही खूप काही नवीन ऐकायला मिळालं. किती तरी विषय... कविता, गाणं, शेती, खेडी... बाबा आमट्यांच्या आनंदवनाबद्दलच्या चर्चाही होत्याच. त्या महामानवाबद्दल भाई भरभरून बोलत होते. सगळे अस्वस्थ होऊन ऐकत होते. मध्येच सुनीताबाई एखादी पूरक आठवण सांगायच्या. जेवणाची वेळ टळून गेली तरी ही गप्पांची मैफल सुरूच होती.

जेवणानंतर सर्वांनी मिळून गावात फेरफटका मारला. गावातली बहुतांश घरं मोडकळीस आलेली; लोकांच्या पेहरावावरून, चेहऱ्यावरून कळून येणारं दारिद्य्र; गावात केवळ चौथीपर्यंतची शाळा; बहुतेक गावकरी अशिक्षित; हे सगळं पाहून भाई अस्वस्थ झाले. त्यांना प्रश्न पडला- अशा ठिकाणी हा कवी? याच्या कवितेत दिसलेला सुंदर व रम्य निसर्ग, शेती, पक्षी... कशाचाच गावात पत्ता नाही. सगळंच विपरीत, ओकं ओकं.

संध्याकाळी पाच वाजता आम्ही माझ्या बरड टेकडीवरच्या शेतावर पोहोचलो. लदबदल्या झऱ्यातून आम्ही पुढे गेलो. विहिरीचं पाणी दंडाने झुळझुळ वाहत होतं. केळीच्या प्रत्यक्ष वाफ्यात साचलेलं पाणी शुभ्र लहान तळ्यासारखं दिसत होतं. त्यात कमलिनी केळीचं सुंदर प्रतिबिंब पडलेलं होतं. भाई, बोरकर, गोविंदराव, सुनीताबाई, बापू सारी मंडळी आत केळीच्या बागेत हरवली. भाईंचं गाणं सुरू झालं-‘केळीचे सुकले बाग, असून निगराणी...' सगळ्यांनी ताल धरला. केळीचे भरघोस घड, वाहतं पाणी, हिरवी नीरव शांतता, पलीकडे गव्हाचं कापणीला आलेलं पिवळं जर्द पीक, ज्वारीचा खोडवा, त्याला मोठ्ठाली कणसं... हजार-दोन हजार पक्षी, राघूंचा थवा हे सर्व पाहून सगळेच पळसखेड गावाचं उद्ध्वस्तपण विसरले. भाईंनी ‘पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे...' सुरू केलं. पिकांसकट पाखरांनीही ताल धरला. बोरकरांनी पायांचा ठेका धरला. पायांखाली दगड-धोंडे होते, आसपास वैराण टेकड्या होत्या, पण त्यात आता स्वर्ग उभा राहिला होता. भाई, गोविंदराव बोलत राहिले. जळगाव, औरंगाबाद, अन्वीहून आमचे शेतकरी मित्र आले होते. कमी खर्चात, कमी पाण्यात आलेल्या या सुंदर पिकांचं गणित; नफा-तोटा, शेतीसाठी लागणारे परिश्रम, नवीन तंत्रज्ञान, नवी वाणं यासंबंधी कुमार अन्वीकर व मी सांगितलं. भाईंनी, गोविंदरावांनी अनेक प्रश्न विचारले व माहिती घेतली. भाईंना खूप जिज्ञासा होती; सगळं समजून घ्यायचं होतं. चार तास फक्त शेती व शेतीसंबंधीच गप्पा सुरू होत्या. जळगावचा आमचा एक मित्र म्हणाला, “भाई, इतकं शेतीचं तुम्ही कशासाठी चालवलंय?” त्यावर ते म्हणाले, “अहो, हा कृषिसंस्कृतीचा देश आहे हे आपण विसरता. त्यातली थोडी तरी अक्कल आपण उसनी का होईना, घेतली पाहिजे. शिवाय, बापू कांचन, कवी महानोर हे आमचे खास मित्र आधी शेतकरी आहेत ते काही उगाच नाही.”

अशाच गप्पांमध्ये रात्रीचे नऊ वाजले. ती माघ पौर्णिमा होती. भाई म्हणाले, “आता घरी नाही जायचं. इथल्या मोसंबीतल्या बागेत, तिथल्या झोपडीत आपण थोडा वेळ गप्पा मारू. माझ्या डोळ्यांसमोरून ती सोन्यासारखी फळांनी लगडलेली, बहरलेली बाग जात नाही. कवीइतकाच तिनेही मला लळा लावला आहे.”

औरंगाबाद, जळगावहून आलेले आमचे मित्र परत गेले. बागेत भाई, सुनीताबाई, गोविंदराव, बापू, बोरकर, त्यांची मुलगी वज्रप, डॉ. राम आपटे, रामराव, भय्या, दादा नेवे आणि आम्ही पाच-सात घरातले- एवढी मंडळी होती. रात्रीचा शांत परिसर. सहा एकरांची मोसंबीची बाग. पौर्णिमेचं स्वच्छ चांदणं. भाईंना ना. घ. देशपांड्यांच्या ‘शीळ'मधल्या ‘नदीकिनारी'ची आठवण आली. त्यांनी त्यांच्या खास पद्धतीने ती कविता म्हणायला सुरुवात केली. ते मध्येच अडले तेव्हा सुनीताबाईंनी पुढील ओळी सांगितल्या. नंतर मी. असं सगळ्यांनी मिळून त्या कवितेचं समूहगान करून टाकलं.

लगेच भाईंना लोवलेकरांची कविता आठवली-

चोरल काढ...पाऊल वाट
हळूहळू जाईल श्यामाराणी
घाटावर आणाया पाणी
हरळी दाट
मऊ सपाट
पुन्हा अभिरुचीतली,
रेखीव अंगलटीवर साडी
स्वच्छंदी
खडी शुभ्र पांढरी
कृष्ण किनारी मोर
पारधिणीची फंद फितुरी
विलोल नयनी भोर
डोंगर कठड्यांमधून जाते
तरणीताठी पोर.

डॉ. आपटे व मी गमतीने सुनीताबाईंना म्हणालो, “बघा, भाई कुठे निघून गेले! या रानात ते फार बहकले!” त्यावर त्या म्हणाल्या, “अहो, भाईंचं ते खास बहकणंच तर माझ्या आयुष्यातली मजा आहे! भाई असा कधीतरीच छान खुलतो. आता त्याला वाटतं, त्याच्यासमोर हजार लोक आहेत.”

मग मी व सुनीताबाईंनी त्या मोसंबीच्या बागेला अनेक कवींच्या कविता ऐकवल्या. बागेतली हजारभर झाडं छान ऐकत होती, डोलत होती. बोरकरांनीही खूप कविता ऐकवल्या. मध्येच उठून ते मनसोक्त गात नाचू लागले. भाईंनी अंगावरची शाल फेकून दिली व ते त्यांना ताल देत कुर्निसात करायला उभे राहिले.

भाई खुलून गेले होते. लांबच लांब झाडांच्या रांगा पाहताना ते आणखीनच आनंदी दिसत होते. मी त्यांच्याशी बोलत होतो. बोरकर म्हणाले, “आम्हाला तरी कळू द्या... फक्त दोघांमध्येच चाललंय.” त्यावर भाई म्हणाले, “एक हजार झाडांची मोसंबीची बाग. पंधरा-पंधरा फुटांवरची चौरस झाडं. माघ पौर्णिमा. टिपूर चांदणं झाडांवरून उतरलेलं. प्रत्येक झाडाखाली झाडा-झाडांच्या सावल्या, गर्द काळपट. चार झाडांच्या मध्ये उतरलेलं चांदण्याचं झाड- प्रत्येक चौरसात. हे चांदण्याचं झाड हलताना, वाऱ्याने नाचताना, तुमच्या कविता ऐकताना दिसतंय. ते खरं झाड नाहीच. त्याचं नृत्य बदलत्या कवितेवर, वाऱ्यावर वेगवेगळं आहे. जरा डोळे बारीक, किलकिले करून बघा. अख्खी एक हजार झाडं, झाडं नसलेली चांदण्याची झाडं हलताहेत, तुमच्यासोबत ताल धरताहेत. महानोर म्हणताहेत, मी लहान कवी. हे खूप सुंदर असं चित्र मला टिपताच आलं नाही कवितेत. बोरकरांना सांगा...ते कधी तरी लिहितीलही...” सगळ्यांनी तशा डोळ्यांनी चांदण्यांची बाग पाहिली. सगळेच चकित झाले, वेडे झाले. इतका सुंदर, नि:शब्द निसर्ग त्यांनी कधी बघितलाच नसावा.

शेवटी सगळ्यांनी मिळून ‘सरीवर सरी' गायलं आणि मग जड पावलांनी सगळी मैफल तिथून उठली. फर्दापूरच्या अजिंठा रेस्ट हाऊसमध्ये सर्वांची रात्रीची सोय केलेली होती. तिथे आणखी पन्नास-साठ मित्रमंडळी वाट पाहत होती. रेस्ट हाऊसच्या सुंदर देखण्या परिसरात परत एकदा मैफल सुरू झाली तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते.

सकाळी सुनीताबाई व मी लवकर उठलो. रेस्ट हाऊससमोर झाडं होती. आम्ही दोघं तिथे गप्पा मारत बसलो. थोड्या वेळाने भाई विष्णुदासनाम्याचा अभंग गुणगुणत आले. समोर डोंगर, झाडी होती; दूरवर अजिंठा लेणी दिसत होती. भाई आणि सुनीताबाई खूप प्रसन्नपणाने सगळ्या परिसराकडे पाहत होते. मी म्हटलं, “भाई, आज आपण सोयगावला जाऊ या. तालुक्याचं गाव आहे. दहा हजार वस्तीचं. रात्री तिथले प्राध्यापक, विद्यार्थी आले होते. तिथे आम्ही नव्याने कॉलेज सुरू केलं आहे. तिथे भेट देऊ.” त्यावर भाई गडबडीने म्हणाले, “कवी, आम्ही जंगलात, रानात फिरू. कॉलेज, तिथे माझा परिचय, ते भाषण, इत्यादी अजिबात नको.” सुनीताबाईंनीही पक्का विरोध दर्शवला.

त्यावर मी त्यांना सोयगावची आणखी माहिती दिली- “भाई, सोयगाव हे तीन हजार लोकवस्तीचं खेडं होतं त्याआधीपासून त्या गावात नाट्यवेडे रसिक, कलावंत होते. मुंबई-पुण्याप्रमाणे इथल्या रंगभूमीवर साठ-सत्तर वर्षं ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, सामाजिक आणि विशेषत: संगीत नाटकं चालली. गावातल्या ‘श्रीराम नाटक मंडळा'ची स्थापना १९०५ सालातली आहे. गावाने स्वत:चं प्रचंड मोठं नाट्यगृह बांधून काढलं. लोटू भाऊ पाटील नावाच्या रसिक माणसाने, कलावंताने नाटकांसाठी लागणारे पडदे-पेटी-तबला, इतर आवश्यक गोष्टी स्वत: विकत घेतल्या. त्याच नाट्यगृहात जयराम शिलेदार व जयमाला शिलेदार यांचं लग्न लागलं. तिथल्या रंगमंचावर नटवर्य नानासाहेब फाटक, भालचंद्र पेंढारकर, मा. भार्गवराम, मा. दामले, मा.दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव अग्रवाल, दामूअण्णा मालवणकर, वसंत शिंदे, दाजी भाटवडेकर, रघुनाथराव शितूत, बाळ कोल्हटकर, राम जोशी, जयराम शिलेदार, विमलबाई कर्नाटकी, किशोरी पाठक, शांताबाई फाटक, शंकरराव जोशी, प्रकाश घांग्रेकर, नटवर्य नानासाहेब चाफेकर, चंद्रकांत गोखले, रा. वि. राणे अशा बऱ्याच दिग्गजांनी हजेरी लावली, नाटकं सादर केली. काही जुन्या गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार लोटू भाऊ पाटील यांनी या आघाडीच्या नाट्यकर्मींबरोबर भूमिका केल्या होत्या.”

हे समजल्यावर मात्र भाईंना उत्सुकता वाटली. त्यांनी आणखीही काही माहिती विचारली. आणि मग त्यांनी आणि सुनीताबाईंनी आपला विचार बदलून सोयगावला येण्याचं नक्की केलं.

मी सोयगावला एक दिवस आधीच भाई आणि सुनीताबाई येणार असल्याचं कळवलेलं होतं. त्यांच्या स्वागतासाठी निदान एक हार, फोटोग्राफर तरी तयार ठेवा अशी कॉलेजला विनंती केली होती. पण आम्ही तिथे पोचलो तर तशी काहीही तयारी तिथे दिसली नाही. कॉलेजच्या प्राचार्यांनी त्यामागचं कारणही सांगितलं. तो परिसर शिक्षणापासून खूप लांब होता. तीन-चार वर्षांपासून प्राचार्य आणि त्यांचे सहकारी कॉलेजसाठी विद्यार्थी जमवण्याचा आटापिटा करत होते. गावागावांतून ज्वारी, बाजरी, मीठ, मिरची, पैसा जमा करून, खेड्यांतल्या मुलांच्या जेवणाची सोय करायची आणि मग त्यांना कॉलेजच्या वर्गांत बसवायचं, असे त्यांचे प्रयत्न चालू होते. अशा परिस्थितीत कुणी साहित्यिक गावात आला तरी त्यांची सरबराई करणं त्यांच्या आवाक्यातलं नव्हतं. आणखी पाच-एक वर्षं तरी ही परिस्थिती अशीच राहणार, अशीही खंत त्या प्राचार्यांनी बोलून दाखवली.

औरंगाबादहून आमच्या शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव काळे आले होते. भाईंच्या स्वागताची काहीही तयारी नसल्याचं पाहून ते भयंकर संतापले आणि म्हणाले, “लाख रुपये देऊनही न येणारा लाखमोलाचा माणूस आपल्या गावात भेट द्यायला आलाय हे कळत कसं नाही?” मात्र कॉलेजकडे त्याचं उत्तर नव्हतं. बाबुरावांनीच धावपळ करून, जवळच्या शेंदुर्णी गावात जाऊन हार वगैरे आणले. त्यांचा रागरंग पाहून मी भाईंना व इतरांना नाट्यगृहाकडे घेऊन गेलो. तिथे त्या काळातले रंगभूमीचे पडदे, इतर साहित्य, वाद्यसंगीतासाठीचा सगळा साज, त्या काळातल्या नाटकांच्या जाहिराती, तिकीट सगळं पाहुण्यांना दाखवलं. जुन्या काही लोकांनी थोडी माहिती दिली. नाट्यगृह पाहून भाई थक्क झाले आणि म्हणाले, “हे नाट्यगृह अतिशय देखणं आहे. पक्कं बांधलेलं. इतकं सुंदर नाट्यगृह मी खेड्यात कुठेही पाहिलेलं नाही. फक्त मुंबई-पुण्यात. ग्रीक रंगमंचासारखं आहे हे. त्याची बांधणी, गॅलरी इत्यादी सगळं काही छानच आहे.” त्या नाट्यगृहाच्या रंगमंचावर ते खूप वेळ नुसते उभे राहिले. सगळ्या नाट्यकृतींचा, कलावंतांचा झंकार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ते भलतेच प्रसन्न, खुषीत आलेले दिसले. कमलाकर सोनटक्के, नारायणराव काळे, सोपानमामा बोर्डे, विष्णू काळे, नाईक गुरुजी, आणखी नवे-जुने बरेच लोक जमले होते. भाई बोलत होते, सगळे ऐकत होते. भाईंनी नंतर त्यांच्या नाट्यपरंपरांच्या कथा-कहाण्या ऐकवल्या. आम्ही सगळे ऐकत राहिलो. एवढा मोठा कलावंत त्या नाट्यगृहाला, रंगमंचाला हात लावून नमस्कार करता झाला, तेव्हा सगळेच पाहत राहिले. सोयगावची नाट्यपरंपरा भाईंच्या भेटीने, बोलण्याने पुण्यवंत झाली.

भाईंच्या स्वागताचा छोटासा का होईना कार्यक्रम करण्याची सर्वांचीच इच्छा होती. मग गावातल्या शाळेच्या प्रांगणात खुर्च्या मांडल्या गेल्या. बाबुराव काळे, भाई, बोरकर त्या खुर्च्यांवर बसले. मी महत्प्रयासाने सुनीताबाईंनाही व्यासपीठावर आणून बसवलं. (त्या व्यासपीठावर येणं टाळायच्या.) समोर तरुण प्राध्यापकवर्ग, गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनी, गावातले थोडेफार लोक बसलेले होते. उपलब्ध असलेला एकमेव हार मी बाईंना घातला. दोन शाली आणलेल्या होत्या, त्या बोरकर व भाईंना दिल्या.

बाबुरावांनी गावातल्या कॉलेजची गोष्ट मोकळेपणाने सांगितली. मग भाई बोलायला उठले. आम्ही केलेलं तुटकंफुटकं स्वागत विसरून ते खूप वेळ मनसोक्त आणि दिलखुलासपणे बोलत राहिले. “माझ्या व सुनीताच्या रजिस्टर म्हणवल्या जाणाऱ्या विवाहाच्या वेळी हारसुद्धा नव्हता, इतकं ते आमच्या पद्धतीने झालं. आज एका फुलांच्या हाराने कवीने आम्हाला बांधलं. फार तर लग्न लावलं म्हणा! केवळ आमच्या कवीमुळेच आम्ही हे ऐकून घेतलं, स्वीकारलं. हे नाट्यतीर्थ, याच्या भेटीने मी पावन झालो. इथल्या मोठ्या ऐतिहासिक घटनांचे तुम्ही धनी आहात हे तुम्ही विसरू नका. नाट्यपरंपरेच्या इतिहासात हे का म्हणून येत नाही? आमच्या मुंबई-पुण्याचं सुतळीभर असलं तरी भलं मोठं होऊन येत असतं. रसिकहो, शरीराला स्नान घालतं ते पाणी व मनाला स्नान घालतं ते तीर्थ. मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, बाबा आमटे अशी माझी तीर्थक्षेत्रं आहेत. आज मी ज्या बाबा आमटे यांच्या तीर्थक्षेत्रावरून आलो त्यांच्या मुक्तांगणातलं थोडं सांगतो... (मुक्तांगण म्हणजे भाईंनी आर्थिक मदत दिली त्यातून सुरू केलेले विविध प्रकल्प आहेत.). ही खेडी, इथली माणसं, दु:ख-दारिद्य्र मला ओरबाडून टाकतं. हे गुणी विद्यार्थी, प्राध्यापक कसं काय काम करतात मला कळत नाही. या खऱ्याखुऱ्या आडवळणांच्या गावी काम करणाऱ्यांसंबंधी मला दाटून येतं. इथे महाराष्ट्राची नाट्यपरंपरा वाढली, संपन्न झाली, इतका रसिकवर्ग खेडोपाडी होता, आहे. इथे जी नाटकं आणि कलावंत आले ते ऐकून मलाही आश्चर्य वाटलं. मला हे माहीत कसं नव्हतं?”

भाई जगभरच्या प्रश्नांवरही खूप बोलले. कविवर्य बोरकरांनी दोन-तीन कविता वाचल्या. निघताना सुनीताबाईंनी सगळ्या प्राध्यापकांची, विद्यार्थ्यांची ओळख करून घेतली. जर्जर अवस्थेतलं होस्टेल, तिथलं जेवण पाहिलं. मग त्यांनी एक चेक लिहून माझ्या हाती दिला आणि म्हणाल्या, “या होस्टेलच्या गरीब विद्यार्थ्यांना भाईंकडून खाऊसाठी थोडंफार दिलं आहे. नाही म्हणू नका.”

कोणतीही सोय नसलेलं ते शाळेचं प्रांगण, परिस्थितीशी झगडणारं कॉलेज, गावाचं नाट्यवेड सांभाळणारं नाट्यगृह, सर्वच भाईंच्या उपस्थितीने सुंदर होऊन गेल्याचं त्यादिवशी सोयगावने पाहिलं.


(समकालीन प्रकाशनाच्या 'पु. ल. आणि मी' या पुस्तकातून साभार.)

हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक : https://amzn.to/3tv6kEl
समकालीन प्रकाशनाचं हे आणि इतर कोणतंही पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 9922433606

Thursday, August 21, 2025

ध्वनीकर्णिका आणि सौजन्य

काही का असेना, लोकांच्यात सौजन्य हवे असे आमचेही मत आहे. मात्र दिल्लीच्या ध्वनिकर्णिकांना हवाई सुंदऱ्या सौजन्य शिकवणार आहेत हे ऐकून मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांनी पब्लिकला भरतनाट्यम शिकवायची तयारी दाखवली आहे असे ऐकतो, ते खरे आहे का?

हवाई सुंदरींनी ध्वनीकर्णिकांना (telephone operators) सौजन्य शिकवायला काही हरकत नाही. सौजन्य ही दुसऱ्यांनाच शिकवायची गोष्ट आहे. एकदा बसच्या सौजन्य सप्ताहात कंडक्टरने चढाऊ उतारुंना "भेंचूत, जरा जेंटलमन सारखं वागा. थोडा सौजन्यपणा दाखवलात तर काय मराल" अशा लाडिक शब्दात सौजन्य शिकवल्याचे मला स्मरते.

ह्या हवाई सुंदरींनी ध्वनीकर्णिकांना सौजन्य शिकवल्यावर त्यांचा आणि आम्हा इष्ट क्रमांक इच्छुकांचा सुखसंवाद किती गोड होईल. आम्ही 1-9-9 फिरवला आहे. पलीकडून एका ध्वनीकर्णिकेचा आवाज येतो आहे. "नमस्ते, आम्ही दिल्ली दूरध्वनी केंद्रावरून बोलत आहोत. मी आपली काय सेवा करू शकते?" हे ऐकून आपल्याला कुठला नंबर हवा आहे हे आपण विसरून जातो आहो. काही क्षण स्तब्धतेत गेल्यावर तीच तिकडून "अय्या, तुम्ही भारीच विसरभोळे दिसताय. तर मग नंबर आठवेपर्यंत थोडा वेळ ऐका वाद्यसंगीत." असे म्हणुन आपल्याला रविशंकरची किर्वाणी ऐकवत आहे.असो. पुढील कल्पना करायला घराघरांचे श्री समर्थ आहेत. आम्ही केवळ सौजन्यभयास्तव आमच्या कल्पनांना लगाम घालतो.

पु. ल. देशपांडे
पुस्तक - खिल्ली

Tuesday, June 24, 2025

कालोचित पुलं ! (अक्षय वाटवे)

पु. ल. देशपांडे यांचा १ २  जून हा स्मृतिदिन. त्यांना आपल्यातून जाऊन पंचवीस वर्षे उलटली आहेत, असे आजही वाटत नाही. त्यांचे साहित्य आजही कालोचित का वाटते, त्यांचे कथाकथन आजही 'व्ह्यूज' का मिळवते, याची ही कारणमीमांसा...

मराठी माणसाला दिलखुलास हसायला शिकवणारे, काळजाचा ठाव घेणाऱ्या संगीताच्या तालावर डोलायला लावणारे, दानाचे महत्त्व कृतीतून पटवून देणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. ‘कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचे हे सांगून जाईल,’ एवढ्या सोप्या भाषेत त्यांनी जगण्याचे मर्म उलगडून सांगितले.

असे बहुआयामी बहुरूपी पुलं देहरूपाने आपल्यातून जाऊन पंचवीस वर्षे लोटली. या एवढ्या काळात त्यांचे ना नवे लेखन प्रकाशित झाले; ना त्यांनी नवीन गाणे संगीतबद्ध केले; ना नाटक किंवा इतर काही. असे असले, तरी आजही सोशल मीडियावर सर्वत्र त्यांचा मुक्त संचार आहे. तरुण मंडळी त्यांची अवतरणे टी-शर्टवर मिरवत आहेत. त्यांचे चाहते ‘पु. ल. प्रेम’ नावाचा ब्लॉग चालवतात आणि त्याला लाखो व्ह्यूज मिळतात. त्यांच्या नावाने महोत्सव साजरे होतात. त्यांच्या विनोदला वंदन करून, मराठी स्टँडअप सादर केला जातो आहे. हे सगळे पुलंच्या पश्चात गेली पंचवीस वर्षे आव्यहत सुरू आहे. का? निव्वळ लोकप्रियता? नाही. निर्विष विनोदातून, मराठी माणसाच्या आयुष्यावर त्यांनी केलेल्या साखर पेरणीमुळे, सुरेल संगीतातून रोजच्या जगण्यावर त्यांनी घातलेल्या हलक्या फुंकरीमुळे (पाऊस सुरू झाल्यावर ‘नाच रे मोरा’ आठवतेच) आणि आपल्या जवळचे कोणी आपल्याशी खासगीत ऐसपैस गप्पा मारत आहे, अशा थाटात रसिकांवर प्रेम करून, त्याला सतत आनंदी राहण्याचा कानमंत्र दिल्यामुळे पुलंना ही अपार लोकप्रियता लाभली असावी. दिवसागाणिक ती वाढते आहे. हा आनंदाचा ठेवा मराठी माणसाच्या पुढच्या पिढीने खुशीने लुटावा, यासाठी अनेक मंडळी स्वयंप्रेरणेने उपक्रम राबवत आहेत. पुलं असताना आणि आज त्यांच्या मागेही त्यांच्या साहित्यावर टीका झाली नाही, असे नाही. दर काही वर्षांनी पु. ल. देशपांडे यांचे साहित्य कालबाह्य झाले, म्हणजे आधुनिक मराठीत सांगायचे तर ‘आउट डेटेड’ झाले अशी आवई उठते. त्यांनी अमुक का केले नाही किंवा तमुकच का केले, असे प्रश्न विचारण्याचा मोहही अनेकांना आवरत नाही. या सगळ्यांतून नक्की काय साध्य होते? पु. ल. देशपांडे यांचे लेखन हे ‘साहित्य’ या एवढ्या चौकटीत मर्यादित राहिलेले नाही, तर तो आता अभिजात मराठीचा एक अविभाज्य संस्कार बनला आहे.

हा कालबाह्यतेचा मुद्दा अधूनमधून वर येतो, त्याचा प्रमुख आधार म्हणजे पुलंच्या लेखनात येणारी चाळीची, गावाची वर्णने, किंवा तात्कालीन संदर्भ. त्यांच्या पात्रांची वेशभूषा, त्यांची जीवनपद्धती वगैरे घटक आज शिल्लक उरलेले नाहीत. केरसुणी, घडवंची, लुगडी, स्टोव्ह वगैरे शब्दप्रयोग आज वापरात नाहीत; कारण या वस्तूच आपल्या दैनंदिन जीवनातून नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे हे संदर्भ आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या गमतीजमतींची आजच्या पिढीला कदाचित सांगड घालता येणार नाही. हे मान्य केले, तरी त्या व्यक्तीचित्रणातील व्यक्तीरेखा, त्यांच्या स्वभावाचे कंगोरे, त्याला असलेली भावनिक किनार, त्यातला रसरशीत ताजेपणा हे सारे ठळकपणे समोर येतेच.

मराठी भाषेचा वापर व्यवहारापुरता आणि जेमतेम करणाऱ्यांना पुलंच काय, एकंदरीत मराठी भाषाही आउट डेटेड वाटू शकते. मात्र, प्रत्यक्षात पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यकृती दीपस्तंभाप्रमाणे किंवा नभांगणातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ दिशादर्शक आहेत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पुलं सर्वार्थाने ‘परफॉर्मर’ असल्यामुळे त्यांनी तत्कालीन बहुसंख्य मराठी माणसाच्या दैनंदिन जीवनात हक्काचे स्थान पटकावले होते. सुशिक्षित, मध्यमवर्गीय आणि अधिकतर शहरी मराठी माणसाचे जगणे पुलंनी आपल्या लेखनातून, नाटकातून, कथाकथनातून, एकपात्री प्रयोगांतून, चित्रपटांतून, दूरदर्शनवर सादर केलेल्या कार्यक्रमांमधून मांडले. त्यांनी निव्वळ हसवले नाही, तर या वाचक-प्रेक्षकाच्या अत्यंत समीप वर्तुळातील जिव्हाळ्याचे स्थान त्यांना मिळाले, म्हणून तर त्यांच्या निधनानंतर आपला माणूस गेल्याची भावना अनेकांच्या मनात दाटली.

त्यांच्या कथनशैलीत अभिनिवेश नव्हता, आक्रमकता नव्हती, कसलाही डांगोरा पिटलेला नव्हता. अगदी सहज; पण अत्यंत बारकाईने माणसाच्या वेषाची, स्वभावाच्या विविध पैलूंची, त्यांच्या जीवनातल्या व्यामिश्रतेची केलेली मिश्कील निरीक्षणे वाचकांना सापडली. त्या निरीक्षणातून एका आनंदयात्रीचा जीवनातली मज्जा उलगडवून दाखवणारा सोपा मार्ग सापडला. पुलंची अनेक वाक्ये आमच्या मागच्या पिढीत, आमच्या पिढीत आणि मधल्या पिढीतही रोजच्या बोलण्यात सहज येऊ लागली. बोलताबोलता टपल्या मारण्यासाठी आम्हाला नर्मविनोदाचा आदर्श पुलंनीच घालून दिला. बघण्याची दृष्टी तिरकस असेल; पण नजर बोचरी नव्हती. ज्या काळात स्टँड अप कॉमेडी नावाचा प्रकार महाराष्ट्राला माहीत नव्हता, त्या काळात पु. ल. देशपांडे या प्रकारातले ‘ग्रेट एंटरटेनर’ होते. ते कालातील असण्यासाठी ही एवढीच करणे नाहीत, तर त्यांचे विविध मार्गांनी मराठी साहित्य आणि समाजाच्या जडणघडणीमधे सहभागी असणेही तेवढेच महत्त्वाचे ठरते.

सामाजिक कार्यात, विविध साहित्य विषयक उपक्रमांत, रंगमंचावर, दूरदर्शनवर सर्व ठिकाणी अत्यंत जिव्हाळ्याने आणि आपुलकीने सहभागी व्हायचे. हे सर्व निगुतीने निभावताना आलेल्या प्रत्येक पत्राला जातीने उत्तर देणे, चाहत्यांशी, वाचकांशी अत्यंत सहृदयतेने संवाद साधणे अशा स्वभावविशेषामुळेही त्यांना रसिक वाचकांचे हृदय सिंहासन सहज प्राप्त झाले. हे करतानाच त्यांनी स्वतःतला चोखंदळ रसिक वाचक लोप पावू दिला नाही. अनेक लेखक, कलावंतांची त्यांनी पाठराखण केली. प्रोत्साहन दिले. त्यांच्याविषयी लेखन केले. हे सारे करताना त्यांनी कोणताही बडेजाव केला नाही. एका हाताने केलेले कार्य दुसऱ्या हाताला कळणार नाही, याची खबरदारी घेतलेली असायची. त्यामुळे त्यांचे साहित्य आणि त्यांचा सामाजिक जीवनातील वावर वेगळा काढता येणार नाही, असेही वाटते. त्यांचे संवेदनशील कलाकार असणे आणि सजग माणूसपणदेखील वेगळे काढता येत नाही.

एखाद्या लेखक कलावंताविषयी अशी संपूर्ण आश्वासकता वाटावी, असे दुसरे उदाहरण सापडणे दुर्मीळ आहे. पुलंवरच्या अफाट प्रेमातूनच मराठी माणूस त्यांच्या साहित्याच्या पालखीचा भोई झाला. ‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असामी’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’, ‘हसवणूक’, ‘गणगोत’ अशी सर्व प्रकाशित पुस्तके; शिवाय त्यांच्या भाषणांचा संग्रह, अनुवादित साहित्य, ध्वनीचित्रफिती वगैरे असा सगळा माणिकमोत्यांहून मूल्यवान ऐवज या प्रेमाच्या पालखीत मराठी रसिक वाचकाने सजवला. अभिजात मराठी भाषेच्या साहित्य-संस्कृती दिंडीत ही पालखी आजतागायत तो दिमाखात मिरवतो आहे; मिरवत राहील...

असा अंतर्बाह्य कला, साहित्य, संस्कृतीशी समर्पित असलेला आणि समाजाविषयी सदोदित जागरूक असणारा बहुरूपी बहुआयामी लेखक सहजासहजी विस्मरणात जाणे शक्य नाही. तसे झाल्यास तो मराठी भाषकांचा करंटेपणा किंवा दुर्दैव म्हणावे लागेल.

-अक्षय वाटवे
https://www.instagram.com/akshay_watve/
१ २ जून २ ० २ ५
महाराष्ट्र टाईम्स


Tuesday, May 27, 2025

लाईव्ह मुलाखतीत पंडित नेहरु चिडले होते, पुलंनी एक प्रश्न पाठवला आणि…

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. आपल्या कमालीच्या निरीक्षण शक्तीने आपली लेखन शैली त्यांनी निर्माण केली. त्यांचं लिखाण त्यांच्या तोंडून ऐकताना किंवा त्यांचं लिखाण वाचताना ते पात्र, तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहातो. पुलंच्या लिखाणाचं हे विशेष आहे. आपल्या लेखनशैलीवर लहानपणी ऐकलेल्या किर्तन शैलीचा प्रभाव आहे. मला किर्तनात जसं पाल्हाळ लावतात ते खूप भावलं. मुद्दा सोडून चाललोय असं वाटत असतानाच लगेच मुद्द्याकडे यायचं असं काहीसं मी माझ्या लिखाणाकडे पाहतो असं पुलंनी म्हटलं होतं. दूरदर्शनची नोकरी मात्र आपल्याला भावली नाही असं पुलंनी सांगितलं.

रेडिओ, टीव्ही या माध्यमांमध्ये पुलंनी काम केलं. मात्र तिथे मन रमलं नाही. कारण तिथे मनोरंजनापेक्षा लोकशिक्षणाचा भाग अधिक होता असं पु.ल. देशपांडे यांनी म्हटलं होतं. अशातच टीव्हीमध्ये काम करत असताना १४ नोव्हेंबरला पंडित नेहरुंना बोलवायचं ठरवलं. त्यांना बोलवलं ते आलेही.. मात्र लाईव्ह कार्यक्रमात ते चिडले. दिवशी काय घडलं होतं? हा किस्सा पु.ल. देशपांडे यांनीच सांगितला होता.

पंडित नेहरुंच्या त्या कार्यक्रमांची संकल्पना काय होती?
“आमच्या टेलिव्हिजन स्टुडिओत एक छोटा हॉल होता. त्यातच सगळे कार्यक्रम व्हायचे. पंडित नेहरुंची मुलाखत त्याच छोट्या हॉलमध्ये घ्यायची असं ठरलं होतं. आधी आम्ही असं ठरवलं होतं की पंडित नेहरुंचा लहान मुलांशी संवाद होईल. पंतप्रधान पंडित नेहरु येतील, ते टेलिव्हिजनच्या हॉलमध्ये बसतील. मुलं ही जणू काही संसदेचे सदस्य आहेत आणि त्यांना प्रश्न विचारत आहेत. त्याला पंडित नेहरु उत्तर देत आहेत. मी प्रश्नही निवडले होते. तुम्ही नेहमी लाल गुलाब का लावता? पिवळ्या गुलाबाने तुमचं काय घोडं मारलं आहे?, तुम्हाला घोड्यावर बसायला आवडतं मग भारतातल्या प्रत्येक शाळेत एक घोडा असला पाहिजे असा आदेश तुम्ही का काढत नाही? अशा प्रकारचे प्रश्न होते. मात्र आमच्या वरिष्ठांना ते काही पटलं नाही. मला त्यांनी सांगितलं सामान्य माणसांशी यांचा (पंडित नेहरु) संवाद ठेवा.” आता त्यावेळी सामान्य माणसं आणायची हे थोडंसं कठीण होतं. कारण आणलेले ते लोक काय बोलतील सांगता येत नव्हतं. त्यावेळी कार्यक्रम रेकॉर्ड करता येत नसे. जो कार्यक्रम होईल त्याचं थेट प्रक्षेपण (LIVE) असे. रेकॉर्डिंग मशीन आलंच नव्हतं. त्यामुळे लाईव्ह करताना काळजी घ्यावी लागत असे.”


सामान्य माणसं आणली त्यांच्या प्रश्नांमुळे वातावरण तापलं होतं-पुलं
“मी वरिष्ठांना सांगितलं की असं कॉमन लोकांना आणून बसवणं रिस्की आहे. पण त्यांनी सांगितलं नाही तुम्ही हे कराच. मग मलाही राग आला होता. मी गेलो आणि काही सामान्य माणसं खरंच आणून बसवली. त्यात एक रिक्षावाला होता, एक असा माणूस होता ज्याला पाहिल्याबरोबरच भीती वाटावी. असे लोक मी आणून बसवले आणि त्यांना प्रश्न विचारायचे आहेत हे कार्यक्रमाचं स्वरुप सांगितलं. ठरल्याप्रमाणे त्यादिवशी पंडित नेहरु आले. त्यांनी स्टुडिओत ही सगळी माणसं बसलेली पाहिली तेव्हा मला म्हणाले ये सभी उंची उमर के दिखायी दे रहें है… त्यावेळी मी त्यांना म्हटलं ये भी एक जमाने में बच्चे थे. You Are Very Clever Young Man असं पंडित नेहरु म्हणाले आणि चांगल्या मूडमध्ये मुलाखतीसाठी बसले. तिथे रिक्षावाल्याने त्यांना पहिलाच प्रश्न विचारला की पंडितजी हमारे स्लम जलानेवाले हैं और वहां इमारत खडी करने वाले हैं. पंडित नेहरुंना पहिलाच प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे जा. त्यावर रिक्षावाला म्हणाला वो लोग कह रहें है आपके पास जाओ, आप कह रहे हैं उनके पास जाओ. हमको सभी थप्पड लगाते है..मला मनात वाटलं झालं पंडित नेहरु आता चिडले. बरं हे सगळं लाईव्ह सुरु होतं प्रसारित होत होतं. हे सगळं कमी काय म्हणून त्यांना (पंडित नेहरु) यांना आणखी प्रश्न आला दिल्लीमें अठ्ठनी वाले स्कूल भी हैं और ५०० रुपयेवाले स्कूल भी है..हमारे बच्चे कितने दिन अठ्ठनी वाले स्कूलमें जायेंगे? या प्रश्नानंतर वातावरण तापू लागलं.

फ्लोअर मॅनेजरकडून पाठवलेली चिठ्ठी आणि..
त्यावेळी मी फ्लोअर मॅनेजरकडून त्यांच्यात एक वृद्ध गृहस्थ होते त्यांना चिठ्ठी पाठवली. त्या चिठ्ठीत प्रश्न लिहून पाठवला होता, ‘पंडितजी तुम्ही देशाची एवढी जबाबदारी घेता, इतकं काम करता तरीही तुमचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा फुललेला कसा राहतो?’ या प्रश्नानंतर पंडित नेहरु जरा शांत झाले. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी खूप छान दिलं होतं. पंडित नेहरु म्हणाले होते, मी पार्लमेंट पार्लमेंटमध्येच ठेवून येतो.. ते घरी आणत नाही. सकाळी बागेतून फिरून येतो. लहान मुलांबरोबर वेळ घालवतो. तसंच महिन्या-दोन महिन्यांतून एखाद्या डोंगरावर जाऊन येतो आणि आजूबाजूच्या प्रदेशाचं दर्शन घेत असतो. हे मला तरुण ठेवत असतं. या नोटवर तो कार्यक्रम आम्ही संपवला. नाहीतर पंचाईत आली असती भांडणं झाली असती. हा प्रसंग घडला तरीही मुलाखत घेत असताना ज्याची मुलाखत घेतली जाते त्याला टॉपल करणं महत्त्वाचं आहे. थोडा भडका उडाला की तो माणूस खरी उत्तरं द्यायला लागतो.” असा किस्सा पुलंनी सह्याद्री वाहिनीच्या मुलाखतीत सांगितला होता.

टेलिव्हिजनची नोकरी का सोडली?
टेलिव्हिजनची नोकरी सोडली कारण तिथे मनोरंजन कमी आणि लोकशिक्षण जास्त होता. मला त्याचा कंटाळा येऊ लागला. कारण नाईलाज म्हणून आम्ही मनोरंजन करतो आहोत अशी भूमिका मला दिसू लागली होती. मला उत्तम नर्तन, उत्तम गाणं हे उत्तम शिक्षण आहे असंच वाटतं. आपण संस्कृतीच्या गोष्टी करतो.. दुसऱ्याला आनंद देणं हीच संस्कृती आहे. माझं मन तिथे रमलं नाही म्हणून मी ते काम सोडलं असं पुलंनी सांगितलं होतं.

आज आपल्या लाडक्या पुलंची जयंती. त्यांच्या नावापुढे अनेक बिरुदं लागली. कोट्यधीश पुलं, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व, भाई, भाई काका फक्त एकच बिरुद आपल्या सगळ्यांना नकोसं वाटलं ते म्हणजे कैलासवासी पुलं. आज ते आपल्यात नसले तरीही त्यांचं लिखाण आहे..त्यांनी सांगितलेल्या कथा ऑडिओ आणि व्हिडीओ रुपात आहेत. माझं साहित्य एखाद्या तरुणाने वाचलं तर मी आणखी पन्नास वर्षे जगलो असं मला वाटतं असं पुलं एकदा म्हणाले होते. तसंच आहे.. पुलं शरीराने आपल्यात नाहीत.. मात्र त्यांचा साहित्यरुपी सहवास आपल्या मनात कायम दरवळतो आहे यात शंकाच नाही.

मूळ स्रोत - https://www.loksatta.com/maharashtra/in-a-live-interview-pandit-nehru-was-angry-p-l-deshpande-sent-a-question-and-then-what-was-that-story-read-in-detail-scj-81-4034606/

Friday, May 23, 2025

उदंड पहिले पाणी !

मला पाण्याचं व्यसन आहे. एखाद्या गावाला नदी आहे, म्हटल्यावर मला ते गाव न पाहताच आवडायला लागतं. वास्तविक जीवघेण्या उन्हाळ्याच्या ह्या देशात पाण्याचं केवढं आकर्षण पाहिजे !

पाण्याच्या आनंदाला आपण कमी मानतो, असं नाही. देवाचीदेखील बिनपाण्याने पूजा नाही करता येत. लग्नातल्या मंगळाष्टकांत गंगा सिन्धु सरस्वती च यमुना म्हणून सगळ्या नद्यांना हाका घालतो. स्त्रतःच्या संस्कृतीला सिंधु-संस्कृती, गंगा-संस्कृती अशी नावे देऊन नद्यांचे उपकार आठवतो. पण वन्दे मातरम् सुरू झालं की 'सुजलाम्' म्हणताना जीभ अडखळते. डोळ्यांपुढे त्या पाण्याच्या नळासमोर लागलेल्या न संपणाऱ्या रांगा दिसायला लागतात. दिवसाच्या आणि रात्रीच्या कुठल्याही वेळी पाण्याच्या शोधार्थ निघालेल्या बाया दिसू लागतात. नळावरची भांडणे करणाऱ्या 'सुहासिनी सुमधुरभाषिणी' आठवतात. मुंबईतल्या नळातून किरंगळीच्या मापाची धार गळायची तासन् तास प्रतीक्षा करणारी एक माउली अमेरिकेत नोकरीला असलेल्या आपल्या लेकाला भेटायला गेली. परतल्यावर अमेरिकेचं कौतुक सांगत होती "अहो, तिथली श्रीमंती म्हणजे काय सांगू ? अहो विश्वास बसणार नाही तुमचा ऽ ऽ नळाला दिवसभऽऽर पाणी ".

प्रत्यक्षात आम्हांला पाण्याची गरज असून किंमत नाही असा चमत्कारिक विरोधाभास आहे. वास्तविक आम्ही वृक्षपूजक, जलपूजक, दगडाधोंड्यांचे आणि मातीचेदेखील पूजक. पण स्त्रीला जशी एका तोंडाने 'देवता' मानून संसारात खुशाल झिजवून मारून टाकतो, तसेच आपण आपल्या जळा-स्थळा-काष्ठा-पाषाणांचे केले! नुकतेच मी गिरसथाचा धबधबा आटून नाहीसा झाल्याचे वाचले, आपल्या एखाद्या आवडत्या कलावंताच्या निधनाच्या बातमीने धक्का बसावा, तसे मला झाले. त्या गिरसभाच्या सान्निध्यात दोनच दिवस होतो मी. काय एकेक लीला दाखविल्या होत्या त्याने ! त्या दोन दिवसांत मी पावसाच्या धारांतला गिरसण्या, धुक्यातला गिरसप्पा आणि सूर्यकिरणांत अंगावर एक नाही तर दोन इंद्रधनुष्ये घेऊन नाचणारा गिरसष्पा पाहिला होता.

- पूर्वरंग

Wednesday, March 12, 2025

चांदणे तुझ्या स्मरणाचे - (वरुण पालकर)

८ नोव्हेंबर हा पु.लं. चा म्हणजे भाईंचा वाढदिवस. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप. भाईंना जाऊन आज 19 वर्ष झाली, पण ते गेल्यापासून आजवर कधीही त्यांच्या वाढदिवसाला मी जयंती म्हणालो नाहीये. कारण भाई म्हणजे "महाराष्ट्राच्या अंगणातील कैवल्याचं, आनंदाचं झाड!!", त्यामुळे ते कधी सुकणं, नष्ट होणं शक्य नाही!!या वर्षाच्या सुरुवातीला "भाई-व्यक्ती की वल्ली" हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित झाला. त्या चित्रपटातील काही संवाद आणि काही पात्रांची निवड खटकणारी होती. तसेच Cinematic liberty घेऊन दाखवलेले काही सीन्स अत्यंत आक्षेपार्ह होते. त्यामुळे पूर्वार्ध पाहून "चांदणे तुझ्या स्मरणाचे" या नावाने पहिला भाग 9 जानेवारी रोजी लिहिला. आणि उत्तरार्ध बघून दुसरा भाग टीकात्मक पद्धतीने लिहिणार असं खरंतर ठरवलं होतं, पण काही केल्या लिहिताच आला नाही. भाई आणि सुनीताबाई म्हणजे माझ्या मर्मबंधातली ठेव. या दोघांनी मला आनंदाच्या आणि संस्काराच्या रुपाने एवढं दिलंय की त्याचं ओझं झटकून त्यांच्यावर आधारित चित्रपटावर टीका करायला, त्यातील उणिधुणी काढायला मी धजावलोच नाही. कधी कधी आयुष्यात काही लोकं तुम्हाला असे वश करतात की ते गेल्यानंतरही त्यांची मोहिनी तुमच्यावर कायम असते. भाई आणि माईंच्याबाबतीत माझं नेमकं हेच झालं, असं म्हणता येईल. त्यामुळे आज दहा महिन्यांनी हा दुसरा भाग पूर्ण करुन, या पुण्यवंत उभयतांचे आणि आमचे ऋणानुबंध यांना उजाळा देऊन अंतःकरणापासून आदरांजली वाहण्याचा हा अगदी छोटा प्रयत्न.


आमच्या आजी आजोबांचा आणि पुलं-सुनीताबाईंचा तसा जवळपास 5 दशके जुना परिचय. आणि तो होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सुनीताबाईंच्या धाकट्या भगिनी कै. शालनताई पाटील!! तेव्हा जोशी हॉस्पिटल शेजारी रुपाली अपार्टमेंटमध्ये भाई आणि माई राहत असत. रोजच्या रोज पत्र, फोन आणि माणसांची वर्दळ!! पण या सर्व वैतागाला लगाम घालायला सुनीताबाईंसारखी खमकी गृहिणी कम सचिव होतीच. मग कधीतरी जरा निवांतपणा मिळावा म्हणून लॉ कॉलेज रोडवरील शालनताईंच्या अबोली अपार्टमेंटमधील घरात दुपारच्या चहापानासाठी अथवा रात्रीच्या भोजनासाठी पुलं-सुनीताबाई येत असत. अशाच एका भोजनप्रसंगी पालकर उभयतांची ओळख झाली मग "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी" यानुसार या मंडळींमध्ये "जननांतर सौहृद" निर्माण झालं,टिकलं ते अगदी सुनीताबाई जाईपर्यंत. सुनीताबाई पक्क्या नास्तिक,पुलंही अजिबात दैववादी नव्हते. त्यामुळे त्यांनी ना घरात कधीही देव ठेवले की ना कुठली कार्यही केली. पण नातेवाईकांच्या, आप्त-स्नेह्यांच्या मंगलकार्यात त्या नुसत्या उपस्थित राहत नसत, तर संपूर्ण कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पडेल ते सर्व करण्याची, प्रसंगी पदरचे पैसे खर्च करुन(ज्यांचे कार्य आहे त्यांच्याकडील कोणाला कळू न देता) यथाशक्ती मदत करीत असत. आमच्या बंगल्याची वास्तुशांत, आत्या आणि बाबांचं लग्न, प्रणवचं बारसं, माझी मुंज आदी सर्व शुभप्रसंगी पुलं-सुनीताबाई जोडीने अथवा सुनीताबाई तरी आवर्जून उपस्थित होत्या. माझ्या मुंजीत भाईंच्या सर्व पुस्तकांचा संच सुनीताबाईंनी भेट दिला होता, जो आजही मी जीवापाड जपून ठेवला आहे.

सततचे दौरे, अविश्रांतपणे केलेले नाटकाचे, अभिवाचनाचे प्रयोग यामुळे जसा भाईंच्या मेंदूवर ताण आला तसाच ताण सततचे दौरे, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बैठका, फायली आणि आपल्या आवडत्या व्यक्तींच्या लागोपाठ जाण्याने आमच्या आजोबांच्या मेंदूवर आला. साधारणपणे एका वर्षाच्या अंतराने 1993 साली पुलंना, आणि 1994 च्या शेवटी आजोबांना Parkinson's विकाराने ग्रासले.मग डॉ.चारुदत्त आपटे, डॉ.प्रदीप दिवटेंकडे उपचार सुरू झाले. त्यानिमित्त तरी भेट व्हावी म्हणून दोघेही पुढे मागे येईल अशीच अपॉइंटमेंट घ्यायचे. त्यात आमचे आजोबा मितभाषी, जरुरीपेक्षा जास्त न बोलणारे असे होते. त्यामुळे आपल्याला हा आजार झालाय, आपण परावलंबी होत चाललो आहोत या भावनेने उचल खाऊन आजोबा अंतर्मनात खचू लागले. पण त्या उलट पुलंनी आपल्या आजाराचीही टिंगल करायचे. डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाताना जेव्हा आमच्या बापूंच पाऊल पुढे पडायचं नाही त्यावेळेस चेष्टेच्या स्वरात पुलं त्यांना म्हणायचे, "अरे प्रताप, तू माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहेस, त्यामुळे पहिला मान माझा. पण इथे आपण उलट करू. तू पहिले आत जा. हं, टाक पाऊल, जमेल तुला. अरे तू एरवी भराभर चालतोस की. माझ्यासारखा स्थूल थोडीच आहेस?" असे एकावर एक विनोद करत पुलं बापूंच्या मनावरचा ताण थोडा हलका करीत. अशीच 2-3 वर्ष गेली. एव्हाना बापूंच्या पूर्ण शरीराचा ताबा Parkinson's ने घेतला होता. दिवसातून दोन वेळा सर्व शरीराला कंप सुटायला लागला, मग साधारणपणे 1998 पासून पूर्ण शरीराला या आजाराने विळखा घातला. यातून तात्पुरती सुटका म्हणून बापू दिवसातून 2 वेळा झोपेच्या गोळ्या घेऊ लागले. यामुळे जास्तीतजास्त काळ बापू झोपूनच राहायचे. इकडे पुलं अमेरिकेला जाऊन मेंदूतल्या पेशींवर शस्त्रक्रिया करून आले,ज्याने त्यांचा त्रास कमी होण्याची अपेक्षा होती, पण त्याचा परिणाम अल्पकाळ टिकला. मग पुलंही wheelchair ला खिळून गेले. बाहेर फिरणे, कार्यक्रमाला जाणे, सगळं सगळं बंद झालं. शेवटचा प्रवास पुलंनी केला तो 1999 साली आनंदवनाचा. तिथे "बाबांच्या सोबत जर मी दोन पाऊलं जास्त चालू शकलो तर माझं आयुष्य वाढेल" या भावनेने जवळपास महिनाभर पुलं तिथे राहिले.

आता आयुष्याचं अंतिम वर्तुळ पूर्ण करण्यासाठी काळाचं चक्र फिरू लागलं. मार्च 2000 च्या शेवटच्या आठवड्यात बापूंना न्यूमोनिया झाला. Parkinson's विकाराचा शेवट न्यूमोनियानेच होते याबद्दल डॉ.आपटेंनी आमच्या बाबांना 1995 लाच कल्पना दिली होती. त्यामुळे हे शेवटचे आजारपण हे बाबा समजून चुकले आणि त्यांनी हळूहळू आजीसह बापूंची बहीण, माझी आत्या सर्वांच्या मनाची तयारी करायला सुरुवात केली. आणि अशातच मे च्या पहिल्या आठवड्यात पुलंना देखील न्यूमोनिया सदृश फुफुसांचा आजार झाल्याचे सुनीताबाईंनी कळवले. तेव्हा मात्र आमच्या घरातल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. आता भाईदेखील त्याच वाटेचे प्रवासी या विचाराने आजी आणि बाबांना अश्रू अनावर झाले. बाबा आणि आजी भाईंना भेटून आले. भाईंनी स्मित केलं पण आवाज खूप खोल गेला होता. 1 मे रोजी डॉक्टरांच्या साप्ताहिक भेटीत बापूंना dehydration झाल्याचे निदर्शनास आले. शरीरात पाणी राहिना. कातडी ओढली की तशीच वर राहू लागली. शरीरातला जोम दिवसागणिक कमी होत गेला, डोळे खोल गेले. डॉक्टरांनी औषधे बंद करण्यास सांगितली. त्यांचा शेवटचा दिस गोड करा, ते मागतील ते द्या, असा जवळच्या आप्तासारखा सल्ला त्यांनी बाबांना दिला. बापूंची प्रकृती अत्यावस्थ आहे हे समजल्यावर 11 मे रोजी सकाळी सुनीताबाई शहाळी घेऊन आमच्या घरी आल्या. बापू तर ग्लानीतच होते. मग सहज बोलता बोलता आजी म्हणाली की गेले 2 महिने यांच्या आजारपणामुळे यांचं आणि माझं पेन्शनच आणायला जमलेलं नाही. झालं!! आजी बोलायचा अवकाश आणि सुनीताबाई आजीला गाडीत बसवून पेन्शन आणायला घेऊन गेल्या. अर्ध्या तासाने परत आणून सोडलं. मग निघताना मला एक चॉकलेट दिलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला.

दुसरे दिवशी 12 मे रोजी सकाळी बापू गेले. 11 वाजता सुनीताबाई आल्या. मी दारातल्या जिन्याच्या पायरीवर बसून हमसून हमसून रडत होतो. मला जवळ घेत त्यांनी माझे डोळे पुसल्याचं आजही मी विसरु शकत नाही. मग बरोबर महिन्याने 12 जून रोजी पुलं गेले. जणू महाराष्ट्राचा "आनंद-पारिजात"च कोमेजला!! त्याच दिवशी पुलं-सुनीताबाईंच्या लग्नाचा 54 वा वाढदिवस असणे हा एक विचित्र योगायोग म्हणायला हवा. मी लहान असल्याने मला हॉस्पिटलमध्ये तर नेलं नव्हतंच, पण घरीही नेलं नव्हतं. मात्र संध्याकाळी मी रडून घर डोक्यावर घेतलं म्हणून आई-बाबा मला पुढ्यात बसवून "मालती-माधव" मध्ये पुलंच्या घरी घेऊन गेले. मी आत गेलो तोच मला सुनीताबाई दिसल्या. मी मूकपणे रडत त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. आणि एका क्षणी मी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागलो. माझं रडणं ऐकून आई बाबा तर रडलेच, पण सुनीताबाईंचे डोळेही पाझरले. माझ्या पाठीवरून हात फिरवत, मला धीर देत त्यांनी माझं रडू आवरलं.

पुलं गेले तेव्हा मी फक्त 10 वर्षांचा होतो. मी जे पुलं पाहिले ते wheelchair वर बसलेले, दाढी वाढलेले, मऊ सुती बंडी आणि हाफ चड्डी घालणारे आणि खोल गेलेल्या आवाजामुळे शांत बसलेले असे पुलं पाहिले होते. पण सुनीताबाईंचा सहवास मला अगदी 2008 पर्यंत लाभला. या उभयतांनी महाराष्ट्राला खूप दिलं. पुलंनी लोकांना हसवलं, आणि त्यातून जे कमावलं त्याचा विनियोग सचोटीने करत, अनेक प्रामाणिक कष्टाळू संस्थांना भरघोस मदत करत सुनीताबाईंनी दातृत्वाचा एक अतुलनीय वस्तुपाठ महाराष्ट्राच्या सामाजिक कार्यक्षेत्रात घालून दिला. काल सुनीताबाईंची ११ वी पुण्यतिथी झाली. आयुष्यात जास्तीतजास्त आनंद शोधून तो इतरांनाही द्यावा, हे मला भाईंनी शिकवलं, तर कसोटीच्या क्षणी कसं निकराने लढावं, खचून न जाता कणखरपणे कसं उभं राहावं, याचे धडे मी सुनीताबाईंपाशी गिरवले. माझा स्वभाव आवडल्याने ज्यांनी मला आपलंसं केलं, त्या स्वभावाचे कंगोरे घासून लख्ख करण्यात पुलं-सुनीताबाईंचा सिंहाचा वाटा आहे. कुबेराचं कर्ज तिरुपतीचा स्वामी व्यंकटेश्वर अजून फेडतो आहे असं म्हणतात, तद्वत या साहित्यिक कुबेराचे समस्त मराठी जनांवर असलेले ऋण शेवटचा मराठी माणूस या पृथ्वीवर असेपर्यंत फिटणार नाहीत, हे अलबत.

©वरुण पालकर
पुणे

Wednesday, March 5, 2025

सुखाची जागा

स्वातंत्र्य आणि साहित्य हे नेहमी आत्मतेजोबलाने उभं राहत असतं. टेकू देऊन उभे राहतात ते राजकारणातले तकलादू पुढारी. हे महाराष्टाचे अमके अन् तमके! सीटवरून खाली आले की मग कोण? साहित्यात असं होत नाही. शेकडो वर्षांपूर्वी झालेला तुकाराम आजही आपल्या मदतीला येतो. कालिदास आजही आपल्याला आनंद देऊन जातो. भवभूती, शेक्सपिअर, टॉलस्टॉय, आमचे ज्ञानेश्वर आजही आपल्या मनाला शांती आणि आनंद देऊन जात असतात.

प्रतिकूल परिस्थिती सर्वांनाच असते. श्रीमंत लोकांकडे तुम्ही गेलात तर त्यांच्याकडे अपचनाचं दुःख असतं आणि गरिबांकडे गेलात तर उपाशीपणाचं दुःख असतं. पोटाचीच दोन्ही दुःखं. उलट एखादा मनुष्य म्हणतो - मी मजेत आहे. तो तेव्हाच मजेत असेल जेव्हा अवघ्या जगाचं सुखदुःख हे त्याला आपलं आहे असं वाटत असेल! साहित्यिकाची हीच भूमिका आहे. अशा या भाषेतून फुलोरा फुलवणं हे तुमचं काम आहे. तो निरनिराळ्या तन्हेनं फुलवा. कुठलीही सक्ती लादून घेऊन नका. साहित्य अनेक तऱ्हेने फुलते.

एक गोष्ट आहे - एका हॉस्पिटलमध्ये एका खोलीत दोन पेशंट होते. एकाला खिडकीजवळची जागा होती अन् दुसऱ्याला आतल्या बाजूची. दोघेही सीरियसच होते. खिडकीजवळची जागा ज्याला होती तो त्यातल्या त्यात बरा होता. तो खिडकीच्या बाहेर बघायचा अन् या पेशंटला सांगायचा; 'बरं का, काय सुंदर फुलबाग आहे इथं. बाहेर काय सुरेख फुललं आहे. सुंदर प्रकाश आहे, मुलं खेळताहेत, फुलं काय सुरेख आली आहेत.' असं तो वर्णन करून सांगायचा. दुसऱ्याला सारखं वाटायचं, ही जागा मला मिळायला पाहिजे होती. कधीतरी ती कॉट मला मिळावी. हा बरा तरी होऊ दे नाहीतर मरू दे तरी।

आणि एके दिवशी सकाळी काय झालं. तो जो नेहमी वागेचं वर्णन करून सांगणारा होता तो मनुष्य मेला लगेच दुसऱ्याने उत्साहाने डॉक्टरला सांगितले की, 'चला, मला त्या कॉटवर न्या.' डॉक्टर म्हणाले, 'नको. तिथं कशाला !' तरी तो म्हणाला, 'तिथेच मला जागा द्या' डॉक्टरनी नाइलाजानं त्याला तिथं झोपवलं. उत्साहाने त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. तर तिथं बाग नव्हती. काही नव्हतं. तिथे एक कबरस्तान होतं. तो याला बरं वाटावं म्हणून बागेचं वर्णन करून सांगायचा.

साहित्यिकाचं हेच काम आहे. जीवनात अनेक दुःखं असतात आणि, 'वाबारे, इतकी दुःखं असली तरी जीवन इतकं वाईट नाही. जीवनामध्ये अजूनही चांगलं होणार आहे. हे सांगणं साहित्यिकाचं काम आहे. जीवनावर माणसाचे अतोनात प्रेम आहे. टॉलस्टॉयची एक गोष्ट आहे - एक माणूस असतो. त्याच्यामागे वाघ लागतो. हा धावत धावत जातो. कोठे तरी झाडावर चढायला बघतो. जे झाड दिसतं ते काटेरी असतं. तरी तो कसा तरी वर चढतो. वर चढायला लागल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की, वाघ यायला लागला आहे आणि आपणाला खायला एक अजगर आणखी वर त्या झाडावर चढतोय. आता काय करावं? कळत नाही. तो आणखी वरती जाण्याचा प्रयत्न करतो पण तिथे मधाचे पोळे असते. त्या मधाच्या पोळ्याला धक्का लागतो आणि मधाचा एक थेंब त्याच्या खांद्यावर पडतो. या सगळ्या गडबडीत तो ते चाटून घेतो. जीवनात इतक्या संकटांमध्ये मधाचा एक थेंब आपण चाटून घेत असतो. कोठेतरी एक एवढीशी सुखाची जागा आपण ठेवलेली असते. ही सुखाची जागा मला एकट्याला न मिळता सगळ्या समाजाला मिळावी असे जेव्हा वाटायला लागते तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मोठे होतो.

पु. ल. देशपांडे
साहित्य सेवा मंडळ, विटा, यांनी आयोजित केलेल्या ग्रामीण साहित्य सम्मेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणातील काही अंश.. (२४-१-१९८२)
पुस्तक – मित्रहो

Friday, December 6, 2024

लंडनचा नाताळ

परिचयः पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (जन्म १९१९)- ह्यांना विनोदी लेखक व प्रतिभाशाली नाटककार म्हणून फार मोठी मान्यता मिळाली आहे. प्रारंभी काही दिवस मराठीचे प्राध्यापक, नंतर मुंबई व दिल्ली येथील आकाशवाणी केंद्रात अधिकारी होते. त्यांचे 'खोगीरभरती', 'नस्ती उठाठेव' इत्यादी विनोदी लेखसंग्रहः 'अंमलदार', 'तुझे आहे तुजपाशी' इत्यादी नाटके फार प्रसिद्ध आहेत. 'बटाट्याची चाळ', 'असा मी असामी' इत्यादी एकपात्री प्रयोग रंगभूमीवर अतिशय यशस्वी ठरले आहेत. व्यक्तिचित्रण व प्रवासवर्णन करताना तर त्यांची प्रतिभा विशेष फुलून येते. त्यांची 'अपूर्वाई' व 'पूर्वरंग' ही प्रवासवर्णने फार लोकप्रिय आली आहेत. त्याचप्रमाणे 'व्यक्ती आणि वल्ली' व 'गणगोत' यांतील व्यक्तिचित्रणे दीर्घकाळ स्मरणात राहण्यासारखी लिहिली गेली आहेत. अतिशय सहजसुंदर असा विनोद करून जीवनात रूढ झालेल्या प्रथा व परंपरा यांतील विसंगती आणि हास्यास्पदता ते अचूकपणे दाखवितात. त्यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे. भारतसरकारने त्यांना 'पद्मश्री' हा बहुमान देऊन त्यांचा गौरव केला आहे. १९७४ साली इचलकरंजी येथे भरलेल्या म. सा. संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
प्रस्तुत पाठ त्यांच्या 'अपूर्वाई' या प्रवासवर्णनपर पुस्तकातून घेतला आहे. ह्या पाठात लंडनच्या मुक्कामात आलेल्या नाताळच्या सणाचे वर्णन त्यांनी त्यांच्या विनोदी शैलीने करून दिले आहे. त्या निमित्ताने लहान मुले, त्यांचे खेळ व खेळणी यांच्या बाबतचे मौलिक विचार अतिशय सहजपणे मांडले आहेत.

थंडीचा कडाका वाढत होता. परंतु अजून हिमसेक मात्र सुरू झाला नव्हता. लंडनच्या मुक्कामात हवेचा तेवढाच एक चमत्कार पाहायचा राहिला होता. बाकी फॉग, स्मॉग आणि हवामानाच्या इतर लहरी भरपूर अनुभवल्या होत्या. त्यातल्या त्यात दाट धुक्याचा अनुभव एकदा लंडनच्या पोलिसाला आणि एका पोस्टाच्या पेटीला टकरावून घेतला होता. इंग्रज लोक हयाला 'पी-सूप' धुके म्हणतात, म्हणजे कोकणातल्या गुळवणी इतके दाट धुके. (देशावरच्या मंडळींनी पिठल्याइतके दाट म्हणावे.) साऱ्या लंडनभर आंधळी कोशिबीर चालते. रेल्वेचे एकदोन अपघात होतात. मोटारी रस्त्यांतून रांगायला लागतात. माणसे अंदाजाने पावले टाकतात आणि अशाच वेळी नाताळ येतो. मला नाताळ म्हटले की ओ. हेन्रीच्या त्या प्रसिद्ध कथेची आठवण होते. लंडनच्या प्रचंड दुकानांतून नाताळचे जंगी सेल सुरू झाले. नाताळाला आठदहा दिवस अवकाश होता, पण दुकाने गि-हाइकांनी तुडुंब भरली होती. ऑक्सफर्ड स्ट्रीट, पिडिली वगैरे लंडनच्या बाजारभागात तर गर्दी आवरायला खास पोलिस नेमले होते. त्यातल्या त्यात एखादा उजळ दिवस मिळाला की लोकांच्या उत्साहाला ऊत येई. बाकी अशा वेळी वाटते की माणूस हया प्राण्याच्या इतर सगळ्या व्याख्या रद्द करून 'माणूस म्हणजे खरेदीत आनंद मानणारा प्राणी' एवढी एकच व्याख्या मंजूर करावी. दाढीवाला सांताक्लॉज पोरांना आवाहन करीत होता. ही परस्परांना दयायच्या बक्षिसांची खरेदी एकमेकांना नकळत करायची. हे गुपित नाताळाच्या रात्री उघडे करायचे. सुंदर सुंदर बाहुल्यांना हेवा वाटावा अशी ही गुटगुटीत, सोनेरी, कुरळ्या केसांची इंग्लिश बालके आपले निळे निळे डोळे विस्फारून दुकानातल्या काचांपलीकडला खेळ पाहताना पाहून मला तर आनंदाने गदगदून यायचे. सांताक्लॉज हा मुलांचा सगळ्यात आवडता देवदूत. हा ख्रिसमसच्या रात्री घरांच्या धुराड्यांतून गुपचूप खेळणी ठेवून जातो. इंग्लंडच्या मुक्कामात मी निरनिराळ्या दुकानांतून हिडलो. सेल्फ्रिजिस, हाउन्सडिचसारखी प्रचंड दुकाने पाहिली. परंतु खेळण्यांच्या दुकानांत हिडण्यासारखा आनंद नाही. शेकडो मुले त्या पाच-पाचमजली खेळण्यांच्या दुकानांतली हजारो त-हेची खेळणी अशा काही डोळ्यांनी पाहतात की आपण मुग्ध होऊन त्या चिमुकल्या डोळयांतल्या बाहुल्यांचा नाच पाहावा. पापण्यांची पाखरे काय भिरभिरतात, ओठांचे चंबू काय होतात, चिमुकल्या टाळ्यांच्या पाकळ्या काय उधळतात. एवढेच नाही, एकदा तर बॅटरीवर चालणारा खेळण्यातला बँड सुरू झाला आणि चिमुकल्या गि-हाईकमंडळींनी त्या दुकानातच सांघिक नृत्य सुरू केले. लाजरीबुजरी पोरेदेखील दोनचार मिनिटांत त्या दंग्यात सामील झाली. ही खेळणी विकणाऱ्या पोरीही चतुर. त्यांना ह्या चिमण्या गि-हाइकांना गुंगवण्याची कला जमलेली असते. मग त्याही मुलांत मूल होऊन जातात.

आमच्या आयुष्यात दुर्दैवाने खेळणेच आले नाही. लहानपणी नाही म्हणायला बाहुलाबाहुलीच्या लग्नाचे खेळ खेळलो आहे. पण भूमिका दोन-एक, भटजी आणि दुसरी, सनईवाला. मला भटजीची नक्कल फार लहानपणी यायला लागली. आणि नाकपुड्या चिमटीत धरून सनई वाजवता येत असे. त्यामुळे बाहुलाबाहुली कशीही असेना, भटजीला आणि सनईवाल्याला त्याचे काय, अशा भावनेने त्या खेळण्याकडे आम्ही पाहिले. त्यातून आमच्या लहानपणी ज्यांना बाहुल्या म्हणत, त्या पदार्थाचे वर्णन काय करावे! एका लाकडी ओंडक्यावर पिवळे, तांबडे, हिरवे रंग असत. हात अंगाला चिकटलेले असत. डोक्यामागून पाठीच्या खाली पायापर्यंत एकच एक सपाटी असे. ही बाहुली टेकूशिवाय उभी राहिली नाही आणि आयुष्यात खाली बसली नाही. तिचा उपयोग खेळणे, खिळे ठोकणे किवा जात्याचा खुंटा बसवणे अशा विविध प्रकारे केला जाई व ही बाहुली पिढीजात टिकत असे. मुलींना निदान बाहुली होती. मुलांना फक्त मैदानी खेळ. साऱ्या आळीत एखादया मुलाकडे क्रिकेटची बॅट असे. आणि त्याचे 'तीनदा आऊट झाल्यास एकदा आऊट' असे कोष्टक असायचे. हे निमूटपणे मोजण्यावाचून गत्यंतरच नसायचे. इंग्रज पोरांच्या भाग्याचा हेवा वाटला. अर्थात हल्ली आपल्याकडेही खेळण्यांकडे लक्ष जायला लागले आहे. पण बाहुल्या मुलींना खेळायला देण्याऐवजी आईच त्यांचे प्रदर्शन मांडून त्यांच्यावर लेख वगैरे लिहिताना अधिक आढळते. अशा वेळी मुलींची आणि त्या मुक्या बाहुल्यांची दया येते. बाहुल्या पोरींच्याच हाती सोपवाव्या. कपाटातल्या बाहुल्या अगदी नव्या कोऱ्या असल्या तरी करुण वाटतात. माझ्या एका मित्राच्या मुलीने परवाच माझी आपल्या सहा मुलींशी ओळख करून दिली. त्यांची अवस्था पाहून त्या पोरींची लग्ने कशी होणार, याची काळजी मला लागली. सहांपैकी एकही हातीपायी धड नव्हती. रंग उडालेले, हात ढिले झालेले, पाय तुटलेले अशा अवस्थेतल्या त्या तिच्या 'सहा पोरी' आम्हांला तशा वाटत होत्या. पण आईसाहेब खूश होत्या. 'रोज संध्याकाळी त्यांची लग्नं होतात' हीदेखील बहुमोलाची माहिती मला मिळाली. बाकी इंग्रज पोरीदेखील आपल्याच मुलींसारख्या त्या बाहुल्यांचे धिडवडे करतात. छान सुबक बाहुलीचा हया पोरींना हेवा वाटतो की काय कोण जाणे ! तिला एकदा मातीत लोळवून विद्रूप केली की मगच प्रेमाचे खरे भरते येते. बाकी नाताळात केवळ मुलेच नव्या खेळण्यांनी खेळतात असे नाही. बच्चा, बच्चेका बाबा आणि आईदेखील मुलांत मूल होऊन खेळतात.

परदेशातला हा नाताळ एखादया पाश्चात्त्य कुटुंबात साजरा करावा अशी माझी फार इच्छा होती. परंतु ख्रिसमस सुरू होण्याच्या सुमाराला लंडनमधला मुक्काम हलवून पॅरिसला जावयाचे होते. पॅरिसमध्ये माझे मित्र माधव आचवल यांखेरीज माझ्या ओळखीचे कोणीही नव्हते. आणि जनरल द गॉलखेरीज दुसऱ्या कुठल्याही फ्रेंच रहिवाशाचे मला नावही ठाऊक नव्हते. परंतु फ्रान्समध्ये नाहीतर जर्मनीत अचानकपणे एकाच नव्हे तर पाचसहा कुटुंबांत नाताळ साजरा करण्याचा योग आला. आचवलांचे बंधू गेली दोनतीन वर्षे जर्मनीत उच्च शिक्षणासाठी राहिले होते. त्यांचे आमंत्रण आले आणि ख्रिसमसच्या आधी आम्ही लंडन सोडले. आता लंडनचा आमचा ऋणानुबंध संपला होता. पॅरिसचा दोन महिन्यांचा मुक्काम आटोपल्यावर परत फक्त दोन दिवसांसाठी लंडनला येऊन हिंदुस्थानात परतण्यासाठी बोट पकडणार होतो.

(अपूर्वाई)
लंडनचा नाताळ
पु. ल. देशपांडे
कुमारभारती
इयता - आठवी १ ९ ८ २ 

Tuesday, December 3, 2024

गांधीयुग व गांधीयुगांत

परतंत्र भारतातील जनतेमध्ये भय, दारिद्र्य, आलस्य, अविश्वास इत्यादि जे दोष निमाण झाले होते, ते नष्ट करण्यासाठी गांधीजींनी जनतेच्या हाती अहिंसक प्रतिकाराची समर्थ आयुधे कशी दिली, याची मीमांसा पुढील लेखात केली आहे. त्याचप्रमाणे, स्वातंत्र्यकाळात गांधीय मूल्यांचा लोप भारतामध्ये झालेला कोठे कोठे दिसतो, हेही त्यात विवेचिले आहे.

गांधीजींनी एके ठिकाणी म्हटले आहे की, “ गांधीवाद नावाची कोणत्याही प्रकारची वस्तू नाही. आणि माझ्यामागे कोणताही असा पंथ चालू व्हावा अशी माझी इच्छा नाही. मी एखादे नवे तत्त्व किवा एखादा नवा सिद्धान्त शोधून काढला, असा दावाही मला करावयाचा नाही.'' गांधीजींच्या या उद्‌गारावरून मला तुकोबांच्या अभंगातील ओळ आठवली:-

“आम्ही वैकुंठवासी। आलो याचि कारणासी ।
बोलिले जे ऋषि । साच भावे वर्ताया ॥”

ऋषींनी शोधलेली आणि माणसामाणसाला निरामय, सुंदर जीवनाचा आनंद देणारी सनातन तत्त्वे संतांनी आचरून दाखविली. ज्ञानेश्‍वरांनी ह्या अशा शुद्ध, निर्भय आचरणालाच उद्देशून म्हटले आहे, “जयांच्या लीळांमाजी नीति जियाली दिसे.'' त्यांचे आचरण पाहणे म्हणजेच नीतितत्त्वांचा विकास पाहणे आहे. गांधीजींचा शोध हा त्यांच्या लेखनातून किवा वक्‍तृत्वातून घेण्यापेक्षा आचरणातून घ्यायला हवा. वक्तृत्वापेक्षा कर्तृत्वातून त्यांना शोधायला हवे. त्यांच्या शब्दापेक्षा त्यांचं मौन अधिक बोलके असे आणि उपदेशापेक्षा उपोषणातून अधिक सामर्थ्य प्रकट होई. म्हणूनच गांधीवाद गांधींना मंजूर नव्हता.वादात प्रतिपक्षावर मात करण्याचा अभिनिवेश असतो. तिथे बहुधा जो तो बुद्धीच सांगतो आणि उरते ते करंटेपण. वाचाळतेला क्रियेचा आधार नसला तर 'शब्द बापुडे केवळ वारा' होऊन जातात. गांधींचे तत्त्वज्ञान त्याच्या प्रत्येक क्रियेतून दर्शन देत गेले. ईश्वर आणि प्रार्थना ह्यांवर नितान्त श्रद्धा असणारे गांधीजी त्या ईश्वराचे दर्शन भारतातल्या बहुसंख्यांना भाकरीतूनच घडवावे लागेल हे ओळखून होते. त्यांना भरल्या पोटातला वेदान्त नको होता आणि उपाशी पोटोबांना विठोबाची भक्ती सांगायची नव्हती. म्हणूनच त्यांच्या अध्यात्माचा टाळकुटेपणा झाला नाही. भगवन्ताचे अधिष्ठान आणि चळवळीचे सामर्थ्य ह्यांचा संगम झाला पाहिजे. नुसत्या भगवन्ताच्या अधिष्ठानाच्या जयजयकारातून आळसाला आणि भोंदूपणाला उत्तेजन मिळते. आणि सात्त्विक अधिष्ठानाशिवाय होणाऱ्या सामाजिक वा राजकीय चळवळीतून द्वेषाचे विषारी वातावरण तयार होते, तत्त्वच्युती होते, अविश्वास निर्माण होतात. अविश्वासातून भय आणि भयातून हिंसा जन्माला येते. दुर्बलांचे दुर्बलत्व वाढते आणि सबलांचे दानवीकरण होते.

गांधीजींनी सत्य, अहिंसा यांसारख्या सनातन मूल्यांचे स्वरूप कृतीतून प्रकट करण्यात आयुष्याचा प्रत्येक क्षण वेचला. सामान्य माणसाला हवा असतो तो त्याच्या डोळ्यांना दिसणारा आचरणाचा धर्म. आणि हा धर्म सांगणारा माणूस आपल्यांतच आहे, आपल्या वेदना जाणणारा आहे, त्या वेदना भोगलेला आहे, हा विश्‍वास ऐकणाराच्यात निर्माण व्हावा लागतो. गांधीजींचे हे लौकिकत्व अत्यंत अलौकिक होते. म्हणूनच त्यांचे अनुयायीत्यांच्यासमवेत पुढारी आणि अनुयायी ह्या नात्याने न चालता त्यांचे कुटुंबीय म्हणून चालले. ते महात्माजी होते, पण त्याहूनही अधिक ते ‘बापू’ होते. सरदार वल्लभभाई म्हणजे नखशिखान्त विलायती बालिष्टर. पण बापूंच्या सहवासांत आले आणि हा पोलादी पुरूष बापूंची दात घासण्याची लिंबाची काडी तयार करणे, फळे कापणे, मधपाण्याचे मिश्रण करणे ही कामे मागून घेऊन करू लागला. असामान्य बुद्धिमत्ता आणि प्रखर पांडित्य असलेले विनोबा आश्रमात गांधीजींच्या जोडीला बसून धान्य निवडीत, दळण दळीत. जनाबाई दळिता कांडिता विठ्ठलाचे गीत गात होती, कबीर शेले विणताना माणसांच्या वेदना पाहून रडत होता, चोखामेळा रस्ता झाडत देवाचे नाव घेत होता, सावता माळी मळ्यातल्या कांद्यामुळ्यांच्या लागवडीत विठ्ठलाचे रूप पाहत होता. महात्माजींच्या आश्रमांत ही सारे कामे देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन चालली होती. व्यासपीठावरून भाषणे करणारे, सरकारशी शाब्दिक किंवा शस्त्र धारण करून चकमकी करणारे पुढारी जनतेला ठाऊक होते. ते वंद्यही होते. ते तुरूंगवासही सहन करीत. त्यांच्या शौर्याविषयी लोकांना आदरही होता. परंतु पुढ्यात चरखा घेऊन सूत काढणारा आणि आपल्यासारखेच दळणटिपण करणाराआणि आपल्यासारखेच गरीबीचे जिणे जगणारा, तसाच अर्धनग्न असणारा हा माणूस आपल्या दु:खाशी सर्वस्वी परिचित असणारा आपला तारक आहे ही जाणीव गांधींना विलक्षण जवळीक देऊन गेली. गांधींच्या काळात भारत हा एक विशाल कुटुंब बनला तो गांधींच्या ह्या लोकविलक्षण लौकिकत्वामुळे. भारतातल्याच नव्हे, तर जगातल्या कुठल्याही माणसाला सवंसंगपरित्यागी माणसाकडे सदैव जिव्हाळा आणि आदर अशा संमिश्र भावनेनेच पहायला आवडते. भारतात तर त्याचे विशेषच कौतुक. म्हणूनच गांधीजींच्या सार्वजनिक जीवनातल्या उदयाबरोबर गांधीवादाचा जन्म न होता गांधीयुगाचा जन्म झाला. वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवनांत मानवी समाजाच्या धारणेला अत्यावश्यक असणाऱ्या सनातन मूल्यांचा आधार असलेले नवे विचार गांधींनी दिले. गांधींनी नवा धर्म दिला. नाही, नवी व्रते गांधींच्या आचाराधिष्ठित विचारांना गांधीवाद न म्हणता गांधीयोगच म्हणायला हवे. योगात जोडण्याची कल्पना येते, आणि जोडायला दुवा लागतो. भारतातला 'दारिद्र्य' हा दुवा गांधींनी सर्वांत महत्त्वाचा मानला. सार्‍या व्यथांचे मूळ दारिद्रयात आहे, हे सनातन सत्य आहे.

ह्या देशात गांधीजींच्या काळात आणि आजच्याही काळात जास्तीत जास्त लोकांची समान व्यथा म्हणजे दारिद्र्य. विवेकानंदांनीही लक्ष्मीनारायणापेक्षा दरिद्री- नारायणाच्या उपासनेलाच महत्त्व अधिक दिले. भारतात आर्थिक दारिद्र्याइतकेच भयानक आध्यात्मिक दारिद्र्य आहे. ईशावास्याची घोषणा ज्या देशात झाली त्या ह्या देशाइतका अध्यात्मदृष्ट्या दरिद्री देश भौतिकवादी म्हटल्या गेलेल्या यरोपखंडातही नसेल. सर्वाभूती एकच ईश्वर असल्याचा आपण गजरच अधिक करतो. साक्षात्‌ त्या देवाच्या दारातच आम्ही स्पृश्याला घडविणारा ईश्‍वर आणि अस्पृश्याला घडवणारा ईश्‍वर असे त्या ईश्वराचेच दोन तुकडे केले. आम्हाला दारिद्रयामुळे माणुसकी परवडत नाही की माणुसकी नाही म्हणून आम्ही दरिद्री, कोण जाणे. दारिद्र्याच्या खातेऱ्यात लोळणार्‍या माणसांकडे आपण चांगल्या कोरड्या डोळयांनी आणि त्याहून कोरड्या मनाने पाहू शकतो. रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी यांसारख्या अमानुष आचरणपद्धतीत भारताला अग्रमान मिळावा, असला हा देश राजकीयच काय पण धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक किवा वैचारिक पारतंत्र्यात न पडता तरच आश्‍चर्य. गांधीजींनी पहिले बोट ठेवले ते ह्या आध्यात्मिक आणि आर्थिक दारिद्रयावर. ह्या आध्यात्मिक दारिद्रयाविरुद्ध आणि त्यातूनच निर्माण होणार्‍या सहानुभूतिशून्य जगण्यावर अत्यंत तीव्रतेने आघात करणारा गांधींच्याही आधीचा महात्मा ज्योतिबा फुले. उपास, दैन्य, उपेक्षा ह्यांच्या संगतीत नांदणारा आणि भिक्षुकशाहीने निर्माण केलेल्या भगवंताच्या भुताला देव मानणारा शेतकरी आणि त्याच भिक्षुकशाहीला बळी दिलेल्या विधवा आणि अस्पृश्य, ह्यांच्याविषयीच्या कळवळ्याने, अत्यंत तीव्रतेने जीवनातील सत्याचा शोध घ्यायला निघालेले ज्योतिबा फुले मला इतर कुठल्याही पुढाऱ्यापेक्षा गांधीजींचे खरे पूर्वसूरी वाटतात. फुल्यांची वाणी कठोर हाती, पण अंतःकरण माणुसकीने ओथंबलेले होते. गांधींचे अंत:करण आणि वाणी दोन्हीही मृदु असली तरी निर्धार वज्राला भेदणाराच होता. महात्मा फुल्यांच्या कार्याची मर्यादा महाराष्ट्रापुरतीच राहिल्यामुळे भारतीय पातळीवर त्यांच्या कार्याचे कौतुक झाले नाही. पण त्यांनी जी चळवळ सुरू केली ती सत्यशोधनाचीच होती. गांधींनीही प्रथम प्रयत्न सुरु केले ते सत्याचेच प्रयोग. प्राचीन भारतीय ऋषी हे प्रयोग करणारे वैज्ञानिक होते. गांधींच्यात सामान्य आणि असामान्य दोघांनाही प्रयोग करणारा ऋषी आढळला. फरक इतकाच की, हा ऋषी सामान्यांच्यात वावरणारा सन्त होता. हिमालयांत जाऊन बसणारा योगीराज नव्हता.हा आपल्यात राहणारा, आपल्यासारखाच, आपल्याला समजणारी भाषा बोलणारा आणि आपल्या दुःखांना वाचा फोडणारा, ती दुःखे हलकी करण्याच्या कृती शोधून काढणारा आहे, ह्याची जाणीव, जिथे प्रकाशाचा कसलाही किरण पोहोचू शकत नव्हता, असल्या खेड्यांतल्या सामान्यांतल्या सामान्य माणसाला झाली.

स्मृतिकारांनी 'ज्ञानी' माणसाच्या वागण्याचे मोठे मार्मिक वर्णन केले आहे.:-
यं न सन्तं न चासन्तं
नाश्रुतं न बहुश्रुतं ।
न सुवृत्तं न दुर्वृत्तं
वेद कश्चित्स ब्राह्मण: ॥

जो संतांसारखा असामान्य नाही किवा जो संतपणाला पारखाही नाही, जो अविद्वान नाही आणि विद्याभ्यासजडही नाही, जो सदाचाराचा बडेजाव करणारा नाही किवा दुराचारीही नाही, असा लौकिकांत लौकिक आणि अलौकिकांत अलौकिक असणारा माणूस पोथीनिष्ठांना बुचकळ्यात पाडीत असला तरी सामान्यांना आपल्याहून थोर असल्याची जाणीव असूनही आपला वाटतो. म्हणूनच राजकारणातील पंडितांना गांधीजींची जी 'फॅड्स्‌' आहेत असे वाटत होते, ती सामान्य जनांना अहिंसामय प्रतिकाराची समर्थ आयुधे वाटली. गांधी पंचा नेसून उघडे राहिले. वस्त्राधिष्ठित संस्कारांना सुधारणा समजणाऱ्या लोकांना त्यांत ढोंग दिसले, परंतु कोट्यवधी अर्धनग्न भारतीयांना त्यात हा माणूस आपल्यासारखा वाटला. गांधींच्या आधी हा वेडेपणा (?) फक्त ज्योतिबांनी इंग्रजांच्या मुंबईत भरलेल्या दरबारी जातांना केला होता. गांधीजींच्या उदयापूर्वी 'स्वराज्य' हा भारतीय बुद्धिमंतांचा आणि शस्त्रवंतांचा इंग्रज बुद्धिमंतांशी आणि शस्त्रवंतांशी चाललेला झगडा होता. गांधीजींनी तो न्यायाचा अन्यायाविरुद्ध चाललेला, माणुसकीचा अमानुषत्वाशी चाललेला झगडा केला.हा झगडा केवळ राष्ट्रीय नव्हता. जगातल्या दलितांचा त्यांना दलितावस्थेत ठेवणारांशी चाललेला हा झगडा होता. गांधींनी राजकारणाचे अध्यात्मीकरण केले ते सायंप्रार्थनेने नव्हे, तर जात, धर्म, राष्ट्र, वेश ह्या कृत्रिम तटबंदीविरुद्ध पुकारलेल्या पवित्र शंखनादाने. डॉ. मार्टिन ल्यूथर किंगच्या बलिदानामुळे गांधींच्या आंतरराष्ट्रीय प्रभावाची जाणीव जगाला अधिक झाली, तरी एकोणीसशे एकोणतीस साली म्हणजे डॉ. किंग ज्या साली जन्माला आले आणि वयाने अवघे सात महिन्यांचे होते, त्या वर्षी गांधींनी निग्रोंच्या दास्यमुक्तीच्या चळवळीला त्यांच्या 'क्रायसिस' नावाच्या मासिकासाठी संदेश पाठविता होता. त्यात त्यांनी म्हटले होते- “गुलाम असणे यात कोणताच कलंक नव्हता. गुलामांचे मालक असणे यात खरा कलंक होता. परंतु ते जाऊ द्या. गतकाळाचा हा संदर्भ उकरून काढणे आता बरोबर होणार नाही. भविष्यकाळाकडे आपण नजर ठेवू. जे लोक सत्य, पावित्र्य व प्रेम यांचा आग्रह धरतील तेच आगामी काळाची घडण करू शकतील.” इतकेच नव्हे तर त्यानंतर सहाच वर्षांनी म्हणजे १९३५ साली गांधींच्या भेटीला निग्रो कार्यकर्त्यांचे एक पथक भारतात आले होते. त्या पथकाला गांधींनी सांगितले, “अखेरीस अहिंसेचा पवित्र संदेश जगाला पोहोचविण्याचे ऐतिहासिक कार्य निग्रोंच्याच द्वारा होणार आहे.” गांधीजींना अभिप्रेत होते ते सार्‍या मानवी समाजाचे स्वातंत्र्य. लिकनने म्हटले आहे, “मी कुणाचा जसा गुलाम होणार नाही, तसाच कुणाचा मालकही होणार नाही.''

स्वातंत्र्य ह्याचा अर्थच मुळी भयशून्य होणे हा आहे. भारतीय तत्त्वज्ञानात चित्त भयशून्य करणे हा गीताप्रणीत अंतिम आदर्श आहे. लोकमान्य आणि गांधी ह्यांची गीतेवरची अपार निष्ठा ह्या भयशून्य होण्याच्या साधनेतूनच आली. “आनंदं ब्रह्मणो विद्वान्‌ न विभेति कदाचन।” भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात बहुतेक साऱ्या क्रांतिकारकांना गीतेचे आकर्षण भयशून्य होण्याच्या तत्त्वज्ञानाचा मार्गदर्शक ग्रंथ म्हणूनच होते. भयशून्यता ही स्वातंत्र्याचीच नव्हे, तर जीवनातल्या सार्‍या थोर कर्तृत्वाला आवश्यक असणारी अटच आहे. याच संपूर्ण मुक्तीच्या कल्पनेमुळे गांधींना इंग्रज मालक जाऊन देशी मालक यावा, हे अभिप्रेतच नव्हते. म्हणूनच त्यांनी सारी शक्‍ती माणसामाणसांतल्या उच्नचनीचतेच्या कल्पना नष्ट करण्याकडे लावली. मानवी इतिहासातला हा काही पहिलाच प्रयत्न नव्हे. परंतु विसाव्या शतकात इतक्या निकराचा प्रयत्न गांधीजींनीच केला. गांधीजींच्या लेखी एखादा वैज्ञानिक आणि केवळ अंगमेहनत करणारा भंगी ही दोन टोके नव्हती. समाजपुरुषाच्या शरीरातील समान महत्त्वाची घटके होती. शौचकूप गलिच्छ झाल्यावर मायक्रोस्कोपऐवजी झाडू हवा आणि मलरोग तपासायला मायक्रोस्कोप वापरता यायला हवा. त्या त्या वेळी ती कामे समान महत्त्वाची. म्हणूनच गांधीनी लेखणी, टकळी आणि झाडू एकाच तोलाने वापरली. गांधीजी खरे कर्मयोगी होते. कारण हाती असलेल्या प्रत्येक कर्मातल्या “ कौशल्याला” ते अतिशय महत्त्व देत. प्रार्थनेची जागा आणि शौचाचा संडास ह्या दोन्ही स्थानांविषयी त्यांनी तितक्याच उत्कटतेने विचार केला. गांधीजींच्या निकट सहवासाचे भाग्य लाभलेले एक गृहस्थ मला सांगत होते की, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत गांधीजी जे जे काही करीत असत ते पाहणाऱ्याला असे वाटे की, गांधीजींना तेवढेच काम आहे.नुसते स्नान करीत असले तरी एखाद्याला वाटावे की, ह्यांना स्नानाचाच शौक आहे. आणि मैला साफ करीत असताना वाटावे की, गांधीजींना मैला साफ करणे एवढेच सर्वात महत्त्वाचे वाटते. हिशेबाबद्दलची दक्षता पाहून त्यांना कोणी पक्का बनिया समजावे, तर मुलांशी खेळतांना पाहून असला रिकामा आजोबा आपल्याही घरात असावा असे वाटावे. नुसते झोपले तरी इतके गाढ झोपायचे की, ही झोप चांगली पाचसहा तास चालणार असा अंदाज करावा, तर विसाव्या मिनिटाला त्या गाढ निद्रेतून त्यांना जाग येत असे. गांधीजी पंचाच नेसत. पण त्या पंचाची काळजी एखाद्या रेशमी वस्त्रासारखी घेत. सूत काढताना बोटभर सूत फुकट जाऊ देत नसत. उघडे असत, पण अजागळासारखे उघडे नसत.त्यांनी शरीराचे चोचले पुरविले नाहीत, पण एखाद्या तलवार बहाद्दराने आपली तलवार लखलखीत आणि धारदार ठेवावी तसे आपले शरीरही लखलखीत ठेवले. शरीर हे जीवित-कार्यातल्या साधनासारखे वापरले. ते गंजू दिले नाही. साधे पत्र लिहिताना कागदाचा एक कपटा वाया घालवू दिला नाही. शब्दांचा वापरदेखील असाच काटेकोरपणाने केला. गांधीजींची शब्दयोजना हा तर साहित्यिकांनाही हेवा वाटावा असा विषय आहे. ते मितभाषी नव्हते की अमितभाषी नव्हते. यथार्थभाषी होते, गंभीरातला गंभीर प्रसंग देखील एखाद्या प्रासंगिक विनोदी उद्गाराने ते सुसह्य करून टाकीत. विनोद हा तर गांधीजींच्या अहिंसक भात्यातला रामबाण होता. अश्रू आणि हास्य हे माणसाला जोडणारे केवढे बळकट दुवे आहेत! भयग्रस्त माणूस हसू शकत नाही आणि अमानुषाच्या डोळ्यात सहानुभूतीचे अश्रू उभे राहात नाहीत. असला हा लौकिकातला लौकिक आणि अलोकिकातला अलौकिक माणूस आपल्या देशात ज्या काळी आपल्या आचरणाने नवे चैतन्य निर्माण करीत होता तो काळ म्हणजे गांधीयुग. युगाचा हिशोब तारीखवार करता येत नाही. परंतु एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांनी असहकारितेचे पर्व सुरू केल्यापासून ते भारत दुभंगला जाऊन पाकिस्तान आणि भारत अशी दोन शकले होऊन मिळालेल्या स्वातंत्र्यापर्यंतचा काळ हे गांधीयुग, असे मला वाटते.

ह्या युगात देशातल्या लहानापासून थोरांपर्यंत सर्वांना कुठल्याही विषयावर महात्मा गांधी काय म्हणतात ते जाणून घेण्याची ओढहोती. आमची दुःखे समजणारा हा नेता आहे, असा विश्‍वास अनुयायांना वाटल्याखेरीज त्या नेतृत्वाला काहीच अर्थ नसतो. मग ते दुःख वैयक्तिक असो वा सामाजिक. माझ्या मुलांच्या शिक्षणापासून ते माझ्या आरोग्यापर्यन्त गांधी माझी चिन्ता करताहेत असे वाटे. समाजातल्या प्रत्येक माणसासाठी गांधीजींनी कार्यक्षेत्र निर्माण केले होते. देशभक्ती व्यासपीठावरून उठून थेट स्वयंपाकघरापर्यंत जाऊन पोहोचली. शांतिमय लढाईची दैनंदिन तालीम केल्याशिवाय ह्या लढ्यांतला सैनिक होता येत नाही, हे लोकांना उमजले.त्यासाठी गांधींनी लोकांना कितीतरी प्रकारची व्रते दिली. व्रताशिवाय शिस्त येत नसते. शिस्त ह्याचा अर्थ मनाला तालात पावले टाकायला शिकवणे. मिलिटिरी किंवा एन. सी. सी. तली शिस्त ही प्रासंगिक असते. परेड ग्राउंडवरून निघालेली एन्‌. सी. सी. तील मुले किवा सुट्ट्यांच्या दिवशी हिंडणारे लष्करी जवान सार्वजनिक जीवनातली शिस्त पाळतातच असे नाही. त्यांची शिस्त वरिष्ठांच्या हुकुमातून पाळली जाते. स्वत:च्या मनाला हुकूम दयायची त्यांना सवय नसते. सत्याग्रही सैनिकाचा अधिकारीही तोच आणि साधा सैनिकही तोच. व्रताला हृदयपरिवर्तन व्हावे लागते. वेषपरिवर्तन नव्हे. हृदयपरिवर्तनापेक्षाही बुद्धीने घासून घेऊन स्वीकारलेले व्रत अधिक कसोशीने पाळले जाते. गांधीजींनी हृदयपरिवर्तन म्हटले, तरी केले ते विचारपरिवर्तन. ते झाल्यावर परदेशी कापड अंगाला लावणार नाही म्हणणाऱ्या सामान्यातल्या सामान्य माणसाला निर्भयतेचा दिव्य स्पर्श होऊन गेलेला असे. “गांधीजी तुरुंगात आहेत ना? मग आपण दिवाळीचे फक्त स्नान करायचे, फराळ करायचा नाही, अंगाला उटणी लावायची नाहीत, विलायती साबण लावायचा नाही.” एवढे साधे व्रत करणार्‍या कुटुंबालाही केवढा धन्यतेचा साक्षात्कार होत असे. हे सारे निर्णय सचिवालयातून आलेले नसत की भडक प्रचाराचीही साधने वापरली जात नसत. ज्या ब्राह्मण कुटुंबात-शिवाशिवीचा सैतान धुमाकूळ घालायचा, त्या कुटुंबातल्या वयोवृद्ध कर्मठ बायका देखील सत्याग्रही म्हणून तुरुंगात गेल्या आणि तुरुंगातील विटाळ कालवलेली (?) भाकरी खाऊन धर्माच्या खऱ्या साक्षात्काराचे नवे पुण्य संपादून परतल्या. ज्या गुजरातेत पुरुषांपुढे येताना बायकांना तोंडासमोर हातभर लांब घुंगट घेऊन यावे लागे, त्या गुजराती स्त्रिया हजारोंच्या संख्येने सत्याग्रहात दाखल झाल्या. पदराखालच्या पित्या पोराला म्हातार्‍या सासूच्या हवाली करून निःशस्त्र प्रतिकाराला निघालेल्या भारतीय बायका, दारूबाजांचे अश्लील बरळणे आणि पोलिसांच्या लाठ्या ह्यांना न जुमानता दारूच्या अड्ड्यावर पिकेटिंगला उभ्या राहिलेल्या सत्याग्रही स्त्रिया, ज्यांच्या सुकुमार तळव्यांना दिवाणखान्यांतला गालिचा देखील टोचावा असल्या तरुणींनी भर उन्हात मिठाच्या सत्याग्रहासाठी केलेली पायपीट आणि पोलिसाहाती खाल्लेला मार ह्यांच्या स्मरणाने देखील आजच्या सर्वस्वी विपरीत परिस्थितीत, माझ्या बालपणी मी पाहिली होती. ती स्वप्ने होती की सत्य होते असा संदेह निर्माण होतो. मुंबईच्या लॅमिंग्टन रोड पोलिस स्टेशनपुढे सत्याग्रह्यांवर लाठीहल्ला चालू होता. बघ्यांचीही गर्दी होती. त्यातच एक स्त्री होती. अंगावर दागिने होते. तिने ते दृश्य पाहिले. अंगावरचे दागिने उतरवले. शेजारी एक अनोळखी माणूस उभा होता, त्याच्या हाती ते दागिने दिले, त्याला आपल्या घरचा पत्ता दिला आणि सांगितले, “हे दागिने माझ्या घरी पोहोचव आणि घरच्या माणसांना सांग की, मी सत्याग्रहांत दाखल झाले.'' तो माणूस म्हणाला, “पण बाई, मी अनोळखी माणूस. कुठल्या विश्‍वासाने हे दागिने तुम्ही माझ्या हाती देता? '' बाई म्हणाली, ” तुमच्या अंगावर खादी आहे ना? तेवढा विश्वास मला पुष्कळ आहे.''

आज त्याच खादीच्या संदर्भात ही कथा “अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी” सारखी वाटेल. कृष्ण गेल्यावर युद्धविजेत्या अर्जुनाला चोरांनी बदडावे आणि गांधी गेल्यावर पांढर्‍या खादीला स्वार्थाने बरबटलेल्या अभद्र वस्त्राचे, कोड फुटल्यासारखे पांढरेपण लाभावे हा काय भयानक दुर्विलास आहे! गांधीयुग एखाद्या स्वप्नासारखे संपले आणि वास्तवांत गांधीयुगान्त सुरू झाला. यंदा साजरा होत असलेला गांधीजन्मशताब्दीचा उत्सव मला तरी सुतकातल्या सणासारखा वाटतो आहे. गांधींचे आम्ही काय ठेवले आहे म्हणून आम्ही त्यांच्या जन्मशताब्दीच्या उत्सवाचा अधिकार सांगावा? सद्गुणी बापाच्या दुर्गुणी पोराने कुठल्या आधारावर पितृश्राद्ध करावे? केवळ रूढी म्हणून! नाही केले तर लोक नावे ठेवतील म्हणून! सत्ताधीशांनी तर खादी पांघरून आपले लांडगेपण दडवलेच, परंतु गांधीयोगाचा गांधीवाद करणारांनी आणि असल्या सत्ताधीशांचा सदैव आधार घेऊन जगणारांनी तर खादीचे धर्मांधांसारखे सोवळे केले. सोवळ्यातला अहंकारी ब्राह्मण आणि खादीचा पंचा नेसून स्वतःला चारचौघांपेक्षा श्रेष्ठ मानणारा गांधीवादी ह्यांत मला तरी फरक वाटत नाही. एकाने खादीचे कवच केले, दुसऱ्याने सामान्यांना दूर लोटणारे सोवळे केले.


आता तर काय? सारी सृष्टीच बदलली. पिकेटिंग करणाऱ्या बायकांनी पोलिसांच्या लाठ्यांतून फुटलेल्या रक्‍ताला कुंकू मानून दारूबाजांना परावृत्त केले होते. व्यसनमुक्‍ती लाभली नाही तरी आपण पोराबाळांना उपाशी टाकून ताडीचे मडके पोटांत रिचवतो, ह्याची लाज निर्माण होत होती. नुकतीच मी मुंबईत दादरच्या भरवस्तीत पाटी वाचली. ‘सरकारमान्य ताडी-माडी विक्री केंद्र.' आत डोकावलो असतो, तर तिथे सुताचा हार घातलेला राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटोही आढळला असता. एका बाजूला गांधीजींच्या जन्मशताब्दीचा सोहोळा, तर दुसरीकडे ताडीमाडी-विक्री केंद्राची उद्‌घाटने. आपल्या सार्वजनिक जीवनाची भयंकर परवड आहे ही! आपल्या देशाने दारूबंदी हे एक व्रत म्हणून स्वीकारले होते. व्रताच्या पालनासाठी प्राण पणाला लावावे लागतात. जीवनातली प्रत्येक गोष्ट तर्कावर घासता येत नाही. राष्ट्रीय निशाण हेही एक फडकेच असते. पण त्याच्या इज्जतीसाठी माणसे प्राण देतात. जुन्या राष्ट्रीय निशाणाचा, बूट पुसायचे फडके म्हणून, आपण वापर करीत नाही. निरनिराळया भावनेमुळे हिदू गोमांस खात नाही आणि मुसलमान सूकर भक्षण करीत नाही. प्रत्येक धर्माने टिकावासाठी अशी व्रते दिली आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात गांधीजींनीही अशी व्रते दिली होती. राष्ट्रभाषा शिकण्यापासून ते रस्ते झाडण्यापर्यंत अनेक व्रते होती. आणि सर्वदेवनमस्कार केशवाप्रत जातात, तशी ही सर्व व्रते अखेर स्वराज्याप्रत जाताहेत, अशी गांधीयुगांत लोकांची श्रद्धाही होती. फार मोठ्या प्रमाणावर आपल्या देशांत ह्या व्रतांचे पालन होत होते. मात्र जसजसे स्वराज्य दृष्टिपथात येऊ लागले आणि सत्तेच्या सिहासनांच्या अंधुक आकृत्या दिसू लागल्या, तसतसा एक एक चिरा ढासळू लागला. आपण केलेल्या त्यागाचे आता आपल्याला सामुदायिक नव्हे तर व्यक्तिगत मोल मिळायला हवे, अशी वासना होऊ लागली. चातुर्मास संपत यावा आणि अभक्ष्य भक्षणाची खायखाय सुटावी तसे झाले.

असल्या सत्तेच्या सिंहासनाची स्वप्ने पडत नव्हती फक्त गांधीजींना. त्यांना स्वतंत्र भारतात राज्यकर्ते नको होते. त्यांना हवे होते राज्यकारभार करणारे जनतेचे विश्वस्त. मत्ताधीशांना विश्‍वस्त म्हणणारे गांधी सत्ताधीशांकडूनही तीच अपेक्षा करीत होते. त्यांचे सत्याचे प्रयोग संपले नव्हते. पण आता सत्तेचे प्रयोग सुरू होतील, ह्याची चिन्हे त्यांना दिसू लागली होती. आणि म्हणूनच त्यांनी काँग्रेसच्या विसर्जनाची सूचना केली होती. हंगामी मंत्रिमंडळाच्या काळांत काँग्रेसमधल्या पुढाऱ्यांना सत्तेच्या रक्ताचे काही थेंब चाटायला मिळाले होते. सत्तेच्या तुकड्यांसाठी चाललेले ते जिभल्या चाटणे गांधींनी पाहिले होते. सत्ता आली की ती गाजवण्याचा मोह आलाच. म्हणूनच गांधीजी म्हणाले होते की, ज्याला म्हणून चांगले राहायचे आहे आणि कुठल्याही परिस्थितीत चांगले असेल तेच करायचे आहे, त्याने सत्ताधीश होता कामा नये. डॉ. झाकीरहुसेन यांना लिहिलेल्या उत्तरात गांधीजींनी स्पष्ट म्हटले आहे- “राजकीय सत्तेची प्राप्ती झाल्यावर आपल्या कामाचे बक्षिस म्हणून जर आपण सत्ता धरून बसू लागलो तर त्यात आपला अध:पात होईल.”

व्हिन्सेंट शीन ह्या त्यांच्या चित्रकाराने त्यांना स्पष्ट विचारले होते, “आपलं काय मत की, सत्ता नेहमीच अधःपाताला कारणीभूत असते?” गांधींनी एका शब्दांत तितक्याच स्पष्टपणे सांगितले, “होय!”

आणि सत्तेचा मोह काँग्रेसच्या पुढार्‍यांना सुटला नाही. भयानक रक्‍तपाताने झिजलेल्या दिल्लीमध्ये दुभंगलेल्या भारताचा स्वातंत्र्योत्सव साजरा होत होता आणि मुस्लीम लीगच्या रक्‍तपिपासू लांडगेतोडीने छिन्नविछिन्न झालेल्या, पाशवी अत्याचारांनी धाय मोकलणाऱ्या मायमाऊल्यांच्या वेदनांनी व्याकुळलेली गांधीजींची वृद्ध पावले तिथे “एकला चालो रे” करीत निघाली होती. गांधीयुगान्ताचे भेसूर शिंग स्वातंत्र्यदिनीच फुंकले गेले. ज्या मुसलमानांच्या प्रेमाने गांधींनी हिदूंचे शाप सारखे झेलले त्या मुसलमानांनी त्यांचे मानले नाही आणि भरतखंडाची शकले झाल्यामुळे हिदूंचा संताप अनावार झाला. ज्यांना गांधींनी आपले अनुयायी मानले होते, कालपर्यंत जे त्यांचे वाक्‍य वेदवाक्‍याइतके पवित्र मानीत असल्याचे दाखवीत होते, त्यांनीही आपला मार्ग बदलला. ते नव्या राजप्रसादांच्या दिशेला गेले आणि गांधीजींचा वनवास चालूच राहिला. गांधींना हवा होता तो भारतीय आदर्शातला ‘जगाचा उपभोगशून्य स्वामी असणारा राजा’. प्रत्यक्षात गोरे राज्यकते गेले आणि काळे राज्यकर्ते आले. गोऱ्यांच्या राजवटीत कागदी घोडे नाचवणार्‍या नोकरशाहीने तिकडले मुजरे इकडे केले. मुजोरी न सोडता! पुन्हा एकदा राजा आणि गुलाम हे नाते सुरू झाले. काल लोकांच्या जोडीने अनवाणी चालणारे नेते सत्तेवर येताच अलीशान बंगल्यांत राहू लागले. दारावरचा उर्मट दारवान हलला नाही. गरिबांचे राज्य आल्याची दवंडी झाली. राज्यावर बसलेला गरीब मात्र दिसेना. लोकशाहीत लोक होते तिथेच राहिले. तसेच आशाळभूत. तसेच भयग्रस्त. तसेच अडाणी तेच उपाशी. साहेबांच्या राज्यांत अगम्य इंग्रजीत कारभार चाले. स्वराज्याचा कारभारही त्याच भाषेत आणि त्याच लालफितांच्या दिरंगाईचा गुण घेऊन चालला. ब्रिटिश नोकरशाहीची लोखंडी चौकट अभंग राहिली. गांधीजींची जीवनस्पर्शी व्रते आता केवळ प्रतीकात्मक राहिली, सणासुदीला सूतकताई होऊ लागली. रस्त्यांची नावे बदलली. कडेच्या फूटपाथनिवासीयांचे निवासस्थान बदलले नाही. साहेबांचे घुतळे गेले पण नव्या पुतळ्यांच्या पायऱ्यांवर तेच दळिद्र रात्रीच्या विसाव्याला पडत होते. निधर्मी राज्याची घोषणा झाली. परंतु निवडणुकीचे उमेदवार निवडताना कग्रेसने देखील सत्पक्षाचे यश न मानता आपल्या पक्षाच्या यशावर डोळा ठेवून जात हाच विचार महत्त्वाचा मानला. संस्थाने खालसा झाली, पण करोडो खाजगी मालमत्ता असणाऱ्या संस्थानिकांना आम्हीं गलेलट्ठ तनखे दिले. कसायांना गाईनी सुरे मोडल्याची नुकसानभरपाई दिली. काही संस्थानिकांनी तर अंगावर खादीही पांघरून नव्या अधिकाराच्या जागा मिळवल्या. गांधींनी विधायक कार्य करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या सार्‍या संस्थांची संस्थाने झाली आणि प्रत्येक ठिकाणी, बाबा आमट्यांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे फक्त 'मतपेटीशी प्रणयाराधन सुरू झाले. प्रणयात आणि समरात सारेच साजून दिसते. तेव्हा तत्त्वाशी तडजोडी आल्याच! समाजोपयोगी कार्याला महत्व न राहता राज्यकर्त्यांचे प्रत्येक पाऊल निवडणुकांचे कौल आपल्या बाजूने कसे पडतील ह्याचाच फक्त विचार करून टाकण्यात येऊ लागले. कार्यसिद्धीपेक्षा कार्यप्रसिद्धीला महत्त्व आले. गांधी सामाजिक जीवनात नीती हा निरपवाद नियम म्हणून मानीत होते. आता नीती हा एक अपवाद ठरला आहे. राजसत्तेला ठाऊक असलेली नीती एकच! वारांगनेची! गांधीयुगामध्ये खरोखरीच त्यागाला मागेपुढे न पाहणाऱ्या नेत्यांनी सत्तेवर येताच तो त्याग जणू काय भावी भोगाच्या आशेने चढवलेला मुखवटा होता की काय अशी शंका येण्यासारखे अभद्र व्यवहार सुरू केले. लोकराज्यातही लोक आणि राज्यकर्ते असे तट पडले. आणि दिल्ली ही लोकधानी न होता राजधानीच झाली. निष्ठावन्त विधायक कार्यकर्त्यांनाही आश्रितांचे जिणे जगावे लागले. माधुकऱ्याच्या चौपदरीत सणासुदीला एखादी जिलेबी टाकावी तसली अनुदाने त्यांना मिळू लागली. त्यांतल्या धूर्तांनी निरनिराळया अखिल भारतीय बोर्डात आपली वर्णी लावली आणि दरिद्रीनारायणाच्या सेवेला भल्याभक्कम लांबलचक अमेरिकन् मोटारीत बसून हे महन्त हिंडू लागले. सत्याचा आणि सेवेचा धर्म खरोखरीच मानणारा एखादा गांधीयोगी कुठे तरी संडास साफ करीत, नाहीतर खादीच्या चिंध्या फाडीत वसला. एखाद्या म्हाताऱ्या बेकार नटाने उगीचच आपल्या तरुणपणीच्या भूमिकांतली भाषणे आपल्या चाळीतल्या एका खोलीच्या बिऱ्हाडी पाव्हण्यांना म्हणून दाखवावीत, तशी ह्या जुन्या निष्ठावान विधायक कार्यकर्त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या प्रवचनांची स्थिती आहे. फक्त केविलवाणी!
(अपूर्ण..)

पु. ल. देशपांडे
(गांधी जन्मशताब्दीनिमित्त 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी', पुणे, यांनी प्रसिद्ध केलेल्या 'महात्मा गांधी गौरव ग्रंथा'तून)

Thursday, October 31, 2024

चाळीची साठी - (सुनील शिरवाडकर)

१६ फेब्रुवारी १९६१.
स्थळ..भारतीय विद्या भवन,मुंबई.
'इंडियन नैशनल थिएटर'(आय एन टी) चा महोत्सव.
रिकाम्या रंगमंचावर फक्त एक कलाकार.. त्याचा एक मफलर.. आणि एक बाकडं.
बस्स एवढ्या सामग्रीवर अडिच तीन तास लोकांना खिळवुन टाकलं त्या कलाकारानी.
तो कार्यक्रम होता..'बटाट्याची चाळ'.
आणि तो सादर केला पु.ल.देशपांडे यांनी.

'बटाट्याची चाळ' चा हा पहिला प्रयोग. दोन वर्षापासून आयएनटी वाले मागे लागले होते. आपल्या महोत्सवात पु.लं.नी एखादा कार्यक्रम सादर करावा. त्यावेळी पु.ल. दिल्लीत दुरदर्शन केंद्रावर काम करत होते. त्यांना त्या कामातुन अजिबातच फुरसत मिळत नव्हती. लागोपाठ दोन वर्षे नकार दिल्यानंतर मात्र आयएनटी वाले ऐकुन घेईनात. पुलंसाठी महोत्सव पुढे ढकलण्याची तयारी त्यांनी दाखवली. मग मात्र पुलंची पुरती नाकेबंदी झाली. आणि त्यांनी या महोत्सवासाठी एक नवीन कार्यक्रम बनवण्याचे ठरवले

खरंतर 'बटाट्याची चाळ' चा हा प्रयोग...प्रयोग म्हणण्यापेक्षा या पुस्तकाचे वाचन त्यांनी तीन वर्षापुर्वीच केले होते. त्यावेळी पु.ल. लंडनमध्ये होते. बीबीसी ची कार्यपद्धती आणि ब्रिटिश रंगभूमीचा अभ्यास यासाठी माहिती आणि प्रसारण खात्याने त्यांना इंग्लंडला पाठवले होते.

लंडनमधील मराठी भाषिक दिवाळी साजरा करतात.आता पु.ल. इथे आलेलेच आहे तर त्यांनी एखादा कार्यक्रम सादर करावा अशी त्यांची इच्छा. 'कोणालाही नाराज करायचे नाही' हे पुलंचे ब्रीद.
लंडनमधील कॉर्नवॉल स्ट्रीटवरच्या एका हॉलमध्ये त्या दिवशी पु.लं.नी बटाट्याच्या चाळीतले काही भाग वाचुन दाखवले. कार्यक्रम तुफान रंगला.वाक्यावाक्याला हशा आणि टाळ्या. पुढेही कितीतरी दिवस लंडनमधील मराठी बांधवांमध्ये याच कार्यक्रमाची चर्चा.

आणि मग त्यानंतर तीन वर्षांनी झालेला 'चाळी' चा अधिक्रुत पहिला प्रयोग. त्यादिवशी खरंतर पु.लं.तापाने फणफणले होते.घशात कोरड पडलेली. सारखे विंगेत जाऊन पाणी प्यायचे.आपल्याकडुन प्रयोग होईल की नाही असंही त्यांना वाटलं.असा घोट घोट पाणी पीत केलेला तो प्रयोग अपेक्षेप्रमाणे रंगलाच असणार यात नवल नाही.

आणि मग दर शनिवार रविवार चाळीचे प्रयोग सुरु झाले. दर आठवड्याला दिल्लीहून महाराष्ट्रात यायचं..प्रयोग करायचे.. तसं पाहिलं तर हे सगळंच खुप दमवणारं होतं.पण प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादाने पु.लं.चं मन भरुन येई.

पु.लं.या प्रयोगाला'बहुरूपी खेळ' असं म्हणत.'एकपात्री' हा शब्द त्यांना आवडत नसे.जुन्या काळातील कथेकरी,किंवा किर्तनकार कशी वेगवेगळी उदाहरणे देत,गोष्टी सांगत कथा पुढे नेत..आणि मग शेवटी आपल्या मुळपदावर येत..अगदी तसाच प्रयोग पु.ल. करत.चाळीचं शेवटचं चिंतन याच प्रकारचं होतं.

चाळीच्या पुर्वार्धात 'उपास',आणि 'भ्रमणमंडळ'..तर उत्तरार्धात 'संगितिका', आणि 'चिंतन' यांचे अंश ते सादर करत.त्रिलोकेकर,कोचरेकर,काशिनाथ नाडकर्णी ही पात्र ते अक्षरशः जिवंत करीत.त्यात मधुन मधुन गायन..तेही विविध ढंगाचं.हे सगळंच तसं पाहिलं तर खुप थकवणारं होतं.आणि शेवटचं चिंतन? ते तर अक्षरशः प्रेक्षकांना हेलावून सोडत असे.

'बटाट्याची चाळ' चं बुकिंग सुरु झालं की काही तासातच हाऊसफुल्ल चा बोर्ड हॉलवर लागत असे. शेवटी ठरवण्यात आले..एका प्रेक्षकाला फक्त चारच तिकिटे मिळतील.मराठी रंगभूमी साठी हे सगळंच नवीन होतं.त्याहीपेक्षा पु.लं.साठी तर खासच.तिकिटांचे दर असायचे ७-५-३-आणि २रुपये. असं असुनही खुप मोठी रक्कम जमा व्हायची. पु.लं.च्या आयुष्यात एवढी मोठी कमाई करण्याची ही पहीलीच वेळ. सुनीताबाई तर म्हणाल्याही होत्या..
"बटाट्याची चाळ हा भाईसाठी अकाउंट पेयी चेक होता"

पु.लं.जेव्हा लंडनमध्ये होते.. तेव्हा त्यांनी एम्लिन विल्यम्स चा एक शो पाहीला होता.'A boy growing up' या नावाचा.हे असंच..एक काळा पडदा, एक खुर्ची, एक नट.अडीच तास हसु आणि आसुचा खेळ.बटाट्याच्या चाळीचा शो बसवताना त्यांच्या डोळ्यासमोर हाच एम्लिन विल्यम्स होता.तो एकदा भारतात आला. पु.लं.नी त्याला चाळीचा शो पहाण्यासाठी बोलावले. तो तर थक्कच झाला. त्याला अजुन एका गोष्टीचे कौतुक वाटले की या कलाकाराला स्क्रिप्टसाठी दुसर्या वर अवलंबुन रहावे लागत नाही.तो पु.लं ना म्हणालाही..तुझे स्क्रिप्ट तुच लिहु शकतोस ही केवढी मोठी सोय आहे.

बटाट्याच्या चाळीला पुलंना अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. पण जशी प्रेम करणारी माणसे असतात. तशी द्वेष करणारीही असतातच ना. तर अश्याच एका शो च्या मध्यंतरातली ही घटना. खरंतर मध्यंतरात पुलंना भेटायची परवानगी कोणालाही नसायची. तसा दंडकच सुनीताबाईंनी घातला होता. पुलंची एकाग्रता भंग होऊ नये हा त्यांचा उद्देश. एकदा एक तथाकथित पु.ल. भक्त मध्यंतरात आला. सुनीताबाईंना भेटला. त्याने सोबत पुलंना आवडणारा पानाचा विडा आणला होता. तो पुलंना द्यावा अशी विनंती केली. या भक्ताचा फारच आग्रह झाला. म्हणून सुनीताबाईंनी तो घेतला. आत जाताना त्यांनी तो विडा सहजच उघडून पाहिला. तर त्यात काही खिळे आणि चुका भरलेल्या होत्या. पुलंनी हे पान तोंडात घातलं असतं तर कसलं मोठं संकट ओढवलं असतं.

तर अशी ही 'बटाट्याच्या चाळी' ची कहाणी. तो शो कालांतराने पुलंनी थांबवला. पुलंनी म्हणण्यापेक्षा सुनीताबाईंनी. कारण भाईसारख्या असाधारण प्रतिभेच्या कलाकाराने आत्मत्रुप्त राहु नये.. स्वतःच्या यशाच्या आव्रुत्त्या काढत बसु नये.. नवनवीन आव्हाने स्विकारावी..आणि ती पेलावी यावर त्या ठाम होत्या. आणि मग त्यांनी बटाट्याच्या चाळीचे शो थांबवले.

बटाट्याच्या चाळीचे शो थांबले.. नंतर पु.लं ही गेले. पण ही चाळ पुस्तक रुपाने मात्र मराठी मनात कायमस्वरुपी घर करुन बसली आहे.

शेवटी जाता जाता एक आठवण..

बटाट्याच्या चाळीचा शो पाहण्यासाठी एकदा आचार्य अत्रे आले.प्रयोग संपल्यानंतर रंगमंचामागे गेले.. पु.लं.ना कडकडुन मिठी मारली. तोंडभरून कौतुकही केले. घरी गेले. एक अग्रलेखही लिहीला.त्यानंतर झोपले. पण झोप काही येईना. डोळ्यासमोर चाळ..चाळीतले भाडेकरू.. आणि ती पात्रे जिवंत करणारे पु.ल.

शेवटच्या रात्री दोन अडीचच्या सुमारास त्यांना काही राहवेना. त्यांनी थेट पु.लं.ना फोन लावला. काय चाललंय वगैरे विचारलं.

"अहो झोपलोय.रात्रीच्या दोन अडीचला सभ्य माणूस दुसरं काय करणार?
पण तुम्ही फोन कशासाठी केलाय एवढ्या रात्री?"

त्यावर अत्रे म्हणाले..

मी प्रयोग बघुन आलो.मला झोपच नाही. वा वा वा...पुल..खरं सांगु तुला,
सगळं पाहीलं..हसलो.. डोळ्यात अश्रू आले. सगळं झाल्यावर म्हटलं,आता वाटतं.."

"काय? काय वाटतं..?

"वाटतंय की झालंय माझ्या आयुष्याचं सार्थक..काय पहायचं राहीलंय?आता मी मरायला मोकळा झालो"

सुनील शिरवाडकर.
९४२३९६८३०८