Thursday, December 24, 2009

साने गुरूजी

अमळनेरला साने गुरूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पु.लंनी केलेल्या उत्स्फूर्त सुंदर भाषणातला काही भाग.

"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे. `ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा! तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!' केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खर्‍या अर्थाने आपण जगलो असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत. प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणार्‍यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दांत बोलायचे म्हणजे-

तुका म्हणे व्हावी प्राणासवे आटी
नाही तरी गोष्टी बोलू नये

अशी गुरुजींची जीवननिष्ठा. त्यांनी स्वत:ला साहित्यिक म्हणवून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरं , पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मनाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींना निसर्गाने किती सुंदर दर्शन घडते. झाडू, टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. सार्‍या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाहीतर गाण्या-बजावण्याऎवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती? गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला? मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का? जुन्या काळचे असेल तर ती बिचारी काशी यात्रेला जाईल. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की, तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण असा अर्थ करून घायला हवा. गुरुजी गेले. गुरुजींना जावेसे वाटले. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो..."

पुलंचा कंठ दाटुन आला होता. डोळ्यांत गुरुजींचेच अश्रू दाटुन आले होते. पु.लंनी स्वत:ला सावरलं. "शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी `ऊठवू सारे रान आता पेटवू सारे रान' म्हणणारा, स्त्रियांची गाणी, लोकगीतं दारोदार, खेडोपाडी फिरून माताबहिणींमधली कविता सुखदु:ख वेचून घेणारा, त्यांच्या दु:खांना सामोरं जाणारा, दलितांसाठी मंदिरं आणि माणसांच्या अंत:करणातली बंद कवाडं खुली करायला सांगणारा हा महामानव या पवित्रभूमीत राहिला आणि काळ्याकुट्ट काळोखात बोलबोलता नाहिसा झाला."

5 प्रतिक्रिया:

साळसूद पाचोळा said...

भन्नाट, अतीशय सुंदर ब्लाग आहे आपला... मी बराच वेळ ह्या पानावर शोधत होतो कि ह्या ब्लाग चा फोलोवर कसं व्हायचं ते... नाही मिळाले, तरीही मी वारंवार येत राहनार इअकडे,.. अतिशय सुदर उपक्रम आहे हा.... अगदी मनापासून.
.
आप्ला.

साळसूद पाचोळा.

Prashant said...

सुंदर.... आम्हा सगळ्यांना हा लेख उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद.

थोड्या दुरुस्त्या सुचवत आहे... जमल्यास दुरुस्ती कराच.

सूष्टीत सृष्टीत
मानण्यार्‍यातले मानणार्‍यातले
खरोखरीचं खरोखरीच


साळसूद पाचोळा,
अहो, तुम्ही फीड रीडर का नाही वापरत? जसा गुगल रीडर www.google.com/reader/ आहे एक.
यावर तुम्ही नेहमी वाचण्याचे ब्लॉग/बातम्या/इतर पानं पाहू शकता, एकाच ठिकाणी. यासाठी त्या त्या पानावरचे feeds subscribe करावे लागतील, एकदा का ते झाले, की नविन लेख आल्यावर तो दाखवणारच... विस्मरण होणार नाही.

मात्र फायरफॉक्स किंवा तसा एखादा चांगला ब्राउजर वापरा.... Internet Explorer नको, त्यात फीड ची खुण दिसतच नाही... सबस्क्राइब करणे खुपच कठीण.

दिपक said...

धन्यवाद प्रशांत,
आपण सुचवलेल्या सुधारणा केल्या आहेत. आपले सहकार्य असेच मिळत राहो ही अपेक्षा.

R.G.Jadhav said...

खरच आवडले शाळेत असताना साने गुरुजींची पुस्तक वाचली योग्य वयात ती वाचावयास मिळाली त्या पुस्तकांनी आम्हाला जगावयाचे कसे ते शिकविले . आपला ब्लोग नियमित वाचतो आणि मित्रांना देखील वाचण्यास सांगतो.
धन्यवाद.
रवी जाधव

Mohan kardekar said...

Farach chhaan Aanita alhad debate.