Friday, April 29, 2022

रसिकतेचा महापूर : आणि मी एक पूरग्रस्त

एके काळी मला प्रश्न पडायचा की, माणसं इतक्या अरसिकपणानं जगूच कशी शकतात? आयुष्यात एकाही गाण्याला न गेलेली, नाटक न पाहिलेली, क्रिकेटमध्ये काय पाहायचं म्हणून विचारणारी, हॉटेलात भूक लागली तरच जायचं असतं असं मानणारी- अशी अरसिकतेच्या क्षेत्रातली एकाचढी एक मातब्बर माणसं मी पाहिली आहेत. त्या उलट रात्र ही गाण्या-बजावण्यासाठी किंवा नाटक-सिनेमा पाहण्यासाठी किंवा (परीक्षेला न लावलेलं) मस्त पुस्तक वाचण्यासाठी निसर्गानं निर्माण केलेली सोय आहे, अशी आमची धारणा असल्यामुळे ही घनगंभीर माणसं पाहिली की, एके काळी मला भीती वाटे. आपण रसिक आहोत अशी आपली बदनामी होऊ न देण्याची खबरदारी घेत ही माणसं आपली अरसिकता कसोशीनं जपत जगायची, पण आता मात्र अमक्या अमक्याला साहित्य-संगीत-कला यात अजिबात रस वाटत नाही असं ऐकलं की त्या माणसाला कडकडून भेटावं असं मला वाटतं. असली माणसं नवकवितेतल्या प्रतिभासृष्टीबद्दल बोलायची आपल्यावर सांस्कृतिक जिम्मेदारी आहे असं मानत नाहीत. कधी बायकापोरांनी फारच टुमणं लावल्यामुळे नाटक पाहायला गेले तरी नाटककारांनी नायिका परंपरानिष्ठ रंगवली आहे, की बंडखोर रंगवली आहे, याची त्यांना काळजी पडत नाही, उलट समोर जी दिसली तिला मेकअप करणाऱ्यांनी रंगवली होती, याची त्यांना खात्री असते. नाटक पाहायला गेलं की, रडू आलं तर रडायचं, हसू आलं तर हसायचं आणि पहिला अंक पडला की बटाटेवडा खायचा एवढंच त्यांना ठाऊक असतं आणि तेवढंच पुरतं. अशी सरळ गाण्याला गाणं म्हणणारी, नाटकाला नाटक, गोष्टीला गोष्ट आणि नाचाला नाच म्हाणणारी माणसं आता अल्पमतात जायला लागली आहेत.

एके काळी माणसं इतकी कलासक्त रसिक वगैरे झाली नव्हती आणि मुख्य म्हणजे त्यामुळे आपल्याला दुय्यम नागरिकत्व येतं अशी त्यांच्या मनाला खंत नव्हती, पण आता हे रेडिओ, व्हिडिओ, टी. व्ही., टेपरेकॉर्डर, सिनेमे, नाटक, एल. पी., टी. व्ही., टेपरेकॉर्डर, सिनेमे, नाटक, एल. पी., साहित्यजत्रा, पुस्तकदिंड्या, दरमहा भरणारी नाना प्रकारची साहित्य संमेलनं, परिसंवाद या भानगडीमुळे रसिकतेची लागण न झालेला निरोगी माणूस भेटणं मुश्कीलच झालं आहे. त्यातून तुम्ही , गायक, नट वगैरे होऊन चुकलेले असलात तर तो आकाशातील प्रभूच तुमचं रक्षण करो! तुमच्याशी बोलणारा “इरेस पडतो तर बच्चमजी मीही लेखक झालो असतो” अशा थाटात स्वतःची रसिकता तुमच्यावर फेकायला लागतो. नुकताच मी एका पंचतारांकित संस्कृतीतल्या नवरसिकाच्या तावडीत सापडलो. त्याच्या बायकोला- चुकलो मिसेसना “इकेबाना'मध्ये टेरिबल इंटरेस्ट आहे. माझ्यासारख्या रायटरनं एकदा 'विथ युवर ओन आईज' रेखानं केलेली इकेबाना फ्लॉवर अरेंजमेंट पाहावी, अशी त्याची इच्छा होती. त्यावर “रेखा कोण?” हा आमचा येडपट प्रश्न. त्यावर त्या फाइव्हस्टार गृहस्थाचं “रेखा म्हणजे माय वाईफ.” त्यावर “असं असं, युवर ओन वाईफ होय?” हा आमचा 'विथ युवर ओन आईज" मधला “ओन? डोक्यात चिकटल्यामुळे झालेला भोटमपणा. एवढं सगळं यथासांग झालं. मी म्हणालो, “मला काय कळतं?” ते म्हणाले, “जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात रस घेऊन जगावं-नाही तर ती नुसती श्वास घेतल्याची आणि सोडल्याची घटना झाली - इट इज नॉट जीवन! असं आपणच म्हटलंय...” (माझ्या कुठल्यातरी लेखात बेसावधपणे लिहून गेलेलीच वाक्यं लोक लक्षात का ठेवतात कोण जाणे!) शेवटी त्याच्या इम्पोर्टेड गाडीत बसून त्याच्या अठ्ठाविसाव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये गेलो. ज्याच्या घराणातल्या दहा पिढ्यांच्या आधीपासूनचे पूर्वज हसले नसतील अशा एका गांभीर्यमूर्ती नोकरानं दार उघडलं - दिवाणखान्यात हल्ली प्रचंड कापड दुकानात दर्शनी काचेच्या मागे जिवंत बाईसारखी दिसणारी शाडूची बाई साडीबिडी नेसवून उभी करतात त्या नमुन्याची स्त्री उभी होती. असल्या बायकांना पूर्वीचे कवी 'कमनीय' वगैरे म्हणायचे. “ही रेखा”, त्यांनी आपल्या मिसेसची ओळख करून दिली. मग रेखाबाईंनी मला मेणाच्या प्रदर्शनातल्या बाहुलीसारखा कळसूत्री नमस्कार केला आणि टी. व्ही.वर आजच्या बातम्या संपल्यानंतरच्या छापील हास्यासारखं हास्य केलं.

दिवाणखाण्यात पाहावं तिकडं नाना प्रकारच्या फुलदाण्यांत रंगीबेरंगी फुलं, देठ, गवताची पाती, नाना प्रकारचे अंगविक्षेप करीत उभी करावीत तशी मांडली होती, कर्तव्यबुद्धीनं मी ती पाहत होतो. वा! छान! वगैरे म्हणत होतो. वास्तविक 'इकेबाना' हा शब्द जरा जास्त ठसक्यात उच्चारला तर मराठीत शिवी म्हणून खपून जाईल. आणि रेखाबाई मला जपानमध्ये घराणी आहेत वगैरे ऐकवत होत्या व पुन्हा आपल्यासारख्या साहित्यिकांना आम्ही काय सागणार?" हे होतंच. आम्ही चांगले चार-पाच प्रकाशक पचवलेले साहित्यिक असल्यामुळे हे वाक्य नुसतेच 'गुगली' आहे हे ओळखून होतो. तेवढ्यात त्या देवीजींनी 'आपल्या देशात फुलांचं मनोगत जाणून घ्यायची कुणालाच कशी ओढ नाही" वगैरे सांगून आपली तलम रसिकता माझ्या लक्षात आणून दिली.

'फुलांचं मनोगत' वगैरे लेखी शब्द तोंडी झालेले पाहून चमकलोतच. माझ्या डोळ्यांपुढे फुलांचा मोठासा हार विकत घेतल्यावर “साहेब, पुड्यात तुळशीची पानं टाकायची ना?” हा प्रश्न विचारणारे आमचे मामा फुलवाले आले. फुलांचा उपयोग मयत, देव आणि पुढारी या व्यतिरिक्त इतर कशासाठीही केलेला खुद्द आमच्या फुलवाल्यालाच अमान्य - फार तर लग्नात नवरा-नवरीच्या गळ्यात टाकायला आणि इथे रेखादेवी फुलांच्या मनोगताच्या गोष्टी सांगत होत्या. फुलांच्या बाबतीत देव, मयत आणि पुढारी या वास्तव्यापासून दूर असलेल्या रेखाबाईंच्या त्या अर्ध्या टक्क्याच्या संस्कृतीबद्दल चार शब्द ऐकवणार होतो. (मी चालू साडेतीन टक्‍क्‍यांच्या संस्कृतीतल्या जमाखर्चातला अर्धा टक्‍का दहाव्या मजल्याच्या वरच्या मजल्यावर राहणारांसाठी राखून ठेवला आहे.) तेवढ्यात “आपण काय घेणार?” हा आल्हाददायक प्रश्न आणि तोही नाजूक स्त्रीस्वरात ऐकू आला आणि साडेठशहाण्णव टक्क्यांचं प्रतिनिधित्व करायचं माझं अवसान एकदम गळून पडलं.

पण तो चहा, केक, बिस्किटं आणि सांजा वगैरे गोष्टी मला भलत्याच महागात लागल्या. सांजाबिजा होईपर्यंत मिस्टरांनी आणलेल्या स्टिरिओ-साऊंड-टेपडेक वगैरे भानगडीवर मला रवीची सतार आणि त्यावरचं रसग्रहण ऐकावं लागलं. या सर्व वाजंत्रीवाल्यांचा उल्लेख रवी, विलायत, झाकीर, हरी असा एकेरी सलगीनं करणं हाही एक आपल्या रसिकतेची पिचकारी ऐकणाऱ्यांच्या अंगावर उडवायचा प्रकार आहे. तेवढ्यात रेखादेवींना 'इकेबाना'च्या जोडीला कवितेतसुद्धा इंटरेस्ट असल्याचं मिस्टरांनी सांगितलं. वास्तविक फुलांचं मनोगत वगैरे शब्दयोजनेतून मला या धोक्याचा अंदाज यायला हवा होता. काय घेणार? या प्रश्नानं घोटाळा झाला होता. "आपल्यासारख्या ख्यातनाम सा साहित्यिकांना माझ्यासारखीनं स्वतःची कविता वाचून दाखवायची म्हणजे एक प्रकारचे धाडसच आहे - पण....” अशी आणखी थोडी थोडी गुगली बॉलिंग करून त्यांनी आपली वही उघडली. अठठाविसाव्या मजल्यावरून आपण खाली उडी मारली तर आपण नक्कीच मरू की नुसत्याच तंगड्या मोडतील? हा प्रश्न माझ्या मनात चटकन तरळून गेला. तोवर अत्यंत कातर स्वरात कानावर पहिली ओळ आली. बाई भलत्याच भावनाबंबाळ झाल्या होत्या. “कवितेचे नाव आहे एक उदास सांज...' माझ्या डोक्यात उगीचच “आता माझा प्रवास आहे सांज्याकडून सांजेकडे' ही ओळ उड्या मारून गेली. इकडे बाई त्या कवितेतून निर्माल्य, अश्रूफूल, वेदनांनी झुकलेली वेल वगैरे बरंच काही होत चालल्या होत्या. मी कविता ऐकण्यात तल्लीन झाल्याचा अभिनय करीत शेवटच्या ओळीची वाट पाहत होतो. किंचित अळणी असलेल्या सांज्यात काही मिनिटांपूर्वी घातलेल्या मिठाला तरी जागणं प्राप्त होतं. शेवटी त्या उदास सांजेला कवयित्री धुळीत पडलेली कळी झाल्या आणि पाच-सहा सेकंद पुढची ओळ कानावर आली नाही. तेव्हा कविता संपली असेल याची खात्री पटून (आणि सांज्याला स्मरून) “वा छान!” म्हणालो. “उगाच!” रेखादेवी म्हणाल्या. “उगाच ना. खरंच,” मी. “उगाच हे माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे!" रेखादेवी. आपण सिक्सर मारली अशा भ्रमात असलेल्या फलंदाजाला आवाज आला तो आपल्या बॅटचा नसून त्रिफळा उडाल्याचा होता, हे लक्षात आल्यावर जे काही वाटत असेल ते याहून निराळं नसणार. मग ती 'उगाच' सुरू झाली. “आज पाखरं का आली? उगाच! आज आसू का आले? उगाच! हे का झालं? उगाच! ते का झालं? उगाच! विष्णूसहस्त्रनामासारखं हे उगाच सहस्त्रनाम चालू होतं. मी नाइलाजानं त्यातल्या प्रत्येक उगाचला सलाम करीत ते उगाचच उगाळणं चालू असताना तो सगळा इम्पोर्टेड दिवाणखाना पाहून घेतला. “ही कविता म्हणायची रेखाला, कविसंमेलनात फार फर्माईश होते,” रेखापती म्हणाले. “मी मी आसू आसू झाले! डोळ्यातच बुडुनी गेले!” रेखाबाईनी आणखी एक पान उलटलं होतं. मला एक कोडं आहे. कवयित्री जितकी श्रीमंत तितकं तिच्या दु:खाचं माप जास्त. असं का? इथे चारी बाजूला घट्ट गादीतून कापूस उसवावा तशी त्या फ्लॅटमध्ये श्रीमंती उसवून बाहेर सांडत होती. आणि बाई कवितेतून सुई टोचल्यासारखी सारखी स्स-स्स-स्स करीत बसली होती. आणि तिला इतक्या सुखात ठेवणारा हा तिचा हा तिचा नवरा तिचं ते दु:ख नुसता ऐकत नव्हता तर चारचौघांना चहाबिहा देऊन ऐकवीत होता. आणि हे सारं करा पण आम्हांला रसिक म्हणा” यासाठी!

अशा वेळी सतार आणि तुणतुणं यातला फरक आपल्या बापालासुद्धा कळला नाही, असं सांगून सतारीच्या कार्यक्रमाची तिकिटं गळ्यात घालायला आलेल्या कुठल्याशा संस्थेच्या सेक्रेटरीला दारातूनच वाटेला लावणारे आमचे आप्पा सामंत मला शूरही वाटतात आणि सुखीही वाटतात. घरी जेवायला बोलावलं की सामंत वैनी ताजे फडफडीत मासे तळतात - मस्तपैकी बांगड्याची आमटी करतात. सोलाची कढी करतात- आग्रह करतात, कविता करून ऐकवीत नाहीत. आप्पा सामंत फक्त मासे या विषयावरच बोलतात. जेवताना उगीचच टेपरेकॉर्डरवर रविशंकर लाव, संतूरचं तुणतुणं चालू ठेव, भीमसेनचं (त्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे) 'हा हू' ऐकव, असला रसिकपणा उधळीत नाहीत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कुठल्याही कलेची किंवा कलावंताची सावली आपल्या अंगावर पडू दिली नाही. त्यामुळे त्यांची कुठे थयथयही झाली नाही. आहार, निद्रा, भय मैथुनाच्या मस्त पातळीवर जगत आले.

“साहित्य-संगीत-कलाविहीन माणूस हा शेपूट किंवा वशिंड नसलेला साक्षात बैल आहे,' असं कुठल्याशा सुभाषितकारांनी म्हणून घोळ करून ठेवला आहे. पण साहित्य-संगीताची आवड नसलेले बैल दु:खी असतात म्हणून कुणी सांगितलं? आणि असलंच दुःख तर ते चूपचाप भोगतात. त्याच्या कविता करून इतरांना ताप देत नाहीत किंवा आपली गरिबी, दैन्य, वेदना वगैरे साहित्याच्या बाजारात मोडून खात नाहीत.

या सर्व प्रकारांत साहित्याइतका तर बिनभांडवली धंदा नसेल. बरं, एके काळी लेखक मंडळी आपला साहित्यिकपणा ग्रंथातून किंवा मासिकातून प्रकट करायचे! आपला साहित्यिकपणा प्रकट करून “हम भी कुछ कम नही' हे दाखवायची जबाबदारी वाचकांवर हल्लीसारखी पडली नव्हती. त्यातलं सगळ्यात कीव आणणारं प्रकरण म्हणजे हल्लीच्या लडिवाळ साहित्यिक लग्नपत्रिका! “आमच्या रंजूच्या लग्नाला नक्की या हं' असल्या लाडेलाडे ओळींची संपणारी आमंत्रणपत्रिका आली की मी ते लग्न टाळतो. तसल्या पत्रिकेतून इतकं लालित्य आणि लडिवाळपणा सांडत असतो की, त्या रंजूची मम्मी आपलं स्वागत गालगुच्चा घेऊन करील आणि “आयशकलीम खाऊन जायच्यं बरं का-” असं काहीतरी करील अशी भीती मला वाटते. माझ्या डोळ्यापुढे जुन्या लग्नपत्रिका उभ्या राहतात. त्यात कुणाचं लग्न कुठे, किती वाजता सगळं स्पष्ट असायचं. साहित्यिकपणा नव्हता. उलट लग्नांना 'शरीरसंबंध' वगैरे म्हणून माणसं सत्याच्या जरा अधिक जवळ जात होती. आणि इथे माझ्या पुढ्यात एक लग्नपत्रिका पडली आहे. त्यातली पहिलीच ओळ, “ओळखा पाहू कोण आहे ते?” अशी आहे. आता नुसती पत्रिका पाहून काय ओळखणार? मी आमंत्रणपत्रिकेच्या खाली आपले नम्रबिम्न काही दिसताहेत की काय ते पाहायला लागलो. त्यात नुसतं विसू आणि नलू एवढंच होतं. विसू आणि नलू या नावाची लेबलं चिकटलेली काही डझन मनुष्यमात्रे माझ्या ओळखीची आहेत कोण हे विसू-नलू म्हणत मी ती आमंत्रणपत्रिका वाचायला सुरुवात केली आणि माझ्या प्रतिक्रिया उमटत गेल्या. “ओळखा पाहू कोण ते?” (मी नाही ओळखत-गेलात उडत.) “तुम्ही तिला पाहिली असेल पाळण्यात.” (आम्ही शेकडो पोरं पाळण्यात पाहिली आहेत.) “ऐकले असतील तिचे बोबडे बोल” (पोरांपेक्षा आयाच जास्त बोबडं बोलतात.) “आमची पिंकी एक कळी उमलते आहे.”(नो कॉमेंट्स) “पिंकी आता नववधूच्या वेशात उभी राहणार आहे,” (नववधू ही काय भानगड आहे? जुनी वधू असते का?) “पिंकीला पप्पूसारखा जीवनसाथी मिळतोय,” (आता का? नववर म्हणा की!) स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी करावी असे हे दृश्य." (देवांना दुसरा धंदा नाही.) “नक्की या हं!” (हा मराठीतला "हं कुणीतरी तडीपार करून कानडी नाहीतर गुजरातीत नेऊन टाकारे.) “तुमचे विसू आणि नलू.”

आता ही काय लग्नाची आमंत्रणपत्रिका आहे, की बेबीफूडची जाहिरात? त्या पत्रिकेवरच माझ्या प्रतिक्रिया लिहून त्या विसू-नलूला पाठवाव्या म्हणून पत्ता पाहायला लागलो, पण आपण साहित्यिकपणा मिरवायच्या नादात विसू-नलू पत्ताच काय, पण ते लग्न कुठल्या कार्यालयात आहे याचासुद्धा तपशील छापायला विसरले होते.

रसिकपणाची मी अशी हाय खाल्ल्यामुळे सांस्कृतिक सप्ताह, संगीत महोत्सव, हेमंत व्याख्यानमाला, नवरात्र महोत्सव वगैरे जाहिराती पाहिल्या की मला धडधडायला लागतं. माणसाला इतकी व्याख्यानं, गाणी, परिसंवाद, नाटकं, नाच वगैरे मिसळलेले हे इतकं सांस्कृतिक आंबोण खायची गरज आहे का?

त्यात पुन्हा शासनानं 'सांस्कृतिक खातं' काढून आणखी घोळ करून ठेवलाय, खरं तर साहित्य, संगीत कलांचा हा महापूर आवरता कसा येईल याचा विचार करायला हवा. अशाच विचारात मी एका सांस्कृतिक सप्ताहाच्या उद्धघाटनाला मुंबईला डेक्कन क्वीननं निघालो होतो. (चालू बांधिलकीच्या जमान्यात लेखकांनी स्वतः होऊन डे. क्वी.सारख्या भांडवलशाही गाडीच्या पहिल्या वर्गातून प्रवास केल्याचा जाहीर बभ्रा करू नये. गुपचूप जावे आणि कथा किंवा कविता लोकलमधून लोंबकळून जाणाऱ्यांवर लिहावी, हे साहित्यक तंत्र मी जाणतो. पण सत्य सांगायला हवे म्हणून डेक्कन क्वीनचा उल्लेख.) एक पहिलवान संघटनेचे किंवा तंबाखू अडत दुकानदार परिषदेचे अध्यक्ष वाटावेत असे गृहस्थ माझ्या शेजारच्या रिकाम्या सीटवर स्थानापन्न झाल्याच्या थाटात बसले. त्यांच्याबरोबरचा माणूस चेहऱ्यावर आदबीचा थर थापून उभा होता. काही वेळाने त्या आदबशीर गृहस्थांनी यांच्या हातात एक कागद दिला, आणि माझ्या कानावर प्रश्न पडला, “का हो भिरुंडे, हा बालगंधर्व म्हटांत तो होता कोण?” पुणे-मुंबई प्रवासात “बालगंधर्व कोण होता?” हा प्रश्न अस्सल मराठीत इतक्या खणखणीत आवाजात विचारणारा महाभाग आपल्याला प्रवासात शेजारी म्हणून लाभल्यामुळे पुढचे चारेक तास सुखात जाणार या आनंदात मी होतो, तेवढ्यात त्यांनी मलाच सवाल केला, “काय बाम्भेला निघाला का?” “हो!” “काय बिजनेस आपला?" “बिजनेस वगैरे काही नाही-पुस्तकं लिहितो.” “कितवीची?” “शालेय नाही, ललित साहित्याची लिहितो.” या उत्तराऐवजी मी नुसतं क ख ग घ ड म्हटलं असतं तरी चाललं असतं. “काय नाव?” प्रश्न आला. मी माझं नाव सांगितलं, ते त्यांच्या कानावर यापूर्वी कधीही पडलेलं नव्हतं. एके काळी मी थोडासा खट्टू झालो असतो. पण आज मी खुषीत होतो. “काय मिटिंग बिटिंगला निघाला काय?” “हो!” “तरीच फस्टक्लास. टीयेडीये असेल... स्वत:च्या पैशांनी आजकाल कोण जाईल फसमधून. आम्ही नेहमी कारनीच जातो, आज कार बोंबलली तेव्हा ट्रेननी जाणं आलं!”

“नक्की तंबाखू अडत दुकानदार परिषदेचे अध्यक्ष,' मी मनात म्हटलं.

“आपले नाव?” “आम्हाला वळखलं नाही का? भिरुंडे, सायबांना पेप्रातला फोटो दाखवा.” मग भिरूंड्यांनी पेपरातला त्यांचा फोटो दाखवला. फोटोखाली नाव होते आणि पुढे मजकूर होता. “सांस्कृतिक खात्याचे नवे मंत्री," मी, युरेका!' म्हणून ओरडायचं बाकी ठेवलं होतं.

सध्याचा सांस्कृतिक महापूर आवरायला असलंच भक्कम धरण पाहिजे होतं. रसिकतेच्या महापुरात वाहत चाललेल्या पूरग्रस्तांना हा केवढा दिलासा! साहित्य-संगीत-कला वगैरे भानगडींपासून निर्लेप राहिलेल्या त्या महा (काय) पुरुषाचं खडकी ते मसजिद बंदरपर्यंत चाललेलं घोरणं एखाद्या गवयाची दरबारातील आलापी ऐकल्यासारखी ऐकत राहिलो.

लेखक - पु. ल. देशपांडे
कालनिर्णय १९८४

2 प्रतिक्रिया: