Thursday, June 11, 2020

‘मन’ : पु.ल. नावाचं - प्रवीण दवणे

एखाद्या जिवलग मित्राची ओळख नेमकी केव्हा झाली, हे जर पन्नास वर्षांनंतर कुणी विचारले, तर ज्याप्रमाणे आपण एका मजेशीर अडचणीत सापडतो, त्याप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके भाई म्हणजे पुलं यांच्याशी माझी वाङ्मयीन मैत्री केव्हा झाली, हे आज मला सांगणे अवघड जाते. माझ्या शालेय वयात पाठ्यपुस्तके ही केवळ पाठीवर न्यायची नव्हती, तर ती वर्षानुवर्षे जपावीत अशी होती आणि भाषेचे शिक्षकसुद्धा अनुक्रमणिकेच्या पाट्या टाकणारे नव्हते. आपल्याला केवळ मराठी शिकवायला नेमलेले नसून, मुलांना भाषेची गोडी लावण्यासाठी आपली नियुक्ती आहे, असे मानणारे होते. याचा परिणाम असा झाला की, आम्ही मुले वाचू लागलो. मराठीच्या तासाची वाट पाहू लागलो. त्या वाटेवरच प्रसन्न भाषेचे एक व्यक्तिमत्त्व माझ्या विद्यार्थिआयुष्यात आले आणि अर्थातच ते व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे!’

गंमत म्हणजे आजच्याप्रमाणे लेखकांचे किंवा कवींचे फोटो धडे किंवा कवितांवर नसत, तर त्यांची रेखाचित्रे असत आणि ती पाहून आम्ही ‘लेखक दिसतो तरी कसा?’ या उत्सुकतेची तहान भागवत असू. अशा क्षणी पु. ल. देशपांडे यांचे रेखाचित्र मी पाहिले आणि त्याही वयात मनाची मिस्कीलता जपणारे त्यांचे टपोरे डोळे, गंभीरतेचा खूप प्रयत्न करूनही, सज्जातून डोकावणार्‍या दोन उनाड मुलांसारखे डोकावणारे ते दोन दात, माझ्या वय वर्षे दहा या मनावर बिंबले गेले. आणि एकतर आवडलेला धडा पुन:पुन्हा वाचावा तसा इतर लेखकांच्या रेखाचित्राहूनही अधिक वेध घेतलेला हा चेहरा, यामुळे दुसरे कुणी म्हणायच्या आतच पु. ल. हे माझे लाडके व्यक्तिमत्त्व झाले. नेमका कुठला धडा होता ते आज आठवत नाही, पण पुढील वाचनाची गोडी लागावी असे काहीतरी त्यात होते. मात्र ‘इयत्ता’ पुढे सरकल्यानंतर साधारणत: आठवी-नववीच्या वयात मी माझ्या जगण्याचेच एक अंग असावे इतक्या सहजपणे पुस्तके वाचू लागलो. याच वाचनयात्रेत ‘अपूर्वाई’ हे प्रवासवर्णन माझ्या हाती आले. जग पाहण्याच्या माझ्या उत्सुकतेची मी उघडलेली ती पहिली खिडकी होती. एकाच वेळी प्रवासाचे वाचन आणि वाचनाचा प्रवास सुरू होता. खरेतर या आधी वाचलेली प्रवासवर्णनेही एकप्रकारची देश कसा बघावा याची गाईडस् होती. परंतु, पु. ल. देशपांडे यांच्या अपूर्वाईने एक वेगळेच गारूड माझ्या मनावर केले. ते नुसते वर्णन नव्हते. प्रवासात घडणार्‍या अनेक फजिती, गडबड-गोंधळ, त्यातून उडणारी भंबेरी, स्वत:चीच घेतलेली फिरकी, यामुळे पुस्तक वाचताना मी खो खो हसत असे. हा अनुभव मला फक्त चिं. वि. जोशी यांच्या ‘चिमणरावचे चर्‍हाट’ वाचताना आला होता. इतकं निर्मळ, नितळ असं लेखन माझ्या आयुष्यात पु. लं.च्या लेखनाच्या रूपाने आले होते आणि मग काय, एकच उद्योग सुरू झाला. शाळा सुटल्यावर वाचनालयात जावे आणि पुलंचं पुस्तक तेथून घेऊन यावे आणि पहाटेपर्यंत जितके जमेल तितके वाचावे, हसावे, असा दिनक्रमच सुरू झाला. ‘पूर्वरंग’, ‘जा जरा पूर्वेकडे’ अशी प्रवासवर्णने, जगण्याचा प्रवासही प्रवासातल्या जगण्याने आनंददायी करता येतो, हे सांगून गेली.

भारावून जाऊन मी पुलंना एक पत्र लिहिले. तोपर्यंत पुलंना खाजगी नात्यात ‘भाई’ म्हणतात, हे मला कळले होते. मी आपलं वांग्याच्या झाडाने वडाच्या झाडाशी मैत्री करावी, त्याप्रमाणे त्यांना लिहिले- ती. भाईस, सा. न. वि. वि. आणि पुढे त्यांची पुस्तके मला किती आवडतात ते थोडक्यात लिहिले. पंधरा-वीस दिवस गेले असतील, मी आपला उत्सुकतेनी पुलंचं दोन ओळींचं तरी उत्तर येईल म्हणून चातकासारखी वाट पाहात राहिलो. माझ्यासारख्या बारा-तेरा वर्षांच्या मुलाला पुलं कसले उत्तर देतात या कल्पनेने, अर्थातच त्यांना मी पत्र पाठवले हेही मी विसरून गेलो आणि ते विसरल्यामुळेच की काय, एका संध्याकाळी शाळेतून मी घरी परतताच, हाती नजराणा द्यावा त्याप्रमाणे माझ्या आईनेच मला एक पत्र ‘नजर’ केले. आतापर्यंत जो वाक्प्रचार मी मराठीच्या उत्तरपत्रिकेत एका गुणासाठी उपयोगात आणला होता तो वाक्प्रचार मी साक्षात जगत होतो. अर्थात ‘आनंद गगनात मावेनासा होणे’ हा तो वाक्प्रचार होता. अवघ्या मराठी मनाला भुरळ पाडणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अक्षरश: माझ्यासमोर होते. त्या पत्राच्या तीन-चार ओळीतसुद्धा भाईंनी माझी एक चूक जिव्हाळ्यानी काढली होती. भाईंनी लिहिले होते, चि. प्रवीण, अनेक आशीर्वाद. तू मला ‘ती.’ केल्यामुळे मी तुला ‘चि.’ करणे ओघानेच आले. माणसाने विनम्र असलेच पाहिजे; पण प्रवीणमधला ‘वी’ हा दीर्घच असला पाहिजे. तुझ्या पत्राला उत्तर देण्यास विलंब झाला, कारण काही महिने मी बंगालच्या दौर्‍यावर होतो. आणि पत्राच्या शेवटी ‘तुझा भाई’ असे मायेने लिहून स्वाक्षरी केली होती. पुलंच्या या पत्रामुळे मी चांगलाच धीटावलो आणि अधूनमधून पत्रं पाठवीत राहिलो.

का कोण जाणे, पुलंच्या केवळ लेखनामुळेच मला त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटली नाही, तर त्यांची पत्रे, त्यांची भाषणे, दूरदर्शनवरील त्यांच्या मुलाखती, कथाकथने हे सारेच मायेने ओतप्रोत आहे, हे मला जाणवले. पुलंना भरपूर ऐकण्याचा एक वेगळाच योग तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामुळे आम्हा भाग्यवंतांना लाभला. आपण ओळखलेच असेल, आणिबाणीचे काळेकुट्ट पर्व देशात सुरू झाले आणि मेणाहून मऊ असलेले पुलं वज्राहून कठीण कसे आहेत, याचे प्रत्यक्ष दर्शन महाराष्ट्राला घडले.

मला आठवतं, त्याच वेळी यशवंतराव चव्हाण आणि पु. ल. देशपांडे यांच्यातही शाब्दिक चकमक रंगली होती. यशवंतरावांची आणि पुलंची मैत्री होती व नाते जिव्हाळ्याचे होते; तरीही आपली मते परखडपणे मांडताना ही मैत्री आड आली नाही. त्याच वेळी दुर्गाबाई भागवत कराडच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या. दुर्गाबाई आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील वैचारिक मतभेद, ही जशी माझ्यासारख्या तरुण वाचकांना पर्वणी होती, तशीच त्याच संमेलनात पु. ल. देशपांडे यांनी केलेले भाषण हेसुद्धा माझ्यासाठी शब्दांची आणि विचारांची दिवाळी होती! इचलकरंजी येथील पुलंचे अध्यक्षीय भाषण म्हणजे प्रसन्न आणि खुमासदार शब्दांत किती ‘गंभीर’ बोलता येते, याचा नमुना होता. पुलंवरचे माझे प्रेम असे वेगवेगळ्या प्रकारे अधिक अधिक दृढ होत गेले. एक वेडच लागले म्हणा ना, जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे पुलंना पाहावे, त्यांना ऐकावे, त्यांना वाचावे, असे झपाटलेपण माझ्याच नव्हे, तर माझ्या पिढीतील असंख्य तरुणांमध्ये दाटून येत गेले. दरम्यान एक विद्यार्थी म्हणून मी पुलंना पत्र पाठवीत गेलो आणि मला त्यांची उत्तरेही येत गेली. इतकी लोकप्रियता आणि वेळेची व्यग्रता असूनही पुलं माझ्यासारख्या विद्यार्थ्याला उत्तर देत होते, याचे आजही मला नवल वाटते. त्याच दरम्यान एक अगदी दुर्मिळ आनंदयोग योगायोनानेच माझ्या वाट्याला आला तो म्हणजे, परमपूज्य बाबा आमटे यांच्या आनंदवनात जाण्याचा. कोण असावे तेथे? तर साक्षात पु. ल. देशपांडे! प्राचार्य राम शेवाळकर आणि पु. ल. देशपांडे दैवतासारखे समोर आहेत आणि आनंदवनाच्या गाभार्‍यात, स्वागताला बाबा आमटे आहेत. तीन दिवस त्यांच्यासह मी होतो. बालतरूची पालखी घेऊन त्याचे भोई कोण? तर पुलं आणि राम शेवाळकर. आनंदवनाच्या कार्याबद्दल भाईंनी काढलेले उद्गार आजही कानात गुंजत आहेत. भाई म्हणाले होते- ‘‘उद्ध्वस्त माती आणि उद्ध्वस्त माणूस यांचे नाते जोडण्याचे काम बाबांनी केले.’’ पुलंच्या वक्तृत्वाचा एक निराळाच नमुना मी थक्क होऊन अनुभवत होतो. त्यात पुलंना वाटणारी सामाजिक कार्याची तळमळ, परमपूज्य बाबांबद्दल वाटणारी श्रद्धा, उपेक्षितांबद्दल वाटणारी आस्था, या सगळ्याचा माझ्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला की, त्यांच्या अवघ्या लेखनाकडे बघण्याची माझी दृष्टीच बदलून गेली. लोक म्हणतात तसे पुलं हे केवळ विनोदी लेखक नाहीत, तर विलक्षण करुणा असलेले हे एक सहृदय व्यक्तिमत्त्व आहे, या दृष्टीने मी त्यांचे लेखन वाचू लागलो. पुन्हा एकदा त्यांचे आधीचे लेखन वाचताना मला जाणवले, सर्कशीतल्या सर्वांना हसवणार्‍या विदुषकाच्या डोळ्यांतही अश्रू दिसावा, त्याप्रमाणे हे लेखन कारुण्याने मनाला अंतर्मुख करणारे आहे.

पुलंची व्यक्तिचित्रे, वार्‍यावरची वरात आणि बटाट्याची चाळ यासारखे स्वत:शी व समाजाशी केलेले मुक्तचिंतन मी पुन्हा नव्याने वाचले. एकीकडे त्यांच्या सभांच्या लोकप्रियतेमुळे आणि पुस्तकाच्या प्रचंड खपामुळे, त्यांना लेखकच न मानणारा साहित्यातला न्यूनगंडाने पछाडलेला साहित्यिकांचा आणि समीक्षकांचा एक वर्ग मी बघत होतो आणि दुसरीकडे समाजाला जीवनावर भरभरून प्रेम करायला लावणारा, सांस्कृतिक मूल्ये मानणारा, केवळ स्वत:च्याच साहित्यावर प्रेम न करता अगदी नव्या लेखकांनाही भरभरून दाद देणारा खराखुरा माणूस मी पाहात होतो.
माझे वयच असे होते की, नवे काही चांगले ऐकले की मन तुडुंब भरून यायचे. कधी कुणी टीका केली की मतेही बदलत जायची. श्रद्धांच्या मोडतोडीचा हा काळ नव्या लेखकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ असतो. पुलं, दुर्गाबाई भागवत, गंगाधर गाडगीळ, चिं. त्र्यं. खानोलकर, जयवंत दळवी ही माझी तेव्हा साहित्यातील दैवते होती. त्यांच्यामध्येही मतभेद होतेच, पण कुठेही कडवटपणा नव्हता. म्हणूनच परस्परांतील मतभेदांचा परिणाम त्यांच्याबद्दलच्या वाटणार्‍या ओढीतच झाला. कुसुमाग्रज, बोरकर ही जशी कवितेतील दैवते त्याचप्रमाणे पुलं, गाडगीळ, खांडेकर ही गद्य लेखनातील दैवतेच ठरली. ही मंडळी केवळ उत्तम लेखकच होती असे नाही, तर त्यांच्या लेखनातून समाज सुसंस्कृत करण्याचे एक वेगळेच सामर्थ्य होते.

कामवलेल्या, रियाझी गळ्याच्या गवयाचे साधे गुणगुणणेही संमोहक वाटते. पुलंचे अगदी साधे बोलणेही तसे वाटायचे. काय त्या स्वरात जादू होती ते पुलच जाणे! कारण ‘देव जाणे’ म्हणण्याची पंचाईत; कारण रूढ अर्थाने ते देवभोळे नव्हते, पण देवत्व मात्र मानणारे होते. देवमाणूस जाणणारे होते. पंढरपुरीचा विठोबा पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू येत; कारण त्याच्या पायांवर ज्ञानेश्‍वर, तुकारामांनी माथा टेकला आहे, त्यांचे स्पर्श तेथे रेंगाळलेत, हा भाव त्यांच्या मनात दाटून येई. पुलं समजून घेताना त्यांचं हे हळवेपण समजून घ्यायला हवं.

अध्यापनाच्या आरंभीच्या काळात मी जरा जास्तच प्रयोगशील होतो. त्या जरा ‘जास्तीच्या’ उत्साहात मी केलेले प्रयोग कसे होते, याचा एक नमुना मला इथे सांगायचा आहे. वर्गात पुलंचा ‘अंतुबर्वा’ शिकवल्यानंतर पुलभक्तीची एक वेडी लाट वर्गात उसळली. अर्थात ही किमया पुलंच्या लेखणीची होती. त्या भरात मी विद्यार्थ्यांना पुलंच्या घराचा पत्ता देऊन म्हटले, त्यांना पत्र लिहा. त्यांच्या लेखनाने तुम्हाला दिलेला आनंद त्यांना कळवा. त्या काळात विद्यार्थी जरा विशेषच आज्ञाधारक होते. दोन वर्गांतील जवळजवळ दीड- दोनशे विद्यार्थ्यांनी भरभरून पत्रं लिहिली. पंधरा-वीस जेमतेम गेले असतील. दहा-पंधरा मुला-मुलींचा घोळका रोज ‘स्टाफरूम’मध्ये जमू लागला. माझी लोकप्रियता अचानक वाढल्याचे सावट स्टाफरूममध्ये पसरले. पण, ती किमया पुलंची होती. मुलांच्या हाती पत्रं होती आणि ती पुलंची त्यांना आलेली उत्तरे होती. हा सोहळा पाच-सात दिवस सुरू होता. पुलंनी सर्व मुलांना वेगवेगळी उत्तरे- त्यांच्या पत्रातील मजकुराचा सूर धरून लिहिली होती. (आजही ती आता पन्नाशीची झालेली मुले भेटतात-त्या पत्रांजलीने गहिवरतात.) गंमत म्हणजे रवींद्र नाट्यमंदिरातील त्यांच्या षष्ट्यब्दीला ‘चतुरंग- मुंबई’ या संस्थेने त्यांची थेट मुलाखत आयोजित केली होती. मी त्यातील एक मुलाखतकार होतो. पुलंच्या पत्रव्यवहारातील तत्परतेबद्दलचा प्रश्‍न विचारताना मी जाहीरपणे हा दीडशे पत्रांच्या प्रयोगाचा किस्सा सांगितला, तेव्हा पुल मिस्कीलपणे डोळे वटारून म्हणाले, ‘‘बरा सापडलास! तो अघोरी प्रयोग माझ्यावर करणारा तूच का तो!’’ नाट्यगृह हास्यरसात कल्लोळत राहिले. आता या गोड माणसाशी प्रत्यक्षही छान सूर जुळले होते; तरीही मी आदराने भान व मर्यादेचे अंतर राखून होतो. त्यात सुनीताबाईंचा सर्वश्रुत धाक- याचे एक कारण होतेच.

तरीही तो न जुमानता एकदा मी जरा ‘अधिकपणा’ केलाच. निमित्तही मजेशीर होतं. आळंदीला माउलीचं दर्शन घेऊन मी न माझे प्राध्यापक मित्र प्रा. दत्तात्रेय चितळे व मेव्हणे प्रशांत देशमुख पुण्यातून फिरत होतो. अचानक ते म्हणाले, ‘‘सर, अंतिम वाटावी अशी माझी एक इच्छा आहे.’’ मी थोडा चपापलोच. एवढा उत्साही माणूस एकाएकी असं का बरं म्हणतो आहे? बरं, आमचा दिवसही तसा छान गेला होता. मी फक्त प्रश्‍नार्थक पाहिले. ते म्हणाले, ‘‘एकदा- फक्त एकदा- पुलंना पाहायचंय. दुरून का होईना, बस्स् एकदा योग आणाच.’’ चितळेसरांचं पुलप्रेम मनापासून होतं, हे मला माहीत होतं. आता त्यांच्या स्वरातील ‘पुल’कित भाव मला स्पर्शून गेला होता. पंधरा-वीस पावलं जेमतेम मी चाललो. विचार करीत नि एकदम रस्त्यालगतच्या फुलवाल्याकडून पुष्पगुच्छ घेतला नि रिक्षाला हात केला. चितळेसरांना तर काय घडतंय हेच कळेना. रिक्षाचालकाला मी फर्मावले- ‘‘कमला नेहरू पार्क, रूपाली.’’ चितळेसर तर केवळ नि:शब्द होते. अवाक् व्हायला काही क्षण होते. काही मिनिटांत आम्ही एका दरवाजासमोर उभे होतो. पाटी होती. पु. ल. देशपांडे. स्वाक्षरी शैलीतील ती पाटी. बेल दाबली. अपेक्षेप्रमाणे सुनीताबाईंनीच दरवाजा उघडला. माझी धडधड वाढली. इतर दोघांचे काय झाले मला कळले नाही. मी नाव सांगताच सुनीताबाईंनी हसल्यासारखे केले.

‘‘फोन करून यायला हवे होते.’’
‘‘फोन नंबर नव्हता.’’
‘‘त्यासाठी आपल्याकडे डिरेक्टरीची सोय असते.’’
‘‘सुचलं नाही.’’
‘‘मग निदान वन् नाइन् सेव्हन्ला विचारून फोन नंबर घ्यायला हवा होता.’’
‘‘फक्त पाचच मिनिटं.’’
‘‘जो लेखक आवडतो- त्याच्या आरोग्यासाठीच त्यांना आरामाची गरज ओळखून मी म्हणतेय.’’
सगळी झाडमपट्टी सोसल्यावर एकदम चित्र पालटले. समोर खुर्चीत चक्क पुल! डोळ्यात तेच उत्साही बुद्धिमान मूल! चेहर्‍यावर केवढं निर्मळ हासू!

चॅर्ली चॅपलीनला पाहिल्यावर पुलंना जो अपरिमित व अवाक् करणारा आनंद झाला होता- प्रा. चितळे यांच्या चेहर्‍यावर तोच भाव होता. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते नि त्यांनी पुलंचे पाय धरून चक्क साष्टांग नमस्कार घातला. शब्दातीत असं ते भक्तिचित्र मी जन्मात विसरणार नाही. पार्किन्सनने कंप पावणारे हात- त्यांनाही दाटून आलेले- असे पुल मला म्हणाले, ‘‘प्रवीण, अरे हा इतका वाकलाय की त्याच्या वाकण्यापुढे मला वाकावं लागतंय.’’ आणि त्या भावकल्लोळातही हास्यकल्लोळ झाला. संध्याछाया नुसत्याच ‘भिववू’ लागण्याच्याच नव्हे, तर- ओढू लागण्याच्या वाटेवरही ‘पुल नावाचं एक मन’ केवढं प्रसन्न होतं. खरंच, पुलंच्या माणूसपणाची थोरवी मराठी मन निरंतर गातच राहीन.
मी एवढंच म्हणेन-
पुल असताना मी जन्माला आलो, त्यांना पाहता आलं, त्यांच्याशी बोलता आलं, त्यांचा हात पाठीवरून फिरला. माझ्यासारख्या मराठी भाषेच्या एका रसिकाला दुसरं अजून काय हवं असतं…!
प्रवीण दवणे
https://tarunbharat.org/?p=69307

1 प्रतिक्रिया:

स्वातीची लेखणी https://swatichilekhni.blogspot.com said...

मस्त... पु. ल.सहवास...आपल्या आठवणीत आम्हीही थोडा पु.ल.सहवास भोगला. उत्कृष्ट लिखाण🙏✍️👏