Monday, November 28, 2016

पुलंचं लिखाण 'पाहिलं' तेव्हा..

आज पुलंचा वाढदिवस.

पुलंनी लिहिलेली अनेक वाक्य आपल्याला तोंडपाठ आहेत. पण तीच वाक्य मूळ स्वरूपात - पुलं च्याच हस्ताक्षरात लिहिलेली मी जेव्हा पाहिली तेव्हाची ही गोष्ट.


२००७
प्रोजेक्ट मॅनेजर ला "मी घरी चाललोय" असं डायरेक्ट तोंडावर सांगून असुरी आनंदानं ऑफिस मधून बाहेर पडलो आणि फोर्ट च्या दिशेने निघालो. 'एशियाटिक सोसायटी' आत्तापर्यंत सिनेमात पहिली होती आणि एक दोनदा बाहेरून. अर्थात मी उड्या मारत पोहोचलो तरी 'तिथे आपल्याला आत सोडतील का?' हा एक प्रश्न डोक्यात होताच. तिथे कोणी आपल्याला उगाच ओरडेल अशी भीती वाटत होती. पण तसं कोणी ओरडलं नाही. एका छोट्याश्या हॉलकडे जाणाऱ्या बाजूला बोर्डवर माहिती लिहिली होती. मी आत गेलो कोणी अडवल नाही...
संपूर्ण हॉल मध्ये भिंती कडेला काचेच्या काउंटर मांडले होते आणि त्याखाली होती ती सोनेरी पानं. पुलं नी लिहिलेली महत्वाची ओळ आणि ओळ. लिखाण करताना मध्ये काही भागावर खुणा, सुधारणा, भाषणाचे मुद्दे बहुदा ते स्टेज वर बसल्या बसल्या लिहिलेले, अतिशय त्रोटक नुसत्या विषयांची सुरुवात करणारे, गरुड छाप, गरुड छाप , गरुड छाप ... त्यांच्या नाटकाच्या संहिता, वह्या डायऱ्या. वेड्यासारख्या पुन्हा पुन्हा पाहत होतो. बरंच लिखाण भाषणं ओळखीची पण मूळ स्वरूपात जेव्हा आणि ज्या ठिकाणी ती पहिल्यांदा उमटली, त्या स्वरूपात पाहणं हा अनुभव मला साठवून ठेवायचा होता.

त्या वेळेस काही कार्यक्रम होते. आता सगळ्यांची नावं आठवत नाहीत. पण एका काकांनी हिंदी मधलं 'पानवाला' वाचून दाखवलं.
भारत दाभोळकर, विजू खोटे आणि किशोर प्रधान यांनी "तुज आहे तुजपाशी" चे इंग्लिश व्हर्जन सादर केलं. अशोक रानडे यांनी पुलं दुसऱ्याचे गाणं कसं ऐकायचे, श्रोता म्हणून ते कसे होते याबददल सांगितलं. पुलंच्या लिखाणाच्या मध्ये बसून ३०-४० लोकांसमोर ते कार्यक्रम झाले. दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळॆ कार्यक्रम संपले तेव्हा पुन्हा एकदा मी सगळं लिखाण पाहत पाहत हॉल मधून फिरत होतो. एका डायरीच्या पानावर 'म्हैस' होती आणि त्या काउंटरची काच खालच्या बाजूने फुटलेली होती. हळूच थोडा हात आत घालून त्या पानांवर बोटं टेकवली आणि स्वतःच्या वेडेपणावर हसलो.

बाहेर यायला लागलो तर एका मुलानं हाक मारली.

हॅलो, एक नवीन न्यूज चॅनेल येतोय 'IBN लोकमत' नावाचा, त्यासाठी आम्ही बाइट्स घेतोय.
मी म्हटले "अहो पण मी काय बोलू?" आणि बाकी बरेच मोठे लोक आहेत त्यांचे घ्या बाइट्स.
(आमच्या पलीकडे अभिनेत्री इला भाटे होत्या त्यांच्याकडे मी हात केला.)
नाही ते आम्ही घेऊच पण आम्हाला यंग ऑडियन्स हवाय, (आणि त्या हॉल मध्ये सु किंवा दुर्दैवाने मी एकटाच यंग होतो )

"तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगू शकता का? तुम्हाला जे वाटतं ते बोला."

माझा जसा न्यूज बाईट देण्याचा पहिलाच अनुभव होता तसा त्या दोघांचंही असावा.
कारण इकडून लाईट येत नाहीये तिकडे उभे राहू, तुम्हाला ही बॅकग्राऊंड हवी असेल तर मी इथे उभा राहतो वगैरे एकमेकांच्या साहाय्याने तो बाईट दिला.

"लहानपणी पुण्यातच मी पहिल्यांदा म्हैस ची कॅसेट ऐकली तेव्हा काही समजलं काही नाही पण पुढे मात्र जितके मिळत गेलं तितके वाचत ऐकत गेलो, पुण्यात शिकायला आलो तेव्हा मालती माधव समोरून बरेचदा चालत गेलो पण आत जायची हिम्मत झाली नाही. ज्या दिवशी पुल गेले त्यादिवशी मेस मध्ये जाऊन मी नुसताच टीव्ही पाहत बसलो होतो. तेव्हाही प्रत्यक्ष जायला नको वाटलं होतं. पण आज ही अशी भेट झाली वगैरे वगैरे..."

आजही कोणाला हे लिखाण पाहायचे असेल तर एशियाटिक सोसायटीशी संपर्क करून पाहू शकता.
कदाचित अधिक माहिती त्यांच्या वेब साईट वर मिळेल.

८ नोव्हेंबर २०१६
हर्षद गोडबोले

3 प्रतिक्रिया:

शब्दांच्या पलिकडले said...

Thank you so much..
ata jevha mumbai la jaen tevha Asiatic Society madhe nakki bhet denar..

Unknown said...

"पुलंचं लिखाण 'पाहिलं' तेव्हा.."
ही पोस्ट वाचली आणी खुप छान वाटलं!
आता जेव्हा एशियाटीक लायब्ररीत जाणे होईल, तेव्हा निश्चितच पाहीन!

अश्विनी said...

इथे का नाही देत?
सगळ्यांनाच तिथे जायला जमेल असे नाही.